The Three-Body Problem - Cixin Liu

Submitted by मामी on 25 May, 2023 - 04:02

कालच The Three-Body Problem हे पुस्तक / कादंबरी वाचून संपवली आणि लिहिल्यावाचून राहवेना. कादंबरी बरीच मोठी आहे आणि तिचा आवाका, तपशील आणि विषय तर फारच भव्य आणि सखोल आहे. मी माझ्या मगदुराप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही कमीजास्त झालं असेल तर समजून घ्यालच. तर .........

चिनी लेखक Cixin Liu (उच्चार साधारणपणे त्सशिन लिउ किंवा चिनी पद्धतीनं लिहायचं तर लिउ त्सशिन) २००८ साली लिहिलेली ही कादंबरी २०१४ मध्ये अमेरिकन लेखक Ken Liu ने (केन लिउ) इंग्रजीत आणली. ( केन लिउचं मूळ चिनी लेखकाशी काही नातं नाही). द थ्री बॉडी प्रॉब्लेम (The Three-Body Problem - TBP) ही Remembrance of Earth's Past या तीन पुस्तकांच्या सिरीजमधील (trilogy) पहिली कादंबरी आहे. इतर दोन कांदबर्‍या आहेत - द डार्क फॉरेस्ट ( The Dark Forest, २००८) आणि डेथ'स एंड ( Death's End, २०१०) ज्या अनुक्रमे २०१५ (अनुवाद - Joel Martinsen) आणि २०१६ (अनुवाद - Ken Liu) इंग्लिशमध्ये भाषांतरीत केल्या गेल्या.

हे एक dystopian सायन्स फिक्शन आहे. या कादंबरीत येणारे एका वेगळ्या ग्रहावरचे जीवन, त्यातील बारकावे, विज्ञानातील संकल्पना वापरून आणि स्वतःची केवळ अद्भूत अशी कल्पनाशक्ती वापरून निर्माण केलेल्या काही भविष्यकालीन संकल्पना अक्षरशः थक्क करून सोडणार्‍या आहेत. यात कोणी रुढार्थानं नायक, नायिका नाहीत. आहेत ती सर्व निव्वळ पात्रं.

गोष्ट सुरू होते चिनी 'कल्चरल रिव्होल्युशन' च्या पार्श्वभूमीवर. ही पार्श्वभूमी फारच हृदयद्रावक आणि अंगावर येणारी आहे. क्रांतीच्या नावाखाली जी क्रौर्याची परिसीमा गाठली गेली ते वर्णन फार त्रासदायक आहे खरंतर. पण यातूनच Ye Wenjie या महत्त्वाच्या स्त्री पात्राची मानसिक जडणघडण तयार होते. हा सर्व भाग अगदी बारीकसारीक तपशीलातून डोळ्यापुढे अक्षरशः उभा राहतो आणि फार परिणामकारक आहे. Ye Wenjie चं कुटुंब, त्यातील सदस्यांची क्रांतीतील भुमिका, तिच्यासमोर तिच्या वडिलांची होणारी हत्या आणि तिची हतबलता क्लेशकारक आहे.

क्रांती झाल्यावर Astrophysics मधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेल्या Ye Wenjie ला दूरच्या प्रांतात जंगलातील वृक्ष तोडण्याच्या कामास पाठवले जाते. तिच्या वडिलांचा क्रांतीला विरोध होता म्हणून हिला शिक्षा. इथून जवळच असलेल्या एका सिक्रेट मिलिटरी बेसवर (Red Coast Base) तिला तिच्या शिक्षणामुळे आणि वडिलांच्या एका विद्यार्थाच्या मदतीमुळे रहायला मिळतं आणि तिथे ती काम करू लागते. पुढे इथेच अचानक तिला सुर्याचा उपयोग करून पृथ्वीवरून अवकाशात दूरवर सिग्नल पाठवता येईल याचा शोध लागतो आणि तिच्या गत आयुष्यातील घटनांमुळे मानवजातीवरचा विश्वास उडलेली Ye Wenjie एक चूक करून बसते. तिने पाठवलेल्या सिग्नलला उत्तर मिळतं पण ते असतं - " या मेसेजला उत्तर देऊ नका." तरीही मानवजात नष्ट करण्याच्या उद्देश्याने Ye Wenjie उत्तर देते आणि पृथ्वीचा ठावठिकाणा Trisolaris ग्रहावरच्या जीवांना लागतो. ते पृथ्वीवर येण्यास निघतात ते पृथ्वीवासियांना नष्ट करण्याच्या उद्देश्याने.

कादंबरीच्या दुसर्‍या भागात Trisolaris ग्रहावरच्या विचित्र जीवनाची ओळख आपल्याला एका Virtual Reality (VR) मधून होते. आता क्रांतीला चाळीसहून जास्त वर्षं लोटली आहेत. Ye Wenjie नं केलेल्या चुकीनंतर (आणि दोन खुनांनंतर) तिच्या जीवनात बर्‍याच घडामोडी घडून गेल्या आहेत आणि सध्या ती (वरवर पाहता) शांत जीवन जगत आहे. या वर्तमानकाळात कादंबरीतील दुसरे एक महत्त्वाचे पात्र - नॅनो सायंटिस्ट Wang Miao याच्या जीवनात अचानक एक चमत्कारीक घटना घडते आणि त्याच्या जीवनात Ye Wenjie आणि एका VR गेमचा प्रवेश होतो. तो हा गेम खेळू लागतो. या गेमचं नाव असतं - Three Body.

कादंबरीत या गेमचं अगदी तपशीलवार वर्णन आहे. Wang Miao जसजसा हा गेम खेळतो तसतशी Trisolaris ग्रहावरची कठीण परिस्थिती आणि तिथल्या रहिवाश्यांनी त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न या खेळातून आपल्यापर्यंत पोहोचतात. हे तपशील केवळ अद्भुत आणि आवाक करणारे आहेत. Wang Miao या खेळात बर्‍याच वरच्या लेवलपर्यंत पोहोचतो आणि मग एका संस्थेकडून (The Earth-Trisolaris Organization (ETO) ) त्याला आमंत्रण येते. इथवर कादंबरी फार हळू जात असते पण यानंतर जोर पकडते आणि अ‍ॅक्शन सुरू होते. कादंबरीच्या या दुसर्‍या भागात Three Body गेम आणि इतर घडामोडी अदलून बदलून येत रहातात.

Wang Miao च्या कादंबरीतील आगमनाबरोबरच आणखी एका वल्लीचंही आगमन होतं. हा पोलिस डिटेक्टिव्ह Shi Qiang ( Big Shi किंवा Da Shi ) एक स्मार्ट, कर्तव्यदक्ष आणि हुशार अधिकारी आहे. त्याचं स्थान या कादंबरीत महत्त्वाचं आहे. कादंबरीतील प्रत्येक पात्र अतिशय ठसठशीतपणे आपल्या डोळ्यासमोर येतं त्याप्रमाणेच Shi Qiang ही फार प्रभावीपणे समोर येतो. सुरवातीला त्रासदायक वाटलेला हा प्राणी नंतर आपल्याला आवडतोच. त्याची out of box विचार करण्याची वृत्ती ठायीठायी दिसते. त्यानं सुचवलेलं आणि प्रत्यक्षात आणलेलं Operation Guzheng अचाट आहे.

या पुस्तकातून चीनमधील क्रांतीच्या वेळची आणि नंतरची परिस्थिती, चीनच्या सर्वदूर खेड्यातील खडतर जीवन, समाजातील, सिस्टिम्समधील ताणेबाणे, कम्युनिस्ट राजवटीत आक्रसलेलं स्वातंत्र्य, स्ट्रिक्ट सिस्टिम्स आणि त्यातून मार्ग काढणारी लोकं हे आपल्याला अनभिज्ञ असलेलं जग दिसतं. याचबरोबर पात्रांच्या मानसिक जडणघडणीस कारणीभूत ठरणारी त्यांची पार्श्वभूमीही तपशीलात मांडली आहे. विशेषतः Ye Wenjie आणि ETO चा संस्थापक Mike Evans यांच्या कृत्यांमागच्या प्रेरणा फार प्रभावीपणे विषद केल्या आहेत. सहसा science fiction मधे हे असे सामाजिक, राजकीय, धार्मिक, मानसशास्त्रीय तपशील येतीलच असं नाही.

science fiction म्हणूनही ही कादंबरी फार उच्च पातळीवर जाते कारण यात मांडलेल्या वैज्ञानिक संकल्पना. उदा. sophon* ची संकल्पना. Trisolarans हा सोफोन कसा बनवतात हे वाचताना वाचक केवळ थक्क होतो आणि लेखकाच्या कल्पनाशक्तीला दंडवत घालतो. सोफोन खरेच आहेत की काय असं वाटून मी गुगल केलं तर ते (निदान आजमितीस) खरे नाहीत असं दिसलं. सोफोन बनवण्याची प्रक्रीया, त्यांची विविध मितीतील रुपे, त्यांना पृथ्वीवर पाठवण्याची प्रक्रिया, त्यांचा पृथ्वीवरील विज्ञानातील प्रगती थांबवण्यासाठी केलेला उपयोग, सोफोनमधील quantum entanglement आणि त्याचा फायदा वगैरे तपशील हे तसं क्लिष्ट वाटणारं प्रकरण लेखकानं बर्‍यापैकी सहज भाषेत लिहिलं आहे. या सोफोनमुळेच Wang Miao च्या जीवनात ती चमत्कारीक घटना घडते हे पुढे उलगडते.

असंच आहे Trisolaris ग्रहाचं आणि त्यावरील महाविचित्र हवामानपालटाचं वर्णन. Trisolaris हा Alpha Centauri या तीन सूर्य (तीन तारे) असलेल्या सिस्टिममधील एक ग्रह**. या तीन सूर्यांची आणि विज्ञानातील three-body problem*** यांची सांगड घालून Trisolaris वरील हवामानातील अचानक आणि अकल्पित बदल आणि त्यायोगे घडलेलं जीवनचक्र उलगडून सांगितलं आहे. कधी एक सूर्य उगवतो, तो बराच काळ राहतो, यामुळे जीवन बहरतं. कधी अचानक दोन सूर्य उगवतात मग प्रचंड उष्णता वाढते, अशावेळी ग्रहावरचे जीव स्वतःला dehydrate करतात. कधी वर्षानुवर्षे (एकही) सूर्य उगवत नाही आणि मग तो काळ कमालीच्या थंडीचा असतो .... भितीदायक पण अतिशय ठळकपणे हे सर्व तपशीलवार वर्णन कादंबरीत येतं. या तीन सूर्यांच्या विचित्र चक्रातून निर्माण होणारी आणि Trisolaris ला विनाशाकडे नेणारी परिस्थिती निर्माण होते आणि नव्या ग्रहाची गरज भासू लागते तेव्हाच नेमका Ye Wenjie चा मेसेज Trisolaris वर पोहोचतो.

याशिवाय Wang Miao च्या गेममधे एका लेवलला Trisolaris वर कॉम्पुटरची सुरुवात कशी होते याचं अत्यंत भारी वर्णन आहे. ते मुळातूनच वाचायला हवं.

काहीशी किचकट आणि समजून घेण्यास कठीण जरी वाटली तरी विज्ञानकथा वाचकांसाठी ही मेजवानी आहे हे नक्की. अर्थात हे तर तीन पुस्तकांच्या मालिकेतले पहिले पुस्तक होते. आता पुढचं वाचायला घेईन. आता पृथ्वीवर Trisolarans चाल करून येत आहेत. आगे आगे देखते है होता है क्या.

***********************************************************************************************************
* A sophon is a fictional proton-sized supercomputer from The Three-Body Problem that is sent by an alien civilization to halt scientific progress on Earth. (आंतरजालावरून साभार)

** In the novel, unlike in reality, the star system is unstable, and the erratic orbits of the three stars wreak havoc on the Trisolaran's home world, making it nearly impossible to inhabit. (आंतरजालावरून साभार)

** The three-body problem is one of the oldest problems in physics: it concerns the motions of systems of three bodies – like the Sun, Earth, and the Moon – and how their orbits change and evolve due to their mutual gravity. The three-body problem has been a focus of scientific inquiry ever since Newton. (आंतरजालावरून साभार)

टीपा : या पुस्तकाच्या शेवटी लेखकानं स्वतःविषयी काही माहिती दिली आहे. त्याचं चीनच्या खेड्यातील जीवन, क्रांतीमुळे झाकोळलेलं बालपण, खेड्यात रहात असताना वयाच्या सातव्या वर्षी त्याने पाहिलेले आणि त्याला भावलेले पहिल्या चिनी सॅटेलाईटचे (Dongfanghong 1) उड्डाण याविषयी लिहिले आहे. त्याचबरोबर स्वतःला लाभलेल्या एका अद्भूत शक्तीचा शोधही लेखकाला त्याच्या लहानपणीच लागला. यासंदर्भात तो लिहितो की वस्तूंचं अस्तित्व आणि अंतरं (प्रकाशवर्षासारखं मोठं असो की अतिसूक्ष्म असो) ही त्याला वाचल्यावर (किंवा विचार केल्यावर) इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जाणवतात. जणू काही एखाद्या झाडाला अथवा खडकाला स्पर्श करावा तसा तो त्यांना स्पर्श करू शकतो, मनात मूर्त रुप देऊ शकतो.

याव्यतिरिक्त लेखकाने आपली extraterrestrial intelligence बद्द्लची भुमिका मांडली आहे. जर कधी पृथ्वीवर बाहेरून कोणी extraterrestrial आलेच तर त्यांची भुमिका पृथ्वीवासियांचा नाश करणे हीच असेल असं लेखकाला वाटतं. त्याच्यामते पृथ्वीवरही जेव्हा जेव्हा एका भूभागातील लोक नव्या भूभागात गेले तेव्हा तेथिल स्थानिक लोकांना नष्ट करण्याचीच त्यांची प्रवृत्ती होती. तर मग पृथ्वीवर येणारे दुसर्‍या ग्रहावरचे लोक दयाळू असतील असं आपण मानणं हा भाबडेपणा होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला परिचय.
दोन तीन वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात (आदूबाळ या लेखकाने?) याच कादंबरीच्या एका प्रकरणाचं मराठी भाषांतर केलं होतं का? मूळ कादंबरी चिनी होती, सायन्स फिक्शनच होती आणि चीनमधल्या क्रांतीशी संबंधित होती असंही वाटतंय.

इन्टरेस्टिंग वाटतंय. विश लिस्टमध्ये टाकते. धन्यवाद. Happy

(मला शीर्षक वाचून आधी शंका आली की पुस्तक पॉलीअ‍ॅमरीबद्दल आहे की काय! Lol )

दोन तीन वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात (आदूबाळ या लेखकाने?) याच कादंबरीच्या एका प्रकरणाचं मराठी भाषांतर केलं होतं का. >>> मी वाचलं नव्हतं हे. आता वाचेन.

मामी काय मस्त परिचय करुन दिलायस. एका बैठकीत एका ओघात झपाटल्यासारखे लिहीलाय असे वाटते. >>> हो ग सामो. बरोबर ओळखलंस.

इंटरेस्टिंग आहे...वाचनयादीत add करते. >>>
इन्टरेस्टिंग वाटतंय. विश लिस्टमध्ये टाकते. >>>>

मृणाली, स्वाती .... नक्की वाचा. Happy

मला शीर्षक वाचून आधी शंका आली की पुस्तक पॉलीअ‍ॅमरीबद्दल आहे की काय! >>>>. स्वाती ..... Lol

मामी, मस्त परिचय . ड्युन वाचून/ ऐकून काढल्यावर काही तरी नवे हवे होते ते मिळाले. आता ह्याच्यावर माझे सहा महिने तरी जातील.
लोक्स ऑडिबल वर बुक्स उपलब्ध आहेत ऐकायला. मला हे सोयीचे पडते. बोअरिन्ग काम करताना ऐकता येते.
युट्युब वर सर्च केले तर बरेच मटॅ रिअल आहे. ड्युन पुस्तकांवर अभ्यासपूर्ण लिहिणारा व बोलणा रा एक क्विन म्हणून आहे. बहुतेक क्विन्स आयडिआज त्याचे चेनेल आहे. त्याने पण ह्या पुस्तकावर व्हिड केले आहेत.

ते वढ्या साठी ऑडिबल डाउनलोड केले अ‍ॅप. पहिले पुस्तक चालू केले आहे. एक नेटफ्लिक्स/ कुठलीतरी टीव्ही सिरीअल पण आहे ह्या पुस्तकांवर . रेडिट वर एक बीटा सब रेडिट आहे.
मस्तच काय भारी कल्पना आहेत.

अवांतरः स्पॉटिफाय वर द रिअल डिक्टेटर्स असा एक पॉडकास्ट आहे त्यात माओ व कल्चरल रेवो. ची चार भागात माहिती आहे. ह्याला बॅक अप म्हणून ते ही ऐकून घ्या.

ही त्रयी मी वाचलेल्या सगळ्यात भयंकर/भीतीदायक पुस्तकांपैकी एक. खऱ्या अर्थाने फाटते. शिवाय खरे खुरे साय फाय. उगाच नवल दिवाळी अंकातल्या कथांसारखे "तात्यांनी कालप्रवास केला आणि समोर निळा परग्रहवासी आला" असले दळभद्री वन बी एचके मध्ये घडणारे साय फाय नव्हे.

उगाच नवल दिवाळी अंकातल्या कथांसारखे "तात्यांनी कालप्रवास केला आणि समोर निळा परग्रहवासी आला" असले दळभद्री वन बी एचके मध्ये घडणारे साय फाय नव्हे.>>> तात्याने कालप्रवास करू नये असा नियम आहे काय? रॉबर्टने करावा पण तात्याने करू नये. छान!

सगळ्यात भयंकर/भीतीदायक पुस्तकांपैकी एक>>>मामीनी लिहिलेल्या परीचया वरून ही हॉरर कथा आहे असे वाटत नाही.
मी पुस्तक वाचलेले नाहीये. पण माझा असा ग्रह झाला कि हे "स्पेस ऑपेरा" टाईप काहीतरी असावे.

हे एक dystopian सायन्स फिक्शन आहे. >>> हे डिप्रेसिंग, भयावह असतंच.

शिवाय रॉय यांनी तीनही पुस्तकं वाचली आहेत. पुढे भयानक परिस्थितीचं वर्णन असू शकतं. रुढार्थानं हॉरर कथा जॉन्राँ नसला तरी.

I am really interested to know about the climate affected by three suns. Makes me think how unique and precious our earth is.

मामी
तुम्ही चांगला परिचय लिहिला आहे.
या उपर अजून जाणून घ्यायचे असेल तर
"ऐसी" वर श्री अस्वल यांनी लिहिलेले हे लेख वाचनीय आहेत.
"गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी "
https://aisiakshare.com/node/7116
https://aisiakshare.com/node/7113
wiki page इथे आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Remembrance_of_Earth%27s_Past
मामी, काही लोकांना झुरळाची पण भीती वाटते. सगळ्यांना नाही.

अरे वा, छान लिंक्स दिल्यात केशवकूल. धन्यवाद. वाचते.

मामी, काही लोकांना झुरळाची पण भीती वाटते. सगळ्यांना नाही. >>>> हो बरोबर.

हो बुवा आम्ही रहातो वन बीएच्केमधेे. काय करणार ? इलाज नाही.
कधी मधी जमल तर कालप्रवास करतो. आम्हाला भ्र्ताणारे परग्रहवासी "निळ्या सावळ्या " रंगाचे असतात. ref "अवतार"चा कर्ता तो वन बीएच्केमधेे रहात होता?
म्हणून आम्हाला हाय ब्रोज कमी लेखतात हे वाचून अत्यंत दुःख झाले.

हा आठवडा खूप मोठ्या घडामोडींचा होता. अमेरिकेतल्या मिलिटरी मधील अनेक माजी अधिकारी शपथेवर अमेरिकन सरकारला उघडे पाडत आहेत.

आपण कदाचित त्या क्षणाच्या जवळ पोचलो आहोत.

आपण एकटे तर नाहीच, परंतु आपल्याहून अतिप्रगत असे परजीव आपल्या पृथ्वीवर आहेत यावर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे.

सावधान लोकहो.

मी सहजा सहजी भाकडकथांवर विश्वास ठेवणारा नाही, परंतु दाल मे काला है हे सिद्ध होत आहे.

Pages