मन आवर सावर - Mind Control

Submitted by रघू आचार्य on 22 December, 2022 - 21:36

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा (खसखस) दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

कवयित्री – बहिणाबाई चौधरी

मन कसं उधळलेल्या कालवडासारखं असतं हे शेतकर्‍याला माहिती असतं. त्याला व्यक्त होता येत नाही. बहिणाबाईंसारख्या आश्चर्य असलेल्या कवयित्रीला ते व्यक्त करता येतं. या कवितेत बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे तो कदाचित अनेक विद्वानांच्या प्रवचनाचा अर्क असेल किंवा या कवितेवरून लाखो प्रवचनं देता येऊ शकतात.

जस जसं आपण नैसर्गिक जीवनशैलीकडून वेगवान जीवनशैलीकडे जातो, तस तसे मनाशी असलेला संवाद कमी होतो. त्यावरचे नियंत्रण सुटत जाते. अशा वेळी आपल्याला एका मार्गदर्शकाची / गुरूची / अध्यात्मिक गुरूची गरज वाटू लागते जो आपले मन आपल्या नियंत्रणात कसे ठेवायचे हे शिकवतो. त्यातले कामाचे काय घ्यायचे हे आपण घेतो. बाकीचे सोडून देतो.

अशा काही उपयुक्त प्रशिक्षणाबद्दल या धाग्यावर चर्चा करूयात.

( या विषयाशी संबंधित ग्रुप सापडला नाही. सध्या मायबोली संवाद मधे हा धागा आहे. योग्य त्या ठिकाणी हलवू शकता).
टीप : धागालेखक त्या विषयात ढ असण्याची दाट शक्यता असते. त्या विषयाशी प्रशिक्षणाची सर्वात जास्त गरज लेखकाला असल्याने त्याने धागा काढला आहे ही शक्यता असल्याने अडचणीत आणणारे प्रश्न विचारून एक विशिष्ट नगरीय कंड शमविण्याचा यत्न करू नये. तसेच असे व्हिडीओज पाहिल्याने कधी हे ज्ञान ओततोय असे वाटून मायबोलीचा प्रत्येक धागा वेठीस धरून विषयाशी संबंधित नसणारे प्रतिसाद तिकडे न देता ते एकाच ठिकाणी यावेत हा ही उप हेतू आहे).

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपने मन के जाल को समझो। वो कैसे मूर्ख बनाता है।
ओशो - आचार्य रजनीश यांची प्रवचने मला आवडतात. त्यांच्या वादग्रस्त आयुष्याशी काही घेणं देणं नाही आणि त्यावर कुणी टिप्पणी केल्याने भावना दुखावत नाहीत. कामाचे काय तेव्हढेच घ्यावे इतकाच मामला आहे. या धाग्यावर माझ्याकडून रजनीशांची गाजलेली प्रवचने देण्याचा प्रयत्न करीन.
https://www.youtube.com/watch?v=VUlPOgQHVqE

आनापान आणि सुखप्राणायाम याचा बऱ्याचदा उपयोग झाला आहे. पण प्रत्येक वेळी हे आठवेल असे नाही मन वढाय वढाय होत जाते.

आनापान म्हणजे प्राणायाम, खोल श्वास असे काहीही न करता श्वास जसा सूरू आहे तसाच ठेवून त्याचे खालील प्रकारे सावकाशपणे निरीक्षण करणे:
श्वास आत येतोय की बाहेर जातोय?
खोल आहे की उथळ?
दोन्ही नाकपुड्यातून सारखा आहे का?
थंड आहे की उष्ण?
आत घेताना थंड वाटतो का?
बाहेर सोडताना कमी थंड, उष्ण वाटतो का?
असे आलटून पालटून निरीक्षण करत रहाणे.
एक ही श्वास आपल्याला न कळत आत किंवा बाहेर जायला नको हे उद्दिष्ट ठेवावे. मध्येच मन भरकटले तर हरकत नाही, ते लक्षात आले की परत निरीक्षण सुरू ठेवावे.
असा बराच वेळ जाऊन मन शांत व स्थिर झाले की
श्वासाचा स्पर्श कुठे जाणवतो आहे?
नाकपुड्यात? घशात? की छातीत?
श्वास आत घेताना शांत वाटतंय, आत आल्यावर शांत वाटतंय की बाहेर सोडताना?
असे थोडावेळ निरक्षण करून शेवटी सुख प्राणायाम:.
यातही सुरू असलेल्या श्वासाची गती बदलायची नाही.
फक्त एवढे बघायचे की श्वास आत घेतो तेव्हा पोट किंचितसेच फुगते की नाही.
यासाठी डावा तळवा पोटावर ठेवून बघावे.
पोट फुगत नसेल तर मुद्दाम किंचीत फुगू द्यावे श्वास आत घेताना. याच स्थितीत काही वेळ श्वास घेत राहावा, एक - दोन मिनिटे किंवा हवा तेवढा वेळ.

मग शांत आणि काही वेळा प्रसन्न होते असा अनुभव आहे.

छान
>>जस जसं आपण नैसर्गिक जीवनशैलीकडून वेगवान जीवनशैलीकडे जातो, तस तसे मनाशी असलेला संवाद कमी होतो>>>+९९

छान धागा.
मी काय करते हे लिहिते.
१. भरपूर व्यायाम, फिरायला जाणे नाही तर rigorous workout. एड्रिनिलिन जळले की राग कमी येतो.
२. झूम्बाने मूड सुधारतो, प्रसन्न वाटते व योगाने शांत वाटते.
३. कुणालाही इमोशनल पर्सनल स्पेसमधे न येऊ देणे. स्वतःच्या बाऊन्ड्रीज जपणे. अर्थात इतरांच्या बाऊन्ड्रीजचेही भान ठेवणे.
४. रोज २० मिनिटे ध्यान, झोपताना. कारण दिवसाचा ताण तणाव अनडन करायला बरे पडते.
५. रोज काही वेळ एकटं राहणे. एकांतवास आवश्यक आहे. तेव्हाच स्वसंवाद साधता येतो, आपण मनाला डिसमिस करत रहायचे पर्याय शोधत असतो. सोमि वगैरे.
६. नो गॅजेट्स फॉर समटाईम.
७.प्रत्येक गोष्टीवर रिएक्ट करायची गरज नाही. आपण काही मोठी व्यक्ती नाही, आपल्या मताला काडीचीही किंमत नाही. उगाच रक्त आटवायचं नाही. काहीही पर्सनली घ्यायचं नाही. (नंबर तीन सोडून)
८. वरचे नाही जमले कधी, तर गिल्ट न बाळगणे.
९. Don't let the child in you die. खोड्या आवश्यक आहेत. Wink

नियंत्रण येत नाही कधी, पण त्यातल्या त्यात शांत वाटते. Happy
------

हा धागा आत्मविकास आणि क्लृप्त्या या ग्रुपमधे हलवा आचार्य , दिसतचं नाहीये धागा.

माझे मन कधी अस्थिर झाले तर मी खालील गोष्टी करतो.

१) एकांतवास - यासाठी माझी आवडती जागा वॉशरूम. यात भारतीय बैठकी जाऊन वेस्टर्न कमोड आलेत हे बेस्ट झाले. तासनतास ईथे बसता येते. त्या वेळेपुरता माझा बाह्य जगाशी संपर्क तुटतो आणि त्यातून येणाऱ्या चिंता मिटतात. अगदी ऑफिसमध्येही हा अनुभव रोज दोनदा घेतो. प्रोजेक्टमध्ये कितीही आग का लागली असेना, एकदा आत शिरून कडी लावली की त्या दरवाज्यापलीकडे प्रचंड काम आपली वाट पाहतेय याचा विसर पडतो. साहजिकच त्याचा ताण जातो. बाहेर आल्यावर पुन्हा ताजेतवाने होऊन भिडता येते.

२) छंद जोपासणे - माझा सर्वात आवडता छंद लिखाण आहे. (याचा अर्थ मी लेखक आहे असा नाही Happy ) पण काहीतरी लिहिणे हे माझ्यासाठी स्ट्रेसबस्टरचे काम करते. आणि तो मूड मग तेवढ्यापुरताच नाही तर पुढेही काही काळ फ्रेश राहतो.

३) आवडीचा खेळ खेळणे - काहींबाबत छंद आणि आवडीचा खेळ एकच असू शकते. पण मला ईथे शारीरीक हालचाल अपेक्षित असते. मग तो बैठा खेळ का असेना तरी तो तितक्याच enthusiasm ने खेळला तर जी एक उर्जा अंगात संचारते ती मनालाही उभारी देते. कारण शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरुस्त. कुठलाही खेळ उत्साहात खेळणे हे नकळत आपल्या मनाला आपल्या तंदुरुस्तीची खात्री पटवून देते. माझ्या बाबतीत खेळाचा हा ईफेक्ट साधायला मुलांसोबत दंगा घालणेही पुरते. ईनफॅक्ट ते जास्त परीणामकारक ठरते.

४) कुटुंब आणि मित्रपरीवार - मनाला उभारी देणारी जगातली सर्वात स्पेशल भावना म्हणजे आपण कोणालातरी हवे असणे. मग ते तुमचे कुटुंबीय असतील वा मित्रपरीवार वा अशी कुठलीही जनता त्यांनी तुम्हाला तुमच्या गुणदोषांसह स्विकारले असते. यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. ते तुमच्या मनात कधीही नकारात्मक विचार येऊ देणार नाहीत.

याऊपर मी नास्तिक विचारांचा असल्याने देव या संकल्पनेचा मला फायदा ऊचलता येत नाही. आध्यात्मिक गुरुंची गरज आजवर कधी भासली नाही वा अजून तो अनुभव घ्यावासा वाटला नाही. तरी आजही आईवडील सोबत असताना मी फार सुरक्षित फिल करतो. जेव्हा आपल्याला काही सुचत नाही तेव्हा त्यांचे ऐकतो. माझ्यासाठी देव आणि गुरू तेच आहेत तुर्तास.

अस्मिता, आवडला प्रतिसाद.
हे विशेष आवडले.
५. रोज काही वेळ एकटं राहणे. एकांतवास आवश्यक आहे. तेव्हाच स्वसंवाद साधता येतो, आपण मनाला डिसमिस करत रहायचे पर्याय शोधत असतो. सोमि वगैरे.
६. नो गॅजेट्स फॉर समटाईम.
७.प्रत्येक गोष्टीवर रिएक्ट करायची गरज नाही. आपण काही मोठी व्यक्ती नाही, आपल्या मताला काडीचीही किंमत नाही. उगाच रक्त आटवायचं नाही. काहीही पर्सनली घ्यायचं नाही. (नंबर तीन सोडून)

ऋन्मेष,
क्र 3, 4 मला पण. शेवटचा क्र 5 केला तर त्याबद्दल कुणीतरी लिहीलच. वाट पाहूया.

जे काही तुम्ही कराल ते तुमच्या आवडीचे असावे तर तुमचे मन कुठेच भटकत नाही.
उत्तम आरोग्य असणाऱ्या शरीरात च निरोगी मन वास्तव्य करत असते.
त्या मुळे योगा आणि शारीरिक व्यायाम मन लावून करायला हवा.
अगदी मनापासून.
कोणी सांगत आहे म्हणून उपाय कधीच करता येत नाहीत.
आडात च नसेल तर पोहऱ्यात कोठून येणारं.
ह्या म्हणीचा अर्थ ते समजून घेण्यासाठी वापरावा