सच कहुं तो- नीना गुप्ता : थोडा परिचय-थोडं चिंतन

Submitted by अस्मिता. on 1 December, 2022 - 20:45

ह्या पुस्तकाविषयी ऐकलं होतं, पण वाचनाच्या बाबतीत अचानकच रस वाटणं बंद झाल्याने हे आणि इतरही बरीच पुस्तकं मागेमागे पडत गेली. एकदातर ह्या पुस्तकाची १०० पानं पंचेचाळीस मिनिटात वाचली, 'पानं मोजणं' कधी करेन वाटले नव्हते. पण मी त्या अ-वाचकाच्या गर्तेतून बाहेर पडतेयं हेही थोडके नाही. तरीही पूर्वीचा 'राक्षस' परत हवायं. जयश्री गडकरचे 'अशी मी जयश्री' सोडून मी याआधी कुठलेही सिने किंवा नाट्यसृष्टीतल्या लोकांचे आत्मचरित्र वाचलेले नव्हते. दादा कोंडकेचे 'एकटा जीव' आईने सुचवले होते, तेव्हा 'ती तूच आहेस का, जिने मला दादा कोंडकेचा एकही सिनेमा बघू दिला नाही' झाले होते !! एवढंच नाही तर तिने 'फडके - अर्नाळकर' पण गाठोड्यात घालून भिंतीतल्या कपाटात वर टाकून दिले होते. हे सांगायचं कारण की नीनाच्या आईने पण 'लडकी बिगड़ जायेगी' या भीतीपोटी अपार कष्टं घेतले होते. ती तिचं 'बिघडली', आपण आपलं बिघडू. Happy

नीनाच्या प्रेमप्रकरणांमधल्या संभाव्य 'रसाळ' तपशीलामुळे ते पुस्तक हातोहात खपलेही/खपतंही असेल. तिने व्हिवियनची, मसाबाची, सर्वांचीच प्रायव्हसी जपण्यासाठी फार समतोल साधत तरीही वाचकांपर्यंत जास्तीत जास्त प्रामाणिक-फर्स्ट हँड अनुभव पोचवत लिहिलंय. इतकं स्पष्टं-सरळ भाषेत व जिथे अनावश्यक तपशील देण्याची गरज नाही , तिथे 'प्रिय वाचकांनो, मला कुणाचा अनादर करायचा नाही, कुणाच्या भावनाही दुखावयाच्या नाहीत, म्हणून यापेक्षा जास्त सखोल मी लिहू शकले नाही.' असा थेट कबूली जबाब दिलायं. लोकांना फिल्मी लोकं सामान्य लोकांपेक्षा 'उघड्यावर' असल्याने ते व्हल्नरेबल असतात हे माहिती असते. ह्याचं भान तिलाही आहेच. यास्तवं तिने फार 'सशक्तं लक्ष्मणरेषा' आखली आहे. जी अलिप्ततेपेक्षा healing झाल्यावरची वाटली. जितक्या जजमेंट सहन करायची ताकद आहे, तेवढीच माहिती बाहेर येऊ दिली आहे. हा पर्फेक्ट अप्रोच सांभाळूनही साधीसरळ शैली जपलीये.

हे पुस्तक पुस्तक म्हणून असामान्य नाही, ती काही सराईत लेखिकाही नाही. तसा काही आवही आणलेला नाही. तरीही खिळवून ठेवणारं व रंजक आहे. लहान वयात पळून जाऊन केलेले लग्नं मगं वर्षभरातच घेतलेला घटस्फोट, हे कशानं तर आई म्हणत होती 'लग्नं करा व हवं तितकं हिंडा पण आधी असे चाळे नकोत.' नंतर पंडित जसराज यांच्या मुलाशी ठरलेलं लग्न अचानक मोडणं व त्यावर त्या कुटुंबानी प्रचंड घरोबा असतानाही कुठलेही सबळ कारण न देता उडवाउडवीची उत्तरं देणं. इथे नाव बदललं आहे पण फारच सहज लक्षात येतं. व्हिवियनच तर आधीच विवाहित होता. हे माझ्या मनाला टोचलंच. कारण मान किंवा सुख यापैकी एकाच पर्यायाचे स्वातंत्र्य असेल तर मी मानंच निवडेन. जन्मभर असुखी राहीले तर राहीले. अशा नात्यांना भविष्य आणि स्थैर्य दोन्ही लाभत नाही. नीना काहीतरी वेगळीच आहे. तिने या नात्याला फार आदर दिलाय, मसाबाला होऊ देण्याचा तिला काहीही पश्चाताप नाही. I am pro-choice for pregnancy but not-so-much with falling for an already married man. तेही जेव्हा आपण कधीही एकत्र येणार नाहीत ह्याची खात्री असताना. ती आता खूप आनंदात आहे , विवाहित असलेल्या माणसाच्या प्रेमात पडून तो विभक्त झाल्यावर आधीच्या विवाहबाह्य संबंधातून झालेली तरूण मुलगी असताना मगं लग्न केलंय. किती 'आऊट ऑफ द बॉक्स' असावं एकाच माणसानी..! मला एवढे तपशील माहिती नव्हते. पण मी ह्यामुळे तिला लक्षात ठेवणार नाहीये,तिच्या कामामुळेच ठेवेन. तरीही हे माझ्या कंफर्टझोनच्या बाहेरचं होतं.

मला आपलं छोटीमोठी पण छान कामं करणारी, आता या(?) वयात कारकीर्द भरभराटीस आलेली आत्मविश्वासू वावर असणारी अभिनेत्री हीच ओळख होती. 'मसाबा- मसाबा' सिरीज मला फार आवडली होती, त्यातलं मायलेकीचं नातं भन्नाट वाटलं होतं. असेही मला मिक्सड-रेस लोक अफाट खास वाटतात, पण या सिरीजमुळे जी 'वास्तवाधारित काल्पनिका' म्हणता येईल, त्याने मला मसाबाही सुंदर, कल्पक, हुशार, जबाबदार आणि मेहनती वाटायला लागली.
1ca9b15c-c7e4-4be3-9bfe-8779d51a9148.__CR0,0,300,300_PT0_SX300_V1___.jpg

या पुस्तकातला मला आवडलेला भाग म्हणजे 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' आणि त्यातल्या गमतीजमती व शैक्षणिक प्रकिया. यात आवर्जून व पुन्हापुन्हा आलेली नावं म्हणजे सतीश कौशिक, ओम पूरी, इला अरूण, अनिता कँवर आणि इब्राहिम अल्काझी. ह्या शिवाय यात्रा, बहादुरशहा जफर, खानदान या दूरदर्शनवरील कार्यक्रमाचा उल्लेख, तसेच 'मंडी' सिनेमातले धमाल किस्से , शाम बेनेगेल यांच्याकडून मिळालेले रीतसर शिक्षण व त्यांची शिस्त. ऍटनबरोंच्या 'गांधी'मधे आभाची भूमिका. 'लल्लू लडकी' ची व्यक्तिरेखा का केलीस हा गिरीश कर्नाडांचा रोखटोक सवाल , त्यानंतर टाईपकास्ट झाल्याने खरोखरचं चांगली कामं मिळायची बंद होणे व नंतर दूरदर्शनमुळे झालेली मदत. स्वतःचा 'बाजार सीताराम' ह्या दिल्लीतल्या पूर्वजांच्या घरावर बेतलेली पूर्णपणे स्वनिर्मित नाटीका व त्याला मिळालेला नॅशनल अवार्ड. तरीही कामाबाबत अनिश्चितता. डेव्हिड धवनच्या सिनेमात मिळालेला व कुठलाही संवाद नसलेला भिकारणीचा रोल ,'किमान एका वाक्याचा संवाद तरी द्या' म्हटल्यावर झालेली कुत्सित हेटाळणी. 'चोली के पिछे' गाण्यामुळे मिळालेले स्टेज शोज, त्यातले बरेवाईट अनुभव. सतत दुय्यम भूमिकांचा आलेला वीट. सप्तपदीच्या सीनमधे पॉलिस्टर कपड्यात यज्ञवेदीजवळील दृष्यादरम्यानच्या चित्रिकरणात 'टीपू सुलतान'च्या सेटवर लागलेली प्रचंड आग व त्यातून मसाबाला पाजवायला काढता पाय घेतल्याने थोडक्यात बचावलेला जीव. एकता कपूरच्या मालिकांच्या लाटेत स्टार प्लसने रद्दबातल केलेले अनेक कार्यक्रम , त्यामुळे बसलेला मानसिक धक्का. अचानक मिळालेल्या 'बधाई हो' व 'पंचायत' आणि 'द लास्ट कलर' सिनेमातल्या गमतीजमती व कारकिर्दीला अनपेक्षितपणे मिळालेली कलाटणी. असे आणि इतरही रंजक-रोमांचक किस्से आहेत.
article-l-2022615412263744797000.jpg
सतत छोटीछोटी कामं करावीच लागणं कारण घर चालवण्यासाठी पर्याय नसणे, शिवाय हा निर्णय आईवडिलांच्या मनाविरूद्ध घेतलेला असल्याने , शक्यतो सगळ्या गरजा भागवणे हे नीनाला अगणित वेळा करावे लागलेयं. सोसायटीच्या सचिवानी नीनाचे चारित्र्यहनन केल्याने तिच्या बाबांनी त्याच्याविरूद्ध आवाज उठवून स्वतः सहभागी होऊन निवडणूका घेऊन त्याला पदावरून निलंबित केले, हे मला फार कौतुकास्पद वाटले. असे सगळे असूनही तिचे आईवडील अत्यंत सपोर्टीव्ह वाटले मला, कारण त्यांनी तिला मुंबईत घरं घेऊन दिली, मसाबाच्या वेळीही हट्ट धरला नाही, आईपश्चात बाबांनी तिचे बाळंतपण केले, ते व्हिवियनलाही अत्यंत आदराने वागवायचे, मसाबालाही अगदी मायेने वाढवलं. आधी जो काळजीपोटी विरोध असायचा तो त्यांनी कधीही ताणून धरलायं असं वाटलं नाही. तो विरोधही विरोध नसून ती तिच्या निर्णयांवर किती ठाम आहे याची चाचपणी वाटली. ती संस्कृतमधे एम फिल आहे. सुविद्य व बुद्धिमान मुलगी असल्याने तिच्या आईची इच्छा होती की तिने आपले PhD पूर्ण करून चांगल्या संस्थेत प्रोफेसर किंवा IAS व्हावे व या बेभरवशाच्या क्षेत्रात आपले आयुष्य लोटू नये. ही पालक म्हणून उच्चं तरीही अवाजवी नसलेली अपेक्षा आहे. वडिलांचा अजून एक संसार असल्याने आईला प्रचंड मनस्ताप व्हायचा , ह्यावर मोकळेपणाने सांगितले आहे. याकरिता त्यांच्या मृत्यूपश्चातचं लिहायचे धाडस तिने केलेयं.

हे पुस्तक प्रामाणिक आणि प्रांजळ वाटले. ना स्त्री मुक्तीचा आवेश- ना प्रसिद्धीचा अभिनिवेष ! ना चोरटेपणा- ना खाजगी बाबींचा चव्हाटा , ना उथळ- ना फार गंभीर. गुजगोष्टी केल्यासारखे पण संग्रही असू द्यावे असे सखोलही नाही. एकदा वाचताना कंटाळा येणार नाही इतके रोचक आणि सोप्या इंग्रजी भाषेत.

मला प्रवाहाविरूद्ध पोहणाऱ्यांची उत्सुकता वाटते ते या निर्णयांच्या परिणामांना कसे सामोरे गेले असतील म्हणून..! ती ताकद कोठून येते..! त्यांच्यात असं काय असतं जे माझ्यासारख्यांत नाही. चूक-बरोबरपेक्षा मला अधिक काही तरी हवं असतं, जे मला माझे तथाकथित "नियम" मोडायला लावेल. शूर नाही तर किमान मला समृद्ध तरी करेल. लेबल लावणं सोपं आहे पण त्याने आपलीच वाढ कुठेतरी खुंटते. मला माणसं फार आवडतात, त्यांच्याशी असलेल्या साधर्म्याने त्यांची सोबत वाटते व त्यांच्यातल्या वेगळेपणाने त्यातल्या समृद्धीची ओढ. फक्त निरिक्षकाच्या भूमिकेत रहायचं !!

मी काढलेला सारांश हा की नीना ही मुलीसाठी अतोनात कष्टं उपसणारी एक 'आधुनिक हिरकणी' आहे.

©अस्मिता
चित्र # साभार बॉलीवुड शादी आणि अमेझॉनवरची पुस्तक प्रसिद्धी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही रिचर्डबद्दलची पोस्ट फारेण्डकडून बघून आश्चर्य वाटलेले. कारण नीना गुप्ताने आपल्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या पुस्तकावरचे अस्मिताने लिहिलेले परीक्षण वाचून रिचर्डबद्दलचा आदर कमी करणे फारच घाईचे झाले.

कोणाला तो मुसाफिर चित्रपट आठवतोय का.. दोघे नवराबायको.. समीरा रेड्डी आणि महेश मांजरेकर हे अनिल कपूरला एकच घटना आपापल्या ॲंगलने एकदम विरुद्ध सांगतात. तेव्हा सत्य दोघापैकी एकच बोलत असतो. पण अश्या केसेसमध्ये मात्र सत्य दोन्हीच्या मध्ये कुठेतरी असण्याची शक्यता जास्त असते.

धन्यवाद राभु, पराग, वर्णिता आणि अवलताई Happy
राभु, निरिक्षण Happy
वर एका प्रतिसादात मी चुकून आत्मचरीत्र लिहायचं तर आत्मपरीक्षण लिहिलेय, परीक्षण आणि आत्मचरीत्र हे एकत्रं झालेयं, कृपया समजून घ्या. Happy
सर्व वाचकांचे आभार.

मस्त परीचय. खुप छान लिहिलंय अस्मिता. अगदी पुस्तक मिळवुन वाचावं सं वाटलं.
नीना आणि रिचर्ड गेले आयुष्यात पुढे. आपलं पब्लिक तिथेच तेच उगाळणार. कधी ही स्वार्थी तर कधी तो चुकीचा. लेबलं लावायची.

आरोपी क्र. १ - व्हिव्हियन रिचर्डस
आरोपी क्र २ -नीना गुप्ता
मायबोलीच्या सांस्कृतिक कोर्टात हजर व्हा हो SSSSSSSS
आपल्यावर सांस्कृतिक पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहे. याबाबतचा खटला मायबोलीचे निष्णात वकील श्री व सौ नेहमीचेच यशस्वी चालविणार आहेत. कोर्टाकडून आपणास वकील देण्याची मुभा देण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नसल्यास इथे गरीब वकील मिळू शकतील. मायबोली न्यायालयाचा निकाल आपणावर बंधनकारक राहील याची नोंद घेण्यात यावी.

मनापासून आभार सस्मित Happy , वाचलंस तर जरूर इथे नोंदव हं !
थँक्स व्हाईटहॅट , तुम्ही लेख वाचल्याचं लक्षात आलयं पण प्रतिक्रियेवरून काही कळत नव्हतं म्हणून आभार मानायचे राहून गेले होते. Happy
-----------

रघ्वाचार्य, Proud ऑर्डर ऑर्डर. आता पुढचा परीचय आध्यात्मिक आत्मचरित्रावर लिहिते मगं बघा कोर्टात कसा शुकशुकाट होतो. Proud

He may also have his side of the story. >>>>
पुस्तकावरचे अस्मिताने लिहिलेले परीक्षण वाचून रिचर्डबद्दलचा आदर कमी करणे फारच घाईचे झाले. >>>

अ‍ॅग्रीड. पण वाचल्यावर तसे वाटले हे खरे आहे. आणखी काही माहिती पुढे आली तर ते बदलेल परत.

आपलं पब्लिक तिथेच तेच उगाळणार. कधी ही स्वार्थी तर कधी तो चुकीचा. लेबलं लावायची. >>> सस्मित, हे समजले नाही. तिनेच आत्ता पुस्तकात तो विषय काढला ना? नाहीतर गेल्या १५-२० वर्षांत कधी यावर विचार केल्याचे आठवत नाही. फक्त मधे ती मसाबाची सिरीज आली तेव्हा "अरे ही तर रिचर्ड्सची मुलगी" असे आठवले होते Happy

फा, Happy
पुस्तकात जबाबदारीबद्दल स्पष्टं लिहिलेलं नाही, म्हणून मी लेखातही लिहिले नाही. सामोने आवर्जून विचारलं नसतं तर मी तेवढंही लिहिलं नसतं. त्या प्रतिक्रियेतही मी फक्त प्रेमाबद्दल आणि ब्रेकअपबद्दल लिहिले आहे. हे संदिग्ध असल्याने मला याबाबत मत नाही. शिवाय व्हिवियन व क्रिकेट दोन्हीतही रस नाही. मला कुतूहलही नव्हते. कारण तो पुस्तकाचा 'इसेन्स' नाही!!

धन्यवाद स्वाती Happy

फारेण्ड, तुम्हाला लिहिलंय असं नाही. पण १०० पानात तिचं शिक्षण करीयर मधला संघर्ष दिसुन ४ पानात हे प्रकरण लिहिलं असेल‌ तरी लक्षात तेच रहावं त्याचीच चर्चा व्हावी आणि त्यावरून तिला जज् करावं हे दिसुन येतं.
तुम्ही त्याच्या बद्दल आदर वाटला नाही किंवा कमी झाला ह्यात आता बघता चुकीचं वाटलं नाही मला. हे जनरली असा कसा वागला तो अशी प्रतिक्रिया येते तेवढं साधं वाटलं. सगळ्यानी लिहिलंच आहे.
टायपायचा कंटाळा येतो.
अस्मिता, नक्की.

वा, खूप छान परिचय अस्मिता. नीना गुप्ता आवडते.
छान लिहिलेयस नेहमीप्रमाणे. शब्दाशब्दाला अनुमोदन.

लेख आवडला.
नीना गुप्ता एक अभिनेत्री म्हणून कायमच आवडत आली आहे. मसाबाचा जन्म वगैरे ते माझे कॉलेजचे-होस्टेलचे दिवस. तेव्हाही ते सर्व माझ्या कक्षेच्या बाहेरचे होते आणि आजही आहे. मला लक्षात राहीले ते त्या काळातही तिचे ' आहे हे असे आहे' म्हणत धडपडत पुढे जात रहाणे . त्यात कसली लपवाछपवी नव्हती, मी बघा किती धाडसी असा आवही नव्हता आणि सनसनाटीच्या नावाखाली कॅश करायचा प्रयत्नही नव्हता.

छान लिहलयस अस्मिता, पुस्तक वाचावस वाटतय.
नीना गुप्ता नेहमीच काळाच्या पुढे असलेली वाटत राहिली आहे, तिच्या कॅलिबरचे रोल तिला आता करायला मिळतायत हे पन्चायत्,बधाई हो बघुन जाणवल.मसाबा-मसाबा मधला मायलेकिचा बॉन्ड भारी आहे.

छान परिचय. नीना गुप्ता आवडतेच, तिच्या मुलाखतींमधूनही ती प्रांजळ आहे हे जाणवतं. मनात असेल ते बोलून टाकते - आतबाहेर काही नाही - असं वाटतं. हे पुस्तक वाचायला आवडेल.

छान लेख अस्मिता. नीना गुप्ताचा अभिनय आवडतो.
अगदी उत्सव पासून खानदान, मधले टप्पे आणि नुकताच पाहिलेला बनारसच्या पार्श्वभूमीवरील सिनेमा.. आणखी एक पीनी किंवा तत्सम नाव असलेला एपिसोड सुद्धा आवडलेला. तिची सहजता आवडते.

नीना गुप्ता 'जुनून'मध्येपण होती ना? दूरदर्शनवर लागायची ही मालिका. त्यात तिचं काय काम होतं तेही आठवत नाही आता. टायटल सॉंग आठवतंय फक्त.

कमजोर कडी कौन गा गेम शो ती होस्ट करायची
>>>
अरे हो, आणि लाज काढायची एकेकाची. वाह्यात कार्यक्रम होता तो.

सामी, शर्मिला, स्वातीताई, जाई, प्राजक्ता ,मेघना व प्राचीन तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. Happy

'कमजोर कडी कौन' एका परदेशी शो वरील फॉर्मॅटला तंतोतंत फॉलो करायचे व कॉपीराइट मुळे ते तसं उद्धट बोलणं स्क्रिप्टचा भाग होतं. त्यामुळे की काय फार चालला नाही.

अस्मिता, उत्तम परिचय लिहीला आहेस. तुझी शब्दांची निवड नेहमीच खूप आवडते.

मला माणसं फार आवडतात, त्यांच्याशी असलेल्या साधर्म्याने त्यांची सोबत वाटते व त्यांच्यातल्या वेगळेपणाने त्यातल्या समृद्धीची ओढ. >>> हे खूप आवडलं.

आज सतीश कौशिक गेले. नीना गुप्ता आणि कौशिक यांचे खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. नीना गुप्तांच्या या कठीण काळात त्यांनी नीना गुप्ता यांना प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती. "तू चिंता करू नकोस. कारण तु माझ्याशी लग्न केलंस तर ते बाळ आपलं आहे हे तू हक्काने जगाला सांगू शकशील" असे ते नीना यांना म्हणाले होते. नीना यांनी या पुस्तकातच त्याबाबत लिहिले आहे. आज अनेक मिडिया आउटलेट्सनी त्याचा उल्लेख केला आहे.

हो अतुल, तसा उल्लेख पुस्तकातही आहे. असा सपोर्टिव्ह व धमाल मित्र सर्व स्त्रियांना मिळो. मला फार आवडायचा तो.

सामो Happy

सुंदर पुस्तक परिचय.
मागे प्रोतिमा बेदीचे "टाइमपास" हे आत्मचरित्र वाचले होते, भन्नाट आवडले होते. हे ही वाचायला लागेल.
"एकटा जीव" चे काही भाग ऐकले. आता पुस्तक वाचायचे आहे !

धन्यवाद छंदीफंदी व चौथा कोनाडा. Happy
टाईमपासचा किंडल प्रिव्यू वाचून मी ते विसरून गेले होते, मागेच पडले. आठवण आली.

सुंदर पुस्तक परिक्षण...
शोभा डे आणि प्रतिमा बेदी यांचं मराठीत अनुवादीत केलेलं आत्मकथन वाचलंय.. नीना गुप्ताचं आत्मकथन ही वाचायला आवडेल.

Pages