अज्ञातवासी - S2E02 - मृतात्म्याचे मनोगत!

Submitted by अज्ञातवासी on 30 October, 2021 - 13:27

आधीचा भाग - https://www.maayboli.com/node/80439

'नमस्कार!
माझा आवाज ऐकून तुम्ही चक्रवाल, म्हणाल, मोक्ष राजशेखर शेलारला ऐकू येणारे आवाज, आम्हालाही ऐकू येताय का?
तर उत्तर आहे हो, आणि नाहीही...
जेव्हा जिवंत माणसांना नेमून दिलेलं कार्य करता येत नाही, तेव्हा मुडदे बोलतात.
जेव्हा जिवंत माणसे मेलेल्या माणसासारखी वागतात, तेव्हा मुडदे बोलतात.
मुडदे गोष्टी सांगत नाहीत, ते सांगतात इतिहासाच्या पाऊलखुणा, आणि भविष्याच्या चाहूलखुणा.
कुणी म्हणेल, राजशेखर शेलार, तुम्ही तुमच्या मुलाला राक्षस बनवलं, कुणी म्हणेल हत्यारा बनवलं... कुणी म्हणेल मी त्याचं आयुष्य बरबाद केलं...
पण मी सांगतो मी काय केलं...
मी त्याला फक्त नियतीच्या चक्रावर आणून सोडलं...
वर्तुळ पूर्ण करण्यासाठी...
आज माझ्या माणसांची ओळख करून देतो.
हसलात ना?
...मी जिवंत असेपर्यंत तरी ती माझीच माणसे होती...
विजयसिंह शेखावत...
राजस्थानच्या एका निर्धन शेतकऱ्याचा मुलगा. नाशिकला आला तर खिशात एक आणा नव्हता. मात्र होती ती खानदानी अदब आणि अतिशय चतुर मेंदू. नाशिकच्या एका कंपनीत लोखंड वितळवण्याचे काम करायचा.
जेव्हा मला पहिल्यांदा भेटला, तेव्हा तो एक किडकिडीत बांध्याचा, तेजस्वी डोळ्यांचा एक तरुण होता.
माझ्याच हातातल्या पिस्तूलकडे तो उत्सुकतेने बघत होता.
मी सहज पिस्तूल त्याच्या हातात दिली.
लोखंड कच्च आहे. पाच सहा शॉटनंतर पिस्तूल हातात फुटेल. काळजी घ्या.
तेव्हा पिस्तूल आनंद बनवायचा. त्याच्या हातात पिस्तूल दिली...
पाचव्या शॉटला त्याचा हात जायबंदी झाला...
... आणि त्या दिवसापासून शेखावत शेखवतसा झाला...
गजानन पांडे...
अट्टल बिहारी. बिहारमधून त्याचा बाप आचारी म्हणून नाशिकला आला.
त्याचा जम बसेना, तर याने रिक्षा चालवायला सुरुवात केली. त्यानंतर मुंबई टॅक्सी.
पांडेची वाणी अतिशय मिठास. बोलायला लागला की समोरच्याने ऐकलच पाहिजे.
असाच एका कंपनीत पांडे घुसला, आणि तिथलाच झाला.
त्यानंतर पांडेच्या सहमतीशिवाय नाशिकच्या टॅक्सी आणि उद्योग, दोघांचं चाक हलेनास झालं.
निलेश सायखेडकर...
सीए... सुरुवातीला हिशेब बघण्यासाठी आला.
आणि मोठमोठ्या कंपन्यांचे हिशेब तो ठेवायला लागला.
देवराज जाधव.
एका कंपनीचा स्टोरकिपर... जोपर्यंत जाधव स्टोरमध्ये आहे, एका पैशाचं मटेरियल इकडे तिकडे जाणार नाही.
पण वरच्या साहेबाला हे समजलं नाही. नवीनच होता.
खोटा आळ घेतला, जाधवने चिडून त्याचं डोकं फोडलं.
मग माझ्याकडे आला, आणि सोन्यात खेळायला लागला.
समशेर सिंग...
खानदानी श्रीमंत, आणि माझा अतिशय विश्वासू साथीदार.
मनमाड मी त्याला आंदण दिलं, आणि त्याने सगळ्या पेट्रोल कंपन्या मला...
लिओनेल डिसुझा...
गोव्याचा माणूस. फेणी बनवण्यात त्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. तिथे पोलिसांनी पकडलं. सुटला आणि थेट नाशिकला आला, आणि मला भेटला.
आता कोकेनपासून ते वाईनपर्यंत सगळं बनवतो...
अस्मिता राणे...
ताईने मला भाऊ मानलं नाही, मी खुर्चीवर बसल्यानंतर.
आणि मी तिला बहीण मानण सोडलं नाही.
राऊत...
माझं आणि याचं कधी जमलं नाही
काकासाहेब शेलार..
काका आपल्याच कादंबऱ्यात जगत राहिला.
तात्यासाहेब जाधव.
सरड्याचा परममित्र
हेमलता विश्वासराव.
अतिशय धोकेदायक बाई
ज्ञानेश्वर शेलार.
फक्त आडनावाने शेलार
अप्पासाहेब शेलार.
डुख धरलेला नाग.
तुम्ही म्हणाला, हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय?
कारण स्पष्ट आहे.
यापुढे जे घडेन, जसं घडेल त्याचे तुम्ही साक्षीदार असाल...
तूर्तास मी रजा घेतो.
कारण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.'

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान... !!
जमल्यास मोठे भाग लिहा...!

छान... !!
जमल्यास मोठे भाग लिहा...!

नवीन Submitted by रूपाली विशे - पाटील on 31 October, 2021>>>अनुमोदन.

सुंदर लिहिले आहे परंतु खालील एक सुधारणा सुचवावीशी वाटते,

कथेचे शिर्षक चुकलेले आहे, हिंदू धर्मग्रंथ आणि वेद पुराणानुसार, आत्मा हा अविनाशी आहे,
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥
आणि 'मृतात्मा' या समासाची फोड 'मृत आहे आत्मा असा तो' ही होते जे धर्माच्या मते अशक्य आहे...आजकाल लोक सर्रास हा शब्दप्रयोग करतात, पण माझ्यामते ज्यांच्यात लिहिण्याची प्रतिभा आहे त्यांनी ही खात्री करायला हवी की आपणाकडून जास्तीत जास्त बिनचूक कसे लिहीले जाईल ज्यायोगे दर्जेदार वाचले जाईल आणि बिनचूक बोलले जाईल. धन्यवाद.