
८ नोव्हेंबर १९१९ ला महाराष्ट्राच्या अत्यंत लाडक्या व्यक्तीचा ( बऱ्याच लोकांसाठी दैवताचा) जन्म झाला. आज असते तर १०३ वर्षांचे अवघ्या महाराष्ट्राचे, जगभर पसरलेल्या मराठीजनांचे, लाडके 'भाई' आजोबा झाले असते.
पुलं एक बहुरंगी, बहुढंगी, व्यक्तिमत्व, ज्यांनी लेखन, संगीत, अभिनय, गायन, दिग्दर्शन प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. पुलं म्हणजे विनोदी अस एक सरसकट समीकरण केलं जातं. त्यात खदा खदा हसवणारे विनोद सापडतात तर कधी त्या विनोदाला कारुण्याची झाक असते, कधी विरोधाभास अधोरेखित होतो, तर कधी एखादीच स्मितरेषा अनुभवतो. पण त्यांनी फक्त विनोदी लिखाण केलं नाही. त्यांच्या नाटकांमधून, पुस्तकांमधून अनेकदा तत्कालीन सामाजिक समस्या किंवा विरोधाभास, मराठी भाषेची खुबी, स्वतःला उच्चभ्रू, उच्च्शिक्षित समजणाऱ्याची वैचारिक दिवाळखोरी, अशा अनेक विषयांना स्पर्श केलाय, सामान्य माणसाच्या व्यक्तीविशेषांबरोबर त्यांनी प्रतिभाशाली, गुणी कलाकारांचे आणि मान्यवरांचे भरभरून कौतुक केलंय .
पुलंच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घ्यायचा म्हणजे खरंच खूप अवघड आहे. कारण जरी एक बटाट्याची चाळ घेतली, तरी जवळ जवळ पन्नास एक व्यक्तिचित्र डोळ्यासमोर उभी राहतात अगदी त्यांच्या खास लकबी सकट, तीच गोष्ट व्यक्ती आणि वल्लींची. बर हा माणूस फक्त लिहून न थांबता एक पाऊल पुढे जाऊन त्या सर्व पात्रांचे आवाज, त्यांच्या लकबी साभिनय सादर करून ते चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे करतो, नव्हे कायमचे हृदयात कोरतो.
तरी आज एकंदर त्यांच्या कलाकृतींची एकत्रित यादी करायाची ठरवले तर त्यांनी १९४७ ला पहिल्यादा कुबेर या चित्रपटात अभिनय आणि पार्श्वगायन केले. त्यानंतर तब्बल २५ सिनेमांमध्ये कधी अभिनय केला, दिग्दर्शन केले, कथा लिहली, तर कधी पार्श्वसंगीत दिले, पार्श्वगायन केले. त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे १९९३ चा एक होता विदूषक.
अंमलदार, तुका म्हणे आता , तूझे आहे तुजपासी , तीन पैशाचा तमाशा , एक झुंज वाऱ्याशी, ती फुलराणी, सुंदर मी होणार, वार्यावरची वरात , आम्ही लटिके ना बोलू, पुढारी पाहिजे, वयं मोठं खोटं , नवे गोकुळ यांसारखी लोकप्रिय नाटके लिहली, बसवली, त्यात अभिनय केला.
नसती उठाठेव, खोगीर भरती, उरलं सुरलं , पुरचुंडी, हसवणूक , खिल्ली. अघळ पघळ , गाठोडं, पुचूंडी अशी अनेक पुस्तके लिहली, ज्यांच्या अजूनही नवीन नवीन प्रति छापल्या जाताहेत,
त्यांच्या बटाट्याची चाळ, असा मी असामी एक पात्री प्रयोगानी अनेक वर्षे हाऊसफुल चे बोर्ड्स बघितले.
अपूर्वाई , पूर्वरंग , जावे त्यांच्या देशा यांसारखी प्रवास वर्णने आजही तुम्हाला त्या देशांची त्या काळातील सफर घडवून आणतात.
व्यक्ती आणि वल्ली तुम्हाला माणसे बघायला, वाचायला आणि समजायला शिकवते. तर गणगोत , मैत्र मध्ये त्यांच्या ऋणानुबंधातील बंध अलगद मोकळे होतात.
बरं ते इतके साहित्यप्रेमी कि त्यांनी सुनीताबाईंबरोबर बा. भ. बोरकर, बा. सी . मर्ढेकर आणि आरती प्रभू यांसारख्या मातब्बरांच्या कविता वाचन करून त्यातील सौंदर्य, गाभा अगदी सामान्य माणसालाही उलगडून दाखवला.
इतके मनस्वी (कि तपस्वी ?) कि रवींद्रनाथांच्या साहित्यावरील प्रेमापोटी, ते शांतिनिकेतनात जाऊन राहिले, बंगाली भाषा शिकले.
'ती फुलराणी' असू दे किंवा 'कान्होजी आंग्रे', इंग्रजी भाषेतील साहित्याचा इतका सुंदर मराठीमय अनुवाद करावा तर पुलंनीच!
पुलं संगीत नाटक, साहित्य अकादमी, पदमभूषण , पदमश्री अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित होते. त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना नेहमीच भरघोस मदत केलीये.
महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत, लेखक, विनोदी लेखक, दानशूर व्यक्ती, उत्तम अभिनेते, नाटककार, संगीतकार होऊन गेलेत, ज्यांना मोठं मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय. पण मग महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून मात्र फक्त पुलंचं का बर येतात डोळ्यासमोर ?
एक तर त्यांचं बहूआयामी व्यक्तिमत्व आहेच पण त्याहीपेक्षा (मला वाटतं ) त्यांचं लिखाण अगदी सहज सोपं, सामान्य माणसाच्या हृदयाजवळच, त्याच्या मनाला भिडणार आहे. कालातीत आहे.
खरं सांगायचं तर मला कळायला लागलं तेव्हा पासून मी त्यांना, आजोबांच्या रूपातच बघत आलीये. म्हणजे मी ज्यां कलाकृतींचा मनमुराद आनंद घेतला ती बटाट्याची चाळ, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, म्हैस माझ्या जन्माच्या कितीतरी वर्षे आधीच लिहून झालं होतं. तो काळ, ती ट्राम, ती चाळ, बग्गी काही काही आमच्या वयाच्या किंवा त्या नंतरच्या कित्येकांनी प्रत्यक्षात कधी बघितलंहि नसेल पण त्यांचा नारायण अगदी आजकालच्या लग्नातही भेटतो, एखादं चौकोनी कुटुंब दोन घरं सोडून तुमच्या शेजारी आजही नांदत असतं, कधी एखादा नंदा प्रधान कॉलेजच्या ग्रुपची शान वाढवत असतो, तर आजही एखादा नाथ कामत त्याच्या (न झालेल्या ) गर्ल फ्रेंड्स च्या आठवणीत झुरत तुम्हालाही पकवत असतो, आजही विमानातल्या प्रवासातसुद्धा एखाद्या मधू मलूष्टेच्या नजरेत एखादी सुबक ठेंगणी भरते, चितळे मास्तर एखाद्या निवृत्त शिक्षिकेच्या रूपात स्वतःच्या पदराला खार लावून मुलांसाठी वण वण करताना भेटतात. थोडक्यात, साठ सत्तर वर्षांनंतरही त्यांनी फुलवलेली व्यकिचित्रे , त्यांचा आवाज, त्यांचा अभिनय मनाला प्रफुल्लीत करून टाकतो, सगळी मरगळ झटकून टाकायला लावतो. म्हणूनच जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी लोकं आजही त्यांच्या त्या आवाजात आणि विश्वात स्वतःला, मनातल्या किलमिषांना विरघळून टाकतात आणि पुलकित होतात.
तळटीप - हा लेख एक पुलं प्रेमी म्हणून त्यांच्या जन्मदिनी लिहिलाय. जास्तीतजास्त आणि अचूक माहिती/ आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही त्रुटी असतील तर नक्कीच कळवू शकता. तुमच्या ओळखीच्या पुलं प्रेमींपर्यंत जरूर पोहचवा.
आश्चर्य आणि वाईट या गोष्टीचं
छान लेख....
आश्चर्य आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की मायबोलीकर एरवी हिरारीनं व्यक्त होतात ते पु.लं बाबतीत गप्प कसे.... ....
एवढंच म्हणेल की त्यांनी कालातीत लिखाण केलं. ते अक्षय आहे.
पु.ल.,. तुम्हाला कोटी कोटी नमन...
दत्तात्रय साळुंके. थँक यू .
दत्तात्रय साळुंके. थँक यू .
एवढंच म्हणेल की त्यांनी कालातीत लिखाण केलं. ते अक्षय आहे.
पु.ल.,. तुम्हाला कोटी कोटी नमन...<<< +१
पुलं च काही साहित्य खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचलय, आणि साध्य यूट्यूब व इतर social मिडीआयचे फायदे. परंतु अजून बरेच साहित्य, कलाकृती, सर्वसाधारण पणे लोकांना माहित नाहीत हा माझा अनुभव,
त्यामुळे त्यांच्या वरच्या प्रेमापोटी एक धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला. एक पु ल. प्रेमी म्हणून त्यांची हि थोरवी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक छोटा मानस!
छान माहिती! तुम्हाला
छान माहिती! तुम्हाला शुभेच्छा !
आश्चर्य आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की मायबोलीकर एरवी हिरारीनं व्यक्त होतात ते पु.लं बाबतीत गप्प कसे. >> मला वाटते द.सा. की - पु.लं बाबत खुप लिखाण आणि बोलणे या अधीही मायबोलीवर झाले आहे. (धागे शोधायला हवेत खरतर) म्हणून ही शांतता असावी.
निकु थँक यू
निकु थँक यू
पु.लं बाबत खुप लिखाण आणि बोलणे या अधीही मायबोलीवर झाले आहे. (धागे शोधायला हवेत खरतर) म्हणून ही शांतता असावी.<<<< मी कालं पुलं वरील मायबोलीतले धागे शोधत होते. खरंच खूप धागे, माहिती मिळाली.
मी गेल्या वर्षी त्यांच्या
मी गेल्या वर्षी त्यांच्या सम्रीतीदिनाला लिहून काढलेली, एक माझी चुटपुट पोस्ट करते >>>
आज लाखो मराठी माणसांच्या लाडक्या पुलंचा स्मृतिदिन! पुलंच्या साहित्याशी माझी पहिली ओळख झाली ती चौथी पाचवीत असताना. आजोबांकडे त्यांच्या कथाकथनाच्या बऱ्याच कॅसेट्स होत्या . असामी असामी , अंतू बर्वा , हरितात्या ह्यांची पारायणं करून झाली. वाटायचं काय सुंदर आणि मजेशीर गोष्टी सांगतात . हळु हळू हे फार मोठे साहित्यिक आहेत ह्याची जाणीव झाली . त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली , अपूर्वाई , पूर्वरंग, खोगीरभरती अशा पुस्तकांशी ओळख झाली . ती फुलराणी, बटाट्याची चाळ , वाऱ्यावरची वरात ह्या नाटकांनी वेड लावलं. साधारण सातवीत असताना चतुरंग चा रंगसंमेलन कार्यक्रम होता आणि प्रमुख पाहुणे होते स्वतः पुलं. बरीच उत्कंठा होती त्यांना बघण्याची. सातवीआठवीच्या मुलांना असतो तसा मला पण स्वाक्षरी गोळा करायचा छंद होता. पुलंची सही घ्यायचीच असा पणचं करून ठेवला होता. परंतु कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी प्रयोजकांनी सांगितले कि पुलंकडे कोणीही स्वाक्षरी मागण्यासाठी किंवा भेटण्यासाठी गर्दी करू नये. मन थोडे खट्टू झाले पण म्हंटलं की ठीक आहे . मी काही कारणाने मागच्या दरवाज्याने बाहेर पडले आणि घाईघाईने जात होते. तर काळा चष्मा घातलेले एक आजोबा समोरून येत होते. ओळखीचे वाटले. ते माझ्याकडे बघून मिश्किल हसले. आणि मी जगाच्या जागी थिजले ."अरे हेच तर आपले दैवत! तासंतास ह्यांच्याच तर आवाजाने आपल्याला वेड लावले ! " लाखो विचार त्या क्षणी मनात येऊन गेले . ते गोंधळलेल्या माझ्याकडे माझ्याकडे बघत गोड हसत निघून गेले. आणि मी भानावर आले. मला चुटपुट लागून राहिली "माझ्याकडे ऑटोग्राफ बुक का नव्हतं ? उफ मला त्यांच्याशी दोन शब्द बोलावे हे कस नाही कळलं . त्यांना साधा नमस्कार पण नाही केला ." एक ना दोन हजारो विचारांनी कल्लोळ केला. पण तो सोन्यासारखा क्षण माझ्या मनात कायमचा कोरला गेला. दरवर्षी त्यांच्या पुण्यस्मृतीला त्यांच्या जन्मदिवशी हटकून ह्या क्षणाची आठवण येते. त्यांचं एवढ्या जवळून दर्शन घडलं म्हणून खुप धन्य वाटतं पण ठोंब्यासारखं बघतच राहिले म्ह्णून स्वतःचा राग पण येतो. आज इतक्या वर्षांनी तो क्षण शब्दबद्ध करावासा वाटला.
१२जून,२००० ला पुलं ना
१२जून,२००० ला पुलं ना देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मृती दिनाला खर तर चार दिवस होऊन गेलेत. तेवीस वर्षे झाली म्हणायची.
माबो वर बऱ्याच ठिकाणी वारंवार पुलंची वाक्ये , त्यांची पात्रे यांचा उल्लेख होत असतो. आज सकाळी मी पुलंच्या असामी तल एक वाक्य टाकलं आणि नंतर जाणवलं की त्यांचा स्मृतिदिन नुकताच होऊन गेला त्यानिमित्ताने ह्या लेखाची आठवण झाली. म्हणून हा वर काढला.
१२जून,२००० ला पुलं ना
१२जून,२००० ला पुलं ना देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मृती दिनाला खर तर चार दिवस होऊन गेलेत. तेवीस वर्षे झाली म्हणायची.
माबो वर बऱ्याच ठिकाणी वारंवार पुलंची वाक्ये , त्यांची पात्रे यांचा उल्लेख होत असतो. आज सकाळी मी पुलंच्या असामी तल एक वाक्य टाकलं आणि नंतर जाणवलं की त्यांचा स्मृतिदिन नुकताच होऊन गेला त्यानिमित्ताने ह्या लेखाची आठवण झाली. म्हणून हा वर काढला.
पुलं कळतात, खूप आवडतात पण
पुलं कळतात, खूप आवडतात पण व्यक्त करताना मन दाटून येतं आणि शब्द फुटत नाहीत.
ते असते तर त्यांना एक कडकडून मिठी मारली असती आणि मी कोण आहे काय करतो, अवती भवती कोण आहे ह्याची तमा न बाळगता पाय चेपले असते.
खूप छान लिहिलंय..
खूप छान लिहिलंय..
पु. लं. च लिखाण हे माझं पाहिलं प्रेम. अगदी समजेल तेव्हापासून वाचतेय. त्यांच्या पुस्तकांनी माझ्या कठीण काळात आयुष्य सोपं केलं.
मैत्रिणींबरोबर पुस्तक भिशी चालू केली तेव्हा माझ्या पहिल्या भिशीत त्यांची सात -आठ पुस्तकं आणली.
फक्त पु. लं. वाचता यावेत म्हणून इंग्लिश मिडीयम मधल्या मुलाला त्याने शाळेत शिकण्या आधीच घरी मराठी वाचायला शिकवलं. त्याला त्यांच्या अनेक पुस्तकातले पान च्या पान पाठ आहेत.
त्यांच्या पुस्तकांनी माझ्या
त्यांच्या पुस्तकांनी माझ्या कठीण काळात आयुष्य सोपं केलं.>>>+1
फक्त पु. लं. वाचता यावेत म्हणून इंग्लिश मिडीयम मधल्या मुलाला त्याने शाळेत शिकण्या आधीच घरी मराठी वाचायला शिकवलं. त्याला त्यांच्या अनेक पुस्तकातले पान च्या पान पाठ आहेत.>>> ऐकून छान वाटले
प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
पुलं कळतात, खूप आवडतात पण
पुलं कळतात, खूप आवडतात पण व्यक्त करताना मन दाटून येतं आणि शब्द फुटत नाहीत.
ते असते तर त्यांना एक कडकडून मिठी मारली असती आणि मी कोण आहे काय करतो, अवती भवती कोण आहे ह्याची तमा न बाळगता पाय चेपले असते.
>>> असाच एक ह्रदयस्पर्शी प्रसंग त्यांच्या "रावसाहेब" ह्या कथेत आहे
आज पु. लं चा स्मृतीदिन..
आज पु. लं चा स्मृतीदिन..
_/\_
_/\_
https://youtu.be/t-uqxOpoxUU
https://youtu.be/t-uqxOpoxUU?si=_8Nkxw_vEAeVFofU
१९८७ साली झालेल्या BMM च्या संमेलनात पुळणी केलेलं भाषण..
खूप छान वाटलं ऐकून.
पुलंच्या स्मृतीदिनी _/\_
पुलंच्या स्मृतीदिनी _/\_
https://www.facebook.com
https://www.facebook.com/100000881285668/posts/pfbid04LmfSWu6EfdtKAbY49i...
हा महाराष्ट्र टाइम्स मधला लेख चांगला वाटला.
‘एक शून्य मी’ ह्या पु. लं.
‘एक शून्य मी’ ह्या पु. लं. देशपांडे यांच्या पुस्तकातील, ‘नाटक’ ह्या लेखातील काही उतारे..
***.
पुलं हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांना भले स्वतःची ओळख ‘आम्हाला हसवणारा माणूस’ म्हणून करून घ्यायला आवडले होते, अर्थात ते सार्थही आहे. तरी त्या विनोदबुद्धी मागे खूप मोठा व्यासंग, प्रखर बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि कलोपासकता होती हे नक्कीच.
या पुस्तकात त्या बुद्धीची धार जाणवून देणारे अनेक लेख आहेत त्यातीलच हा एक ‘नाटक’.
आज रंगभूमी दिन आहे. तर त्यानिमित्ताने पुलंसारख्या एका श्रेष्ठ ( आणि माझ्या आवडत्या) नाटककाराचे नाटकाविषयीचे विचार इथे समोर ठेवले आहेत.
अन्य नाटककार, कलाकार, नेपथ्यकार, किंवा नाटकाशी संबंधित अन्य कलावंत यांच्याकरता तर ते महत्त्वाचे आहेतच परंतु एक प्रेक्षक म्हणूनही मला ते समृद्ध करणारे वाटले. म्हणूनच हा प्रपंच
*"""
एखाद्या बगीच्यात एकाच मातीतून नानातऱ्हेची रंगीबिरंगी फुले फुलावी तशी साहित्यातही जीवनाच्या अनुभवांतून येणारी नानातऱ्हेचीच फुले फुललेली असतात. त्यातील काही कथापुष्पे असतात, काही काव्यसमाने असतात, काही तत्त्वज्ञानाचे वटवृक्ष असतात. साहित्याच्या या बागेत नाटक नावाचा एक वृक्ष असाच फुललेला आहे.
इतर साहित्याप्रमाणे एखादा अनुभव सांगण्याची आणि तो ऐकणाऱ्याच्या मनाला आनंद देण्याची इच्छा हीच नाटक ह्या साहित्य प्रकारामागली प्रेरणा असते. पण इतर साहित्यप्रकार आणि नाटक यांच्यात एक मुख्य फरक असा आहे, की नाटक हे तो अनुभव जणू काय पाहणाऱ्यांच्या डोळ्यांपुढे प्रत्यक्ष घडतो आहे, अशा रीतीने दाखवण्याच्या उद्देशाने जन्माला घातलेले असते.
नाटकाला प्रेक्षक येतो तो नुसता ‘ईक्षक’ म्हणजे पाहणारा नसतो. प्र अधिक ईक्षक असतो. म्हणजे विशेष चोखंदळपणाने पाहणारा असतो. संगीताला ‘श्रोता’ येतो. म्हणजे फक्त ऐकणारा. गवई डोळ्याला दिसला नाही तरी तो गायनाचा आनंद घेऊ शकतो. आणि कादंबरीतला वाचक असतो म्हणजे पुस्तक हाती घेऊन वाचणारा. वाचणारा किंवा वाचलेले फक्त ऐकणारा माणूस मनापुढे ती ती दृश्य आणतो.
नटकाच्या प्रेक्षक मात्र डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि कानांनी ऐकण्यासाठी येत असतो. त्यामुळे नाटकाराला ती दृश्ये डोळ्यांपुढे रंगमंचावर आणून खरी आहेत असा आभास निर्माण करायचा असतो. हा आभास आहे हे प्रेक्षकाला ठाऊक असूनही तो क्षणभर ते खरे आहे असे मानण्याच्या तयारीने आलेला असतो. रंगभूमीवरचा महालाचा देखावा हा पडद्यावर रंगवलेला आहे हे ठाऊक असूनही तो त्याला नाटकापुरता खरा महाल मानायला तयार होतो. शिवाजी महाराज होऊन आलेल्या नटाने खोटी दाढीमिशी लावली आहे हे ठाऊक असूनही तो त्या आभासाला घटकावर सत्य मानायच्या तयारीने आलेला असतो. परंतु जर नटाने तो आभास आपल्या अभिनय कलेने टिकवला नाही तर मात्र त्याचे लक्ष उडते. म्हणजेच नाटक रंगमंचावर अवयशस्वी होते. म्हणून नाटकाचे लेखन उत्तम असून चालत नाही. ते प्रेक्षकापुढे आणणारे नट, नेपथ्यकार, त्या प्रसंगाला उठाव देणाऱ्या प्रकाशाची संयोजना करणारे कलावंत किंवा प्रसंगात व्यक्त केलेल्या भावनांना आणि वातावरणाला अधिक परिणामकारक करणारे संगीत-नियोजक ह्या सर्वांना आपली कला पणाला लावूनच ते दरवेळी उभे करावे लागते.
नाटकात जी माणसे दाखवली जातात त्यांना आपण नाटकातली ‘पात्रे’ म्हणतो. भांड्याला देखील ‘पात्र’ असा शब्द आहे. ही नाटकातली पात्रे देखील एका अर्थी भांड्या सारखीच असतात. म्हणजे त्या पात्रामध्ये जो रस भरलेला असतो, तो त्या पात्राचे जसे दर्शन घडते त्याला साजेसा हवा. करवंटीतून कोणी आमरस भरून घ्यायला लागला तर ते चमत्कारिक वाटेल किंवा सुंदर सुवर्णपात्रातून रॉकेल भरलेले ही रुचणार नाही. म्हणजे ते पात्र आणि त्याचे वागणे, बोलणेसवरणे हे एकमेकांच्या आतल्या आणि बाहेरच्या स्वरूपाशी एकरूप झालेले असले पाहिजे.
नाटकाला इंग्रजीत ‘प्ले’ म्हणजे खेळ म्हणतात. आपणही पूर्वी “नाटकाचे खेळ झाले” असे म्हणत होतो. जुन्या मराठीत नटांना ‘खेळीये’ म्हटले आहे. हा माणसामाणसांतल्या निरनिराळ्या कारणांनी निर्माण होणाऱ्या तेढीचा, मैत्रीचा, शत्रुत्वाचा, आकांक्षांच्या पुर्तीचा किंवा अपूर्तीचा जय-पराजयाचा खेळच असतो.
नाटककार रंगमंचावर जो खेळ दाखवतो तो आपल्या मनातही सुरू होतो.
कलेतून मिळणारा आनंद आणि समाजाचे आरोग्य किंवा समाजाचे हित साधणारी कला असली तर दुधात साखर.
तंबोऱ्याच्या षड्जाच्या दोन तारा एकमेकींशी तंतोतंत जुळल्या म्हणजे त्यातून आपोआप गंधार हा स्वर उमटतो. नाटकातला किंवा एकूणच कलेतला समाज हिताचा विचार हा असा आपोआप उमटला पाहिजे.
****”