अज्ञातवासी - S02E03 - फैसला...

Submitted by अज्ञातवासी on 20 December, 2022 - 07:44

याआधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/80454

काकू धावतच वाड्यात आल्या.
समोर प्रचंड माणसांच्या गर्दीत तो उभा होता.
हातात भली मोठी एके56 घेऊन...
"अप्पासाहेब, अप्पासाहेब, अप्पासाहेब... बोलावलं नाही मला. म्हणजे, मीसुद्धा सदस्य आहे ना घरातला. आहे का नाही?"
"मोक्षा, अरे घरं तुझंच आहे."
"येस. हे घर माझं, हा वाडा माझा, ही माणसं माझी, ही खुर्ची माझी."
असं म्हणून तो निवांत खुर्चीवर बसला.
संग्राम सरसावून निघणार तेवढ्यात अप्पांनी त्याला अडवले.
"खुर्चीचा निकाल अजून लागायचाय मोक्षा."
"पण त्या खुर्चीच्या नादात, आपल्याच माणसांचा निकाल लागायला नको, काय?" मोक्ष हसला.
"काकू," रूपाली मागून हळूच म्हणाली.
बोल.
"हा असा वेड्यासारखा का वागतोय."
"कारण कधीकधी शहाण्यांना कुणीही जुमानत नाही."
मोक्ष शेलार, सोबत खानसाहेबांची माणसे...
झोया खान स्वतः...
"ओ भजनी मंडळ... व्हाय स्टॉप??? सुरू ठेवा." मोक्ष ओरडला.
..आणि दामोदर महाराजांनी पुन्हा कीर्तन चालू केलं.
"अतिशय सुंदर, मंत्रमुग्ध. अद्भुत. महाराज, पाया पडतो." मोक्ष महाराजांच्या पाया पडायला गेला.
महाराजांनी घाबरतच त्याला आशीर्वाद दिला.
"तुला काय वाटतं, ही मोठी बंदूक घेऊन तू आम्हाला घाबरवशील?" संग्राम म्हणाला.
"भावा, भीती बंदुकीची नाही, तर बंदूकवाल्याची असते." मोक्ष त्याचा डोळ्यात बघत म्हणाला.
"म्हणजे बघ ना, ही एके५६, हिच्याकडे बघून कुणी काय म्हणेल? की भारी आहे हो बंदूक, केवढ्याला पडली? पण जर तुम्हाला कळलं, की ही एके५६ ज्याच्या हातात आहे, त्याने काल ३८ लोक मारले तर???"
एक भीतीची लहर सगळ्यांमध्ये पसरली.
"खुर्ची बंदुकीने नाही मिळत मोक्षा, मतदानाने मिळते." अप्पासाहेब म्हणाले.
"चला, लवकर संपवून टाकू, मतदान. चला रे छोट्या हॉलमध्ये."
आणि तो छोट्या हॉलकडे निघाला.
सगळे जागीच थिजून उभे होते.
त्याने मागे वळून बघितले...
"काय मंडळी, आमंत्रण द्यावं लागेल का? चला की..."
सगळे यंत्रवत त्याच्यामागे निघाले.
कित्येक वर्षांनंतर त्या छोट्या हॉलमध्ये आज इतके लोक जमलेले होते...
पुन्हा एकदा खुर्चीचा वारसदार निवडण्यासाठी.
हे इतकं अनपेक्षित होईल, अशी कुणीही कल्पना केली नव्हती.
पंधरा खुर्च्या. समोरासमोर चौदा आणि टेबलाच्या सुरुवातीला एक.
मोक्ष उजवीकडच्या पहिल्या खुर्चीवर बसला.
सगळे जण त्याच्यामागे आत आले. झोया मोक्षच्या मागे उभी राहिली.
संग्राम डावीकडच्या खुर्चीवर बसला.
अप्पासाहेबांनी सगळ्यात समोरची खुर्ची पटकावली. हेड ऑफ द टेबल!
"थोडावेळ, फक्त थोडावेळ." मोक्ष पुटपुटला.
जाधव, पांडे, सायखेडकर, डिसुझा, सिंग आणि शेखावत. सर्वजणांनी शेवटच्या सहा खुर्च्या पटकावल्या.
तात्या जाधव...राऊत... विश्वासराव...ज्ञानेश्वर शेलार... काकासाहेब आणि अस्मिता शेलार. यांनी अजून सहा.
प्रचंड अनिश्चितता, आणि चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.
थोडावेळ कुणीच काही बोललं नाही. तेवढ्यात काही बंदूकधारी झोयाच्या मागे येऊन उभे राहिले. त्यांची बंदूक झोयाकडे रोखलेली होती.
"घाबरु नकोस मोक्षा, बंदुका आमच्याकडेही आहेत. फक्त सेफ्टी रे." संग्राम हसला.
मोक्षही हसला.
पुढच्या काही क्षणातच टेबलावरची बंदूक लोड झाली, झोयाकडे पास झाली, आणि तिने तिघांना गोळ्या घातल्या.
तीन खून, तीन सेकंदात...
स्मशानशांतता.
"इथे कुणाला सुरक्षित वाटावं, हे मी ठरवणार संग्राम..." मोक्ष म्हणाला.
"हेच आम्हाला नकोय, मोक्षा. तुम्ही दोघा भावांनी लढून परिवाराला यातना द्याव्यात, हे कुणालाही नकोय.
म्हणून, खुर्चीवर कुणीही बसो. दुसऱ्याला घर आणि हा देश सोडावा लागेल. पुन्हा त्याने कधीही या देशात पाऊल टाकायचं नाही. कळलं? आहे दोघांना मंजूर?" आप्पासाहेब निर्धाराने म्हणाले.
मोक्षने होकारार्थी मान हलवली, आणि संग्रामनेही.
"झोया, खानसाहेब येणार आहेत का?" आप्पासाहेबांनी विचारले.
"काल कुणीतरी आमच्या हवेलीवर हल्ला केला. त्यात आमची बरीच माणसे शहीद झालीत. त्यांचा दफनविधी अजून झालेला नाही. त्यांना कुणी मारलं, यांचाही दफनविधी..."
"पुरे. कळलं आम्हाला." आप्पासाहेबांनी तिला थांबवले. "तर मंडळी, खानसाहेब इथे असते, तर बरं झालं असतं. अनेक वर्षापूर्वी अशीच स्थिती आली होती. मागच्या पिढीने तर हे सगळं बघितलं देखील आहे. तेव्हाही दादासाहेब, आणि ताई... दोघांमध्ये निर्णय घ्यायचा होता. पण शेवटी अण्णांनी दादासाहेबांना निवडलं. अर्थात ताई असती, तरीही आपला तितकाच दबदबा राहिला असता हेही खरं." आप्पासाहेब थांबले, आणि त्यांनी सगळ्यांकडे बघितलं.
"काळ बदलला, लोकशाही आहे. आजकाल निर्णय बंदुकीने नाही, तर सर्वसहमतीने घेतले जातात. किंबहुना बहुमताने तरी. हा प्रश्न इतका लवकर समोर येईल, असं आम्हाला तरी वाटलं नव्हतं. पण ठीक आहे. जे महादेवाला वाटेल, ते होईल.
सर्वात आधी दोघा उमेदवारांनी आपापला परिचय द्यावा. परिचय म्हणजे आपलं नाव-गाव नाही, तर शेलार परिवारासाठी आजवर आपण काय केलं, याचा परिचय द्यावा. बोला, कोण आधी सुरुवात करणार?"
मोक्षने संग्रामकडे बघून त्याला सुरू करण्याची खूण केली.
संग्राम हसला.
"इथे आम्हाला कुणी ओळखत नाही, असं नाहीये. तरीही आम्ही काय परिचय द्यावा?
माझं आयुष्य या परिवारात गेलं. जेव्हा काही लोक जीवाच्या भीतीने विदेशात पळून गेले, तेव्हा मी दादासाहेबांच्या अंगावर खेळलो, वाढलो. सावलीसारखा त्यांच्या सोबत राहिलो. कितीदा मृत्यू समोरून गेला, गणती नाही, पण तरीही पर्वा केली नाही. माझा प्रत्येक श्वास, या वाड्यासाठी. प्रत्येक क्षण मी या वाड्यासाठी जगलो, आणि यापुढेही जगेन. माझा जन्म, या खुर्चीसाठी झालाय, आणि या खुर्चीवर माझाच हक्क आहे. बस... एवढंच."
त्याचा श्वास फुलला होता.
"मोक्ष, तुम्हाला काही बोलायचंय?"
मोक्ष हसला.
"बरोबर आहे तुझं, मी आयुष्यभर पळत राहिलो, वाड्यापासून, स्वतःपासून, माझ्या बापापासून, सगळ्यापासून... कारण मला कधीही इथे यायचं नव्हतं. मी आलोदेखील नसतो.
पण यावं लागलं, आलो, आणि इथलाच झालो. इथेच राहिलो, अक्षरशः वेडादेखील झालो. पण राहिलो. तू मृत्यूचा सामना केलाय संग्राम, पण मी मृत्यूला नाचवलंय, आणि यापुढेही नाचवत राहीन. एक थेंब रक्ताचा न सांडता, कारण या शेलारांमधील कुणाचाही रक्ताचा एक थेंब सांडू देणार नाही, ही शपथ घेतलीय.
हा वाडा नाही, तर हे लोक, हे नाशिक माझं आहे. आणि कायम माझंच राहणार. खुर्चीवर बसणं तुझा हक्क आहे, पण ही माझी नियती आहे, आणि ती माझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही... महादेवाची शपथ."
सर्वजण थोडावेळ शांत बसले...
"आरंभ करुयात." आप्पासाहेब म्हणाले.
"मी अप्पासाहेब जगनअण्णा शेलार, माझं मत मी संग्राम शेलार याला देतोय. कारण आयत्या बिळात नागोबा बसवण्यापेक्षा, या मातीत जन्मलेल्या, वाढलेल्या माणसालाच मी प्राधान्य देईन."
"मी तात्यासाहेब जाधव, माझं मत संग्राम."
"संग्राम," राऊत म्हणाले.
"संग्राम," ज्ञानेश्वर शेलार.
"संग्रामच..." विश्वासराव म्हणाले.
आप्पासाहेब हसले.
माझ्यामते आपण दादासाहेबांच्या सहकाऱ्यांचंही मत घेऊयात.
शेखावतने सगळ्यांकडे रोखून बघितले.
"मोक्ष..." त्याने शांततेत उत्तर दिले.
"मोक्ष..." पांडे म्हणाला.
"मोक्ष..." जाधव.
"मोक्ष..." सिंग म्हणाला.
"मोक्ष..." सायखेडकर.
अत्यंत अनपेक्षितरित्या या घडामोडी बघून अप्पासाहेब चक्रावले.
"म्हणजे तुम्ही सगळ्यांनी इमान विकलं तर..." ते म्हणाले.
"आमचं इमान एकच होतं. दादासाहेब. मग ते नसतील तर त्यांच्या मुलाला इमान नाही द्यायचं नाहीतर कुणाला?" शेखावत म्हणाला.
"तुमचं इमान खुर्चीसोबत रहायला हवं," अप्पासाहेब म्हणाले.
"खुर्ची आमचीच आहे अप्पासाहेब." शेखावत म्हणाला.
"अजून नाही शेखावत, अजून नाही." डिसुझा म्हणाला.
क्षणभर शांतता पसरली.
"माझं मत, संग्राम. डिसुझा शांतपणे" म्हणाला.
"डिसुझा..." शेखावत सुन्न झाला.
संग्राम मोठमोठ्याने हसू लागला.
"तयारी करा मोक्षदादा, संपलं सगळं." तो कुत्सितपणे म्हणाला.
मोक्ष हसला.
"अजून दोन मते बाकी आहेत संग्राम..."
"अच्छा, स्वप्नात आहेस का? अरे दादासाहेबाना कधी ताईने राखी बांधू दिली नाही, आणि ती तुला मत देईन. ताई, दे निर्णय, संपव सगळं." आप्पासाहेब उत्तेजीत होत म्हणाले.
"तो हरण्याच्या आधी माझं तर मत विचारा," काकासाहेब म्हणाले.
"हो हो सांगा काकासाहेब... म्हणजे मत वाया घालवायचं की आमच्या नजरेत चांगलं राहायचं हे तुम्ही ठरवा." संग्राम म्हणाला.
काकासाहेब थोडावेळ शांत बसले, आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.
"आजवर मी शांतच राहिलोय रे. पण आज नाही. लढू दे मलाही शेवटच्या क्षणापर्यंत. माझं मत मोक्ष शेलार." आणि त्यांनी खुर्चीवर मागे मान टेकवली.
"ताई. बघ नियतीने कसं दान तुझ्या पदरात टाकलं... आज तुझ्या मताने शेलारांचा वारसदार ठरणार. सांग, कळू दे सगळ्यांना." आप्पासाहेबांची उत्तेजना लपत नव्हती.
अस्मिता राणे - शेलार.
जगनअण्णा शेलारांची मुलगी...
तिन्ही भावांची बहीण...
मोक्षची नजर तिच्याकडे रोखली गेली होती, आणि संग्रामचीसुद्धा...
"अभिनंदन संग्राम..." अस्मिता शेलार म्हणाल्या...
खोलीत सगळे थिजल्यासारखे बसून राहिले.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Welcome back...
...... with a solid bang

इतक्या काळानंतरही उजळनी न करता कथेची लिंक लागली. भारी कमबॅक.

पण इथुन पुढे जर सलगता नाही ठेवली तर वाचणार नाही ही कथा Happy

नाही वाचणार ठरवून देखील आपोआप क्लिक करून वाचत गेलो.
इतका मोठा गॅप असून देखील लिंक लगेच लागल्या. सगळं आठवलं.( परीक्षेत लिहिताना अभ्यास असा आठवला असता तर असेही वाटलं )
आता न चुकता आठवड्यात 2 ते 3 भाग येणार आणि पूर्ण करणार हे मात्र ठरवा.

छान भाग..!
लवकरात लवकर कथा पूर्ण करण्यासाठी खूप शुभेच्छा..!!

@धनवंती - धन्यवाद. तुमचा प्रतिसाद नेहमी हुरूप वाढवतो.
@आबासाहेब - धन्यवाद. इथून पुढे नेहमी लिहिण्याचा मानस आहे.
@झकासराव - धन्यवाद. आठवड्यातून निदान एक भाग यावा, असा प्रयत्न करेन.
@आनंदा - धन्यवाद Happy
@रूपाली - धन्यवाद Happy