अज्ञातवासी - S02E10- पाच भुते!

Submitted by अज्ञातवासी on 6 January, 2023 - 11:26

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/82843

काही दिवसांपूर्वी!
"गफूरभाई सलाम वालेकुम!"
समोरच्या व्यक्तीला बघताच गफूरभाई ताडकन उठला.
"वालेकुम सलाम अकबरभाई... कैसे आना हुआ? हमको बुला लेते."
"अभीतक आप भाई थे, आप अब डॉन बनने वाले हो."
"मतलब?"
"डिसुझा का फोन आया था. बोल रहा है, आपको नासिक दिला सकता हू!"
"पागल हो गया है वो!"
"मुझे भी ऐसा ही लगा, पर जब देवराज जाधव का भी कॉल आया, तब मैं थोडा सिरियस हुवा."
"अकबरभाई अपने पास जितनी गोलिया है ना, उतनी उनके पास बस बंदूके है."
अकबर हसला.
"चलो बाहर चलते है."
दोघेजण बाहेर आले.
गफूर डोळे फाडून बघतच राहिला.
समोर आठ खचाखच भरलेल्या ट्रक होत्या.
"अकबरभाई, कैसे?"
"दुबईसे संदेसा है गफूर. तुम्हारे लिये! और ये माल भी. नासिक तुम्हारा है."
"इंशाअल्ला! तो समाधानाने म्हणाला.
*****
मोक्ष रात्री घरी आला.
'शेखावतची कॉल रेकॉर्डिंग ऐकायला हवी.' त्याने स्वत:शीच विचार केला.
बराच वेळ निरुपद्रवी संभाषण ऐकल्यावर कंटाळून तो हेडफोन ठेवणार तेवढ्यात...
'शेखावत, अजूनही वेळ आहे, सोबत ये. जाधवसुद्धा माझ्यासोबत आहे. उद्या गफूरभाई येतोय नाशिकला, आणि परवा बघ, शेलार आणि त्याच्या साथीदारांचं नामोनिशाण राहणार नाही.'
'डिसुझा, नक्की करणार काय आहेस तू?'
'आठ ट्रक दारूगोळा, आधी खानची सगळी माणसे उडवायची, आणि नंतर सगळे शेलार.'
'डिसुझा, मूर्खपणा करू नको.'
'शेखावत, माझ्या आड येऊ नको. फुकट मरशील.
फोन कट झाला.
मोक्षने हेडफोन काढले, आणि तडक खानसाहेबांना फोन लावला.
"खानसाहेब, असाल तसे इकडे या."
थोड्याच वेळात खानसाहेब हजर झाले.
आता मध्यरात्र चालू झाली होती.
मोक्षने खानसाहेबाना क्लिप ऐकवली.
खानसाहेब थोडावेळ विचारात पडले, आणि त्यानंतर निर्धाराने उठले.
"मी माझी माणसे तयार करतो."
"गरज नाही." मोक्ष म्हणाला.
"मग फुकट मरायचं?" खानसाहेब वैतागले.
"नाही. पण कुणालाही मरू द्यायचं नाही."
"दादा, करायचं काय नेमकं"
"तुमची वायनरीत किती माणसे कामाला आहेत?"
"असतील दहा वीस."
"नवीन रिसॉर्टला?"
"आठ नऊ."
"पुरे आहेत. बोलवा त्यांना."
"आता?"
"मग आपण वर गेल्यावर?" मोक्षने प्रश्न केला.
खानसाहेबानी फोन लावला. बराच वेळ त्यांचं फोनवर बोलणं चालू होतं.
"येतायेत लोक."
"आरडीएक्स किती आहे तुमच्याकडे खानसाहेब?"
"काय?" खानसाहेब आश्चर्याने मोक्षकडे बघत म्हणाले.
"आरडीएक्स!"
"प्लॅन काय आहे मोक्षसाहेब?"
"ते जिथे असतील तिथल्या तिथे त्यांना उडवायचं!"
"नाशकात आजपर्यंत कधीही बॉम्बस्फोट झालेला नाही दादा, संपूर्ण नाशिक हादरेल. सगळी गणिते बदलून जातील."
"काही गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच घडतात खानसाहेब... होईल सगळ्यांना सवय."
"बॉम्बस्फोटांची?"
"मोक्ष राजशेखर शेलारची..."
खानसाहेब मोक्षकडे बघतच राहिले.
"किती आहे आरडीएक्स?"
"एक टन..."
"परफेक्ट. प्लांट आणि कनेक्शन करायला काही अडचण?"
"नव्या रिसॉर्टमध्ये सिमेंटच्या गोण्या म्हणून ठेवून देऊ."
"बाकीचं वायनरीच्या स्टोअर्स मध्ये रचून ठेवा. कुणाला संशय येणार नाही. कनेक्शन कसं कराल?"
"नोकिया तेहेतीस दहा..."
"तो तर अणुबॉम्बच्या स्फोटात फुटणार नाही." मोक्ष हसला.
खानसाहेब अजूनही गंभीर होते.
"आणि हो, ही खबर बाहेर कुणालाही कळायला नको. सगळं नॉर्मल रहायला हवं. उद्या चाचीना बिर्याणी बनवायला लावा. मी येईन दुपारी जेवायला..."
"ठीक आहे दादा."
"चला, तयारीला लागा. महादेव कायम यशच देईल..."
"आणि नाही मिळालं तर..." खानसाहेबांनी साशंक मनाने विचारले.
"तर शेलार फायरवर्क्सची एकूण एक गोळी उद्या त्यांच्या शरीरात असेल." मोक्ष म्हणाला.
खानसाहेब चपापले, आणि तिथून निघाले.
*****
"जेवायचं नाही का?" मोक्षने श्रेयाला विचारले.
ती अजूनही धक्यातच होती.
"अगं जेवायचं नाही का?" त्याने पुन्हा विचारले.
ती भानावर आली, आणि तिने त्याचा दंड सोडला.
"सॉरी..." ती ओशाळून म्हणाली.
"पोज छान होती श्रेया." तो हसत म्हणाला.
विखुरलेल्या काचा टाळून दोघेही आत आले.
टेबलला तडा गेला होता.
इथेच बसूयात. तुटणार नाही हा टेबल. मोक्ष म्हणाला.
"काय केलंस मोक्षा, आजपर्यंत मी असं काहीही कधीही बघितलं नाही."
"बघणारही नाहीस. आणि अजून एक सांगू?"
"बोल."
"आपला एकही माणूस या स्फोटात गेला नाही. डिसुझाने आधीच वायनरीतून सगळ्या लोकांना निक्षून घरी जायला लावलं होतं. सिक्युरिटीसुद्धा नव्हती. जेवढ्या किंकाळ्या तू ऐकल्या, ही सगळी गफूरची माणसे होते, आणि आपला एक माणूस."
"कोण?"
"लिओनेल डिसुझा... आता पाचच भुते उरलीत श्रेया."
श्रेयाच्या अंगावर सरसरून काटा आला.
काहीतरी प्रचंड वेगाने बदलल्याची तिला जाणीव झाली...
दादासाहेब आणि सहा भुते, अभेद्य समीकरण.
पटावरचा राजा गेला होता, मात्र हे सहा वजीर अभेद्य होते.
नवीन राजा आल्याचाच धक्का अजून नवीन होता.
...आणि आल्या आल्या राजाने एक वजीर उडवला होता...
आपल्या माणसांचा रक्ताचा एक थेंब न सांडता!
तिचं विचारचक्र थांबत नव्हतं.
"श्रेया... डिनर आलाय." त्याच्या आवाजाने ती भानावर आली.
"चल, मला जावं लागेल. पण तू एकटी जेवणार नाहीस."
ती त्याला प्रश्न विचारायच्याही मनस्थितीत नव्हती.
तेवढ्यात एक बाई दरवाजातून आत आली.
"आई!" ती किंचाळलीच.
"शांत हो श्रेया, मला सगळं माहिती होतं..." अस्मिता राणे म्हणाल्या.
*****
खानसाहेब गेले.
मोक्ष विचारांच्या तंद्रीत गढला.
शेवटी न राहवून त्याने फोन उचलला.
रिंग वाजत होती.
"मोक्ष, अरे इतक्या रात्री. काय झालं."
तो क्षणभर काहीही बोलला नाही.
"अरे बोल ना, काय झालं."
"आत्या, जर मला माझ्या माणसांसाठी राक्षस बनावं लागलं तर?"
तिकडून क्षणभर काहीही आवाज आला नाही.
"आत्या..."
"नक्की बन, कारण रावण कितीही वाईट असला, तरीही त्याच्या माणसांसाठी त्याने सोन्याची लंका बनवली."
मोक्ष हसला.
"ठीक आहे. मग ऐका..."
त्याने सांगायला सुरुवात केली.
*****
त्या अग्नीवर्षावाने संपूर्ण नाशिक हादरलं...
त्या रात्री दिवसाचा भास झाला.
संपूर्ण वायनरी आणि बाजूचा परिसर जळून राख झाला. एकेकाळचं नाशिकचं वैभव राख झालं.
खानसाहेब हवेलीत चिंताक्रांत बसले होते.
दूरवर मोठाच मोठा आगीचा पसरलेला लोळ त्यांना दिसला...
थोडावेळ ते सुन्नच झाले.
आणि नंतर हर्षारितेकाने त्यांनी आरोळीच ठोकली...
शेखावत चिंताक्रांत अवस्थेत त्याच्या बंगल्यात बसला होता.
जोरदार आवाजाने तो बाहेर आला.
समोरचा आगीचा लोळ बघून तो जागीच स्तब्ध झाला.
"डिसुझा, दोस्त था तू मारा!"
डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला, आणि तसाच आत धावला.
त्याने कपाट उघडलं, त्यातून एक जुना फोन बाहेर काढला.
प्लस नाईन सेवन वन... त्याने नंबर डायल केला.
रिंग जाऊ लागली... त्याची धडधड अजून वाढली.
तिकडून फोन उचलला गेला.
"आठ ट्रक, गफूर आणि डिसुझा, सगळ्यांची राख झाली. शेलारांच्या एकही माणसाला धक्का लागला नाही."
तिकडून हसण्याचा आवाज आला.
त्याने दीर्घ श्वास घेतला...
"डिसुझा आणि गफूर, मी उडवायच्या आधीच मोक्षने त्यांना उडवलं."
तिकडून काहीही आवाज आला नाही.
"अजूनही वाट बघणार आहात?" शेखावतने विचारले.
तिकडून फोन कट झाला.
शेखावतने फोन परत जागेवर ठेवला.
"जय एकलिंगजी!" त्याने सुस्कारा सोडला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@धनवन्ती - धन्यवाद! बहुतेक रविवारी रात्री अजून एक भाग येईन
@अज्ञानी - धन्यवाद! बघू, पुढे काय होतं ते.
@आबा - धन्यवाद! धमाका तर मागच्याच भागात झाला Wink