अरेंज मॅरेज, एक किस्सा !

Submitted by छन्दिफन्दि on 12 June, 2023 - 23:20

अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज किंवा लिव्ह इन् याच्या घोळात काही आपल्याला जायचं नाही.
पण आपल्याकडे अरेंज मॅरेजला फार मोठी परंपरा आहे. दोन अनोळखी भिन्न माणसचं नाही तर अख्खी कुटुंब एकत्र येतात, मग त्यात विरोधाभास असणार, आणि त्यातून गमती जमती होणार हे ही ओघाने आलंच.
अगदी पु.लं. च्या 'नारायण' आणि 'असा मी असामी' पासून ते अलिकडच्या (बर्याचशा रटाळ) दैनंदिन मालिकांपर्यंत अनेक ढंगात ते आपल्या समोर आलंय.
अशीच एक मजेशीर(?) गोष्ट!
___________________________________________________________________________
लग्न ठरायच्या सहा आठ महिने आधी,

तो होता 85किलो, तळवळकर्सचा वेट लॉस प्रोग्राम इमाने इतबारे करून केलं की वजन 25किलो कमी ! हाईट तर होतीच त्यामुळे लागला सडसडीत दिसायला.

आधीचीच बारीक ती, अजून चार किलो वजन कमी झाले, आलं की ४४ वर. आई-आजी ने कंबर कसली.केळी, दूध, ड्रायफ्रुटस आणि डिंकाच्या लाडवांचा मारा झाला सुरू. ५ किलो का होईना पण वाढलं एकदाचं वजन.
आलं ५०च्या उंबरठ्यावर!

***

एकमेकांना पहिल्यांदा भेटले तेव्हा फरक बारा-चौदा किलोचा आणि १० इंच उंचीचा,
पण अरेंज मॅरेजच्या एकंदर गुण जुळविण्याचा क्रम बघता त्याच काय विशेष. झालं, लग्न ठरलं.

***

ओळख वाढवायला भेटायला लागले. गप्पा मारत हास्य विनोद करत दोन अडीच तास आरामात जात.

इकडे तो खुश, वा फक्त पत्रिकाच नाही तर आपली मनही जुळतायत. वरती अनायसे चालण्याचा व्यायाम होतो हा बोनस!

नव्या नवलाईत आपण खूप दमलोय हे ही ती विसरुन जाई. भेटी वाढत गेल्या तसं तिला जाणवू लागलं आपण भेटलो की गप्पा मारत चालायला लागतो. दोन अडीच तीन तास चालतच रहातो आणि उशीर झाला म्हणून रिक्षात बसून आपापल्या घरी जातो.

आता ती "आपण होटेल मध्ये जाऊया" सुचवू लागली.
"Ok".
लागले कधीमधी होटेलात जाऊ.
पण ह्याची order ठरलेली “व्हेज क्लिअर सूप" मग ती सुद्धा असचं काही one by two soup तत्सम घेत असे.

"येवढं चालल्यावर असं soup पीत राहिले तर काही खरं नाही! परत dry fruits n लाडवाचा मारा सुरू होईल" ती चिंतेत.

पण तरी नाही म्हटलं तरी थोडा संकोच होताच.

अजून थोड्या दिवसांनी तिने संकोच बाजूला सारून हळूच सुचवलं, "आपण आज काहीतरी जेवू या".
"OK पालक पनीर, डाल तडका आणि एक साधी रोटी, " इति तो.

आता मात्र शर्थ झाली. हॉटेलमध्ये दाल तडका आणि पालक पनीर खायला कोण जातं? तिला मित्रमंडळी आणि कुटुंबियांबरोबर झोडलेली फोर कोर्स डीनर्स आठवली.
लगेच "स्टार्टर्स? मलाई कोफ्ता ? पनीर माखनवाला?आईस क्रीम? " तिचं सुचवणं सुरू.

"हे असं खायला लागलो तर सगळंच बोंबलेल! परत तळवलकर्स ची पायरी नाही चढायची आपल्याला, "त्याचं स्वगत.

थोडं तुझं थोडं माझं करत दोन महिन्यांत झालं की शुभमंगल!
आणि ते सुखानं नांदु लागले..

आपली गोष्ट इथेच नाही संपली.

***

वीस वर्षांच्या संसारात दोनाचे चार झाले तरी तो आजही आपलं वजन ( अहो फक्त समाजातलं नाही, खरंखुरं) राखून आहे.
तिनं मात्र परत कधी ५०चा काटा पाहीला नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीस वर्षांच्या संसारात दोनाचे चार झाले तरी तो आजही आपलं वजन ( अहो फक्त समाजातलं नाही, खरंखुरं) राखून आहे.
तिनं मात्र परत कधी ५०चा काटा पाहीला नाही!

>>> relatable

छान !
स्टार प्लस वर रविवारी एक तासाच्या कथा दाखवायचे त्यातली एक ओव्हरवेट मुलगा आणि अंडरवेट नाही, पण ठीकठाक मुलगी यांच्या प्रेम आणि लग्नाबद्दलची होती. तिला त्याच्या जाड असण्याने जास्तच काळजी वाटत असे. शेवटच्या शॉटमध्ये ती कुकरी शोसाठी शूट करत असते.

आपल्या रोजच्या आयुष्यात इतके विरोधाभास असतात, त्यातून कधी कधी विनोदनिर्मिती. होते.

हा एक असाच प्रयत्न नर्मविनोदी लिखाणाचां!

वाचून दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!

दीड एक वर्षापूर्वी लिहिलेला, आता माबो वर टाकला.

भरत, हा कार्यक्रम मी बघितला नव्हता पण interesting दिसतोय.

तिनं मात्र परत कधी ५०चा काटा पाहीला नाही!
>>>

मी अजून कन्फ्युज आहे
आकडा वर गेला की खाली Proud

तसे लग्नानंतर वरच जातो म्हणा... याची कल्पना आहे.

शेवटची ओळ संसार कसा चालू आहे हे सांगून गेली..

दोन महीन्यात तिला अंदाज आला नसेल तर मग अ‍ॅरेंज मॅरेज काय नि लव्ह मॅरेज काय !