आठवण

Submitted by निखिल मोडक on 10 May, 2023 - 09:59

आली का ही बया
अशीच येते ही अगदी
नेमक्या वेळेस न सांगता
अगदी दारात उभीच राहते
बरं दारातून घालवून द्यायची आपल्यात रीत नाही
निदान या बसा पाणी घ्या तरी म्हणावं लागतं
हिला ते ही म्हणायची सोय नाही
आली की कितीवेळ बसेल सांगता येत नाही
घटका दोन घटका दिवस दोन दिवस
बरे शांत बसेल तर खरी
नुसती आपली भुणभुण भुणभुण
आपण आपले कामात असावे
तरी हिचे आपले चालूच
बरे अगदीच काही वाईट वागत नाही
रिकाम्या हाताने तर कधीच येत नाही
कधी काहीतरी गोड घेऊन येईल
कधी आंबट कैरीची फोड घेऊन येईल
निदान तेवढ्यासाठी नाही म्हणवत नाही
पण आपल्याला तरी चालते का
सारखे कोणी आगंतुकासारखे आलेले
तास तास बसलेले
आपण टाळत राहिले
तरी हिला कळत नाही
एक मात्र खरे
हिच्या अश्या वागण्यामुळे
रोज आली तर चालत नाही
आणि चार दिवस दिसली नाही
तर मात्र राहवत नाही

© निखिल मोडक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults