२०२२ : वैद्यकीय संशोधनाची झेप

Submitted by कुमार१ on 29 December, 2022 - 11:29

नमस्कार !
2022 ची अखेर आता लवकरच होत आहे. या संपूर्ण वर्षात आधुनिक वैद्यकशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांचा धावता आढावा या लेखात घेत आहे. गेली ३ वर्षे संपूर्ण मानवजातीला ग्रासलेल्या covid-19 या रोगासंबंधीचे संशोधन चालूच आहे. परंतु याची विस्तृत माहिती संबंधित धाग्यावर आतापर्यंत आलेली असल्याने या विवेचनातून या आजाराला पूर्णपणे वगळलेले आहे.

१. मधुमेह प्रकार-१ : यामध्ये स्वादुपिंडाच्या इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींचा नाश झाल्यामुळे अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शनच्या उपचारावर राहावे लागते. अशा रुग्णांसाठी सध्या विविध स्वयंचलित इन्सुलिन इंजेक्शन प्रणाली अस्तित्वात आहेत. यंदाच्या संशोधनात अशी एक अत्याधुनिक प्रणाली विकसित केलेली आहे. त्याला ‘बायोनिक पॅनक्रिआज’ म्हणतात.
या आजाराच्या या पुढील संशोधनाचा टप्पा अधिक रोचक आहे. उच्चरक्तदाबासाठी उपचार म्हणून वापरण्यात येणारे verapamil हे औषध इन्सुलिन-निर्मिती पेशींचा नाश रोखू शकते. त्यावर अभ्यास चालू आहे.

२. मेंदू विकारांच्या संदर्भात यंदा बऱ्यापैकी संशोधने झालेली आहेत. म्हातारपणी स्मृतिभ्रंश ही एक महत्त्वाची समस्या उद्भवते. सध्या त्यासाठी काही औषधे अस्तित्वात आहेत. परंतु औषधांविनाचे उपचार यावर बऱ्यापैकी संशोधन सातत्याने होत आहे. मेंदूचे विशिष्ट भाग लो फ्रिक्वेन्सी प्रवाहांच्या सहाय्याने चेतवल्यास स्मृतीपेशींचे कार्य अबाधित राहू शकेल का, यावरील विविध प्रयोग नेटाने चालू आहेत.

Human_brain.jpg

३. पार्किन्सन आजार हा देखील एक मेंदू संदर्भात महत्त्वाचा आजार. तो जितक्या लवकर ओळखता येईल तितके या रुग्णांचे भवितव्य अधिक चांगले राहील. त्यासाठी एखादी व्यक्ती झोपेत असताना तिच्या श्वसनाचा विशिष्ट अभ्यास करून संगणकाच्या साह्याने काही आलेख काढण्यात येतात. या आलेखांच्या बिघाडातून पार्किन्सन्स होऊ शकेल का याचा अंदाज बांधता येईल.

४. लहान मुलांची झोप यावर बऱ्यापैकी संशोधन चालू आहे. शालेय वयातील मुलांनी किमान नऊ तास रोज झोपल्यास एकंदरीत मेंदूचे आरोग्य उत्तम राहते. ज्या मुलांची झोप बऱ्यापैकी कमी असते त्यांच्यामध्ये मूड बिघडणे आणि विचारक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. याचा सविस्तर अभ्यास चालू आहे.

५. डोळे : म्हातारपणी होणारी दृष्टीपटलाच्या संवेदनशील भागाची (macula) झीज ही डोळ्यांची एक जटील समस्या. ती रोखण्यासाठी आहारातून Lutein and zeaxanthin हे घटक देण्यासंदर्भातील संशोधन प्रगतीपथावर आहे.

६. पायांच्या दुर्बलतेमध्ये किंवा काही स्वरूपाच्या पंगुत्वामध्ये विविध कृत्रिम साधनांचा उपचार होत असतो. या संदर्भात रोबोटिक सांगाडे हे एक नवे संशोधन आहे. या प्रकारचे सांगाड्यांचा दुर्बल व्यक्तीखेरीज मजूर किंवा अग्निशामन दलाचे कर्मचारी यांच्यासाठी देखील वापर करता येईल.

७. एड्स हा आजार एचआयव्ही विषाणूमुळे होतो. त्याच्या प्रतिबंधासाठीचे लस संशोधन गेली अनेक वर्ष चालू आहे. त्या संदर्भात आशादायक निष्कर्ष मिळालेले आहेत.

८. आपल्या मोठ्या आतड्यात अनेक उपयुक्त जिवाणू वास्तव्य करतात. त्यांचा आपल्याला उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी उपयोग होत असतो. विविध कारणांमुळे या जिवाणूंच्या वसाहतींवर विपरीत परिणाम होत असतात. विविध प्रकारचे आतड्यांचे दाहयुक्त आजार व मधुमेह या आजारांच्या संदर्भात या जिवाणूंच्या वसाहतींचा सखोल अभ्यास चालू आहे.

९. माणसाला डास चावल्यामुळे विविध आजार होतात. किंबहुना डास हे बऱ्याच रोगजंतूंचे वाहक म्हणून काम करतात. ठराविक लोकांना डास अधिक प्रमाणात आणि वारंवार का चावतात हा एक यक्षप्रश्न. या संदर्भातही कुतूहलजनक संशोधन चालू आहे. ज्या लोकांच्या त्वचेतून ठराविक रसायने अधिक प्रमाणात स्रवतात व ती डासांना आकर्षित करतात. त्यांचा अभ्यास चालू आहे.

१०. संगीत आणि विविध प्रकारचे ध्वनी यांचा वेदनाशामक म्हणून उपयोग करता येतो. या संदर्भातील संशोधनही प्रगतीपथावर आहे.

11. हृदयकार्य बंद पडल्यानंतर काही मिनिटातच शरीरपेशींचा ऑक्सिजन अभावी नाश होऊ लागतो. अशा प्रकारचा नाश लांबवता किंवा रोखता येईल काय, या संदर्भात प्राण्यांवर संशोधन चालू आहे. हे यशस्वी झाल्यास पुढील मानवी संशोधनाची दिशा ठरवता येईल. हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूच्या स्ट्रोकमध्ये संबंधित पेशींचा नाश होतो. त्यांचे पुनरुज्जीवन करता येईल का, हा या संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भातही या संशोधनाचा महत्त्वाचा वाटा असेल.
Heart_anterior_exterior_view.png

शरीराचे विविध अवयव आणि त्यांच्या संबंधित वैद्यकाच्या अनेक शाखांमध्ये निरंतर संशोधन चालूच आहे. त्यापैकी काही ठळक संशोधनाची ही होती ओझरती ओळख. याखेरीज विविध रोगनिदान, उपकरणे आणि चिकित्सा पद्धतींमध्येही भरीव संशोधन झालेले आहे. त्याचा आढावा वेळोवेळी मी संबंधित आरोग्य धाग्यांवर प्रतिसादांमधून घेतलेला आहे. ज्या संशोधनांमध्ये मराठी माणसांनी मोलाचे योगदान दिले आहे त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आमची माणसे, आमचा गौरव (https://www.maayboli.com/node/80165) या धाग्यावर वेळोवेळी केलेला आहे

येणाऱ्या नव्या वर्षात वरील सर्व संशोधनांची अधिक प्रगती होऊन विविध नवे औषधोपचार संबंधित रुग्णांना उपलब्ध व्हावेत ही सदिच्छा.
आपणा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा देखील व्यक्त करतो.

……………………………………………………………………….

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरोग्य, ही मूलभूत गरज आहे .
त्या क्षेत्रात सरकारी गुंतवणूक च जास्त प्रमाणात हवी.

सरकारी गुंतवणूक ह्याचा अर्थ च सार्वजनिक निधी पुरवणे.
आणि होणाऱ्या उत्पादन वर सर्वांचं हक्क असणे.

पाणी, वीज,अन्न,आरोग्य , निवारा ह्या क्षेत्रात बिलकुल खासगी कंपन्या नको.
अगदी जागतिक कंपनी सरकारी स्थापन करून ती जबाबदारी त्या कंपनीवर दिली पाहिजे.
जगातील प्रत्येक व्यक्ती कडून त्या साठी काही रक्कम टॅक्स म्हणून वसूल केली पाहिजे.
परत एकदा तेच लिहीत आहे.
जो पर्यंत खासगी कंपन्या आरोग्य क्षेत्रात आहेत.
तो पर्यंत.
कॅन्सर ,मधुमेह आणि असे अनेक रोग ..ह्या वर उपाय सापडणार नाही.
कायम स्वरुपी उपाय हे शोधणार च नाहीत.
मृत्यू चे भय दाखवून करोडो रुपये फक्त कमावणार.
किती राष्ट्र अध्यक्ष कॅन्सर नी मेल
.
Heart attack नी मेले.
किती उद्योगपती .
कॅन्सर नी मेले .
किंवा अटॅक नी मेले .

अगदी अपवाद सापडतील

कॅन्सर ,मधुमेह आणि असे अनेक रोग ..ह्या वर उपाय सापडणार नाही.
कायम स्वरुपी उपाय हे शोधणार च नाहीत.>>

हा चुकीचा विचार आहे.
फार पूर्वी पासुन बघितलेत तर
औषधे व मेडिकल सायन्स ह्यांची प्रगती
स्टेप बाय स्टेपच झालेली आहे. ट्रायल व एरर.
तुम्हाला औषधांच्या प्रोडक्षन प्रोसेस, रिसर्च,
गुड प्रॅक्टी सेस, ट्रायलस बद्दल किती माहिती आहे.

किती प्रोटोकॉल्स कसे वापरायच्चे ते माहीत आहे.
आपल्याला इतके रेडिमेड ज्ञान अनुभव
व औषधे एका मीटिन्ग मध्ये
व काही पैसे मोजून मिळत आहे रेडीमेड.

ठोकुन देतो ऐसाजे हे बरोबर नाही प्रत्येक बाबतीत

जे काही संशोधन,औषध निर्मिती होईल.
उपचार पद्धती निर्माण होतील..

त्या साठी लागणारा पैसा हा जनतेचाच असला पाहिजे.
त्या मुळे हक्क पण जनतेचाच असेल.
कोणी व्यक्ती,कोणी कंपनी ह्या क्षेत्रात काम च करू शकणार नाही असा जागतिक कायदा हवा
बाकी खोलात जाण्याची गरज नाही.
लोक इतकी बेशुद्ध अवस्थेत आहेत .की त्यांचे शोषण कोण करतं आहे त्याची त्यांना जाणीव च नाही..
शोषण करणाऱ्या लोकांचेच समर्थन लोक करत आहेत

बऱ्याच दीर्घकालीन आजारांच्या बाबतीत रुग्णांना आयुष्यभर रोज औषधे घ्यावी लागतात. त्याचा वैताग येऊन कधीकधी औषध टाळण्याचे प्रकार होऊ लागतात. तर काहींच्या बाबतीत विस्मरण होते.
त्या दृष्टीने एखादा असा उपाय शोधण्याचा प्रयत्न चालू आहे की ज्याचा परिणाम काही महिन्यांपर्यंत राहू शकेल.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी siRNA या तंत्रज्ञानावर आधारित एक औषध (Zilebesiran) विकसित होत आहे. त्याचे इंजेक्शन त्वचेखाली दिले जाते.
त्याचे रुग्णप्रयोग सध्या दुसऱ्या टप्प्यात आहेत.

हेमंत तेच तेच सर्वत्र बोलुन काय मिळते? निदान प्रतिसादांची संख्या तरी मर्यादीत ठेवा. रँटींगची देखिल एक जागा आणि मर्यादा असते.

>>>उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी siRNA या तंत्रज्ञानावर आधारित एक औषध>>> चांगली माहिती.

>>>उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी siRNA या तंत्रज्ञानावर आधारित एक औषध>>> चांगली माहिती.

काल भारत सरकारतर्फे जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये एकूण ८ डॉक्टरांचा समावेश आहे. त्या पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण तर सात पद्मश्री आहेत.

पद्मश्री मिळालेल्या डॉ. ईश्वरचंद्र वर्मा यांचे जनुकशास्त्रातील संशोधन वाखाणण्यासारखे आहे. भारतातील जनुकशास्त्र संशोधनाचा पाया त्यांनी घातला. सध्या ते आंतरराष्ट्रीय मानवी जनुक प्रकल्पात कार्यरत असून जागतिक आरोग्य संघटनेनेतही महत्त्वाच्या पदावर आहेत.

कोणती ही नवीन गोष्ट ही पूर्ण सिद्ध झालेली नसते.
सबसे तेज .
हा रोग सर्वांना आहे.
शरीर शास्त्रात नवीन लागलेले शोध हे खरेच खरे आहेत का?
हे सिद्ध होण्यास अजून दहा वीस वर्ष जातील.
लगेच विश्वास ठेवू नका

मागील पानावर स्तनाच्या कर्करोगावरील एका महागड्या औषधाच्या किमतीचा उल्लेख झालेला आहे.
या संदर्भात दिलासा देणारी एक बातमी आजच्या (9 फेब्रुवारी) छापील सकाळमध्ये वाचली. त्यातील हा अंश :

" भारतीय कंपन्यांनी देशात काही जेनेरिक औषधांची आवृत्ती सादर केली आहे. त्यात 90 हजार रुपयांचे औषध पाच हजार रुपयांना उपलब्ध करून दिले आहे", अशी माहिती कर्करोग तज्ञ डॉ. जयंत गावंडे यांनी दिली.

जेनेरिक औषधे बेस्ट!!!! तेच औषध पण कालांतराने/ ठराविक मुदतीनंतर, जेनेरिक होत असते बहुतेक. अमेरिकेत एच-१ वरती असते वेळी माझा आजार डायग्नोस झालेला. त्या आजारात, सतत जॉब जायची काळजी असताना, अजुन एक काळजी भेडसावत असे की इतकी महागडी ४-५ औषधे भारता कशी मिळतील? कुठुन एवढे पैसे आणायचे? त्यात इथला जॉब गेला की भारतात जॉब शोधायचा , मधल्या वेळेत पैशाची चणचण असणार, प्रोफेशनल अ‍ॅडजस्ट्मेन्ट असणार - एक ना दोन.
अर्थात या सर्व चिंताजनक, विचारांच्या मूळाशी प्रचंड अँग्झायटी होती जी की फॉल्स होती. तेच मूळात एक लक्षण होते.
तर असो. हळूहळू काही औषधे जनरिक झाली, व औषधोपचारांनीही ती अ‍ॅग्झायटी निवळली.

ते सर्व आठवले.

औषधे जनरिक झाली, व औषधोपचारांनीही ती अ‍ॅग्झायटी निवळली.
>>> वाचून चांगले वाटले.

आधुनिक वैद्यकात एखाद्या आजारावरील नवे औषध शोधण्यासाठीची पारंपरिक पहिली पायरी म्हणजे त्या औषधाचे प्राण्यांवर प्रयोग करणे. परंतु प्राण्यांवर यशस्वी झालेले सुमारे 40% प्रयोग पुढे मानवी उपयोगाच्या दृष्टीने फसतात. काही बाबतीत अन्य सस्तन प्राणी आणि मानवी शरीराचे प्रतिसाद वेगवेगळे असतात. प्राण्यांवरील प्रयोगाला पर्याय म्हणून अन्य काही पद्धतींचा शोध गेल्या दशकभर चालू आहे.

जैव अभियांत्रिकी शाखेच्या विकासानंतर या संशोधनाला चांगली चालना मिळालेली आहे. असाच एक पर्याय म्हणजे “ऑर्गन्स ऑन चिप्स” हा प्रकल्प.

यामध्ये एखाद्या छोट्याशा चकतीवर मानवी शरीराच्या एखाद्या अवयवाच्या पेशी रोपल्या जातात. नंतर त्या पेशींची वाढ करणे किंवा रोखणे असे प्रयोग निरनिराळी द्रव्ये देऊन करता येतात.

अशा प्रकारच्या सुमारे 15 अवयवांच्या चिप्स तयार झालेल्या आहेत. त्यामध्ये मूत्रपिंड, आतडी, फुफ्फुस, योनी या अवयवांचा समावेश आहे. उदाहरणादाखल फुफ्फुसाचे हे चित्र पहा :

organ_on_the_chip.jpg

दुसऱ्या धाग्यावरून:
<सन २०५० पर्यंत काही माणसे तरी न-मर्त्य होतील असे पुस्तक म्हणते.>
हे ऐकले/वाचले आहे. पण हा दावा नक्की कशाच्या आधारे केला जात आहे हे कळले नाही.
सरसकट विधान असेल तर ठीक आहे.

हा दावा नक्की कशाच्या आधारे केला जात आहे
>>>
पुस्तकात 'गिल्गमेश प्रकल्प' ( अमरत्वाचा शोध) असा उल्लेख आहे.
वाचावे लागेल...

Caenorhabditis elegans या किड्याचे सरासरी आयुष्य जनुकीय अभियंयत्यांनी अलीकडेच दुप्पट केले आहे.

स्वप्न रंजन म्हणून अमरत्व ठीक आहे.
आजार बरे न करता .
रोग निवारण करण्यात ताकत न खर्च करतात जेव्हा सर्रास अवयव सहज बदलले जातील तेव्हाच आपण अमरत्व च्या दिशेने पहिले पावूल टाकले आहे असे समजावे.
तो पर्यंत नाही

>>>स्वप्न रंजन म्हणून अमरत्व ठीक आहे.>>+234

यासंबंधी एक बोधकथा वाचली :-
मृत्यु ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते ?
"जन्म-मृत्यू" हा सृष्टीचा नियमच आहे. तो कोणालाही चुकलेला नाही. तो आवश्यकही आहे. अन्यथा माणसेच माणसाच्या जीवावर उठली असती.
कशी? ते पहा...
एका राजाने शहराबाहेर, एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले,
"साधूमहाराज, मला अमर करू शकेल, अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का?"
साधू म्हणाला, "हे राजा, हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास, की, तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील."

ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला.
त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला.
तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला.
पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला.
एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला.
राजाने त्याला कण्हण्याचे कारण विचारले. तो म्हणाला,
"या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले. परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले. गेली पन्नास वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये, म्हणून गेली पाच वर्षे मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही."
त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, "छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं, तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू.
त्याने साधूकडे पर्याय मागितला.
साधू म्हणाला, "ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्यापुुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा. म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल."

साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल, या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला.

तिथे त्याला चार तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले, त्यावर तो म्हणाला, "आता मी अडीचशे वर्षांचा आहे. तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षांचे माझे बाबा, पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू ?"
राजाने युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले, तर तो म्हणाला, "अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे साडे तीनशे वर्षांचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा."
साडे तीनशे वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता, तो म्हणला, "मी तरी संपत्ती कुठून देणार ? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता ४०० वर्षांचे आहेत."
यावर राजा म्हणाला, "पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय ? यावर पणाजोबा म्हणाले, "आमच्या
घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे."

तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले, तर तेही नकोच. कारण ते जास्त भयंकर आहे.
राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, "तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत. मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा माणसेच माणसांच्या जीवावर उठली असती."
साधू म्हणाला, "मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे. त्यातच खरा आनंद आहे.

मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे. त्यातच खरा आनंद आहे.>> हे एखाद्या कॅन्सर पेशंट ला म्हणून दाखवा... .. जो दर क्षणी डिप्रेशन शी झगडा करत असतो.

आध्यात्मिक पोस्ट इथे अस्थानी आहेत.

=====================================================

कुमार सर. मला पाल्बो सिलिब प्रिस्क्राइब झाली. ही तशीही लेट्रो पेक्षा महाग आहे. पण पूर्वी उपलब्ध होती त्यापेक्षा फार स्वस्तात.
तीन आठव डे घ्यायची एक आठव्डा ऑफ असे शेडुल दिले आहे. व १५ दिवसांनी डब्य्लु बीसी चेक आहे. व रिव्यु.

Trichloroethylene (TCE)
या रसायनाच्या शरीरावरील घातक परिणामांबाबत दीर्घकाळ संशोधन झालेले आहे. त्याचे कर्करोगकारक परिणाम पूर्वीपासून माहित आहेत. परंतु त्याचा मेंदूतील चेतातंतूवर होणारा परिणाम अलीकडेच उजेडात येतो आहे, तो म्हणजे मेंदूतील डोपामीन निर्मिती करणाऱ्या चेतंतूंना इजा पोचवणे. यातूनच पुढे पार्किन्सन आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी (५००%) वाढते असे एक गृहीतक अलीकडे मांडले गेलेले आहे :
https://content.iospress.com/articles/journal-of-parkinsons-disease/jpd2...

या आजाराची कारणमीमांसा गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये आधुनिक काळातील अनेक रसायनांचा हात असण्याची शक्यता आहे.

TCE हे रसायन अनेक दशकांपासून वापरात आहे. त्याचे उपयोग दैनंदिन वापरातील वस्तू, औद्योगिक उत्पादने व कारखाने, एकेकाळी वैद्यकातील भूल देण्याचे साधन आणि लष्करी विभागांमध्ये होत आलेले आहेत. सध्या हे रसायन खालील गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते:
1. धातुंवरील ग्रीज काढण्यासाठी
2. कपड्यांचे ड्रायक्लीनिंग
3. रंगकाम आणि तत्सम कामे
4. टंकलिखित मजकूर खोडण्यासाठीच्या द्रावणात
5. लष्करात बंदुका साफ करण्यासाठी

या रसायनाचा एकंदरीत संचार बघता एव्हाना ते हवा आणि भूजलात देखील बऱ्यापैकी प्रमाणात आढळत आहे.
प्रस्तुत संशोधनात सात रुग्णांचा सखोल अभ्यास केला गेलेला आहे. त्यातून संशोधकांनी हे गृहीतक मांडलेले आहे. भविष्यात यावर अधिक संशोधनाची गरज आहे.

थॅलेट्स >>>> +११
या रसायनांचा पूर्वी इथे ( https://www.maayboli.com/node/69846) आढावा घेतला आहे.
******
पार्किन्सनच्या कारणमीमांसेत अनेक तण व बुरशीनाशकांत
असणाऱ्या रसायनांचा हात आहे. उदा:
Paraquat, maneb / mancozeb.

MPTP या वातावरणीय टॉक्सिनसंबंधी बराच अभ्यास झालेला आहे

Pages