The Three-Body Problem - Cixin Liu

Submitted by मामी on 25 May, 2023 - 04:02

कालच The Three-Body Problem हे पुस्तक / कादंबरी वाचून संपवली आणि लिहिल्यावाचून राहवेना. कादंबरी बरीच मोठी आहे आणि तिचा आवाका, तपशील आणि विषय तर फारच भव्य आणि सखोल आहे. मी माझ्या मगदुराप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही कमीजास्त झालं असेल तर समजून घ्यालच. तर .........

चिनी लेखक Cixin Liu (उच्चार साधारणपणे त्सशिन लिउ किंवा चिनी पद्धतीनं लिहायचं तर लिउ त्सशिन) २००८ साली लिहिलेली ही कादंबरी २०१४ मध्ये अमेरिकन लेखक Ken Liu ने (केन लिउ) इंग्रजीत आणली. ( केन लिउचं मूळ चिनी लेखकाशी काही नातं नाही). द थ्री बॉडी प्रॉब्लेम (The Three-Body Problem - TBP) ही Remembrance of Earth's Past या तीन पुस्तकांच्या सिरीजमधील (trilogy) पहिली कादंबरी आहे. इतर दोन कांदबर्‍या आहेत - द डार्क फॉरेस्ट ( The Dark Forest, २००८) आणि डेथ'स एंड ( Death's End, २०१०) ज्या अनुक्रमे २०१५ (अनुवाद - Joel Martinsen) आणि २०१६ (अनुवाद - Ken Liu) इंग्लिशमध्ये भाषांतरीत केल्या गेल्या.

हे एक dystopian सायन्स फिक्शन आहे. या कादंबरीत येणारे एका वेगळ्या ग्रहावरचे जीवन, त्यातील बारकावे, विज्ञानातील संकल्पना वापरून आणि स्वतःची केवळ अद्भूत अशी कल्पनाशक्ती वापरून निर्माण केलेल्या काही भविष्यकालीन संकल्पना अक्षरशः थक्क करून सोडणार्‍या आहेत. यात कोणी रुढार्थानं नायक, नायिका नाहीत. आहेत ती सर्व निव्वळ पात्रं.

गोष्ट सुरू होते चिनी 'कल्चरल रिव्होल्युशन' च्या पार्श्वभूमीवर. ही पार्श्वभूमी फारच हृदयद्रावक आणि अंगावर येणारी आहे. क्रांतीच्या नावाखाली जी क्रौर्याची परिसीमा गाठली गेली ते वर्णन फार त्रासदायक आहे खरंतर. पण यातूनच Ye Wenjie या महत्त्वाच्या स्त्री पात्राची मानसिक जडणघडण तयार होते. हा सर्व भाग अगदी बारीकसारीक तपशीलातून डोळ्यापुढे अक्षरशः उभा राहतो आणि फार परिणामकारक आहे. Ye Wenjie चं कुटुंब, त्यातील सदस्यांची क्रांतीतील भुमिका, तिच्यासमोर तिच्या वडिलांची होणारी हत्या आणि तिची हतबलता क्लेशकारक आहे.

क्रांती झाल्यावर Astrophysics मधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेल्या Ye Wenjie ला दूरच्या प्रांतात जंगलातील वृक्ष तोडण्याच्या कामास पाठवले जाते. तिच्या वडिलांचा क्रांतीला विरोध होता म्हणून हिला शिक्षा. इथून जवळच असलेल्या एका सिक्रेट मिलिटरी बेसवर (Red Coast Base) तिला तिच्या शिक्षणामुळे आणि वडिलांच्या एका विद्यार्थाच्या मदतीमुळे रहायला मिळतं आणि तिथे ती काम करू लागते. पुढे इथेच अचानक तिला सुर्याचा उपयोग करून पृथ्वीवरून अवकाशात दूरवर सिग्नल पाठवता येईल याचा शोध लागतो आणि तिच्या गत आयुष्यातील घटनांमुळे मानवजातीवरचा विश्वास उडलेली Ye Wenjie एक चूक करून बसते. तिने पाठवलेल्या सिग्नलला उत्तर मिळतं पण ते असतं - " या मेसेजला उत्तर देऊ नका." तरीही मानवजात नष्ट करण्याच्या उद्देश्याने Ye Wenjie उत्तर देते आणि पृथ्वीचा ठावठिकाणा Trisolaris ग्रहावरच्या जीवांना लागतो. ते पृथ्वीवर येण्यास निघतात ते पृथ्वीवासियांना नष्ट करण्याच्या उद्देश्याने.

कादंबरीच्या दुसर्‍या भागात Trisolaris ग्रहावरच्या विचित्र जीवनाची ओळख आपल्याला एका Virtual Reality (VR) मधून होते. आता क्रांतीला चाळीसहून जास्त वर्षं लोटली आहेत. Ye Wenjie नं केलेल्या चुकीनंतर (आणि दोन खुनांनंतर) तिच्या जीवनात बर्‍याच घडामोडी घडून गेल्या आहेत आणि सध्या ती (वरवर पाहता) शांत जीवन जगत आहे. या वर्तमानकाळात कादंबरीतील दुसरे एक महत्त्वाचे पात्र - नॅनो सायंटिस्ट Wang Miao याच्या जीवनात अचानक एक चमत्कारीक घटना घडते आणि त्याच्या जीवनात Ye Wenjie आणि एका VR गेमचा प्रवेश होतो. तो हा गेम खेळू लागतो. या गेमचं नाव असतं - Three Body.

कादंबरीत या गेमचं अगदी तपशीलवार वर्णन आहे. Wang Miao जसजसा हा गेम खेळतो तसतशी Trisolaris ग्रहावरची कठीण परिस्थिती आणि तिथल्या रहिवाश्यांनी त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न या खेळातून आपल्यापर्यंत पोहोचतात. हे तपशील केवळ अद्भुत आणि आवाक करणारे आहेत. Wang Miao या खेळात बर्‍याच वरच्या लेवलपर्यंत पोहोचतो आणि मग एका संस्थेकडून (The Earth-Trisolaris Organization (ETO) ) त्याला आमंत्रण येते. इथवर कादंबरी फार हळू जात असते पण यानंतर जोर पकडते आणि अ‍ॅक्शन सुरू होते. कादंबरीच्या या दुसर्‍या भागात Three Body गेम आणि इतर घडामोडी अदलून बदलून येत रहातात.

Wang Miao च्या कादंबरीतील आगमनाबरोबरच आणखी एका वल्लीचंही आगमन होतं. हा पोलिस डिटेक्टिव्ह Shi Qiang ( Big Shi किंवा Da Shi ) एक स्मार्ट, कर्तव्यदक्ष आणि हुशार अधिकारी आहे. त्याचं स्थान या कादंबरीत महत्त्वाचं आहे. कादंबरीतील प्रत्येक पात्र अतिशय ठसठशीतपणे आपल्या डोळ्यासमोर येतं त्याप्रमाणेच Shi Qiang ही फार प्रभावीपणे समोर येतो. सुरवातीला त्रासदायक वाटलेला हा प्राणी नंतर आपल्याला आवडतोच. त्याची out of box विचार करण्याची वृत्ती ठायीठायी दिसते. त्यानं सुचवलेलं आणि प्रत्यक्षात आणलेलं Operation Guzheng अचाट आहे.

या पुस्तकातून चीनमधील क्रांतीच्या वेळची आणि नंतरची परिस्थिती, चीनच्या सर्वदूर खेड्यातील खडतर जीवन, समाजातील, सिस्टिम्समधील ताणेबाणे, कम्युनिस्ट राजवटीत आक्रसलेलं स्वातंत्र्य, स्ट्रिक्ट सिस्टिम्स आणि त्यातून मार्ग काढणारी लोकं हे आपल्याला अनभिज्ञ असलेलं जग दिसतं. याचबरोबर पात्रांच्या मानसिक जडणघडणीस कारणीभूत ठरणारी त्यांची पार्श्वभूमीही तपशीलात मांडली आहे. विशेषतः Ye Wenjie आणि ETO चा संस्थापक Mike Evans यांच्या कृत्यांमागच्या प्रेरणा फार प्रभावीपणे विषद केल्या आहेत. सहसा science fiction मधे हे असे सामाजिक, राजकीय, धार्मिक, मानसशास्त्रीय तपशील येतीलच असं नाही.

science fiction म्हणूनही ही कादंबरी फार उच्च पातळीवर जाते कारण यात मांडलेल्या वैज्ञानिक संकल्पना. उदा. sophon* ची संकल्पना. Trisolarans हा सोफोन कसा बनवतात हे वाचताना वाचक केवळ थक्क होतो आणि लेखकाच्या कल्पनाशक्तीला दंडवत घालतो. सोफोन खरेच आहेत की काय असं वाटून मी गुगल केलं तर ते (निदान आजमितीस) खरे नाहीत असं दिसलं. सोफोन बनवण्याची प्रक्रीया, त्यांची विविध मितीतील रुपे, त्यांना पृथ्वीवर पाठवण्याची प्रक्रिया, त्यांचा पृथ्वीवरील विज्ञानातील प्रगती थांबवण्यासाठी केलेला उपयोग, सोफोनमधील quantum entanglement आणि त्याचा फायदा वगैरे तपशील हे तसं क्लिष्ट वाटणारं प्रकरण लेखकानं बर्‍यापैकी सहज भाषेत लिहिलं आहे. या सोफोनमुळेच Wang Miao च्या जीवनात ती चमत्कारीक घटना घडते हे पुढे उलगडते.

असंच आहे Trisolaris ग्रहाचं आणि त्यावरील महाविचित्र हवामानपालटाचं वर्णन. Trisolaris हा Alpha Centauri या तीन सूर्य (तीन तारे) असलेल्या सिस्टिममधील एक ग्रह**. या तीन सूर्यांची आणि विज्ञानातील three-body problem*** यांची सांगड घालून Trisolaris वरील हवामानातील अचानक आणि अकल्पित बदल आणि त्यायोगे घडलेलं जीवनचक्र उलगडून सांगितलं आहे. कधी एक सूर्य उगवतो, तो बराच काळ राहतो, यामुळे जीवन बहरतं. कधी अचानक दोन सूर्य उगवतात मग प्रचंड उष्णता वाढते, अशावेळी ग्रहावरचे जीव स्वतःला dehydrate करतात. कधी वर्षानुवर्षे (एकही) सूर्य उगवत नाही आणि मग तो काळ कमालीच्या थंडीचा असतो .... भितीदायक पण अतिशय ठळकपणे हे सर्व तपशीलवार वर्णन कादंबरीत येतं. या तीन सूर्यांच्या विचित्र चक्रातून निर्माण होणारी आणि Trisolaris ला विनाशाकडे नेणारी परिस्थिती निर्माण होते आणि नव्या ग्रहाची गरज भासू लागते तेव्हाच नेमका Ye Wenjie चा मेसेज Trisolaris वर पोहोचतो.

याशिवाय Wang Miao च्या गेममधे एका लेवलला Trisolaris वर कॉम्पुटरची सुरुवात कशी होते याचं अत्यंत भारी वर्णन आहे. ते मुळातूनच वाचायला हवं.

काहीशी किचकट आणि समजून घेण्यास कठीण जरी वाटली तरी विज्ञानकथा वाचकांसाठी ही मेजवानी आहे हे नक्की. अर्थात हे तर तीन पुस्तकांच्या मालिकेतले पहिले पुस्तक होते. आता पुढचं वाचायला घेईन. आता पृथ्वीवर Trisolarans चाल करून येत आहेत. आगे आगे देखते है होता है क्या.

***********************************************************************************************************
* A sophon is a fictional proton-sized supercomputer from The Three-Body Problem that is sent by an alien civilization to halt scientific progress on Earth. (आंतरजालावरून साभार)

** In the novel, unlike in reality, the star system is unstable, and the erratic orbits of the three stars wreak havoc on the Trisolaran's home world, making it nearly impossible to inhabit. (आंतरजालावरून साभार)

** The three-body problem is one of the oldest problems in physics: it concerns the motions of systems of three bodies – like the Sun, Earth, and the Moon – and how their orbits change and evolve due to their mutual gravity. The three-body problem has been a focus of scientific inquiry ever since Newton. (आंतरजालावरून साभार)

टीपा : या पुस्तकाच्या शेवटी लेखकानं स्वतःविषयी काही माहिती दिली आहे. त्याचं चीनच्या खेड्यातील जीवन, क्रांतीमुळे झाकोळलेलं बालपण, खेड्यात रहात असताना वयाच्या सातव्या वर्षी त्याने पाहिलेले आणि त्याला भावलेले पहिल्या चिनी सॅटेलाईटचे (Dongfanghong 1) उड्डाण याविषयी लिहिले आहे. त्याचबरोबर स्वतःला लाभलेल्या एका अद्भूत शक्तीचा शोधही लेखकाला त्याच्या लहानपणीच लागला. यासंदर्भात तो लिहितो की वस्तूंचं अस्तित्व आणि अंतरं (प्रकाशवर्षासारखं मोठं असो की अतिसूक्ष्म असो) ही त्याला वाचल्यावर (किंवा विचार केल्यावर) इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जाणवतात. जणू काही एखाद्या झाडाला अथवा खडकाला स्पर्श करावा तसा तो त्यांना स्पर्श करू शकतो, मनात मूर्त रुप देऊ शकतो.

याव्यतिरिक्त लेखकाने आपली extraterrestrial intelligence बद्द्लची भुमिका मांडली आहे. जर कधी पृथ्वीवर बाहेरून कोणी extraterrestrial आलेच तर त्यांची भुमिका पृथ्वीवासियांचा नाश करणे हीच असेल असं लेखकाला वाटतं. त्याच्यामते पृथ्वीवरही जेव्हा जेव्हा एका भूभागातील लोक नव्या भूभागात गेले तेव्हा तेथिल स्थानिक लोकांना नष्ट करण्याचीच त्यांची प्रवृत्ती होती. तर मग पृथ्वीवर येणारे दुसर्‍या ग्रहावरचे लोक दयाळू असतील असं आपण मानणं हा भाबडेपणा होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा घडामोडी अगदी सरकारी पातळीवरही घडल्या नव्हत्या. ज्या लोकांना अजूनही शंका वाटते त्यांनी माझे नव्हे, स्टॅनफोर्ड मधील अतिशय मोठे वैज्ञानिक गॅरी नोलान यांचे म्हणणे ऐकावे.

थ्री बॉडी मधील ग्रेट रीविन सुरू होऊ नये इतकीच प्रार्थना.

कृपया आता ही पुस्तके वाचू नका. खूप मोठे नैराश्य येईल.

प्लीज.

चांगला परिचय.

आदुबाळ याने मराठीत भाषांतर केले आहे. आम्ही ती प्रकाशित करण्याचे प्रयत्न केले होते. पण कोव्हिडनंतर परिस्थिती काही फार बरी नाही.
पण प्रयत्न थांबवलेले नाहीत.

छान परिचय.
आदुबाळ व टीम यांना शुभेच्छा.

चिनूक्स, अरे वा. मराठीतून वाचायलाही आवडेल.

रॉय, interesting माहिती. कधीतरी aliens येणार असतील / आपले अस्तित्व दाखवणार असतील तर ते आपल्याला बघायला मिळालं तर फारच छान. होउन्जाउन्दे!

मामी, कदाचित तुम्ही याला लाइटली घेत आहात. परंतु ज्या दिवसापासून ही न्यूज ऑफिशियली जाहीर होईल त्या दिवसापासून जगभरात अंदाधुंदी माजायला
सुरु होईल. भारतासारख्या बिनडोक लोकांच्या देशात धर्माचा जबरदस्त पगडा आहे तिथे ते धर्म कसे रिऍक्ट होतील याची नुसती कल्पना करून बघा. मोजकेच प्रगत देश सोडल्यास प्रत्येक देश असल्या धार्मिक मूर्खपणाच्या मागे आहे.

जर परजीव आपल्याहून प्रगत असतील तर मग आपली वाट लागलीच म्हणून समजा.

विशेषतः आपल्यावर हल्ला होणार आहे या भीतीने सगळी मानवजात एक होऊन लढा देईल हे केवळ कल्पनारंजन होईल. प्रत्यक्षात अशी लढत देण्यासाठी जेवढी किमान तांत्रिक प्रगती व्हायला पाहिजे तेव्हढी झालेली नाही त्यामुळे जग जर या मागावर लागले तर असंख्य लोक उपासमारीने मरणार हे नक्की. कारण शेवटी अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून हजार लोक जरी जगले आणि कोट्यवधी लोक मेले तरी चालेल या निष्कर्षाप्रत मानवजात येऊन ठेपेल.

ते मज्जा वगैरे सोडून द्या. नुसत्या कल्पनेनेच थरकाप उडेल एवढी प्रचंड अंधाधुंदी माजेल. आपल्या सगळ्या कल्पना त्या धार्मिक असोत किंवा वैज्ञानिक धुळीस मिळाल्यावर अनेक माणसांना वेडच लागायची पाळी येईल. आत्मनाश करण्याचा लाटा येतील, लाखो लोक स्वेच्छेने मरतील, उरलेले एकमेकांना मारतील. काही लोकांना कयामत वाटेल काहींना प्रलय काहींना त्यातही स्वार्थ साधून घ्यावा वाटेल.

वेगस मध्ये झालेली घटना ही फेक आहे. त्यावर विश्वास नका ठेवू. डेव्हिड गृश च्या स्फोटक मुलाखतीमुळे होणाऱ्या गोंधळात दिशाभूल करण्यासाठी आणि त्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी अश्या फेक घटना घडवल्या जात आहेत.

डेव्हिड गृश की गृल्श नावाचा एक माझी सैनिक आज एक स्फोटक मुलाखत देतो आहे.

व्हिसलब्लोअर, डेव्हिड चार्ल्स गृश, 36, याने 2016 ते 2021 पर्यंत वरिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून नॅशनल रिकॉनिसन्स ऑफिसमध्ये काम केले. इतर गोष्टींबरोबरच, तो युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षांना दैनंदिन इंटेलिजन्स ब्रीफिंग तयार आणि वितरित करत असे.

त्याने 2019 ते 2021 पर्यंत UAP टास्क फोर्समध्ये हेरगिरी कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून काम केले. 2021 च्या उत्तरार्धात जुलै 2022 पर्यंत, तो UAP विश्लेषणासाठी राष्ट्रीय भूस्थानिक-गुप्तचर एजन्सीचा लीडर आणि विभागातील टास्क फोर्सचा प्रतिनिधी होता (नौदल).

गृशने काँग्रेससाठी अज्ञात हवाई घटनांबद्दल संक्षिप्त माहिती तयार केली. डिसेंबर 2022 मध्ये त्याने गुप्त UFO/UAP कार्यक्रमांबद्दल माहिती पुढे आणणाऱ्या साक्षीदारांच्या संरक्षणासाठी एका कायद्याचा मसुदा तयार करण्यात मदत केली. ज्यावर बायडन यांची स्वाक्षरी आहे.

UAP टास्क फोर्सचा विश्लेषक म्हणून, त्याच्याकडे सेन्सिटिव्ह कंपार्टमेंटेड इन्फॉर्मेशन (SCI) सुरक्षा मंजुरी आणि 2000 हून अधिक "विशेष" कार्यक्रमांमध्ये प्रवेशपरवाना होता.

गृशचा तपास उच्च-स्तरीय गुप्तचर अधिकार्‍यांच्या विस्तृत मुलाखतींवर केंद्रित होता, ज्यापैकी काही थेट UAP कार्यक्रमांमध्ये गुंतलेले होते. त्याने कॉंग्रेसच्या देखरेखीपासून अलिप्त केलेल्या बेकायदेशीर विशेष कार्यक्रमांची माहिती शोधली आहे. हे कार्यक्रम क्रॅश झालेले UFO काबीज करून यू.एस. काँग्रेस आणि अमेरिकन जनतेची दिशाभूल करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करत होते.

त्याने 21 ऑक्टोबर 2019 रोजी सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीच्या स्टाफ सदस्यांना आणि दोन दिवसांनंतर सिनेट इंटेलिजेंस कमिटीच्या स्टाफ सदस्यांना वरील प्रयत्नांविषयी ब्रीफिंग दिले आहे.

चार्ल्स मॅककुल III प्रणित, राष्ट्रीय गुप्तचर संचालकांच्या अंतर्गत, ऑडिट - तपासांसाठी जबाबदार गुप्तचर अधिकाऱ्यांविरुद्ध त्याने अमेरिकन महानिरीक्षकांकडे औपचारिक व्हिसलब्लोअर तक्रार केली आहे. जनतेपासून डेटा रोखणे आणि कॉंग्रेसपासून जाणीवपूर्वक लपवणे हे आरोप आहेत.

कार्यक्रमात सहभागी अनेक सक्रिय सदस्यांनी महानिरीक्षक कार्यालयात गृशने प्रदान केलेल्या माहितीची पुष्टी केली आहे.

गृशचे समर्थन करणारे त्याचे सहकारी म्हणाले की त्याची माहिती अत्यंत संवेदनशील आहे. अनेक गैर-मानवी वस्तू अत्यंत गुप्त ब्लॅक प्रोग्राम्सच्या ताब्यात आहेत. ती हस्तगत केलेली स्थाने, कार्यक्रमाची नावे आणि इतर विशिष्ट डेटा क्लासिफाईड असला तरी, महानिरीक्षक आणि गुप्तचर समितीच्या कर्मचार्‍यांना हे तपशील दिले गेले.

इंटेलिजेंस कम्युनिटी इन्स्पेक्टर जनरल यांना जुलै २०२२ मध्ये त्यांची तक्रार “विश्वासार्ह आणि तातडीची” वाटली. गृशच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक एव्हरिल हेन्स यांना ताबडतोब सारांश सादर करण्यात आला.

एक व्हिसलब्लोअर तपास सुरू करण्यात आला आणि गृशने गृह गुप्तचर समिती तसेच सिनेट इंटेलिजन्स कमिटीला बंद दाराआड साक्ष दिली कारण साक्षीचे काही तपशील नियमित कॉंग्रेस सदस्य आणि कर्मचारी यांच्या मंजुरी पातळीपेक्षा उच्च होते.

ही सुनावणी 11 तासांहून अधिक काळ चालली आणि शेकडो पानांचे रिपोर्ट तयार केले गेले.

गृशच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सर्व संबंधित माहिती योग्य समित्यांना पाठवली आहे. त्याने त्यांना स्थळे, गुंतलेल्या लोकांची नावे, प्रकल्पाची कोड नावे, एरोस्पेस कंपन्या आणि पुढील तपास कोठे करायचा याचा “रोड मॅप” दिला आहे.

त्याच्या तपासाचा परिणाम म्हणून, 2021 पासून गृशला अनेक महिने सूड सहन करावा लागला. या सूडाच्या प्रयत्नांची चौकशी अजूनही चालू आहे.

गृशने 7 एप्रिल 2023 रोजी सरकारी पद सोडले. त्याला गुप्तचर वर्तुळात चांगलाच पाठिंबा आहे आणि असंख्य स्त्रोतांनी त्याच्या विश्वासार्हतेची पुष्टी केली आहे.

गुप्तचर विभागाचे उच्च-स्तरीय अधिकारी म्हणून, अशी सरकारी माहिती प्रकाशित करण्यापूर्वी संरक्षण कार्यालय प्री-पब्लिकेशन्स सिक्युरिटी रिव्ह्यू (DOPSR) द्वारे अधिकृत असणे बंधनकारक आहे. DOPSR अधिकृततेचा अर्थ असा आहे ही सगळी माहिती राष्ट्रीय सुरक्षेचा भंग करत नाही.

त्यामुळे केवळ राष्ट्रीय सुरक्षेला धोका नाही तीच माहिती लोकांसोबत शेअर केली गेली आहे. बाकीची गुलदस्त्यातच राहणार आहे.

मामी असले लो एफर्ट (फालतू) युट्यूब चॅनेल नका पाहू.

कन्टेन्ट साठी काहीही थापा लावलेल्या असतात त्यांनी.

खूप चांगले अजून दर्जेदार चॅनेल्स आहेत.

नेटफ्लिक्स थ्री बॉडी ( गेम ऑफ थ्रोन्स वाली जोड करते आहे ) आणि अवतार दि लास्ट एअर बेंडर या दोन जबरदस्त सिरीज करणार आहे.

शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे पिकसार अनिमेशन सुद्धा एक अबडक्शन स्टोरी करत आहे.

एकंदरीत २०२४ हे वर्ष महत्त्वाचे असणार आहे हे नक्की.

माझी थिअरी आहे की आपल्याला काहीतरी कन्क्लुसिव्ह प्रूफ प्रेसेंट केले जाईल.

एक प्रख्यात हार्वर्ड भौतिकशास्त्रज्ञ अवि लोएब महासागरात कोसळलेली संभावित एलियन आर्टिफॅक्ट शोधण्यासाठी यांनी $1.5 मिलियनची शोधमोहीम चालवत आहेत.

इथे युट्यूब व्हिडीओ पाहता येइल.

लोएब यांनी 2019 मध्ये हा ऑब्जेक्ट पाहिला. ती शोधलेली पहिली आंतरतारकीय उल्का म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ ती आपल्या सौरमालेच्या बाहेर उगम पावली आहे.

नासाच्या सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज कॅटलॉगमधील इतर सर्व 272 उल्कांपेक्षा ही उल्का अधिक कठीण असल्याचा निष्कर्ष लोएब आणि त्यांच्या टीमने काढला.

या निष्कर्षामुळे उत्सुकतेने, लोएब यांनी एक टीम स्थापन केली. त्यांनी समुद्राच्या तळावरील 1.7km खोलीवर उल्का तुकड्यांचा शोध घेण्यासाठी दोन आठवड्यांच्या मोहिमेची रचना केली. तुकड्यांच्या रचनेचे विश्लेषण करून ऑब्जेक्ट नैसर्गिक आहे की कृत्रिम आहे हे ठरवण्यासाठी.

महासागर मोहिमेमध्ये चुंबकीय स्लेज असलेले जहाज वापरले आहे. या टीममध्ये सात स्लेज ऑपरेशन्स तसेच एक वैज्ञानिक टीम आहे. ते 10km × 10km बॉक्सच्या आत समुद्राच्या तळावर मॅग्नेट, कॅमेरे आणि दिवे बसवलेले स्लेज टो करतात.

त्यांना आतापावेतो एक मॅग्नेशियमची तार सदृश्य रचना सापडली आहे. जी नैसर्गिकरित्या तयार होणे जवळपास अशक्य आहे.

नेहमी नवीन नवीन अपडेट येत आहेत. कदाचित त्यांच्या हाती काहीच लागणार नाही. अक्षरश: समुद्रातून सुई शोधल्याचा प्रकार आहे.

सलाम या वैज्ञानिकांना.

इथे सगळे अपडेट मिळतील.

मामी
आता तुम्ही चहाला बोलावणार म्हटल्यावर मग मला कबुली द्यायलाच पाहिजे. चहासाठी आपुन कहीभी जानेके लिये तैयार ही. मी एलिअन आहे. "तिकडून" पळून आलो आहे हो. प्रुफ पाहिजे? हे घ्या.
https://www.misalpav.com/node/50024
तेव्हढे चहाचे मात्र नक्की ना!

Pages