तुम्ही का वाचता?

Submitted by सामो on 7 June, 2023 - 11:22

काही लोक वाचनाची अजिबात आवड नसलेले तर काही वाचनाशिवाय जगूच न शकणारे. पैकी मी या स्पेक्ट्रममध्ये कुठे तरी पडते. पुस्तकवेडी आहे मी. लहानपणीच्या माझ्या आठवणी म्हणजे - वाचनात गढलेल्या, आई किंवा बाबांच्या शेजारी पडून त्यांचे नीरीक्षण करणे. मासिकांत तर चित्र नाहीत मग ही मोठी मंडळी पान का उलटत नाहीत - हा प्रश्न मला पडलेला लख्ख आठवतो. पुढे अक्षरांशी ओळख झाल्यानंतर, अक्षरक्षः दुकानावरच्या पाट्यांपासून ते भेळेच्या कागदापर्यंत सर्वाहारी वाचक अशी मी अमेरीकेत येउन हरवुन गेले होते. काही काळ मराठी वाचनापासून वंचित राहील्याने कठीण गेला. त्यातून मग मराठी संस्थळे सापडत गेली. मराठी संस्थळांच्या संस्थापकांचे ऋण मानावे तितके थोडे आहेत. आता तर किंडलवरही मराठी, हिंदी पुस्तके उपलब्ध आहेत. अनेकानेक ब्लॉग्ज आहेत तेव्हा आता मराठीची उपासमार राहीलेली नाही.

मला मराठी खालोखाल हिंदी वाचन फार आवडते. शुद्ध हिंदी, संस्कृतप्रचुर हिंदी function at() { [native code] }इशय गोड व रुबाबदार भाषा आहे. अनेक कविता, लेख, उपन्यास(कादंबरी), नाटकख, प्रवासवर्णने, व्यंग (विनोदी लेखन). जालावरती भरभरुन हे साहित्य आता उपलब्ध आहे. वाचनाने मला मनःपूत आनंद तर मिळतोच परंतु आय अ‍ॅम पुट टुगेदर. मला विस्कळीत, दिशाहीन वाटत नाही. बरेचदा तर राग, घॄणा, कटकट आदि नकारात्मक विचारांपासून एक सुटका म्हणुन मी वाचते. वाचन माझ्याकरता अमॄतमय आहे, मला 'सेन' ठेवण्याकरता , फन्क्शनल ठेवण्याकरता गजेचे आहे. हां मग आपल्याला जगाची ओळख होते, माहीती मिळते, आत्मविकास होतो, आदि रुक्ष गोष्टी नंतर. आधी महत्वाचे मला पात्रांमध्ये परकाया प्रवेश करुन त्यांचे जीवन जगता येते. मला माझ्यापासून एक सुटका मिळते.

बुक्स ऑइल अवर ब्रेन. वंगणाचे काम करतात पुस्तके. विचारक्षमतेला, बुद्धीला गंज लागू देत नाहीत.

एकदाच मला चोरी करण्याची इच्छा झालेली होती. तीव्रतेने. पण अर्थात करु शकले नाही - तेही बरेच झाले. १९९६- भारतात, 'लायब्ररी सेक्रेटरी' नात्याने, हॉस्टेलवरती मीच लायब्ररीचे काम पाही. म्हणजे कोणी काय पुस्तके नेली/ परत केली वगैरे. त्यात मी एक पुस्तक घेउन वाचले होते ते म्हणजे 'द शॉर्ट स्टोरीज ऑफ गाय द मोपासा'. मला ते पुस्तक विलक्षण आवडले होते. तेव्हा भारतात , परदेशी पुस्तके सहजासहजी उपलब्ध नसत. त्यामुळे ते पुस्तक चोरण्याचा प्र-ह-चं-ड मोह झालेला होता. अर्थात चोरले नाही.

सर्वात सुंदर चेहरा कोणता तर वाचनामध्ये गढून गेलेल्या, हरवुन गेलेल्या व्यक्तीचा - हे माझ्यापुरता सत्य उत्तर आहे. ग्रंथालयात सर्वात सुंदर चेहरे पहायला मिळतात तर कधी प्रवासात.

'तुम्ही का वाचता? तुम्हाला वाचनामधुन काय मिळते?' या प्रश्नाचे उत्तर ऐकायला खूप आवडेल. तुमचे वाचनासंबंधी उत्कट विचार ऐकायला आवडतील. अन्य पेरिफेरल विषय स्पर्श केलेत जसे वाचनाची गोडी कशी लागली, त्या अनुषंगाने झालेल्या गंमती - तर तेही ऐकायला आवडेल. पुस्तके न आवडणार्‍या लोकांना , वाचन या छंदाविषयी काय वाटते तेही ऐकायला आवडेल. त्यांना वाचन ओव्हररेटेड छंद वाटतो का? लोक त्यांना वाचन आवडत नाही म्हणुन कमी लेखतात का वगैरे वगैरे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हपा Happy
>>>>द सा, मुद्दा क्रमांक ७ आवडेश>>>
मुद्दाम खाली सोडलं. कुणाचा मुद्दा आवडला तर तिथे घेऊ... Happy

अक्षर ओळख केव्हा झाली ते तर आठवतच नाही. आठवतंय तेव्हापासून वाचतेच आहे. लहानपणी उडत्या गालीच्या पासून.. घागरीतल्या भूता .. पर्यंत काहीही वाचायचे. घरात आईला महिन्याचा किराणा भरायला मदत करणं एवढं एकच काम आवडायचं कारण तेव्हा सामान वर्तमानपत्राच्या कागदात पुड्या बांधून यायचं. त्यामुळे ते वाचायला मिळायचं...
कारण वाचन हाच श्वास होता.
बरीच वर्षे फक्त मराठी वाचत होते.. पुढे काही वर्षे हिंदी उपन्यास वाचायला लागले (कारण घरासमोर सिंधी कुटुंब रहायचं. त्यांच्याकडे सतत कुणी तरी मुंबईहून येत असायचं. म्हणून मग ते स्टेशन वर मिळणारे उपन्यास यायचे.). अक्षरशः बकरीसारखी चरत गेले.

मुलाचं शिक्षण चालू झालं, त्यालाही वाचायला आवडायचं (माझ्याकडे वीसेक वर्षे टीव्ही नव्हता.) तसं इंग्रजी वाचायला लागले.. मग तर हॅरी पॉटर पासून सुरवात करून अगाथा ख्रिस्ती.. केन फोलेट.. जॉन ग्रिशम .. असे एक एक लेखक पूर्ण करतच आले..

का वाचलं..? तर माझी सोबत मला पुरेशी असायची..

पण आता जरा कमी झालंय वाचन. ....

मी सगळ्यात भाग्यवान.. आमचे वडील एका मोठ्या आणि स्वातंत्र्यपूर्वकाळापासून असलेल्या शाळेत ग्रंथपाल होते (सेवानिवृत्त झालेत). म्हणून वाचायला लागलो. घरी दूरदर्शन होतं फक्त, म्हणून पुस्तकातच जास्त रमायचो, कदाचित केबल असती तरी पुस्तकातच रमलो असतो. सुट्ट्यांशिवाय पुस्तके मिळायची नाहीत, आणि प्राथमिक शाळेत ग्रंथालय नव्हतं, तरी चौथीपर्यंत भा रा भागवत फास्टर फेणे झालं होतं वाचून. माध्यमिकसाठी मोठ्या शाळेत

माझ्याकडे वीसेक वर्षे टीव्ही नव्हता>>आमच्याकडॅही दहावी पर्यन्त टी व्ही नव्हता बहुदा हेही एक कारण असावे शाळेमध्ये अस्ताना वाचन होण्यामागे.

अक्षरशः बकरीसारखी चरत गेले.>>>> Bw हे वाक्य एकदम आवडल,

>>>>अक्षरशः बकरीसारखी चरत गेले.
सन्जोप राव यांनी हा वाक्प्रचार वापरलेला आहे. एखादे उंडगे जनावर जसे चरते तसे पुस्तकवाचन करावे.
अर्थात मिळेल ते मिळेल तिथे फडशा पाडत वाचत जावे Happy

सन्जोप राव यांनी हा वाक्प्रचार वापरलेला आहे. एखादे उंडगे जनावर जसे चरते तसे पुस्तकवाचन करावे.
अर्थात मिळेल ते मिळेल तिथे फडशा पाडत वाचत जावे>>> मस्त

तुम्ही का वाचता?
काय मिळतं वाचून?
तुम्ही काय वाचता?

अश्या धाग्यांवर जाऊन आल्यावर मला ओशाळल्यासारखं झालं. सखाराम गटणे जसं चहाबद्दल बोलताना 'पूर्वी पीत होतो' अशी कबुली देतो ना, तशी मी 'पूर्वी वाचत होतो' अशी देतो. आता 'तुम्ही का वाचता?' ऐवजी 'तुम्ही वाचता का?' असा धागा कुणी काढला तरच तिथे मला समदु:खी माणसं भेटायची शक्यता आहे.

हपा
तुम्ही माझ्या काळाच्या पुढे आहात. मी लवकरच तुम्हाला गाठून तुमच्या पुढे जाईन.

केकू, तुम्ही पृथ्वी एक अंतराळयान - यात असाल तर ते अवघड आहे. यानात तुम्हाला एका खोलीतून दुसरीकडे प्रवास करावा लागेल. नाहीतर मग थॉट एक्स्पेरिमेंट नं ३ करा. Wink

हपा
ते सगळंं जुुनंं झालंं. अजूनही माझे वाचन सुरु आहेच.
सकाळी उठल्या उठल्या "बातम्या" नावाच्या कचरा कुंडीत "घरातला" कचरा टाकून विदेशातला सुसंस्कृत कचरा वाचतो. नंतर "शेर मार्केट" ह्या अत्यंत गूढरम्य रहस्यकथा वाचतो. माझा ह्याच्याशी काही संबंध नाही. पण तशी ख्रिस्ती बाई खून पाडतात त्याच्याशी आपला काय संबंध? तरीही आपण वाचतोच. नंतर मायबोलीवर पुस्तकांचे आणि सिनेमांचे चारोळी परिक्षण वाचतो. केवळ सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी. नंतर क्रिकेटकडे झटकन एक नजर. स्कोर काय झाला? म्हणजे इकडे प्रतिसाद टाकायला बर पडत. आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे मार्केट यार्ड मध्ये भाज्या, हळद आणि मिरची इत्यादींची आवक जावक किती झाली ते जाणून घेतो. कांदा फक्त पाच रुपये आहे हे वाचून आनंद होतो. जे भाव असतात ते शंभर किलोचे असतात का पाव किलोचे असतात? माहित नाही. जाणून घ्यायची इच्छा नाही.सोन चांदी आणि डॉलर महाग होताहेत. त्यांच्या भावावर बारीक कडक नजर ठेवावी लागते.
अजूनही बरच वाचतो. सामो ह्यांनी धागा काढला म्हणून हे सगळे लीवावे लागले. नाहीतर लोक म्हणायचे हा साला काही वाचतच नाही.

मी तर बातम्या, बाजारभाव वगैरेही वाचत नाही. गाडी चालवताना गाडीचा स्पीडोमिटर आणि वाटेत येणारे वाहतुकीबाबतचे बोर्ड तेवढे वाचतो. पण केकू, तुमचं वाचून मला बरं वाटलं. म्हणजे इथे मला फोमो होत होता तो कमी झाला.

आणि हॉटेलात मेनू कार्ड? हे सांगायचे राहिलेच. मेनू पूर्ण वाचून त्याचा तौलनिक अभ्यास करून एक कटींगची ऑर्डर करतो. हे ही एक वाचनच.

Lol दोघेही.
एकेकाळी मी न वाचणाऱ्यांना तु क टाकायचे, आता मीही याच बोटीत. देव पण काय दिवस दाखवतो. मिळून कोतबो काढू हर्पा आणि केकू. जुन्या पुंजीवर आपलं माबोचं केंदिपो दुकान किती दिवस चालणार काय माहिती...!

तु क टाकायचे? केंदिपो?
वाचनाच्या कक्षा "रुंदाव्या" लागणार असंं दिसतंय. वाचन कमी पडतंय.

सामो,
मी का वाचते/वाचायचे सांगते. तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या मला एकसंध होण्याची धडपड होती. त्यामुळे कुठे तरी आपले दुवे शोधत वाचायचे. प्रत्येक पुस्तकात आपले दुवे सापडतील असं नाही मग कधीतरी एखादा तुकडा मिळाला की चंद्र गवसल्याचा आनंद व्हायचा. अखंड होण्याचा ध्यास म्हणजे वाचन आहे माझ्यासाठी. माझ्या अखंडात पूर्ण ब्रह्मांड येतं, पण फक्त माझं पर्सनल ब्रह्मांड.. ! Happy

आता इथ सगळे मनापासून लिहिताहेत तर मी ओं माझे एक गुपित उघड करतो.
मी मायबोलीवरच कुठलाही धागा वाचत नाही. मी फक्त प्रतिसाद वाचतो. प्रतिसादावरून एकूण रोख कळतो. मग मी मी लिहिलेला "प्रतिसाद" हा प्रोग्राम चालू करतो. पूर्वी तार करताना पैसे वाचवण्याची युक्ती होती . म्हणजे तार वाल्याला फक्त नंबर सांगायचा. चार लैनीच्या् अत्यंत वांंङमयीन संदेशाचे आकड्यात रुपांतर! माझा प्रोग्राम त्यावर आधारित आहे.
१=== छान.
२=== पुलेशु
३===अजून वाचायला आवडेल.
४=== जरा मोठे भाग टाका.
५=== पुढचा भाग कधी?
६===...
बापरे, सामोने हे वाचल तर?
भागो!

एखादा तुकडा मिळाला की चंद्र गवसल्याचा आनंद व्हायचा. अखंड होण्याचा ध्यास म्हणजे वाचन आहे माझ्यासाठी. माझ्या अखंडात पूर्ण ब्रह्मांड येतं, पण फक्त माझं पर्सनल ब्रह्मांड >>

बाप रे! हा प्रतिसाद फारच सुंदर होता.

केकू Happy

हपा, केकू,अस्मिता Lol
इतरांचे प्रतिसाद पण छान आहेत.
मला वाचायला लहाणपणापासून आवडते..शाळेत शेवटचा एक तास वाचनाचा असायचा..परिकथा,मॉरल स्टोरीज पुस्तकं वाचायला मिळायची.. घरी पण घेऊन जाता यायची..तिथून वाचनाची गोडी लागली.. मग नववीत असताना एक लायब्ररी लावली,तिथून कांदबर्या वाचायला सुरुवात झाली.. एकदा दिवाळी अंक मासिक आणले होते त्यात ते मधे मधे मोठ्यांसाठी वाले बाईचे दुमडलेले रंगीत चित्र असायचे.. ते आजीने बघितले आणि फार ओरडा बसलेला...
सध्या डिजीटल वाचन अधाशासारखे सुरू आहे..वेळ सत्कारणी वागतो..जितकं वाचतो तितक्या नव्या गोष्टी कळतच राहतात...अजून खूप वाचायचंय...

हपा, अस्मिता, केकू
भन्नाट...आता इथंच किती वाचलं एकमेकांचं...
पुढची १५-२० वर्ष अजिबात वाचू नका....अपवाद स्पिडोमिटर, सिग्नल सारख्या जीवनावश्यक स्क्रिप्ट...बाकी सगळं फुटकळ भंगारात टाका फुकट... Happy

Pages