कानात “बसलेले” संगीत

Submitted by हेमंतकुमार on 10 April, 2023 - 21:52

मनाला रिझवणाऱ्या गोष्टींमध्ये संगीताचे स्थान फार वरचे आहे. व्यक्तीगणिक संगीताची आवड वेगवेगळी असते, परंतु कुठलेच संगीत न आवडणारा माणूस मात्र विरळाच. वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनेक प्रकारे आपण संगीत ऐकत असतो - मग ती विविध संगीतप्रसारक श्रवणमाध्यमे असतील किंवा प्रत्यक्ष संगीताची मैफिल. कधी आपण शुद्ध वाद्यसंगीत ऐकतो तर बऱ्याचदा गीत आणि संगीताचा सुरेख संयोगही ऐकतो. यांच्या जोडीला अजून एक संगीताचा प्रकार आपल्या कानावर वारंवार पडतो आणि तो म्हणजे संगीतमय जाहिराती. तर अशा अनेक प्रकारचे संगीत ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे होतो.

दर काही वर्षांनी आपण नवी गाणी ऐकतो आणि त्याचबरोबर जुनी गाणी देखील पुन्हा पुन्हा ऐकली जातातच. अशा आपल्या श्रवणभक्तीतून काही ठराविक गाण्यांवर आपले अवीट प्रेम जडते. ध्यानीमनी नसताना जेव्हा असे एखादे गाणे आपल्याला कुठल्याही प्रसारमाध्यमातून अचानक ऐकू येते तेव्हा होणारा आनंद वर्णनातीत असतो. मग आपण ते गाणे तन्मयतेने ऐकतो. ते गाणे संपते परंतु आपल्या मनात बसलेली त्याची धून मात्र चांगल्यापैकी तेवत असते. मग आपण ती धून किंवा गाण्याचे शब्द देखील गुणगुणत राहतो. हा अनुभव बऱ्यापैकी सार्वत्रिक आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत अशी संगीताची धून डोक्यात राहण्याचा परिणाम सकारात्मक असतो. त्यातून आपल्याला दैनंदिन कामे करताना एक प्रकारचा उत्साह वाटतो किंवा आपल्यात जोश देखील संचारतो. त्या जोशात आपण कधीकधी आपल्या आसपासच्या व्यक्तींना देखील त्या गाण्याच्या लयीत सामावून घ्यायला बघतो. साधारणपणे आवडत्या गाण्याबाबतचा असा अनुभव ते गाणे संपल्यानंतर काही तास टिकतो. परंतु काहींच्या बाबतीत तो अक्षरशः दिवसभर देखील राहतो. बहुतेकदा अशी गाणी स्वरमधुर आणि/ किंवा तालबद्ध असतात.

इथपर्यंत जे लिहिलंय त्याच्याशी आपल्यातील बहुतेक जण सहमत होतील. कदाचित काही जण आपापल्या आवडत्या गाण्याची एखादी धून देखील मनात गुणगुणू लागतील. पण त्याचबरोबर वाचकांच्या मनात असा प्रश्नही आला असेल, की या सर्वसामान्य सुखद भावनेची आठवण करून देण्यात लेखकाचा काय हेतू असावा ?

सांगतो...
आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट आपण जमेल तितकी वारंवार करतो त्याचप्रमाणे आवडणाऱ्या संगीताची धूनही वारंवार मनात गुणगुणली जाते. परंतु ही वारंवारिता सुखद राहण्याला एक मर्यादा असते. ती जर का ओलांडून एकच एक कृती नको इतक्या वेळा (कळत/नकळत) होत राहिली तर तो प्रकार त्रासदायक ठरु शकतो.

मग एक वेळ अशी येते, की संबंधित माणूस ते गाणे गुणगुणत नसला तरीही त्या संगीताची धून त्याच्या नकळत त्याच्यावर गारुड करते आणि मनाला सतत छळत राहते. आता ही सुखद गुणगुण राहिलेली नसून ती नको असलेली भुणभुण ठरते. अशा स्थितीला सामान्य भाषेत कानभुंगा (earworm) म्हणतात तर मानसशास्त्राच्या परिभाषेत त्याला ‘डोक्यात रुतून बसलेले संगीत’(stuck song syndrome) असे गोंडस नाव आहे.

व्यावसायिक संगीतकारांच्या बाबतीत हा प्रकार सामान्य माणसापेक्षाही अधिक प्रमाणात होतो. साधारणतः सामान्य माणूस जास्त करून गाण्याचे ध्रुवपदच आळवत बसतो. परंतु संगीतकाराच्या मनात गाण्याच्या अनेक ओळी बिनचूक वारंवार गुणगुणल्या जातात. अर्थात त्यांच्या बाबतीत असे होणे हे कला-नवनिर्मितीसाठी उपयुक्तच ठरते; ते त्रास वाटण्याच्या पातळीवर सहसा जात नाही.

आता आपण सामान्य माणसाच्या बाबतीत होणाऱ्या कानभुंगा या अवस्थेची काही वैशिष्ट्ये पाहू :
१. या अवस्थेचे प्रमाण हे त्या व्यक्तीच्या संगीत ऐकण्याच्या प्रमाणाशी थेट निगडित आहे. जे लोक दिवसातील अनेक तास मन लावून संगीत ऐकतात आणि त्याचे अर्थपूर्ण आकलन करून घेतात, त्यांच्या बाबतीत ही घटना अधिक प्रमाणात दिसते.

२. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एखादे गाणे ऐकून संपल्यावर लगेचच ही अवस्था येत नाही परंतु त्यानंतर काही तासांनी ती उद्भवते.

३. काही गाणी ही माणसाच्या आयुष्यातील काही ठराविक घटनांशी निगडित झालेली असतात.
उदाहरणार्थ,
“मी परीक्षेला निघालो होतो तेव्हा घरून निघताना माझी १५ नंबरची बस चुकली होती आणि त्याच वेळेस बसथांब्या शेजारच्या घरातील रेडिओवरून ‘ते’ गाणे लागलेले होते”, इ.

काही गाणी ही आनंद किंवा वेदनेच्या प्रसंगाशी देखील निगडित असू शकतात. त्यातून अशा गाण्यांची मेंदूमध्ये एक घटनाधारित स्मृती कोरली जाते. पुढील आयुष्यात जेव्हा केव्हा ते गाणे अकस्मात ऐकू येते तेव्हा ते गाणे आणि पूर्वायुष्यातील संबंधित घटना यांची सांगडही सतत घातली जाते. मग ते गाणे आणि त्या घटनेची स्मृती असा 'मिश्रभुंगा' मनाला सतावू शकतो.

४. कानभुंगा जेव्हा काही तास किंवा फार तर त्या दिवसापुरता मर्यादित राहतो तोपर्यंत काळजीचे कारण नसते. परंतु काहींच्या बाबतीत हा भुंगा पुढे विस्तारत अगदी आठवड्यापर्यंत टिकतो. त्याची वारंवारिता जर फारच वाढली तर मग मूळ गाण्याचा अर्थ किंवा त्यातील स्वरमाधुर्य देखील हरवून गेलेले असते; जाणवते ती फक्त त्रस्तता.

५. अशा वेळेस मात्र संबंधिताच्या दैनंदिन घरगुती आणि व्यावसायिक कामावर देखील परिणाम व्हायला लागतो. तसेच झोप लागण्यातही या भुंग्याचा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

६. कानभुंग्याने त्रस्त असलेल्या व्यक्तींचा मानसशास्त्रीय अभ्यासही झालेला आहे. साधारणतः अशी माणसे झपाटल्यासारखी वागत असतात. त्यांच्या मनात बऱ्याचदा विचारांचे असंतुलन होते. एखाद्या घटनेनंतर त्यातला त्रासदायक भाग मनात घोळवत बसण्याकडे त्यांचा कल असतो. बऱ्याचदा अशी माणसे त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा व्यावसायिक कामांमध्ये कुठेतरी कमी पडत असतात आणि ही जाणीव त्यांना अस्वस्थ करत असते. सहसा अशी माणसे मानसिकदृष्ट्या ताठर प्रवृत्तीची असतात.

७. काही मनोविकारांमध्ये कानभुंग्याची समस्या तीव्रतेने जाणवते. असा एक परिचित विकार म्हणजे कृतीचे झपाटलेपण अर्थात OCD. अशा व्यक्तींच्या बाबतीत ताणतणावाच्या प्रसंगी कानभुंगा अधिक सतावतो. या मुद्दयावरील विवेचन या लेखाच्या कक्षेबाहेरचे आहे.

कानभुंगा घालवण्याचे उपाय

जेव्हा एखादे गाणे कानसुखाची मर्यादा ओलांडून भुंग्यासारखे मागे लागते तेव्हा सामान्य माणसासाठी काही साधे सोपे उपाय करून बघता येतात :
१. एकाच प्रकारचे संगीत दीर्घकाळ न ऐकणे; संगीतप्रेमी व्यक्तींनी त्यात सतत विविधता आणत राहायची. एखाद्या ॲपवरून जर ठराविक गाणी रोज ऐकण्याची सवय असेल, तर त्यात गाणी ‘पिसण्याचा’ जो पर्याय दिलेला असतो तो जरूर वापरायचा.
२. एका बैठकीत गाणी ऐकायला अगदी शिस्तीत वेळमर्यादा घालून घ्यायची.

३. कानभुंगा सतावू लागला की सरळ उठून ‘चालायला’ लागायचे. आपल्या आवडत्या गाण्याची एक विशिष्ट तालगती असते. त्या गतीपेक्षा एकतर खूप हळू किंवा खूप भरभर चालू लागायचे.
४. गाण्याचे फक्त ध्रुपद आळवत बसण्यापेक्षा एकदाच संपूर्ण गाणे शांतपणे आणि समजून ऐकायचे. साधारणपणे ध्रुपद किंवा गाण्याचे ‘तुकडे’ ऐकण्याची स्मृती मेंदूत खूप लवकर उमटते. त्या तुलनेत संपूर्ण गाणे लक्षात ठेवणे ही अवघड क्रिया आहे.

५. हातातले काम बाजूला ठेवून कुठले तरी पूर्णपणे वेगळे काम, वाचन किंवा अन्य छंदाकडे वळायचे. घरगुती पातळीवर, मटार सोलणे किंवा बारीक पानांची पालेभाजी निवडणे या कृती सुद्धा खूप उपयुक्त ठरतात.

६. च्युइंगम चघळत बसणे. आपण ती चघळण्याची किंवा चावण्याची क्रिया मन लावून करू लागलो की मग गाण्याच्या स्मृतीपटलाला बऱ्यापैकी धक्का लागतो.
. . .

आता जरा व्यक्तिगत लिहितो. लहानपणापासून अनेक वर्षे ऐकलेली काही गाणी आणि संगीतमय जाहिराती माझ्या कानात बसलेल्या आहेत. अर्थातच त्या कानसुख आणि गानसुख या पातळीवरच आहेत ! शालेय जीवनात रेडिओ हे मुख्य करमणुकीचे साधन होते. विविध भारतीवरील अनेक जाहिराती सुद्धा आयुष्याचा भाग बनून गेल्यात. सकाळी अंघोळ करण्याच्या वेळेस साडेआठच्या दरम्यान लागणारी ‘निरमा वॉशिंग पावडर’ची जाहिरात हे त्यातले ठळक उदाहरण.

nirma.jpg

दर 24 तासांनी त्या जाहिरातीची मनातल्या मनात उजळणी होई. त्यातली,
“जया और सुषमा,
सबकी पसंद है निरमा”,

ही ओळ ऐकून ऐकून मनातल्या मनात एकेक जया आणि सुषमा देखील कल्पिल्या गेल्यात. Happy
भले मी निरमाचा ग्राहक नसेना का, परंतु त्या जाहिरातगीताची गानस्मृती मात्र अगदी डोक्यात चिकटून गेली अन आयुष्याचा एक कायमचा भाग बनून गेली.

एकदा शाळेत जायला उशीर झाला होता आणि शाळेजवळ पोहोचलो तेव्हा ध्वनीवर्धकावर
“हे ये जो मोहब्बत है
ये उनका है काम..”

हे कटीपतंगमधले प्रसिद्ध गाणे लागलेले होते. ते ऐकत ऐकत पावले झपझप पडत होती. शाळेत उशीर झाल्याबद्दल दारातच गुरुजींच्या छड्या खाव्या लागणार आहेत याची कल्पना होतीच आणि तसेच झाले. आजही हे गाणे जेव्हा अचानक ऐकू येते तेव्हा मनाने मी शाळेत गेलेलो असतो आणि छडीच्या वेदनेसह तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. आता इतकी वर्षे सरल्यानंतर त्याच्याकडे स्मरणरंजनातून पाहता येते.

दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास अनेक ठिकाणांहून ‘रिमझिम गिरे सावन’ हे गीत ऐकू येऊ लागते. आपल्या संस्थळावरील या गाण्यासंबंधीचे धागे देखील टपकन वर येतात आणि मग मनच अगदी रिमझिम होऊन जाते. जाता येता ते गाणे कुठे बाहेर ऐकले रे ऐकले की काही वेळाने बोटे आपोआप युट्युबकडे वळतात. मग किशोर आणि लता अशा दोघांच्या आवाजातील ती स्वतंत्र गाणी लागोपाठ ऐकल्यावरच तृप्तीने निथळतो.

पावसाळ्यातच येणाऱ्या गणेशोत्सवात विविध भक्तीगीते मोठ्या आवाजात दिवस-रात्र कानावर पडत राहतात आणि मग त्यांचीही एक सुखदस्मृती मनावर कोरली जाते. यामध्ये वाडकरांचे ओंकार स्वरूपा आहे, गानकोकिळेच्या स्वरातील विविध गणेशवंदना आहेत आणि आशाताईंचे रामा रघुनंदना सुद्धा आहे. त्या संपूर्ण महिनाभर या गाण्यांच्या धून व मोजके शब्द डोक्यात जवळजवळ दिवसभर झनकत राहतात. ही काहीशी गानव्यसनाचीच अवस्था असते. अशा काही गाण्यांच्या विविध प्रसंगांशी जडलेल्या स्मृती नक्कीच आनंददायी आहेत.

मात्र आयुष्यातील काही मोजक्या वेळा मी कानभुंग्याची अवस्था अनुभवली आहे- विशेषतः परदेशात एकटे राहत असताना. त्या वास्तव्यात घरी असताना संगीताला सोबती करून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर वाद्यसंगीत ऐकता ऐकताच झोपी जाण्याची सवय जडली होती. तेव्हा कधीकधी एखाद्या धुनेने डोक्यात अगदी थैमान घातलेले असायचे आणि मग त्या रात्री झोप लागायला बऱ्यापैकी त्रास व्हायचा. अर्थात हे त्या रात्रीपुरतेच टिकायचे. पुढे त्याची कधी समस्या झाली नाही.
. . .

मित्रहो,
तुमच्यापैकी बरेच जण कानसेन असतील तर काहीजण तानसेन सुद्धा असू शकतील. तुमच्या आवडत्या गाण्यांबद्दल काय अनुभव आहेत तुमचे ? त्यांच्याशी निगडित काही व्यक्तिगत आठवणी नक्कीच असतील. आवडत्या गाण्यांचे कानसुख घेता घेता तुम्ही कधी कानभुंग्याने सतावला गेला होतात का?

प्रतिसादांमधून जरूर लिहा. वाचण्यास, नव्हे ऐकण्यास उत्सुक !
****************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुंग्यापासून थोडे अवांतर जाऊन आपल्याला तल्लीन करणाऱ्या काही गाण्यांबद्दलही लिहावेसे वाटते.

त्यापैकी एक म्हणजे आशाबाईंनी गायलेले हे भजन :
“तोरा मन दर्पण कहलाए . . . “
आणि त्यातल्या खालच्या ओळी तर आपल्याला तल्लीनतेच्या उच्चतम पातळीवर नेऊन ठेवतात..
. . . जग से चाहे भाग ले कोई
मन से भाग ना पाए . . .

हे गाणे ऐकताना एक जाणवते की त्यात संगीताने एकाही शब्दाला खाऊन टाकलेले नाही. प्रत्येक शब्द अगदी सुस्पष्ट ऐकू येतो. म्हणूनच हे गाणे माझे अनेक वर्षांपासून लाडके आहे. अशा तल्लीनतेमुळे असे गाणे ऐकून संपले की त्यानंतर त्याचे ध्रुपद आणि निवडक ओळी आपण वारंवार आवडीने गुणगुणत राहतो.

लवेरिया !
आज कित्येक वर्षांनी विविध भारतीवर खालील गाणे ऐकले :
सर्दी खासी ना मलेरिया हुआ. . लवेरिया हुआ .. . लवेरिया हुआ .. .

1990 च्या दशकात या गाण्यावर तरुणाई थिरकताना पाहिलेली आठवते. त्याकाळी मात्र ते अगदी “कानात बसलेले” गाणे होते. त्यातल्या लवेरिया या शब्दामुळे ते लक्षणीय ठरले होते.

काल खूप महिन्यांनी
मृदुल करांनी छेडित तारा . . .

हे गाणे रेडिओवर ऐकले आणि मग काही तास मस्तपैकी त्याचे पारायण करत बसलो. अत्यंत आवडते.

हे गाणे आवडत असल्यास इथली माहिती (blog) अतिशय वाचनीय आहे : https://www.aathavanitli-gani.com/Song/Mrudul_Karani_Chedit_Tara

सामो,
आणि संगीतकार दशरथ पुजारी. सर्वच मंडळी थोर आहेत !
योगायोग बघा - आताच 28 जानेवारीला सुमन कल्याणपुर यांचा ८९ वा वाढदिवस साजरा झाला Happy

युट्युबवरील त्या गाण्यात जोडीला शब्दही दिले आहेत. त्यामुळे ऐकताना आनंद द्विगुणीत होतो.

ब्लॉग छान आहे. हे प्रमोद रानडे म्हणजे गायक प्रमोद रानडेच ना? हृषिकेश रानडेचे वडील?

आज फारा दिवसांनी ‘हमें और जीने की चाहत ना होती, अगर तुम ना होते’ हे गाणे ऐकले.
सालं, वेड लावतं हे गाणं.
कितीही वेळा ऐका

* ‘हमें और जीने की चाहत ना होती
>>> क्या बात है ! मस्त गाणे आहे हे ! 👌

तुमचा प्रतिसाद वाचून त्याची संपूर्ण पाचही कडवी वाचून काढली आणि ऐकली पण.
गुलशन बावरा-आरडी-किशोर-लता असा सुवर्णसंगम आहे तो ! 👌
धन्स . . .

काल संध्याकाळी खूप वर्षांनी,
बिन तेरे सनम मर मिटेंगे हम, आ मेरी जिंदगी
आना ही पडा सजना . . .

हे गाणे अचानक ऐकण्यात आले आणि मग काही तास भुंग्यासम अवस्था झाली होती खरी.
एकेकाळी या गाण्याने मला वेड लावले होते.

>>>>> “ बिन तेरे सनम मर मिटेंगे हम, आ मेरी जिंदगी
आना ही पडा सजना . . .

आहाहा!! तब तरुण थी मय. त्या दिवसांना चक्क सुगंध होता. तो सुगंध येतो मला हे गाणे लागले की.
.
अजुन एक-
बेलिया ये तूने क्या किया साथिया ये तूने क्या किया,
मैने किया तेरा इन्तजार..... इतना करो ना मुझे प्यार ...

त्या गाण्यात तेव्हा मी असे Happy हिरॉइनच्या जागी.

*त्या दिवसांना चक्क सुगंध होता
>>>> वा ! सुगंधी प्रतिसाद आवडला. या गाण्याचे विडंबन म्हणून मी एक आरोग्यविषय घेऊन लिहायचा प्रयत्न केला होता. परंतु ते हस्तलिखित कुठेतरी हरवले.
. . .
*बेलिया ये तूने क्या किया
>>> ही आठवण पण मस्त !

Pages