विळी ...माझी दुरावलेली मैत्रीण

Submitted by मनीमोहोर on 5 June, 2023 - 04:20

माझी दुरावलेली मैत्रीण ...विळी

पंजाब, राजस्थान, गुजरात अश्या भारताच्या उत्तरेकडच्या भागात भाजी कापण्यासाठी सुरीचा वापर होत असला तरी महाराष्ट्रात मात्र भाजी चिरण्यासाठी (सुरीने भाजी कापतात आणि विळीवर चिरतात ) विळीचाच वापर आज अनेक वर्षे घरोघरी होत आहे. किनारपट्टी वरच्या कोकण भागात तर ओला नारळ खोवण्यासाठी विळीच्या पात्याला असलेल्या खोवणीचा ही तेवढाच उपयोग होतो.

विळी म्हणजे काय हे मराठी लोकांना तरी सांगण्याची गरज नाही पण तरी ही इथे लिहून ठेवते. एका अर्ध चंद्राकृती धारदार पोलादी पात्याला पुढे करवती सारखे दाते असलेलं गोलाकार सपाट चक्र असत ज्याचा उपयोग नारळ खवण्यासाठी केला जातो. हे पातं एका लाकडी पाटावर स्क्रू ने सैलसर बसवतात ज्यामुळे पात्याची उघड झाप सहजपणे करता येते. विळी उघडली की विळीच्या लाकडी पाटावर बसायचं आणि पात्याखाली ताटली ठेवून चिरायला सुरवात करायची. चिरून कातून झालं की पातं धुवून विळी मिटली की काम संपलं. मेंटेनन्स फारच सोपा. सुरीने कापताना चॉपिंग बोर्ड ची स्वच्छता हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो . असो. सुरीने भाजी कापताना सुरीचं पातं चॉपिंग बोर्ड वर पडतं तर विळीने चिरताना विळीच पातं आपल्या हाताला टच होतं. अंदाज चुकला तर हात कापू शकतो म्हणून बरेच जणांना विळीने चिरणे जमत नाही.

माझ्या लहानपणी आम्ही विळीच वापरत होतो आणि भाजी चिरण्याचं काम माझं खूप आवडतं होतं. मी आईला बरेच वेळा भाजी वगैरे सगळं चिरून देत असे. माझं चिरणं अगदी एकसारखं आणि छान आहे म्हणून आई नेहमी माझं कौतुक ही करत असे. आमच्या अलिबागची कळीची तोंडली चवदार म्हणून ठाणा मुंबई भागात ही खूप प्रसिद्ध आहेत. पण तेव्हा अलिबागला फार भाज्या मिळत नसल्याने वेगवेगळ्या तऱ्हेने आठवड्यात दोन तीन वेळा तरी तोंडली होत असत म्हणून आम्हा मुलांना काही तोंडली फार आवडत नसत.

तरी ही उन्हाळा आला की मी आईकडे तोंडली घेण्यासाठी हट्ट करायचे. तोंडल्याच्या काचऱ्या पावसाळ्यात तळून खाण्यासाठी म्हणून आई त्या उन्हाळ्यात वाळवून ठेवत असे. खाण्यापेक्षा तोंडल्याच्या काचऱ्या करणं माझं आवडत काम होत. एका वेळी दोन दोन शेकडा ( तेव्हा शेकडा असे आणि तो ही 120 चा ) तोंडली मला चिरायला मिळतील ह्याचंच अप्रूप अधिक होतं म्हणून मी आईच्या मागे लागत असे “तोंडली घे तोंडली घे “ म्हणून.

लग्न झाल्यावर पहिल्यांदा मे महिन्यात कोकणात गेले होते तेव्हा मागच्या एका पडवीत घरातल्या लहान, मोठ्या, धारदार, बेताची धार असलेल्या , पाट लहान मोठे असलेल्या, लहान स्टुला सारखा उंच आणि रुंद पाट असलेल्या घरातल्या सगळ्या विळ्या आंब्या फणसाच्या कामांसाठी भिंतीकडेला सज्ज होऊन अगदी तयारीत उभ्या राहिलेल्या पाहिल्या तेव्हा एवढया विळ्या एके ठिकाणी बघून मी चाटच पडले होते.

कच्च्या फणसाचे तळलेले गरे करण्याचं किचकट काम करताना खूप विळ्या हाताशी लागतात. एक जण फणसाच्या भेसी करायला आणि चार पाच जणी तरी गरे चिरायला बसतात तेव्हा कुठे पल्ला पडतो. फणस कापला की विळी चिकट होते. विळीच पातं गॅसवर गरम करून ते लगेच फडक्याने पुसून घेतलं की पातं अगदी स्वच्छ होत. पातं गरम झालं की पात्याला लागलेल्या खोबरेल तेलाचा आणि फणसाच्या चिकाचा जो वास सुटतो त्याची मी जबरदस्त फॅन आहे.

वाऱ्यामुळे खाली गळून पडणाऱ्या कैऱ्यांची त्या सोलून चिरून आंबोशीच करावी लागते. त्या पिकत घालू शकत नाही. हे काम ही रोज असतंच. त्या आंबोशीच गोड लोणचं तर छानच होतं पण आंबोशी आंबट ओली असताना भ न्ना ट ( वाचा मधुरा च्या स्टाईल मध्ये Happy ) लागते. तर आंबोशीच्या आणि बेगमीच्या लोणच्याच्या कैऱ्या चिरताना कैरीच्या आंबटपणामुळे विळीला चांगलीच धार चढते. कोकणी लोकं जात्याच काटकसरी. आलटून पालटून रोज वेगळी विळी घेतली की आपोआपच सगळ्या विळ्या धारदार होतात, मुद्दाम वेगळी धार काढावी लागत नाही. पूर्वी माझ्या तिकडे रहाणाऱ्या सासूबाई रात्रीच्या पंगतीत वाढायच्या आंब्याच्या फोडी ही विळीवरच करत असत आणि त्याला ही त्या “ आंबे चिरणे ” असच म्हणत. हल्ली मात्र आंबे कापण्यासाठी स्टीलची सुरी वापरतो आम्ही.

कोकणात आमच कुटुंब मोठं असल्याने रोजच्या वापरासाठी ही दोन तीन तरी विळ्या लागतातच. म्हणजे भाजी चिरणे, नारळ खोवणे अशी कामं एका वेळी करता येतात. तसेच वर्षातले अर्धे दिवस कांदा लसूण वर्ज्य स्वयंपाक होत असल्याने अनावधानाने कांदा चिरलेली विळी दुसऱ्या कशाला वापरली जाऊ नये म्हणून एक छोटीशी कांद्यासाठीची सेपरेट विळी आहे. आणि तिची सरमिसळ होऊ नये म्हणून ती नेहमी वेगळी म्हणजे कांद्याच्या टोपलीतच ठेवलेली असते.

कोकणातल्या घरच्या सगळ्या विळ्या पोलादी / लोखंडीच आहेत, एक ही विळी स्टेनलेस स्टील ची नाहीये. आमच्या शेजारचच गाव लोहारकामा साठी प्रसिद्ध आहे, तिथल्या लोहाराकडून छान धारदार पातं करून घ्यायचं आणि घरच्या आंब्याच्या किंवा फणसाच्या लाकडी पाटावर ते सुताराकडून बसवून घेतलं की वर्षानुवर्षे टिकणारी विळी तयार.

ठाण्याच्या घरातली विळी ही अशीच माझ्या लग्नाच्या ही किती तरी वर्ष आधी कोकणातूनच आलेली आहे. लग्न झाल्यावर अनेक वर्षे मी खाली बसूनच चिरत होते. सगळं आधी चिरून घ्यायचं आणि मग स्वयंपाकाला सुरवात करायची. परंतु मुलं लहान असताना खाली बसून चिरणं रिस्की वाटल्याने विळी ओट्याला लावून चिरायला सुरवात केली. खाली बसून चिरायची सवय जरी त्यामुळे मोडली तरी सकाळच्या ऑफिसच्या गडबडीत टाईम मॅनेजमेंट च्या दृष्टीने ते मोठंच वरदान ठरलं. सारखी उठ बस वाचल्यामुळे भरपूर मल्टि टास्किंग करणं शक्य झालं ज्यामुळे खूप वेळ वाचवता आला. तेव्हा भाज्या तर मी विळीवरच चिरायचे पण वेज कार्व्हिंग करताना पातळ स्लाईस करणे , फ्रुट सॅलड करताना फळं कापणे, काकडी टोमॅटो घातलेले सॅण्डविच कट करणे हे ही मी विळीवरच करत असे.

मुलं लग्नाची झाली की आई बाप त्यांच्या साठी सोनं चांदी घेऊन ठेवतात. पण विळी शिवाय घर ही कल्पना ही मी करू शकत नसल्याने छान धारदार पातं आणि खोवणी असलेल्या दोन विळ्या मी कोकणातून त्यांच्यासाठी घेऊन ठेवल्या होत्या. Happy तथापि लग्न झाल्यावर मुलगी गेली परदेशात आणि तिची विळी मात्र राहिली ठाण्यात.विळी विनाच तिचा संसार सुरू झाला ह्याच तिला जरी काही वाटलं नाही तरी मला थोडं वाईट नक्कीच वाटलं होतं.

मी जेव्हा पहिल्यांदा तिच्याकडे गेले तेव्हा तिच्यासाठी घेतलेली विळी चेक इन बॅग मधून तरी न्यावी अस होतं मनात पण " शस्त्रास्त्र " आणलंय म्हणून कस्टम वाले एखाद वेळी अडवतील ह्या भीतीने मी तो मोह आवरला. Happy तिच्याकडे स्वयंपाक करताना माझ्या साठी सर्वात कठीण गोष्ट सुरीने चिरणे ही होती. बोट / हात कापून न घेणे ह्यालाच प्राधान्य दिल्याने चार बटाटे चिरायला अर्धा तास आणि अर्धा कांदा तो कापायला पंधरा मिनिटं लागत असत. आणि वर चिरणं ही नीट होत नसे ते वेगळंच. पण दुसरा पर्याय ही नव्हता. हळू हळू सुरीची सवय होत गेली. सुरीने ही तितकंच छान आणि फास्ट चिरता यायला लागलं . आणि आता तर काही चिरायचं असेल तर सुरीकडेच हात जातो.

आमच्या ऐतिहासिक विळीला आता घरातल्या एखाद्या अनुभवी, वयस्कर, सुगरण स्त्री सारखं मानाचं स्थान मिळालं आहे. म्हणजे तिला कशी रोजची कामं सांगितली नाहीत तरी “ तुम्ही पाक करा बाकी लाडवांच मी बघते “ असं कधीतरी म्हणून तिच्या अनुभवाचा मान ठेवला जातो तसच सूरी, चॉपर , फूड प्रोसेसर च्या जमान्यात रोज चिरण्या / कापण्यासाठी विळी वापरली नाही तरी काकडी कोचवायला, सुरण, लाल भोपळा अश्या कठीण भाज्यांची सालं काढायला, नारळ खोवायला वगैरे तिचा उपयोग आवर्जून केला जातो.

हेमा वेलणकर

( विळीचा फोटो नाहीये माझ्याकडे )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालघर वसईकडे चारचाकी गाडीच्या चाकाची पोलादी धाव ( शब्द बरोबर आहे का?) असे, त्या गोलाकार पात्यांच्या तुकड्यांपासून भक्कम रुंद विळ्या बनवीत. मात्र त्या थोड्याशा उभ्या असत. प्रचंड मजबूत. न गंजणाऱ्या. आणि त्याला तसेच भक्कम सागाचे किंवा फणशीचे ऐसपैस पाट.

>>> माझं चिरणं अगदी एकसारखं आणि छान आहे म्हणून आई नेहमी माझं कौतुक ही करत असे.
>>>>खाण्यापेक्षा तोंडल्याच्या काचऱ्या करणं माझं आवडत काम होत. एका वेळी दोन दोन शेकडा ( तेव्हा शेकडा असे आणि तो ही 120 चा ) तोंडली मला चिरायला मिळतील ह्याचंच अप्रूप अधिक होतं म्हणून मी आईच्या मागे लागत असे “तोंडली घे तोंडली घे “ म्हणून.
हे असे संदर्भ मस्त वाटले वाचायला. यांच्यामुळे लेख डॉक्युमेन्टरी न होता function at() { [native code] }इशय मस्त झालेला आहे.
>>>>>पातं गरम झालं की पात्याला लागलेल्या खोबरेल तेलाचा आणि फणसाच्या चिकाचा जो वास सुटतो त्याची मी जबरदस्त फॅन आहे.
वाह!!

लेख फार सुरेख झालेला आहे. तुमचं कोकणातलं बालपण , हेवा वाटावा असे गेलेले जाणवते. ममो लिहीत रहा.

Ashu29, विळी न वापरत असून ही सगळं वाचलस म्हणून धन्यवाद.

हीरा, नवीन माहिती धन्यवाद.

सामो , प्रतिसाद खूप आवडला. छान लिहिलं आहेस.

लेख फार सुरेख झालेला आहे. तुमचं कोकणातलं बालपण , हेवा वाटावा असे गेलेले जाणवते. ममो लिहीत रहा. >> थॅंक्यु सो मच.

फार छान झालाय लेख.
विळी माझी प्रेमाची. आईकडे खूप धारदार लोखंडी पाते असलेली झकास विळी होती. सगळ्यांचे हात कापायचे. पण मला आणि आईला तंत्र अवगत झालेले. विळीवर एकसारखी बारीक भाजी चिरणे हा छंद आहे माझा, होता म्हणावे लागेल.
आईच्या विळीवर माझा डोळा होता. लग्न करून यु के ला येताना विळी नेता येईल का नाही हे माहिती नव्हते. नम्तर 2/4 वर्षात त्या विळीचे पाते अचानक तुटले.
पुन्हा तशी विळी मिळाली नाही.
आता मी आणि आई, दोघीही, सूरी वापरतो
ममो, तुमच्यामुळे सगळे पुन्हा आठवले Happy

लेख नेहमीप्रमाणे खूपच सुंदर आहे. साध्यासुध्या गोष्टीतून रंजक असे काहीतरी निर्माण करणे ह्यात तुमचा हातखंडा आहे. केवळ रम्य आठवणीमुळेच मनात रुतलेल्या गोष्टींना हात घालून त्या प्रकाशात आणता आहात. ही गतरम्यता आम्हांला आवडते आहे. त्यात काही काळ डुंबून राहिल्यामुळे ताण थोडासा हलका होतो आहे.हलके वाटते आहे.
आभार.

त्या गोलाकार पात्यांच्या तुकड्यांपासून भक्कम रुंद विळ्या बनवीत. मात्र त्या थोड्याशा उभ्या असत. प्रचंड मजबूत. न गंजणाऱ्या. आणि त्याला तसेच भक्कम सागाचे किंवा फणशीचे ऐसपैस पाट. >>> कमानपाट्याची . या विळीची धार कधीच गेलेली नाही.
जुन्या पिढीतील ही विळी आणि पितळी परात या दोन गोष्टी माझ्याकडे आहेत वापरात. अजुन एक मोठं तांब्याचे तपेले ठेवले आहे. वापरत नाही पण अजून आहे.

@हीरा >>> गतरम्यता -- नॉस्टॅल्जियाला सुरेख मराठी प्रतिशब्द

@वर्णिता >>> तुमच्या विळीचा फोटो टाका ना.

एकसारखी बारीक भाजी चिरणे हा छंद आहे माझा, होता म्हणावे लागेल. >> अदिती छंद हा perfect शब्द वापरलास , माझा ही छंद आहे म्हण ना. माझ्या मुलात ही माझी ही आवड आलीय. तो ही बघत राहावं अस अप्रतिम चिरतो. पण तो सूरी वापरतो.

वर्णिता >>> तुमच्या विळीचा फोटो टाका ना. > अनुमोदन .

हीरा किती सुंदर लिहिलं आहे. थॅंक्यु सो मच.
गतरम्यता >> खूप च आवडला शब्द.

माझा शोध नव्हे.*- तरीही धन्यवाद. शब्दाचा चपखल वापरही शोधा इतकाच महत्त्वाचा !
Wink >> भाऊ बरोब्बर लिहिलय.

छान लेख ममो!
आमच्याकडेही विळीच होती लहानपणी, साबा तर अजूनही विळीच वापरतात.
मला काहीसाठी विळी तर काही गोष्टी चिरायला विळी लागले ते. उदा. बो भोपळ्याची साले काढून भोपळा चिरायला विळीच बरी वाटते तर बारीक का कांदा सुरीवर भराभर चिरता येतो. पालेभाज्या मला कधीच विळीवर चिरता आल्या नाहीत. बायका सगळी जुडीच्या जुडी हातात धरून भाजी चिरणे एक मिनिटात संपवतात ते मला अजूनही जमले नाही.

नारळ खवायची खोवणी मात्र आमच्याकडे गेल्या तीन चार पिढ्यांपासून आहे आणि एकदम छान आहे. विळीवर नारळ खवताना पाते सारखे हलते आणि नारळ खवायला वेळ जातो. आमची खोवणी सोसायटीमधे बरीच प्रसिद्ध आहे आणि तिला मागणीही असते याच कारणामुळे Happy

मस्त जुन्या आठवणी जागवल्यात. कोकणी आडोळी / आडवळी म्हणतात. >> हे वाचून मला भोंडल्यातले गाणे आठवले - आडात पडली आडोणी .... Happy

माझ्या माहेरी सुद्धा आधी विळी च वापरायची आई,त्यामुळे सासरी असणारी मोठ्ठी विळी मला पटकन वापरता आली ही जरा कौतुकाची गोष्ट झाली होती,
पण आता नाही वापरत, गेली कित्येक वर्षे विळीवर चिराचीर केलीच नाही,
मस्तच लेख

मस्त लेख. मी आणि आई पण पूर्वीपासून विळीच वापरायचो, पण लग्नानंतर सुरीची सवय झाली. आई अजूनही विळी वापरते. ती माझ्याकडे येते तेव्हा मला विळी काढून ठेवावी लागते. एकदा गंमत झाली, ती माझ्याकडे आली आणि सकाळी मी ऑफिस ला गेले, विळीचं काही लक्षात आलं नाही. मग तिचा फोन आला तर मला अजिबात आठवेचना कुठे ठेवलीय ते. बिचारी ने सोसायटीतील कुणाची तरी मागून आणली.

कातण्याचा दंतुर पंखा असलेल्या विळीला मोरणी म्हणतात कारण तो कातण्याचा दंतुर भाग ( कातणी) मोराच्या पिसाऱ्यासारखा आणि त्याच्या सांध्यापाशी मूळ पात्याचे किंचित पुढे आलेले टोक हे छोट्याशा पायांसारखे दिसते. मऊ लोखंड असेल तर सांधा जोडताना उष्णतेने वितळते आणि ते टोक ठोकून एकजीव करून नाहीसे करता येते. मध्ये पक्ष्याच्या मानेसारखी घन वृत्तचिती ( शब्द सुचवा!) राहाते.
पण कमान पाट्याच्या विळ्या अखंडच असत.

मस्त लिहिलेस ग.. आवडले.

मला ते अंजली प्रकरण कधीही जमले नाही. नारळ खवायचा तर विळीच हवी. इकडे आडाळा म्हणतात. इथले आडाळे भरभक्कम असतात, तिकडे मुंबईत माझी नाजुकशी विळी होती.

सर्व प्रतिसाद देणाऱ्यांना मनापासून धन्यवाद.

SonaliSl धन्यवाद.

आडात पडली आडोणी . >> निकु +11 , असेल हा संदर्भ.

सान्वी, सुरीची सवय नसेल तर नाही येणार चिरता कतता हा स्वानुभव आहे, त्यामुळे अगदी डोळ्यासमोर आलं

आदू धन्यवाद

कातण्याचा दंतुर पंखा असलेल्या विळीला मोरणी म्हणतात >> हीरा , छान लिहिलं आहे विळीला मोरणी म्हणतात माहीत नव्हतं मला मोरळी हा शब्द माहीत होता विळीला.

साधना , थॅंक्यु.

मी विळीवर लिहिलेलं एवढया जणांनी वाचलं, काही जण आता विळी वापरत नसले किंवा कमी वापरत असले तरी विळी संदर्भातल्या त्यांच्या आठवणी इथे लिहिल्या खूप छान वाटलं , सर्वांना त्या साठी धन्यवाद.

लेखात लिहिलेल्या काचऱ्या आई अश्या करायची.

तोंडल्याच्या गोल गोल चिरून काचऱ्या करून त्या कडकडीत उन्हात वाळवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवायच्या. हवं असेल तेव्हा त्या काचऱ्या पापड वगैरे तळतो तश्या तळायच्या आणि गरम असतानाच वरून मीठ तिखट भुरभुरवायचे आणि खायच्या. पानात डावीकडे पाऊस वैगेरे असेल तर मस्त लागतात वरण भाता बरोबर.
जाई तुला वि पु पण केली आहे.

ही आमची खूप वर्षे जुनी विळी. पाटाची मागची बाजू ओट्याच्या कडेवर मस्त फिक्स होते आणि वरच्या वर चिरता येतं. इथे फोटो डकवून ठेवतेय.

20230713_110058.jpg

मी सासरी आले तेव्हापासून साबाना अशीच ओट्यावर विळी ठेवून काम करताना बघितलंयं. आता मीही शिकलेच.

किती छान लेख! मलाही मी पण विळीवाल्याच पिढीतली. म्हणजे आईला विळीच वापरताना बघितलंय कित्येक वर्ष. तिला तर अजूनही सुरीने जमत नाहीच काही कापायला. विळीवर एकसारख्या बारीक भाज्या चिरणं तुमची पिढीच करू जाणे. आत्ताही आई इकडे अमेरिकेत आलीये तरी सुरी नाही वापरायची तिला. तिच्यासाठी इंडीयन गोर्सरी दुकानातून विळी आणून द्यावी लागली Happy आता एकदम लाईटवेट छोटी स्टीलची मिळाली तर ती तिला इतकी आवड्ली म्हटली घेऊन जाते तिकडे. इथे काय वापरणार तू? म्हटलं बायका आणि विळी न तुटणारं नातं खरंच!

ममो, तुमचे लेख वाचणे हा नेहमीच एक सुंदर अनुभव असतो. भूतकाळात हरवून जायला होते. हा लेखही तसाच आहे. माझ्याकडे देखिल दोन विळ्या आहेत. कधीतरीच वापरते. पुढच्या सर्व लेखनासाठी खूप शुभेच्छा. लौकर लौकर लेख येऊ द्यात.

Pages