आव्हानाचे अत्तर (इटली आयर्नमॅन स्पर्धा) भाग ३

Submitted by हर्पेन on 17 October, 2022 - 07:55

भाग १ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82537

भाग २ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82540

भाग ३ सुरु

मुक्काम चर्व्हिया 

१३ सप्टेंबर २०२२

एक दिवस उशीरा पोचलो होतो त्यामुळे वेळ न दवडता त्या दिवशी पोचल्यावर; हुश्श दमलो बुवा वगैरे न करता लगेचच सायकल जोडायला घेतली आणि ती नीटपणे जोडली. तशी व्यवस्थित जोडली गेली होती पण जोडताना जरा वाटत होते की हॅन्डल नीट घट्ट बसले नाहीये. मग पुणेरी मित्रांच्या सुचवणीनुसार स्कॉट बाईकच्या एका अधिकृत सर्व्हिस सेंटर मधून बाईक नीट तपासून घ्यायची असे ठरवले. ते ठिकाण जवळच ३-४ किमी वरती होते गुगल मॅप च्या सौजन्याने सायकल चालवतच तिकडे पोचलो. तिकडे आधीपासून चार सायकली अशाच जोडण्या / तपासण्याच्या कामाकरता आलेल्या असल्याने त्या माणसाने वेळ लागेल म्हणून सांगितले. मग जरा इकडे तिकडे फिरून यावे म्हणून दुकानातून बाहेर पडलो तो समोर राऊंड अबाऊट मधे एक सुंदर बाग होती. बसायला बाके जास्त आणि माणसे कमी असा प्रकार.  शिवाय लोखंडी स्क्रॅप पासून बनवलेली सुंदर शिल्पे होती. त्यांचे फोटो काढले
१.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.30.07 PM.jpeg

२.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.30.03 PM.jpeg

३.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.30.04 PM.jpeg

४.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.30.05 PM.jpeg

अजुन थोडा इकडे तिकडे फिरलो आणि मग अंधार पडायच्या सुमारास परत दुकानी आलो. तिकडे जी माणसे चार सायकली घेऊन आली होती ती कोलंबियाहून आलेले मित्र मंडळ होते ज्यात प्रत्येकी दोन जण फुल आणि हाफ आयर्न मॅन करणारे होते त्यांच्याशी ओळख गप्पा मध्ये वेळ छान गेला. त्यातल्या शेवटच्या सायकलीला खूप वेळ लागणार असल्यामुळे त्यांनी त्यांच्याआधी मला वेळ देऊ केला शिवाय त्यातल्या एकाला इटालियन आणि इंग्रजी दोन्ही भाषा येत असल्यामुळे त्याचाही खूप उपयोग झाला. तिथला मनुष्य आमची बडबड सुरु असतानाही ज्या मनोभावे तल्लीन होऊन आणि प्रेमाने सायकली नीट फिक्स करून देत होता ते बघून त्याच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेची प्रचिती येत होती. त्यामुळे सायकलच्या जोडणीबाबत मन एकदम निश्चिन्त झाले. आणि त्याला मी हे सांगितल्यावर जो काही गोड लाजरे हसला तो त्याला तोडच नाही. दुकान साडेसात वाजता बंद होणार होते पण त्यानंतरही थांबून त्याने काम पूर्ण केले शिवाय माझ्या नंतरही एक सायकल होतीच. 

तिकडून निघून फोन केला असता बाकीची पुणेरी मंडळी जेवायला बसली होती त्यामुळे मी माझ्या हॉटेलातच जाऊन रात्रीचे जेवण घेतले. अत्यंत चविष्ट जेवण होते आणि पोर्शन पण भरपूर. जेऊन गपगुमान वर खोलीत जाऊन झोपलो. 

१४ सप्टेंबर २०२२

सकाळी समुद्रात पोहायला जायचे ठरले होते. तिथे समुद्रकाठी, पुण्याच्या मंडळींना म्हणजे जोतीराम, निलेश, मंगेश आणि अरुंधती या चौघांना प्रथमच एकत्र भेटलो. ओळख भेटी सुरु असतानाच वेटसूट चढवणे चालू होते. समुद्र खूप शांत होता त्यामुळे समुद्रातले पोहोणे हा खूप छान आणि आश्वस्त करणारा अनुभव ठरला. जेलीफिशनी दिलेले जवळून दिलेले दर्शन जरा काळजीत पाडणारे होते पण ते वगळता बाकी सगळे एकदम झकास होते. जेलीफिशचाही तसा काही त्रास असा झाला नाही.  

नंतर सगळ्यांबरोबर इझी सायकल राईड करता जाऊन आलो वाटेत रस्ता थोडा चुकलो पण आडवाटे वरून अजून सुंदर दृष्ये बघताना फोटो सेशन मात्र व्यवस्थित आणि यथास्थित केले.
१.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.59 PM.jpeg

२.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.58 PM.jpeg

३.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.30.00 PM.jpeg

एकंदरीत ३५-४० किमी सायकल चालवली असेल. त्यावेळी परत येताना वारा सुटला होता वळणावर सायकल थोडी भेलकांडत होती त्यामुळे जोरात वारा असता काय परिस्थिती उद्भवू शकते याची माफक कल्पना मिळाली. इटलीत पोचल्यावर एकतरी ब्रिक सेशन व्हायलाच हवे असे मला सांगितले गेले  होते त्यामुळे सायकलिंग झाल्यावर मी एक अगदी छोटी ५ किमी ची रन करून घेतली. त्यातला काही भाग रस्त्यावरून तर काही ट्रेल वरून धावलो तो ट्रेल रूट अगदी रमणीय परिसर होता. 
१.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.57 PM.jpeg

दुपारी चारच्या सुमारास बिब कलेक्शन आणि रजिस्ट्रेशन सुरु होणार होते म्हणून आयर्नमॅन व्हिलेजकडे रवाना झालो. तिकडे जाऊन बराच वेळ रांगेत उभे होतो पण रांग काही पुढे सरकेना मग कळले की प्रिंटर चालत नसल्याने आज रेजिस्ट्रेशन होणार नाही. मग सगळ्यांसोबत आयर्नमॅनचा  एक्स्पो आणि खरेदी विभाग असतो तिकडे बराच वेळ घालवला. मी खरे तर काहीच घेणार नव्हतो पण शेवटी एक टी शर्ट घेतलाच त्यावर मागच्या बाजूला सर्व सहभागी स्पर्धकांची नावे अत्यंत बारीक अक्षरात लिहलेली होती त्यात आपले नाव नक्की आहे ना हे शोधण्यात वेळ बरा गेला.

WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.56 PM.jpeg

बाकीच्या लोकांची खरेदी खूप वेळ सुरु होती त्यामुळे नुसते उभे राहून शेवटी पाय दुखायला लागले. मग तिकडेच नॉर्माटेक कंपनीच्या रिकव्हरी करता उपयुक्त असे प्रॉडक्टचा डेमो देणारा विभाग होता तिथे जाऊन पाय चेपवून घेतले. मंडळींची खरेदी संपली पण मग बिलाकरता मोठी रांग होती त्यामुळे अजून थोडा वेळ गेला आणि अशा रीतीने रजिस्ट्रेशन न होताच नुसतीच तंगडतोड करून आम्ही परतलो. 

WhatsApp Image 2022-10-18 at 3.31.02 PM.jpeg

त्यावेळी परतताना कळले की दशरथ जाधव म्हणून अजून एक जण पुण्याचेच आहेत ते आले आहेत मग त्यांना भेटायला त्यांच्या हॉटेलवर गेलो. ते म्हणजे 'द दशरथ जाधव सर' आहेत. वय वर्षे ६६ फक्त. त्यांनी याआधीही आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. नुकतीच त्यांनी LEL लंडन एडिंबरो लंडन अशी सायकल स्पर्धा असते ती पूर्ण केली होती. अत्यंत निगर्वी माणूस. त्यांनी याआधीही आयर्नमॅन केलेल्या असल्यामुळे त्यांच्याकडून बरेच अनुभव ऐकायला मिळाले. आम्ही बाकी सगळे पहिलटकर असल्याने किती आणि काय ऐकू असे आमचे झालेले. 

संध्याकाळ पर्यंत भरपूर गप्पा झाल्या आणि मग इकडे खाण्याची ठिकाणे साडेआठ नऊ च्या सुमारास बंद होत असल्यामुळे जवळच्याच एका पिझ्झेरियात जेवायला म्हणून गेलो. गर्दी होती; आमचे रिझर्व्हेशन नव्हते थोडे थांबावे लागले पण सगळे पिझ्झे मस्त होते. जेवण छान झाले. जरा फोटो वगैरे काढले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी आपापल्या सोयीनुसार धावायचे असे ठरवले आणि तिकडून निघून आपापल्या  हॉटेल वर येऊन झोपलो. 

१५ सप्टेंबर २०२२

सकाळी उठल्यावर बाहेर बघितले तर छान वातावरण होते.  १० किमी धावायचे ठरवून बाहेर पडलो. प्रत्यक्ष स्पर्धा मार्गावर धावून बघावे म्हणून अंदाजाने निघालो ते नंतर वेगळीकडेच गेलो तिकडे मंडई सदृश एक जागा होती.  

१.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.55 PM.jpeg

२.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.55 PM (1).jpeg

सकाळी इतक्या लवकरही गजबज होती.  तिथून पुढे निघाल्यावर शाळा, मुले,  त्यांना सोडवायला येणारे पालक असे एकदम घरगुती वातावरण बघायला मिळाले. सगळे गाव सुंदर. आखीव रेखीव रस्ते टुमदार घरे रस्त्याच्या कडेनी कमीत कमी एका तरी बाजूने असलेले फुटपाथ, दुतर्फा लावलेली आणि घरातून पहिल्या मजल्यावरून  बाहेर बघताना नजर अडणार नाही अशा बेताने फांद्या छाटलेली पण वरती डेरेदार असणारी झाडे, अधे मधे मुलांना खेळायला झोपले घसरगुंड्या वगैरे असलेल्या जागा, नियम पाळणारे नागरिक. सगळे काही स्वप्नवत धावायला अप्रतिम वातावरण. तंद्रीत रस्ता लांबचा घेतला आणि धावता धावता दहा ऐवजी १२ किमी झाले.

१.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.54 PM.jpeg

२.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.53 PM.jpeg

३.
WhatsApp Image 2022-10-18 at 3.42.57 PM.jpeg

४.
WhatsApp Image 2022-10-18 at 3.42.59 PM.jpeg

खोलीवर येऊन अंघोळ करून आयर्न मॅन व्हिलेज ला जायला तयार झालो.  मित्रांबरोबर फोनवर ठरल्याप्रमाणे ज्याचे पहिले आवरून होईल त्याने पुढे व्हायचे असे ठरले त्यामुळे एकटाच तिकडे गेलो. आज प्रिंटर सुरु होता रांग चटचट पुढे सरकत होती. तंबूत बिब घेण्याकरता डाव्या बाजूला आयर्न मॅन आणि उजव्या बाजूला हाफ आयर्न मॅन अशी सोय होती. मी आत पोचतोय तोवर बाकीचेही आलेच. माझा बीब नंबर ५७९ होता तो घरी आणि सर्व मित्राना कळवला. आयोजकांतर्फे एक सॅक, बिब, हातात घालायचा बँड (जे आमचे रेस्ट्रीक्टड एरिया मध्ये जाण्याकरता ओळखपत्रम्हणून काम करणार होते ) दोन ट्रांसीशन करता दोन आणि एक स्पर्धा संपल्यावर लागणारे सामान ठेवायला अशा तीन प्लास्टिकच्या बॅग्स असे सामान मिळाले. 

मंडळी आजही काही ना काही खरेदी करतच होती परत एकदा नॉर्माटेक कंपनीच्या प्रोडक्त्त चा डेमो घेतला. तिथल्या माणसाबरोबर भरपूर गप्पा मारल्या. कार्लोस आणि त्यापुढे बरेच मोठे नाव असलेला तो ब्राझिलियन मुलगा इटालियन शिकायकरता म्हणून इटलीत काही महिन्यांकरता आलेला होता. त्यात काही दिवसांकरता त्याने हा एक्स्पो मध्ये डेमो देण्याचा जॉब पत्करला होता. मन लावून त्याचे काम करत होता. खूप उमदे आणि सकारात्मक व्यक्तिमत्व.  दशरथ सरांनी ते पाय चेपायचे मशीन घेऊनच टाकले.

मी आणि Carlos Eduardo Cad Moreira Ceratti
WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.28 PM.jpeg
 
बाकीच्या मंडळींच्या हॉटेलवर दशरथ सरांनी मिळालेल्या बॅगांमधून काय कसे भरायचे हे सांगता सांगता सगळ्यांकडून रेसच्या दिवशी वापरायच्या पिशव्यामध्ये सामान भरूनच घेतले. मी ते बघून नंतर खोलीवर येऊन माझ्या बॅग भरल्या.  रात्रीचे जेवण माझ्या हॉटेलातील रेस्टॉरंट मधे घेतले तेव्हा नाइट रन आणि मुलांकरता मॅरेथॉन समोरूनच जात होती ती बघितली. जेवण झाल्यावर बाकीची मंडळी त्यांच्या हॉटेलवर परतली. ह्या स्पर्धेकरता Event partner असलेला Fantini Club हॉटेलसमोरच असल्याने उत्सवी माहौल हवेत ओथंबून तरंगत होता.
१.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.13 PM.jpeg

२.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.29.12 PM.jpeg

३.
WhatsApp Image 2022-10-18 at 2.28.58 PM.jpeg

थोडा वेळ बाहेर घालवून जास्त न रमता मी खोलीवर परतणे पत्करले. रात्री उशिरापर्यंत स्पीकरवरील गाणी  ऐकू येत होती. काय काय कार्यक्रम सुरु असावे. बाहेरून बरेच आवाज येत होते आवाज ऐकता ऐकता कधी झोप लागली कळलेच नाही. 
 
१६ सप्टेंबर 

आज काहीही धावपळ करायची नाही सावकाश उठायचे अशा सूचनांचे पालन करत उशिरा उठायचे ठरवले होते तरी लवकरच जाग आली.  दुपारी बारा ते सात ह्या वेळात सायकल जमा करायची होती त्याकरता किती वेळ लागेल माहीत नसल्याने दुपारचे जेवण घेऊन मगच जावे असे ठरले. दुपारचे जेवण एका छोटेखानी फक्त दोन माणसे लीलया सांभाळत असलेल्या एका छोट्या पण गर्दी असलेल्या रेस्टॉरंट मध्ये घेतले. तिकडून परत येताना बंगलोरचा प्रज्वल प्रसाद भेटला त्याचे पूर्ण कुटुंबच आले होते हा मुलगा मी माझ्या थोंनूर हाफ आयर्न च्या वेळी स्वयंसेवक म्हणून काम करत होता. त्यावेळी तो कॉलेजात होता. ह्या दरम्यानच्या काळात त्याने ऑलरेडी ऑस्ट्रेलियात आयर्न मॅन केलेले होते. चर्व्हियात पोचल्यावर एकदा त्याच्याशी फोनवर बोलणे झाले होते तेव्हा तो पोहायला जात होता त्यामुळे नंतर भेटू असे बोललो होतो तो अचानकच भेटला त्यामुळे खूप बरे वाटले. प्रज्वल माझ्या पहिल्या हाफ आयर्न आणि फुल आयर्न अशा दोन्ही वेळी स्पर्धेआधी भेटण्याच्या योगायोगाची मौज वाटली. तीच उत्सुकता तीच पोटातली बाकबूक. 

पुढे आलो आणि आता आपापल्या हॉटेल वर जाऊन सायकली घेऊन यायचे असे ठरवतच होतो तितक्यात कोणीतरी सायकल परत घेऊन जाताना दिसले त्याच्याशी बोलून कळले की आता काही कारणानी सायकली घेत नाहीयेत. चार वाजता घेणारेत. म्हटले बर बुवा झाले असेल काहीतरी आणि बरे झाले आपण जेवून घेतले. तिकडे ट्रान्सिशन एरिया जवळच्या स्वयंसेवकांना जाऊन विचारले असता त्यांनी सायकली घेण्याची 'आमाला पावर नाय' असे सांगितले आणि कधी घेणार ते ही त्यांना माहीत नव्हते. एकतर बहुतेक सगळ्यांना कोणाला धड इंग्रजी येत नव्हते आणि त्यातूनही त्यांना खरोखरच काही माहीत नाहीये हे कळत होते. ते तरी काय सांगणार बिचारे. मग तिथेच कळले की सगळ्यांना ऑफिशियल ईमेल / मेसेज येईल त्यात नक्की काय ते कळेल.   

स्पर्धेच्या आदल्या दिवशी ज्याला इंग्रजीत ऑफ द फीट म्हणतात तसा वावर / वागणे अपेक्षित असते म्हणजे त्या दिवशी काहीही ट्रेनिंग करायचे नाही, फार हिंडाफिरायाचे नाही, पायांना आराम द्यायचा वगैरे वगैरे म्हणून मग हॉटेलवर परतायचे ठरले. शिवाय कोव्हीडोत्तर काळात रेस ब्रिफींग प्रत्यक्ष न भेटता ऑनलाईन प्रकारे दिले जाते; तो व्हिडिओ बघायचा राहिला होता म्हटले तो पहावा.   हॉटेलवर आल्यावर फेसबुक पेज वर आयर्न मॅन च्या अँपवर अशा सगळ्या ठिकाणी तपासत असताना कुठून तरी कळलं की उद्या चर्व्हिया मध्ये वादळ येणार आहे त्यामुळे स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.    स्वयंसेवकांनी सांगितले होते की ई-मेल तपासा म्हणून ई-मेल चेक केली असता बहुदा ऑटो जनरेटेड असावी पण उद्याकरता शुभेच्छा अशी ई-मेल आलेली दिसली.  कपाळबडवती शिवाय काही पर्याय नव्हता. 

सरते जे आधी फेसबुक पेज वर कळलेलं ते रात्री नऊ वाजता ई-मेल मधून आले.  

As you may be aware, a large part of Italy’s central Marche region has unfortunately experienced torrential rainfall which occurred late on Thursday, with forecasted weather conditions significantly worsening in Emilia-Romagna for tomorrow. As a result, Emilia-Romagna local authorities have issued an ‘Orange’ warning which means that the IRONMAN Italy Emilia-Romagna triathlon cannot take place on Saturday, September 17 as scheduled. The team is now hard at work in finding alternative racing solutions and discussing these solutions with local authorities and various stakeholders. As things stand, the forecasted weather conditions do allow for IRONMAN 70.3 Italy Emilia-Romagna to go ahead as scheduled on Sunday, September 18 and we are working on various scenarios that would allow IRONMAN Italy Emilia-Romagna athletes to race alongside the same day. The well-being of our competitors remains a priority, as is ensuring a smooth and safe event experience for all involved. We will continue to monitor Emilia-Romagna’s weather forecast, whilst also taking guidance from local authorities. We will update all IRONMAN Italy Emilia-Romagna, IRONMAN 70.3 Italy Emilia-Romagna and 5150 Triathlon Series Cervia this evening with more details.

माझ्या त्या वेळच्या मनस्थितीचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत.   हे एक दुःस्वप्न आहे. आपल्याला जाग यावी आणि आपण उद्या स्पर्धा करताना प्रत्यक्षात यावे असे अनेकदा वाटले. 

याआधी माझ्या मित्रांसोबत असेच काहीसे झाले होते. आयर्नमॅन करता कोरियाला गेले असताना टायफून आल्यामुळे त्यांची स्पर्धा अशीच रद्द झाली होती. म्हणजेच तू पहिला नाहीस ज्यांच्यासोबत असे झाले आहे. सोबत अडीच हजार सहभागी स्पर्धक आहेत तू एकटा नाहीस ज्याच्या सोबत असे होते आहे अशी मनाची समजूत घातली अन काय. तत्वज्ञान बोलायला खूप सोपे असते जगायची पाळी आली की वाट लागते.    

पण आलीया भोगासी असावे सादर चित्ती असो द्यावे समाधान  म्हणून आणि कशीही मनस्थिती असली जेवायला तर हवेच त्यामुळे चला पोटात ढकलू काहीतरी असे म्हणून माझ्या मित्राच्या हॉटेल मालकाने सुचवलेल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जायचे ठरवले.  ते एक असे हॉटेल निघालं जिकडे हॉटेल उघडायच्या आधी पासून रांग होती. आम्ही सातच्या आधी तिकडे पोचल्यामुळे आम्हाला जागा मिळाली. भरपूर मोठी जागा / सीटिंग कॅपॅसिटी असलेले ते हॉटेल दहा एक मिनिटातच संपूर्ण भरले. तिथेही पुणेरी पाट्या होत्या त्याची फार म्हणजे फार मौज वाटली. जेवण म्हणजे सॅलड, पिझ्झे वगैरे खूप छान होते.     
                               
WhatsApp Image 2022-10-18 at 3.31.01 PM.jpeg

१७ सप्टेंबर २०२२ 
सकाळी सात वाजता जाग आली आणि बाहेर बघतो तो समुद्रातून सूर्य वर येत होता लख्ख उजेड म्हटले इकडचे हवामान खातेही आपल्यासारखेच निघाले तर काय गरज होती स्पर्धा रद्द करायची.  पण मग आठच्या सुमारास ढग दाटून आले. साडेआठ वाजता पाऊस सुरु झाला आणि बरोबर नऊ वाजता वादळ. जोरात वारा सुटला होता पावसाचा जोरही वाढला माझ्या बाल्कनीतून डावीकडे  जरा मान वर करून बघितले असता समुद्र दिसायचा, तो एकदम खवळलेला होता. आणि स्पर्धा रद्द केली त्याबद्दल आयोजकांचे मनोमन आभार मानले.

WhatsApp Image 2022-10-18 at 3.30.57 PM.jpeg

निसर्गाचे हे तांडव आम्ही पोहताना किंवा स्पर्धा मार्गावर असताना सुरु झाले असते तर काय झाले असते त्याचा विचार देखील करवत नाही. हा सगळा प्रकार दुपारी तीन पर्यंत चालला.  मग मेसेज आला  की चार वाजता स्थानिक प्रशासनाबरोबर एक मिटिंग होणार आणि एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन मग पुढे काय ते ठरणार. 

दिवसभर हॉटेलात खोलीवर नुसते बसून कंटाळा आला होता. चार च्या सुमारास वादळ शमल्यावर जरा खाली उतरलो आणि पुणेरी मित्रांसोबत पाय मोकळे करायला म्हणून बीच वर जायचे ठरले.  समुद्रावर गेलो. आकाशात सुंदर इंद्रधनुष्य तयार झाले होते. ते खूप वेळ दिसत राहिले. मग त्यासोबत फोटो वगैरे काढले.

१. माझ्या हॉटेलातून
WhatsApp Image 2022-10-18 at 3.30.56 PM.jpeg

२. बाहेर पडल्यानंतर
WhatsApp Image 2022-10-18 at 3.30.54 PM.jpeg

३.
WhatsApp Image 2022-10-18 at 3.30.53 PM.jpeg

४.
WhatsApp Image 2022-10-18 at 3.30.53 PM (1).jpeg

बाहेर कळले की रविवारी हाफ आयर्न सोबत फुल पण होणार पण अधिकृतरित्या तसे कळले नव्हते. साधारण साडेपाच वाजता फेसबुक पेज वरून कळले की रविवारी हाफ आयर्न सोबत फुल पण होणार आणि ८ ते अकरा या वेळात सायकली घेणार आहेत. 

Following conversations with the Head of Police, Civil Protection, local authorities and our stakeholders, we have received the necessary clearance to proceed as planned with IRONMAN Italy Emilia-Romagna and IRONMAN 70.3 Italy Emilia-Romagna triathlons tomorrow (Sunday, September 18).
There has been minimal disruption to the course, and the team are busy on the ground clearing any debris so it’s clear for tomorrow morning. The race village and registration are now open and close at 23:00 today. The bike check-in will start at 20:00 today.All athletes will receive an update by e-mail shortly with further information.

मग सायकली देण्याआधी जेऊन घेऊ असे ठरवले. पुणेरी मंडळींनी ते रहात असलेल्या हॉटेल प्लुटोनच्या किचन मध्ये जाऊन दाल खिचडी बनवली होती. मी नेलेल्या गुळपोळ्या आणि ती गरमागरम खिचडी असे आमचे जेवण झाले. नंतर खायला बडीशोप देखील होती मंडळींकडे. नुसती चंगळ.

WhatsApp Image 2022-10-18 at 3.30.52 PM (1).jpeg

जेवून परत माझ्या हॉटेलवर जात असताना कळले की आठ वाजता आधी फक्त हाफ वाल्यांच्या सायकली घेताहेत. फुलवाल्यांच्या त्यांच्या नंतर घेणार. पण नंतर म्हणजे कधी माहीत नाही. एक जण तणतणत परत जात होता का तर सायकल देण्यात रात्री उशीर होईल आणि मग झोप / विश्रांती कमी मिळेल. मग उद्या स्पर्धा कशी करायची म्हणून त्याने भाग घ्यायचे रद्दच केले आहे. हे देखील त्याच्या बरोबर बहुतेक त्याची बायको असावी तिने इंग्रजीत सांगितले म्हणून कळले. नाहीतर तो इतका पिसाटला होता की तो हे सगळे आम्हाला त्याच्या भाषेत सांगत होता. एकीकडे दिसत होते की तिकडे सायकल देणाऱ्यांची गर्दी वाढतच होती त्यामुळे रांगेत तरी उभे राहू म्हणून घाईघाईने सायकल घ्यायला माझ्या खोलीवर गेलो. थोडक्यात सांगायचे झाले तर सगळे करून रात्री घरी यायला रात्रीचे साडेनऊ दहा वाजले.
१.
WhatsApp Image 2022-10-18 at 3.30.52 PM.jpeg

२.
WhatsApp Image 2022-10-18 at 3.30.50 PM.jpeg

एकीकडे स्पर्धा होत होती ह्याचा आनंद आणि दुसरीकडे होणारे म्हणोन वाटणारी हुरहूर अशा संमिश्र भावनेत झोपी गेलो. 

क्रमशः

भाग ४ आणि शेवटचा - https://www.maayboli.com/node/82551

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद उबो
मागच्या दोन भागात फोटो वाढवले आहेत. ह्या भागातही टाकणार आहे.

धन्यवाद मंडळी
वावे - ते फोटो कुठे टाकायचे आहेत हे मलाच लक्षात यावे म्हणून मुद्दाम लिहिलंय. Proud

छान सूरुय.
किती ती अनिश्चितता
Positive राहणं अशावेळी हे कठीण फार.
पण जमवलं तुम्ही.

वा वा वा!!!!! जबरदस्त!!! सविस्तर लिहीताय ह्याचा खूप आनंद वाटतोय.

बाकी तुमचं टायमिंग बघून एक गोष्ट जाणवली की, तुमचं रनिंगवर सायकलिंगपेक्षा थोडं जास्त प्रेम आहे. तुम्ही सायकलिंग किंचित जास्त सहज केलेलं दिसलं आणि रनिंग तुलनेने फार शक्तीने केल्यासारखं वाटलं (केवळ टायमिंगमुळे केलेला फक्त अंदाज). मी कधी काळी अशी एखादी छोटी ड्युएथॉन केली तर त्यामध्ये सायकलिंगमध्ये जास्त जोर लावेन, वेळ वाचवेन आणि रन स्लो- स्टेडी असा पूर्ण करेन. तुमचं रनिंगवर जास्त प्रेम असल्यामुळे तुम्ही रनिंगवर जास्त जोर दिला, सायकलिंग सहजमध्ये केलं असं वाटलं. कदाचित चुकीचा अंदाजही असू शकेल. असो.

अनिश्चितता पोचली.
त्या वेळी मी ही त्यांच्या फेसबुक पेजवर चक्कर मारली होती. बराच गोंधळ होता.

मार्गी म्हणताहेत, ते मलाही जाणवलं. सायकलिंगला जास्त वेळ घेतलाय. कारणाचा विचार नाही आला.

मस्त!
ईथे मायबोलीवर लोकं प्रार्थना करत होते म्हणून तिथले वादळ गेले वातावरण निवळले Happy
पण अजून एक फोटो नाही पाहिला मी,, मागच्या धाग्यात टाकलेत का..
निदान डीपी तरी बदला आता आणि आयर्नमॅनच्या कॉश्च्युममध्ये लावा

धन्यवाद मंडळी

फोटो टाकले आहेत

झकासराव - हो सोपं नव्हतं सकारात्मकता टिकवणे. विशेषतः एकटा असताना. सहसा मी आशावादी सकारात्मकतेने भरपूर असा मनुष्य म्हणूनच ओळ्खला जातो. मी देखील स्वतःला तसाच मानतो. त्याची परीक्षाच होती. पण झालो बाबा पास.

भरत - अफाट अनिश्चितता होती.
तिथल्या स्वयंसेवकांना सोडाच पण आयोजकांनाही माहीत नव्हते स्पर्धा भरवता येइल की नाही ते.
शिवाय फेसबूक वरचे इटली आयर्नमॅनचे ऑफिशियल पान, आयर्नमॅन अ‍ॅप, आपली त्यांच्याकडे नोंदवलेली ई-मेल आयडी ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन बघावे लागत होते आली आहे का काही बातमी. एकाच वेळी सगळीकडे अप्डेट करत नव्हते. अन ऑफिशियल फेसबूक पेज वर लोकांनी लढवलेले तर्क, त्याची वेगळीच कथा. खूपच गोंधळाचे वातावरण.
चर्व्हियापासून जवळच एका गावात ढगफुटी झाल्याने काही माणसे जनावरे दगावली होती त्यामुळे स्थानिक प्रशासनाने इतकी गर्दी असणारी स्पर्धा होऊ देण्यास परवानगी नाकारली होती. पण तो नि र्णय function at() { [native code] }इशय योग्य ठरला. कितीही कमर्शियल अँगल असला तरी द्य दुसर्‍या दिवशी दोन्ही स्पर्धा एकाच वेळी घेण्याचे शिवधनुष्य लीलया पेलून आयोजकांनी function at() { [native code] }यंत प्रशंसनीय कामगिरी बजावली. अजीबात सोपे नव्हते.

मार्गी - सायकलिंगवरचे तुझे प्रेम दिसतेय हो अगदी. सगळीच कसे तुझ्या सारखे असणार. असो. पुढच्या भागात तुझ्या शंकेचे समाधान होऊ शकण्याची शक्यता आहे.

ऋन्मेऽऽष - ईथे मायबोलीवर लोकं प्रार्थना करत होते म्हणून तिथले वादळ गेले वातावरण निवळले असावे हे अगदीच शक्य आहे.
आणि तुला वाटतोय तसा कॉश्च्युमवाला आयर्नमॅन नाही मी Wink

सगळं सुरळीत असतानाही काही स्पर्धात्मक करतानाच नव्हे पण वार्षिक परीक्षेची सगळी तयारी झाली असतानाही पाकपूक व्हायचं. भले निकालात पहिल्या पाचात आलो तरी. तुमच्या बाबतीत तर अजून भेसूर परिस्थिती होती...
कोलंबसाचे गर्वगीत आठवलं.....
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे
ढळु दे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशून मातु दे दैत्य नभामधले
दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
कराया पाजळुदे पलिता !

की स्वर्गातून कोसळलेला सूड-समाधान
मिळाला प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान !

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे
फुटूदे नभ माथ्यावरती
आणि तुटूदे अखंड उल्का वर्षावात अग्नी
नाविका ना कुठली भीती !

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा
झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम !

काय सागरी तारु लोटले परताया मागे
असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी
जपावे पराभूत प्राणा !

कोट्यवधी जगतात जिवाणू जगती अन् मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नव क्षितिजे पुढती !

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा !

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथाया खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

कुसुमाग्रज....

छान फोटो आहेत सगळे!
आता प्रत्यक्ष स्पर्धेतला अनुभव वाचायची उत्सुकता वाढली आहे.

हर्पेनजी तुमचे कौतुक शब्दांत मांडणे कठीण.
कौतुक करावे तरी किती आणि कशाकशासाठी?
आॉफिस सांभाळून सराव, आजुबाजुंच्यांमध्ये चटकन मिसळणे, प्रसंगावधान, नेतृत्वगुण, प्रचंड सकारात्मक अप्रोच, ध्येय गाठण्याची जिद्द आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला प्रत्यक्ष अनुभवतोय असे वाटावे इतक्या उच्च दर्जाची लेखमाला. _^_
सगळंच कल्पनातित.

जियो! सलाम! दंडवत!

बापरे..पेला तोंडाला लागेपर्यंत किती ह्या अडचणी!...आणि त्यातूनही तुम्ही सकारात्मक ऊर्जा ठेऊन वाट काढत आहात.. तुमच्या जिद्दीला सलाम.._/\_

मालिका वाचत आहे..आणि त्यातील अथक परिश्रम पाहून प्रत्येक लेखानंतर मी पाणी प्यावे आणि एक दीर्घ श्वास घ्यावा असे वाटत आहे...तुमचा अभिमान वाटतो. Happy

धन्यवाद मंडळी

दत्तात्रय साळुंके - खूप छान कविता. धन्यवाद.
काहीवेळा आपल्यात हे कुठून येते ह्याचे मोठे कुतुहल वाटते

वाचतोय हर्पेनजी .छान लिहिताय .
दशरथ जाधव म्हणजे पूर्वी मुंबई पुणे स्पर्धा जिंकणारे आणि घाटांचा राजा . आजकाल होते की नाही माहित नाही

वाचतोय हर्पेनजी .छान लिहिताय .
दशरथ जाधव म्हणजे पूर्वी मुंबई पुणे स्पर्धा जिंकणारे आणि घाटांचा राजा . आजकाल होते की नाही माहित नाही

मस्तच !
हा भाग छान सचित्र झालाय Happy

वाचता वाचता किती वेळा थांबून मोठा श्वास घेतला. तुझ्याकडून प्रत्यक्ष ऐकलं होतं तरीही वाचताना प्रत्येक टप्याला धडधडलं. त्या वादळाची कल्पना फोटोमुळे फारच तीव्रतेने जाणवली.
तुझ्यातले प्रचंड सकारात्मकतेचे, कधीही हताश न होण्याचे जे काही रसायन आहे, त्याला नतमस्तकच! जियो

प्रतिसादात अनामिकाने लिहिलय त्याला
>>>आॉफिस सांभाळून सराव, आजुबाजुंच्यांमध्ये चटकन मिसळणे, प्रसंगावधान, नेतृत्वगुण, प्रचंड सकारात्मक अप्रोच, ध्येय गाठण्याची जिद्द आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला प्रत्यक्ष अनुभवतोय असे वाटावे इतक्या उच्च दर्जाची लेखमाला. _^_
सगळंच कल्पनातित.<<< +100

फोटोही मस्तच!

आॉफिस सांभाळून सराव, आजुबाजुंच्यांमध्ये चटकन मिसळणे, प्रसंगावधान, नेतृत्वगुण, प्रचंड सकारात्मक अप्रोच, ध्येय गाठण्याची जिद्द आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला प्रत्यक्ष अनुभवतोय असे वाटावे इतक्या उच्च दर्जाची लेखमाला. _^_
सगळंच कल्पनातित <<<>>>>>> खरोखर.