कैरी / आंब्याची डाळ आणि हरभरा उसळ

Submitted by लंपन on 24 June, 2023 - 11:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लहानपणी चैत्रात हमखास एक दोन वेळा होणारा हा मेन्यू सोबत थंडगार पन्हं, काकडी आणि कलिंगडाची फोड. उन्हाळ्याची सुट्टी चालू झालेली असे त्यामुळे अजूनच सुखद आठवणी Happy आमच्या वाड्यातल्या एका काकूचे भाऊ चिंचवड स्टेशनला रहात, त्यांच्याकडे चैत्रात वाड्यातल्या सगळ्यांना हमखास निमंत्रण असे आणि हाच मेन्यू असे. खूप आठवणी जाग्या झाल्या ही पाकृ लिहिताना.

कैरीची डाळ साहित्य

चणा डाळ - दीड वाटी
कैरी - अर्धी वाटी
एक हिरवी मिरची
किंचित आले
साखर - एक चमचा
मीठ - चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर - दोन चमचे
फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, जिरे आणि हळद.

हरभरा उसळ साहित्य

भिजवून उकडलेले हरभरे पावशेर
एक मोठा टोमॅटो बारीक चिरून
चिंच गूळ कोळ अर्धी वाटी (आमटीची)
दोन टी स्पून गोडा मसाला
एक टी स्पून काश्मिरी लाल मिरची
ओलं खोबरं दोन चमचे
मीठ चवीनुसार
दोन / तीन चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली

फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे , हिंग, कढीपत्ता, हळद.

क्रमवार पाककृती: 

कैरीची डाळ

हरभरा डाळ पाच सहा तास भिजवून पाणी निथळून भरड वाटायची. एकदम बारीक करू नये. कैरी, मिरची आणि आले एकत्र वाटून भरड केलेल्या हरभरा डाळीत मिक्स करावे त्यातच मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साखर घालावी. आता दिलेल्या साहित्याची वरून फोडणी करून घालावी आणि सर्व एकत्र करावे. कैरी डाळ तयार Happy कैरी, साखर , तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.

हरभरा उसळ

कढईत तेल घेऊन वर दिलेल्या साहित्याची फोडणी करा. त्यात टोमॅटो, गोडा मसाला, ओले खोबरे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. नंतर त्यात चिंच गुळाचा कोळ घालावा. दोन तीन मिनिटांनी त्यात शिजवलेले हरभरे, कोथींबीर घाला, हवे त्यानुसार पाणी घाला, आणि आठ दहा मिनिटे चांगले उकळून घ्या. ही उसळ नुसतीच खायची आहे, म्हणून मसाले म्हणून गोडा मसाला आणि काश्मिरी लाल तिखट वापरायचं आहे. चिंच गूळ हवाच. उसळीची चव गोडा मसाला, चिंच गूळ ह्यानेच येणार आहे त्यामुळे ह्यात बदल नको Happy

Kairi Daal Panhe.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

बरेच दिवसानी पाकृ लिहीत आहे आणि त्यातपण चैत्र, वैशाख गेल्यावर Happy माझ्या पाकृवर ब्लॅककॅट हमखास प्रतिक्रिया देत. वरच्या दोन्ही पाकृ त्यांना समर्पित.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लंपन, मस्त पाकृ.

आमच्याकडे चैत्रातलं हळदी कुंकू फार थाटामाटात केलं जातं. आईकडे सगळे जवळ रहाणारे नातेवाईक येतात डाळ, उसळ आणि पन्हे प्यायला.
आमची सजावट ही फार मजेशीर असते. दर वर्शी आई वेगळं काही तरी करु म्हणत वनविहार करणारी देवी हाच देखावा करते. मग त्या पुढे कलिंगडाची कमळं, कैरीचे पोपट इत्यादी नेहमीचे यशस्वी कलाकार. डाळ, उसळी सोबत ते कलिंगड आणि आंबे पण कापायचे. ती गोड , आंबट, तिखट अशी सगळी चव मिक्स होउन मस्त काही तरी फिलिंग यायचं. ती पदार्थांची चव असते का कझिन्स सोबतच्या गप्पांची ते नाही माहीत पण सगळा माहोल मजेशीर असतो एक्दम.

अवांतराबद्दल सॉरी!

पुर्वी तरुण असताना मी फार आंबट चिंबट खायचे आता अजिबात आवडत नाही. त्यामुळे मला ही डाळ पुर्वी खुप आवडायची आता नाही आवडत पण फोटोला १०० / मार्क.. अशी प्लेट कोणी मला दिली तर संपवेन नक्कीच.

छान!
आईची मैत्रीण, दरवर्षी ही आंबाडाळ खायला अगत्याने बोलवीत असे.सोबत मात्र पन्हे नसून उसाचा रस असे.मला पन्हे आवडायचे नाहीच.उलट उसाचा रस आवडायचा.लहानपण सरले.त्या बाईही गेल्या.उरल्या आठवणी!
लंपन,तुमच्या लेखामुळे परत सारे आठवले.धन्यवाद!

वाह मस्तच.

चैत्रगौर हळदीकुंकु म्हणजे धमाल असायची, फक्त आमच्या आजूबाजूला हरबरा उसळ कोणी करायचे नाहीत, भिजवलेले हरबरे द्यायचे, आंबा डाळ आणि पन्ह्यासोबत. ते हरबरे नेऊन उसळ ज्याने त्याने घरी करायची Lol

आंबेडाळ, पन्हे मेन्यू होतोच दरवर्षी चैत्रात दोनदा तरी.

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात असू तर अजून मजा, आजूबाजूच्या गावातूनही आमंत्रण असायचं, आम्हीही सर्वांना बोलवायचो.

मस्त रेसिपी आणि फोटो ही ..
भर पावसाळ्यात चैत्र गौर, पन्ह, आईस फॅक्टरी तुन आणलेला बर्फ सगळं आठवलं , मजा आली.

लंपन, आठवणी, फोटो, कृती मस्त! आंबे डाळ मलाही खूप आवडते. पूर्वी अक्षयतृतीयेपर्यंत अनेकदा खायला मिळायची . आजकाल हकूचं त्यात आणखीन चैगौ च प्रमाण फारच कमी स्वतः करून स्वतः खावी लागते. ... चवबदल मिळत नाही. आई करायची हकु. दरवर्षी वेगवेगळी सजावट. आकर्षक आकारात कापलेलं कलिंगड,करंज्या आणि शेव हे त्रिकुट म्यानडेटरी!

छानच लेख व पाककृती. आमच्या घरी पण गौरीचे हळदीकुंकु तीन घरांचे मिळून व्हायचे. दोन्ही काकवा आईला ज्युनिअर व त्यांच्या मुली येत. माझे स्ट डी टेबल त्या च सुप्रसिद्ध मोठ्या खोलीत जागा बदलून ठेवत व त्यावर सजावट. ओगले काच कारखान्यातून आणलेले काचेचे तांब्या भांडे होते त्यात माझे क्यामलिन कलर्स पाण्यात मिसळून रंगीत कलर करत. व इतर खेळणी भावल्या हे ते.
भिजवलेले हरबरे व डाळ पन्हे असे. व सुवासिनींना मुलींना मोगर्‍याचे गजरे. माळणीचे घर बेसमेंटातच आहे त्यांच्याकडून यायचे गजरे. ते ब्लेड ने अर्धे अर्धे करून सर्वांना देत.
करून ठेवलेली आंबाडाळ स्टीलच्या टिफिन डब्ब्यात घेउन सर्वाना देत असू. नाइस डेज.

छान फोटो! आमच्याकडे पण चैत्रगौर दणक्यात असायची म्हणजे, झिकझॅक कापलेले कलिगन्ड, करन्जी,लाडू देविपुढे आरास असायचीच असायची.
बाकी पन्ह , ओलि डाळ आणी हरभर्‍याचि ओटी अस ठरलेल होत.

चैत्र गौरीं वरून आठवलं , आमच्या कडे देवी साठी डाळ आणि पन्ह ठेवलेल्या ज्या वाट्या वाट्यांच्या कडेवर भिजवलेले हरभरे सोलून ते लावायचो आम्ही. हरभरा सोलायचा आणि निमुळता भाग वर करून हरभऱ्याची मधली खाच वाटीच्या कडेवर अलगद खोचायची , मस्त डिझाईन दिसायचं वाटीच्या कडेवर.

रीया धन्यवाद, छान आठवणी, पदार्थ साधेच आहेत पण माहोल आणि इतर गोष्टींमुळे लक्षात राहतात बहुदा आणि पूर्वी त्या त्या वेळीच आणि दिवशीच बनत त्यामुळे अजून अप्रूप. भरत, धन्यवाद उसळ ट्राय करा नक्कीच जमेल. देवकी, अंजूताई छान आठवणी. अमुपरि, अवलजी, स्वांतसुखाय धन्यवाद. ममोजी दोन्ही आठवणी छान. अमा छान आठवणी, धन्यवाद. हलली देसाई बंधू कडे आंबा डाळ विकत मिळते:) मंजूताई ,प्राजक्ता छान आठवणी, धन्यवाद.

छान लेख आणि पाककृती मस्त! फोटो बघून तोंपासू. आता कैरीची डाळ करून खाल्ल्याशिवाय बरे वाटणार नाही Happy

अहाह तोंपासू रेसिपी, फोटो सगळंच.
आता इथेच लगेहाथो विचारुन घेते. इथे (अमेरिकेत) मी इंग्रोमधून कैरी मारे हिरवी वगैरे बघून आणली पण फार आंबटच निघाली नाही. आपल्या भारतीय कैर्‍यांच्या तुलनेत अगदीच फालतू वाटली. त्यामुळे आंबाडाळीची म्हणावी तशी मजाच आली नाही.
इथे कुठे वेगळ्या कैर्‍या मिळतात का? का यातच गोडी (आंबटपणा!) मानायचा?

मस्त रेस्प्या!
कैरीच्या डाळीत नेहेमी कैरी ही किसून तर डाळ जरा भरड अशी वाटून केल्या जाते घरी. वर चांगली चळचळीत तेल अणि भरपूर हिंगाची फोडणी आणि हिरवीगार ताजी कोथिंबीर मस्ट.
फोडणीत कधी लाल सुक्या मिरच्या तर कधी कुटाच्या मिरच्यांचा बदल. ओखो शक्यतो वापरल्या जात नाहीच पण कधी बायडी सुक्या खोबर्‍याचा कीस घालते जरा. ते ही छान लागतं.
चण्याची उसळ य प्रकारे करून पाहायला हवी.
घरी शक्यतो आमचूर पावडर, धणे-जिरेपूड, लाल तिखट, हळद अश्या कोरड्या मसाल्याची केली जाते उत्तर भारतीय पद्धतीची.

वर्षा, यावर्षी तर इथेही पोपट झालाय माझा कैर्‍यांच्या बाबतीत. चांगली टणक हिरवीगार अन दुकानदाराला चारचारदा विचारून आणलेली कैरी अजिबातच आंबट न निघणे, गर तर पिवळट केशरी रंगावर पण निघाला आहे एकदा. असो...

वर्षा, फ्रोझन कैर्‍या (दीप ब्रँड) च्या आंबट निघालेल्या. त्या ट्राय करा

रेसीपी छान आहेत. आंबा डाळ विशेष नाही आवडत पण उसळ खूप आवडते ही. या पद्धतीने करून पाहीन.

योकु Sad
सुक्या खोबर्‍याची कल्पना मस्त. जरा वेगळ्या प्रकारे खमंग लागत असावी त्याने.
मनमोहन, हो की! फ्रोजन वापरता येतील हे लक्षातच नाही आले. ट्राय करेन.धन्यवाद! Happy

आबा, अस्मिता, सोनाली, वर्षा ताई, मनमोहन धन्यवाद. वर्षा ताई लिंबू पर्याय म्हणून वापरावा का अशावेळी? योकु धन्यवाद, तुमच्या रेसिपीज मला आवडतात.