विळी ...माझी दुरावलेली मैत्रीण

Submitted by मनीमोहोर on 5 June, 2023 - 04:20

माझी दुरावलेली मैत्रीण ...विळी

पंजाब, राजस्थान, गुजरात अश्या भारताच्या उत्तरेकडच्या भागात भाजी कापण्यासाठी सुरीचा वापर होत असला तरी महाराष्ट्रात मात्र भाजी चिरण्यासाठी (सुरीने भाजी कापतात आणि विळीवर चिरतात ) विळीचाच वापर आज अनेक वर्षे घरोघरी होत आहे. किनारपट्टी वरच्या कोकण भागात तर ओला नारळ खोवण्यासाठी विळीच्या पात्याला असलेल्या खोवणीचा ही तेवढाच उपयोग होतो.

विळी म्हणजे काय हे मराठी लोकांना तरी सांगण्याची गरज नाही पण तरी ही इथे लिहून ठेवते. एका अर्ध चंद्राकृती धारदार पोलादी पात्याला पुढे करवती सारखे दाते असलेलं गोलाकार सपाट चक्र असत ज्याचा उपयोग नारळ खवण्यासाठी केला जातो. हे पातं एका लाकडी पाटावर स्क्रू ने सैलसर बसवतात ज्यामुळे पात्याची उघड झाप सहजपणे करता येते. विळी उघडली की विळीच्या लाकडी पाटावर बसायचं आणि पात्याखाली ताटली ठेवून चिरायला सुरवात करायची. चिरून कातून झालं की पातं धुवून विळी मिटली की काम संपलं. मेंटेनन्स फारच सोपा. सुरीने कापताना चॉपिंग बोर्ड ची स्वच्छता हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो . असो. सुरीने भाजी कापताना सुरीचं पातं चॉपिंग बोर्ड वर पडतं तर विळीने चिरताना विळीच पातं आपल्या हाताला टच होतं. अंदाज चुकला तर हात कापू शकतो म्हणून बरेच जणांना विळीने चिरणे जमत नाही.

माझ्या लहानपणी आम्ही विळीच वापरत होतो आणि भाजी चिरण्याचं काम माझं खूप आवडतं होतं. मी आईला बरेच वेळा भाजी वगैरे सगळं चिरून देत असे. माझं चिरणं अगदी एकसारखं आणि छान आहे म्हणून आई नेहमी माझं कौतुक ही करत असे. आमच्या अलिबागची कळीची तोंडली चवदार म्हणून ठाणा मुंबई भागात ही खूप प्रसिद्ध आहेत. पण तेव्हा अलिबागला फार भाज्या मिळत नसल्याने वेगवेगळ्या तऱ्हेने आठवड्यात दोन तीन वेळा तरी तोंडली होत असत म्हणून आम्हा मुलांना काही तोंडली फार आवडत नसत.

तरी ही उन्हाळा आला की मी आईकडे तोंडली घेण्यासाठी हट्ट करायचे. तोंडल्याच्या काचऱ्या पावसाळ्यात तळून खाण्यासाठी म्हणून आई त्या उन्हाळ्यात वाळवून ठेवत असे. खाण्यापेक्षा तोंडल्याच्या काचऱ्या करणं माझं आवडत काम होत. एका वेळी दोन दोन शेकडा ( तेव्हा शेकडा असे आणि तो ही 120 चा ) तोंडली मला चिरायला मिळतील ह्याचंच अप्रूप अधिक होतं म्हणून मी आईच्या मागे लागत असे “तोंडली घे तोंडली घे “ म्हणून.

लग्न झाल्यावर पहिल्यांदा मे महिन्यात कोकणात गेले होते तेव्हा मागच्या एका पडवीत घरातल्या लहान, मोठ्या, धारदार, बेताची धार असलेल्या , पाट लहान मोठे असलेल्या, लहान स्टुला सारखा उंच आणि रुंद पाट असलेल्या घरातल्या सगळ्या विळ्या आंब्या फणसाच्या कामांसाठी भिंतीकडेला सज्ज होऊन अगदी तयारीत उभ्या राहिलेल्या पाहिल्या तेव्हा एवढया विळ्या एके ठिकाणी बघून मी चाटच पडले होते.

कच्च्या फणसाचे तळलेले गरे करण्याचं किचकट काम करताना खूप विळ्या हाताशी लागतात. एक जण फणसाच्या भेसी करायला आणि चार पाच जणी तरी गरे चिरायला बसतात तेव्हा कुठे पल्ला पडतो. फणस कापला की विळी चिकट होते. विळीच पातं गॅसवर गरम करून ते लगेच फडक्याने पुसून घेतलं की पातं अगदी स्वच्छ होत. पातं गरम झालं की पात्याला लागलेल्या खोबरेल तेलाचा आणि फणसाच्या चिकाचा जो वास सुटतो त्याची मी जबरदस्त फॅन आहे.

वाऱ्यामुळे खाली गळून पडणाऱ्या कैऱ्यांची त्या सोलून चिरून आंबोशीच करावी लागते. त्या पिकत घालू शकत नाही. हे काम ही रोज असतंच. त्या आंबोशीच गोड लोणचं तर छानच होतं पण आंबोशी आंबट ओली असताना भ न्ना ट ( वाचा मधुरा च्या स्टाईल मध्ये Happy ) लागते. तर आंबोशीच्या आणि बेगमीच्या लोणच्याच्या कैऱ्या चिरताना कैरीच्या आंबटपणामुळे विळीला चांगलीच धार चढते. कोकणी लोकं जात्याच काटकसरी. आलटून पालटून रोज वेगळी विळी घेतली की आपोआपच सगळ्या विळ्या धारदार होतात, मुद्दाम वेगळी धार काढावी लागत नाही. पूर्वी माझ्या तिकडे रहाणाऱ्या सासूबाई रात्रीच्या पंगतीत वाढायच्या आंब्याच्या फोडी ही विळीवरच करत असत आणि त्याला ही त्या “ आंबे चिरणे ” असच म्हणत. हल्ली मात्र आंबे कापण्यासाठी स्टीलची सुरी वापरतो आम्ही.

कोकणात आमच कुटुंब मोठं असल्याने रोजच्या वापरासाठी ही दोन तीन तरी विळ्या लागतातच. म्हणजे भाजी चिरणे, नारळ खोवणे अशी कामं एका वेळी करता येतात. तसेच वर्षातले अर्धे दिवस कांदा लसूण वर्ज्य स्वयंपाक होत असल्याने अनावधानाने कांदा चिरलेली विळी दुसऱ्या कशाला वापरली जाऊ नये म्हणून एक छोटीशी कांद्यासाठीची सेपरेट विळी आहे. आणि तिची सरमिसळ होऊ नये म्हणून ती नेहमी वेगळी म्हणजे कांद्याच्या टोपलीतच ठेवलेली असते.

कोकणातल्या घरच्या सगळ्या विळ्या पोलादी / लोखंडीच आहेत, एक ही विळी स्टेनलेस स्टील ची नाहीये. आमच्या शेजारचच गाव लोहारकामा साठी प्रसिद्ध आहे, तिथल्या लोहाराकडून छान धारदार पातं करून घ्यायचं आणि घरच्या आंब्याच्या किंवा फणसाच्या लाकडी पाटावर ते सुताराकडून बसवून घेतलं की वर्षानुवर्षे टिकणारी विळी तयार.

ठाण्याच्या घरातली विळी ही अशीच माझ्या लग्नाच्या ही किती तरी वर्ष आधी कोकणातूनच आलेली आहे. लग्न झाल्यावर अनेक वर्षे मी खाली बसूनच चिरत होते. सगळं आधी चिरून घ्यायचं आणि मग स्वयंपाकाला सुरवात करायची. परंतु मुलं लहान असताना खाली बसून चिरणं रिस्की वाटल्याने विळी ओट्याला लावून चिरायला सुरवात केली. खाली बसून चिरायची सवय जरी त्यामुळे मोडली तरी सकाळच्या ऑफिसच्या गडबडीत टाईम मॅनेजमेंट च्या दृष्टीने ते मोठंच वरदान ठरलं. सारखी उठ बस वाचल्यामुळे भरपूर मल्टि टास्किंग करणं शक्य झालं ज्यामुळे खूप वेळ वाचवता आला. तेव्हा भाज्या तर मी विळीवरच चिरायचे पण वेज कार्व्हिंग करताना पातळ स्लाईस करणे , फ्रुट सॅलड करताना फळं कापणे, काकडी टोमॅटो घातलेले सॅण्डविच कट करणे हे ही मी विळीवरच करत असे.

मुलं लग्नाची झाली की आई बाप त्यांच्या साठी सोनं चांदी घेऊन ठेवतात. पण विळी शिवाय घर ही कल्पना ही मी करू शकत नसल्याने छान धारदार पातं आणि खोवणी असलेल्या दोन विळ्या मी कोकणातून त्यांच्यासाठी घेऊन ठेवल्या होत्या. Happy तथापि लग्न झाल्यावर मुलगी गेली परदेशात आणि तिची विळी मात्र राहिली ठाण्यात.विळी विनाच तिचा संसार सुरू झाला ह्याच तिला जरी काही वाटलं नाही तरी मला थोडं वाईट नक्कीच वाटलं होतं.

मी जेव्हा पहिल्यांदा तिच्याकडे गेले तेव्हा तिच्यासाठी घेतलेली विळी चेक इन बॅग मधून तरी न्यावी अस होतं मनात पण " शस्त्रास्त्र " आणलंय म्हणून कस्टम वाले एखाद वेळी अडवतील ह्या भीतीने मी तो मोह आवरला. Happy तिच्याकडे स्वयंपाक करताना माझ्या साठी सर्वात कठीण गोष्ट सुरीने चिरणे ही होती. बोट / हात कापून न घेणे ह्यालाच प्राधान्य दिल्याने चार बटाटे चिरायला अर्धा तास आणि अर्धा कांदा तो कापायला पंधरा मिनिटं लागत असत. आणि वर चिरणं ही नीट होत नसे ते वेगळंच. पण दुसरा पर्याय ही नव्हता. हळू हळू सुरीची सवय होत गेली. सुरीने ही तितकंच छान आणि फास्ट चिरता यायला लागलं . आणि आता तर काही चिरायचं असेल तर सुरीकडेच हात जातो.

आमच्या ऐतिहासिक विळीला आता घरातल्या एखाद्या अनुभवी, वयस्कर, सुगरण स्त्री सारखं मानाचं स्थान मिळालं आहे. म्हणजे तिला कशी रोजची कामं सांगितली नाहीत तरी “ तुम्ही पाक करा बाकी लाडवांच मी बघते “ असं कधीतरी म्हणून तिच्या अनुभवाचा मान ठेवला जातो तसच सूरी, चॉपर , फूड प्रोसेसर च्या जमान्यात रोज चिरण्या / कापण्यासाठी विळी वापरली नाही तरी काकडी कोचवायला, सुरण, लाल भोपळा अश्या कठीण भाज्यांची सालं काढायला, नारळ खोवायला वगैरे तिचा उपयोग आवर्जून केला जातो.

हेमा वेलणकर

( विळीचा फोटो नाहीये माझ्याकडे )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख. आता विळी वापरली जात नाही. त्यामुळे बालपण आठवले.
आमच्याकडेही आई विळी चॅम्पियन. त्यामुळे आता चाकूसुरी तिला बोअर होते.
बायकोचे उलट. तिला विळी जमत नाही.
जनरेशन गॅप Happy

लहानपणी विळीवर खोबरे किसायचे काम माझ्याकडे असायचे. आजी घाबरायची. लहान मुलाला कशाला विळीवर काम देतात. पण आई द्यायची.

बाकी विळीवर कापाकापी मलाही डेंजरस वाटते. तरी विळीवर काम फास्ट होते हे नक्की.

लेख फारच आवडला.
कोपुत घरी आधी 2 विळी होत्या.
त्यावरच आई चिरणे काम करायची.
त्यातला एका विळीला सनमाईकाचे फुलांचे design होते.
विळी वर जोरदार कापलं जातं म्हणून आम्हाला विळी वापरायला बंदी होती. शिवाय त्यावर पाय पडून दुखापत होउ नये म्हणून मनात भिती देखील असायची.
फक्त संकष्टी चतुर्थी च्या वेळी विळीवर खोबरे खवणून देणे काम केले आहे. मजा यायची.
नंतर बाबांनी एक हाताने फिरवत एका हातात नारळ धरून फिरवत खवणता यायची ती खवणी ( ह्याला काय योग्य शब्द आठवत नाही ) आणली , ते जास्त सोपे होते.
आता चाकूने जमते नीट. विळी घरात वापरात नाही.

मस्त लेख ! हा मी परवा fb वर ओझरता वाचला पण पूर्ण नाही झाला वाचून इथे आता पूर्ण वाचला! तुमचे लेख म्हणजे एकदम नॉस्टॅलजिया असतो , माझ्या आजोळी पण same असेच होते कांद्याची विळी वेगळी आणि याss भल्याथोरल्या भरभक्कम विळ्या!!

विळी माझ्या अत्यंत जिवाभावाची , विळी वापरायला खूप आवडते , वर लिहिलंय तसं बटाट्याच्या काचऱ्या तर अप्रतिम होतात याने! मात्र तुम्ही सॅन्डविच चे ब्रेड पण विळीवर कट करायचात म्हणजे कमाल आहे !

माझ्या माहेरी विळीच वापरतात आणि सासूबाई सुद्धा ओट्यावर ठेऊन उभ्याने विळीवर चिरतात. बऱ्याच घरी सुरीचा वापर स्क्रू ड्राइवर म्हणून केल्याने पुढचं टोक वाकडं झालेलं असतं , अश्या सुऱ्या मला अजिबात आवडत नाहीत.
इथे जर्मनीत मी विळी miss करते सूर्य चालतात चेक इन मध्ये हे नक्की मात्र विळी आणायला somehow भीती वाटतेय आणि मला आता सुरीचीही तितकीच सवय झाली आहे

आढाळा भारीच ए शब्द .. हा नवीनच कळला, कधीच नव्हता ऐकला !!
विळीचा drawback म्हणजे चिरताना विळीच्या पात्याचा हाताला अंगठ्याला होणारा टच. >>> मला वाटायचे मलाच नीट चिरता येत नसावे म्हणून अंगठ्याला चिरा पडतात>> हो मला खूप वाटते कि शिवणकाम करताना जसे अंगुस्तान घालतात तसे विळी वर चिरताना अंगठ्याला अंगुस्तान घालावे Proud

आताशी विळी माझीही दुरावलेली मैत्रीण आहे. तथापि आमच्याकडे (पूर्व विदर्भात) विळीला पावशी म्हणतात, आणि मोठ्या कोयत्याला विळा व छोट्या कोयत्याला विळी म्हणतात.

तर माझ्या घरीही ४५-५० वर्षे जुनी लोखंडी (पोलादी) पावशी आहे. मात्र ती उघडझाप करता न येणारी असल्याने वापर झाला की पालथी (आडवी) ठेवावी लागते. ह्यादरम्यान आम्ही कितीतरी घरे व शहरे बदलली ती मात्र कायम राहिली. केवळ हिरवी मिरची कापतांना हात तिखट होऊ नये म्हणून आई चाकू (सूरी) वापरते, त्यामुळे मला व बहिणीलाही तीच सवय लागली. दरम्यान मी शिक्षणासाठी पहिल्यांदा जेव्हा एक वर्ष घराबाहेर पडलो तेव्हा स्वयंपाकासाठी नवीन भांडी घेतांना आवर्जून पावशी घेतली होती. पुढे घरी आल्यावर आईने तिची स्वयंपाकघरातील ठेवणीतल्या भांड्यात रवानगी केली. कित्येकदा तिला आग्रह करूनही किंवा तिच्या नकळत मी वापरात काढूनही आईने तिची ४५-५० वर्ष जुनीच पावशी वापरात ठेवली. शेवटी मी माझा पराभव मान्य करून आई व माझ्यात नवीन पावशी उपवासाच्याच दिवशी किंवा अगदीच गरज पडल्यास (खूप चिराचिरी असल्यास) वापरायचे ठरले. बहिणीचे लग्न होऊन मुंबईला आल्यावर पहिल्याच महिन्यात आईला निरोप धाडला की तिला पावशी हवी आहे, कारण तिलाही चाकूने भाज्यांची कापाकापी मुळीच जमत नसे. मग काय, आईने लगेच खास दुकानातून शोधून तिला नवीन पावशी पाठवली (आईलाही म्हणे, आजीने अशीच पावशी पाठवली होती).

परत एकदा मी शिक्षणासाठी (व आता नोकरीनिमित्त) घराबाहेर पडलो. ह्यात पहिल्यांदा बंगलोरला दोन वर्षे शिकलो. तेथील मेसचे जेवण (बिहारी व्यक्ती चालवायचा) अजिबात न आवडल्याने आम्ही मित्रांनी स्वयंपाकाची भांडी गोळा करून (उडीया) स्वयंपाकी ठेवला. उंहू! त्याच्याही हातचे जेवण पसंत पडेना, मग आम्ही स्वतःच स्वयंपाक करायला सुरुवात केली. माझ्याकडे भाजी बनवायची जबाबदारी होती, पण मला चाकूने भाज्या कापणे अजिबात जमत नसे. ह्यादरम्यान आम्ही बंगलोरात नवीन पावशीचा खूप शोध घेतला, काही दुकाने पालथी घातली. पण आधीच आम्ही नवीन (बंगलोर शहराची फारशी माहिती नसलेले) व त्यात भाषेची अडचण त्यामुळे ती काही मिळाली नाही. शेवटी पावशी सारख्या दिसणाऱ्या सुरीच्या दोन्ही बाजूंनी भाजी कापता येणारा अंजलीचा चॉपर बोर्ड घेतला, पण पावशीने भाजी चिरायचा सराईतपणा त्यावर आला नाही. शेवटी मी सुरीचे नटबोल्ट कडून तिला साईडला ठेवले आणि साध्या चाकूसह केवळ चॉपर बोर्ड वापरायला सुरुवात केली (माझ्यामते सूरी/चाकूने भाज्या कापतात तर पावशीने (विळीने) चिरतात).

पुढच्या टप्प्यात मुंबईला आल्यावरही नॉर्थ इंडियन मुलांसोबतच जास्त राहण्याचे प्रसंग आल्याने त्यांच्यासोबत स्वयंपाक करताना हळूहळू चाकुची सवय झाली. पण मी पावशीला खूप मिस करतो, ती खरंच दुरावली. अजूनही माझा अवाढव्य देह जमिनीवर फतकल मांडून मला पावशीने भाजी चिरण्यात जी मजा येते ती चाकू किंवा चॉपिंग बोर्डवर येत नाही. तसेच मला बालपणापासून पावशीच्या टोकावर करवती सदृश्य दाते असलेल्या चक्रीचे फार कुतूहल होते. मला वाटायचे की पावशीची उघडझाप करतांना तिचे अणुकुचीदार टोक पाटावर पडून त्याला भोक पडू नये म्हणून हि सोय केली असावी. मात्र गेल्या काही वर्ष्यांपासून करवती सदृश्य दातेदार चक्री ऍक्च्युली ओला नारळ खवण्यासाठी वापरतात हे समजले आहे (परत तेच कारण, पूर्व विदर्भात अगदी आतापर्यंत ओले नारळ केवळ पावसाळ्यात मिळत. त्यामुळे श्रावण महिन्यातील सणांना किंवा गणपतीलाच ओले नारळ वाहले जात; आणि आमच्या इकडे मला तरी नारळ खवतांना कधीच बघितल्याचे आठवत नाही).

माझ्या मते कुणाच्या स्वयंपाकघरातील स्वच्छता निरीक्षणाचा आणखी एक मापदंड म्हणजे पावशी/विळी स्वच्छ असणे. भाज्या चिरून झाल्यावर आईसारखीच मलाही पावशी लगेच स्वच्छ पाण्याने धुवून व कापडाने पुसून आडवी ठेवायची सवय आहे. काही लोकांकडे भाजी चिरून पावशी तशीच ठेवली जाते. कित्येकदा तिच्यावर भाज्यांची बारीक पाने किंवा कांदा, लसूण, व बटाट्याची एखादे साल किंवा फोलपट तसेच लागलेले दिसते. त्यामुळे आमच्या कडे जेव्हा स्वयंपाकासाठी मावशी ठेवल्या गेल्या तेव्हा त्यांना पहिल्यांदा ह्याच सूचना दिल्या गेल्या. मात्र पहिल्या मावशी फारच कानाडोळा करत म्हणजे स्वच्छतेची फारच बोंब होती. नेहमी पावशी भरलेलीच ठेवत असत. तर दुसरीकडे माझ्या आईला त्यांच्या मुलीची पोटदुखीची वारंवार तक्रार सांगत असत, कित्येक डॉक्टरांचे औषधोपचार झाले होते. शेवटी एकदा त्यांच्या संभाषणात आईच्या परवानगीने बोललो आणि भरलेली पावशी दाखवली आणि ह्यावरून त्यांच्या घरी असलेल्या अस्वच्छतेची व मुलीच्या पोटदुखीची त्यांना कल्पना दिली. त्यांना ओशाळवाणेही वाटले. पुढे त्यांनी लॉकडाउनचे कारण सांगून आमचे काम बंद केले. त्या मानाने आताची स्वयंपाकाची मावशी बरी आहे, तिला अजूनपर्यंत तरी प्रत्येक वेळी पावशी धुवायची सूचना द्यावीच लागली नाही, ती स्वतःच करत असते.

आणि हो! माझ्या सुदैवाने अजूनही पावशी (विळी) किंवा चाकूने माझी बोटे कापण्याचा अघोचरपणा घडला नाही. कधी कधी मी मुद्दाम डोळे बंद करून (विशेषतः जेव्हा कांदी रडवतात) केवळ स्पर्शाच्या साहाय्याने कापायचा प्रयत्न करतो, अगदी तेव्हाही नाही.

ह्यावरून आणखी एक आठवलं, 'खट्याळ सासू नाठाळ सून' ह्या चित्रपटात दया डोंगरे (सासू), व वर्षा उसगावकर (सून) ह्यांचा छत्तीसचा आकडा असतो. एका प्रसंगात सासू विळीवर भाजी चिरत असते व सुनेला चित्रपट बघायला जायचे असते. तिला उशीर व्हावा म्हणून खट्याळ सासू विळी उघडीच टाकून बाथरूममध्ये अंघोळीचे नाटक करायला जाते, आणि सुनेकडे कानकोंडा करते. मग नाठाळ सून बाहेरून अलगदपणे बाथरूमची कडी लावून माहेरी तयार व्हायला निघून जाते. बराच वेळ सासू बाहेर निघायसाठी आरडाओरडा करत असतांना तिचा दूरचा भाऊ (चंदू पारखी) येतो आणि बाथरूमची कडी काढतो. बहिणीची विचारपूस करताच ती सुनेला शिव्याशाप देत बाहेर पडतांना नकळतपणे विळीवर पाऊल ठेवून चिरून घेते.

इति पावशी (विळी) पुराण समाप्तमं!

छान लेख आणि प्रतिसाद.
विळीचा काहीच अनुभव नाही , आईकडे आणि माझ्या कडे हि चाकू वापरला जातो..

छान लेख. लहानपणच्या विळीच्या आठवणी जाग्या झाल्या. विळीवर नारळ खोवायचा प्रयत्न करायचो. त्याच्या वाटीच्या कडेचं खोबरं खोवणे हे एक कौशल्याचं काम असतं. कधीकधी ते करताना हात सटकून त्या खोवणीच्या रेषा अंगावर काढल्या आहेत आणि मग त्या खरचटलेल्या खोब्री हाताची वाट लागलेली बघत 'आढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे' अवस्था अनुभवली आहे.

मी कमी वजनाचा असताना त्या विळीच्या पाटावर पुरेसं वजन टाकू शकत नसे. तेव्हा त्या खोवणीवर जोर लावताना पाटाच्या बाजूने विळी उचलली जाणं ही एक वेगळीच सर्कस होती.

आमच्या घरी साधी लाकडी पाटाची लोखंडी पात्याची विळी होती. त्यामुळे स्टीलच्या चकचकीत पात्याच्या व सनमायका लावलेला पाट असलेल्या विळ्या नवीन बाजारात आल्या तेव्हा फार आस्चर्य वाटले होते. कधी घेतल्या गेल्या नाहीत. त्यात एक पाट फिश माश्याच्या आकाराचा पण होता. हे फारच मॉडर्न वाटायचे.

आढाळा भारीच ए शब्द .. हा नवीनच कळला
>>>>

आमच्याकडेही हाच शब्द वापरतात. त्यामुळे. विळी हा फार पुस्तकी वाटतो. लिहायला ठिक, बोलायला नाही.

पुढचा लेख लाकडी सोर्‍यावर येउद्या. मी लाकडी सोर्‍या वापरून चकल्या केलेल्या आहेत व कुरड्या सुद्धा. आईच्या हाता खाली. आता आईची आठव्ण म्हणून सोर्‍या आहे घरी. कधी मधी शेव करते.

मला वाटलेलं , हा मालवणी शब्द आहे>>>>
हो हा मालवणीच शब्द आहे ..
आंम्ही अजुनहि विळीवरच सगळं कापुन घेतो... सुरीपेक्षा खुप बारीक चिरलं जात.. मात्र जपुन सगळं कापाव लागतं.
अजुनहि गावी गणपतीला .. बायका आपआपल्या घरातील आदाळे घेवुन गणपतीच्या आमच्या मुख्य घरात येतात.. ८-१० आदाळे असतात..सगळ्याजणी कुणि भाजी, खोबरं मिरची, कोथिंबीर असं कापण्याचं काम करतात.. गणपतीचं जेवण सगळं एकत्र असतं. खुप मजा येते हे
सगळं करायला Happy

आई अजूनही विळीच वापरते. मात्र त्या छोटासा पाट असलेल्या विळीवर मला आता तोलच सांभाळता येत नाही. आणि सुरीचीही सवय झाली आहे. पण एकेकाळी विळीवर अगदी खोबरेही खवणले आहे.

त्याच्या वाटीच्या कडेचं खोबरं खोवणे हे एक कौशल्याचं काम असतं. >>> अगदी अगदी

(पूर्व विदर्भात) विळीला पावशी म्हणतात, आणि मोठ्या कोयत्याला विळा व छोट्या कोयत्याला विळी म्हणतात.
>>> आमच्याकडे (कोकणात) अर्धचंद्राकृती कोयत्याला विळा म्हणतात. त्याची ब्रेड्थही नेहमीच्या कोयतीपेक्षा कमी असते.

का कोण जाणे ह्या विळ्यांचे पाट एका साइडने घसरगुंडी सारखे असायचे.माझ्याकडच्या विळीला extension लावून घेतले.

खूप वर्षांपूर्वी सासरी खोबरे कातताना हातातून कवड सटकली आणि सटकन हाताची बोटे उलट्या दिशेने विळीच्या पात्यावर जोरात आपटली.आधी कांदा मिरच्या कापून घेतल्या होत्या.त्यामुळे खूप आगजाळ झाले होते. भळाभळ रक्त आले.त्यानंतर कधीही त्या विळीच्या वाटेला गेले नाही.

पुढचा लेख लाकडी सोर्‍यावर येउद्या. मी लाकडी सोर्‍या वापरून चकल्या केलेल्या आहेत व कुरड्या सुद्धा. आईच्या हाता खाली
×××××××

सेम पिंच.. लाकडी सोऱ्या आणि आईच्या हाताखाली चकल्या. म्हणजे अगदी आजही चकल्या गाळायचे काम माझेच असते.

इतक्या प्रतिसादा साठी धन्यवाद. खूप छान आहेत सगळेच प्रतिसाद.

काही गोष्टी चिरायला अजूनही विळीच लागते पाटाची. तरी मी आंबे सुरीने , नवरा ते काम मात्र अजूनही विळीने करतो (त्याच्यावर टाकलं की एका आंब्यासाठीही विळी घेतो) . नारळ खवायला विळीच वापरतो. >> विळी स्टील ची आहे का? लगेच खाल्ले तर चालत पण नाहीतर थोड्या काळ्या पडतात आंब्याच्या कडा ...
मंजू मस्त लिहिलं आहेस. त्या बायका चिरतात हातावर. हिंदी पिक्चर मध्ये ही बाहेर खाटल्यावर बसून हातावर च चिरत असते नायकाची माँ किंवा मौसी Happy

आम्ही भावंडं लहान असताना विळीच्या आसपास लुडबुडणार या भितीने आई विळी ओट्यालगत धरून वापरत असे. >> मेधा मी पण अगदी ह्याच कारणासाठी विळी ओट्याला लावायला लागले. आणि ते खूप म्हणजे खूप सोयीचं आणि सुरक्षित ही वाटत.

वर्णिता मस्त लिहिलं आहेस.

अनु , वाचून सुद्धा काटा आला अंगावर. विळी आहेच रिस्की सूरी पेक्षा.

ऋ, लहानपणी कारायचास मदत आईला आता बायकोला देतोस की नाही नारळ खवणून ? ( हलके घे )

झकासरव छान आठवणी.

राहुल खूप सुन्दर लिहिलंय. तो पावशी शब्द आवडला मला गोड वाटतोय बोलताना.

तुम्ही सॅन्डविच चे ब्रेड पण विळीवर कट करायचात म्हणजे कमाल आहे ! >> anjali cool, विळीला चांगली धार असेल तर मस्त कट होते सँडविच. दोन्ही हातात धरायचं आणि कट करायचं. धारे मुळे आतली काकडी टोमॅटो ही परफेक्ट कट होतात. अंगुस्तान भारीच आयडिया.

छान लेख आणि प्रतिसाद. >> मृ , थॅंक्यु

अमा, सन्मायका विळ्या सम हाऊ आवडत मला

काढल्या आहेत आणि मग त्या खरचटलेल्या खोब्री हाताची वाट लागलेली बघत 'आढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे' अवस्था अनुभवली आहे. >> हरपा Happy

विळा झाला आता लाकडी सोऱ्या, भावंड धुण्याच्या काठीवर लिही म्हणून मस्करी करतात आहेतच Lol Lol Lol Lol

आंम्ही अजुनहि विळीवरच सगळं कापुन घेतो... सुरीपेक्षा खुप बारीक चिरलं जात.. मात्र जपुन सगळं कापाव लागतं.
अजुनहि गावी गणपतीला .. बायका आपआपल्या घरातील आदाळे घेवुन गणपतीच्या आमच्या मुख्य घरात येतात.. ८-१० आदाळे असतात..सगळ्याजणी कुणि भाजी, खोबरं मिरची, कोथिंबीर असं कापण्याचं काम करतात.. गणपतीचं जेवण सगळं एकत्र असतं. खुप मजा येते हे >> भावना गोवेकर वाचून ही मस्त वाटलं.

त्याच्या वाटीच्या कडेचं खोबरं खोवणे हे एक कौशल्याचं काम असतं. >>> अगदी अगदी >> माझे मन , तेव्हाच हात जाण्याची शक्यता असते.

मी आता वाढदिवसाला केक विळीवर चिरणार आहे Happy >> मेले हसून हसून.

खूप वर्षांपूर्वी सासरी खोबरे कातताना हातातून कवड सटकली आणि सटकन हाताची बोटे उलट्या दिशेने विळीच्या पात्यावर जोरात आपटली.आधी कांदा मिरच्या कापून घेतल्या होत्या.त्यामुळे खूप आगजाळ झाले होते. भळाभळ रक्त आले.त्यानंतर कधीही त्या विळीच्या वाटेला गेले नाही. >> देवकी, काय प्रसंग ग ..विळी आहेच डेंजरस.

बाकी विळीला अनेक नवीन शब्द समजले मला एक मोरळी माहित होता फक्त.

विळी स्टील ची आहे का? >>> हो. मधल्या नणंदेने मुंबईहून आणलेली. आधी माझ्याकडे अंजलीची होती, गिफ्ट मिळालेली. माहेरी मात्र लोखंडाची आहे, साठ वगैरे वर्ष झाली असावीत.

मोरळी शब्द मीही ऐकलेला. बाकी नव्हते ऐकले.

खूपच छान लिहिलंय. विळी माझी पण खूप आवडीची. विळीवर चिरायला आवडायचं पण आणि जमायचं ही. सुरीने कापण बिलकुल जमायचं नाही. म्हणजे भाज्या. फळ वगैरे कापायला सुरीच हवी. पण भाज्या आणि मासे यासाठी मात्र विलीच पाहिजे. मात्र लहानपणी घरच्या मोठ्या माणसांकडून विळी उघडी ठेवून झालेल्या अपघात बद्दल ऐकले आहे. आमच्याकडे नाही कधी काही झालेलं. पण आम्हाला चांगली सवय लागावी म्हणून ही सांगितल्या असतील या गोष्टी. पण त्यामुळे विळी कधीही उघडी टाकून उठायचं नाही हे डोक्यात भिनल आहे. कोबीची भाजी विळी वर इतकी एकसारखी चिरली जाते, तशी सुरीने नाहीच. भाज्यासाठी सुरीची सवय आता आता झाली आहे. मुलाकडे अमेरिकेत विळीचा पर्याय नाहीच. त्यामुळें सूरीची सवय करून घ्यावी लागली. तीच सवय आता भारतात पण लागली आहे. शिवाय मासे पण कापून मिळायला लागल्यामुळे वापर कमीच झाला आहे. फक्त मटण चिरण्यासाठी अजूनही विळीच लागते. खोबरं पण खवणलेल मिळतं आणि आणलं जात. त्यामुळें ते ही काम नाही. आईकडे लोखंडी पात्याची विळी आहे. माझी मात्र स्टील चा पात्याची आहे. किर्तीकर मार्केट मधून घेतलेली.

लहानपणी मी विळीवर नारळ खोवून देवून आईला मदत करायचो. पण हे चोरून करावे लागे, कारण मुलांच्या दुनियेत तें बायकी काम समजले जायचे. पण तें किंवा तसली कामं केल्याशिवाय आईकडे सिनेमा, खाण्यासाठी पैसे मागणं फार अवघड वाटायचं ( 'पॉकेट मनी ' ही संकल्पना तेंव्हां रूढ झाली नव्हती.) हळू हळू मी कुशल विळी ऑपरेटरही झालो व मग बाहेर खेळत असलेल्या मला आई बोलावून घ्यायची व विनवणी करायची, ' अरे, तुला 'मॉर्निंग शो'साठी पैसे देते पण पटकन ही भाजी चिरून दे '' ! अजूनही माझ्या ह्या कलेचं कौतुक करत घरचे माझ्याकडून हक्काने हे काम करून घेत ! आता मात्र वयामुळे खाली विळीवर फार वेल बसणं कठीण वाटतं, इतकंच.

येस, विळीशी सुरवातीला स्वार्थाने मैत्री केली असली, तरी ती माझीही न दुरावलेली जिवलग मैत्रीणच आहे ! Wink

नका हो तुमच्या त्या मैत्रीच कौतुक सांगू ; किती जुनंच आहे तें विळी -भोपळ्याचं सख्य !!purviche.jpg

<<आमच्याकडे (पूर्व विदर्भात) विळीला पावशी म्हणतात>>
येस, विसरून गेलो होतो हा शब्द.
विळा= ईया. विळी = ईयी

भाऊ Happy

भाउ Happy

मराठवाड्यातल्या आमच्या गावी लाकडी छोट्या पाटावर उभं बसवलेलं लोखंडी पातं अशा विळ्या होत्या. ते कधी बंद होत नसे. त्यामुळे सांभाळून वापरावं लागे.

आई, साबाई विळी प्रेमी. आई अजूनही विळीच वापरते. अंजलीची विळी पण आवडते मला. भरभर चिरलं जातं. आमच्या स्वयंपाकाच्या मावशींना सुरीच लागे म्हणून मग रोज सुरीच वर असायची सवय लागली. आणि विळ्या वर ठेऊन दिल्यात. आता मला विळी, सुरी, अंजलीची विळी, आमची गावाकडची विळी सगळे प्रकार येतात वापरायला.

सुरीला ‘बतई’ असा शब्द वापरतं का कुणी? आमच्याकडे वापरतात.

कधी या विषयावर वाचायला मिळेल असा वाटलं नव्हतं, मस्त लिहिले आहे.

आमच्याकडे आडा/दाळा म्हणतात, मालवणी भाषेत.

मातोश्री रोज वापरतात,गावी तर अजून एक मोठा दणकट, लोखंडी पआत्याचा ,आजीच्या वेळेचा आहे -फक्त ओले काजू कापायला वापरतात, कारण तो प्रचंड धारधार आहे. आईची सगळी चिराचिरी विळी वरच, सुरी वापरताना ती एकदम नवशिकी स्वयंपाकी वाटते. बहिणीकडे तर विळी च पात ओट्याला फिक्स केलेले होते.

मला काही काही गोष्टी विळीवर कापणे आवडते e.g. शेवग्याच्या शेंगा, आंबे.
मी नारळ कातायच ( खोबर खवायच) काम फक्त विळीवर करू शकते, एकदा ओट्यावर उभी ठेवायची खवणी आणलेली भुलेश्वर हून ,मला नाही वापरता आली शिवाय विळी प्रेमी आईची बोलणी खाल्ली, आत्ता एक चमच्यासारखी खवणी आहे , मलाही check in मधून विळी आणता येईल याची शाश्वती नसल्याने तीच आणली पण त्यात विळीची मजा नाहीच मुळी .

का कोण जाणे खोबऱ्याच्या कापांची आठवण येतेय.

नॉस्टॅल्जिया लa मराठीत काय बोलतात? स्मरणरंजन? Google translate तर nostalgia च दाखवते आहे!

धन्यवाद सर्वांना प्रतिसदा बद्दल.

भाऊ छान लिहिलय आणि चित्र ही मस्त.

सुरीला ‘बतई’ असा शब्द वापरतं का कुणी? आमच्याकडे वापरतात. >> शरी, नवीनच कळला. आमच्याकडे ही आहे अशी एक बंद न होणारी विळी. पण तू लिहिलंयस तशी उभ्या पात्याची नाही नॉर्मल चांद्रक्रोरीच्या पात्याची.

कधी या विषयावर वाचायला मिळेल असा वाटलं नव्हतं, मस्त लिहिले आहे. >> थॅंक्यु meghaSK तू लिहिलंयस तशी चमच्या सारखी खवणी माझ्याकडे ही आहे पण उपयोग नाही होत एवढा तिचा.

अरे बहुधा मी इतर ठिकाणी फारच ज्ञान पाजळलं आहे. मला इतकं पण फार ज्ञान नाही. Lol

बतई आठवत नाही. बतिया बऱ्याचदा ऐकलं आहे.

मला अजिबात विळी वापरता येत नाही. आई, साबा वापरतात अधुन मधुन. पण मी लेख आणि प्रतिक्रिया फार आवडीने वाचल्यात Happy
रीस्पेक्ट वाटतो बाबा मला विळी सराईत वापरणार्यांबद्दल !

Pages