सच कहुं तो- नीना गुप्ता : थोडा परिचय-थोडं चिंतन

Submitted by अस्मिता. on 1 December, 2022 - 20:45

ह्या पुस्तकाविषयी ऐकलं होतं, पण वाचनाच्या बाबतीत अचानकच रस वाटणं बंद झाल्याने हे आणि इतरही बरीच पुस्तकं मागेमागे पडत गेली. एकदातर ह्या पुस्तकाची १०० पानं पंचेचाळीस मिनिटात वाचली, 'पानं मोजणं' कधी करेन वाटले नव्हते. पण मी त्या अ-वाचकाच्या गर्तेतून बाहेर पडतेयं हेही थोडके नाही. तरीही पूर्वीचा 'राक्षस' परत हवायं. जयश्री गडकरचे 'अशी मी जयश्री' सोडून मी याआधी कुठलेही सिने किंवा नाट्यसृष्टीतल्या लोकांचे आत्मचरित्र वाचलेले नव्हते. दादा कोंडकेचे 'एकटा जीव' आईने सुचवले होते, तेव्हा 'ती तूच आहेस का, जिने मला दादा कोंडकेचा एकही सिनेमा बघू दिला नाही' झाले होते !! एवढंच नाही तर तिने 'फडके - अर्नाळकर' पण गाठोड्यात घालून भिंतीतल्या कपाटात वर टाकून दिले होते. हे सांगायचं कारण की नीनाच्या आईने पण 'लडकी बिगड़ जायेगी' या भीतीपोटी अपार कष्टं घेतले होते. ती तिचं 'बिघडली', आपण आपलं बिघडू. Happy

नीनाच्या प्रेमप्रकरणांमधल्या संभाव्य 'रसाळ' तपशीलामुळे ते पुस्तक हातोहात खपलेही/खपतंही असेल. तिने व्हिवियनची, मसाबाची, सर्वांचीच प्रायव्हसी जपण्यासाठी फार समतोल साधत तरीही वाचकांपर्यंत जास्तीत जास्त प्रामाणिक-फर्स्ट हँड अनुभव पोचवत लिहिलंय. इतकं स्पष्टं-सरळ भाषेत व जिथे अनावश्यक तपशील देण्याची गरज नाही , तिथे 'प्रिय वाचकांनो, मला कुणाचा अनादर करायचा नाही, कुणाच्या भावनाही दुखावयाच्या नाहीत, म्हणून यापेक्षा जास्त सखोल मी लिहू शकले नाही.' असा थेट कबूली जबाब दिलायं. लोकांना फिल्मी लोकं सामान्य लोकांपेक्षा 'उघड्यावर' असल्याने ते व्हल्नरेबल असतात हे माहिती असते. ह्याचं भान तिलाही आहेच. यास्तवं तिने फार 'सशक्तं लक्ष्मणरेषा' आखली आहे. जी अलिप्ततेपेक्षा healing झाल्यावरची वाटली. जितक्या जजमेंट सहन करायची ताकद आहे, तेवढीच माहिती बाहेर येऊ दिली आहे. हा पर्फेक्ट अप्रोच सांभाळूनही साधीसरळ शैली जपलीये.

हे पुस्तक पुस्तक म्हणून असामान्य नाही, ती काही सराईत लेखिकाही नाही. तसा काही आवही आणलेला नाही. तरीही खिळवून ठेवणारं व रंजक आहे. लहान वयात पळून जाऊन केलेले लग्नं मगं वर्षभरातच घेतलेला घटस्फोट, हे कशानं तर आई म्हणत होती 'लग्नं करा व हवं तितकं हिंडा पण आधी असे चाळे नकोत.' नंतर पंडित जसराज यांच्या मुलाशी ठरलेलं लग्न अचानक मोडणं व त्यावर त्या कुटुंबानी प्रचंड घरोबा असतानाही कुठलेही सबळ कारण न देता उडवाउडवीची उत्तरं देणं. इथे नाव बदललं आहे पण फारच सहज लक्षात येतं. व्हिवियनच तर आधीच विवाहित होता. हे माझ्या मनाला टोचलंच. कारण मान किंवा सुख यापैकी एकाच पर्यायाचे स्वातंत्र्य असेल तर मी मानंच निवडेन. जन्मभर असुखी राहीले तर राहीले. अशा नात्यांना भविष्य आणि स्थैर्य दोन्ही लाभत नाही. नीना काहीतरी वेगळीच आहे. तिने या नात्याला फार आदर दिलाय, मसाबाला होऊ देण्याचा तिला काहीही पश्चाताप नाही. I am pro-choice for pregnancy but not-so-much with falling for an already married man. तेही जेव्हा आपण कधीही एकत्र येणार नाहीत ह्याची खात्री असताना. ती आता खूप आनंदात आहे , विवाहित असलेल्या माणसाच्या प्रेमात पडून तो विभक्त झाल्यावर आधीच्या विवाहबाह्य संबंधातून झालेली तरूण मुलगी असताना मगं लग्न केलंय. किती 'आऊट ऑफ द बॉक्स' असावं एकाच माणसानी..! मला एवढे तपशील माहिती नव्हते. पण मी ह्यामुळे तिला लक्षात ठेवणार नाहीये,तिच्या कामामुळेच ठेवेन. तरीही हे माझ्या कंफर्टझोनच्या बाहेरचं होतं.

मला आपलं छोटीमोठी पण छान कामं करणारी, आता या(?) वयात कारकीर्द भरभराटीस आलेली आत्मविश्वासू वावर असणारी अभिनेत्री हीच ओळख होती. 'मसाबा- मसाबा' सिरीज मला फार आवडली होती, त्यातलं मायलेकीचं नातं भन्नाट वाटलं होतं. असेही मला मिक्सड-रेस लोक अफाट खास वाटतात, पण या सिरीजमुळे जी 'वास्तवाधारित काल्पनिका' म्हणता येईल, त्याने मला मसाबाही सुंदर, कल्पक, हुशार, जबाबदार आणि मेहनती वाटायला लागली.
1ca9b15c-c7e4-4be3-9bfe-8779d51a9148.__CR0,0,300,300_PT0_SX300_V1___.jpg

या पुस्तकातला मला आवडलेला भाग म्हणजे 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' आणि त्यातल्या गमतीजमती व शैक्षणिक प्रकिया. यात आवर्जून व पुन्हापुन्हा आलेली नावं म्हणजे सतीश कौशिक, ओम पूरी, इला अरूण, अनिता कँवर आणि इब्राहिम अल्काझी. ह्या शिवाय यात्रा, बहादुरशहा जफर, खानदान या दूरदर्शनवरील कार्यक्रमाचा उल्लेख, तसेच 'मंडी' सिनेमातले धमाल किस्से , शाम बेनेगेल यांच्याकडून मिळालेले रीतसर शिक्षण व त्यांची शिस्त. ऍटनबरोंच्या 'गांधी'मधे आभाची भूमिका. 'लल्लू लडकी' ची व्यक्तिरेखा का केलीस हा गिरीश कर्नाडांचा रोखटोक सवाल , त्यानंतर टाईपकास्ट झाल्याने खरोखरचं चांगली कामं मिळायची बंद होणे व नंतर दूरदर्शनमुळे झालेली मदत. स्वतःचा 'बाजार सीताराम' ह्या दिल्लीतल्या पूर्वजांच्या घरावर बेतलेली पूर्णपणे स्वनिर्मित नाटीका व त्याला मिळालेला नॅशनल अवार्ड. तरीही कामाबाबत अनिश्चितता. डेव्हिड धवनच्या सिनेमात मिळालेला व कुठलाही संवाद नसलेला भिकारणीचा रोल ,'किमान एका वाक्याचा संवाद तरी द्या' म्हटल्यावर झालेली कुत्सित हेटाळणी. 'चोली के पिछे' गाण्यामुळे मिळालेले स्टेज शोज, त्यातले बरेवाईट अनुभव. सतत दुय्यम भूमिकांचा आलेला वीट. सप्तपदीच्या सीनमधे पॉलिस्टर कपड्यात यज्ञवेदीजवळील दृष्यादरम्यानच्या चित्रिकरणात 'टीपू सुलतान'च्या सेटवर लागलेली प्रचंड आग व त्यातून मसाबाला पाजवायला काढता पाय घेतल्याने थोडक्यात बचावलेला जीव. एकता कपूरच्या मालिकांच्या लाटेत स्टार प्लसने रद्दबातल केलेले अनेक कार्यक्रम , त्यामुळे बसलेला मानसिक धक्का. अचानक मिळालेल्या 'बधाई हो' व 'पंचायत' आणि 'द लास्ट कलर' सिनेमातल्या गमतीजमती व कारकिर्दीला अनपेक्षितपणे मिळालेली कलाटणी. असे आणि इतरही रंजक-रोमांचक किस्से आहेत.
article-l-2022615412263744797000.jpg
सतत छोटीछोटी कामं करावीच लागणं कारण घर चालवण्यासाठी पर्याय नसणे, शिवाय हा निर्णय आईवडिलांच्या मनाविरूद्ध घेतलेला असल्याने , शक्यतो सगळ्या गरजा भागवणे हे नीनाला अगणित वेळा करावे लागलेयं. सोसायटीच्या सचिवानी नीनाचे चारित्र्यहनन केल्याने तिच्या बाबांनी त्याच्याविरूद्ध आवाज उठवून स्वतः सहभागी होऊन निवडणूका घेऊन त्याला पदावरून निलंबित केले, हे मला फार कौतुकास्पद वाटले. असे सगळे असूनही तिचे आईवडील अत्यंत सपोर्टीव्ह वाटले मला, कारण त्यांनी तिला मुंबईत घरं घेऊन दिली, मसाबाच्या वेळीही हट्ट धरला नाही, आईपश्चात बाबांनी तिचे बाळंतपण केले, ते व्हिवियनलाही अत्यंत आदराने वागवायचे, मसाबालाही अगदी मायेने वाढवलं. आधी जो काळजीपोटी विरोध असायचा तो त्यांनी कधीही ताणून धरलायं असं वाटलं नाही. तो विरोधही विरोध नसून ती तिच्या निर्णयांवर किती ठाम आहे याची चाचपणी वाटली. ती संस्कृतमधे एम फिल आहे. सुविद्य व बुद्धिमान मुलगी असल्याने तिच्या आईची इच्छा होती की तिने आपले PhD पूर्ण करून चांगल्या संस्थेत प्रोफेसर किंवा IAS व्हावे व या बेभरवशाच्या क्षेत्रात आपले आयुष्य लोटू नये. ही पालक म्हणून उच्चं तरीही अवाजवी नसलेली अपेक्षा आहे. वडिलांचा अजून एक संसार असल्याने आईला प्रचंड मनस्ताप व्हायचा , ह्यावर मोकळेपणाने सांगितले आहे. याकरिता त्यांच्या मृत्यूपश्चातचं लिहायचे धाडस तिने केलेयं.

हे पुस्तक प्रामाणिक आणि प्रांजळ वाटले. ना स्त्री मुक्तीचा आवेश- ना प्रसिद्धीचा अभिनिवेष ! ना चोरटेपणा- ना खाजगी बाबींचा चव्हाटा , ना उथळ- ना फार गंभीर. गुजगोष्टी केल्यासारखे पण संग्रही असू द्यावे असे सखोलही नाही. एकदा वाचताना कंटाळा येणार नाही इतके रोचक आणि सोप्या इंग्रजी भाषेत.

मला प्रवाहाविरूद्ध पोहणाऱ्यांची उत्सुकता वाटते ते या निर्णयांच्या परिणामांना कसे सामोरे गेले असतील म्हणून..! ती ताकद कोठून येते..! त्यांच्यात असं काय असतं जे माझ्यासारख्यांत नाही. चूक-बरोबरपेक्षा मला अधिक काही तरी हवं असतं, जे मला माझे तथाकथित "नियम" मोडायला लावेल. शूर नाही तर किमान मला समृद्ध तरी करेल. लेबल लावणं सोपं आहे पण त्याने आपलीच वाढ कुठेतरी खुंटते. मला माणसं फार आवडतात, त्यांच्याशी असलेल्या साधर्म्याने त्यांची सोबत वाटते व त्यांच्यातल्या वेगळेपणाने त्यातल्या समृद्धीची ओढ. फक्त निरिक्षकाच्या भूमिकेत रहायचं !!

मी काढलेला सारांश हा की नीना ही मुलीसाठी अतोनात कष्टं उपसणारी एक 'आधुनिक हिरकणी' आहे.

©अस्मिता
चित्र # साभार बॉलीवुड शादी आणि अमेझॉनवरची पुस्तक प्रसिद्धी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परीक्षण. वाचनातला रस कमी होणे याला अनुमोदन.
आत्मचरीत्राचा नायक / नायिका हा आयडॉल नसतो तेव्हां त्याच्या चुका काढणे म्हणजे त्याच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणे आहे का ? असेल तर आत्मचरित्र लिहून ते चव्हाट्यावर का आणले हा सनातन प्रश्न आहे. तसेच अशा चरित्रातल्या सांस्कृतिक चुकांबद्दल (ज्या खासगी गप्पात आपण चवीने चघळतो, पण मायबोलीसारख्या पीठावर अशा कोडवर्डसद्वारे मांडून कडक इस्त्रीचा चेहरा बिघडू देत नाही) आर्थिक / सामाजिक तफावत व त्या अनुषंगाने विश्लेषण यावर लेखापेक्षा मोठा निबंध प्रतिसादात लिहीण्याची आलेली खुमखुमी नाईलाजाने मागे घेत आहे.

योगायोगाने कालच नीना गुप्ताचा वर्क आउटचा शॉर्ट व्हिडीओ काल पाहिला तेव्हां स्वतःची लाज वाटली. आपण तिच्या वयाचे होऊ तेव्हांही तिचे वय इतकेच राहील आणि आपल्याला तिच्या वडलांची भूमिका करावी लागेल असे वाटले.

चांगला परिचय. नीना गुप्ता आवडते मला. काही वर्षांपूर्वी तिची एक मुलाखत वाचली होती त्यात तिने मसाबाला वाढवताना उपसलेल्या कष्टांबद्दल सांगितलं होतं.

छान परीचय व त्यासोबतचे मनोगतही छान लिहले आहे.
हिच्या जीवनाबद्दल काहीच माहिती नव्हती.

छान लिहिलस. नीना बद्दल तू लिहिलयस, अगदी असच वाटतं आलय. >>>प्रवाहाविरुद्ध... हा परिच्छेद अगदी आवडला

सध्या नीना गुप्तांविषयी माध्यमातून येत आहे. पुस्तक पब्लिश झाल्यानंतर त्या अनुषंगाने येणाऱ्या बातम्या. अनेक दशकांनी त्या बातम्यांत दिसल्या त्यामुळे पुस्तकाविषयी उत्सुकता होतीच. माबोवर अनपेक्षितपणे हा लेख दिसला तो सुद्धा तुम्ही लिहिला म्हणून उघडून वाचूनच काढला. आणि जे अपेक्षित होते तेच मिळाले. नेहमीप्रमाणे छान मांडणी व तितकीच छान ओळख करून देण्याची पद्धती.

मला अशा लेखांतून जे इतरत्र फारसे चर्चिले गेलेले नसते असे सांगितले जाते ते प्रचंड आवडते. काल परवाच खुशवंत सिंह यांच्यावरचा लेख वाचताना, अन्य एक लेखकाने जिवंतपणीच त्यांना श्रद्धांजली वाहिलेला लेख देशभर खप असलेल्या नियतकालिकात लिहिला होता, हे वाचून प्रचंड मौज वाटली होती.

या तुमच्या लेखातही असे मौजधक्के आहेत. जसे की...

>> 'टीपू सुलतान'च्या सेटवर लागलेली प्रचंड आग व त्यातून मसाबाला पाजवायला काढता पाय घेतल्याने थोडक्यात बचावलेला जीव

कारण आगीच्या प्रसंगाची बातमी व प्रसिद्धी तेंव्हा खूप झाली होती. पण त्याचे नीना गुप्ता कनेक्शन माहीत नव्हते जे इथे कळले. तसेच त्यांच्या वडिलांचा अजून एक संसार, त्यांच्या सिनेमतल्या भूमिका, एकही संवाद नसलेले काम इत्यादी बरेच रोचक ओळख करून दिलीत.

माध्यमे उथळ आहेत, असतात आणि होती. ९० च्या आसपास व्हिवीयन व नीना गुप्ता यांच्या खूप साऱ्या बातम्या येत. पण केवळ चटपटीतपणा इतकेच त्यांचे स्वरूप असे. त्यामागचा संघर्ष व भूमिका यांच्यात कुणालाही (माध्यमाला) स्वारस्य दिसत नव्हते. आणि हेच अनेक सेलेब्रिटीबाबत घडते. त्यांच्या वैचारिक भूमिका, नेहमीच्या जगण्याच्या आयुष्याला ते कसे सामोरे जातत्, तो संघर्ष समोर न आणता हुल्लडबाजांच्या झुंडीना खाद्य पुरवण्याचे कार्य अनेक माध्यमे वर्षानुवर्षे करत आली आहेत. त्यामुळेच अशी पुस्तके व त्यांची ओळख करून देणारे असे लेख वेगळे वाटतात.

एक छान लेख वाचायला मिळाला. शेवटच्या भागातले स्वगत सुद्धा खूप भावून गेले.

पुस्तक परिचय आवडला, बॉलीवूडी थिल्लरपण नीनाला स्पर्शूनही गेले नाही हे लक्षात येते आहे. तिच्या 'आऊट ऑफ बॉक्स' विचारांबद्दल सहमत, too many of them in her !

'बाजार सीताराम... हो, नीना स्वतःच लेखिका, निर्देशिका आणि निर्माती होती. मी बहुदा नॅशनल फिल्म फेस्ट मध्ये बघितली होती दिल्लीत, आता नीट आठवत नाही.

.... मला माणसं फार आवडतात, त्यांच्याशी असलेल्या साधर्म्याने त्यांची सोबत वाटते व त्यांच्यातल्या वेगळेपणाने त्यातल्या समृद्धीची ओढ. ...

खूप आवडले हे Happy

छान लिहिलेयस अस्मिता नेहमीप्रमाणे. शब्दाशब्दाला अनुमोदन.

सच कहू तो.. पुस्तकाचे शीर्षकही छान आहे.

माझ्या मनातली तिची ओळख नेहमी प्रवाहाविरुद्ध पोहणारीच होती. प्रत्यक्षातही ती काही वेगळे नाहीये हे पुस्तकातून कन्फर्म होतच असेल.

क्रिकेटची आवड असल्याने आणि ग्रेट विव्ह रिचर्डसचा संदर्भ असल्याने तिच्या या प्रेमप्रकरणाबद्दल बरेपैकी माहीत होतेच. आणि त्यात काही वावगे वा थिल्लर कधीच वाटले नव्हते. उलट तिचे लेकीला असे वाढवण्याचे नेहमी कौतुकच वाटायचे. त्यामुळे ते आधुनिक हिरकणीही पटण्यासारखे आहे.

तिला मिळणाऱ्या दुय्यम भुमिकांबद्दलही प्रकर्षाने जाणवते. कारण तिच्यातले पोटेंशिअल त्यामानाने उच्च दर्जाचे आहे. ओटीटी वेबसिरीजच्या जमान्यात त्याला अजून न्याय मिळो अशी सदिच्छा.

नीना गुप्ता कोण आहे
येथूनच सुरुवात आहे त्या मुळे ह्या विषयावर काय बोलणार .
.मोठी कर्तृत्व वान महिला असती तर सर्वांना माहीत असती.

परिचय आवडला.
मला माणसं फार आवडतात, त्यांच्याशी असलेल्या साधर्म्याने त्यांची सोबत वाटते व त्यांच्यातल्या वेगळेपणाने त्यातल्या समृद्धीची ओढ. ...

खूप आवडले हे Happy +१

नीना गुप्ता कोण आहे येथूनच सुरुवात आहे >> म्हणूनच या धाग्यावर फुल्ल स्कोप आहे.

त्या मुळे ह्या विषयावर काय बोलणार >>> स्पष्ट केल्याने अनेकांचा होणारा खोळंबा टळला, नाहीतर लोक वाट बघत बसून राहीले होते.

.मोठी कर्तृत्व वान महिला असती तर सर्वांना माहीत असती >> जे जे आपणास नठावे , ते ते ज्योतिर्मा तमसोगमय. खूप खूप छान.

नीना गुप्ता म्हणजे ज्यांच्या घरातल्या हार्मोनियम मधे नी हे बटण तुटलेले असते किंवा चालत नसते त्यांच्या गायनात सुद्धा सा रे ग म प ध सा येते. त्यामुळे लोक म्हणतात नी ना गायब आहे. त्याचेच नीना गुप्ता झाले. थोडक्यात ज्यांच्या गाण्यात नी हा सूर लागत नाही असे सर्व लोक नीना गुप्ता नावाने ओळखले जातात. ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे.

छान रसग्रहण
शेवटचा पाराग्राफ तर एकदम भिडणारा

वा, खूप छान परिचय अस्मे. मलाही नीना गुप्ता आवडते.

छान लिहिलेयस अस्मिता नेहमीप्रमाणे. शब्दाशब्दाला अनुमोदन.

सच कहू तो.. पुस्तकाचे शीर्षकही छान आहे.++++१११११
मायबोली उघडल्याचं सार्थक झालं.

अस्मिता, खूप छान संयत भाषेत लिहीलं आहेस. पुस्तकाबद्दल आणि पुस्तक वाचणाऱ्या तुझ्याबद्दलही. शेवटचा परिच्छेद तर खासम् खास.

खूप छान पुस्तक परिचय. मला नीना गुप्ता आवडते.

दूरदर्शनवर एका महाभारतावर आधारित मालिकेत तिने कुंतीचं काम केलं होतं. त्यात सूर्यदेव तिला वर देतात असं न दाखवता तो सूर्य तिचा प्रियकर तिला भेटतो आणि त्यापासून झालेल्या संततीला ती लोकांचा विरोध असूनही वाढवायचं ठरवते, पण मग त्याला सोडून द्यावं लागतं वगैरे दाखवलं होतं. मी भैरप्पांचं पर्व वाचताना मला ती मालिकाच आठवत होती. नीनाच्या स्वतःच्या अनुभवाला समांतर अशी ती भूमिका असली तर प्रत्यक्ष आयुष्यात तिने अपत्याला सोडून न देता वाढवली. कमाल!

वरचा तो ओम पुरी बरोबरचा फोटो खूप गोड आहे.

सामो,
खानदान मधली भूमिका नीनाच्या मते खलनायकी नसून काळाच्या मानाने प्रगत होती. लग्न झालंय तरीही मूल न होऊ देण्याचा निर्णय तेव्हाच्या बहुतांश प्रेक्षकांना झेपला नाही. एकाने ते सगळं खरंच समजून एअरपोर्टवर तिला गवायवा करून मूल होऊ देण्याविषयी विनंती केली होती. यानंतर तिला टिव्हीवर साध्यासुध्या भूमिका मिळणं काही काळ बंद झालं. त्यामुळे तिला ही भूमिका पटलेली असूनही करीअरला खिळ बसवणारी असल्याने ह्या निर्णयाबाबत समाधान मानता आलं नाही.

मला खानदान, बहादुर शहा जफर, यात्रा, महाभारत हे काहीही आठवत नाही. टिपू सुलतान सुद्धा अंधूकसे आठवते. आगीबाबत झालेली चर्चा मात्र आठवते. संजय खानला प्रचंड दुखापत होऊन तो बरा झाला पण नंतर त्याला व्यवस्थित हसता येत नाही, हे मला लहानपणी धक्कादायक वाटले होते. हसता न येणे किती वाईट आहे !!!

युट्यूबमुळे मात्र हे आता पुन्हा बघणं शक्य आहे.

खूप छान पुस्तक परिचय. मला नीना गुप्ताचे खूप कौतुक वाटते. मी प्रथम तिला साथ साथ चित्रपटात पाहिलेले. तेव्हा आवडली आणि वेगळीच वाटली. मला आठवते, त्याकाळी unwed mother टॅग घेऊन वावरणे, इंडस्ट्री मध्ये कामे करणं व मुलीला वाढवणे हे खरोखरच धैर्याचे काम होते. तो काळ आजच्या इतका ओपन नव्हता. मी नक्की वाचेन हे पुस्तक.

धन्यवाद रघू आचार्य, वावे, मानवदादा, अवल, सायो, अतुल, कुमार सर, अनिंद्य, हर्पेन, ऋन्मेष, हेमंत, मंजूताई, मृ, धनवन्ती, AMIT, झकासराव, धनुडी, अमित, अनया, हर्पा, सामो, देवकी तै आणि आरती.
तुमच्या कौतुकानी हुरूप येतो व नवीन लेखनासाठी उमेदही मिळते. Happy

छान परिचय. आवडला लेख. हे हिंदी शीर्षक असलेले पण इंग्रजीत लिहीलेले पुस्तक आहे का?

Pages