
मनाला रिझवणाऱ्या गोष्टींमध्ये संगीताचे स्थान फार वरचे आहे. व्यक्तीगणिक संगीताची आवड वेगवेगळी असते, परंतु कुठलेच संगीत न आवडणारा माणूस मात्र विरळाच. वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनेक प्रकारे आपण संगीत ऐकत असतो - मग ती विविध संगीतप्रसारक श्रवणमाध्यमे असतील किंवा प्रत्यक्ष संगीताची मैफिल. कधी आपण शुद्ध वाद्यसंगीत ऐकतो तर बऱ्याचदा गीत आणि संगीताचा सुरेख संयोगही ऐकतो. यांच्या जोडीला अजून एक संगीताचा प्रकार आपल्या कानावर वारंवार पडतो आणि तो म्हणजे संगीतमय जाहिराती. तर अशा अनेक प्रकारचे संगीत ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे होतो.
दर काही वर्षांनी आपण नवी गाणी ऐकतो आणि त्याचबरोबर जुनी गाणी देखील पुन्हा पुन्हा ऐकली जातातच. अशा आपल्या श्रवणभक्तीतून काही ठराविक गाण्यांवर आपले अवीट प्रेम जडते. ध्यानीमनी नसताना जेव्हा असे एखादे गाणे आपल्याला कुठल्याही प्रसारमाध्यमातून अचानक ऐकू येते तेव्हा होणारा आनंद वर्णनातीत असतो. मग आपण ते गाणे तन्मयतेने ऐकतो. ते गाणे संपते परंतु आपल्या मनात बसलेली त्याची धून मात्र चांगल्यापैकी तेवत असते. मग आपण ती धून किंवा गाण्याचे शब्द देखील गुणगुणत राहतो. हा अनुभव बऱ्यापैकी सार्वत्रिक आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत अशी संगीताची धून डोक्यात राहण्याचा परिणाम सकारात्मक असतो. त्यातून आपल्याला दैनंदिन कामे करताना एक प्रकारचा उत्साह वाटतो किंवा आपल्यात जोश देखील संचारतो. त्या जोशात आपण कधीकधी आपल्या आसपासच्या व्यक्तींना देखील त्या गाण्याच्या लयीत सामावून घ्यायला बघतो. साधारणपणे आवडत्या गाण्याबाबतचा असा अनुभव ते गाणे संपल्यानंतर काही तास टिकतो. परंतु काहींच्या बाबतीत तो अक्षरशः दिवसभर देखील राहतो. बहुतेकदा अशी गाणी स्वरमधुर आणि/ किंवा तालबद्ध असतात.
इथपर्यंत जे लिहिलंय त्याच्याशी आपल्यातील बहुतेक जण सहमत होतील. कदाचित काही जण आपापल्या आवडत्या गाण्याची एखादी धून देखील मनात गुणगुणू लागतील. पण त्याचबरोबर वाचकांच्या मनात असा प्रश्नही आला असेल, की या सर्वसामान्य सुखद भावनेची आठवण करून देण्यात लेखकाचा काय हेतू असावा ?
सांगतो...
आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट आपण जमेल तितकी वारंवार करतो त्याचप्रमाणे आवडणाऱ्या संगीताची धूनही वारंवार मनात गुणगुणली जाते. परंतु ही वारंवारिता सुखद राहण्याला एक मर्यादा असते. ती जर का ओलांडून एकच एक कृती नको इतक्या वेळा (कळत/नकळत) होत राहिली तर तो प्रकार त्रासदायक ठरु शकतो.
मग एक वेळ अशी येते, की संबंधित माणूस ते गाणे गुणगुणत नसला तरीही त्या संगीताची धून त्याच्या नकळत त्याच्यावर गारुड करते आणि मनाला सतत छळत राहते. आता ही सुखद गुणगुण राहिलेली नसून ती नको असलेली भुणभुण ठरते. अशा स्थितीला सामान्य भाषेत कानभुंगा (earworm) म्हणतात तर मानसशास्त्राच्या परिभाषेत त्याला ‘डोक्यात रुतून बसलेले संगीत’(stuck song syndrome) असे गोंडस नाव आहे.
व्यावसायिक संगीतकारांच्या बाबतीत हा प्रकार सामान्य माणसापेक्षाही अधिक प्रमाणात होतो. साधारणतः सामान्य माणूस जास्त करून गाण्याचे ध्रुवपदच आळवत बसतो. परंतु संगीतकाराच्या मनात गाण्याच्या अनेक ओळी बिनचूक वारंवार गुणगुणल्या जातात. अर्थात त्यांच्या बाबतीत असे होणे हे कला-नवनिर्मितीसाठी उपयुक्तच ठरते; ते त्रास वाटण्याच्या पातळीवर सहसा जात नाही.
आता आपण सामान्य माणसाच्या बाबतीत होणाऱ्या कानभुंगा या अवस्थेची काही वैशिष्ट्ये पाहू :
१. या अवस्थेचे प्रमाण हे त्या व्यक्तीच्या संगीत ऐकण्याच्या प्रमाणाशी थेट निगडित आहे. जे लोक दिवसातील अनेक तास मन लावून संगीत ऐकतात आणि त्याचे अर्थपूर्ण आकलन करून घेतात, त्यांच्या बाबतीत ही घटना अधिक प्रमाणात दिसते.
२. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एखादे गाणे ऐकून संपल्यावर लगेचच ही अवस्था येत नाही परंतु त्यानंतर काही तासांनी ती उद्भवते.
३. काही गाणी ही माणसाच्या आयुष्यातील काही ठराविक घटनांशी निगडित झालेली असतात.
उदाहरणार्थ,
“मी परीक्षेला निघालो होतो तेव्हा घरून निघताना माझी १५ नंबरची बस चुकली होती आणि त्याच वेळेस बसथांब्या शेजारच्या घरातील रेडिओवरून ‘ते’ गाणे लागलेले होते”, इ.
काही गाणी ही आनंद किंवा वेदनेच्या प्रसंगाशी देखील निगडित असू शकतात. त्यातून अशा गाण्यांची मेंदूमध्ये एक घटनाधारित स्मृती कोरली जाते. पुढील आयुष्यात जेव्हा केव्हा ते गाणे अकस्मात ऐकू येते तेव्हा ते गाणे आणि पूर्वायुष्यातील संबंधित घटना यांची सांगडही सतत घातली जाते. मग ते गाणे आणि त्या घटनेची स्मृती असा 'मिश्रभुंगा' मनाला सतावू शकतो.
४. कानभुंगा जेव्हा काही तास किंवा फार तर त्या दिवसापुरता मर्यादित राहतो तोपर्यंत काळजीचे कारण नसते. परंतु काहींच्या बाबतीत हा भुंगा पुढे विस्तारत अगदी आठवड्यापर्यंत टिकतो. त्याची वारंवारिता जर फारच वाढली तर मग मूळ गाण्याचा अर्थ किंवा त्यातील स्वरमाधुर्य देखील हरवून गेलेले असते; जाणवते ती फक्त त्रस्तता.
५. अशा वेळेस मात्र संबंधिताच्या दैनंदिन घरगुती आणि व्यावसायिक कामावर देखील परिणाम व्हायला लागतो. तसेच झोप लागण्यातही या भुंग्याचा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
६. कानभुंग्याने त्रस्त असलेल्या व्यक्तींचा मानसशास्त्रीय अभ्यासही झालेला आहे. साधारणतः अशी माणसे झपाटल्यासारखी वागत असतात. त्यांच्या मनात बऱ्याचदा विचारांचे असंतुलन होते. एखाद्या घटनेनंतर त्यातला त्रासदायक भाग मनात घोळवत बसण्याकडे त्यांचा कल असतो. बऱ्याचदा अशी माणसे त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा व्यावसायिक कामांमध्ये कुठेतरी कमी पडत असतात आणि ही जाणीव त्यांना अस्वस्थ करत असते. सहसा अशी माणसे मानसिकदृष्ट्या ताठर प्रवृत्तीची असतात.
७. काही मनोविकारांमध्ये कानभुंग्याची समस्या तीव्रतेने जाणवते. असा एक परिचित विकार म्हणजे कृतीचे झपाटलेपण अर्थात OCD. अशा व्यक्तींच्या बाबतीत ताणतणावाच्या प्रसंगी कानभुंगा अधिक सतावतो. या मुद्दयावरील विवेचन या लेखाच्या कक्षेबाहेरचे आहे.
कानभुंगा घालवण्याचे उपाय
जेव्हा एखादे गाणे कानसुखाची मर्यादा ओलांडून भुंग्यासारखे मागे लागते तेव्हा सामान्य माणसासाठी काही साधे सोपे उपाय करून बघता येतात :
१. एकाच प्रकारचे संगीत दीर्घकाळ न ऐकणे; संगीतप्रेमी व्यक्तींनी त्यात सतत विविधता आणत राहायची. एखाद्या ॲपवरून जर ठराविक गाणी रोज ऐकण्याची सवय असेल, तर त्यात गाणी ‘पिसण्याचा’ जो पर्याय दिलेला असतो तो जरूर वापरायचा.
२. एका बैठकीत गाणी ऐकायला अगदी शिस्तीत वेळमर्यादा घालून घ्यायची.
३. कानभुंगा सतावू लागला की सरळ उठून ‘चालायला’ लागायचे. आपल्या आवडत्या गाण्याची एक विशिष्ट तालगती असते. त्या गतीपेक्षा एकतर खूप हळू किंवा खूप भरभर चालू लागायचे.
४. गाण्याचे फक्त ध्रुपद आळवत बसण्यापेक्षा एकदाच संपूर्ण गाणे शांतपणे आणि समजून ऐकायचे. साधारणपणे ध्रुपद किंवा गाण्याचे ‘तुकडे’ ऐकण्याची स्मृती मेंदूत खूप लवकर उमटते. त्या तुलनेत संपूर्ण गाणे लक्षात ठेवणे ही अवघड क्रिया आहे.
५. हातातले काम बाजूला ठेवून कुठले तरी पूर्णपणे वेगळे काम, वाचन किंवा अन्य छंदाकडे वळायचे. घरगुती पातळीवर, मटार सोलणे किंवा बारीक पानांची पालेभाजी निवडणे या कृती सुद्धा खूप उपयुक्त ठरतात.
६. च्युइंगम चघळत बसणे. आपण ती चघळण्याची किंवा चावण्याची क्रिया मन लावून करू लागलो की मग गाण्याच्या स्मृतीपटलाला बऱ्यापैकी धक्का लागतो.
. . .
आता जरा व्यक्तिगत लिहितो. लहानपणापासून अनेक वर्षे ऐकलेली काही गाणी आणि संगीतमय जाहिराती माझ्या कानात बसलेल्या आहेत. अर्थातच त्या कानसुख आणि गानसुख या पातळीवरच आहेत ! शालेय जीवनात रेडिओ हे मुख्य करमणुकीचे साधन होते. विविध भारतीवरील अनेक जाहिराती सुद्धा आयुष्याचा भाग बनून गेल्यात. सकाळी अंघोळ करण्याच्या वेळेस साडेआठच्या दरम्यान लागणारी ‘निरमा वॉशिंग पावडर’ची जाहिरात हे त्यातले ठळक उदाहरण.
दर 24 तासांनी त्या जाहिरातीची मनातल्या मनात उजळणी होई. त्यातली,
“जया और सुषमा,
सबकी पसंद है निरमा”,
ही ओळ ऐकून ऐकून मनातल्या मनात एकेक जया आणि सुषमा देखील कल्पिल्या गेल्यात.
भले मी निरमाचा ग्राहक नसेना का, परंतु त्या जाहिरातगीताची गानस्मृती मात्र अगदी डोक्यात चिकटून गेली अन आयुष्याचा एक कायमचा भाग बनून गेली.
एकदा शाळेत जायला उशीर झाला होता आणि शाळेजवळ पोहोचलो तेव्हा ध्वनीवर्धकावर
“हे ये जो मोहब्बत है
ये उनका है काम..”
हे कटीपतंगमधले प्रसिद्ध गाणे लागलेले होते. ते ऐकत ऐकत पावले झपझप पडत होती. शाळेत उशीर झाल्याबद्दल दारातच गुरुजींच्या छड्या खाव्या लागणार आहेत याची कल्पना होतीच आणि तसेच झाले. आजही हे गाणे जेव्हा अचानक ऐकू येते तेव्हा मनाने मी शाळेत गेलेलो असतो आणि छडीच्या वेदनेसह तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. आता इतकी वर्षे सरल्यानंतर त्याच्याकडे स्मरणरंजनातून पाहता येते.
दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास अनेक ठिकाणांहून ‘रिमझिम गिरे सावन’ हे गीत ऐकू येऊ लागते. आपल्या संस्थळावरील या गाण्यासंबंधीचे धागे देखील टपकन वर येतात आणि मग मनच अगदी रिमझिम होऊन जाते. जाता येता ते गाणे कुठे बाहेर ऐकले रे ऐकले की काही वेळाने बोटे आपोआप युट्युबकडे वळतात. मग किशोर आणि लता अशा दोघांच्या आवाजातील ती स्वतंत्र गाणी लागोपाठ ऐकल्यावरच तृप्तीने निथळतो.
पावसाळ्यातच येणाऱ्या गणेशोत्सवात विविध भक्तीगीते मोठ्या आवाजात दिवस-रात्र कानावर पडत राहतात आणि मग त्यांचीही एक सुखदस्मृती मनावर कोरली जाते. यामध्ये वाडकरांचे ओंकार स्वरूपा आहे, गानकोकिळेच्या स्वरातील विविध गणेशवंदना आहेत आणि आशाताईंचे रामा रघुनंदना सुद्धा आहे. त्या संपूर्ण महिनाभर या गाण्यांच्या धून व मोजके शब्द डोक्यात जवळजवळ दिवसभर झनकत राहतात. ही काहीशी गानव्यसनाचीच अवस्था असते. अशा काही गाण्यांच्या विविध प्रसंगांशी जडलेल्या स्मृती नक्कीच आनंददायी आहेत.
मात्र आयुष्यातील काही मोजक्या वेळा मी कानभुंग्याची अवस्था अनुभवली आहे- विशेषतः परदेशात एकटे राहत असताना. त्या वास्तव्यात घरी असताना संगीताला सोबती करून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर वाद्यसंगीत ऐकता ऐकताच झोपी जाण्याची सवय जडली होती. तेव्हा कधीकधी एखाद्या धुनेने डोक्यात अगदी थैमान घातलेले असायचे आणि मग त्या रात्री झोप लागायला बऱ्यापैकी त्रास व्हायचा. अर्थात हे त्या रात्रीपुरतेच टिकायचे. पुढे त्याची कधी समस्या झाली नाही.
. . .
मित्रहो,
तुमच्यापैकी बरेच जण कानसेन असतील तर काहीजण तानसेन सुद्धा असू शकतील. तुमच्या आवडत्या गाण्यांबद्दल काय अनुभव आहेत तुमचे ? त्यांच्याशी निगडित काही व्यक्तिगत आठवणी नक्कीच असतील. आवडत्या गाण्यांचे कानसुख घेता घेता तुम्ही कधी कानभुंग्याने सतावला गेला होतात का?
प्रतिसादांमधून जरूर लिहा. वाचण्यास, नव्हे ऐकण्यास उत्सुक !
****************************************************
कानभुंगा शब्द आवडला.
कानभुंगा शब्द आवडला.
कुमार सरांनी जी अवस्था वर्णन केली आहे ती वाचताना अगदीच झालं.
आणखी एक - कधी कधी चाल आठवत राहते, गुंजी घालत राहते शब्द काही आठवत नाहीत.
किंवा शब्द अर्धवट आठवतात. दिवस दिवस गाणे आठवत नाही.
आत्ता " तेरी एक नजर मे राजा " एव्हढी एक ओळ आठवतेय, गाणं नाही.
गुगल केलं तर मजा निघून जाईल.
"दिलदार कर दिया"
हे लिहीता लिहीता आठवलं
धन्यवाद !
धन्यवाद !
*1. परि सोडिना ध्यास……गुंजनात हा दंग >> अगदी !
..
*2. गुगल केलं तर मजा निघून जाईल. >>> हे बरोबर !
आहे ती अवस्था मस्त. . .
गेले काही दिवस तांबडी चामडी
गेले काही दिवस तांबडी चामडी हे गाणं कानात आणि डोक्यात घर करून राहिलं आहे.
अच्छा ! नव्हते ऐकलं हे गाणं
अच्छा !
नव्हते ऐकलं हे गाणं
मी सहसा रॅप ऐकत नाही. ह्याला
मी सहसा रॅप ऐकत नाही. ह्याला रॅप म्हणावं का तेही माहीत नाही, पण त्याच्या शब्दांची लय डोक्यात रेंगाळत राहते. लका लाका लका लका . गाणं येऊन ४ आठवडेच झालेत, पण साडे चार दशलक्ष दर्शनं झाली आहेत त्याची.
म्हणजे खूप लवकर लोकप्रिय झाले
म्हणजे खूप लवकर लोकप्रिय झाले.
. . .
यंदा रजनीगंधा या हिंदी चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यात मोजून दोन गाणी आहेत- एक लता व दुसरे मुकेशचे. त्यातले
‘रजनीगंधा फुल तुम्हारे’
हे लताचे गाणे फारच आवडते आणि त्याच्यात मला भुंगा लावण्याची क्षमता आहे !
(विशेषतः त्याच्या दुसऱ्या ओळीच्या शेवटी,
“मेरे अनुरागी मन में” इथे जो काही अप्रतिम सूर लावलेला आहे त्याला तोड नाही).
त्या काळी ते बिनाका गीतमालामध्ये बराच काळ पहिल्या क्रमांकावर होते.
रजनीगंधा >> सुंदर गाणं आहे ते
रजनीगंधा >> सुंदर गाणं आहे ते
ते गाणे आणि त्या चित्रपटाची
ते गाणे आणि त्या चित्रपटाची अफलातून निर्मिती कथा या https://www.esakal.com/saptarang/rajnigandha-movie-publish-history-enter...
वाचनीय लेखात दिलेली आहे.
इच्छुकांनी जरूर वाचावी.
रजनीगंधा >> सुंदर गाणं आहे ते
रजनीगंधा >> सुंदर गाणं आहे ते +१
आवडते.
हा अनुभव खूपदा घेतला आहे.
हा अनुभव खूपदा घेतला आहे.
एखादे गाणे इतके सतत मनात घोळत राहते की त्यातील खुमारी जाऊन फक्त त्रासदायक धून कानात वाजत राहते. मला तर मळमळल्या सारखे होते !!!
e.g. कहो ना प्यार है..हे गाणे तेव्हा खूपदा ऐकल्याने माझ्या अगदी डोक्यात गेले आहे!
यावर खूप आधी एक उपाय माझ्या भावाने सुचवला होता..

की हे गाणे मैफिलीत गायचे...
म्हणजे काय तर... निदान चारपाच जण जमवून त्यांच्यापुढे गायचे..
तरच ते डोक्यातून जाते! !
आता.......
हा उपाय अजिबातच करण्याजोगा नसल्याने, मी काहीच बोलले नाही...
कुमार सर, तुम्ही सांगितलेले वरचे उपाय योग्य आहेत...
हा अनुभव खूपदा घेतला आहे.
डु प्र
* की हे गाणे मैफिलीत गायचे...
* की हे गाणे मैफिलीत गायचे... >>> छान !
..
यावरून मार्क ट्वेन यांचे एक स्फुट आठवले ते लिहितो. त्यातली पहिली ओळ या संदर्भात लागू होईल :
Sing like no one is listening,
Love like you have never been hurt,
Dance like nobody is watching
and
Live like it is heaven on earth !
Live like it is heaven on
Live like it is heaven on earth !>>>>
एक रिल हल्लीच पाहिले. खुप सुंदर….
एक आत्मा माणसाच्या शरिरातुन मुक्त होऊन पुढील वाट पाहात आहे. त्याला देवासमोर नेण्यात येते. देव त्याला हसुन विचारतो,
सांग मग, तुला स्वर्गात कसे वाटले? आवडला का स्वर्ग?
आत्मा म्हणतो, काय हे देवा, मी अजुन रांगेत आहे, अजुन स्वर्ग कुठे अलॉट केलायस मला? आधीच काय विचारतोयस??
देव म्हणाला, बाळा मी तुला स्वर्गातच पाठवले होते. स्वच्छ सुंदर हवा, खळाळते पाणी, भरपुर कसदार अन्न उगवणारी जमिन, रसदार फळे देणारी झाडे, मनाला रंजवणारे प्राणी व पक्षी… हे सगळे मी तुला पृथ्वीवर उपलब्ध करुन दिले होते. ते तुला उपभोगता आले नाही, त्याचा सत्यानाश लाऊन तु इथे आलायस आणि इथे तुला परत मी स्वर्ग तयार करुन देऊ???
मला कानभुंगा अजुनतरी आवडतोय.
मला कानभुंगा अजुनतरी आवडतोय. मी जुन्या गाण्यात रमते, त्रासदायक गाणी चटकन विस्मरणात जातात त्यामुळे त्रास होत नाही.
आता वरचे वाचुन ‘हा….. युंही महके प्रित पियाकी, मेरे अनुरागी मन मे..’ हे गुंजतेय कानात…
मला कानभुंगा अजुनतरी आवडतोय.
मला कानभुंगा अजुनतरी आवडतोय. मी जुन्या गाण्यात रमते, त्रासदायक गाणी चटकन विस्मरणात जातात त्यामुळे त्रास होत नाही.
आता वरचे वाचुन ‘हा….. युंही महके प्रित पियाकी, मेरे अनुरागी मन मे..’ हे गुंजतेय कानात…
कुमार सर, तुमच्या पोस्टी
कुमार सर, तुमच्या पोस्टी आवडल्या.
मार्क ट्रेनच्या कवितेत मी मनानेच Write like no one is reading ही भरही घातली आहे, स्वतः साठी.
नवे प्रतिसाद मार्मिक व
नवे प्रतिसाद मार्मिक व उत्तम !
१.
*देव म्हणाला, बाळा मी तुला स्वर्गातच पाठवले होते.
>>> छान.
याच आशयाचा लक्ष्मण लोंढे यांचा ‘दुःखी माणसाचा बुशकोट’ हा ललितलेख सुंदर आहे.
त्यातला रड्या माणूस स्वर्गात दिल्यानंतर सुद्धा देवाला म्हणतो,
“इथे काही शिलाईचा शोध लागलेला दिसत नाही. तेव्हा मला माझ्या पृथ्वीवरच्या सगळ्या पँट व बुशकोट मिळाले तर बरे होईल !”
२.
२.
* मनानेच Write like no one is reading ही भरही
>>> अगदी अगदी !
हे झकासच आणि कधीही लागू असलेले . . .
छान प्रतिसाद. वाचतोय.
छान प्रतिसाद. वाचतोय.
<मार्क ट्वेन> मस्त
अस्मिता, तू किती सुरेख
अस्मिता, तू किती सुरेख लिहीतेस!
As if no one is reading...... हे चुकीचे अझंप्शन आहे!
तांबडी चामडी...
तांबडी चामडी...
एखाद्या शेळीनं लबा लबा पाला खावा तसं शब्दांचा फडशा पाडत होतं. परिणाम काय खाल्लं ऐवजी किती खाल्ल एवढंच उमगलं. याला रॅप का म्हणतात तेही कळलं ...घाई असेल तेव्हा चपातीत सुकी भाजी रॅप करून गपा,गप खाणं हाकानाका. सुधीर फडके आठवले . गाण्यातला शब्दनशब्द ऐकणा-याला स्पष्ट कसा कळेल या साठी ते विशेष दक्षता घेत.
गद्य खूप वेगात वाचलं की झालं रॅप. आपले कान कशाला रेमटवायचे यांच्या रॅपपायी. यातली शब्दरचना अजिबात काव्यात्मक नसते. एक रॅप दोन तीन पाणी गद्य असेल.
*सुधीर फडके आठवले . गाण्यातला
*सुधीर फडके आठवले . गाण्यातला शब्दनशब्द > +१
आणि
"ष" चा उच्चार श पेक्षा वेगळा असून त्याचा आग्रह धरणारे ते गायक कोण?
>>>"ष" चा उच्चार श पेक्षा
>>>"ष" चा उच्चार श पेक्षा वेगळा असून त्याचा आग्रह धरणारे ते गायक कोण?>>> मला वाटतं बाबूजीच असतील.
माझाही तोच अंदाज होता
माझाही तोच अंदाज होता
धन्यवाद !
…
कानभुंगा- अवस्था तरुणवर्ग, स्त्रिया आणि ओसीडी असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक असते असे इथे म्हटले आहे
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4723199/#:~:text=Earworms%2....
कानभुंगा हा छान शब्द आहे.
कानभुंगा हा छान शब्द आहे.
एखादे गाणे गारुड केल्यासारखे लक्षात राहते, हे खरे.
क्वचित कधीतरी भल्या सकाळी एखादे गाणे आठवते, विशेषतः शॉवर घेताना, आणि मग ते दिवसभर गुणगुणले जाते म्हणजे अक्षरशः 'तोंडात बसते" त्याला "मुखरव" म्हणावे काय?
*मुखरव >>>
*मुखरव >>>
सुंदर शब्द ! आवडला.
कानभुंगापेक्षा ही अवस्था लवकर आटोक्यात येते असा अनुभव
चांगल्या गाण्यांनी कानभुंगा
चांगल्या गाण्यांनी कानभुंगा लावला तर आनंद वाटतो. परंतु सध्या काही त्रासिक तथाकथित गाण्यांनी शहरभर धुमाकूळ घातलाय आणि त्याचा कानाला व कामाला फार त्रास होतोय.
विधानसभेच्या बहुतेक सर्व उमेदवारांच्या नावाने प्रचार करणाऱ्या ज्या रिक्षा ओरडत फिरत आहेत त्यावरची "काव्यसुमने" भल्या मोठ्या आवाजात सतत कानावर आदळून वात आलाय नुसता.
मध्यंतरी भाडीपाच्या दिन दिन
मध्यंतरी भाडीपाच्या दिन दिन दिन दिन दिवाळी गाण्याने कानभुंगा लावला होता. फार वैतागवाणी चाल आहे त्यांची, पण डोक्यातून जाता जाईना.
बाकी वरील राजकारणी गाण्यांना कानभुंगा म्हणण्यापेक्षा कानभोंगा म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल.
* कानभोंगा >>>> अ- ग -
* कानभोंगा >>>> अ- ग - दी- च !!!
< कानभोंगा म्हणणं जास्त
< कानभोंगा म्हणणं जास्त सयुक्तिक> +१ भारीच.
Pages