९८ धावांची दमदार खेळी: नांदेडचे आजोबा

Submitted by मार्गी on 27 July, 2023 - 06:17

सर्वांना नमस्कार. कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला वक्ता म्हणून एखाद्याला बोलावलं जातं. त्याचं भाषण झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की तो माणूस कोण ज्याने ह्या वक्त्याला बोलावलं! काहीसं तसंच पण वेगळ्या अर्थाने. माझे नांदेडचे आजोबा- श्री. गजानन महादेव फाटक ह्यांचं जगणं बघताना हाच प्रश्न मनात येतो आणि आश्चर्य वाटत राहतं की- बनानेवाले ने क्या खूब बनाया है! अतिशय वेगळं आणि काहीसं दुर्मिळ जगणं ते जगले. कधी कधी ९८ धावांवर एखादी इनिंग थांबते कारण वेळच संपून जातो. फलंदाज नाबादच राहतो. तसं त्यांचं जगणं आहे असं मनात येतं. शतक पूर्ण झालं नाही ही हुरहुर क्षणापुरती मनात येते आणि मग ती दमदार खेळी डोळ्यांपुढे येते. परवा २४ जुलैला ही नाबाद इनिंग अखेर थांबली. १३ मे १९२५ ला सुरू झालेलं एक पर्व जणू‌ संपलं. त्यांचा नातू म्हणून मनात येणा-या आठवणी व्यक्त करण्याचा हा प्रयत्न.

लहानपणापासून मी त्यांना नांदेडचे आजोबा म्हणायचो. आईचे आई- बाबा हे आजी- आजोबा जरा जास्त जवळचे असतात, कारण त्यांचा सहवास कमी लाभतो आणि जेव्हा लाभतो तेव्हा लाड जास्त होतात आणि बोलणी कमी खावी लागतात. लहानपणापासून त्यांचं कडक वागणं बघायला मिळालं. अर्थात् माझ्या जन्माच्या आधीच म्हणजे १९८३ मध्ये ते नांदेडच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या आधीच्या आयुष्यातले अनेक प्रसंग त्यांच्याकडून ऐकायला मिळाले होते. जुन्या आठवणी, किस्से, प्रसंग सांगण्याचा त्यांचा उत्साह खूप होता! अरे आनंद, का रे नंदन, अशी सुरूवात करून एक एक गोष्टी ते सांगायचे. पुतण्यांची जवाबदारी लवकर खांद्यावर आल्यामुळे त्यांनी सुरूवातीला डिप्लोमा करून रेल्वेतली नोकरी केली होती. संघाशी जवळून संबंध होता आणि तेव्हा १९४८ मध्ये सत्याग्रहसुद्धा केला होता. त्यानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि नंतरच्या आयुष्यात नांदेडमध्ये प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून काम केलं.

त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण करतानाचा सांगितलेला एक किस्सा खूप लक्षात राहिला. काही वर्षांच्या गॅपनंतर त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. तेव्हा त्यांचा संसार व नोकरी सुरू झालेली होती. पहिल्या वर्षी गणिताच्या परीक्षेत त्यांना १०० पैकी केवळ ३ गुण मिळाले होते. तेव्हा ते स्वत:वर कमालीचे नाराज झाले होते. "अरे निरंजन, तुला सांगतो मला स्वत:ची भयंकर लाज वाटत होती. इतकं माझं गणित कसं बिघडलं असं वाटत होतं." तेव्हा त्यांनी ठरवलं की, मी मेहनत घेईन आणि गणितात उत्तीर्ण होईनच. मग त्यांच्या शिक्षकांची त्यांनी मदत घेतली. त्यांना सांगितलं की, मला वर्गातलं खूप फास्ट असल्यामुळे नीट कळत नाही. तुम्ही मला ट्युशनसारखं शिकवा. मग त्या शिक्षकांनी त्यांच्या सर्व मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या. आजोबांनी अभ्यास सतत सुरू ठेवला. पुढे करत राहिले. "निरंजन, तुला सांगतो पुढच्या सेमिस्टरला मला ४८ मार्क्स मिळाले! अगदी फर्स्ट क्लास नाही, पण मी पास झालो!" आणि त्यांची गणिताची आवड इतकी पक्की की पुढे जेव्हा माझं गणित दहावी- बारावीच्या पातळीपर्यंत गेलं तेव्हा ते मलाही प्रश्न द्यायचे. "कारे निरंजन, हे बघ जरा. तुला सुटतंय का पहा," असं म्हणून एखादं मोठं समीकरण किंवा त्रिकोणमितीतील्या आकृत्या सांगायचे. तेही त्या गणिताला सोडवत राहायचे आणि मलाही सोडवायला लावायचे!

नातू ह्या नात्याने त्यांना बघताना आणि अनुभवताना त्यांच्या जगण्यातली खोली आणि व्याप्ती जाणवायची. अनेकदा त्यांना विचारायचो की, देशात इंग्रज होते तेव्हा कसं होतं? नेताजी बोस, दुसरं महायुद्ध वगैरे तुम्हांला कसं वाटत होतं? त्यांना फक्त विचारलं की पुढे सविस्तर किस्से ऐकायला हमखास मिळायचे! आणि अशीच माझी नांदेडची आजी होती- सौ. कालिंदी फाटक. लहापणी किंवा तरुणपणी तिच्या गोष्टी किती वेगळ्या होत्या हे जाणवायचं नाही. पण एखाद्या छोट्या शहरातली उच्च शिक्षित- एमए साहित्य अशी शिक्षिका किती वेगळं काम करते, तिच्या अशा वेगळ्या प्रकारच्या कामामध्ये संघर्ष किती असतील ह्याची कल्पना खरं तर नंतर येत गेली. आणि आताही हे हळु हळु कळतंय. काही गोष्टी अशा असतात की, त्या घडून तर आधी जातात पण आपल्याला कळत नंतर जातात. आजीने सांगितलेला एक प्रसंग खूप आठवतो. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये तिचा सहभाग होता. एकदा एका वस्तीत काम करताना तिने एका बाईला विचारलं की, तुम्ही भाजी एवढी तिखट का करता? छोट्या मुलांना हे सहन होत नाही. त्यावर त्या स्त्रीने आजीला सांगितलं की, भाजी एवढी तिखट करतो म्हणूनच एक वाटी भाजी सगळ्यांना पुरते! कारण मुलं भाजी कमी खातात आणि पाणीच जास्त पितात. तिखट कमी केलं तर भाजी पुरणारच नाही. त्या दिवशी मला गरीबी कळाली, असं आजी म्हणायची. आजीबद्दल वेगळं नंतर कधी लिहेन.

आजोबा अतिशय शिस्तीचे आणि रोखठोक वागणारे. आणि फटकळसुद्धा. त्यामुळे अघळपघळपणाला अजिबात स्थान नाही. अगदी प्रत्येक गोष्ट मोजून मापून. ह्याचा फटका माझ्या दोन्ही मामांना बसायचा. नंदन मामाला (नंदन फाटक) आयआयटीमध्ये मिळालेला प्रवेश आजोबांनी रद्द करून सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायला लावला. आनंद मामाला (डॉ. आनंद फाटक) ९ वर्षं प्रचारक व नंतर वनवासी कल्याण आश्रमाचं काम करू दिलं पण कधी त्याच्या गाडी चालवण्याच्या कौशल्यावर विश्वास ठेवला नाही. काहीशी तीच गोष्ट त्यांच्या संध्याताईची. आई म्हणजे सौ. संध्या गिरीश वेलणकर- त्यांची संध्याताई. आई स्कूटर शिकताना पडली आणि तिला लागलं. त्यामुळे नंतर कधीही त्यांनी तिला स्कूटर चालवू दिली नाही. आयुष्यातल्या ब-या वाईट अनुभवांमधून आलेली ही काही टोकाची मतं असतील. किंवा त्यांच्या मनाच्या गणितातले वेगळे समीकरणं असतील. असा टोकाचा आग्रह असला तरी त्यासोबत काळजीही असायची. एका बाजूला इतके फटकळ असले तरी आईची काळजीही तितकेच करायचे. त्यांच्या फटकळपणाबद्दल इतकंच म्हणेन की, माझी "भ च्या बाराखडीची" ओळख त्यांनीच करून दिली. प्रसंगी समोरच्या माणसावर टीकेचा भडीमार जरी करत असले तरी त्याबरोबर त्याच्याकडे लक्षही ते ठेवायचे. काही बाबतीत टोकाचे कठोर असूनही अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली. त्या काळात जातीच्या भिंती मोडून गरजूंना जमेल ती मदत केली. शीघ्रकोपी असले तरी तरूण मुलांसाठी फिल्मफेअर आणायचे! नंतरच्या काळात नातवंडांसाठी खेळणीही आणायचे. त्यांचेही लाड करायचे.

नांदेडचं भाग्यनगरमधलं घर अजूनही डोळ्यांपुढे आहे. तिथे पहाटे लवकर उठून खणखणीत आवाजातली पूजा ते करताना दिसतात. त्यानंतर नॅशनल पॅनासॉनिक रेडिओवरच्या बीबीसी बातम्या ते ऐकतात. त्यांच्या उठण्या- बसण्यात इतरांसाठी एक दरारा असतो. घरात काम करण्यासाठी येणा-या मावशी, बाहेरचे लोक, दुरुस्तीसाठी येणारे मॅकेनिक अशा सगळ्यांना त्यांची झळ लागते! माझी अजून एक आठवण म्हणजे माझ्या अपेंडिक्स ऑपरेशनच्या वेळेस ते लगेचच मला बघायला परभणीला आले होते. दुस-या दिवशी डोळे उघडल्यावर समोर आधी तेच दिसलेले आठवतात.

एक खराखुरा गणित- यंत्रप्रेमी जगेल तसं त्यांचं जगणं होतं. त्याबरोबर मोठी आणि गजराची घड्याळं ते बघायचे, सतत बारीक सारीक दुरुस्ती करत राहायचे! हातोडा, स्क्रू ड्रायव्हर हे तर त्यांचे खास मित्र! वयाच्या अगदी नव्वदीपर्यंत ते सतत काही ना काही उघडून बघत राहायचे व दुरुस्त करत राहायचे! वयाच्या नव्वदीतही ते त्यांच्या संध्याताईला रिक्षा स्टँडपर्यंत सोडायला चालत जायचे आणि शाखेतही जायचे. मला आठवतंय त्यांच्या येणा-या एसटीडी फोनचासुद्धा आई- बाबांना धाक वाटायचा! त्याबरोबर सगळ्या बाहेर जगातल्या गोष्टींचं स्पष्ट आकलन त्यांना होतं. १९२५ ते २०२३! काळ किती म्हणजे किती बदलला. मोबाईल, इंटरनेट, प्रवासाची साधनं, जीवनशैली, घराचं स्वरूप, लोकांचं भेटणं सगळं बदलत गेलं! २००४ मध्ये नांदेडवरून कायमस्वरूपी औरंगाबादला ते आले. २०१५ मध्ये आजी गेल्यानंतर त्यांची एक हळवी प्रतिक्रिया होती, "मी हिला समजायला कमी पडलो. ती खूप वेगळी होती. मी तिला चांगला न्याय नाही देऊ शकलो."

वयोमानानुसार आजोबांचं मन व बुद्धी थकली नाही तरी शरीर थकत गेलं. पण एखाद्या निष्णात फलंदाजाने विपरित परिस्थितीतही कमालीचा तग धरावा तसं त्यांची खेळी पुढे सुरू राहिली. जोपर्यंत हिंडता- फिरता येत होतं तोपर्यंत फिरायचे. नंतर घरातल्या घरात फिरायचे. अगदी ९५ वर्षांनंतर घरातच व्हील चेअरवर फिरायचे. पेपर वाचायचे, पूजा करायचे, गप्पा मारायचे, जुने किस्से सांगायचे. आणि हो, ठरलेल्या पद्धतीने घणाघातसुद्धा करायचे! त्यांच्याकडून एखाद्या व्यक्तीचा उद्धार होताना ऐकणं हा अनुभव मिस करण्यासारखा नसायचा (अर्थात् ती व्यक्ती आपण नसलो तरच)! त्यांच्यातली ही ऊर्जा आणि हे जीवंत मन शेवटपर्यंत टिकून राहिलं.

आज तीस- चाळीस वर्षांमध्ये लोकांना जे त्रास सुरू होतात- डायबेटीस, बीपी, पाठदुखी व त्यांचे सर्व स्नेही इ. तसल्या मंडळींना कधीच त्यांच्या जवळपासही येता आलं नाही. त्यांचं शरीरयंत्र बघूनसुद्धा तो निर्माताच आठवायचा. काय अविष्कार त्याने घडवला आहे, असं वाटायचं. माझा मामा- डॉ. आनंद फाटक ह्यांना भेटायला आलेल्या वरिष्ठ डॉक्टरांपैकी एकांनी ह्यामागचं रहस्य थोडं उलगडलं. त्या म्हणाल्या की, ही पिढीच अशी होती की, जिला कधीच औषध, गोळ्या, डॉक्टर अशा कुबड्यांची गरजच पडली नाही. आपण उत्तम निरोगी आहोत ही त्यांची मानसिक धारणाच इतकी खोलवर असते की ही त्यांची धारणाच एक प्रकारे firewall सारखं त्यांचं रोगांपासून रक्षण करते. मनच मुळात इतकं वेगळ्या धाटणीचं होतं की, तिथे अशा किरकोळ गोष्टींना थाराच नव्हता. त्यामुळे त्यांना कधीच रोग असे झाले नाहीत. कोरोनाने अनेकांचा बळी घेतला. पण ह्यांना कोरोनाचा क सुद्धा स्पर्श करू शकला नाही. उत्तम शरीराचं एक गुपित मनामध्येही आहे. म्हणूनच तर म्हणतात मन करा रे प्रसन्न.

अर्थात् गेल्या दहा वर्षांमध्ये शरीर यंत्र हळु हळु कमकुवत होत गेलं. ह्या काळामध्ये सुमन मावशी त्यांची जणू आई झाल्या. आईच्या मायेने आजोबांच्या वृद्धावस्थेतल्या बालपणाची काळजी त्या घेत होत्या. चोवीस तास आजोबांची सेवा करत राहिल्या. सेवा नव्हे त्या आजोबांचीही आई झाल्या असं म्हणणं जास्त योग्य आहे. शरीर कितीही खंगत गेलं तरी तल्लख विचार बुद्धी आणि आवाजातली ऊर्जा टिकून राहिली. स्मरणशक्ती टिकून राहिली. जीवनातला रस टिकून राहिला. जुन्या असंख्य आठवणी ते पुन: पुन: सांगायचे. त्याबरोबर नांदेडही कल्पनेने त्यांच्या नजरेसमोर राहिलं. कोण कसे होते, कोणी काय केलं, कोणी कसा त्रास दिला हेही लक्षात राहिलं. अशा अनेकांचे उद्धार होत राहिले. बघणा-याला कधी कधी वाटायचं की, इतक्या वयामध्येही इतक्या लहान सहान गोष्टी का लक्षात ठेवाव्या, आता सगळ्यांना माफ का करू नये. पण ही शरीराची व मनाची घडणच अशी होती की, तिची पकड घट्ट राहिली. शरीर जितकं कणखर होतं तसेच मनावरचे इंप्रिंटसही पक्के होते.

शरीर थकत गेलं, एक एक हालचाल कमी होत गेली. ऐकू येणं कमी झालं. आवाजातला जोष कमी होत गेला. नंतर मात्र आजोबांचं हळवं रूप बघायला मिळालं. सुमन मावशींमुळे मी टिकून आहे, जगत आहे असं आजोबा म्हणायचे. कधी कधी म्हणायचे की, मी खूप भाग्यवान आहे, इतके चांगले लोक मला मिळाले. एकदा तर माझ्या मामीला- डॉ. प्रतिभा फाटक हात जोडून धन्यवाद म्हणाले. कदाचित "तो"‌इतके वर्ष ह्याचीच वाट बघत होता. कृतज्ञता आणि धन्यता. आणि त्यानंतर त्याने त्यांना बंधनातून काढायचं ठरवलं. पण तो त्यांना आउट नाही करू शकला. त्यापेक्षा खेळीसाठी असलेला वेळ संपला असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून ते ९८ वर नाबाद राहिले आणि शांतपणे मैदानातून गेले असं म्हणावं लागेल.

ही प्रदीर्घ खेळी एका पर्वासारखी होती! त्यांचं तरूणपण म्हणजे कुठे तो १९४०- ४५ चा काळ! तेव्हाची प्रवासाची साधनं, जीवनशैली, परिस्थिती! मलाच एकदा आठवतंय, त्यांनी सांगितलं होतं, एके काळी नागपूर- नांदेड बसचं भाडं फक्त एक रूपया चाळीस पैसे होतं! तिथपासूनचा आजचा काळ! त्यांच्या जीवनासाठी अजून एक शब्द समर्पक राहील- Timeless steel! अथक आणि कठोर! मोडेन पण वाकणार नाही हा बाणा. त्यांची ही प्रदीर्घ खेळी‌ कमालीची थरारक राहिली. प्रत्येक बॉल व प्रत्येक रन एक ईव्हेंट होता. He kept everyone on his toes. अगदी‌ शेवटपर्यंत. आता ह्या अद्भुत यंत्राला विश्रांती लाभलीय. शांती लाभली आहे. त्यांना सद्गती मिळो आणि त्यांच्या जगण्यातल्या ऊर्जेची आणि शिस्तीची प्रेरणा सगळ्यांना मिळो ही इच्छा व्यक्त करतो. स्मशानामध्ये लिहीलेल्या कबीरजींच्या ओळी मनात येत राहतात-

जो उग्या सो अन्तबै, फूल्या सो कुमलाहीं।
जो चिनिया सो ढही पड़े, जो आया सो जाहीं।

(इस संसार का नियम यही है कि जो उदय हुआ है,वह अस्त होगा। जो विकसित हुआ है वह मुरझा जाएगा। जो चिना गया है वह गिर पड़ेगा और जो आया है वह जाएगा।)
- निरंजन वेलणकर 09422108376. 26 जुलै 2023.

Group content visibility: 
Use group defaults

वाह!! काय सुंदर चितारलय व्यक्तीमत्व. खूप भाग्यवान आहात मार्गी. आपल्या आजोबांना श्रद्धांजली.

छान
नांदेड नाव दिसताच आपोआप मनात काहीतरी होतं, वाजतं Happy

मार्गी मला एकदम माझ्या आईचे वडील आठवले , दिगंबर बळवंत पाठक . करारी आणि ताठ . औरंगाबादला होते. मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. शिक्षणाचे खूप महत्व होते. देवगाव रंगारी सारख्या खेड्यातून आजीला औरंगाबादला मुलांच्या शिक्षणासाठी पाठवले . स्वतःची ३ आणि भावाची २ अशी मुले संभाळली. सर्वांना पोस्ट graduate केले. प्रचंड धाक होता सगळ्यांना. मामा udct topper होता याचा खूप अभिमान. अनेक आघात पचवले ३८ वर्ष्याच्या मामाचा अकाली मृत्यू , लगेच १वर्ष्यात मुलीच्या नवऱ्याचा मृत्यू , पुढच्या वर्षी ३ री मुलगी मरणाच्या दारात. ३ आघातांनी खचले पण मावशी साठी परत उभे राहिले. संघात जाऊ लागले आणि दुःखातून त्यातून सावरले. नातवंडांना घडवण्यात खूप मोठा वाटा आहे. आम्ही नाशिकला होतो बाकी नातवंड औरंगाबाद मध्ये त्यामुले आम्हाला सहवास फक्त सुट्टी पुरता पण आयुष्यभराच्या आठवणी आहे . मला वाटते आपली पिढी खूप भाग्यवान आहे ज्यांना असे आजी आजोबा मिळाले.

सुंदर व्यक्तिचित्रण!
एखादी त्यांच्या संबंधीची व्यक्तिगत अशी खूप जपून ठेवलेली आठवण वर्णनात आली असती तर लेखन अधिक हृद्य झाले असते.

सुरेख व्यक्तिचित्रण ! आजोबांना नमस्कार.
मी नांदेडची असल्याने 'नांदेड' वाचलं की एंटिने वर होतात. नांदेडचे लोक खरोखरच कष्टाळू आणि चिवट आहेत. भाग्यनगरला एकेकाळी खूपदा जाणं व्हायचं, कमानी समोरून तर अनेकवेळा. तुमच्या आजोबांना भेटायला आवडलं असतं. Happy

इंद्रा, तुमच्या आजोबांचही कौतुक वाटलं.

नांदेडकडे वयोमान जास्तच आहे कि काय by डिफॉल्ट?

आमच्या सौंचे आईकडचे आजोबा.. 3 बायका, 7 अपत्ये.. १०५ वर्षं आयुष्य! 2018 ला वारले..

अजूनही 100+ उदाहरणे परिचित आहेत.

सर्वांना वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

@ इंद्रा जी, प्रेरणादायी व्यक्तीमत्व! त्यांना आदरांजली!