पोन्नियिन सेल्वन २ - क्षणचित्रांची आतषबाजी

Submitted by स्वाती_आंबोळे on 30 April, 2023 - 17:15

धागा काढायचा असं काही खरंतर ठरवलं नव्हतं, अमांच्या सांगण्यावरूनकाढत आहे. Happy

तर झालं असं की सात महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परवा आमच्या गुरुवारी संध्याकाळी जगभरात पोन्नियिन सेल्वन चित्रमालिकेतला दुसरा भाग प्रदर्शित झाला. १४ तारखेला तिकिटविक्री सुरू होताच मी तातडीने सदाचारी पापभीरू मध्यमवर्गीय मराठी बाण्याला जागून शनिवारची तिकिटं काढली होती. पण काही केल्या शनिवार उगवेच ना! शेवटी न राहावून गुरुवारी हाफ डे टाकून आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला गेलो.

या मध्यंतरीच्या सात महिन्यांच्या काळात मूळ तमिळ कादंबरीचा पवित्रा श्रीनिवासन यांनी केलेला अनुवाद - पाचही खंड - वाचून ऑडिबलवर ऐकून पूर्ण केले होते. 'कोण कोणाला म्हणाले आणि का', 'कोण कधी जन्मले किंवा मेले आणि कोणामुळे', 'कोणावर कसला आळ आला', 'कोण खरंतर मेलेच नाही' इत्यादी प्रश्नांचा एकमेकांकडून सराव करून घेतला होता. कुठल्याही पात्रावर दोन मार्कांची टीप किंवा 'अमक्यांच्या पराभवाची आठ कारणे' सहज लिहिता येतील इतका आत्मविश्वास आला होता.

कळवण्यास अत्यंत आनंद होतो की हा सगळा अभ्यास कावेरीत गेला.

कल्की यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित असली तरी चित्रपट ही एक स्वतंत्र कलाकृती आहे, आणि तिचा कर्ताकरविता मणिरत्नम आहे याचा लखलखीत साक्षात्कार झाला. सुरुवातीला काही ठिकाणी 'पण पुस्तकात तर...' असं काहीबाही आठवलं, पण चित्रपटाचा भव्य नेत्रसुखद कॅनव्हास आणि भरधाव वेग यामुळे लवकरच त्याचा विसर पडला.

कथेची पार्श्वभूमी:
दहाव्या शतकात घडलेली तमिळनाडूतील चोळ साम्राज्याची ही गोष्ट. चोळ, चेरा आणि पंड्या या त्या भूप्रदेशातल्या तीन तत्कालीन महासत्ता म्हणून ओळखल्या जातात. पैकी पंड्या आणि चोळ यांच्यातील यादवीचा संदर्भ या कथेत येतो. राजराजा (किंग ऑफ किंग्ज!) चोळ हा या घराण्याचा मुकुटमणी शूर योद्धा होताच, पण तो कलाप्रेमी आणि त्याचबरोबर कुशल, धोरणी आणि दूरदर्शी प्रशासकही होता. अर्थातच याच्या कारकीर्दीत चोळ साम्राज्य केवळ वाढलंच नाही, तर बहरलं.
पण चित्रपटात मांडलेला कथाभाग आहे तो नंतर राजराजा म्हणून ओळखला गेलेला अरुणमौलीवर्मन राजपुत्र असतानाचा. त्याचा मोठा भाऊ आदित्य करिगालन (कळिकाळ?) याला यौवराज्याभिषेक झालेला आहे. तो महापराक्रमी आहे, पण त्याचबरोबर तापट आणि काहीसा आततायी (इम्प्लसिव्ह) आहे. त्याला राजकारणात आणि राज्यकारभारात रस नाही. त्याच्या पाठीवरची बहीण कुंदवै ही तिच्या वयाच्या मानाने अतिशय परिपक्व आणि मुत्सद्दी राजकारणी आहे, सर्वात धाकट्या अरुणमौलीच्या जडणघडणीत तिचा फार मोठा वाटा आहे. ही बहीण खरी, पण आपण शिवबाने राज्यकारभार कसा करावा त्याचे धडे जिजाऊंकडून घेतले म्हणतो तशी ही किंगमेकर आहे. सद्य चक्रवर्ती सुंदरराज चोल हे या तिघांचे वडील.

पोन्नी हे कावेरी नदीचं लाडाचं नाव. त्याचा अर्थ सुवर्णकुमारी असा आहे. कावेरीच्या खोर्‍यातली पुळण सोनेरी दिसते म्हणून वाच्यार्थाने आणि अतिशय सुपीक म्हणून लाक्ष्यार्थानेही मिळालेलं. राजराजा हा या कावेरीचा लाडका पुत्र म्हणून 'पोन्नियिन सेल्वन'.

पंड्यांच्या राजाचा पराभव आणि शिरच्छेद आदित्याने केल्यामुळे पंड्या सरदार सूडाने पेटलेले आहेत. त्यांच्या गुप्तहेरांनी चोळ साम्राज्य पोखरायला सुरुवात केलेली आहे. चोळांचा नायनाट करून त्यांना पंड्याच्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसवायचं आहे. दक्षिणेला श्रीलंकेच्या राजाचा अरुणमौलीने पराभव केल्यामुळे तेही चवताळलेले आहेत. तशातच चोळांच्या एका अंतर्गत कलहालाही हळूहळू उकळी फुटते आहे. सुंदरराज चोलाकडे राज्याची धुरा आली ती त्याचे थोरले काका गंधरादित्य लढाईत मारले गेले तेव्हा त्यांचा मुलगा मधुरांतक लहान असल्यामुळे. पण आता तो मोठा झाला आहे, आणि त्याला त्याचं राज्य परत हवं आहे. त्याचा बाहुलं म्हणून वापर करून राज्यावर कबजा करता येईल अशी स्वप्नं बाळगून असलेले आणि त्यासाठी त्याला पाठिंबा देणारे काही सरदारही आहेत.

इथे या कादंबरीतलं - आणि चित्रपटातलंही - काल्पनिक, पण सर्वात महत्त्वाचं पात्र 'नंदिनी' आपला डाव मांडतं. नंदिनीचं वर्णन 'साक्षात सर्पिणी' असं केलं गेलं आहे. ती महत्त्वाकांक्षी तर आहेच, पण तिच्या ध्येयप्राप्तीच्या आड कुठलाही विधिनिषेध येत नाही. वयात येत असताना तिचं असामान्य सौंदर्य पाहून आदित्य तिच्या प्रेमात पडला होता, पण तिच्या कुलशीलाचा ठावठिकाणा नसल्यामुळे राजघराण्यात तिचा समावेश अशक्य होता. त्या घटनेमुळे नंदिनीच्या महत्त्वाकांक्षेला खीळ बसली नाहीच, उलट आता त्याला सूडाग्नीची जोड मिळाली आहे.

यापुढचा तपशील मी अर्थातच सांगणार नाही.

ही पाच खंडांत लिहिली गेलेली कथा दोन चित्रपट मिळून सहा तासांत दाखवण्याचं शिवधनुष्य मणिरत्नमने पेललं आहे. अश्या वाक्यांत सहसा 'लीलया' हे विशेषण येतं. मी ते मुद्दाम वापरलेलं नाही. कारण या प्रयत्नात त्याची धावपळ झालेली जाणवते. विशेषत: या दुसर्‍या भागात. पहिल्या भागाने काहीश्या विलंबित लयीत रागाची ओळख करून दिली होती. हा भाग द्रुतलयीत एकाहून एक इन्टेन्स प्रसंगांची अशी आतषबाजी सुरू करतो की जीव दडपतो! त्यात निसर्गाचे रौद्रभीषण आविष्कार आहेत, राजकीय डावपेच आहेत, विश्वासघात, कटकारस्थानं आणि त्यांना हिकमतीने दिलेली मात आहे, थक्क करणारे गौप्यस्फोट आहेत, नेत्रदीपक लढाया आहेत...

आणि या सगळ्याला पुरुन उरणारे प्रेमिकांतले, भावाबहिणींतले, मित्रामित्रांतले अतिशय हळुवार आणि हृद्य क्षणही आहेत. असे क्षण मोजक्या ब्रशस्ट्रोक्समधून नेमकेपणाने पोर्ट्रे करणं यात मणिरत्नमचा हातखंडा आहे. हा शेवटी ह्यूमन ड्रामा आहे याचा विसर तो पडू देत नाही.
चित्रपट संपल्यावर बाहेर येताना लढाया आणि आतषबाजी आठवत नाही, या क्षणांचा अंतःप्रवाहच उचंबळून येतो!
आणि हृदयात रुंजी घालत राहातं ते रहमानचं संगीत.

सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका अक्षरशः जीव ओतून केल्या आहेत. राजबिंडा अरुणमौली, मिश्किल/चार्मिंग/फ्लर्टी वंद्यदेव, संस्कृत नाटकांतल्या सूत्रधार-कम-विदुषकासारखा आलवारकडियान, सगळे सरदार, मानकरी, वानदी/कुंदवै/पुंगुळली/सेंबियन महादेवी - सगळी पात्रं या कलाकारांनी प्राण फुंकून जिवंत केली आहेत. पण नंदिनी झालेली ऐश्वर्या आणि आदित्यच्या भूमिकेतल्या विक्रमचा खास उल्लेख करणं मला इथे अपरिहार्य आहे. त्यांचे रोल भावखाऊ आहेत हे खरंच, पण ते तितक्याच ताकदीने पेलले गेले नसते तर चित्रपट फसला असता! दोघांनी कमाल केली आहे!

चित्रटाची भव्यता, सेट्स, लोकेशन्स, कॅमेरावर्क, नेमक्या प्रसंगांत जवळून वा दुरून चित्रण, कपडेपट, रंगसंगती - यांत बोलण्याइतका माझा अधिकार नाही, तेव्हा सामान्य प्रेक्षक म्हणून ते भारी वाटतं आणि अर्थातच चित्रपटाच्या परिणामकारकतेत मोलाची भर पडत जाते इतकंच म्हणू शकते.

रहमानच्या संगीताचा मी उल्लेख केला का? गाणी बहुतांशी गायली न जाता पार्श्वसंगीत म्हणूनच वाजतात, तीही अपूर्ण, आणि तरीही नेमका परिणाम साधतात. पार्श्वसंगीत हे यातलं एक महत्त्वाचं पात्रच आहे म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

काही बाबी (बहुधा पुस्तकं वाचलेली असल्यामुळे) मला खटकल्या. स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहणार्‍यांना कदाचित जाणवणारही नाहीत.
दुसर्‍या भागात नंदिनी आणि काही प्रमाणात कुंदवै वगळता यातल्या स्त्री पात्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. पुस्तकांचं माझ्यासाठी एक मोठं अपील त्यातली अतिशय स्ट्राँग स्त्रीपात्रं हे होतं. इथे बहुधा काटछाटीत त्या शोभेच्या वस्तू होऊन उरल्या आहेत. नंदिनीचे विषारी आणि विखारी डावपेच चित्रपटात बरेच डायल्यूट केले आहेत. खुद्द पोन्नियिन सेल्वनही 'शूर? चेक! मुत्सद्दी? चेक! निष्ठावंत मित्र? चेक! उदार? चेक! कलाप्रेमी? चेक!' अश्या प्रकारची एक 'चेकलिस्ट' होऊन राहिला असं वाटत राहातं.

पाच दिवस अटीतटीने खेळल्या गेलेल्या टेस्ट क्रिकेटमधल्या सामन्याची क्षणचित्रं अर्ध्या तासात बघावीत तसं होतं. डोळे दिपतात, पण रुचे-पचेतो हातातली वाळू निसटून जाते. दोनाऐवजी तीन सिनेमांत गोष्ट विभागली असती तर बरं झालं असतं का? की मग चार हवे होते असंही वाटलं असतं, कोणी सांगावं!

अर्थात पडद्यावर ही प्रतिसृष्टी निर्माण केल्याबद्दल आणि त्यात ते हळवे क्षण गुंफल्याबद्दल मणिरत्नमला असे शंभर अपराध माफ आहेत!

म्हणूनच तर मी ती आधी काढलेली शनिवारची तिकिटं कॅन्सल केली नाहीत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हपा, आयॅम इन! Happy

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार. Happy

बुवा Happy
थोडासा अवांतराचा (आणि ॲब्स्ट्रॅक्शनचा) धोका पत्करून मला काय वाटतं ते लिहू का?
मला ही प्रिविलेज वाटते.
म्हणजे बघा ना, ही दहाव्या शतकातल्या माणसांची गोष्ट माझ्यापर्यंत पोचण्यामागे किती घटनांची साखळी नेमकी विणली जावी लागली!
कल्कींच्या १९५०मध्ये लिहिल्या गेलेल्या लिटररी मास्टरपीसवर मणिरत्नमने सिनेमा काढणं, तो आवडल्यामुळे मूळ कथा शोधायची बुद्धी होणं, मला कळेल-रुचेल-पचेलश्या भाषेतला त्याचा अनुवाद ऑडिबलवर उपलब्ध असणं (पाच खंड पुस्तकरूपात कदाचित माझ्याच्याने वाचले गेले नसते!), ते ऐकण्यासाठी ॲप आणि उपकरणं घ्यायची ऐपत असणं, तो ऐकण्याइतकी उसंत आणि मनःस्थिती असणं, कान ऐकण्याचं आणि डोकं समजून घेण्याचं काम नीट करत असणं, त्याबद्दल बोलून/लिहून पिडता येईल अशी तुमच्यासारखी मित्रमंडळी सोबत असणं… यादी न संपणारी आहे! या साखळीतली एकसुद्धा कडी निसटली असती तर केवढ्या आनंदाला मी मुकले असते!

कित्येकदा आपल्या बाबतीत काही अप्रिय/प्रतिकूल घटना घडली की 'what did I do to deserve this?!' असा प्रश्न आपल्याला पडतो.
पण हा इतका अमाप आनंद माझ्या वाट्याला आला, तो तरी मी 'earn' केला आहे का? नाही! तो मला आंदण मिळाला! कितीकांच्या आनंदाचा / लेबर ऑफ लव्हचा साइड इफेक्ट म्हणून मिळाला! मी त्याबद्दल फक्त आणि फक्त कृतज्ञच असायला हवं आणि आहे. Happy

(असो. सकाळीसकाळी फार उपदेशपांडेपणा झाला. लवकर टीपापावर जावं हे बरं! Proud )

तुझ्या नियंत्रणाबाहेरचे मुद्दे -
(१) कल्कींच्या १९५०मध्ये लिहिल्या गेलेल्या लिटररी मास्टरपीसवर मणिरत्नमने सिनेमा काढणं
(२) मला कळेल-रुचेल-पचेलश्या भाषेतला त्याचा अनुवाद ऑडिबलवर उपलब्ध असणं

तुझ्या नियंत्रण कक्षातले मुद्दे -
(१) तो आवडल्यामुळे मूळ कथा शोधायची बुद्धी होणं, (पाच खंड पुस्तकरूपात कदाचित माझ्याच्याने वाचले गेले नसते!),
(२)ते ऐकण्यासाठी ॲप आणि उपकरणं घ्यायची ऐपत असणं,
(३) तो ऐकण्याइतकी उसंत आणि मनःस्थिती असणं,
(४) कान ऐकण्याचं आणि डोकं समजून घेण्याचं काम नीट करत असणं,
(५) त्याबद्दल बोलून/लिहून पिडता येईल अशी तुमच्यासारखी मित्रमंडळी सोबत असणं… यादी न संपणारी आहे!

५ मुद्दे तू कमावलेले आहेस मग का नको अभिमान?
हां २ मुद्द्यांबद्दल कृतज्ञ रहा Happy

Ps1 बघताना मला दहा वेळा google /विकीपेडिया उघडावा लागला होता... अचानक पडद्यावर कोणी यायचे आणि हा कोण/ हि कोण असे प्रश्न पडत... अत्यंत फेल डायरेक्शन.. कॅरॅक्टर बिल्ड करायला जराही कष्ट घेतले नव्हते...
तरी ps 2 बघायचा आहे...

नवीन Submitted by च्रप्स on 1 May, 2023 - 09:31

>>>

त्यात अजुन गोंधळ
ऐश्वर्याचा. जुळा भाऊ जोश मूवी पासून शोधतोय अजून सापडला नाही
परत ps १ बघून विकिपीडिया मारला आणि चारक्टर इन्फो मध्ये सगळे स्पॉईलर्स
परत विक्रम ला मुख्य प्रोटोगॉनिस्ट म्हटले तो ३-४ वेळा दिसला फक्त

पुर्ण मुव्ही पाहुनही डोक भन्जाळल नुसत. पुर्ण पेपर सोडवुन आल्यावर आपण नक्की काय लिहल होत हे आठवत नाही तसच झालय. प्लिज! कुणीतरी जरा फ्लो चार्ट काढुन द्या बर कोण कोणाच कोण ते याचा.
अचानक पडद्यावर कोणी यायचे आणि हा कोण/ हि कोण असे प्रश्न पडत... अत्यंत फेल डायरेक्शन.. कॅरॅक्टर बिल्ड करायला जराही कष्ट घेतले नव्हते...>>> मुव्ही बघण्याआधी सगळ्यानी आधी पुस्तक वाचलेच असेल आणि सगळ्याना सगळे कॅरेक्टर माहित असेल अस ग्रुहित धरुन मुव्ही काढलेला वाटतोय. सुरवातिला अगदी अल्प परिचयात २-४ पात्राची ओळख आहे. त्यानतर भरपुर लोक पडद्यावर येत राहतात त्यातही २-४ लोक सोडली तर कोणाच कुणाशी काय इक्वेशन आहे हे निट क्लियरच होत नाही.

मी हा लेख आधी दोनदा वाचला आणि मग PS1 पाहिला! Happy कदाचित मानसिक तयारीने पाहिल्याने असेल पण मला काही अवघड गेला नाही बघताना, आणि सगळे एकसारखे दिसताहेत असेही वाटले नाही Happy
कथेचा केवढा मोठा कॅन्व्हास आहे हे समजते. पुस्तके वाचणे / ऐकणे हल्ली अजिबात पेशन्स राहिलेला नाही. पण सिनेमा म्हणून पण खूपच रंजक वाटला. टिपिकल सौथी ड्रामा नाही, ऑब्जेक्टिफाय केलेली स्त्री पात्रं , मुद्दाम भयंकर कुरुप केलेले व्हिलन्स इ. नाहीत. अर्थात मणिरत्नम तसे करत नाही आणि करणार नव्हताच. पण एक धसका आहे सौथ सिनेमांचा मला. स्वातीने आग्रह केला नसता तर पाहिला असता की नाही कुणास ठाऊक. पण पाहिला याचा आनंद आहे! एंजॉय केला मी.
मला आदित्यचे कॅरेक्टर खूप आवडले. कुंदवै, वंद्यदेवन चे पण छान आहे, पोन्नियन सेल्वनलाच काही फार वाव नाही दिसला अजून. ऐश्वर्या बर्‍याच काळानंतर इतकी सुंदर दिसली आहे! मस्त रोल आहे तिचा आणि तिने केलाय पण मस्त. तरी पण तिची आणि तिच्या नवर्‍याची, इतरांची कारस्थाने, कुंदवै चे डावपेच वगैरे अजून खूप डीटेल मधे दाखवायला वाव होता. त्यामुळे स्वातीने लिहिले तसे एखाद्या रंगलेल्या इन्टेन्स मॅच ची क्षणचित्रे बघितल्याचा फील येतो. तरी मी दुसरा भाग अजून पाहिला नाहीये. यावर एखादी गेम ऑफ थ्रोन्स सारखी ३-४ सीझन्स ची सीरीज केली असती तर फार ग्रेट झाली असती!!
व्हिजुअल्स अप्रतिम! केश आणि वेषभूषा पण खास दाद देण्यासारखे! पार्श्व संगीत फार सुंदर आहे. पण मला अ‍ॅक्चुअल गाणी ते केचक आणि अलाइकादन सोडता बाकी एवढी खास नाही वाटली. बरीच गाणी आहेत पण कथेच्या ओघात येतात आणि पटकन संपतात मात्र.

परीक्षण छान आहे.

पार्ट वन बघताना जरा कन्फ्युज झाले होते पण पार्ट २ नीट समजला. आवडलाही.
आदित्य यात ह्युमन वाटतो व चांगला दिसतोही. फक्त क्राऊन प्रिन्स नाही वाटत. वयस्क वाटतो.

बाय द वे त्या नंदिनी व आदित्यच्या सीनमधे ती स्वतःच्या महत्वाकांक्षेबद्दल खरं सांगते की खोटं?

बेटावरच्या सीनमधे मी कुंदवैच्या बांगड्या बघत होते. दागदागिने व वस्त्रभूषा आवडलीच.

अर्थात दोन्ही भाग बघून काही प्रश्न अजून पडले आहेतच जसं नंदिनीला हाकलवण्यात आदित्यचा सहभाग नसतोच. व पांड्य
जर शत्रू असतो व लढाई चालू असते तर मग त्यांच्या राजाला मारलं तर नंदिनी एवढी का खवळते? भाग १मधे पुंगळल्ली व अरुणमौळी यांची जवळीक का फ्लर्टींग दाखवलंय नी वाणती ही कुटुंबाने चुज केलीय. मग अचानक अरुणमौळी व वाणती यांच्यात प्रेम कुठून निर्माण झाले? नी पुंगुळल्लीचं पुढे काय? पार्थिवन खरोखरच अरुणमौळीला जबाबदार ठरवतो की नंदिनीच्या इन्फ्लुअन्सखाली शत्रूला मिळतो?
कुणीतरी सांगा रे. का पुस्तक वाचले पाहिजे?

स्वातीचं परीक्षण वाचून सिनेमा पाहण्याची उर्मी दाटून आली आहे.
पहिला भाग कुठे बघायला मिळेल?
हपा ,प्लीज ती पार्श्वभूमी लिहायचं बघा बरं लवकर.
स्वाती, पीएस सारख्या एका छान पुस्तकाची आणि सिनेमाची ओळख करुन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

शुगोल, मी आणि स्वातीने मिळून पार्श्वभूमी लिहिली आहे already. नक्की वाचा. https://www.maayboli.com/node/83414

Mazeman,
पांड्य जर शत्रू असतो व लढाई चालू असते तर मग त्यांच्या राजाला मारलं तर नंदिनी एवढी का खवळते? >> दुसऱ्या सिनेमात दाखवलं आहे की त्या पांड्य राजाने तिला कठीण काळात वडीलकीच्या नात्याने आश्रय दिलेला असतो. आदित्य जेव्हा त्याला मारायला येतो तेव्हा ती म्हणते की याला मारू नकोस, मी याला सर्वस्व अर्पण केलं आहे - की तत्सम काहीतरी. नक्की शब्द मला आठवत नाहीयेत. या अशा कन्फुजिंग वाक्यामुळे आदित्यला वाटतं की ह्यांचं लफडं आहे.

भाग १मधे पुंगळल्ली व अरुणमौळी यांची जवळीक का फ्लर्टींग दाखवलंय नी वाणती ही कुटुंबाने चुज केलीय. मग अचानक अरुणमौळी व वाणती यांच्यात प्रेम कुठून निर्माण झाले? >> पुंगळल्लीबद्दल स्वाती जास्त चांगलं सांगू शकेल. वाणती आणि अरुलमोळी यांचं लहानपणापासून कुछ कुछ होता है. ते सिनेमात फारसं आलं नाहीये. कुठेतरी उल्लेख आला आहे बहुतेक.

PS2 , Prime वर 4 भाषेत सिनेमा पण हिंदीत नाही
हरचंद, ती पत्र पाठवते अरूंणमौळीला त्या vanditevayan थ्रू असाही एक सिन आहे पार्ट 1 मध्ये.
शिवाय पार्ट1 मध्ये pungluli फार इम्प्रेस असलेली दाखवलीय. मनही मन मे प्यार आणि ते पूर्ण चेहरा आणि बॉडी लँग्वेज मध्ये दिसतंय असे पार्ट 1 मध्ये जाणवतंय.
( Btw
नावं लक्षात ठेवणे आणि लिहिणे फार अवघड ह्या character ची, त्यामुळे फेफे उडालीय लिहिताना, चुकीला हसू नये, माफी द्यावी )

चित्रपटाचं कथानक चांदोबातल्या गोष्टींसारखं आहे. आणि मणिरत्नम ते पडद्यावर उतरवण्यात अयशस्वी झालेले आहेत. भाषेचा प्रॉब्लेम आहेच, शिवाय पात्रांची सांगड घालताना कसरत करावी लागते. चित्रपटाला एआर रेहमान म्युझिकल म्हणुन का प्रोजेक्ट केलंय, हे एक कोडं आहे; म्युझिकलची व्याख्या बदलली असावी.

ओवरॉल, चित्रपट अजिबात पकड घेत नाहि. यापेक्षा नेफिवर रोमन किंवा आटोमन एंपायरवर असलेल्या डॉक्युमेंटरीज बघा, त्या जास्त एंगेजिंग आणि नेत्रदिपक आहेत... Wink

नवीन अभिप्रायदात्यांचे आभार. Happy

तुमचेमन, एकेका प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करते:

>>> आदित्य यात ह्युमन वाटतो व चांगला दिसतोही. फक्त क्राऊन प्रिन्स नाही वाटत. वयस्क वाटतो.
हो, पुस्तकात ही सगळीच पात्रं बरीच तरूण आहेत. जर मला बरोबर आठवत असेल तर नंदिनी आदित्यपेक्षा एखाद्या वर्षाने मोठीच असल्याचाही उल्लेख आहे. टीनएज स्वीटहार्ट्स नंतर फार तर एखादं दशक दुरावले आहेत, म्हणजे मृत्युसमयी आदित्य पंचविशीचा, फार तर तिशीत असेल. बाकीची भावंडं आणि वंद्यदेवन विशीचे.
सिनेमात मणिरत्नमने त्यांच्या ताटातुटीनंतर बराच काळ लोटल्याचं दाखवलं आहे.
मला अशी शंका आहे की ऐश्वर्या आणि विक्रम हे कास्टिंग त्याच्या डोक्यात पक्कं असावं. मग बाकीची पात्रं त्यांच्या वयाच्या हिशोबाने कास्ट केली काय कोण जाणे.

>>> बाय द वे त्या नंदिनी व आदित्यच्या सीनमधे ती स्वतःच्या महत्वाकांक्षेबद्दल खरं सांगते की खोटं?
खरं. तिला खरंच सिंहासनावर बसायची महत्त्वाकांक्षा असते. पहिल्या सिनेमात ती नवर्‍याबरोबर राजवाड्यात येते तेव्हा सिंहासनाकडे असोशीने पाहते, त्यावर तरुण वयातली आपली छबीही पाहते, आठवतं का?
पुस्तकात तर ती आदित्यला टीन असतानाच (पुढचं सगळं रामायण घडण्याआधीच) तू बापाचा काटा काढ, पळुवेट्टरियांना मार, राजमुकुट हस्तगत कर आणि मला तुझी पट्टराणी कर असं सांगते.

>>> पांड्य जर शत्रू असतो व लढाई चालू असते तर मग त्यांच्या राजाला मारलं तर नंदिनी एवढी का खवळते?
आदित्यला ती आवडते हे कळल्याबरोबर नंदिनीसह तिच्या दत्तक कुटुंबाला राज्यातून हुसकावून लावण्यात येतं. ते आदित्यने केलेलं नसलं, तरी राजघराण्यात आपलं स्वागत होणार नाही, उलट तसा प्रयत्न केला तर आपल्याला देशोधडीला लावण्यात येईल हे तिला कळून चुकतं. चोळांबद्दलची निष्ठा तिथे संपते. त्यानंतर पांड्यांकडे तिला आधार मिळतो, वीरपांड्या राजा तिचा प्रतिपाळ करतो, त्यामुळे त्याचा पराभव/शिरच्छेद तिला सहन होत नाही. (पुस्तकात तिची निष्ठा केवळ सत्तेशी आहे, ना चोळांशी, ना पांड्यांशी, ना आदित्यशी, ना पळूवेट्टरियांशी!)

>>> भाग १मधे पुंगळल्ली व अरुणमौळी यांची जवळीक का फ्लर्टींग दाखवलंय
नाही, फ्लर्टिंग वंद्यदेवनला करताना दाखवलंय.
अरुणमौळी चोळा नागरिकांचा हीरो आहे. आता नट किंवा खेळाडू असतात तसा तरुणींचा हार्टथ्रॉब वगैरे - तसा तो पुंगुळलीचाही क्रश आहे, इतकंच.

>>> वाणती ही कुटुंबाने चुज केलीय. मग अचानक अरुणमौळी व वाणती यांच्यात प्रेम कुठून निर्माण झाले?
वानती हा अरुणमौळीसाठी कुंदवैचा 'चॉइस' आहे, ती तिची मैत्रीण आहे आणि कुंदवै तिलाही साम्राज्ञीपदासाठी 'ग्रूम' करते असा पुस्तकात उल्लेख आहे. अरुणमौळीलाही वानदी पसंत आहे. तसे त्याला गळाला लावायला सगळेच आसपासचे राजे/सरदार उत्सुक आहेत.

>>> पुंगुळल्लीचं पुढे काय?
पुंगुळलीचं लग्न तिचा आत्तेभाऊ सेंदनमुदन (वंद्यदेवाला मदत करणारा आणि अरुणमौळीला नागईपट्टणमला नेताना त्याची शुश्रुषा करताना दिसतो तो) याच्याशी होतं. सिनेमात ते अगदी स्पष्ट दाखवलं नसलं तरी सूचित केलं आहे.

>>> पार्थिवन खरोखरच अरुणमौळीला जबाबदार ठरवतो की नंदिनीच्या इन्फ्लुअन्सखाली शत्रूला मिळतो?
दोन्ही. Happy
आदित्यच्या मृत्यूनंतर ब्लेम गेम सुरू होतो, त्यात मग वंद्यदेव, अरुणमौळीसकट सगळ्यांकडेच संशयाची सुई फिरते. म्हणूनतर मधुरांतकाला राजा करणं ही एक ब्रिलियन्ट खेळी अरुणमौळी खेळतो.
मधुरांतकन ना पराक्रमी, ना कुशल प्रशासक, ना धोरणी, असं कोणीही इन्फ्लुअन्स करून नाचवावं असं बाहुलं असतं. या एका मूव्हने त्याच्या नाड्या अरुणमौळीच्या हातात येतात, आणि राजमुकुटासाठी भावाची हत्या केल्याचा लोकापवादही टळतो.

अजून प्रश्न असतील तरी जरूर विचारा Happy
मला या विषयावर बोलायची संधी हवीच असते. Proud

तसंच शक्य असेल तर पुस्तकंही वाचाच असा आग्रह करेन! Happy

मधुरांतकन ना पराक्रमी, ना कुशल प्रशासक, ना धोरणी, असं कोणीही इन्फ्लुअन्स करून नाचवावं असं बाहुलं असतं. या एका मूव्हने त्याच्या नाड्या अरुणमौळीच्या हातात येतात, >>> हे वाचुन २०१९ च्या महाराश्ट्रातल्या राजकिय खेळिची प्रकर्शाने आठवण झाली.smiley2.gif

मला वाटत पुस्तक सगळ्यानी वाचल असेलच आणी प्रेशकाना सगळे सदर्भ माहिती आहेत हे धरुनच दोन्ही मुव्ही बनवले आहेत त्यामुळे मुव्ही बराचसा जम्प करत सगळे हायलाइट कव्हर करत जातो.. सदर्भ माहित नसल्याने लॉजिक शोधताना प्रेक्षकाच्या डोक्याच भज होत.
२ पार्ट मधे सगळा पसारा कोबुन बसवण्यापेक्षा ३ भाग करायला हवे होते.
अरुणमोळी प्रचन्ड कौतुक सगळे करतात पण त्याची म्हणावी तितकी छाप पडत नाही त्याउलट आदित्य, त्याच तुटलेल प्रेम याने तो पडदा व्यापुन टाकतो.

चांगले प्रश्न, माझे मन.
या निमित्ताने मला पडलेले प्रश्न ही विचारून घेते Happy (टाइप करायचा कंटाळा)
Spoiler alert
1. शेवटी ऐश्वर्या पाण्याखाली जात असते तेव्हा ती पतीच माझा भला होता, तोच माझा परमेश्वर वगैरे वगैरे बोलते तसेच आहे मूळ पुस्तकात की ऐश्वर्याची इमेज salvage करायला किंव्वा भारतीय प्रेक्षकांना रुचेल असे घातले आहे?

2. नंदिनी जर एवढी सत्ता केंद्रित असते तर ती कुंदवै बरोबर खेळायला, तिच्याशी गोड बोलून का राहात नाही? बाकीच्या राज घराण्यातील लोकांशी बरी राहिली असती तर तिला स्वीकारले ही असते कदाचित. Movie मध्ये पहिला लहानपणीचा पार्ट पटापट दाखवल्यामुळे नक्की कोणाच्या काय भावना होत्या काही कळल्या नाहीत. मला ते दोघेही young actors आवडले, त्यांची chemistry आवडली म्हणुन मी समजूत घालून घेतली की खरच मेजर प्रेम आहे Happy

>>> 1. शेवटी ऐश्वर्या पाण्याखाली जात असते तेव्हा ती पतीच माझा भला होता, तोच माझा परमेश्वर वगैरे वगैरे बोलते तसेच आहे मूळ पुस्तकात की ऐश्वर्याची इमेज salvage करायला किंव्वा भारतीय प्रेक्षकांना रुचेल असे घातले आहे?
तिला (अगदी परमेश्वर वगैरे नाही तरी) तिच्यावर निरपेक्ष प्रेम करणारा फक्त हाच एक माणूस होता याची जाणीव खरंच होते. बाकी सिनेमात दाखवली आहे तशी ती गरीब बिच्चारी पुस्तकात नाही. तिला वापरायचा प्रयत्न करणारे लोक आहेत, पण आपल्या भात्यातली सगळी शस्त्रं (मग त्यात स्त्रीत्व, सौंदर्य, अनाथ असल्याबद्दलची सहानुभूती, जन्मकथेबाबतचं कन्फ्यूजन इत्यादी सगळंच) वापरून या थोर्थोर पुरुषांना खेळवण्यात ती स्वतःही प्रवीण आहे.

>>> 2. नंदिनी जर एवढी सत्ता केंद्रित असते तर ती कुंदवै बरोबर खेळायला, तिच्याशी गोड बोलून का राहात नाही? बाकीच्या राज घराण्यातील लोकांशी बरी राहिली असती तर तिला स्वीकारले ही असते कदाचित.
कुंदवै तिच्या गोड बोलण्याला भुलण्याइतकी भोळी लहानपणीही नव्हती. या दोघीही बायका त्यांच्या वयाच्या मानाने परिपक्व, धोरणी आणि धूर्त आहेत.
पुस्तक वाचताना या दोन बायका बुद्धिबळाचा पट मांडून बसल्या आहेत आणि ही सगळी प्यादी खेळवताहेत असं चित्रं डोळ्यांसमोर उभं राहातं.

मुव्ही मध्ये नंदिनी कुठल्याही पुरुषाला काहीही काम सांगताना दाखवली आहे. आदित्यचे दोन्ही मित्र तिचे म्हणणे इतके पटकन कसे काय ऐकतात?
कांदबरी मध्ये ती त्यांच्या बरोबर खूप वेळ घालवते, आमिष दाखवते, पैशाची वगैरे लालूच देते का?
मला झेपलच नाही, पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही भागात आदित्यच्या जीवाला जीव लावणारे मित्र , त्याचा तिच्याबद्दलचा राग माहीत असताना तिचे ऐकून एक्शन का घेतात. (हा शब्द लिहिता येईना. देवनागरीमध्ये "ऍ" हे अक्षर आहे?)

त्याचा तिच्याबद्दल राग उगीच आहे असं त्यांना वाटत असलं तरी ह्या बाईपासून जरा सावध राहायला पाहिजे असं कुठेच त्यांना वाटत नाही?

अ‍ॅक्शन!
अ‍ॅ अ‍ॅ
shift e = अ‍ॅ अ‍ॅ
नवीन Submitted by रेव्यु on 20 January, 2023 - 21:4

shift e = अ‍ॅ अ‍ॅ

मी गूगल1 इंडिक वापरते. मला मिळेना हे shift e = अ‍ॅ अ‍ॅ

पीनी
तुम्ही गुगल इंडिक वापरू नका.
फक्त मायबोलीचे पेज ओपन करा. त्यात मराठी/इंग्रजी मध्ये मराठी सिलेक्ट झाले आहे हे बघा. (नेहमी मराठीच असते.)
सरळ लिहायला लागा. एकदा अ‍ॅ लिहून झाले कि मग गुगल इंडिक वापरा.
एव्हढी कटकट करायची नसेल तर हे अ‍ॅ नोटपॅॅड मध्ये कॉपी पेस्ट करून ठेवा. जेव्हा पाहिजे तेव्हा कॉपी पेस्ट करून घ्या..

@स्वाती आंबोळे >>> तुमच्या रेकमेंडेशनमुळे पोन्नियीन सेल्वनचे सारे भाग वाचले. आवडली पुस्तकं. जास्त डिटेल्ड व छान आहेत.

आदित्य करिकाल, वाणती, मणिमेखला, पळ्ळवेतुरायार वगैरेंची पात्र पुस्तकात चांगली रंगवली आहेत. आणि पोन्नियिन सेल्वन हे नाव पुस्तक सार्थ करते कारण त्याचे बारीक सारीक गुणविशेष छान दाखवले आहेत.

कन्सिडरींग सुंदर ही परांतक चोळाला त्याच्या आकर्षक रुपामुळे मिळालेली उपाधी आहे, प्रकाश राज सुट होत नाही. तो तितकासा खंगलेलाही वाटत नाही, स्टाऊट वाटतो.

मणिरत्नमने चित्रपट न काढता वेब सिरीज काढली असती तर पुस्तकांना जास्त न्याय मिळाला असता. आशुतोष गोवारीकरकडे ती कपॅसिटी आहे. फक्त चुकूनही केकता कपूरचं लक्ष नको जायला इकडे.

काही गोष्टी खटकतात अजूनी -
अरुलमौळी काही काळ तरी पुंगुळल्लीकडे आकर्षित झालेला असतो. सारे पाश सोडून नवी जगं पाहण्याची दोघांची आंतरीक इच्छा कॉमन असेल कदाचित. आणि वाणतीवर ही लादलेली आहे या भावनेने काहीसा रोषच असतो. तो रोष नाहीसा होऊन वाणती कधी आवडायला लागते हे ना पुस्तकात क्लिअर होत ना पिक्चरमधे.

तसंच पुंगुळल्लीचं - तिलाही अरुलमौळी आवडत असतोच. पण निदान राजकारणाशी संबंध येऊन तिला हळूहळू आपल्याला काय झेपणार नाही हे जाणवतं.

पहिल्यांदा तामिळ पी एस १ आणि २ इंग्लिश सबटायटल्स वाचत पाहिले. मग सगळी पुस्तकं वाचून काढली आणि परवा दोन्ही भाग हिंदी मध्ये पाहिले. आता वाटतेय पिक्चरचे नाव वंद्यदेवन ठेवायला पाहिजे होते. तोच डार्क हॉर्स आहे यात. अरुलमौळी फक्त शेवटी शेवटी इफेक्टिव्ह वाटतो. कारण त्याला स्कोपच कमी आहे. सबटायटल्सच्या नादात पहिल्यांदा संगीताकडे लक्ष गेले नव्हते. आता मात्र कथा माहिती असल्यामुळे ते नीट ऐकले आणि रहमानचा म्युझिकल हे सार्थ ठरते. नंदिनी व कुंदवैचा फेसऑफ, वंद्यदेवन व कुंदवैचा रोमान्स, आदित्य नंदिनीची भेट यावेळचे म्युझिक डोक्यात घोळत राहते.

मला पुस्तकात नंदिनीचं पात्र ज्या पद्धतीने एग्झिट घेतं ते शॉकिंग होतं आणि अजिबात आवडलेलं नाही.
मी तो भाग रिवाइंड करून तीन-तीनदा ऐकला - आपण बहुतेक नीट ऐकलं नाही असं वाटून!
तोवर मला ही नंदिनीची गोष्ट वाटली होती!
ते पात्र तर पूर्णपणे काल्पनिकच आहे, पण वंद्यदेवनदेखील 'इतिहासा'ला एका कुठल्याशा शिलालेखापलीकडे माहीत नाही. ही पात्रं जिवंत करण्याचं आणि इतकी स्ट्राँग करण्याचं सगळं श्रेय कल्कींचं.

PS चे दोन्ही भाग पाहिले अखेर. दुसरा भाग जास्त आवडला ज्याची पायाभरणी पहिल्या भागाच्या अर्ध्या तासानंतरच्या सिनेमात झाली आहे. पहिल्या भागाची पहिली १५ ते २० मिनिटे बोअर झाली स्पेशली नंबी आणि वंद्यदेव ह्यातील संवाद टिपिकल साऊथ इंडियन सिनेमासारखे आहेत . नंतर मात्र सिनेमा पकड घेतो .
खरतर ह्याची वेबसिरीज व्हायला हवी होती. मजा आली असती अजून .

कलाकारांमध्ये मला कुंददैवी आणि विक्रम जास्त आवडले. कुंडदैवी सुंदर दिसते . तिच्या वेशभूषकराला १०० मार्क्स .

ऐश्वर्याच्या जागी तब्बू असायला हवी होती ( तिचा मकबूल मधील परफॉर्मन्स बघत ) . ऐश्वर्या नुसती प्लास्टिक हावभाव करत असते . कार्ती पण मस्त काम करतो . मणिरत्नमचा सिनेमा असल्याने स्टोरी टेलिंग , छायाचित्रण बाबतीत प्रश्नच नाही . सिनेमात सगळ्याच थोडे थोडे असे मस्त पॅकज जमून आले आहे. एकंदरीत मस्त एंटरटेनिंग अनुभव मिळतो.

Pages