पोन्नियिन सेल्वन पाहण्याआधी हे वाचा - पी एस फॉर डमीज

Submitted by हरचंद पालव on 6 May, 2023 - 11:33

पोन्नियिन सेल्वन या चित्रपटावर गेल्या काही दिवसांत झालेली चर्चा पाहता अतिपरिचयात् अवज्ञा होण्याचा धोका आहे, किंबहुना ती झालीच आहे. विशेषतः चित्रपटाच्या पहिल्या भागात नवीन लोकांसाठी त्यांनी पात्रांची ओळख परेड व्यवस्थित पार न पाडल्यामुळे पंचाईत होते हे मान्य आहे. पण तरीही या चित्रपटाची पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे जी मजा आली, ती पाहता हा आनंद इतरांनाही घेता यावा या उद्देशाने अगदी थोडक्यात पार्श्वभूमी लिहायची ठरवली आहे. सविस्तर चर्चा खाली करता येईलच, पण लेखात ही ओळख शक्य तितकी संक्षिप्त आणि सुटसुटीत लिहायचा आम्ही प्रयत्न करू. अगदी फार कुठे जाऊन अभ्यास करायची गरज नाही. चित्रपट पाहण्यापुरती माहिती मिळाली तरी पुरे.

ही कथा कुठल्या एका युद्धाची नाही, तर चोळकालीन राजकारणाची, त्यातल्या चढाओढीची, आणि 'कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले' याची आहे. महाभारत, गेम ऑफ थ्रोन्स वगैरे कथानकांत असते तशी पात्रांची खूप मोठी फळी, राजघराण्यांतले परस्परसंबंध, नात्यांतली गुंतागुंत, वेगवेगळी ठिकाणं असं सगळं ह्यात आहे. त्यामुळे थोडी ष्टोरी काय आहे ते पाहूयात.

पोन्नियिन सेल्वन म्हणजे काय रे भाऊ? 'पोन्नी' म्हणजे कावेरी नदी. 'पोन्नियिन सेल्वन' म्हणजे कावेरीचा पुत्र. साधारण १००० वर्षांपूर्वी दक्षिण भारतात (आणि फारिनलाही ... हो, श्रीलंका, साउथ ईस्ट एशियाही फारीनच हाए) पसरलेल्या चोळ साम्राज्यातला सर्वात देदिप्यमान हिरा - राजराजा चोळ ह्याची ही गोष्ट आहे. ह्याचं पाळण्यातलं नाव अरुल्मोळी वर्मन. लक्षात घ्या: अरुल्मोळी वर्मन = राजराजा = पोन्नियिन सेल्वन.

आता ह्याला अजून दोन भावंडं आहेत. सर्वात मोठा आदित्य करिगालन, मधली कुंदवै आणि धाकटा हा - अरुल्मोळी वर्मन. ही तिघं 'सुंदर चोळा'ची मुलं. आता सत्ता ह्यांच्याकडे कशी आली? तर ती प्रक्रिया आणि भाऊबंदकीची बीजे आधीच्या पिढ्यांत पेरली गेली. खालचा तक्ता पहा. (आता सारखं चोळ-चोळ म्हणतो आहोत, म्हणून लक्षात घेऊ या - त्याचा उच्चार आपण हात चोळतो त्यातला च नाही बरे! चोवीस शब्दात जसा चो आहे, तसा उच्चार करा आठवणीनं.)

पोन्नियिन सेल्वन(2).jpg

सुंदर चोळाचे आजोबा परांतक (प्रथम) यांना ३ मुलं. थोरला राजादित्य तरुणपणीच एका लढाईत मारला गेला. त्यामुळे परांतकाच्या मृत्यूनंतर गादी मधल्या खंडरादित्यकडे आली. खंडरादित्याचा जीव राज्यकारभारापेक्षा शिवभक्तीत रमत असल्यामुळे त्याने कारभार धाकटा भाऊ अरिंजय याच्या हाती सोपवला. पुढे अरिंजय मरायला टेकला तेव्हा खंडरादित्याचा मुलगा मदुरांतकन अगदी दोन वर्षाचा असल्यामुळे अरिंजयाचा मुलगा सुंदर चोळ (परांतक-२) राजा झाला. असंतोषाची बीजं पेरली जायला ही कारणपरंपरा पुरेशी होती (आठवा - कौरव-पांडव, राघोबा दादा - नारायण राव वगैरे यादवी).

चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा सुंदर चोळ म्हातारा झाला आहे. 'पळयारै' हे चोळ साम्राज्याचं राजधानीचं शहर. परंतु जराव्याधींनी ग्रस्त सुंदर हा तंजावूरला येऊन राहिला आहे, जिथे नंतर राजधानी हलवली गेली (जिथे पुढे ६००-७०० वर्षांनी मराठी साम्राज्यही होते - व्यंकोजी भोसले आठवा). मुलगी कुंदवै मात्र पळयारैमध्ये राहते. ती अतिशय तल्लख बुद्धीची आणि राजकारणकुशल आहे. उत्तरेच्या मोहिमांचं सेनापत्य आदित्य करिगालन करतो आहे तर दक्षिणेकडच्या मोहिमांची धुरा अरुल्मोळी वर्मन वाहातो आहे. मदुरांतकनही आता बराच मोठा झाला असून आता त्याला गादी खुणावते आहे. पण त्याची आई 'सेंबियन महादेवी' हिच्या मते मदुरांतकाने शिवभक्तीतच लीन व्हावे, राजकारणात मुळीच पडू नये. आता या खेळात काही महत्त्वाची प्यादी आहेत.

१. पळुवेट्टरियर बंधू - त्यातला थोरला पळुवेट्टरियर (पेरिय पळुवेट्टरियर; पेरिय म्हणजे थोरला) हा सुंदर चोळाचा कोषाध्यक्ष/खजिनदार आहे. धाकला पळुवेट्टरियर (चिन्न पळुवेट्टरियर; चिन्न म्हणजे धाकला) तंजावुरचा किल्लेदार आहे. हे घराणं मूळचं पळुवूर नावाच्या ठिकाणचं. गेली अनेक शतकं त्यांचे चोळांशी असलेले पिढिजाद संबंध अतिशय जवळचे आणि विश्वासाचे आहेत. पण आता हे बंधू नक्की कुणाच्या बाजूला आहेत? ते दोघेही एकाच बाजूला आहेत का? सिनेमात पहा. हिंदीत सिनेमा पाहिलात तर डबिंगमध्ये 'पळुवेट्टरियर'चा त्यांनी 'पर्वतेश्वर' केला आहे.

२. वंदियत्तेवन वल्लवरायन - हा आदित्य करिगालनचा अगदी जिगरी दोस्त. हा 'वानर' नावाच्या कुळातला आहे. संपूर्ण कथेत मला प्रचंड आवडलेलं हे पात्र. संपूर्ण कथा आपण एका अर्थी ह्याच्या डोळ्यांनी पाहतो, इतकं ते महत्त्वाचं आहे. हा जिथे जिथे जाईल तिथे तिथे कथा उलगडत जाते. सुंदर चोळ आणि त्याच्या मुलांचा काटा काढायचं काय कारस्थान शिजतं आहे ह्याची माहिती काढायची आणि ती त्या तीन मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ह्याच्यावर आहे. त्यासाठी प्रसंगी हेरगिरी, वेषांतर, प्रसंगी समोरासमोर दोन हात वगैरे सगळं करण्यात हा तरबेज आहे.

३. अळवारकडियन नंबी - हा वैष्णव संन्यासी वरवर विदूषक वाटतो. पण हाही एक हेर आहे. कुणासाठी हेरगिरी करतो ते इथे सांगत नाही.

४. वाणवण महादेवी / वानमादेवी - ही सुंदर चोळाची बायको.

५. मलयमान - वानमादेवीचा बाप, आदित्य (आणि भावंडांचा) आजोबा. सिनेमात तुम्हाला आदित्य करिगालनबरोबर एक पांढरी दाढीवाला भीष्माचार्य-छाप माणूस कायम दिसेल. तोच हा मलयमान. त्याच्या सर्व मोहिमांमध्ये सतत सोबत असणारा.

६. पार्थिबेंद्रन - 'पल्लव' नावाच्या राजवंशातला हा पोरगा आदित्यचा चांगला दोस्त आहे. तोही त्यासोबत दिसतो.

७. पेरिय वेळ्ळार (= बूदी (भूती/बोधी?) विक्रमकेसरी) - अरुल्मोळीची सोबत देणारा, चोळांच्या दक्षिण मोहिमांचा सेनापती. ह्याची पुतणी वाणदी ही कुंदवैची जिग्गी मैत्रीण असते. वाणदी आणि अरुल्मोळीचा बार उडवून टाकावा असं याच्या मनात आहे, कारण हे लग्न व्हावं ही तो (वाणदीच्या पिता)श्रींची इच्छा होती.

८. नंदिनी (= इलय राणी) - ह्या पात्राबद्दल लिहायला शब्द अपुरे आहेत. चित्रपटाचं नाव नंदिनी हवं होतं असं वाटून जातं. ही आदित्यची बालमैत्रीण, क्रश, वगैरे वगैरे. ती 'रॉयल ब्लड’ नसल्यामुळे आदित्यच्या घरच्यांनी तिला लहानपणीच राज्याबाहेर काढलं, आणि चोळांचे शत्रू असलेल्या पांड्य राज्यात ती जाऊन राहिली. तिची महत्त्वाकांक्षा मोठी आहे. ती या खेळातलं प्यादं नाही, ती सगळ्या प्याद्यांना खेळवते. तिच्या अलौकिक सौंदर्याला भुलून भले भले लोकही आपण होऊन तिच्या हातांतली प्यादी होतात, अगदी राजे-महाराजेही! तिने नंतर तिच्यापेक्षा वयस्कर असलेल्या कोषाध्यक्ष पेरिय पळुवेट्टरियर याच्याशी लग्न केलं आहे. हा म्हातारा नवरा, आणि त्यायोगे राज्याचा पैसाअडका तिच्या मुठीत आहे.
आदित्यने एका युद्धानंतर पांड्य राजा - 'वीर पांड्या'चा शिरच्छेद केल्यापासून पांड्य लोक आदित्याच्या आणि पूर्ण चोळकुळाच्या संहाराला आसुसले आहेत. नंदिनी पांड्य राज्यात आश्रय घेऊन आल्यामुळे तिचं तेही एक कनेक्शन आहे. त्यातला एक 'रवीदासन' नावाचा एक चाप्टर माणूस नंदिनीला गुप्तमार्गाने येऊन चोरून भेटत असतो जादुगाराच्या वेशात. अजून बरंच काही आहे ... नंदिनी नवर्‍यासह चोळांच्या नाकावर टिच्चून तंजावूरातच राहते.

वरती आलेल्या ठिकाणांच्या (पळयारै, तंजावूर, कांची) नावांखेरीज एक कडंबूर नावाच्या शहरातला राजवाडा आहे. तो चोळांचाच एक मंत्री 'संभुवरैयन' याचा आहे. त्याचा मुलगा 'कंधमारन' हा वंदियत्तेवनचा मित्र आहे. ही गोष्ट सांगायचं कारण म्हणजे सुंदर चोळाविरुद्ध त्याचेच मंत्री ह्या कडंबूर राजवाड्यात एकत्र जमून खलबतं करतात हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

बाकी राजकन्या कुंदवै हिची मैत्रीण वाणदी, नाविक मुलगी पुंगुळली, अरुल्मोळीचा जीव वाचवणारी वृद्धा (मंदाकिनी) वगैरे पात्रं पहिल्या चित्रपटात महत्त्वाची आहेत. ती कळायला फार कष्ट पडणार नाहीत. एवढ्या माहितीवर आता चित्रपट बघताना अडचण येऊ नये असा कयास आहे. इतर सविस्तर चर्चा, काय कळलं, काय नाही कळलं वगैरे नंतर करता येईलच. वरती लोकांची नावं त्यातल्या त्यात तमिळ उच्चारांच्या जवळपास लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तमिळ जाणकारांनी सुधारणा सुचवल्यास स्वागतच आहे.

- हरचंद पालव आणि स्वाती_आंबोळे

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद हपा/स्वाती. हे नीट वाचूनच ते दोन्ही चित्रपट पाहीन आता. तो वंशवृक्ष व इतर संबंधित माहिती फार उपयोगी पडेल.

ते चोला साम्राज्य वगैरे शब्द वाचताना तो चोवीस मधला उच्चार बरोबर तोंडात येत असे. पण चोळ असे लिहीले की आपण इमेज रीडिंग करतो व हमखास चुकीचा उच्चार होतो Happy

ही तमिळ भाषा एकदा नीट शिकायलाच हवी. काहीतरी प्रचंड कॉम्प्लिकेटेड शब्द आहे असे आपण समजत असतो त्याची कावेरीचा मुलगा अशी फोड होते हे कळल्यावर आता बाकी शब्दही कळायलाच हवेत Happy

मलयमान नावाचा संबंधही मलय पर्वताशी असावा. अजून एक जाणवते, ते म्हणजे प्रत्येक देशांत "राजा" याच्या वरचे एखादे नामाभिदान कधीतरी तयार झालेच. सम्राट, एम्परर्/एम्प्रेस ई असते तसे इथे "राजराजा" दिसते. "वर्मन" हा शब्दही भारतात अनेक ठिकाणी सत्तादर्शक असावा. तो तिकडे पूर्वेलाही वापरला गेला बहुधा आणि त्याचेच नंतर "बर्मन" झालेले दिसते. एसडी बर्मन हे त्रिपुराच्या राजघराण्यातील होते असे वाचले आहे.

या नोट्स बद्दल _/\_ सर..
नीट अभ्यास करून आता PS चा पेपर देईन.

वि. सू. आपण याचे zoom वर online classes सुरू कराच.. एकदम डिमांडमधे रहातील.

उद्या जातेय ps2 बघायला. बर्‍याच मित्र मैत्रिणींना दीक्षा दिली आहे. Feeling proud Happy उद्या संध्याकाळी येथे येऊन आणि स्वाती ताई च्या धाग्यावर हजेरी लावणार आहे. तो धागा अजून कसाबसा वाचायचे टाळतेय. बाकी गृहपाठ करून झालाय Happy हाही धागा वाचला नाहिये. रुमाल टाकला आहे.

हरचंद धन्यवाद या माहिती बद्दल. अजून पूर्ण वाचली नाही, नावे अशी आहेत की लक्षात ठेवायला जड जातंय. नीट उजळणी करत परत वाचेन माहिती आणि परत PS1 बघेन.

>>> प्रत्येक देशांत "राजा" याच्या वरचे एखादे नामाभिदान कधीतरी तयार झालेच. सम्राट, एम्परर्/एम्प्रेस ई असते तसे इथे "राजराजा" दिसते.
अ‍ॅक्च्युअली इथे ते चक्रवर्ती असं आहे. राजराजा ही उपाधी फक्त एकट्या अरुल्मोळीचीच. Happy

>>> नामाभिदान
नामाभिधान Happy

(वर्मा/शर्मा हे प्रत्यय क्षत्रियांच्या नावांना, तर गुप्त ही उपाधी वैश्यांच्या नावांना लागत असे असं मोल्सवर्थ म्हणतो.)

नामाभिधान >>> थँक्यू. लिहील्यावर जाणवत होते काहीतरी गल्ली चुकली आहे Happy

ओह ते वर्माचे वर्मन झाले असावे मग. आणि मग बर्मन.

मी स्वातीचा आधीचा लेख वाचला होता तोही मला पुरला होता बघताना. ही तर एकदम पर्फेक्ट माहिती आहे, म्हणजे २१ अपेक्षित सारखी Happy सिनेमा समजायला आणि एन्जोय करायला पुरेशी आहे Happy
सिनेमा पाहिल्यानंतर मी चोलांबद्दल अजून शोधून शोधून वाचले. ( बायदवे उच्चार चोल असा आहे की चोळ? Chozh असे स्पेल करतात का?)
गुप्त , मौर्य, मुघल्स आणि आपण महाराष्ट्रात असल्यामुळे मराठ्यांचा इतिहास आपण वाचतो पण दक्षिणेतली विजयनगर, चोल, पंड्या, पल्लव या साम्राज्यांबद्दल आपल्याला काहीच कसे नव्हते इतिहासात?!
हपा आणि स्वातीची हरकत नसल्यास मी जे थोडे वाचले ते लिहीन इथेच.

नाही नाही, हरकत काय - उलट हा लेख नसून चर्चाप्रस्ताव आहे असं समजा आणि माहितीत दुरुस्त्या किंवा भर सुचवा. Happy

>>> Chozh असे स्पेल करतात का?
याचं उत्तर हपा जास्त चांगलं देऊ शकेल, कारण तो आता तमिळ अक्षरओळख करून घेतो आहे.
पण त्या zh अक्षराचा उच्चार आपल्या मराठीतल्या ळ आणि ड यांच्यामधला काहीतरी आहे.

<<पण त्या zh अक्षराचा उच्चार आपल्या मराठीतल्या ळ आणि ड यांच्यामधला काहीतरी आहे.>> हो, तमिळ आणि मल्याळम दोन्हीत तसा आहे.

वंद्यतेवनाच्या ‘वानर’कुळाचा मराठी अर्थाने वानरांशी संबंध नाही. हे वन कूळ. Happy

हे मुद्दाम सांगायचा उद्देश, मला हे स्वतः राज्याभिलाषा नसलेलं निष्ठावंत आणि शूर, तसंच प्रोटेक्टिव पात्र अगदी हनुमंतासारखं वाटलं होतं, ते बहुधा त्या कुळाच्या नावामुळे. Happy

तर मी वाचले ते थोडक्यात असे: ( तसे पुस्तके वगैरे नाही वाचलेली तर सर्व नेट वर रँडम लिन्क्स शोधून वाचले आहे त्यामुळे चुका असल्यास सुधाराव्या!)
१० व्या शतकाच्या आधी चोल राज्य म्हणजे साधारण आताचे तमिळनाडू आणि कावेरीच्या आजू बा़जूचा प्रदेश असा होता. पंड्या म्हणजे केरळात आणि पल्लव म्हणजे तेलंगणा आणि ओडिशा भागात होते , या ३ साम्राज्यांमधे चुरस होती. अकराव्या शतकात राजराजा आणि त्याच्या मुलाच्या राजेन्द्र च्या कारकीर्दीत चोलांचे साम्राज्य सर्वात जास्त बहरले आणि वाढले. त्यांनी पल्लव आणि पंड्यांचा पराभव करून त्यांचे प्रदेश तर पादाक्रान्त केलेच शिवाय बलाढ्य आरमार आणि समुद्री मोहिमांद्वारे हिंदी महासागरावरही अधिपत्य गाजवले, आणि इंडोनेशिया, फिलिपीन्स, मलेशियाचा काही भाग , मालदीव , लक्ष्यद्वीप इ. भागात राज्य पसरवले होते. ब्रिटिशांनी जश्या वसाहती वसवून तिथल्या स्त्रोतांचा आणि साधनांचा उपयोग करून आपल्या राज्याला समृद्ध केले तसेच काहीसे चोलांनी तेव्हा केले. भारताबाहेरील मोहिमांमधे विशेषतः राजेन्द्राचे कॉन्ट्रिब्यूशन जास्त होते. असे म्हटले जाते की सिल्क रूट वरील व्यापारी जहाजे प्रवासात मलेशियाला थांबा घेत. राजेन्द्राच्या मलेशिया मोहिमेमागे त्या थांब्यांवर अधिपत्य निर्माण करून महसुलाद्वारे आपल्या राज्याला फायदा करून घेणे ही त्याची दूरदृष्टी होती. भारतीय नौदलाच्या एका अ‍ॅकेडमी ला राजेन्द्राचे नावही देण्यात आले आहे.
चोलांच्या कारकीर्दीत त्यांनी राज्यात बरीच अचंबित करणारी इन्फ्रास्ट्रक्चर उभारली होती. जसे धरणे, बांध, कालवे, तलाव, मोठे राजवाडे, मंदिरे वगैरे. त्यातले काही तलाव आणि कालवे अजूनही अस्तित्वात आहेत! मंदिरे तर आहेतच.
अजून इंटरेस्टिंग म्हणजे त्यांची राज्यकारभार आणि प्रशासन व्यवस्था पण खूप विकसित आणि प्रगत मानली जाते. राज्याचे आणि जमिनीचे रेकॉर्ड्स मेन्टेन करण्याची सिस्टिमॅटिक पद्धत त्यांच्याकडे होती. त्यांचे राज्य ९ मंडलात विभागले गेले होते. ( प्रोविन्सेस) प्रत्येक मंडलाला एक गवर्नर सारखा सरदार सांभाळायचा, ते लोक त्यांचे सैन्य मेन्टेन करत. प्रत्येक मंडलाला डिस्ट्रिक्ट्स मधे विभागले होती ज्यांना नाडू म्हणत. त्या नाडूंच्या प्रशासनांना त्या त्या भागतल्या कारभाराची स्वायत्तता होती! खेड्यात पण आपल्या पंचायत सिस्टीमसारखी पद्धत होती. म्हणजे थोडक्यात केन्द्रशासित कारभार असला तरी स्थानिक संस्थांना स्वायत्ततासुद्धा, या सिस्टीम चा पाया घालण्याचे श्रेय राजराजाला दिले जाते.
नंतरच्या तिसर्‍या चौथ्या पिढीत म्हणजे तेराव्या शतकाच्या सुरुवातीस पंड्यां चा पुन्हा उदय झाला , त्याचबरोबर कर्नाटकातल्या होयसळांनीही दक्षिणेच्या साम्राज्यस्पर्धेत उडी घेतली, तसेच श्रीलंकेच्या सिंहला राजांनी देखिल उठाव केला. दुर्दैवाने त्यावेळचे चोल राज्यकर्ते राजराजा आणि राजेन्द्राइतके कर्तृत्ववान नसल्यामुळे चोलांची वेगाने पीछेहाट होत गेली आणि तेराव्या शतकाच्या शेवटापर्यन्त चोलांचा पूर्ण नायनाट झाला.

अरे, मस्त माहिती.

>>> १० व्या शतकाच्या आधी चोल राज्य म्हणजे साधारण आताचे तमिळनाडू आणि कावेरीच्या आजू बा़जूचा प्रदेश असा होता.
सिनेमात (आणि जर मला नीट आठवत असेल तर पुस्तकातही) कन्याकुमारी ते कृष्णा आणि तुंगभद्रा अशा सीमांचा उल्लेख आहे.

वर्मा शर्मा हे भौतेक वरमलेले, शरमलेले या अर्थाने असेल.

त्यांचे राज्य ९ मंडलात विभागले गेले होते >> नऊ खंड वाचले होते. ते यांचेच असावेत. हे खंड राखणारे खंडप्रमुख असत त्यांना खंडेराय किंवा खंडोबा म्हणत. आपल्याकडे जेजुरीचा खंडोबा होता तर खाली बालाजी.

रच्याकने, वंदियत्तेवनबद्दल ॲक्चुअल इतिहासाला त्याच्या अस्तित्वाविषयी काही माहिती नाही. तो होता, हे माहिती असण्याचं कारण म्हणजे राजराजाने बांधलेल्या तंजावूरच्या बृहदीश्वर मंदिरात कुंदवैच्या नावाने एक शिलालेख आहे, त्यात तिचा उल्लेख 'राजराजाची बहीण, वंदियत्तेवनाची पत्नी' इ. इ.‌ केलेला आहे. ह्याशिवाय त्याच्याबद्दल एक-दोन इतिहासकारांनी केलेलं स्पेक्युलेशन वगळता तो कोण, कुठला हे काहीच ठामपणे सांगता येत नाही, असं दिसतं. काही त्याला मूळ चालुक्य समजतात, तर काही मूळ राष्ट्रकूट, तर काही त्याला चोळांच्याच सामंतांपैकी एक मानतात. कल्की कृष्णमूर्तींनी त्याला वनकुळातील मानून शेवटी तर त्यालाच आपल्या प्रतिभेने 'स्टार' बनवलं, अशी ही कमाल!

पंड्या ==> पाण्ड्य पाहिजे.

बाकी मैत्रेयीने चोळांची माहिती सुंदर लिहीली आहे.
माझे दोन पैसे-
चोळांची नाविक शक्ती उत्तम होती व त्यांच्या कारकिर्दीत चीनपर्यंत व्यापार सुरू झाला.
तंजावूरजवळील बृहदीश्वर मंदिर चोळांनी बनवले आहे.
राजराजेंद्रच्या वंशजाने बंगालच्या खाडीतून नाविक सैन्य हलवून उत्तरेतील एक राज्य काबिज केले व गंगैकोण्ड - गंगेवर विजय मिळवणारा ही पदवी धारण केली.

या धाग्याला नाव वेगळे दिले पाहिजे आता. पोन्नियन सेल्वन ( कावेरीच्या लाडक्या) चोलांचा इतिहास असे काहीतरी Happy

चोळ.

चोल हिंदी झाले.

मराठी लोकांनी ळच म्हंटले पाहिजे कारण ते सर्वात जास्त जवळ आहे.

चोल चोल म्हणून कृपया हिंदीकरण करू नका.

चोळ.

आपल्या इतिहासाच्या पुस्तकांत देखील चोळच आहे.

चोळ म्हणा. चोल नको.

वर्तमानपत्रांनी, वाहिन्यांनी लाजा सोडल्याच आहेत. आपण तरी किमान ळ हे अक्षर टिकवून ठेवायचा प्रयत्न करू.

ज्यांनी नाही पाहिला त्यांनी-
कृपया चित्रपट बघू नका... यू विल थँक मी लेटर... टोटल टाईम वेस्ट आहे.. त्यापेक्षा बाहुबली पुन्हा बघा....

छान चर्चा चालू आहे. सर्वांचेच आभार. Maitreyee आणि भा, सुंदर माहिती. अनेकांनी हे वाचून ps बघणार असं म्हटलं आहे, त्यांचे प्रतिसाद वाचून, हा धागा लिहिणं सार्थकी लागल्यासारखं वाटलं.

Chozh असे स्पेल करतात का >> होय. तमिळ आणि मलयाळम भाषेत २ ळ आहेत. एक आपल्या मराठीत आहे तसा, जिभेचे टोक मागे वळवून उच्चारलेला आणि दुसरा हा टोक मागे न वळवता. च छ ज म्हणताना आपण जसं टोक न वळवता जिभेचा मधला भाग टाळूला लावतो, साधारण तोच भाग वापरायचा पण ळ सारखा उच्चार करायचा. देवनागरीत तो ळ नसल्याने साधारण आपला ळच दोन्हीकडे लिहिला जातो. रोमन लिपीत तर ळ सुद्धा नाही. "The letter z is just a voiced alveolar fricative, so it stands to reason that the digraph "zh" would represent the voiced palatal fricative" असं एके ठिकाणी लिहिलं आहे. पण तमिळ भाषेत त्या अक्षरांना वेगवेगळी चिन्हं आहेत. अलप्पुळा, कोळीकोड या शहरांची नावं पण रोमन लिपीत Alappuzha, Kozhikode अशी लिहिली जातात.

तमिळ हा शब्द पण Tamizh असा लिहिला जातो कारण त्यात तो दुसरा ळ उच्चारायचा आहे. समोरचा म्हणत असतो, 'तमिळ से बात करो' आणि आपल्याला वाटतं 'तमिझ से बात करो'. मग आपण उगाच चिडून म्हणतो, "तू क्या समझा रे मेरकू? मैने कब अरेतुरे किया तेरकू?" Wink

छान चर्चा!

पोन्नियिन सेल्वन कादंबरीचे कल्की लिखित दोन प्रिक्वेल्सही आहेत. त्यांचा पोन्नियिन सेल्वनशी थेट संबंध नसला तरी कादंबरीतील चोळ-पल्लव-पांड्य डायनॅमिक्स या प्रिक्वेल्समध्ये क्लिअर केले आहेत.
१) शिवगामियिन शपथम (शिवगामीची शपथ) - पल्लव साम्राज्याचा उदय
२) पार्थिबन(का वन?) कनवु (पार्थिबनचे स्वप्न) - चोळांचा पडता काळ आणि त्यांच्या पुनरोदयाची पार्श्वभूमि, खासकरून पल्लवांशी त्यांचे संबंध.
या दोन्ही कादंबर्‍यांमध्ये फोकस पल्लव राजा नरसिंहवर्मनवर आहे पण दुसरी कादंबरी पोन्नियिनसाठी रंगभूमि तयार करते असे म्हणता येईल.

त्याशिवाय कल्कींनी दिलेल्या प्रोत्साहनाने कॉपीराईट संपल्यानंतर पोन्नियिनची पात्रे घेऊन पोन्नियिनचे सीक्वेल्स पण आहेत. हिअर मायलेज मे व्हेरी कारण मूळ लेखकाची शैली आणि प्रेरणा घेऊन केलेले लिखाण यात फरक जाणवतो. माझ्या माहितीनुसार पुढील तीन कादंबर्‍यांना बहुतांश तमिळ वाचक या मलिकेचा भाग म्हणून स्वीकारतात.
१) नंदिपुरतु नायगी(की?) (नंदिपुरची नायिका), लेखक वेंबु विक्रमन- कुंदवै आणि वंदियत्तेवनचे पुढे काय होते हा प्लॉट.
२) उदयर, लेखक बालकुमारन - राजराज चोळाचा राज्यकाळ. या कादंबरीत आपण प्रथम राजेंद्र चोळाला भेटतो.
३) वेंगईयिन मैंदन(? उच्चार चुकीचा असू शकतो) (वेंगई/वेंगीचा मेव्हणा), लेखक अकिलन - राजेंद्र चोळाचा राज्यकाळ, खासकरून त्याच्या कादरम् (आजचे मलेशियातील केदाह) आणि उत्तर भारतातील स्वार्‍या. नायक/मुख्य पात्र कोदंबळुरचा राजकुमार इळंगो(उच्चार?) (सुंदर चोळाची बायको वानमादेवी कोदंबळुरची असते).साहित्य अकादमी पुरस्कार विजेते.

Pages