वाळवी - या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 January, 2023 - 15:07

वाळवी - या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

आताच बघून आलो! रात्रीचा शो! फुल्ल धमाल!! फुल्ल पैसा वसूल चित्रपट!!!!

पुर्वार्धात असे काही नाट्य की काही मिस होऊ नये म्हणून एक क्षण, अक्षरशा एक क्षण पडद्यावरून नजर हटू नये. आणि उत्तरार्धात ईतका ड्रामा की बरेच दिवसांनी दिवसांनी असे पुर्ण थिएटर नॉनस्टॉप खळखळून हसताना बघितले.

हो, रात्रीचा शो होता. चित्रपट मराठी होता. आणि तरीही थिएटर हाऊसफुल्ल होते. मी मात्र एकटाच गेलेलो. काहीतरी बायकोच्या मर्डरचा प्लान आहे हे ट्रेलर बघून समजलेले. त्यामुळे या इन्फॉर्मेशन शेअरींग सेशनला तिला सोबत नेले नव्हते. पण असे वाटलेच नाही की मी एकटा आहे.

मोजकी चार पाच कॅरेक्टर.. पण काय तो अभिनय, काय ते संवाद, काय तो एकेकाचा टायमिंग..
स्वप्निल जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते... सर्वच भारी!

मोजकीच चार पाच लोकेशन्स.. पण काय ते चित्रीकरण, काय तो साऊंड, काय ती बॅकग्राऊंड म्युजिक..
कमाल केलीत परेश मोकाशी..

आणि शेवट तर ईतका अनपेक्षितपणे आला की क्षणभर काळजाचा ठोकाच चुकला. छातीवर हात ठेऊन थोडावेळ खुर्चीतच बसून राहिलो.

पण मला आश्चर्य वाटते की मायबोलीवर अजून एकानेही कसे वाळवीबद्दल लिहिले नाही..
अजून कोणी पाहिला नाही का? ईथल्या लोकांपर्यंत अजून हा पोहोचला नाही का?

वाट कसली बघता आहात? आपलाच मराठी चित्रपट आहे. कोणी आमंत्रण देणार नाहीये. जा ऊठा, बूक माय शो करा, जवळचे चित्रपटगृह गाठा आणि पहिले बघून घ्या. लगेच या धाग्यावर लिहून मोकळे व्हा. तोपर्यंत मी रोज हा धागा हलता कसा राहील आणि हा चित्रपट एकूण एक मायबोलीकर कसा बघत नाही हेच बघतो.

आणि हो, चित्रपट मराठी आहे म्हणून नाही, तर ईतका उत्क्रुष्ट बनवलाय की थिएटरातच बघायचा आहे. त्यातच मजा आहे. ओटीटीच्या छोट्या स्क्रीनवर बघाल तर त्या नाट्यातली मजा घालवाल. केवळ मल्टीस्टार्रर, बिग बजेट, वीएफएक्स आणि स्पेशल ईफेक्टवाले चित्रपटच थिएटरमध्ये बघायचे असतात हा माझा भ्रम तोडला या चित्रपटाने. माझ्याकडून फुल्ल पाच स्टार !

धन्यवाद,

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पाहिला आयपीटीव्ही वर.. मला आवडला... काही मित्र परिवार वेड बघायला जाणार होते त्यांचे मतपरिवर्तन करून वाळवी ला पाठवण्यात मी यशस्वी झालोय...

मलाही बर्‍यापैकी आवडला. शेवट भारी Happy नंतर हे कसे झाले असावे यावर पोलिसांचे संभाषण / अ‍ॅनालिसिस ऐकायला मजा आली असती Happy
कधी कधी ते एन्ड च्या क्रेडिट्स सोबत शुटिंग मधले ब्लूपर्स वगैरे दाखवतात तेव्हा तसे काहीतरी दाखवले असते तर चालले असते!

मीही पाहिला. टाईमपास आहे.
एक दोन गोष्टी नैतिक रित्या अगदी डार्क कॉमेडी म्हणून पण खटकल्या. पण ठिके.विषय असा म्हटल्यावर.
सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे चं काम जास्त आवडलं.डायलॉग एकदम चुरचुरीत आहेत.लोक नॉनस्टॉप हसत होते.स्वजो चांगला आहे पण नेहमीच्या स्टाईल मध्ये.राधिका मसाले यांना अभिनयाला फारसा वाव नाहीये Happy

राधिका मसाले यांना अभिनयाला फारसा वाव नाहीये
>>>>>>
ही चित्रपटातील सर्वात जमेची बाजू ग्राह्य धरावी का?

माहीत नाही बा.एकंदरीत फारसे सिरियल्स पाहिले नाहीयेत मी तिचे किंवा कोणाचेच.मला फक्त चेहरे ओळखीचे कळतात सिरीयल च्या ट्रेलर मध्ये.

चांगला होता, जाने भी दो यारो ची आठवण आली Happy
स्व.जो आणि सु.भा आवडत नाहीत पण मेजॉरीटी मराठी अ‍ॅक्टर्स असेच तुपकट असतात, स्टोरी चांगली असल्यामुळे चालून गेले सिनेमात !

हृषिकेश रांगणेकर म्हणतात..

पूर्वार्धातला सिरीयस सिनेमा सेकंड हाफमध्ये अचानक डार्क ह्युमरची व्हेन पकडू पाहतो, ते ट्रान्झिशन पचलं नाही हे तर आधी सांगितलं आहेच
जरा विचार केल्यावर खालील बाबी जाणवल्या. उत्सुकांसाठी सादर:
सिनेमा कुठल्या शहरात होतो हे कुठं येत नाही. मला आठवतं त्यानुसार गाड्यांचे नंबर मुंबईचे नव्हते. स्वप्नीलच्या कारचं बहुधा पनवेल पासिंग होतं, पण बाईक भलतीच पासिंग होती. ते एक असो. इतक्या डिटेलिंगमधे कशाला सखोल जायचं, नै का!
तर मोठ्या शहरात दोघा पुरुष पात्रांचे मोठे बंगले आहेत!
वाळवीवर संशोधन करणाऱ्या बाईला घरावर जप्ती आली तरी फारसं माहीत नाही! ती नवऱ्याला ही महागडी गाडी विकू, ड्रायव्हरला नोकरीवरुन काढून टाकू, ऑफिसमधला स्टाफ कमी करु असले पैसे वाचवायचे सल्ले देत नाही. कित्ती गुणाची बाई ती! ती कधी बँकेत गेलेलीच नाही! आणि ती संशोधकही आहे.
मोठ्या बंगल्यातलं फर्निचर एका टेम्पोमधे बसतं!
सुबोध भावे एक प्रेत एका बंगल्यातून उचलून, गाडीत टाकून स्वतःच्या बंगल्यात एकटा आणतो! आणि गोल फिरणाऱ्या खुर्चीत ठेवतो. हे सगळं भर दुपारी घडतं. कुणी पाहत नाही.
गाडीत प्रेत असताना डेंटिस्ट बाई दारु पीत गाडी चालवणार्या टेम्पोला ओव्हरटेक करु पाहते, त्याच्याशी वाद घालते! सर्वसामान्य लोक अश्या वेळी low-key राहतात. पण ह्यांचं जरा वेगळंच आहे. डार्क ह्युमर निर्मितीसाठी इतकं चालतं.
दगड आणि झुडूप घेऊन एका डेंटिस्ट आणि एका साय्कियाट्रिस्टची मारामारी was too childish. मला एव्हाना जांभया येऊ लागल्या होत्या. पण याचं श्रेय थिएटरमधल्या एसीला देऊया.
गाडीत बायकोचं प्रेत असताना पेट्रोल पंपवाल्याकडे नवरा पस्तीस पैसे मागत थांबलाय, त्यावर चर्चा करतोय हा इयत्ता चौथीतला विनोद वाटला. थिएटरमधले आजूबाजूचे इथं दात काढत होते. कवळीवाल्यांचं माहीत नाही.
Characters establishment नीट झालं नाही असा संशय आला. प्रमुख व्यक्तिरेखांच्या घरी दुसरे कुणीच नसतात का? आईबाबा, सासूसासरे, भाऊबहीण, चुलते, मावशे, मित्र.
डेंटिस्ट, साय्कियाट्रिस्ट यांना रात्रभरात त्यांच्या फॅमिली मेंबर्सपैकी कुणाचाच फोन येत नाही! (बहुधा शुटिंगच्या तारखा फॅमिली मेम्बरांना माहीत असतील.)
साय्कियाट्रिस्टचा मोठा बंगला आहे. त्यात तो एकटाच राहतो. पूजा करतो. हा स्वतःच पेशंटचं समुपदेशन करतो!!!
साय्कियाट्रिस्टपेक्षा ही व्यक्तिरेखा समुपदेशकाची आणखी रास्त झाली असती. पण ते एक असो.
आणखी एकदातरी सिनेमा पाहीन म्हणतो म्हणजे आणखी काही कंगोरे लक्षात येतील.

लित आणि वै त नाही हो तसा......>>> वैभव तत्त्ववादी ? हे आडनाव आहे कि ऊफ्फ मेरे ऊसूल ? एका रेडीओ एफ एम वर निवेदक त्याला मराठीतला ऋत्विक रोशन म्हणत होता.

हृषिकेश रांगणेकर म्हणतात..
पूर्वार्धातला सिरीयस सिनेमा सेकंड हाफमध्ये अचानक डार्क ह्युमरची व्हेन पकडू पाहतो, ते ट्रान्झिशन पचलं नाही
>>>>>

पुर्वार्धही सिरीअस नव्हतो हो, फक्त त्यातला ह्युमर वेगळा होता. नंतरच्यासारखा खळखळून हसवणारा नव्हता. त्यामुळे प्रत्येकाला कळेल असेच नाही.
आणि बहुधा त्यामुळेच गल्लत झाली असावी. त्यामुळे हा पिक्चर मर्डर मिस्ट्री म्हणून बघितला गेला असावा आणि असे डिटेल्स लूपह्ल्स ते शोधत बसले Happy
बाकी हल्ली मुद्दाम पेड ट्रोलिंगही चालते. असे कुठले रिव्यू वाचून जाऊ नका. एका चांगल्या चित्रपटाला मुकाल Happy

मेजॉरीटी मराठी अ‍ॅक्टर्स असेच तुपकट असतात >>> हा हा, हो खरेय. ओवरऑल मराठी माणसे ऑनस्क्रीन प्रेझेन्सबाबत जरा कमीच पडतात. सुबोध माझ्याही आवडीचा नाही या निकषावर. कालही एंट्रीला तो तसाच वाटला. पण मग जी कमाल बेअरींग पकडली ते उत्तर्रार्धात स्वप्निललाही खाऊन टाकले.

स्वप्निल मात्र आता सैफ अली खान आणि शाहीद कपूरसारखा झालाय. हे तिघेही आधीची चॉकलेट बॉय वा गुज्जीगुजी इमेज सोडून डॅशिंग झालेत. त्यामुळे स्वप्निलचे पिक्चर बघायला हल्ली जास्त मजा येते. त्याच्या डायलॉग डिलीव्हरीचा टायमिंग आधीपासून जबरदस्त होताच. त्याचा या रोलमध्ये खूप फायदा झाला. फर्स्ट हाल्फ तर त्याचाच होता.

स्वप्निल मात्र आता सैफ अली खान आणि शाहीद कपूरसारखा झालाय.
->>> आवरा ..... स्व जो ची तुलना सैफ शी करा... चालेल... शाहिद ला काढा लिस्ट मधून.... शाहिद म्हणजे दिलीप कुमार, अमिताभ बच्चन शाहरुख खान लेव्हल आहे...

रांगणेकर बळेबळेच नावे ठेवत आहेत. ते एक शहाणे आणि बाकी हसणारी जनता मूर्ख असे आहे का.
मला काही गोष्टी कळल्या नाहीत. सु भा म्हणतो वीस वर्षाचं करिअर पाण्यात जाईल ते का. पेशंटबरोबर संबंध ठेवले म्हणून का. अनिता घटस्फोट का देत नसते जर ती गरोदर असते तर. शेवटी वाळवीने अनिताच्या खुनाचा नकळत बदला घेतला असे काही रूपक होते का.
आजूबाजूला बसलेले लोक प्रचंड चावचाव करतात. त्यात काही संवाद निघून जातात, समजत नाहीत आणि यातले संवाद खरेच चुरचुरीत आहेत. ती संभेराव दिसल्यावर तर लोक लगेच अरे ही ती हास्यजत्रावाली असे मोठ्याने बोलायला लागले.

हा पाहणार आहे. बरयाच दिवसांनी एखादा मराठी सिनेमा पहावासा वाटतोय. पण आमच्या गावात नाही आला आहे. ओटीटी वरच पाहावा लागणार

त्यामुळे हा पिक्चर मर्डर मिस्ट्री म्हणून बघितला गेला असावा >>> हे काय लिहीलेय रून्मेशजी आपण ? मर्डर मिस्ट्री नाहीये का हा सिनेमा ? तसे असेल तर..
काही प्रतिसाद स्पॉईलरची काळजी न घेता येत आहेत. >>> याला काय अर्थ आहे बरं ? चला, पंधरा वीस प्रतिसाद या विषयावर होतील.

ती संभेराव दिसल्यावर तर लोक लगेच >>> अर्रर्र , तिला घेतलेय का ? मग ओटीटीवर पण नाही बघणार. ( वीसेक प्रतिसादांची सोय)
संभेराव ने प्रचंड ओव्हर ऍक्टिंग केली आहे... लाऊड...>>> झंपु शी सहमत

संभेराव ने प्रचंड ओव्हर ऍक्टिंग केली आहे... लाऊड...
>>>>
दिग्दर्शकाला तेच अपेक्षित असावे. तिचा गोंगाट.

सर अजून जानेवारी महिना चालू आहे
आणि ह्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ?? >>>> १ फेब्रुवारीला धूमकेतू निघत असल्याने हे धोंड्याचे वर्ष जाहीर केले आहे. ३१ जानेवारीला ते संपेल. खरे तर धाग्याच्या शीर्षकात आता बदल करणे शक्य नसल्याने वर्षच आक्रसण्याचा निर्णय उच्च पातळीवर घेतला आहे.

धागा पळावा म्हणून इतके प्रतिसाद दिले. झंपु उर्फ च्रप्सचा तर पत्ताच नाही. अशाने कसा पळणार धागा ?

परेश मोकाशी हा एक उत्तम दिग्दर्शक आहे. त्याचे समुद्र नाटक पाहुन खुप प्रभावीत झालो होतो. भन्नाट कल्पनाशक्ती वापरली होती. दोन पात्री नाटक होत. अतुल कुल्कर्णी आणि केतकी थत्ते . मु. पोश्ट बोम्बिलवाडी पण छान होत. वैभव मान्गले, ह्रिशिकेश जोशी , जितेन्द्र जोशी हे सगळे नवीन होते त्या वेळेस .

Pages