अज्ञातवासी S02E05 - जुनी खुर्ची, नवा सम्राट!

Submitted by अज्ञातवासी on 27 December, 2022 - 06:09

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/82797

फ्लॅट नंबर २२, पाचवा मजला.
मोक्षने लिफ्टचं बटन दाबलं.
"लवकर, लवकर," तो म्हणाला.
लिफ्टच दार उघडलं. तो बाहेर निघाला, उजवीकडे वळला व तिथून चौथ्या फ्लॅटकडे गेला.
'देवदत्त राणे
अस्मिता राणे
श्रेया राणे.'
बाहेरच पाटी लावलेली होती.
त्याने बेल वाजवली.
थोडावेळ कुणीही बाहेर आलं नाही.
"यार..." त्याने पुन्हा बेल वाजवली.
"कोण..." आतून आवाज आला.
"मोक्ष राजशेखर शेलार..." तो वैतागून ओरडला.
थोड्या वेळाने कडी काढायचा आवाज आला.
त्याने दार उघडलं.
थोड्याच अंतरावर एक मुलगी त्याच्यावर गन रोखून उभी होती.
उंच, लांबट चेहरा, तरतरीत बाकदार नाक, आखूड केस, घारे डोळे आणि चेहऱ्यावर रक्तवर्णी लालीमा...
"आय एम सॉरी, मी माझी गन विसरलोय." तो हात वर करत म्हणाला.
"श्रेया, गन खाली कर." मागून आवाज आला.
मागे अस्मिता राणे-शेलार उभ्या होत्या...
काळेभोर लांब केस, त्यावर चंदेरी झाक, थोडासा सावळा वर्ण, लांबटच चेहरा..
"जर त्याच्याकडे गन असती, आणि त्याला चालवायची असतीच, तर आतापर्यंत आपण दोघीजणी जिवंत नसतो..."
मोक्षने हसून मान लवून अभिवादन केले. तरीही त्याचे हात अजूनच वर होते.
तेवढ्यात फोन वाजला...
अस्मितानी फोन उचलला...
"मॅडम, दादासाब का बेटा आपसे मिलने आ रहा है. मैने रोका, पर वो..."
"लवकर सांगितलं. धन्यवाद..." त्यांनी फोन ठेवला.
"खरं सांगायला गेलं, तर मला अजिबात वेळ नाही. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणून पटकन हे घ्या..."
त्याने खिशातून सोन्याची राखी घेतली, आणि टेबलावर ठेवली...
...आणि समोरच्याची प्रतिक्रिया बघायलाही तो थांबला नाही.
श्रेयाने घाईघाईत दार लावलं, वा बंदूक बाजूला टाकली.
"आई हे काय होतं?"
"श्रेया, तुझा अभ्यास कमी पडतोय. या माणसाने दोन महिन्यात कमीत कमी पन्नास तरी माणसे मारलीत. त्याला हवीय ती खुर्ची... अगदी त्याच्या बापासारखी."
"मग तो तुझं मत वळवण्यासाठी आला होता का?"
"तो काहीतरी घेण्यासाठी नाही, तर देण्यासाठी आला होता."
त्यांनी अश्रूपूर्ण नजरेने ती राखी हातात घेतली.
*****
"अभिनंदन संग्राम, आजपर्यंत सगळी जबाबदारी तू सांभाळलीस. आता शांतपणे सगळं जग फिर, नवीन काहीतरी अनुभव घे..." अस्मिता शांतपणे बोलत होत्या.
काहीतरी वेगळचं घडतंय याची सगळ्यांना जाणीव झाली.
"माझं मत... मोक्ष राजशेखर शेलार..."
संग्राम आणि अप्पा ताडकन उभे राहिले.
"ताई, तुझं डोकं फिरलय... ज्या माणसाने तुझा हक्क हिरावला, त्याच्याच मुलाला तू खुर्चीवर बसवतेय. तूही फितूर झालीस... धोका दिलास तू मला... विकली गेलीस तू... सांग..किती पैसे घेतले याच्याकडून. मी दुप्पट देईन. सांग." अप्पा म्हणाले.
*गप्प बसा, जर वाड्यातल्या एकही माणसावर आवाज चढवला, तर गाठ माझ्याशी आहे." मोक्षही आता चिडला.
"अजून तुझी खुर्ची झालेली नाही मोक्षा..." संग्राम म्हणाला.
"मग गणित सुधरव."
"जय एकलिंगजी... संग्राम तुला दुबईत चांगली नोकरी आणि जागा मिळवून देईन." शेखावत म्हणाला.
"शेखावत, जास्त माज करू नका." अप्पा म्हणाले.
"आमचा माज दादांमुळे अप्पासाहेब." मोक्षकडे हात दाखवून शेखावत हसला.
"कुणीही कुठेही जाणार नाही. शेलारांचा वाडा फोडण्यासाठी मी खुर्चीवर बसलेलो नाही. वाडा अभेद्य होता, आहे आणि राहील. कायम..."
आता चक्रावण्याची वेळ सगळ्यांची होती.
"भीक नकोय मला, आजपर्यंत मी माज करत आलोय, सत्ता माझ्याकडे होती. निघतो उद्याच, पण परत येईन आणि..." संग्रामने बोलायला सुरुवात करताच मोक्षने त्याला अडवले.
"शेलारानी नाही तर कुणी माज करायचा रे? दोघे मिळून माज करू. काय? निवांत रहा... भाऊ आहेस माझा, तुला सोडून राहू नाही शकणार मी." मोक्ष म्हणाला.
आज सगळ्यांनाच धक्क्यावर धक्के बसत होते!
"तू आजपासून प्रमुख आहेस. तू जे म्हणशील ते आम्ही करू. संग्राम इथेच राहील." अप्पा म्हणाले.
"अप्पा..."
"गप्प बस संग्राम." अप्पांनी त्याला दटावलं.
"चला शेवट गोड तर सगळं गोड. अप्पा, उठा, इकडे बसा," मोक्ष म्हणाला.
अप्पा रागारागातच उठले.
"हेड ऑफ द टेबल." मोक्ष मोठ्याने म्हणाला, आणि खुर्चीवर जाऊन बसला.
सगळे त्याच्याकडे बघतच राहिले.
"चला, कामाला लागूयात. धन्यवाद." तो म्हणाला.
सर्वजण उठले, आणि बाहेर निघाले.
"तू नाहीस झोया, मला तुझ्याशी बोलायचंय." मोक्ष म्हणाला.
झोयाने फक्त मान डोलावली, व ती तिथेच थांबली.
सर्वजण निघून गेले...
"थॅन्क्स."
"कशासाठी?"
"सगळ्यासाठी..."
"इट्स ओके."
"सॉरी..."
"कशासाठी..."झोयाने विचारले.
"सगळ्यासाठी..." मोक्ष विषण्ण हसला.
"इट्स ओके..." तीही हसली.
"कायम माझ्यासोबत रहा झोया, कायम माझी साथ दे."
"एक स्त्री कायम फक्त तिच्या नवऱ्यासोबत असते. मग आयुष्यभर काय, सात जन्म साथ देते. आहे कबूल? तर मग राहीन सोबत."
"झोया तुला माहितीये हे शक्य नाही."
"मग शक्य नसेल, तर वचन दे... पुन्हा हे असं कधीही माझ्याकडे मागणार नाहीस." तिचा आवाज वाढला.
"वचन देतो, नाही मागणार." तो विशादाने म्हणाला.
झोया थोडावेळ शांत बसली.
"बोल ना झोया..."
"मोक्ष शेलार, लक्षात घे, एक स्त्री आयुष्यात एकदाच खरं प्रेम करते. नंतर उरतो तो फक्त व्यवहार. मी सगळं उधळून टाकायला तयार होते तुझ्यावर, सर्वस्व, पण तू काय गमावलंस याची किंमत तुला कधीही कळणार नाही. चल, आज वचन देते, ही झोया कायम तुझ्यासोबत राहीन, पण तू कायम पस्तावशील..." तिच्या नजरेत आता अंगार भरला होता.
"काहीही चुकीचं पाऊल उचलू नकोस झोया."
"काहीही चुकीचं करणार नाही मी. शेवटी खानसाहेबांची मुलगी आहे मी." तिच्या नजरेतील आग आता शांत होत नव्हती.
मोक्ष शांतपणे खुर्चीवर बसून राहिला.
झोया तरातरा निघून गेली.
*****
"ताई काय झालं?" अस्मिताताई बाहेर येताच काकू म्हणाल्या.
"मोक्ष तयारी तर करून आला होता, पण तो एक गोष्ट विसरला."
"काय?"
"की या जगात काहीही होऊ शकतं. कुणीही बदलू शकतं."
"मग संग्राम?"
"नाही. मोक्ष शेलार. सत्यभामा, ज्या गोष्टीसाठी मी माझ्या भावाशी आयुष्यभर भांडले, तीच गोष्ट आज मी सहज त्याच्या मुलाला देऊन टाकली. काय मिळवलं कडवटपणा ठेऊन? त्याच्याशी शेवटचं बोलायला सुद्धा." त्यांचा कंठ दाटून आला.
"त्याने विनवण्या केल्या, झुकला माझ्यासमोर तो. अक्षरशः लोटांगण घातलं त्याने, पण मी बधले नाही. दगड होते ग मी. काय चुकलं त्याचं? खुर्चीवर बसला की त्या राक्षसीशी लग्न केलं???"
"ताई, हा विषय नको." काकू चरकल्या.
"विषय नको म्हणता म्हणता एक दिवस मोक्षच आपल्याला विचारेल. सांगा, माझी आई कोण होती. सांगा, ती लहानपणीच का मला सोडून गेली, सांगा तिने गोदावरीत उडी का घेतली???"
काकूंनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला...
दोघीजणी स्मशानशांतता असल्यासारख्या गप्प झाल्या.
मात्र वाड्यात आता जल्लोष सुरू झाला होता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी ट्विस्ट टाकता तुम्ही.
मागच्या भागात वाटलेलं संग्रामला खुर्ची.
अंदाज लागू देत नाहीत.
छान लिहिताय.

वाचतेय.. छान चाललीय, I hope लिहून पूर्ण केल्याविना आपण या वेळी अज्ञातवासात जाणार नाहीत.

@आबा - धन्यवाद Happy
@झकासराव - धन्यवाद Happy
@मनुप्रिया - धन्यवाद Happy खूप दिवसांनी तुला बघून छान वाटलं.
@धनवंती - धन्यवाद Happy
@गौरी - धन्यवाद Happy बघुयात काय होतं ते Wink

पुढील भाग उद्या प्रकाशित होईल.