बारामतीकरांची बखर..!

Submitted by संप्रति१ on 4 July, 2023 - 10:01

एकास पळ म्हणावे, दुसऱ्यास धर म्हणावे, तिसऱ्यास बघ म्हणावे आणि चवथ्यास म्हणावे की तुजला काही कुमक पाहिजे असल्यास आम्ही आहोतच. आपण येकदा बसून बोलिले पाहिजे..!
दहा दिशांनी दहा नौका सोडोन मनासारिखे घडेतो दुरून पहात बैसावे. ऐशी पवारसाहेबी मसलत. त्याच पवारसाहेबी गोटात गलबला जाहला त्याचि गोस्ट.
परंतु हे ही खेळ अवघे साहेबांचेच आहेत, असे लोक म्हणताति. खरे खोटे ईश्वर जाणे.

जातो जातो म्हणित होते ते दादासाहेब येकदाचे गेले.
ध्या दुपारा येऊन गनिमाने गोट घेरिला. चहुबाजोंनि हाकारे घातले. बारामतीचे गडास मोर्चे लावोन दादासाहेबांचा मोहरा पळविला. की ते खुद आपलेच पावलांनी निघोंन गेले. कळावयास मार्ग नाही.

दादासाहेबी नादी लावून फौजेवर छापा टाकीला. तिकडे काय चालिले आहे ते पाहोन येतो, असे सांगोन शिलेदार छगनराव गेले. आणिक परस्पर सरदारकीची टिळा लावोन मोकळे जाहले. रंगात रंग मिळविला. आनंद उच्छव केला. ऐसा प्रकार जाहला.
हे वर्तमान पवारसाहेबी समजतांच गालातले गालात हासत, जातिनिशी क-हाड सातारा बालेकिल्ल्यांचे रोखे कूच केले.

काही जनमाणूस म्हणितात की दिल्लीश्वरांनी फडणीसें निरोप धाडिला. आपले संसारात शिंदेसरकारांचे वझे जाहले. गिळता येईना, सोडताही येईना, ऐशी गत जाहली. होता होईल तो सिंदियांस बाजू करावे ऐशी दिल्लीची मसलत. कां कीं दिल्लीश्वरांस दिल्ली बहुत प्यार..! येक दिल्ली साधिली तों दुनिया साधिली..! येकट्या शिंद्यांचे भरवसे दिल्लीचा रस्ता निभत नाही.
त्याकारणें आंगठीतला हिरा बदलणेचे कार्य आहे.‌ त्याकारणें दादासाहेब, तुम्हांस गादीवर बसविणेंचा शब्द आहे. सत्वर निघावे. जेवत असाल तर हात धुणेस इकडेच यावे.‌ ऐसा रूकार मिळताच दादासाहेब चढे घोडियानिसी निघोंन गेले. आणिक चवकशीची धास्त खाऊन समागमे काही खाशा स्वारींनी गनीमाचा रस्ता धरीला, ऐसे जनमाणूस म्हणिते.

दादासाहेबी-फडणिसी मसलत जाहली. दिलजमाई जाहली असता दाणाचाऱ्यास कमी पडणार नाही. मुलुखात उत्तम रसद पोचती होईल, ऐशा वार्ता जाहल्या. ही बाब थोर. म्हराटी रयतेचे भले व्हावे म्हणोन आम्ही ही गोस्ट केली, हे येक आहेच. लोकांस सांगावयास काहींतरी लागतेच.

काका पुतण्याचा किलाफ म-हाट देशास नवा नाही.
दादासाहेबी तरी आजून किती वर्षें कळ काढावी?
काका गादीवर बसवत नाहीत. कारभारीपण देत नाहीत. साठी वलांडली. आजून किती वाट बघावी? दादांचे मनास कष्ट फार.

इतपर सरदार सुभेदार येकमेका सांगावा धाडू लागलें. कबूल आहे, आम्हांस पवारसाहेबी मोठे केले. तयांचे आम्हांवरि बहु उपकार. परंतु आता जीवानिसी प्रसंग. जावे लागते.

शिलेदारांमधी अवघी खलबल माजली. येकमेकांस वारंवार पुसतात की काय करावे कसे करावे? आम्ही जावे की रहावे? इकडे आड तिकडे विहीर, ऐशी गत.‌.! दोन बलिष्ठांचे टकरीत सापडलियांस आपली हकनाक बरबादी.

तिकडे जयंत्राव बहाद्दर थोरल्या साहेबांस पुसतात की
आम्ही असा असा पारिपत्याचा हुकुम काढितो. अवघ्या सरदारांस इतल्ला करितो. नातरी राहिला गोट फरार होतो. ही गोष्ट कशी?
साहेबी उपदेशिले की उत्तम आहे. तुम्हीच हे कार्य करावे. समागमें जितेंदर मुंब्राकरियांस घ्यावे. बंटी जीवाचा माणूस. तरवारबाजी करणेस तिखट. राहिला मोर्चा संजयाजी सांभाळताति. तयांचे तोंडी लागेल असा कोण असे?

इतप्पर काळ तो मोठा कठीण आला. चवकशीचा फेरा आला. आक्काबाईचा गाडा आला. दिवस काई मुकामी राहत नाहीत. निघोन जातील. फितूर समजण्यांस वर्ष सहा मास जातील. तोवर निवडणूकांची धामधूम येते. तर तिथेच तब्बेतशीर रहावे. गोट राखावा.‌ सर्वांचे पोट सांभाळावे. वेळवखत पाहोन माघारा याल तरी घर तुमचेच आहे. ऐसे घोळात घेतिले. पळास जागा ठेवोन थोरल्या साहेबी मान डोलाविली, ऐसे जनलोक म्हणताति.
बाकी, काका-पुतण्यामधी काय वार्ता जाहली ती त्यांचे ते जाणोत.

तिकडे दिल्लीस सब कुशल मंगल वर्तमान समजून चवकशीचा गाडा पुढे कुठल्या प्रांती सरकतो, ते पहावे. प्रांतोप्रांति सांगावे धाडिले आहेत. प्रसंगी स्थिती स्थापकत्व धारण करावे लागते. समयप्रसंगी रान कातरावे लागते. इलाज नाही.

बाकी, सुभेदार तटकरे अलिबागकरांचे येकवेळ ठीक. परंतु येका बाजूस प्रफुलभाई आणि दुसऱ्या बाजूस दस्तुरखुद्द छगनराव..! ऐसे कसे घडो पाहते..? ही तो पवारसाहेबांची बेलभंडाऱ्याची माणसं..! कोण भरवसा ठेवणार? सबब हा तो साहेबांचाच खेळ. ऐशी राजसाहेबी मसलत..! राजसाहेबी सध्या वेळच वेळ..!

परंतु "आम्हांस ऐशा गोष्टींची सवय. नुकसान माझे काही होत नाही" हा राग पवारसाहेबी आळवितात..!

"लेट द स्टोरी अनफोल्ड" हा राग ताईसाहेबी आळवितात. अर्थाचा आम्हांस उलगडा होत नाही. बहुदा आंग्लभाषेतली काहीतरी वार्ता असावी.

घोडा मैदान नजीक आहे. जे जे घडते ते पहावे, अखंड तजविजा करीत बसावें. आपले हाती दुसरे काय असते? आणिक बहुत ते काय लिहिणे? आणिक कशास लिहिणें?

(कृपया हळू घ्या _/\_)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुर्जी, दंडवत. साष्टांग नमस्कार इथूनच घालतो. म्या बालके अजून काय करावे? स्वारींनी समजोनी घ्यावे.

दिल्लीचे शहेनशहा आणि नागपुरी नाना फडणवीस मिळोनी डाव टाकला आहे. आता दिल्लीच्या गारद्यांनी माघार घेतली आहे. खिंडीत पकडले. शरण जावे लागले. तहाच्या अटी काय आहेत? माहित नाही. पुन्हा काका मला वाचावा असे नको. फासे उलट पडले तर?

अतिशय चपखल बखरी शैलीत लिहिलंय
.भारी मौज जाहलीसे.
(शेसव्वाशे वर्सांउपरि सदरहू मजकुरासि अस्सल कागदपत्राचे मोलहि यावे, कुणी सांगावे.)

उत्तम लिहिले आहे.

राहिला मोर्चा संजयाजी सांभाळताति. तयांचे तोंडी लागेल असा कोण असे?... Lol

येथेनाचतमासे चालतात. नाटकशाळा चालतात. कोनीपण कोणासोबत झोपत याला राजकारण म्हणतात

Pages