विळी ...माझी दुरावलेली मैत्रीण

Submitted by मनीमोहोर on 5 June, 2023 - 04:20

माझी दुरावलेली मैत्रीण ...विळी

पंजाब, राजस्थान, गुजरात अश्या भारताच्या उत्तरेकडच्या भागात भाजी कापण्यासाठी सुरीचा वापर होत असला तरी महाराष्ट्रात मात्र भाजी चिरण्यासाठी (सुरीने भाजी कापतात आणि विळीवर चिरतात ) विळीचाच वापर आज अनेक वर्षे घरोघरी होत आहे. किनारपट्टी वरच्या कोकण भागात तर ओला नारळ खोवण्यासाठी विळीच्या पात्याला असलेल्या खोवणीचा ही तेवढाच उपयोग होतो.

विळी म्हणजे काय हे मराठी लोकांना तरी सांगण्याची गरज नाही पण तरी ही इथे लिहून ठेवते. एका अर्ध चंद्राकृती धारदार पोलादी पात्याला पुढे करवती सारखे दाते असलेलं गोलाकार सपाट चक्र असत ज्याचा उपयोग नारळ खवण्यासाठी केला जातो. हे पातं एका लाकडी पाटावर स्क्रू ने सैलसर बसवतात ज्यामुळे पात्याची उघड झाप सहजपणे करता येते. विळी उघडली की विळीच्या लाकडी पाटावर बसायचं आणि पात्याखाली ताटली ठेवून चिरायला सुरवात करायची. चिरून कातून झालं की पातं धुवून विळी मिटली की काम संपलं. मेंटेनन्स फारच सोपा. सुरीने कापताना चॉपिंग बोर्ड ची स्वच्छता हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो . असो. सुरीने भाजी कापताना सुरीचं पातं चॉपिंग बोर्ड वर पडतं तर विळीने चिरताना विळीच पातं आपल्या हाताला टच होतं. अंदाज चुकला तर हात कापू शकतो म्हणून बरेच जणांना विळीने चिरणे जमत नाही.

माझ्या लहानपणी आम्ही विळीच वापरत होतो आणि भाजी चिरण्याचं काम माझं खूप आवडतं होतं. मी आईला बरेच वेळा भाजी वगैरे सगळं चिरून देत असे. माझं चिरणं अगदी एकसारखं आणि छान आहे म्हणून आई नेहमी माझं कौतुक ही करत असे. आमच्या अलिबागची कळीची तोंडली चवदार म्हणून ठाणा मुंबई भागात ही खूप प्रसिद्ध आहेत. पण तेव्हा अलिबागला फार भाज्या मिळत नसल्याने वेगवेगळ्या तऱ्हेने आठवड्यात दोन तीन वेळा तरी तोंडली होत असत म्हणून आम्हा मुलांना काही तोंडली फार आवडत नसत.

तरी ही उन्हाळा आला की मी आईकडे तोंडली घेण्यासाठी हट्ट करायचे. तोंडल्याच्या काचऱ्या पावसाळ्यात तळून खाण्यासाठी म्हणून आई त्या उन्हाळ्यात वाळवून ठेवत असे. खाण्यापेक्षा तोंडल्याच्या काचऱ्या करणं माझं आवडत काम होत. एका वेळी दोन दोन शेकडा ( तेव्हा शेकडा असे आणि तो ही 120 चा ) तोंडली मला चिरायला मिळतील ह्याचंच अप्रूप अधिक होतं म्हणून मी आईच्या मागे लागत असे “तोंडली घे तोंडली घे “ म्हणून.

लग्न झाल्यावर पहिल्यांदा मे महिन्यात कोकणात गेले होते तेव्हा मागच्या एका पडवीत घरातल्या लहान, मोठ्या, धारदार, बेताची धार असलेल्या , पाट लहान मोठे असलेल्या, लहान स्टुला सारखा उंच आणि रुंद पाट असलेल्या घरातल्या सगळ्या विळ्या आंब्या फणसाच्या कामांसाठी भिंतीकडेला सज्ज होऊन अगदी तयारीत उभ्या राहिलेल्या पाहिल्या तेव्हा एवढया विळ्या एके ठिकाणी बघून मी चाटच पडले होते.

कच्च्या फणसाचे तळलेले गरे करण्याचं किचकट काम करताना खूप विळ्या हाताशी लागतात. एक जण फणसाच्या भेसी करायला आणि चार पाच जणी तरी गरे चिरायला बसतात तेव्हा कुठे पल्ला पडतो. फणस कापला की विळी चिकट होते. विळीच पातं गॅसवर गरम करून ते लगेच फडक्याने पुसून घेतलं की पातं अगदी स्वच्छ होत. पातं गरम झालं की पात्याला लागलेल्या खोबरेल तेलाचा आणि फणसाच्या चिकाचा जो वास सुटतो त्याची मी जबरदस्त फॅन आहे.

वाऱ्यामुळे खाली गळून पडणाऱ्या कैऱ्यांची त्या सोलून चिरून आंबोशीच करावी लागते. त्या पिकत घालू शकत नाही. हे काम ही रोज असतंच. त्या आंबोशीच गोड लोणचं तर छानच होतं पण आंबोशी आंबट ओली असताना भ न्ना ट ( वाचा मधुरा च्या स्टाईल मध्ये Happy ) लागते. तर आंबोशीच्या आणि बेगमीच्या लोणच्याच्या कैऱ्या चिरताना कैरीच्या आंबटपणामुळे विळीला चांगलीच धार चढते. कोकणी लोकं जात्याच काटकसरी. आलटून पालटून रोज वेगळी विळी घेतली की आपोआपच सगळ्या विळ्या धारदार होतात, मुद्दाम वेगळी धार काढावी लागत नाही. पूर्वी माझ्या तिकडे रहाणाऱ्या सासूबाई रात्रीच्या पंगतीत वाढायच्या आंब्याच्या फोडी ही विळीवरच करत असत आणि त्याला ही त्या “ आंबे चिरणे ” असच म्हणत. हल्ली मात्र आंबे कापण्यासाठी स्टीलची सुरी वापरतो आम्ही.

कोकणात आमच कुटुंब मोठं असल्याने रोजच्या वापरासाठी ही दोन तीन तरी विळ्या लागतातच. म्हणजे भाजी चिरणे, नारळ खोवणे अशी कामं एका वेळी करता येतात. तसेच वर्षातले अर्धे दिवस कांदा लसूण वर्ज्य स्वयंपाक होत असल्याने अनावधानाने कांदा चिरलेली विळी दुसऱ्या कशाला वापरली जाऊ नये म्हणून एक छोटीशी कांद्यासाठीची सेपरेट विळी आहे. आणि तिची सरमिसळ होऊ नये म्हणून ती नेहमी वेगळी म्हणजे कांद्याच्या टोपलीतच ठेवलेली असते.

कोकणातल्या घरच्या सगळ्या विळ्या पोलादी / लोखंडीच आहेत, एक ही विळी स्टेनलेस स्टील ची नाहीये. आमच्या शेजारचच गाव लोहारकामा साठी प्रसिद्ध आहे, तिथल्या लोहाराकडून छान धारदार पातं करून घ्यायचं आणि घरच्या आंब्याच्या किंवा फणसाच्या लाकडी पाटावर ते सुताराकडून बसवून घेतलं की वर्षानुवर्षे टिकणारी विळी तयार.

ठाण्याच्या घरातली विळी ही अशीच माझ्या लग्नाच्या ही किती तरी वर्ष आधी कोकणातूनच आलेली आहे. लग्न झाल्यावर अनेक वर्षे मी खाली बसूनच चिरत होते. सगळं आधी चिरून घ्यायचं आणि मग स्वयंपाकाला सुरवात करायची. परंतु मुलं लहान असताना खाली बसून चिरणं रिस्की वाटल्याने विळी ओट्याला लावून चिरायला सुरवात केली. खाली बसून चिरायची सवय जरी त्यामुळे मोडली तरी सकाळच्या ऑफिसच्या गडबडीत टाईम मॅनेजमेंट च्या दृष्टीने ते मोठंच वरदान ठरलं. सारखी उठ बस वाचल्यामुळे भरपूर मल्टि टास्किंग करणं शक्य झालं ज्यामुळे खूप वेळ वाचवता आला. तेव्हा भाज्या तर मी विळीवरच चिरायचे पण वेज कार्व्हिंग करताना पातळ स्लाईस करणे , फ्रुट सॅलड करताना फळं कापणे, काकडी टोमॅटो घातलेले सॅण्डविच कट करणे हे ही मी विळीवरच करत असे.

मुलं लग्नाची झाली की आई बाप त्यांच्या साठी सोनं चांदी घेऊन ठेवतात. पण विळी शिवाय घर ही कल्पना ही मी करू शकत नसल्याने छान धारदार पातं आणि खोवणी असलेल्या दोन विळ्या मी कोकणातून त्यांच्यासाठी घेऊन ठेवल्या होत्या. Happy तथापि लग्न झाल्यावर मुलगी गेली परदेशात आणि तिची विळी मात्र राहिली ठाण्यात.विळी विनाच तिचा संसार सुरू झाला ह्याच तिला जरी काही वाटलं नाही तरी मला थोडं वाईट नक्कीच वाटलं होतं.

मी जेव्हा पहिल्यांदा तिच्याकडे गेले तेव्हा तिच्यासाठी घेतलेली विळी चेक इन बॅग मधून तरी न्यावी अस होतं मनात पण " शस्त्रास्त्र " आणलंय म्हणून कस्टम वाले एखाद वेळी अडवतील ह्या भीतीने मी तो मोह आवरला. Happy तिच्याकडे स्वयंपाक करताना माझ्या साठी सर्वात कठीण गोष्ट सुरीने चिरणे ही होती. बोट / हात कापून न घेणे ह्यालाच प्राधान्य दिल्याने चार बटाटे चिरायला अर्धा तास आणि अर्धा कांदा तो कापायला पंधरा मिनिटं लागत असत. आणि वर चिरणं ही नीट होत नसे ते वेगळंच. पण दुसरा पर्याय ही नव्हता. हळू हळू सुरीची सवय होत गेली. सुरीने ही तितकंच छान आणि फास्ट चिरता यायला लागलं . आणि आता तर काही चिरायचं असेल तर सुरीकडेच हात जातो.

आमच्या ऐतिहासिक विळीला आता घरातल्या एखाद्या अनुभवी, वयस्कर, सुगरण स्त्री सारखं मानाचं स्थान मिळालं आहे. म्हणजे तिला कशी रोजची कामं सांगितली नाहीत तरी “ तुम्ही पाक करा बाकी लाडवांच मी बघते “ असं कधीतरी म्हणून तिच्या अनुभवाचा मान ठेवला जातो तसच सूरी, चॉपर , फूड प्रोसेसर च्या जमान्यात रोज चिरण्या / कापण्यासाठी विळी वापरली नाही तरी काकडी कोचवायला, सुरण, लाल भोपळा अश्या कठीण भाज्यांची सालं काढायला, नारळ खोवायला वगैरे तिचा उपयोग आवर्जून केला जातो.

हेमा वेलणकर

( विळीचा फोटो नाहीये माझ्याकडे )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहले आहे मनीमोहर ..
मला विळी वर काहीच करायला जमत नाही .
पण माझ्या आईला सगळ्या चीरण्या साठी विळी लागते अगदी लिंबू पण ती त्यावर चिरते .
आमच्या कडे 3 विळी आहेत . एक सगळे chirnyachi एक उपवासाची एक अशीच स्टील chi ..
Screenshot_20230605-140431_Gallery.jpg

तुमचा नेहमीच्या पठडीतला आणखी एक छान लेख. आमच्याकडे विळीला आढाळा म्हणतात. तुमच्याकडे जशी कांद्याची वेगळी विळी तसा आमच्याकडे मासे कापायचा वेगळा आढाळा होता.
मी लहानपणापासून नारळ खोवणे, वाली चिरणे ही कामे आढाळ्यावर केली आहेत. अंजलीचे व्हेजिटेबल चॉपर आणि कोकोनट स्क्रेपर येऊन (भंगारात) गेले. विळी स्थान टिकवून आहे.
आता लोकांना खाली बसायची सवय नसते , त्यांच्यासाठी स्टूल विळी निघाली आहे.

मस्त लिहिलंय ममो!
आमच्या घरीही अशीच अत्यंत जुनी, अनुभवी वगैरे विळी आहे. मी तिच्यावर कधीही काहीही चिरलेलं नाही आणि बहुतेक कधी चिरणारही नाही. माझ्या एका आत्याचा हात त्या विळीवर कापला गेल्याची घटना माझ्यासाठी पुरेशी भीतिदायक आहे! आजी आणि आई मात्र विळीच वापरायच्या. आता आई कटर आणि विळी, दोन्ही वापरते. त्या विळीला खवणी मात्र नाही. दुसऱ्या दुय्यम विळीला खवणी आहे.
आमची ती अनुभवी विळी एवढी मोठी आणि जड आहे की ती ओट्यावर वगैरे ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
लहानपणच्या मे महिन्यातल्या अत्यंत रम्य आठवणी विळीशी निगडीत आहेत. आंबे आणि फणस विळीवरच फोडले जायचे आणि तिथेच भोवती बसून खाल्ले जायचे Happy

मस्त लिहिलंय. आमच्याकडे पूर्ण लोखंडी विळी होती.
ती उघडली की वरच्या गोलावर नारळ खोवायला कंगोरे होते.
(वावेंची पोस्ट नंतर वाचली, त्यांनी लिहिले तशी खवणी होती.)
बहुतेक वरच्या कपाटात असेल अजून पोत्यात, वेळ मिळाला आणि पोत्यात विळी मिळाली तर फोटो पोस्ट करेन.

मस्त लेख.विळी चं आणि माझं कधीच पटलेलं नाही.एकदा जवळपास अंगठा कापून घेतलाय.बरेच खोल टाके पडले होते.
दातेरी अंजलीची सूरी,दोरी चॉपर आणि खोबऱ्या साठी अंजली चा हॅन्ड स्क्रॅपर वापरते.
मला एम पी च्या मैत्रिणीने सांगितलं की त्यांच्याकडे पण विळी असते, पण फार वापर करत नाहीत.त्याला हसिया म्हणतात.

हसिया हे फारच नाजूक नाव आहे 'विळी'च्या मानाने! Happy
अंजलीचा कोकोनट स्क्रेपरच मीपण वापरते. कापायला सुरी किंवा अंजलीचाच कटर. दोरीवाल्याचा मोह बऱ्याच वेळा होऊनही अजून घेतला नाहीये.

अरे वा आज विळी का.. मी विळीवर खाली बसून भाज्या कांदे चिरले आहेत. काकडी चोचवली आहे. व नारळ पण खोवला आहे. पुणेरी पद्धत. एक पाय मुडपुन बसायचे. कोथिंबीर मिरची पण मस्त चिरून निघते . आमच्या कडे माहेरी एकच विळी, एक बटर नाइफ ह्यांडल मोड्लेली असे होते. आता सुरीच. काचर्‍या पण मस्त होतात विळीवर. सासरी तोंडल्याच्या काचर्‍या भाजी व बटाटा काचर्‍य फारच फेमस होत्या. अजूनही बनव्ल्या की नवर्‍याची आठवण येतेच. बरोबर चिंच गुळाची आमटी, कोशिंबीर व पापड. असा स्वयंपाक वीस वर्शे तरी केला आहे. विळी बेस्टच.

माहेरी मेजवान्या व्हायच्या तेव्हा भरपूर वापरायचो विळी. आईच्या हाताखाली काम केले आहे. सुक्या खोबर्‍याचे काप पण होतात मस्त विळीवर.

ममो, छान विळीपुराण.

आमच्या कडे दोन विळ्या होत्या एक थोडी मोठी, आणि एक पितळी बेस असलेली परंतु छान पोलादी पाते असलेली छोटी मी नियमीत वापरात होती.
मोठी विळी क्वचितच वापरली जाई.

तुमचा नेहमीच्या पठडीतला आणखी एक छान लेख. +
तुमचे घरातील लहानसहान वस्तूंवरील जिव्हाळा पाहून खूप छान वाटते.
मलापण विळीवर चिरकाम करायला आवडते. पण सतत उठबस करावी लागते म्हणून सुरी वापरते. पण खोबरे, कोबी, पालेभाज्या, चिकन मटण कापायला मात्र विळीच लागते. मागे मी vacuum base विळी आणली होती ती किचनच्या ओट्यावर फिक्स करुन वापरता येते. काही चिरताना विळी अजिबात हालत नाही.

नेहमीप्रमाणे रोचक लेख Happy
सासरी एक विळी आहे , ईथे तिला मोडणी म्हणतात . अगोदर गोंधळ व्हायचा माझा Happy
साबाना नेहमी ओट्यावर विळी ठेउन भाज्या कापताना बघितल आहे , आता मलाही तीच सवय झालीय .
विळीवर भाज्या कापताना बोट कापली जाण्याची भीती मला नेहमी वाटत असते .
बरेचदा कापूनही झाली आहेत . पालेभाज्या चिरताना , खोबर खवताना .
साबाना सफाईने भराभर एक्दम बारीक कांदा चिरताना बघून एक्दम कौतक वाटायच , मला त्यावेळेला एक छोटासा टोमॅटो चिरायलाही ५ मिन लागायाची.

तुमच्याकडे जशी कांद्याची वेगळी विळी तसा आमच्याकडे मासे कापायचा वेगळा आढाळा होता...... हो.आमच्याकडे आडाळा म्हणायचे.माशांना वेगळी विळी असायची.आजही आहे.फक्त पडून आहे.कारण मासे साफ करून आणले जातात आणि तिसऱ्या आताशा चिरल्या न जाता गरम केल्या जातात किंवा फ्रीझरमध्ये ठेऊन नंतर नीट केल्या जातात.पण चिरलेल्या ची चव वेगळीच असते.

विळीवर कातणे,चिरणे सोपे व्हायचे.काकडी चोचवणे किंवा केळफूल चिरणे हे विळीवर छान व्हायचे.ती मोठी विळी ओट्यावर ठेऊन कसे काय काम करतात हे अजूनही कळत नाही.
बऱ्याच वर्षांपूर्वी पासून अंजलीचा कटर वापरते.फक्त नारळ कातताना विळी वापरते.तेपण काम बऱ्याच काळापासून आमची ताई करते.

माझ्याकडे इथेही आहेत दोन विळ्या - एक स्टीलची - ओट्यावर टेकवून वापरण्याजोगी आणि दुसरी मोठ्या पाटाची, अमांनी लिहिलं तसं ज्यावर डावा पाय मुडपून बसता येतं अशी. पहिली नक्कीच रोजच्याला सुटसुटीत असली तरी दुसरी माझी विशेष आवडती कारण ती आईने मला मोठा पाट आवडतो म्हणून तशी करवून घेतली होती.
दोन्ही विळ्या कित्येक वर्षं वापरल्या, आता खवलेलं फ्रोझन ओलं खोबरं आणि चिरलेला गूळ/गुळाची पावडर मिळायला लागल्यापासून नाही वापरल्या जात. काकड्याही चॉपरमध्ये कोचवल्या जातात. सुरीने तितक्या सहजी न करता येण्यासारखे हेच तीन मुख्य प्रकार होते.

त्यावरून आठवलं, माझ्याकडचं लाटणंही असंच आईने हौशीने मिळवलेलं फणशीचं छान साइजचं आणि गुळगुळीत आहे - इथे बाजारात ती टिचकी लाटणी मिळतात ती मला वापरताच येत नाहीत! Happy

बाकी बोटं कापून घ्यायच्या कलेचं प्रात्यक्षिक मला सुरी वापरूनही दाखवता येतं. Proud

छान.
चेकिन मधुन न्यायला हरकर नाही ममो. आम्ही पण इकडे आणलेली आहे. वापरत नाही पण आहे. कधी मोदक करायला नारळ आणलाच तर खवता येतो.
ठाण्याला एक विळी-खवणी आणि एक स्पेशल कोकणातून आणलेली नुसती खवणी आहे. तिला घसरगुंडी सारखा पाट आहे. खवणीच्या दात्यांना कानशीने धार करणे हा एक बाबांचा आवडत्या उद्योगांपैकी एक आहे. Happy

छान लेख हेमा ताई!

मी लहानपणापासून विळी वापरत आले. आईकडे एक लाकडी पाटाची आहे तिला नंतर सनमायका (असेच नाव आहे ना Happy लावून घेतलेला. आजोळी भल्या मोठ्या लांबट पाटाची विळी होती. सुरी अजिबात वापरता येत नसल्याने अमेरिकेत येताना आईने अंजली ची घेऊन दिलेली. पण ती कसली प्लास्टिकची तकलादू.. कशीबशी वापरली, तिच्यावर सुरुवातीला नारळ आणून खवलेला आठवतय जेव्हा फ्रोझन नारळ मिळतो हे माहीत नव्हते. त्यानंतर मात्र मग सुरीशी मैत्री करावीच लागली. . आता वेगवेगळ्या सुरी प्रकारा बद्द्ल रीसर्च करणे चालू असते.

मागे गणपतीला भारतात गेलेले तेव्हा हौसेने विळी वर नारळ खवायला घेतला पण वर अनु म्हणतेय तसा अंगठा कापून घेतला. अजून तिथे हात लावला की दुखते Sad

त्यावरून आठवलं, माझ्याकडचं लाटणंही असंच आईने हौशीने मिळवलेलं फणशीचं छान साइजचं आणि गुळगुळीत आहे - इथे बाजारात ती टिचकी लाटणी मिळतात ती मला वापरताच येत नाहीत!>>> खरंय. टिचकी लाटणी फारशी लागत नाहीत.

वाह मस्त लेख. बराच रीलेट केला. त्रिविळी फोटो मस्त.

काही गोष्टी चिरायला अजूनही विळीच लागते पाटाची. तरी मी आंबे सुरीने चिरते, नवरा ते काम मात्र अजूनही विळीने करतो (त्याच्यावर टाकलं की एका आंब्यासाठीही विळी घेतो) . नारळ खवायला विळीच वापरतो.

आमच्या उद्योगी मुलामुळे विळी, कोयता, सुरी सर्वच जपून आम्हाला लपवावं लागतं, मग अशावेळी सुरी हाताशी लागेल अशी ठेवल्याने तीच पटकन वापरली जाते.

आमच्याकडे विळीला आढाळा म्हणतात. >>> अरे वा नवीन नाव समजलं.

ईथे तिला मोडणी म्हणतात >>> हेही पहील्यांदा ऐकलं.

मी इथे विळी, सुरी काहीही कांदा चिरायला वापरलं की पहील्यांदा घासून ठेवते, दोनदा घासायला लागते तो वास एकतर उग्र असतो मिक्स होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते.

सर्व प्रतिसाद मस्त आहेत. कापलं वगैरे वाचलं ते मात्र वाईट वाटलं, विळी सुरी दोन्हीवर कापलं की बरेच दिवसाचं दुखणं होतं.

अमितव तुम्ही सेपरेट खवणीबद्द्ल लिहीलं आहे ती माहेरी होती, अजूनही असेल.

सगळ्यांना प्रतिसादासाठी धन्यवाद. सगळ्यांनी मस्त लिहिल्यात आठवणी अनुभव.

अमुपरी, एवढया तीन विळ्या घरात आहेत म्हणून फोटो दाखवते आहेस आणि वापरत नाहीस एक ही ( दिवे घे )

आढाळा म्हणतात. तुमच्याकडे जशी कांद्याची वेगळी विळी तसा आमच्याकडे मासे कापायचा वेगळा आढाळा होता. >> भरत, नवीन शब्द कळला आढाळा हा... माश्याची विळी सेपरेट असते माहितेय माश्यांची भांडी पण मैत्रिणी कडे सेपरेट असायची.
अहो तुमच्या कडे एकवेळ इकडंच तिकडे चालेल पण पूर्वी आमच्या कडे कांदा लसूण म्हणजे अगदी शिव शिव असायचं.

वावे , छान लिहिलं आहेस.
माझ्या एका आत्याचा हात त्या विळीवर कापला गेल्याची घटना माझ्यासाठी पुरेशी भीतिदायक आहे! अनु ने स्वस्ति ने पण कापून घेतलं होतं।
>> म्हणूनच लोकं विळीच्या वाटेला जात नाहीत.

दोरीवाल्याचा मोह बऱ्याच वेळा होऊनही अजून घेतला नाहीये. ">> घे मस्तच चालतो.

हसिया शब्द कोयत्या पेक्षा फारच सोबर आहे , आवडला.

कृष्णा तुमच्या पितळी पाट असलेल्या विळीचा आणि मानव तुमच्या लोखंडी विळीचा फोटो पहायला आवडेल.

तुमचा नेहमीच्या पठडीतला आणखी एक छान लेख. +
तुमचे घरातील लहानसहान वस्तूंवरील जिव्हाळा पाहून खूप छान वाटते. " थॅंक्यु निल्सन.

मला तर सूरी वापरताच येत नाही. मी पण होते त्यातलीच , आता बदलले आहे.

मोडणी नवीन आहे पण मोरळी म्हणतात कोकणात विळीला कोणी कोणी.

ती मोठी विळी ओट्यावर ठेऊन कसे काय काम करतात हे अजूनही कळत नाही. >> मी नेहमीच तसच चिरते.

अमा मस्त आठवणी

स्वाती एक नाही तर दोन विळ्या ..भारीच टिचकी लाटणी Happy

खरंय. टिचकी लाटणी फारशी लागत नाहीत. "> मोरोबा हाहा

तुम्हाला बराच अनुभव दिसतो आहे. Proud >> स्वाती Happy

अमितव , मला हल्लीच समजलंय नेऊ शकतो चेक इन मधून विळी .पण हल्ली माझं अडत नाही. विळी शिवाय जेव्हा सुरींनी यायचं नाही कापता तेव्हा फार वाटायचं. गुळ वीस तीस सेकंद मायक्रोवेव्ह केला की मऊ पडतो मग भसाभस चिरता येतो , खोबर पण ती विकत च आणते . कानशी ने धार >> अगदी अगदी झालं.

छान लेख हेमा ताई! >> मनमोहन धन्यवाद.

लेख विळी वरचा आहे , काही जणांनी विळी आवडते लिहिलं ही आहे , मला ही आवडतेच विळी पण तरी ही मला हे लिहायचं आहे की
नवी पिढी आणि काही प्रमाणात जुनी लोक ही विळीपासून झपाट्याने दूर जातायत असं मला वाटतं. सूरी, अनेक तऱ्हेचे चॉपर, फूड प्रोसेसर हेच तरुण पिढी जास्त वापरताना दिसते. अर्थात त्या बद्दल मला काही म्हणायचे ही नाहीये ज्याला जे सोयीचं वाटेल तो ते वापरतो. असो.

विळीचा drawback म्हणजे चिरताना विळीच्या पात्याचा हाताला अंगठ्याला होणारा टच. पूर्वी बायकांचे अंगठे विळीमुळे किती कात्रे पडलेले असत. अंदाज नाही आला एखाद वेळी तर हात चांगलाच कापू शकतो त्यामुळे. उलट सुरीचं पात वस्तू कापून झाली की चॉपिंग बोर्ड वर पडत त्यामुळे हात त्या मानाने सेफ रहातो.

अजून काही वर्षांनी विळी माळ्यावर किंवा म्युझियम मध्येच बघायला मिळू शकते. कालाय तस्मै नम: । हा लेख म्हणजे विळीच documentation होईल काही वर्षांनी .

विळीचा drawback म्हणजे चिरताना विळीच्या पात्याचा हाताला अंगठ्याला होणारा टच. >>> मला वाटायचे मलाच नीट चिरता येत नसावे म्हणून अंगठ्याला चिरा पडतात. Lol
बायकांचे अंगठे विळीमुळे किती कात्रे पडलेले असत>>> माझ्याही नेहमी असतात.

मस्त जुन्या आठवणी जागवल्यात. कोकणी आडोळी / आडवळी म्हणतात.

आम्ही भावंडं लहान असताना विळीच्या आसपास लुडबुडणार या भितीने आई विळी ओट्यालगत धरून वापरत असे. आम्हाला पण विळी वापरायची संधी फार कमी मिळाली. मोठ्या प्रमाणात नारळ खोवायचा असला तर मदत करत असू. आमची चिराचिरी कायम चाकूनेच.

इथे जेंव्हा फ्रोझन खोबरं मिळत नसे तेंव्हा मी विळी आणलेली आणि नारळ फोडायला कोयती पण. अजूनही क्वचित ताजा नारळ आणला तर वापरते दोन्ही. बाकी चिराचिरी मात्र चक्कू छुरियों के भरोसे Happy

लेख नेहमीप्रमाणे छानच झालाय. मलाही विळीच आवडते. वरच्या विळीतल्या डावीकडची पहिली विळी तशीच माझ्याकडे गेली ३५ वर्षे वापरतेयअपण कमी झालंय. नारळ खवायला वापरतेच. लग्नानंतर बिहार तेव्हाचं आताचं झारखंडला असताना सुरवातीला विळी नव्हती चाकूची सवय करावीच लागली बोट कापत. तेव्हा चाॅपिंग बोर्ड नव्हता पण शेजारणी हाताच्या हातावरच सराईतपणे भाज्या चिरायच्या एकसारख्या आणि बटाट्याची सालंही काढायच्या. त्यांचं बघत बघत शिकले. एकदा नागपूरला आले असताना विळीची खरेदी झाली मावशीबरोबर म्हणजे जावंच लागलं. ती आमच्याकडे आली तेव्हा तिने ठरवलंच होतं नागपूरला आली की विळी’ खरेदी झाल्याशिवाय पाठवायचंच नाही आणि तेही विळी म्हणजे चाफेकरांचीच ( *c* हा त्यांचा लोगो) . त्यानंतर आली अंजलीची फंटास्टीक, दोरीवाला चाॅपर. काही कामं खाली बसून करतेच कणिक भिजवणे व भाजी कापणे तेव्हा विळीच वापरते. घाई असेल तेव्हा चाकू तेही साधे छोट्या पातीचे. धार घरीच करते करायचं मशीन घेतलंय एका प्रदर्शनातून. आता कुठल्याही साधनाने उत्तम कापाकापी करू शकते (भाज्यांची).

तुमचा नेहमीच्या पठडीतला आणखी एक छान लेख.  >> मम.
एखाद्या विषयावर मस्त गप्पा रंगल्यावर कसा फील येतो तसा आला वाचताना.
भ न्ना ट ( वाचा मधुरा च्या स्टाईल मध्ये Happy ) >> Lol तसच वाचलं.
मी अजूनही विळीप्रेमी. कांदा असो की आंबा विळीवरच करकरीत चिरता येतो, सुरीशी धडपड होते. पूर्वी विष्णू मनोहरांची कुठल्या तरी चॅनलवर पाकस्पर्धा होती. 30 मिनिटात पूर्ण जेवण बनवणे, स्ट्रीट फूड बनवणे वगैरे. त्यात विळी नसायची. मला जाम आश्चर्य वाटायचं सगळ्याजणी लयबद्ध खटखट करत चॉपर, सूरीने कापाकापी करायच्या. मग एकदाच एकजण आली जीला विळीची सवय होती तेव्हा विष्णू मनोहरांनी तिथं कांदा सुरीने फटाफट कसा कापायचा ते प्रात्यक्षिक दिलं होतं. पण विळी उपलब्ध करून दिली नव्हती. या विळीच्या सवयीचा तोटा अजून एक होतो. कुणाकडे आपण गेलो किंवा कुणी आपल्याकडे आलं तर मदतीला जनरली चिराचीरी करणे हे सोयीचं पडतं. पण विळी/सूरी सख्य नसेल तर 10 मिनिटाच्या कामाला अर्धा तास लागतो. लोखंडी पात्याची विळी आहे माझ्याकडे. पात्याची धार कधी गेली नाही पण आता पुढच्या खवणीचे दातरे बोथट झालेत. मी डोळे बंद करूनही त्याच्यावर चिरु शकते इतकी ती सवयीची आहे. स्टीलच्या पात्याची धार कमी होते. कर्नाटकी मैत्रिणीकडे बसायच्या पाटाएवढी लांबरुंद आणि मोठं पातं असलेली विळी बघितली.
कट्टयावर धरून, खाली फतकल मारून बसून कशीही विळी वापरता येते.
आढाळा, मोडणी, मोरळी नवीन शब्द कळले.
मेजोरीटी जनता सूरी/चॉपर प्रेमी बघून मला याबाबतीत मी काकूबाई/आजीबाई कॅटेगरीतली वाटते Proud

मला विळी जमिनीवर असली की कुठेतरी घसरून त्याचा काटेरी अर्धचंद्र पोटात घुसेल वगैरे फोबिया आहे.ओट्यावर ठेवून आयुष्यात पहिल्यांदा नारळ खवत होते तेव्हा नारळ निसटून अंगठा चिरला जाऊन अंगठा ते हात जॉईंट ला आतलं मऊ हाड दिसेल इतकी खोल जखम झाली.टाके घातले.आणि बहुतेक क्लिनिक छोटं किंवा डॉ नवीन असतील किंवा बहुतेक अशीच पद्धत असेल, पुढच्या वेळी गेल्यावर त्यांनी हाताने बरे झालेले टाके खसाखसा ओढून काढले.त्यामुळे विळी पहिली की आधी सारंग सोसायटीचं ते क्लिनिक आणि टाके ओढणारा डॉ आठवतो.फुल्ल पॅनिक अटॅक.

आईला विळी शिवाय जमायचं नाही.नंतर पसारा नको विळी काढायचा म्हणून सुरी शिकली.सा बा आयुष्यभर विळी सोबतच राहिल्या.

Pages