आप्पेपात्रातले कोफ्ते : आफ्ता करी

Submitted by अस्मिता. on 15 January, 2023 - 10:51
कोफ्ता करी
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोफ्त्यांसाठी :
किसलेले पनीर एक वाटी , साधारण पाऊन वाटी चितळे गुलाबजामचे कोरडे मिक्स, किसलेले गाजर अर्धी वाटी, दोन बटाटे उकडून किसून, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, पाच काजू- अर्धबोबडे ,चिमूटभर वेलची पूड, अर्धा चमचा साखर , मीठ, चमचाभर तिखट, चमचाभर गरम मसाला , दोन चिमूट कसूरी मेथी. परतण्यासाठी तेल. पत्ताकोबी घरात असूनही लक्षात आले नाही घालायचे.

करीसाठी:
दोन कांदे, चार टोमॅटो, प्रत्येकी एकएक चमचा आलेलसूण पेस्ट, चमचाभर तिखट,१- २ चमचे गरम मसाला / शाही पनीर मसाला,चिमूटभर वेलची पूड, अर्धा चमचा साखर, मीठ, चिमूटभर हळद, दोन तमालपत्रं, अर्धा कप दूध ,अर्धा कप हाफ अँड हाफ. जी अर्धी मलाई असते, त्यातल्यात्यात कमी स्निग्धांश असलेली मलई असते.

क्रमवार पाककृती: 

कोफ्त्यांसाठी वर दिलेले सगळे घटक एका मोठ्या बोलमधे गोळा करा. हलक्या हाताने मिसळून व मळून गोळे करून घ्या. 'हलक्या हाताने' लक्षात ठेवा कारण हे बेसनाचे लाडू नव्हेत. दाबून मळलेले कोफ्ते गच्च होतात व पोटांत (त्यांच्या) कच्चे रहातात. शिवाय आपण तळून न घेता परतून घेणार आहोत, म्हणून वरून किंचित चपटेही चालतील. पृथ्वी जशी जिऑईड आकाराची आहे तसे , अजून चपटे झाले तर उडत्या तबकड्या होतील , हाकानाका. त्याही चालतील.

१. जिऑईडपूर्व मिश्रण
tempFileForShare_20230115-083800_0.jpg
२. मिश्रणात तेल घातले की नाही की Proud लक्षात नाही.
३. हे चेंडू किंवा तबकड्या आप्पेपात्रात व्यवस्थित परतून घ्या. दोनतीन थेंब तेल घालून प्रत्येक बाजू परतायला मध्यम आचेवर तापलेल्या आप्पेपात्रात तीन मिनिटे तरी लागतील. आच वाढवली की पटकन होतात पण आतून कच्चे रहातात , शिवाय यात गुलाबजाम मिक्स मधली दूधाची पावडर व पनीर ह्यां दोन्ही घटकांत असलेल्या प्रथिनांमुळे हा पदार्थ चटकन करपतो व काळे डाग पडतात. प्रोटीनच्या साखळीमुळे असे होत असावे.
Screenshot_20230115_083627.jpg

४. तयार आफ्ते=आप्पे+कोफ्ते
Screenshot_20230115_083640.jpg

माझ्याकडे चांगले आप्पेपात्र आहे पण कपाटाची अवस्था 'हंड्यावर हंडे , हंड्यावर हंडे ठेवले सात, त्याच्यावर ठेवली परात' अशी आहे. हे हाताशी आले तेच घेतले.
अवांतर: 'हंड्यावर हंडे , हंड्यावर हंडे, हंड्यावर हंडे ठेवले सात, त्यावर ठेवली परात,' एवढं बिल्डअप करून जुन्याकाळच्या मुली लक्ष्मीकांतरावांच्या किंवा कमलाकररावांच्या घरात वगैरे यमक जोडायच्या, गेला बाजार ह्रितिकराव-जॉनराव तरी ऐकायला न्याय्य वाटलं असतं. असो. Wink

५. दोन कांदे , आले लसून पेस्ट एकत्र करून थोड्या तेलावर+थोड्या लोण्यावर दोन तमालपत्रं घालून परतली, क्रिमी दिसायला लागल्यावर दोन टमाट्यांची पेस्ट त्यावर घातली . दोन उकळ्या येऊ दिल्या.
Screenshot_20230115_083617.jpg
६. परतून झाल्यावर त्यात कोरडे मसाले , साखर , वेलची पूड वगैरे घालून अजून दहा मिनिटे उकळले, मलई व दूध थोडे उकळून कसूरी मेथी घातली.
७. अगदी खायच्या पाच मिनिटे आधी आफ्ते यांत सोडले. घटकाभर मंद आचेवर राहू दिले .
Screenshot_20230115_083606.jpg
कोफ्ते मऊच हवे असतील तर अजून शिजवून घ्या. आमच्याकडे भारतदेशाप्रमाणे कोणीतरी एकजण नेहमीच विरोधीपार्टीत असते. त्या एकाला हे मुरलेले आफ्ते दुसऱ्या दिवशी आवडले, बाकीच्यांना काही फरक पडला नाही. पण हे मुरलेले अगदी बाहेरच्या कोफ्त्यांसारखे लागतात!!!

©अस्मिता Happy

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी २ वेळा
अधिक टिपा: 

हे त्यातल्यात्यात कमी स्निग्धं आहे. फॅट फ्री नाही व आरोग्यदायी नाही. सोपे व घरगुती आणि ताजे असल्याने छानच लागते.

माहितीचा स्रोत: 
आप्पेपात्रासोबत मिळालेले बुकलेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<कोफ्ते गच्च होतात व पोटांत (त्यांच्या) कच्चे रहातात. >>>
कंसातील शब्द लिहिल्याबद्दल शि सा न...
नाहीतर (माझ्या ) पोटात गोळा आला असता..

बाकी रेसिपी एकदम चविष्ट आहे Happy

मस्त वर्णन कृतीचं, actual recipe कडे लक्ष कमी गेलं, तुझे वर्णन वाचून

' लक्षात ठेवा कारण हे बेसनाचे लाडू नव्हेत. >> मला वाटलं मलाच सांगतेय Happy

मस्त रेसिपी आणि लिहायची स्टाईल. मी असेच करते, गाजरा ऐवजी दुधी भोपळ्या चा किस. दुधी चे कोफ्ते!

वाह वाह
छानच दिसत आहेत.
आयते मिळाले तर बेस्ट Lol
साखर का बरे?
गोड कोफ्ते का?

मी फक्त पनीर आणि बटाटे वापरून करते कोफ्ते नेहमी आप्पे पात्रात. सोप्पे वाटते आप्पे पात्रात करणे. इथे लिहिली होती रेसिपी.
भाज्या घालून कधी केले नाहीत. करून बघेन एखाद्या वेळी.

पाककृतीकडे लक्ष जात नसले तरीही मी पाककृती जास्तीत जास्त योग्य देण्याचा प्रयत्न केलाय बरं Happy

झकासराव,
साखर चिमूटभर आहे, गोड होत नाहीत. ही करी जरा गोडसर व कमी मसालेदार चांगली लागते. Happy

धनवन्ती ,
पोटात गोळा Proud

आशू,
दूधी भोपळ्याला पाणी फार सुटतं म्हणून असं ट्राय केलं नाही कधी. सध्या दुधी भोपळा किमान पाच वर्षे तरी आणायचा नाही असं सर्वानुमते ठरलयं. फार फार कंटाळा आलाय दुधीचा. Happy

अल्पना,
हो मी एकदा केले होते ते , कबाब नाव दिले व नुसतेचं खाल्ले. Happy

देवकी तै, प्राजक्ता, TI, धनवन्ती, मृ, अन्जूताई, इवाना, गौरी, अल्पना, भरत , आशु , झकासराव सर्वांना धन्यवाद. Happy

पाकृ आणि त्यापेक्षा लिहिण्याची स्टाईल आवडली. माझ्या आवाक्याच्या बाहेर कृती असल्याने असल्याने माझा पास. कधी स्वतःचा सुग्रणपणा दाखवण्याची हौस आली तर नक्की बनवेन.

आआ हा हा हा ! सकाळी सकाळी न्याहारी करताना माबोवर सुद्धा किती तोंपासू न्याहारी मिळाली.
काय ते वर्णन, काय ते फोटो... सगळं एकदम कोफ्ते मधेच हाय.... आपलं ओक्के मध्येच आहे.
क्या बात!

>> उडत्या तबकड्या
Biggrin

यमकाचा उल्लेख केलात ना धाग्यात? घ्या आता भोगा....

या चविष्ट उडत्या तबकड्या
एलियन होऊन खाव्यात गड्या
मग सरळ नी कधी वाकड्या
माबोवर येऊन माराव्या उड्या
Proud

आप्पे पात्रातील कोफ्ते चांगली आयडियाची कल्पना आहे! Happy

करी देखिल छान दिसतेय!

मला दुग्धयुक्त किंवा दुग्धजन्य पदार्थापासून बनविलेल्या भाज्या आमट्या फारश्या आवडत नाहीत अपवाद फक्त ताकापासून बनविलेल्या कढीचा.

मस्त आणि सोपी आहे रेसिपी....करून बघते... वेलची पूड एकदम च नवीन addition आहे माझ्यासाठी....सगळ्याच पंजाबी gravy मध्ये घालू शकतो का?

माझ्या विद्यार्थ्यांची पाकशास्त्रातील प्रगती पाहून ऊर भरून येतो. खूप छान प्रगती केली आहे.
हळूहळू दोन बोटात एक एक आप्पा पकडून बत्तीच्या आंचेवर भाजताना तेलाचे थेंब शिंपडून रूचकर आप्पे बनवता येऊ लागले कि गुरूदक्षिणा भरून पावलो...
थोड्या मोठ्या आकाराच्या बनवल्या तर वॉटर स्लाईड्स / ट्यूबमधे उपयोग होतो.
बाकी लेख आणि आप्पे खुसखुशीत झाले आहेत.

हो केया, घालू शकतो. रादर घालावीच. ह्या माईल्ड क्रिमी भाज्यांमध्ये खुलते ती चव. Happy

अतुल Lol

रघू आचार्य, Lol असेच आशीर्वाद असू द्यात. मी एकलव्य तुम्ही द्रोणाचार्य , गुरूदक्षिणा म्हणून बत्तीवरील आप्पे जमल्यावर अंगठ्या ऐवजी 'थंब इमोजी' देईन. Proud

धन्यवाद माझे मन, केया, अतुल , आचार्य, रश्मी , ऋ, कृष्णा, रश्मी. Happy

मस्त लिहिलंय
करून दे
खायला येईन
Yummy वाटत आहे

छानच दिसतोय आफ्ता. राहुल देशपांडेच्या आवाजात गाणं ऐकू येतंय - दिल की तपिश आज है आफ्ता.

Pages