अज्ञातवासी S02E04 - राखीपौर्णीमा!!

Submitted by अज्ञातवासी on 24 December, 2022 - 12:16

संपूर्ण कथेचा मागील भाग - https://www.maayboli.com/node/82778

या भागाशी लिंक लागण्यासाठी हा भाग आधी वाचावा - https://www.maayboli.com/node/78527

"दादासाहेब, गाडी हळू चालवा." खानसाहेब म्हणाले.
"नाशिक धुळे अंतर आहे, लवकर पोहोचावं लागेल."
"या नादात तुम्ही मला पोहोचवाल."
"ठीक आहे खानसाहेब, गेलो तर सोबत जाऊ. मग महादेव म्हणेल, अरे त्याची पृथ्वीवर सोबत केलीस, आता इथेही सोबतच का?"
"मी तर अल्लाकडे जाईन. येणार सोबत?"
दादासाहेब हसले.
"महादेवाशिवाय मला कुठेही थारा नाही खानसाहेब. जन्म त्याच्याच चरणी, मृत्यूही त्याच्या... मृत्यूनंतरही तोच..."
"जन्म मृत्यूच्या बाता कशाला दादासाहेब. चलो ये पल जी ले..."
"जे बात खानसाहेब..."
"पण आज स्वतः गाडी चालवायचं मनावर का घेतलंत?"
"बघू म्हटलं, अजूनही स्कॉर्पिओचं आमच्यावर प्रेम आहे का..."
"प्रेम आहे म्हणूनच तर इतक्या वेगात पळतेय."
"माणसांनी कधी प्रेम दिलं नाही, निर्जीव वस्तू तरी जीव लावतील.".दादासाहेबांची नजर कुठेतरी शून्यात हरवली.
"दादासाहेब असं बोलून तुम्ही आम्हाला परकं करतायेत."
"माफी असावी साहेब..." दादासाहेब हसले.
गाडी अजूनही सुसाटच धावत होती.
तीन तासांनी गाडी धुळ्यात पोहोचली. एका उंचच उंच भिंतींच्या तटबंदीसमोर गाडी उभी राहिली.
"राणेंची तटबंदी आपल्या वाड्याच्या भिंतीना लाजवेल दादासाहेब."
"आमची ताईच अभेद्य भिंत आहे खानसाहेब... बघा ना, किती वर्षे झालीत, पण आमचं प्रेम ही भिंत नाही तोडू शकलं."
"शेवटी रक्तच रक्ताला मिळतं दादासाहेब. चला, आज तरी तुमची इच्छा पूर्ण होवो."
गाडी एका मोठ्या गेटमधून आत शिरली...
सिक्युरिटीने दादासाहेबांना कडक सलाम ठोकला.
दादासाहेबानी पाचशेची नोट काढून त्याच्या हातात दिली. त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं.
"साहेबांना सांगा, दादासाहेब आलेत."
त्याने मान तुकवली, व फोनकडे वळाला.
"साहेबांना वर्दी दिलीय साहेब." तो म्हणाला.
गाडी आत निघाली आणि एक लांब वळसा घेऊन एका शेडजवळ थांबली.
दादासाहेब खाली उतरले, व तिथल्या एका खुर्चीवर बसले.
खान उभाच राहिला.
"खानसाहेब.. बसा..." दादासाहेब म्हणाले.
"नको दादासाहेब."
"बसा हो... येतील इतक्यात..."
तेवढ्यात एक तीन-चार वर्षांची मुलगी त्यांच्याकडे धावत आली.
"बाबांनी मला सांगितलं, तुम्ही मला खूप खूप खाऊ देणार... द्या ना.."
दादासाहेब हसले. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतलं...
"खूप म्हणजे किती?"
"एवढा मोठा..." तिने हात पसरत सांगितले.
"एवढाच??"
"मग अजून मोठा..." तिने जोशात अजून हात पसरवले.
तिचा अवतार बघून दादासाहेब मनसोक्त हसू लागले.
"आमची भाची... सगळं तुझ्यासाठी आहे गं. हा मामाच तुझा आहे. खानसाहेब ही मोठी झाली ना, हिला नाशिकला घेऊन जाऊ, सगळं ही सांभाळेल मग..."
"अहो दादासाहेब, आता तिला खेळू द्या हो. मोठं झाल्यावर बघू."
आतून एक व्यक्ती बाहेर येत म्हणाली.
देवदत्त राणे! अस्मिता राणेंचा नवरा...
"दादासाहेब माफ करा... तुमच्याच बहिणीची समजूत काढत होतो."
दादासाहेबांनी हात जोडून नमस्कार केला.
"खानसाहेब ती खाऊची पिशवी द्या."
एक भलीमोठी पिशवी खानसाहेबानी दादासाहेबांना दिली.
"श्रेयाबाई उचलली जाईल ना?"
"हो. आय एम स्ट्राँग गर्ल."
"येस यू आर."
आणि मोठ्या कष्टाने ती पिशवी सांभाळत ती आत निघून गेली.
दादासाहेबाना हसू आवरत नव्हतं. शेवटी ते राणेंकडे वळून म्हणाले.
"तिची समजूत निघणार नाही दाजी. शेवटी आमचीच बहीण आहे."
"निदान मग तुम्ही तरी घरात चला..."
_तेही शक्य नाही. तिने आज्ञा दिलीय... कधीही या घरात पाऊल टाकायच नाही म्हणून. आता ती आज्ञा पाळायला नको? असूदे. एक ना एक दिवस बहिणीला आमची दया येईलच. फक्त तेव्हा महादेवाने आम्हाला जिवंत ठेवलं..."
"दादासाहेब... पुढे बोलू नका. महादेव तुम्हाला उदंड आयुष्य देवो."
"कितीही देवो, पण जितकं देईल ना दाजी, तोपर्यंत वाघासारखा जगेन... बरं... खानसाहेब... तबक द्या."
खानसाहेबांनी पूजेचं तबक त्यांच्या हातात दिले.
"एवढं ताईपर्यंत पोहोचवा."
राणेंनी तबकावरचा कपडा बाजूला केला.
एक अतिशय सुंदर कलाकुसर केलेली, विविध रत्नांनी मढवलेली सोन्याची राखी!
"सुंदर!" राणे डोळे विस्फारून बघत राहिले.
दादासाहेब हसले.
"निघायला हवं..."
"लगेच... अहो..."
"थांबवू नका राणेसाहेब. दादासाहेब शेलार यादिवशी सगळ्यात जास्त कमकुवत असतो. विचार करण्याची शक्ती गमावून बसतो."
"ताई..." त्यांनी एका खिडकीकडे बघितले.
"हा बघ, हा दादासाहेब शेलार, राजशेखर शेलार, तुझा छोटा दादू... आज सगळे हात मोकळे ठेवून तुझ्यासमोर उभा आहे. फक्त एकदा माझ्याशी बोल, अग खुर्चीच काय, मी स्वतः तुझ्या पायाशी कायम राहीन... ये ताई..."
"ती तिथे नाहीये दादासाहेब." राणे म्हणाले.
*तिथेच आहे. "
क्षणार्धात पडदा ओढला गेला...
दोघा भावाबहिणींची नजरानजर झाली...
आणि पुन्हा रागाने पडदा लावला गेला.
*येतो दाजी, काळजी घ्या..." दादासाहेब अवरुद्ध कंठाने म्हणाले.
...आणि गाडी सुसाट नाशिककडे निघाली.
*****
"खानसाहेब, आत्या कुठे भेटेल? म्हणजे आता ती नाशिकलाच असेन ना."
"हो, ताई कालच आल्या आहेत. पण त्या वाड्यावर थांबत नाहीत. त्र्यंबक रोडला फिनिक्समध्ये त्यांचा फ्लॅट आहे, तिथेच थांबतात."
"सोन्याची राखी, काय प्रकरण आहे?"
खानसाहेब आश्चर्याने मोक्षकडे बघत राहिले.
"राखीपौर्णीमा पुढच्या महिन्यात आहे खानसाहेब. बाबा मला एकदा म्हणाले होते, की आत्यासाठी सोन्याची राखी बनवायची आहे. ते दर राखीपौर्णिमेला आत्यासाठी सोन्याची राखी बनवायचे का?"
खानसाहेब थोडावेळ शांत बसले...
आणि त्यांनी सर्व कथा मोक्षला ऐकवली...
"ठीक आहे. राखी बनवायला टाकली होती बाबांनी?"
"हो."
"कुणाकडे?"
"राजूशेठ..."
"आणि राजूशेठ कुठे असतात?"
"कळवणला."
"सिरीयसली? कळवण इथून ऐशी किलोमिटर लांब आहे."
"हो पण..."
"जाऊ द्या. पाठवा कुणालातरी, राखी हविये मला उद्या पहाटेपर्यंत..."
"आता? अहो इथे प्रेते पडलीयेत."
"तरीही पाठवा. मी झोपतो."मोक्ष त्रासिक चेहरा करून झोपायला गेला.
खानसाहेब त्याच्याकडे बघतच राहिले.
"ये आदमी पागल है खानसाब." मागून एक माणूस त्यांना म्हणाला.
"कौन..." खानसाहेब ओरडले.
"हैदर..." तो भीतीने म्हणाला.
"अच्छा हुवा तू जिंदा है, जा राखी लेके आ. मैं सेठ को फोन करता."
हैदरने कपाळावर हात मारला...
*****
पहाटेच मोक्षला खानसाहेबांनी उठवलं.
जी खानसाहेब.
"ही राखी." ते शांतपणे म्हणाले.
"गुड." त्याने राखी घेतली, तो तसाच उठला आणि बाहेर धावला.
गाडी स्टार्ट करून त्याने सरळ त्र्यंबक रोडला घेतली.
थोड्याच वेळात तो फिनिक्स अपार्टमेंटमध्ये पोहोचला.
"ओ साब, रुको, किधर चल दिये?" सिक्युरिटीने त्याला अडवले.
"वो, राणे मॅडम के यहापर जाना है."
"हा, ऐसे किसी को भी नहीं मिलती वो."
"मैं किसी भी नहीं हू. मोक्ष दादासाहेब शेलार नाव आहे माझं."
सिक्युरिटी भेदरला...
"माफ करो साब..."
त्याने घाईघाईने गाडी आत सोडली...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचा भाग बघून रविवार सार्थकी लागला..
पाण्यातल्या भोवर्‍यासारखी आहे कादंबरी, वाचकाला खेचून घेते, बाहेर पडू देत नाही...

@धनवंती - धन्यवाद. तुमचे नियमित प्रतिसाद खूप हुरूप वाढवतात. It matters a lot for me.
@Diggi12 - धन्यवाद आणि लवकरच.

भारी!!!

पाण्यातल्या भोवर्‍यासारखी आहे कादंबरी, वाचकाला खेचून घेते, बाहेर पडू देत नाही...

>>>> अगदी अगदी

वाचतोय हां.
पुढे कुठे चाललंय कथानक लक्षात येत नाहीये

@आनंदा - धन्यवाद
@आबा - धन्यवाद
@झकासराव - धन्यवाद, आणि आता तर कथा कुठे सुरू झालीय Wink

पुढील भाग टाकला आहे.

हा भाग मधेच वाचला.
बाबा कदमांच्या कादबं-या अशाच भरगच्च श्रीमंती थाटात या.
आता इतर भाग वाचायला हवेत ...