व्हेज ग्रीन थाई करी

Submitted by अस्मिता. on 22 October, 2022 - 10:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

करीच्या वाटणासाठी:
२ पेरं ओली हळद, ४ पेरं गलांगल(थाई आले),दोन काड्या लेमनग्रास, ५-६ हिरव्यागार मिरच्या, प्रत्येकी चमचाभर पांढरे मिरे, जिरे, धने, ७-८ कोथिंबीरीच्या काड्या, २-३ सांबारचे कांदे, ६-७ पाकळ्या लसूण, एका पूर्ण केफिर लाईमची सालं (पांढरा भाग न येऊ देता).

बाकीचे:
१ लिटर नारळाचे दूध, मशरूम, मध्यम आकारात चिरलेली- प्रत्येकी अर्धी वाटी लाल-हिरवी शिमला मिर्ची , ब्रॉकोलीचे तुरे, गाजराच्या चकत्या, बाळ कणसं,थाई बेझिलची ५-६ पाने

क्रमवार पाककृती: 

क्रमवार पाककृती *
१. वाटणाचे घटक मिक्सर मधून घूरकावून घ्या. निन्जा बिनपाण्याचे करत नाही म्हणाले, म्हणून अर्धीवाटी पाणी घातले. त्यात माझी लेमन ग्रास जून/निबर निघाली, त्यामुळे थोडे जास्तच फिरवले. आर्टिफिशय इंटलेक्टचे निन्जा लईच आगाव हाय, चटणी झाली समजून मनानंच कुटणं थांबवतं. त्याला खवट सासू नव्या सुनेला ज्या प्रेमाने समजावते तसं किंवा 'मोटा शाणा झाला का बे' म्हंणत, ओव्हरराईड करत ओल्या नारळाच्या चटणीसारखी चटणी करून घेतली.
Screenshot_20221022_085959.jpg
* संज्याेतनी गलांगल व हळदीची सालं काढली की नाही कळलं नाही पण मी काढली.
Screenshot_20221022_090015.jpg
२.नारळाच्या दुधापैकी दोन वाट्या दूध मोठ्या कढईत घेऊन आटवले. मग त्यात वाटणाचा गोळा टाकला.
Screenshot_20221022_090033.jpg
३. हा गोळा तूप सुटेपर्यन्त परतला. मग उरलेले सगळे दूध कढईत घालून १० मिनिटे खळखळ उकळू दिले.
Screenshot_20221022_090046.jpg
४. सगळ्या भाज्या घातल्या व करकरीतपणा किंचित कमी झाला की बंद केले. एकीकडे कुकर लावून भात शिजवून घेतला.
Screenshot_20221022_090059.jpg
५. तयार करीवर तुळशीपत्र टाकून (थाय बिस्ट्रोच्या घरावर बेझिल पत्र) भातासोबत गट्टम केले. कुणाचीही वाट बघितली नाही, कुणालाही वरवर केले नाही पहिली वाफ निवायच्या आत......असो.
Screenshot_20221022_090116.jpg
क्रमवार मूर्खपणा
*
१.जास्मिन तांदूळ संपला नाहीये हे गृहीत धरणे व शेवटी बासमतीचा गुरगुट्या करणे.
२.बेबी कॉर्न ऐवजी ट्रेस लेचेस घेऊन येणे, मागच्या वेळी अंडी विसरून नेलपॉलिश आणले होते, त्यामानाने ही प्रगतीच!
३. संज्याेत कीरने टोफू टाकला नाही म्हणून आपणही न टाकणे. जसं काही बाकी नियम पाळतेच!
४. नारळाचे दूध थाई कुकिंगचे न शोधता, लॅक्टोज इन्टॉलरन्स लोकांसाठी असलेल्या सेक्शन मधून गडबडीने घेणे.
५. कांदा आणून वाटणात घालायचा विसरणे व पुन्हा वेगळा वाटून घालणे.

क्रमवार कष्टं* :
पहिल्या तीन घटकांमधे तडजोड करायची असेल तर आपली कढी करा सरळं. गलांगल हे कंद आहे , आले नाही. त्याचा गंध व पोत आपल्या आल्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे. गलांगल,गलांगल, गलांगल .... रामायणातल्या राक्षसाचे नाव वाटते.
हे मला बर्मिज स्टोअरमधे मिळाले, नवऱ्याला कायप्पावरून मागे लागून मिळवले कारण मी बाकी सामान आणून रिस्क घेतली होती. ते दुकान इतके अजागळ होते की नवरा व कलिग दोघे गलांगलाच्या शोधात गेले असताना कलिग म्हणाला, 'आप जाओ मै बाहरही ठीक हुं!' थायलंडला जावे लागले असते तरी चालले असते अशा थराला गोष्टी गेलेल्याच होत्या. 'दृष्टी आड गलांगल' केल्याशिवाय करी होणे नाही. चार पेरं वापरून उरलेल्या पाव किलो गलांगलाचं व दीड छटाक ओल्या हळदीचं मी आता काय करणारे हे महत्त्वाचं नाही. गलांगल, ओली हळद व लेमनग्रास यांचा मी 'अय्या'तल्या राणी मुखर्जी सारखा आलटूनपालटून गंध घेत बसले. मी कुठलीही निर्मिती केली तरी माझी सगळी इंद्रियें ओव्हरटाईम करतात. Happy

*मी उद्या 'लीक सूप' करणारे. त्याचा या लेखाशी संबंध नाही, पण त्याचेही सामान ह्यासोबतच आणून ठेवलेय म्हणून !

करून बघा व प्रमाणात खा!
दिवाळीच्या शुभेच्छा! Happy

क्रमवार विनंती*
प्रिय अॅडमिन व वेमा,
खाजगी जागा कमी पडतेय वाढवून द्यावी , प्लीज. डेटा ईज द न्यू ऑईल आणि आम्ही तेलाची बुधलीच्या बुधली घेऊन तयार आहोत पण ठेवायला जागा नाही. माझ्यासारख्या चित्रदर्शी वेडपटांना दरवेळी आधीची चित्रं उडवावी लागतात, ज्यामुळे आधीचे लेखन अनुभवसमृद्ध राहात नाही. त्याची ऐश्वर्या रायची पार 'ओकीबोकी -निरूपा रॉय' होते. बघा बुवा, जसं जमतंय तसं. दिवाळीच्या शुभेच्छा ! Happy

'करी'दिन समाप्त ! Wink
©अस्मिता

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी २ वेळा
अधिक टिपा: 

वरचा मूर्खपणा, तुमच्या टिपा !

माहितीचा स्रोत: 
संज्याेत कीर. https://youtu.be/-zeV6vSS0mk
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमवार हसतोय.
बेबी कॉर्न ऐवजी त्रेस लेचेस ( हा मला केकच ठावूक आहे भाजी असेल तर क्रमवार मूर्खपणा सदर वाढवून द्यावे) आणण्याची गफलत कशी झाली विचारणार होतो. पण प्रगती समजल्यावर अच्छा है! अच्छा है! झालं. Lol
आता अस्सल ममगिरी करत हळद गलांगल आणि गवती चहाचे शूटस वेगवेगळ्या पाण्यात आठवडाभर ठेवून मग कुंड्यांत रुजवणे उद्योग चालू केलाच असशील. नसला केलास तर मम टायटल ची कसम आहे!
बाकी लेखन आणि फोटो भ हा री ही जमलेत. Lol आम्ही एकदा तयार थाय किचन पेस्टची केलेली आणि बकवास झालेली. ह्या फोटोतच राणी मुखर्जीचा... आपलं फ्लेवराचा वास दरवळतोय.

झकास रेसिपी

हिरवं वांगं नाही घातलंत ? थाई ग्रीन करीत हमखास असतंच.

उरलेल्या ओल्या हळदीचं आणि गलांगल च लोणचं घालू शकता.

रेसिपी लिहायला किंवा फोटो डकवायला दुसरा आयडी काढा.
जुने फोटो उडवायचेच झाले तर गणेशोत्सवाच्या झब्बू धाग्यांवरचे, खाऊ गल्ली वरचे उडवा. ते पुन्हा कोणी पाहील असं वाटतं नाही.
तसंच खाजगी जागेत अपलोड न करताही इथे फोटो दाखवायचे अन्य मार्ग असावेत.

कुठला फोटो कुठे वापरला आहे ध्यानात नाही येत. दुसरा आयडी जुगाड चांगला आहे. अन्य मार्ग पूर्वी होते हल्ली ते एम्बेड करणे चालू असेल तर admin/ वेमा नी त्याचा जाहीर प्रचार केला पाहिजे. नसेल चालू तर चालू करून दिलं पाहिजे.
पण ते पूर्वी पोस्टात काम करत असावेत. पब्लिकला चार रांगात उभं केल्याशिवाय सुधारणार नाही हे ब्रीदवाक्य असल्यागत वागतात. तर ते मरुदे. थांबा .. खाजगी जागेवरून टोमणा मारणे शक्य आहे असं दिसतंय. Wink तर ही खाजगी जागा आहे लक्षात ठेवा. Proud
वांगं आणि बांबू शूटस आणि ते चपटे पांढरे तुकडे कशाचे असतात ते पण राहिले. पण एकावेळी चार अजागळ स्टोर ट्रीप नको. नाहीतर रेसिपी नाही यायची आपल्याला वाचायला. Proud

आजचा सुविचार-
प्रत्येक यशस्वी सुगरणीमागे (गावभर फिरत जिन्नस गोळा करणारा) एक असहाय नवरा (आणि त्याचा कलिग) असतो Lol

गवती चहा संपला अमित पण छोट्या लेमोनेडच्या बाटलीत बेझिल लावलेय. Proud

अक, वांगी नव्हती मूळ रेसिपीत पण सुचनेसाठी आभार पुढच्यावेळी घालेन. लोणचे करावे का तुकडे करून फ्रिझ करावे कळत नाहीये. थँक्स Happy

भरत, तेच केले फोटोसाठी , सरळ आणि सुटसुटीत नाही वाटत. फोनवरचे फोटो स्क्रीनशॉट घेऊन स्वतः ला ईमेल केले व जुने डिलीट करून अपलोड केले. द्राविडी प्राणायाम नसता तर पंचवीस टाकले असते!! मला आवडतं. आभार. Happy

मोरोबा Lol

एकावेळी चार अजागळ स्टोर ट्रीप नको. >>>. Lol
तर ही खाजगी जागा आहे लक्षात ठेवा. >>>>> Lol 'मेरे पास खाजगी जागा है' म्हणून हिणवताही येईल Lol

करी मस्त दिसतेय.
चवीला उत्तम असेल.
रेसिपी लिहिण्याची ( तळटीपासहित) स्टाईल धमाल आहे.

झकास.

गलांगल,गलांगल, गलांगल .... राक्षसाचे नाव वाटते. + १

नारिकेलफलाचे कोणतेच पदार्थ नाही आवडत पण हे लेखन मात्र आवडले Happy

छान!
मी कुठलीही निर्मिती केली तरी माझी सगळी इंद्रियें ओव्हरटाईम करतात. >> Happy नंतरची स्मायली जरा द्वयर्थी करते आहे Happy