मुंबई-हेरिटेज वॉक

Submitted by TI on 2 January, 2023 - 01:28

मुंबई नुसतं नाव ऐकलं तरी गजबजाट, गर्दी, सतत धावणारी माणसं, पळणाऱ्या ट्रेन्स आणि गाड्या असं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं, आणि खरोखरच मुंबई अगदी तशीच आहे. सततची गर्दी असलेलं हे ७ बेटांनी बनलेलं शहर, भारताची आर्थिक राजधानी, सिमेंट काँक्रीटचं जंगल आणि घडाळ्याच्या काट्यावर धावणारी लोकं हीच मुंबईची ओळख बनली आहे, पण ऐतिहासिक वारसा लाभलेली हीच मुंबई इतकी बघणीय असेल हे ऐकून बऱ्याच लोकांना नवल वाटतं. मुंबईच देखणेपण हे इथल्या गल्ल्या-बोळात फिरल्याशिवाय कळणं तसं अवघड!

काल हेरिटेज वॉक च्या निमित्ताने साहेबाची जुनी मुंबई बघण्याचा बेत जमला. सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून झाली, रेल्वेने आम्ही CST स्टेशनला पोचलो, मुंबईत प्रथम येणाऱ्याला स्टेशनची हि बिल्डिंग भुरळ पाडतेच पण रोज ट्रेनने प्रवास करून येणाऱ्याला सुद्धा ह्या बिल्डिंगबद्दल तितकंच अप्रूप वाटतं.

पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ची हि वास्तू आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये गणली जाते. ब्रिटिश आर्किटेक्ट फ्रेडरिक विलियम स्टीव्हज ह्याने इटालियन-गॉथिक पद्धतीने बांधलेली ही वास्तू अतिशय देखणी आहे. १८८७ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले. अप्रतिम स्थापत्याचा नमुना म्हणून ही आजही ओळखली जाते. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे च्या सेंट्रल रेल्वे जाळ्याला जोडणारे मुख्य ठिकाण म्हणजे CST स्टेशन.इथून साधारण १ किमी अंतरावर हेरिटेज वॉकचा आमचा पहिला स्टॉप होता एशियाटिक सोसायटी लायब्ररी.

एशियाटिक सोसायटी लायब्ररी अथवा टाऊन हॉल हे एक राज्य केंद्रीय ग्रंथालय आहे. १८३१ साली बांधून पूर्ण झालेली ही वास्तू, नियोक्लासिकल आर्किटेक्चर शैलीत बांधलेली असून आजच्या घडीला इकडे संस्कृत, मराठी, हिंदी, प्राकृत, पर्शिअन, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इंग्रजी अशा अनेक भाषांमधली पुस्तकं, ग्रंथ, हस्तलिखिते किमान एक लाखांहून अधिक ग्रंथ, १२०० हुन अधिक नकाशे आणि पोथ्या संग्रहित आहेत. एशियाटिक सोसायटी समोरच हॉर्निमन सर्कल किंवा बँक स्ट्रीट परिसर आहे. हॉर्निमन सर्कल गार्डनला त्याच्या वर्तुळाकार आकारावरून नाव देण्यात आलं होतं. गार्डनच्या सभोवती युरोपियन धाटणीच्या बिल्डींग्स आहेत. पूर्वी ह्याचं नाव एल्फिस्टन गार्डन होतं, स्वातंत्र्यानंतर या भागाला पत्रकार बेंजामिन हॉर्निमन ह्यांच्या नावावरून हॉर्निमन गार्डन असं नाव देण्यात आलं.

पुढे आम्ही बँक स्ट्रीट आणि काळा घोडाच्या गल्ल्यांमध्ये इतिहासाच्या खुणा शोधत मुक्त भटकंती केली. ज्यू समाजाचे प्रार्थना स्थळ केनेसेथ अलियाहु सिनॅगॉग, आजूबाजूचे लहान लहान कॅफेज आणि युरोपियन धाटणीच्या इमारती पाहून मला गोव्याच्या फौंटनहासची आठवण झाली, तिथल्याच एका कॅफे मध्ये मनसोक्त नाश्ता करून पुढे आमची पावलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे वळली. पूर्वीचे हे म्युझिअम २० व्या शतकात बांधलं गेलंय. ब्रिटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेट याने हिंदू, राजपूत आणि इस्लामी बांधकाम तंत्राचा वापर केलेला दिसतो. प्रत्येक मंगळवारी विद्यार्थी आणि लहान मुलांना इथे मोफत प्रवेश आहे. संग्रहालयात अनेक दालनं आहेत. संपूर्ण संग्रहालय बघण्यासाठी कमीत कमी २-३ तास लागतात. मुळात ऐतिहासिक वास्तू आणि आतल्या ऐतिहासिक गोष्टी बघून आम्ही भारावून गेलो. मुंबईत लहानपण गेलेल्या, मुंबईत शाळेत गेलेल्या , प्रत्येकाला लहानपणी इथे सहलीला आल्याचे नक्कीच आठवत असेल. इकडे फिरताना शाळेतले आम्ही आठवून खूप मजा वाटली. सध्या बरेच आधुनिक बदल बघायला मिळाले. नूतनीकरणामुळे नक्कीच पर्यटकांची गर्दी जास्त होत असेल. काळा घोडा शिल्पापासून संग्रहालय अंदाजे ८०० मीटर वर आहे. चालत अगदी १० मिनिटांच्या अंतरावर. तसेच पुढे चालत गेल्यावर गेट वे ऑफ इंडियाला पोचलो. मुंबईची ओळख म्हणून प्रसिद्ध असणारं हे ठिकाण. १९२४ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले. संपूर्ण बेसॉल्ट खडकात बांधलेली ही इमारत ८५ फूट उंच असून किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी ह्यांच्य्या भेटीची आठवण म्हणून बांधल्याचे ह्यावर असलेल्या शिलालेखांतून स्पष्ट होते. इंडो- सरसेनिक शैलीचे बांधकाम, समोर अथांग अरेबियन समुद्र, काठाला झुलणाऱ्या लहान मोठ्या होड्या बघत आम्ही बराच वेळ तिथे थांबलो.

थोडं पुढे कोलाबा कॉजवे ला मनसोक्त खरेदी करून घेतली. फोर्ट भागात फिरण्याचा कधीही कंटाळा येत नाही, ह्याची प्रचिती प्रत्त्येक वेळी होते तशी आताही झालीच. दिवस ओसरला तसे आम्ही पुन्हा CST स्टेशनला आलो. हेरिटेज वॉक/ टूर संपली. आता परत ही वास्तू डोळ्यात साठवून निघायची वेळ झाली. पळत पळत ट्रेन न पकडता परत आलो असतो तर जणू पाप लागलं असतं त्यामुळे तेही करून झालं.

मुंबईत फिरण्यासाठीच्या बऱ्याच जागा आहेत आणि त्यासाठी असे हेरिटेज वॉक्सही बऱ्याच कंपन्या अरेंज करतात. वाळकेश्वर, बाणगंगा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तारापोरवाला मत्सालय, क्रॉफर्ड मार्केट,भुलेश्वर मार्केट, नेहरू तारांगण, एलिफन्टा लेणी या आणि अशा अनेक जागांना भेट देऊ शकतो. संध्याकाळी मरिन ड्राइव्ह वर मावळता सूर्य बघणे किंवा रात्री खूप उशिरा सुद्धा तिथे नुसतं बसून समुद्र आणि रात्रीची मुंबई बघणे हे अनुभव निव्वळ वर्णन न करता फक्त अनुभवावेच असे आहेत. गजबजाटा सोबत आयुष्य जगायला शिकवणारी मुंबई प्रत्येकाला आपलंसं करतेच आणि खऱ्या अर्थाने भरभरून आयुष्य जागायलाही शिकवते हे नक्कीच! कोणीतरी म्हंटलंच आहे ना,

ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ
ज़रा हट के, ज़रा बच के
ये है Bombay मेरी जाँ...!

1. एशियाटिक सोसायटी लायब्ररी
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.35 AM.jpeg

2. हॉर्निमन सर्कल
१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.34 AM (1).jpeg

२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.35 AM (1).jpeg

3. बँक स्ट्रीट, हॉर्निमन सर्कल

WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.34 AM.jpeg

4. लहान गल्ल्या, बँक स्ट्रीट

WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.32 AM.jpeg

5. केनेसेथ अलियाहु सिनॅगॉग

१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.32 AM (1).jpeg

२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.33 AM.jpeg

6. बेकहाऊस कॅफे, काळाघोडा

१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.31 AM (2).jpeg

२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.31 AM (1).jpeg

7. काळाघोडा शिल्प

१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.30 AM.jpeg

२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.30 AM (1).jpeg

8. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय

१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.29 AM (1).jpeg
२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.29 AM (2).jpeg

३.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.30.27 AM.jpeg

9. Kalaghoda-lanes resembling Fountainhas, Goa

१.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.33 AM (1).jpeg
२.
WhatsApp Image 2023-01-02 at 11.01.30 AM (2).jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तै, रिदम हाउस आणि स्ट्रँड बुक स्टॉल बंद पडले आता. एक पर्व संपले>> मला माहीत आहे दादा. पण ती बिल्डिन्ग आहे. मी काळा घोडा लायन्स गेट बस स्टॉपला उतरून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये काम केले आहे. अप डाउन रोज करून. समोरच ते बर्ड हाउस सलीम अली ह्यांची सोसायटी, जुने मॅक्स मुल्लर भवन, टर्निन्ग वरचे बारके शंकराचे मंदीर, चेतना थाली रेस्टॉरंट , बाहेर मिळणा रे वन प्लस वन मघई पान. वे साइड इन. इथे आंबेडकर साहेब ही येत असत - तिथे मिळणारे धान शाक, - पुढे एन जी एम ए. जबरदस्त एरिआ आहे. वेसाइड इन पण बंद झाले बहुतेक आता.

टाउन इज लव्ह.

@ashwimimami, ek lekh tumhi pan liha!
Fort ani aaspaschya bhagatlya khadadi cha goshti gola kelya tar ek lekhmala tayar hoil

@farend- sunday sakal aslyamule raste rikame hote baryapaiki, turalak gardi agdi

छान लेख.. फोटोही सुंदर.!!

मागच्या आठवड्यातच गेटवे ऑफ इंडिया आणि फोर्ट भागात पायपीट केली.. क्रॉफर्ड मार्केट आणि मनिष मार्केटला खरेदी करायची म्हणून अजून फिरता आले नाही... खरंतर मुंबईत फिरायला मला कधीच कंटाळा येत नाही...

लहानपणी मामाकडे मुंबईला जाताना आई म्हणायची जवळ पैसे असतील तर मुंबईला सगळं काही विकत मिळेल फक्त सख्खे आईवडील विकत मिळणार नाहीत...

फेब्रुवारी २०२० ला फोर्टला फिरत असताना कल्पना नसतानाही योगायोगाने काला घोडा महोत्सवाला मुलांसोबत हजेरी लावता आली होती. महोत्सवात तरुणाईचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. .. !!

Hi all we can try a town meet up. Maayboli famous GTG. Kala ghoda festival time is also ok. I can bring perfumes.

काळ्या घोड्यांच्या साक्षीने माबोकरांचा ग्रूप फोटो होईल.
दरवर्षी याच वेळी मिनी गटग फिक्स करायचे. मग सायंकाळी उद्यानात फुले प्रदर्शन.

https://www.holidify.com/pages/kala-ghoda-arts-festival-1607.html
चार फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी आहे. आता मला डबा बनवुन हपिसात जायचे आहे. मग तिथून काढीन नायतर. इस बार तो मिलना है यार सबसे. वो भी टाउन में. गर्दी करके.

Hi ok

मी पुण्याची आहे....आतापर्यंत सगळं आयुष्य पुण्यात गेलंय..पण मुंबईवर अतिशय प्रेम आहे...एकदा मनसोक्त भटकंती करायची आहे मुंबईत...आत्तापर्यंत ते ही लहानपणी दादर,घाटकोपर आणि विक्रोळी इथेच जाणं झालं नातेवाईक होते म्हणून..
३ वर्षापूर्वी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले होते..पण एकटीच होते त्यामुळे फिरले नाही..दर्शन घेऊन परत आले.
मुंबई दर्शनाच्या काही टूर असतील तर नक्की सांगा....
मुंबई दर्शन ही bucket list madhali top priority ahe.

शाहरूखचा मन्नत बंगलाही दाखवतात काही मुंबईदर्शन वाले Happy

आपल्या आवडीनुसार निवडावे. मी कधी अनुभव घेतला नाही. पण चौकशी करणे उत्तम. कारण एक दोन मित्रांचे अनुभव छान नाहीत. फार घाई करतात असे म्हटले. त्यामुळे मी कोणाला फिरवायचे झाल्यास असेच फिरवतो. माझगाव भायखळ्यालाच राहत असल्याने बोरीबंदर ते दादर वरळी वाळकेश्वर सगळी ठिकाणे जवळ पडतात..

पण इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट उत्तम आहे. पुण्याहून व्हीटीला उतरा. टॅक्सी करा व सर्व टाउन बघून घ्या. मग हवे तिकडे जा. दोन तीन दिवस काढून या म्हणजे क्रॉफर्ड मार्केट खरेदी, एक दिवस सेंट्रल साइड एक दिवस वेस्टर्न साइड करता येइल. दिवस भराची कॅब केली तर सोपे एसी कॅब रिअली विल हेल्प.

@अश्विनी_९९९, पुण्याच्या असून मुंबईवर प्रेम ऐकून खूपच बरं वाटलं, अपवाद वगळता बहुतेक पुणेकर मुंबईकर वादच चालू असतो. माबो गटग निमित्ताने या कि मुंबईत. अश्विनी मामींनी सांगितल्या प्रमाणे एखादी AC टॅक्सी करून फिरणे सगळ्यात सोयीचे, मुंबई दर्शन बसेस आहेत पण मग आपल्याला हव तितका वेळ हवं त्या ठिकाणी देणं अवघड जातं. २-४ दिवस ठेऊन या शॉपिंग साठी क्रॉफर्ड मार्केट, मंगलदास मार्केट, हिल रोड लिंकिंग वगरे सगळं करता येईल.

@TI .. धन्यवाद.. माझं मुंबई प्रेम सगळ्या नातेवाईकांमध्ये जगजाहीर आहे... पण मुंबईला आता कोणीच नाही...सगळेच मुंबई सोडून दुसरीकडे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे यायचं निमित्त ही मिळत नाही
गटग ला यायचा नक्की प्रयत्न करणार आहे...

मुंबई आणि ब्रिटिश हे घट्ट नाते आहे.
ज्या काही सुंदर इमारती, लोकेशन्स ,आहेत ते सर्व ब्रिटिश कालीन.
वास्तू शास्त्र चे विविध प्रकार फक्त ब्रिटिश कालीन इमारती मध्येच बघायला मिळतील .
अंबानी पासून शारुख पर्यंत एकाची पण इमारत उत्तम वास्तू शास्त्र, कलाकुसर , रचना ह्या व्याख्येत बसत नाहीत.
फक्त सिमेंट चे रचलेले ठोकळे आहेत ते

अंबानी पासून शारुख पर्यंत एकाची पण इमारत उत्तम वास्तू शास्त्र, कलाकुसर , रचना ह्या व्याख्येत बसत नाहीत.
फक्त सिमेंट चे रचलेले ठोकळे आहेत ते >>>> absolutely

अरे मामी के होते हु ए आप ऐसा कैसे कह सकते है. गटगला या. दोन दिवस राहा. भावोजींना पण आणा म्हणजे इथेच समुद्राच्या साक्षीने व्हॅलेंटाइन डॅ. नरिमन पॉइन्ट ही प्रियाराधना साठीही उत्तम जागा आहे. सन सेट बघा. मग कणसे खा व रात्र झाली की बग्गीतून फिरा. हाय सो स्वीट.

अंबानी पासून शारुख पर्यंत एकाची पण इमारत उत्तम वास्तू शास्त्र, कलाकुसर , रचना ह्या व्याख्येत बसत नाहीत.
फक्त सिमेंट चे रचलेले ठोकळे आहेत ते
>>>>>.

कमॉन डूड... जे लोकं शाहरूखचा बंगला बघायला जातात ते वास्तूकलेचे सौंदर्य बघायला जात नाहीत तर आपला आवडता सुपर्रस्टार कुठे राहतो हे बघायला जातात. भावनाओंके समझो Happy

मुंबई दर्शनाच्या काही टूर असतील तर नक्की सांगा....

मुद्दा नोंदला आहे. पुण्याहून येऊन परत संध्याकाळी अशी यात्रा हा धागा असावा. तिथे माबोकर आपली ठिकाणं सुचतील.

याच संदर्भात सांगायचं तर मुंबईहून पुण्याला जाऊन काय पाहता येईल हेसुद्धा आहे. काही ठिकाणं पुणे टुअरमधून पाहिली होती. जोशींचं रेल्वे म्युझियम राहत होतं. परवा एका लग्नाला सिद्धार्थ पॅलेस, जी.ए.कुलकर्णी पथ (कनालच्या गल्लीत )गेलो होतो. समोरच जि.ए.दोन वर्षं राहिलेला बंगला होता. तशी पाटीही आहे. तर पलिकडच्या बाळकृष्ण जोशी पथावर (chat caffe घ्या बाजूला) रेल्वे म्युझियम सापडले.
"चार जण आणि ४८०रुचं तिकिट काढलं तर लगेच दाखवतो." वरच्या मजल्यावर आहे.

जर्मनीतील तीन मजली रेल्वे म्युझियमची एक तासाची चित्र फीत dwtv चानेलने मागे एकदा दाखवली होती ती आठवली. असो.

छान लिहीले आहे. यु ट्युबवर गोठोस्करांची मस्त सिरीज आहे मुंबईवर. खुप बघण्यासारखी व माहीतीपुर्ण आहे ती सिरीज.

मी मुळचा दादर मुंबईचा. माझ्या लहानपणची( ७० च्या दशकातील) मुंबई फारच वेगळी होती. आता जेव्हा अमेरिकेतुन मुंबईला भेट द्यायला जातो तेव्हा हीच का ती मुंबई हा प्रश्न पडतो. काँक्रीटचे जंगल वाटते. रहदारी व वाहनांनी तुडुंब भरलेले रस्ते बघुन त्या रहदारीला रोज सामोरे जाणार्‍या मुंबईकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

गेल्या वर्षीच्या मुंबई भेटीत वाशी ते बोरीवली प्रवास करायला विक्रोळी लिंक मार्गे तब्बल ३ तास लागले( अंतर मला वाटते फार तर फार २५-३० किलोमिटर्स असावे!) झक मारली आणी कारने प्रवास केला असे वाटले. पण रेलवेच्या गर्दीकडे बघुन रेलवे प्रवासाचे धाडस करु शकलो नाही. तीच गोष्ट बोरीवली ते घोडबंदर प्रवासाची. २० एक किलोमिटर प्रवासासाठी दोन अडिच तास लागले. आणी बोरीवली घोडबंदर रस्ता इतका खराब की अंग खिळखिळे झाले. माझ्या मते मुंबईतले रस्ते जितकी वाहने सपोर्ट करु शकतील त्याच्या ४० ते ५० पट जास्त वाहने त्या रस्त्यांवर आहेत.

फारेंड, ते रिकामे रस्ते असलेले फोटो बहुतेक १९२०-१९३० सालातले( तेही रविवारी काढलेले)स्टॉक फोटो असावेत. असे रिकामे रस्ते तुला आता स्वप्नातच दिसतील. चर्चगेट-मरीन लाइन्स-चर्नी रोड असा समुद्राला समांतर हायवे प्रकल्प चालु आहे. त्या हायवेच्या बांधकामामुळे त्या भागातही वाहतुकीची जबरी कोंडी झाली आहे.

मुंबईतल्या नविन काँक्रीट जंगलातल्या एकाही इमारतीला वरच्या लेखात वर्णन केलेल्या इमारतींची व वास्तुंची सर नाही. माझ्या जी एस मेडीकल कॉलेजच्या इमारतीचे व के इ एम हॉस्पीटलच्या इमारतीचे बांधकाम व बाजुलाच असलेल्या वाडिया हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकामही फोर्टमधल्या सुंदर जुन्या आर्किटेक्टच्या इमारतींसारखेच क्लासिक आहे.

मला माहीत असलेल्या व माझी जन्मभुमी असलेल्या मुंबईची अशी झालेली अवस्था बघुन प्रत्येक भारत भेटीत जिवाला वेदना होतात.

पण मुंबईचा नविन विमानतळ मात्र तोंडात बोट घालण्यासारखा व वाखाणण्याजोगा आहे! त्या विमानतळावरुन जेव्हा शिकागोच्या ओ हेअर विमानतळावर उतरलो तेव्हा थर्ड वर्ल्ड देशातल्या विमानतळावर उतरलो की काय असे वाटले! शिकागो ओ हेअर एअरपोर्ट सिरिअसली नीड अ फेसलिफ्ट!

@ mukund, lekhat attach kelele ekunek photo me swataha kadhlele ahet te suddha 11 dec 2022 ya divshi.

Pages