... रंग माझा वेगळा

Submitted by छन्दिफन्दि on 8 November, 2022 - 13:24

खरं सांगायचं तर रंगांची खरी गम्मत मला खूप उशिरा म्हणजे आता आताच कळायला लागली. पण एकदा त्यातली गम्मत कळल्यावर मग मात्र निळेभोर आकाश, सूर्याप्रमाणे आणि ऋतूनुसार बदलत जाणारा त्याचा रंग, त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र कापसासारखे हलके तरंगणारे ढग, सूर्यकिरणांनी अगदी एखाद्या अव्वल चित्रकाराप्रमाणे त्यावर केलेली कलाकुसर आणि रंगकाम, सूर्यास्ताच्या वेळी नेहेमीचे निळेभोर आकाश आणि पांढरेशुभ्र कापसासारखे ढग लुप्त होऊन कधी कुसुम्बी तर कधी सोनेरी-केशरी रंगांची उधळण, सप्तरंगी इंद्रधनुष्य, पिवळी, पोपटी, ते हिरवीगार- हिरव्या रंगाचं पॅलेट उलगडवून दाखवणारी झाडे, पिवळी, लाल, केशरी, गुलाबी, पांढरी वाऱ्यावर डोलणारी फुले , मधेच अनाकलनीय रंगाची - निळा,आकाशी, पोपटी, जांभळा असे रंग अगदी बाजूबाजूला ठेवल्यावर दिसेल तशा रंगाची - मान असेलेला एखादा चुकार हमिंग बर्ड सगळेच खुणावू लागले. ह्या सगळ्यात रंगांची मुक्त उधळण करणारा खरा ऋतू तो म्हणजे इकडचा Fall, शिशिर ऋतू.

Fall मध्ये, म्हणजेच सप्टेंबर- ऑक्टोबर मध्ये, जसे तुम्ही उत्तरे कडे जाल झाडांच्या पानाचा रंग बदलू लागतो. हिरवीगार पाने, पिवळी,केशरी , गुलाबी, लाल रंगाची होतात. सुकू लागतात आणि वाऱ्याबरोबर गळून जातात- म्हणून तो फॉल. शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत कडक थंडीमध्ये, बर्फामध्ये तगून राहण्यासाठी झाडे तयारी करत असतात आणि त्यासाठीच होतात हे रंगबदल आणि पानगळ. पण ती लाल, केशरी, पिवळी, कुसूमबी झाडे फारच विलोभनीय दिसतात. रंगांवर जीव बसणाऱ्या मनाला ह्या फॉलच्या जादूने भुरळ नाही घातली तरच नवल!

लोकांच्या फॉल कलरच्या पोस्ट्स, फोटो बघून दरवर्षी मनात येणार एकच विचार "आपल्याकडे पण फॉल कलर्स दिसले असते तर ? कधी तरी फक्त त्यासाठी नॉर्थ साईडला जायला पाहिजे."

fall2.png

आज सकाळी काही वाणसामान घ्यायला जवळच्या दुकानात म्हणून चालतच बाहेर पडले, पाऊस पडून गेलेला आणि नुकतच ऊन पडलेलं. आणि पाहिलं लाल पानांनी डवरलेलं झाड दिसलं, लगेच फोनचा कॅमेरा सरसावला.लगेच पुढे पिवळ्या रंगाचं, तर लगेच केशरी, मधेच परत एखाद लाल, तर एखाद कुसूमबी- चॉकलेटी, मातकट झाड दिसतच गेली. अधाशासारखे कैक फोटो काढले. हलकिशी वाऱ्याची झुळूक, हवेतला गारवा, कोवळं सोनेरी ऊन, पावसानंतरचा तो ओला वास, ह्यां मुळे फोटो पेक्षाही प्रत्यक्ष दिसणारं ते दृश्य कितीतरी पटींनी अधिक विलोभनीय होत. साहजिकच पंधरा मिनिटांचा तो रस्ता दीड तासाचा कधी झाला कळलंच नाही.

त्याच वेळी अचपळ मनात, "रोज ज्या रस्त्यांवरून जातो, त्याच रस्त्यावर इतकी विलोभनीय रंगांची उधळण करणारी झाडे आहेत, हा सांक्षात्कार आपल्याला गेल्या दोन वर्षात कसा बर नाही झाला? आपण अशी कोणती झापडं लावून वावरत असतो? आपल्या आजुबाजुला इतकं सुंदर काही असतं पण आपली नजर त्याला दूर कुठेतरी अप्राप्य जागी शोधात असते, आणि ते मिळत नाही, दिसत नाही म्हणून आपण बेचैन. काय गम्मत आहे नाही ?" विचारांची रस्सीखेच.

इकडे मनाच्या दुसऱ्या कप्प्यात अजून अनेक विविध रंगांचे शोध सुरूच! पाय, कॅमेरा, हात फिरतायत, जे जमेल, रुचेल सार काही टिपतायत. प्रत्येक झाड वेगळं,अनोखं दिसत होत, एकाच झाडाची पाने सुद्धा एका रंगाची किंवा एकसारखी नव्हती, आणि अगदी एका पानावरती सुद्धा बहुरंगी छटांची नक्षी दाटून सजली होती. जणू ते प्रत्येक झाड, त्यावरील प्रत्येक पान निक्षून सांगत होतं "... रंग माझा वेगळा !"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋतुराज आणि अनिंद्य धन्यवाद!

तोच रस्ता, तिचं झाडं, पण दरवेळी काहीतरी नवीन खुणावत किंवा सापडतं. तीच मजा आहे Happy

ऋतुराज आणि अनिंद्य धन्यवाद!

तोच रस्ता, तिचं झाडं, पण दरवेळी काहीतरी नवीन खुणावत किंवा सापडतं. तीच मजा आहे Happy

पुस्तक कस दोन तीन चार वेळा वाचलं की प्रत्येकवेळी वेगळं काहीतरी गवसत तसंच काहीसं.

खरं आहे. तुमचकडे अजून गडद रंग असतील आणि खूप जास्त.

धनश्री, सेंट्रल पार्क चे fall colors चे फोटो असतील तर टाक ना.

मागे डिसेंबर मध्ये सेंट्रल पार्क गळलेल्या पानांचा अक्षरशः ढीग होता, त्याच्यावरून मनात आलेला की ते फॉल मध्ये खूपच छान दिसत असेल..

मस्त फोटो!
फॉल आला की मला वाटतं हाच माझा सर्वात आवडता ऋतू आहे.
आणि मग स्प्रिंगमध्ये एकेक ब्लॉसम दिसू लागले की पुन्हा तसंच वाटतं Happy

दोन दिवसांपूर्वी पानगळीतीचे, रंगांचे फोटो टिपत असताना ह्या छाटलेल्या झाडाने - झाडाच्या त्या ओबडधोबड बुंध्याने - खर तर त्यावरील इतकुशा त्या पालवीने - लक्ष वेधून घेतले.
ते तेवढ्यावरच न थांबता, ते खोड आणि ती पालवी डोक्यात घर करून राहिली. त्या जादूची (?) की असीम इच्छाशक्तीची नोंद घेताना असच काहीतरी हे हाती लागलं.

पानगळीच्या या दिवसांत
एकेक पान दुरावतंय...
वाऱ्याच्या हलक्या झुळुकेसोबत
अलगद वसुंधरेत सामावतंय!

इथे काय मग जादू घडली?
या निष्पर्ण ओंडक्याला
ही नव्हाळी पालवी फुटली!

काय म्हणू मी या मायेला-
दुर्दम्य अशी इच्छाशक्ती,
की जगण्याची ही आसक्ती?

PXL_20251126_205232994~2.jpg

जिजीविषा म्हणतात ती हीच.

वंशसातत्य ही निसर्गाने सर्व जीवमात्राला दिलेली आदिम प्रेरणा आहे

जिजीविषा म्हणतात ती हीच
धन्यवाद या शब्दासाठी!

वंशसातत्य ही निसर्गाने सर्व जीवमात्राला दिलेली आदिम प्रेरणा आहे>>>

त्यामुळेच हे चक्र चालू आहे - शतकानु शतके Happy

ऋतुराज धन्यवाद!

हा एक टिपलेला पक्षी..
दोन कोनातून प्रयत्न केला पण उन्हात आणि कॅमेऱ्याच्या मर्यादेमुळे एव्हढाच नीट निघाला

PXL_20251126_201635278.jpg

गुगल न एक फोटो स्टाइलैझ्ड करून दिला.. Happy

markup_1000061423 (1).jpg

Pages