वात - चाल

Submitted by Mukund Ingale on 9 January, 2023 - 00:27

WhatsApp Image 2023-01-10 at 6.37.30 PM.jpeg

Fakemytrip by Mukund
म्हणजे (काही खरे काही खोटे)
वात - चाल
तिरुवनंतपुरमहून अल्पुषाकडे निघालात की वाटेवर कोचीच्या पुढे पारावूरचा फाटा लागतो.गर्द झाडीत लपलेली घरे हळूहळू दिसू लागतात.आणि एलूर गाव लागते.गावातून पुढे गेल्यावर जवळच हे मंदिर आहे.
खास केरळी पद्मनाभ पद्धतीने बांधलेले हे देऊळ देवाचे दर्शन घेतानाच अंतर्मुख करते. लाकडी कडीपाटावरील रेखीव कोरीव काम,उंच गाभारा..जवळच एक पुष्करणी .
देवळाचेही दर्शन घेत आपण बाहेर येऊन बसलो आणि त्या समोरच्या झाडाचे हे दृश्य बघतोय.

चौकोनी नीटनेटका बांधलेला पार, बुंध्याच्या अवतीभवती मातीत उगवलेली काही नवी रोपे आणि एक जुनी समई ..पारंपारिक दिवे..निलाविलाक्कु म्हणतात तिला.
सहज मनात विचार आला.आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक ही ऊर्जा स्थाने,प्रेरणास्थाने तयार केली आहेत.
देऊळ प्राचीन..झाड जुने.. पार जुनाच पण वेळोवेळी दुरुस्त केलेला.. समई जुनीच..छान काळाची पुटे चढलेली.
पण पहिल्यांदा त्यात वाती चेतवून कुणी तरी डोळ्यात भरणारे दृश्य पाहिले असेल..डोळे भरून ..कित्येक शतकांपूर्वी. आणि आज मी पाहतोय तेच दृश्य ..अगदी तसेच, त्याच पवित्र भावनेने,भरून जाऊन.. भारुन जाऊन.
फरक फक्त वातींचा आहे.आजच्या या वाती जोडतात दोन काळाच्या अंतराचा धागा ..प्रकाशतात आणि उजळतात मनाचा गाभारा. प्रत्येक पिढीच्या वाती नव्या पण ज्योती त्याच..तितक्याच प्राचीन.
आणि मी मलाच दिसतोय...असाच "आत" आणि आतासुद्धा वाती चेतवून याच वातावरणात,याच जागी असाच निवांत बसलेला...
काही शतकांपूर्वी.
मुकुंद इंगळे

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults