मराठी भाषा गौरव दिन २०२३ -' द स्टोकर' - फ्रान्झ काफ्का - साजिरा - भाग २

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 1 March, 2023 - 10:17

स्टोकरला वाटलं, आपण चीफ इंजिनियर शुबलबद्दल केलेली कुठचीही एक तक्रार त्याला अद्दल घडवण्यासाठी पुरेशी ठरेल. नंतर मात्र त्याच्या लक्षात आलं, आपण घामाने डबडबतो आहोत. कॅप्टनसमोर धड नीट काहीही आपल्याला सांगता आलेलं नाही आणि आपली दयनीय अवस्था झालेली आहे. कॅप्टन गप्प बसलेला पाहून साशंक झालेला चीफ अकौंटंट नक्की काय करावं हे न कळून स्वतःही चडफडत गप्प बसला होता. तिथला तो नोकरही कॅप्टन नक्की काय बोलतो किंवा आदेश देतो; याची उत्सुकता असल्यागत कॅप्टनच्या तोंडाकडे पाहत राहिला.

कार्ल आता अस्वस्थ झाला. त्याला वाटलं, आपण पटकन काहीतरी हालचाल केली नाही, तर आधीच वाईट असलेली परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि कॅप्टन कुठच्याही क्षणी दोघांना बाहेर हाकलून देईल. कदाचित असंही होईल, की कॅप्टन हे सारं समजून घेऊन एखाद्या न्यायप्रिय नेत्यासारखा वागेल. पण आता हे म्हणजे लॉटरीची वाट बघत बसण्यासारखंच झालं.

मग काहीतरी निर्णय घेतल्यासारखा कार्ल अचानक स्टोकरला म्हणाला, ''अहो, तुम्ही जरा सोप्या पद्धतीने आणि स्पष्टपणे सांगा ना, त्याशिवाय कॅप्टन सरांना कसं नीट कळेल? असं बघा, सरांना जहाजावरच्या सार्‍या स्टोकर्स, रिगर्स, वर्कर्सची नावं आणि ते करत असलेलं काम कसं बरं माहीत असेल? सर्वांत महत्त्वाची तक्रार सर्वांत आधी आणि मग त्यानंतर उतरता क्रम- असं सहज कळेल असं आणि थोडक्यात सांगितलं तर सरांना पटकन कळेल. त्यांचा वेळ फार महत्त्वाचा आहे. तुम्ही मला जसं स्पष्ट आणि मुद्देसूद सांगितलं होतं, तसं का सांगत नाही?" आता स्टोकरने कार्लला किती आणि काय तपशील किती मुद्देसूदपणे सांगितले होते? पण या अमेरिकेत सामानाची ट्रंक चोरीला जाऊ शकते, तर मग थोडंसं खोटं बोलायला काय हरकत आहे?"

कार्लच्या बोलण्याने स्टोकर किंचित भांबावल्यागत झाला. पण मग त्याला वाटू लागलं- कार्लने आपला विश्वासघात केला! या अशा प्रसंगी कार्लने आपली पाठराखण करायची सोडून हे काय बडबडायला सुरूवात केली? स्टोकरचे डोळे अश्रूंनी डबडबले, आणि जणू दुखावला जाऊन, भावनातिरेकाने तो तिथंच सगळ्यांसमोर कार्लशी वाद घालू लागला. आपली बदनामी करण्याचा, आपल्याबद्दल असं खोटंनाटं सांगण्याचा या पोराला काय अधिकार आहे, असं त्याला वाटू लागलं. स्टोकरला कार्लचा खेळ समजूनच घ्यायचा नव्हता, की काहीही समजून घेण्याच्या तो पलीकडे गेला होता?

कार्लने आजूबाजूला बघितलं. कुणालाही स्टोकरच्या भावना आणि दु:खांचे कढ याबद्दल दखल घेण्याजोगं काही वाटत नव्हतं. त्या गोल टेबलाभोवती बसलेल्या लोकांनी आपलं काम करायला सुरुवात केली होती. चीफ अकौंटंट- ही ब्याद कधी टळेल, अशा विचारात पडला होता. कॅप्टन मात्र अजूनही तीक्ष्ण, पण त्याने इतक्या वर्षांत कमावलेल्या त्रयस्थ नजरेने स्टोकरकडे बघत होता.

"हो, हो, ठीक आहे, ठीक आहे--" कार्ल पडत्या आवाजात, हसतमुख राहण्याचा प्रयत्न करत म्हणाला, "तुम्ही बरोबर आहात. तुमच्या मुद्द्यांविषयी तर मला शंकाच नाही.." स्टोकरला आता आपण कुठेतरी कोपर्‍यात घेऊन जाऊन समजावू शकलो तर बरं होईल असं कार्लला वाटलं. चिडलेल्या स्टोकरचा अवतार बघता हा आपल्यालाच काय पण खोलीतल्या या सातआठ जणांना सहज ठोकून काढू शकेल अशी भीतीही कार्लला वाटली.

मग स्टोकरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं असल्यागत मघापासून बांबूची काठी हलवत फिरणार्‍या त्या अधिकार्‍याने कार्लला विचारलं, "नाव काय बाबा तुझं?" तेवढ्यात दरवाजा वाजला आणि कॅप्टनच्या इशार्‍यासरशी नोकराने दरवाजा उघडला. दारात एक मध्यमा आकाराचा, जहाजावरच्या यांत्रिकी जगातला अजिबात न वाटणारा, साधारणतः म्हातारी माणसं घालतात तसा कोट घालून एक माणूस सभ्यपणे उभा होता. तिथल्या सगळ्यांच्या नजरांतून कळलं नसतं, तरी स्टोकरच्या रागाने वळलेल्या मुठींवरून कार्लला कळलंच असतं- हा शुबल होता - चीफ इंजिनियर शुबल.

शुबलने तिथल्या लोकांकडे (जे जवळजवळ सगळेच त्याचे मित्र होते) स्थिर, हिशेबी आणि अनुभवी नजरेने बघितलं आणि सोबत आणलेल्या काही हिशेबाची अणि स्टोकरच्या कामासंदर्भातल्या नोंदींची कागदपत्रे आणि रजिस्टर्स खाली ठेवली. असा सभ्य माणूस स्टोकर, किंवा खरंतर कुणाशीही दडपशाही पद्धतीने कसं वागू शकतो? तसा काही वागलाच असता, तर आज स्टोकरला साक्षात कॅप्टनसमोर उभं राहण्याचं धैर्य कसं झालं असतं?

इथल्या या सार्‍या लोकांचा अंदाज आल्यानंतर कार्लला आता वाटलं, इथं स्टोकरसोबत येताना या सार्‍या होऊ घातलेल्या गोष्टींची उजळणी कमीतकमी करता आली असती. शुबल कितीही जेंटलमन असल्यागत वागला म्हणून काय झालं? त्याची एखादी क्षुल्लक गोष्ट अचूक पकडून त्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करता आलं असतं. आणि असंही आहे, की या परिस्थितीत शुबल स्वतः आला नसता तरी कॅप्टनने बोलावलं म्हणून त्याला यावंच लागलं असतं. स्टोकर अजूनही अस्सल वकिली भाषेत उत्तरं देऊन नुसतंच 'हो' आणि 'नाही' म्हणून जिंकू शकतो, पण हे त्याला- खुद्द स्टोकरला कळणं महत्त्वाचं होतं. कार्लने स्टोकरकडे पाहिलं- खाली मान घालून, गुडघे वाकवून क्रुद्ध झालेल्या बैलागत तो जोरजोराने श्वास घेत होता.

कार्लला मात्र हुशारी आणि आत्मविश्वास गवसल्यागत वाटत होतं. घरी असताना हे कधीच कसं होत नव्हतं? त्याच्या सहज मनात येऊन गेलं- त्याच्या आईबापांनी आता इथं, दूरवरच्या एका परदेशी भूमीवर एखाद्याचं चांगलं व्हावं म्हणून त्याच्या बाजूने खंबीरपणे, तेही या इतक्या मोठ्या, उच्चपदस्थ लोकांसमोर उभं राहिलेलं पाहिलं तर त्यांना काय वाटेल? त्यांचं आपल्याबद्दलचं मत बदलेल का? ते त्याला दोघांच्या मध्ये बसवून त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतील का? आता हा स्टोकर तसा सनकी आहे; त्याच्यामुळे त्याच्या बाजूने उभं रहून शेवटी जिंकू वगैरे की नाही, ते माहीत नाही. पण मुळात परक्या आणि वरच्या पदांवर असलेल्या लोकांसमोर असं धैर्याने उभं राहून बोलणं हेच किती महत्त्वाचं आहे!

"बेइमानीचे काही आरोप माझ्यावर झाल्याचं कळलं म्हणून मी इथं आलो," शुबलने बोलायला सुरूवात केली, "किचनमधल्या एका मुलीने मला स्टोकर इकडे आल्याचं सांगितलं. कॅप्टनसाहेब आणि माझ्या मित्रांनो, हे सारे आरोप मी खोडून काढू शकतो कारण त्या त्या वेळी मला व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवायची सवय आहे. शिवाय प्रत्येक घटनेला तुम्ही सगळे ज्यांच्यावर विश्वास ठेऊ शकाल, असे साक्षीदार देखील आहेत." सावकाश पण ठाम आवाजात सुरू केलेलं हे बोलणं कुणालाही प्रथमदर्शनी परिणामकारकच वाटलं असतं. मात्र एखाद्या हुशार आणि न्यायाची चाड असलेल्या माणसाने शुबलच्या या दोनतीन वाक्यांतही वकिली मुद्दे शोधून काढले असते. उदाहरणार्थ - बोलण्याची सुरुवातच शुबलने 'बेइमानी' या शब्दाने का केली होती? किचनमधल्या त्या पोरीने स्टोकर इकडे आल्याचं सांगितलं आणि शुबलने आपलं सारं प्लॅनिंग तिथूनच सुरू केलं!? आणि लगेच सोबत निष्पक्ष साक्षीदारही लगेच आणले? कसली अपराधी भावना या पाठीमागे होती? किचनमधल्या पोरीने सांगितल्यापासून इथं येईस्तोवर त्याने इतका वेळ का घालवला? की स्टोकरचं सारं बोलणं दाराआडून ऐकत होता, आणि स्टोकरचं बोलणं ऐकून कॅप्टन आणि इतर लोक दमून कंटाळून आपली न्यायबुद्धी हरवून बसतील, आणि स्टोकरवर झालेल्या अन्यायाकडे डोळेझाक करून शुबलच्या बाजूने निर्णय देऊन टाकतील- असा अंदाज करून तो योग्य वेळेची वाट बघत बाहेरच उभा होता?

शुबलने प्रस्तावना केली होती खरी, पण कॅप्टनला (आणि अर्थातच हे सारं बघत असलेल्या इतर लोकांनाही) हे प्रकरण आणखी जरा स्पष्ट करून हवं होतं. शुबल त्याच्या त्या साक्षीदाराने आत बोलावण्याआधी मिळणार्‍या जराशा वेळात काहीतरी करायला मिळालं तर बरं होईल- कार्लने विचार केला. तेवढ्यात कॅप्टनने कार्लकडे बोट दाखवत त्याच्या सोबतच्या दुसर्‍या अधिकार्‍याला सहज स्वरात विचारलं- "तुम्हाला या छोकर्‍याबद्दल काही विचारायचं आहे का?" "ओह, येस.. खरं तर मी मघाशीच विचारणार होतो. नाव काय तुझं?"
"कार्ल रॉसमन." कार्ल पटकन उत्तरला. एरवी अशा चौकशांना तो आपला पासपोर्ट दाखवत असे. पण आता ही ती वेळ नव्हती.

कार्लचं नाव ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले, आणि प्रश्न विचारणारा हातात बांबूची काठी घेऊन वावरणारा अधिकारी अविश्वासाने पुढे येऊन म्हणाला, "ओ गॉड! मला मघापासूनच शंका येत होती. अरे तू खरंच कार्ल रॉसमन असशील तर मग मी तुझा मामा जॅकोब आहे, आणि तू माझा भाचा!"

कार्लही आता आश्चर्यचकित झाला खरा, पण लगेच स्वतःला सावरत तो आळीपाळीने जॅकोब आणि इतर लोकांकडे पाहू लागला. पहिला विचार त्याच्या डोक्यात आला, तो म्हणजे- स्टोकरवर या नव्याने कळलेल्या गोष्टीचा नक्की काय परिणाम होईल, हा. त्याने विचारलं, "तुमचं पूर्ण नाव काय?"

"तू नशीबवान आहेस पोरा," कॅप्टन म्हणाला, "हे सिनेटर एडवर्ड जॅकोब आहेत. आता तू तयारी कर कार्ल. तुझं उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहतंय!"

"माझे एक मामा खरंच अमेरिकेत आहेत. पण त्यांचं नाव जॅकोब बेंडेलमायर असायला हवं, कारण आईचं माहेरचं आडनाव बेंडेलमायर आहे."

हे ऐकून सगळे हसू लागले, आणि जॅकोब मात्र अपमान झाल्यागत खिडकीजवळ जाऊन उगाच अस्वस्थपणे चेहेरा रुमालाने पुसू लागला. मग तो पुन्हा पुढे येऊन म्हणाला, "माफ करा लोकहो, तुम्ही उगाच या आमच्या कौटुंबिक नाट्यात ओढले गेलात. खरंतर आपल्या कॅप्टनना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, पण तुम्हाला थोडे स्पष्टीकरण दिलंच पाहिजे."

कार्ल आता आजूबाजूला बारकाईने बघून विचार करू लागला. नाव बदललं असू शकतं मामाने. किंवा मग हे सन्मान किंवा पदवीसारखं आहे का? ल ष्करी आणि पोलिस खात्यातल्या माणसांना पदकं मिळतात तसं काहीतरी? स्टोकरकडे त्याने बघितलं तर तो आता उल्हसित झालेला दिसत होता. पण जॅकोब काय स्पष्टीकरण देतो याचीही कार्लला आता उत्सुकता लागून राहिली होती.

"खरं तर माझ्या या भाच्याला खोडी करण्याला मांजराला बाहेर हाकलावं तसं केलं गेलं आहे." जॅकोब म्हणाला, "आता त्याने नक्की काय केलं तो इतिहास मी सांगत बसत नाही. पण थोडक्यात सांगायचं तर जोहाना ब्रूमर नावाच्या पस्तिशीच्या एका मोलकरणीने याला जाळ्यात ओढलं होतं."

जॅकोब मामाकडे दोन क्षण टक लावून कार्ल पाहत राहिला, मग इतरांकडेही त्याने पाहिलं. उच्चपदस्थांच्या या केबिनमध्ये कार्लने आता चांगलीच सनसनाटी पैदा केली होती, आणि घरातल्या गोष्टी कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक चव्हाट्यावर आल्या होत्या. स्टोकर सोडून इतर सारे गंभीर झाले होते किंवा तसं नाटक तरी करत होते. स्टोकर मात्र या सार्‍याची मजा वाटून हसत होता. हे एक बरंच झालं- कार्लने विचार केला. मघाशी संतापाने नाकपुड्या फुगवणार्‍या त्या स्टोकरपेक्षा हा स्टोकर संपूर्ण वेगळा होता.

"--आणि ही ब्रुमरबाई पोटुशी राहिली. आता आमच्या या हिरोने परदेशी असलेल्या त्याच्या मामाचं, म्हणजे माझं काहीतरी कौतुक त्या बयेजवळ केलं असणार. त्यावर ती इतकी इंप्रेस झाली की तिने झालेल्या बाळाचं नाव 'जॅकोब' ठेवलं! आता मला तिथल्या आताच्या नियमांची फार माहिती नाही, आणि इतक्या वर्षांनतर माझ्या बहिणीच्या कुटुंबाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचीही. पण माझ्याविषयी त्यांचं मत फार काही बरं नसणार असं मला वाटतं. आर्थिकदृष्ट्याही माझ्या बहिणीच्या घरात फार भरभराट वगैरे नसावी असा अंदाज आहे, आणि बहुधा पोटगी वगैरे द्यायची कटकट मागे लागू नये आणि आणखी घोटाळे होऊ नयेत म्हणून याची रवानगी इकडे झाली असावी! त्यांच्याकडून मला दोन पत्रं आली होती खरी!पण मी उत्तरच दिलं नव्हतं. मात्र त्या जोहानाने, थेट मला पत्र पाठवलं; जे फिरत फिरत परवाच माझ्यापर्यंत आलं. माझ्या या भाच्याचं वर्णन आणि तो प्रवास करत असलेल्या जहाजाचं नावही त्यात आहे-" आपल्या ब्रीफकेसमधून दाटीवाटीने बारीक अक्षरांत लिहून पूर्ण भरलेले दोन कागद काढून जॅकोबने सर्वांना दाखवले. "यात तिने लिहिलेले काही उतारे तुम्हाला वाचून दाखवले, तर तुम्ही नक्की हादरून जाल. हे तिने अगदी साध्या भाषेत, पण अर्थपूर्ण आणि हुशारीने लिहिलं आहे, आणि तिच्या बाळाच्या या बापाबद्द्ल असलेलं गाढ प्रेम त्यात दिसतं आहे. पण ते आता इथं वाचायची गरज नाही असं मला वाटतं. माझ्या या भाच्याच्या मनात तिच्याबद्दल काही शिल्लक असेलच तर तो दुखावला जाईल. त्यामुळे हे पत्र मी त्याला देतो. त्याला पाहिजे तेव्हा तो ते वाचू शकतोच.."

कार्लला आता जरा जुनं होऊन गेलेलं, तिच्याबद्दलचं काय काय आठवू लागलं. किचनच्या टोकाला असलेल्या तिच्या नेहेमीच्या जागेवर ती बरेच वेळा गालांवर हात ठेवून कार्लकडे बघत बसलेली दिसायची. कार्ल आईला कसलीतरी मदत करण्यासाठी किंवा वडिलांनी पाणी मागितलं म्हणून देण्यासाठी किचनमध्ये येताजाताना ती टक लावून बघत बसायची, तर कधी अनावर होऊन तो दिसू नये म्हणून डोळ्यांवर हात ठेवायची. किचनला लागून असलेल्या छोट्या खोलीत कधी ती गुडघ्यांवर वाकून बसत प्रार्थना करत असलेली दिसायची (जे तिच्या किंचित उघड्या असलेल्या दरवाजातून कार्ल बघायचा). कधीकधी ती अचानक चपळाईने कार्लच्या येण्याजाण्याच्या रस्त्यात येऊन उभी राहायची, आणि कधी तर तो किचनमध्ये आलेला असताना दरवाजा सरळ बंद करून तिथंच उभी राहायची आणि मग कार्लला दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या कराव्या लागायच्या. कधी ती कार्लला त्याने न मागितलेल्या वस्तू आणून द्यायची आणि हलक्या हाताने त्या त्याच्या हातात देताना त्याचा हात कुरवाळायची.

एकदा सगळी सामसूम झाल्यावर संधी साधून जवळ येऊन हलक्या आवाजात तिने 'कार्ल!!' अशी हाक मारली. तो जरा दचकलाच, पण त्याच्या डोळ्यांत डोळे घालून तिने त्याचे हात पकडले आणि त्याला तिथून उठवून ती सरळ तिच्या खोलीत घेऊन गेली. मग तिने त्याच्या गळ्यांत हात टाकले आणि घट्ट मिठी मारून "प्लीज, प्लीज माझे कपडे काढ.." असं म्हणत खरं तर तिनेच त्याचे कपडे काढले. मग आपल्या बेडवरचा हाच पहिला आणि अखेरचा पुरूष असल्यागत ती त्याला बघत राहिली, त्याला खेळवत राहिली, आणि त्याचवेळी स्वतःही खेळणं होऊन गेली. कार्ल आधी अवघडला, पण तिने पुढाकार घेतला आणि काहीतरी उत्पात घडल्यासारखं कार्लचं शरीर पिळवटून निघालं. त्याच्याच शरीराचा एक तुकडा असल्यागत ती त्याच्याशी एकजीव झाली. पुन्हा भेटण्याच्या मिनतवार्‍या तिने केल्या आणि कार्ल थकून, जवळजवळ मुसमुसतच त्याच्या अंथरूणावर शेवटी झोपायला गेला.

"आणि आता--" कार्ल या सार्‍या आठवणींत दंगला असताना त्याच्या मामाचा मोठ्याने बोलण्याचा आवाज त्याच्या कानावर आला, "मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, मी खरंच तुझा मामा आहे की नाही?"

कार्ल पुढे येऊन सिनेटर जॅकोबच्या हातावर ओठ ठेकवीत म्हणाला, "तुम्ही मामा आहातच माझे. आणखी एक म्हणजे, तुम्ही समजता तसं माझे आईबापही तुमच्याबद्दल काही वाईटसाईट वगैरे बोलत नाहीत. आणखी एक म्हणजे माझ्या कथेबद्दल तुम्ही सांगितलं तसं काही तंतोतंत घडलेलं नाही. पण मला माहीत आहे. इथं इतक्या दूर राहून तुम्हाला ते सारं झालं तसं कळणं अवघड आहे. ते ठीकच आहे. तुम्ही काय सांगितलं, याचा या मंडळींवर झालेला परिणाम आणि त्यांचं या जहाजावरचं काम, याचा काही संबंध नाही. त्यामुळे असो--"

जॅकोब कार्लच्या कपाळावर ओठ टेकवून, मग कॅप्टनकडे वळून पाहत म्हणाला, "आहे की नाही माझा भाचा ग्रेट?"

"मी नशीबवान आहे सिनेटर जॅकोब," कॅप्टन म्हणाला, "तुमच्या या अश्या भेटीसाठी माझं जहाज नियतीने राखून ठेवलं होतं ही गोष्ट मला सुखावणारी आहे. पण या पोराने या जहाजातून केलेला थर्डक्लासमधला प्रवास फार बरा झालेला नसणार असं मला वाटतं. हे आम्ही जरा सुधारायला हवं असंही वाटतं. आम्ही प्रयत्न करतोय, पण त्यात फार यश अजून आलेलं नाही. इथं जहाजावर इतकी रहाटगाडगी अव्याहत चालू असतात, की या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतंच."

"ते ठीकच आहे," कार्ल म्हणाला, "मला फार काही त्रास झाला नाही."

"त्याला फार काही त्रास झालेला नाही!" सिनेटर जॅकोब मोठ्याने हसत, जणू कार्लची नक्कल करत उद्गारला.

"फक्त एकच प्रॉब्लेम असा झालाय, की माझी सामानाची ट्रंकच जहाजावर हरवली--" कार्ल म्हणाला. मग त्याला मघाशी घडलेलं सारं पुन्हा आठवलं. त्याने ते सांगितल्यावर खोलीतले सगळे लोक काहीतरी अनपेक्षित झाल्यासारखे गप्प बसले. तिथं असलेल्या बंदराच्या अधिकार्‍यांनी त्याचं सामान हरवल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

कॅप्टननंतर कार्लचं अभिनंदन करणारा माणूस होता- स्टोकर. मघाचं सारं विसरून त्याला अचानक आनंद झाला होता. त्याला कार्लचं मनापासून कौतुक वाटत होतं. तसाच हसरा चेहरा घेऊन तो कार्लच्या मामाकडे, म्हणजे सिनेटरकडे वळला. पण सिनेटर जॅकोब मात्र अंतर राखायचं असल्यागत दोन पावलं मागे सरकला. आपली मर्यादा ओळखून स्टोकर तिथंच थांबला.

इतर लोक कार्ल आणि सिनेटरबद्द्ल आणि या अचानक घडलेल्या योगायोगाच्या घटनेबद्दल बोलत असतानाच चीफ इंजिनियर शुबल पुढे आला आणि त्याने कार्लचे हात हातात घेऊन अभिनंदनही केलं. सिनेटर जॅकोब अजूनही घडलेल्या घटनेची नाट्यमयता अनुभवत होता, आणि इतरांच्याही लक्षात आणून देत होता. कार्लच्या त्या स्वयंपाकिणीच्या पत्रावरून आपण कसं कधीच न पाहिलेल्या कार्लचं चित्र मनोमन रेखाटलं होतं हे तो वर्णन करून सांगत होता. मघाशी स्टोकरसोबत घडत असलेल्या त्या प्रसंगादरम्यान खिडकीजवळ थांबून आपण कसा त्या पत्राचा आणि कार्लचाच विचार करत होतो- हेही तो सांगत होता. "आणि बघा, नाट्य घडल्यागत कसा अचानक माझा भाचा भेटला!" अशा अर्थाचं पुन्हा पुन्हा बोलत होता.

"स्टोकरचं काय होणार आहे?" नुकत्याच नवीन स्थानावर गेलेल्या कार्लने मोठ्या आवाजात आणि जवळजवळ अधिकारवाणीने विचारलं.

"स्टोकरला त्याच्या पात्रतेप्रमाणे जे काय असेल ते नक्की मिळेल," सिनेटर उद्गारला, "शिवाय कॅप्टन योग्य ते ठरवतीलच. आपण सगळं नीट ऐकून घेतलेलं आहे आधीच, त्यामुळे प्रश्नच नाही."

"मुद्दा नुसतंच ऐकून घ्यायचा नसून न्यायाच्या बाजूने उभा राहण्याचा आहे." कॅप्टन आणि सिनेटरच्या मध्ये उभं राहून कार्ल म्हणाला. इतक्या मोठ्या लोकांसमोर त्याच्या बोलण्याचा पोत आता बदलला होता. जणू असं बोलून त्याला नव्यानेच प्राप्त झालेलं स्थानमहात्म्य तो पणाला लावत होता.

हे सारं घडत असलेलं बघूनही आता स्टोकरने आशा जवळजवळ सोडून दिली होती आणि ते त्याच्या अस्वस्थ हालचालींमधून स्पष्ट दिसत होतं. मात्र त्याने आपल्या तक्रारी मघाशीच त्राग्याने आणि जरा ओरडून वगैरे सांगून टाकल्या होत्या- एवढं मात्र त्याला समाधान वाटत होतं. या प्रशस्त आणि राजेशाही केबिनमध्ये आता कार्लसकट सारे उच्चभ्रू होते. त्यातल्या त्यात तो नोकर आणि शुबल- हेच त्यांच्या उतरंडीत खालच्या पायरीवर होते. याचमुळे खरंतर आता शुबलनेच पुढाकार घेऊन न्याय करायला हवा- असं स्टोकरला वाटलं. असं झालं तर शुबलला यापुढे त्याचं मन खाणार नाही आणि कमीत कमी शांत झोप तरी त्याला मिळेल. मग त्यानंतर कुठचाही स्टोकर आपल्यावर अन्याय झाला म्हणून रडत-ओरडत या केबिनपर्यंत, चीफ अकौंटटंट पर्यंत येणार नाही. मग कॅप्टनने त्याच्या जहाजावर रोमानियन लोक घेण्यावर कुणी आक्षेप घेणार नाही, कारण न्यायी लोक म्हणून रोमानियन्स तोवर सार्‍यांना मा हीत झालेले असतील. पण असं खरंच होईल का? इथले जवळजवळ सर्वच, त्यातले काही तोंडाने बोलून दाखवत नसले तरी, त्याच्या बाजूने दिसत नव्हते. सिनेटर त्याच्या बाजूने असण्याची एक अंधुक शक्यता होती, कारण कार्लची भेट तर त्याच्यामुळेच घडून आली होती. आणि कार्ल तसा अजूनही त्याच्या परीने प्रयत्न करत होता, हे नक्की. पण हे सत्य होतं, की हे दोघे कितीही मानाच्या स्थानावर पोचलेले असले, तरी अजून कॅप्टन झालेले नव्हते..!

"गैरसमज करून घेऊ नकोस बेटा" सिनेटर कार्लला म्हणाला. “ही न्यायाची बाब आहे असं प्रथमदर्शनी वाटतं खरं, पण मला वाटतं ही नियम अणि शिस्त या गोष्टी काटेकोरपणे पाळले जाण्याची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, निर्णय कॅप्टनच घेतील. त्यांचं वय, अनुभव आणि ज्ञान या गोष्टींचा विचार केला तर तो निर्णय शंभर टक्के बरोबर असेल, यात शंका नाही. आधीच कॅप्टनना अनेक गोष्टींमुळे भरपूर त्रास झालेला आहे, आणि आता जहाज न्युयॉर्कला पोचलेलं असल्याने ते सोडायचीही वेळ झाली आहे. तू स्टोकरच्या बाबतीत तुझं काम नक्कीच चांगल्या प्रकारे केलं आहेस, त्यामुळे आता आपण निघायला हरकत नाही.”

"तुमच्यासाठी मी वेगळ्या बोटीची व्यवस्था करतो," सिनेटरशी सहमत झाल्यागत कॅप्टन म्हणाला, आणि कार्लला धक्का बसून तो कॅप्टनकडे पाहत राहिला. कॅप्टनच्या इशार्‍यासरशी चीफ अकौंटंट चटकन उठला, आणि कोपर्‍यातल्या टेबलापाशी जाऊन बोटीची व्यवस्था करण्यासाठी फोन करू लागला. कार्लने स्टोकरकडे पाहिलं तर तो खाली मान घालून हताशपणे काहीतरी पुट पुटत होता.

कार्ल विचार करू लागला- शेवटी ही अशी वेळ आली आहे तर. डेकवरून बाहेर पडताना जसा तो मागच्या लोकांच्या रेट्यामुळे आपोआप पुढे जात शेवटी वर पोचला होता, तसा काळाचा अगम्य अणि अदृश्य रेटा त्याला ह्या अशा परिस्थितीपाशी घेऊन आला होता. हा कॅप्टन तसा सभ्य आणि शांत आहे, पण ते तितकंच. शिस्त केव्हा सुरू होते आणि हा असला शांत सभ्यपणा कुठे संपतो, हे कळत देखील नाही. आणि हा शुबल.. याच्याशी तर मघाशी हस्तांदोलन देखील करायला नको होतं. इथल्या कोणालाच काहीही फरक पडत नाही; त्यामुळे आता जॅकोबमामा म्हणतोय ते तसं बरोबरच आहे. तो आता भेटलाच आहे, तर त्याच्यापासून आपण दूरही जाऊ शकत नाही.

कार्ल स्टोकरजवळ गेला आणि त्याचा निर्जीव भासणारा हात हातात घेऊन म्हणाला, "तुम्ही तरी आता काहीतरी बोला. या जहाजावर तुमच्या बाबतीत अनेक अन्यायकारक गोष्टी घडल्या आहेत, हे मला नीट माहीत आहे. हे असं नको व्हायला तुमच्याबाबतीत. तुम्ही बोला. मनात येईल ते बोला. प्रश्न विचारा, उत्तरं द्या, घडाघडा बोला काहीतरी. कारण तीच एक आशा आहे. स्वतःला आता फक्त तुम्हीच वाचवू शकता. अनेक कारणं आहेत. पण आता मलातरी तुमच्या बाबतीत काहीच करता येणार नाही, असं दिसतं.." मग त्याने स्टोकरच्या हाताचं चुंबन घेतलं, आणि त्याचा तोच हात आपल्या गालांवर ठेवत, सोडून द्याव्या लागणार्‍या खजिन्याकडे बघितल्यागत तो स्टोकरकडे बघत राहिला.

स्टोकरने वर बघितलं. त्याच्या कपाळावर आठ्या होत्या, आणि ओठांची किंचित थरथर होत होती. जणू बोलण्यासाठी तो योग्य शब्द शोधत होता. पण तेवढ्यात सिनेटरने जवळ येऊन कार्लला जवळजवळ खेचूनच दूर नेलं आणि पुटपुटला, "त्या स्टोकरने तुझ्यावर काय अशी मोहिनी घातली आहे? तू एकटा होतास, रस्ता चुकला होतास आणि काय करावं हे तुला कळत नव्हतं, तेवढ्यात तुला हा सापडला आणि तू त्याचे आभार मानलेस. वरून जरा मदतही केलीस. पण आता एवढं पुरेसं आहे आणि इथंच ते संपायला हवं. स्वतःची जागा नीट ओळखायला शीक आता!"

तेवढ्यात दरवाज्याच्या बाहेरून गोंधळाचे आणि दरवाजा जोरजोरात ठोठावण्याचे आवाज आले. नोकराने दरवाजा उघडला, तसा गचाळ अ‍ॅप्रन घातलेला एक खलाशी आत धडपडत घुसला. "बाहेर बरेच लोक जमलेत-" तो अजूनही गर्दीचे धक्केबुक्के खात असल्यागतच वागत होता. मग चटकन त्याला भान आलं आणि आपण कॅप्टनसमोर उभे आहोत, हे त्याला कळलं. तो घाईघाईने कॅप्टनला सॅल्युट करणार, तेवढ्यात आपल्या अ‍ॅप्रनकडे बघून तो किंचाळला, "अरे देवा, हा मोलकरणीचा अ‍ॅप्रन माझ्या अंगावर कुणी चढवला?" मग त्याने कसाबसा तो काढून टाकून खाली फेकून दिला आणि शेवटी कॅप्टनला एकदाचा सॅल्युट केला. हे सारं इतकं विचित्र दिसत होतं, की केबिनमधले लोक हसू लागले. कॅपटन करड्या सुरांत म्हणाला, "कोण आहे दाराबाहेर?"

"ते माझे साक्षीदार आहेत सर," शुबल आता पुढे येऊन बोलला, "त्यांच्या या अशा वागणुकीबद्दल मी माफी मागतो, पण मोठ्या समुद्रप्रवासामुळे कधीकधी हे लोक असे वेडसर होतात खरे."

"त्यांना बोलवा आत." कॅप्टनने हुकूम दिला, आणि सिनेटरकडे वळून तो म्हणाला, "तुम्ही तुमच्या या भाच्याला घेऊन लगेच बाहेर पडा. हा खलाशी तुमच्या बोटीची व्यवस्था करील. तुम्हाला काही त्रास होणार नाही, याची खात्री आहे मला. आपली या सफरीवर ओळख झाली हे खूप छान झालं मिस्टर सिनेटर जॅकोब, तुम्हाला भेटायला मिळणं हा मी माझा सन्मान समजतो. आपण मघाशी जी चर्चा करत होतो- आमच्या अमेरिकन ताफ्याच्या परिस्थितीबद्दल- ती आपण पुन्हा भेटून करू नक्की. शुभेच्छा तुम्हाला!"

"थँक्स कॅप्टन." सिनेटर जॅकोब कॅप्टनशी हस्तांदोलन करत म्हणाला, "तुमच्यासोबत खूप छान चर्चा झाली, आणि तुमच्या या शुभेच्छा माझ्यासाठी मोलाच्या आहेत. आता कार्ल माझ्यासोबत आहे, त्यामुळे मी खुश आहे! पुढच्या युरोपवारीत आपण पुन्हा भेटू बहुतेक.." "नक्कीच!" कॅप्टन उत्तरला, आणि त्याने कार्लपुढे आपला हात निरोपासाठी पुढे केला. कार्लने तो जरा नाईलाजानेच हातात घेतला. एकतर त्याच्या मागेच शुबलच्या त्या चौदा-पंधरा साक्षीदार लोकांचा गोंधळ चालू होता, आणि शुबल दबक्या आवाजात त्यांना काही सूचना देत होता. हे सारं जाणवून कार्ल आणखीच अस्वस्थ होत होता. तेवढ्यात खलाशाने जायची परवानगी मागितली, आणि केबिनमधल्या उच्चपदस्थांच्या घोळक्यामधून मान झुकवत खलाशी पुढे जात सिनेटर आणि कार्ल यांना नेऊ लागला. ते लब्धप्रतिष्ठित लोक बघून कार्लला वाटलं- याच लोकांनी मघाशी शुबल आणि स्टोकर यांच्यामधला वाद जवळजवळ हसण्यावारी नेला आणि मग त्याचा अप्रत्यक्ष का होईना, परिणाम कॅप्टनवर झाला. खाली खलाशाने मघाशी फेकून दिलेला अ‍ॅप्रन दिसत होता. कार्लने तो ओळखला- तो अ‍ॅप्रन मघाशी स्टोकरच्या मिठीत आलेल्या, किचनमध्ये काम करणार्‍या त्या पोरीचा होता.

मग त्या खलाशाच्या मागे जात ते केबिनच्या बाहेर पडले आणि एका लहान हॉलवेमध्ये वळले. मग काही पायर्‍या उतरल्यावर एक लहान दरवाजाकडे ते आले. तो ओलांडल्यावर लहान जिन्याने, खाली त्यांच्यासाठी तयार ठेवलेल्या बोटीमध्ये नेण्यात आले. ते बोटीत शिरताच तिथल्या इतर खलाशांनी उभे राहून त्यांना आदराने नमस्कार केला. सिनेटरने कार्लला सावधपणे पायर्‍या उतरण्याची सूचना केली मात्र! कार्ल तिथंच स्फुंदू लागला. सिनेटरने आपला उजवा हात कार्लच्या हनुवटीच्या खाली ठेवला, आणि मग त्याचा डावा हात वेगाने कार्लच्या गालावर येऊन आदळला. हे असं कार्लसाठी अनपेक्षित होतं. तो थबकला, पण सिनेटरने त्याचा हात आपल्या मजबूत पकडीत घेतला, आणि त्याच्यासोबत खेचला जाऊन कार्ल पायर्‍या उतरू लागला. बसण्याची जागा आल्यावर कार्लसमोरचीच जागा निवडून सिनेटर बसला. आणि मग त्याने खलाशांना बोट सुरू करायचा हुकूम दिला.

बोट सुरू होऊन काही यार्ड पुढे आली तेव्हा कार्लच्या लक्षात आलं; जहाजातल्या कॅप्टनच्या केबिनीच्या बरोबर खाली आपण आहोत. त्या केबिनच्या भल्यामोठ्या आकाराच्या त्या तीन खिडक्या आता शुबलच्या लोकांनी भरून गेल्या होत्या. सिनेटरने त्यांच्याकडे पाहून स्मित केलं, आणि बोटीतल्या खलाशांनीही त्यांच्याकडे पाहून चीत्कारून हात हलवले.

स्टोकर जणू कधी अस्तित्वातच नव्हता. त्याच्याबद्दल मघाशी काहीतरी घडल्यासारखं आठवत होतं. तो भास होता आणि ते जणू वास्तवात कधी घडलंच नव्हतं. समोरासमोर बसल्याने कार्ल आणि सिनेटरचे गुडघे एकमेकांना स्पर्श करत होते. कार्ल बारकाईने सिनेटरकडे बघत होता. हा माणूस काधीतरी स्टोकरची जागा घेईल का?- कार्लच्या मनात आलं.

सिनेटर मात्र कार्लची नजर टाळत बोटीच्या पुढे जाण्यामुळे तयार झालेल्या समुद्राच्या लयबद्ध लाटा बघत होता.

--- संपूर्ण---

साजिरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users