स्वीट पोटॅटो कॅसरोल

Submitted by धनि on 5 December, 2022 - 16:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

स्वीट पोटॅटो - २ - इथे कधी कधी याम म्हणूनही विकतात. भारतात कदाचीत रताळी वापरून करता येईल.
बटर - २ टेबलस्पून (अन सॉल्टेड)
क्रीम / दूध - २ टेबलस्पून
ब्राऊन शुगर - (उगीच गैर अर्थ काढू नयेत) - १ चमचा - तुमच्या आवडीनुसार
मेपल सिरप - १ चमचा
थोडेसे मीठ - अगदी चिमूटभर - सॉल्टेड बटर असेल तर मीठ नाही घातले तरी चालेल
दालचिनी पावडर
जायफळ पावडर
कँडीड pecan - अक्रोड वापरले तरी चालतील - सजावटीकरता

क्रमवार पाककृती: 

तो थँक्सगिव्हिंग जेवणाचा फोटो टाकल्यावर चक्क या रेसेपीची मागणी झाली त्यामुळे खास लोकाग्रहास्तव लिहीतो आहे. बर्‍याच संशोधनानंतर तयार झालेली रेसेपी आहे. क्रमवार लिहीतो.

१) स्वीट पोटॅटो साले काढून, धुवून उकडून घ्या. मी आधी पाण्यात घालून गॅसवर उकडायचो. यावेळेस मात्र मी मायक्रोवेव्ह मध्ये पोटॅटो लावतात त्या सेटींग वर बेक केले. (त्यात मी त्यांना धुवून घेतले, बेक केले आणि मग साले काढली)
२) ते गरम असतानाच मॅश करायला सुरूवात करा. ते करतानाच त्यात बटर घालून मॅश करा.
३) हे नीट मॅश होऊन गुठळ्या आणि रेशा गेल्या की मग त्याच्यात दूध आणि ब्राऊन शुगर घालून हलवा. त्याच वेळेस मेपल सिरप पण घाला.
४) थोडे सैलसर मिश्रण झाले की त्यात मीठ, दालचिनी आणि जायफळ पावडर घाला.
५) हे सगळे मिश्रण एका ओव्हन सेफ भांड्यात टाका. मी पायरेक्स वापरतो ८ * ८ पॅन
६) त्यावर कँडीड pecan लावा. तुम्हाला आवडेल अशी नक्षी करा हवे तर Wink
७) हे ४०० फॅ वर २५ - ३० मिनीटे बेक करा.
८) थोडे सेट झाले की खायला द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांकरता
अधिक टिपा: 

- मेपल सिरप - ब्राऊन शुगर चे प्रमाण तुम्हाला किती गोड हवे आणि कशी चव हवी त्यानुसार बदला.
- मीठ फक्त चवीकरता आहे - खारा पदार्थ नाही हा.
- रताळे आहेत म्हणून उपवासाला चालेल का असे विचारू नका, तुमचे तुम्हीच ठरवा.

माहितीचा स्रोत: 
वेगवेगळे व्हिडीओ आणि प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मस्त! हॉलिडे रेसिपी आहे एकदम.
बर्‍यापैकी हीच रेसिपी + अंडी आणि दुधा ऐवजी क्रीम घालुन पम्पकिन पाय असाच करतो.
यात अंडं घालुन कॅसरोल पण छान होईल वाटलं. करुन बघतो.

पाकृ आवडली. नक्की करून पाहणार.

मेपल सिरप अत्यावश्यक आहे का? तेवढ्यासाठी बाटली घ्यायचे जीवावर आलेय.
काकवी आहे घरात. कदाचित ती वापरेन.

धन्यवाद सगळ्यांना.

मेपल सिरप न वापरता नुसतीच साखर जास्त वापरली तरी चालेल.

Mast रेसीपी आहे.अंडे नसल्याने अधिकच छान. मेपल सिरप न वापरता काकवी वापरेन.