आव्हानाचे अत्तर (इटली आयर्नमॅन स्पर्धा) भाग १

Submitted by हर्पेन on 11 October, 2022 - 07:57

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर - कवी गुरु ठाकूर

मी इटलीतील चर्व्हिया येथे १८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या स्पर्धेत भाग घेऊन ३.८ किमी पोहणे, १८०. किमी सायकल चालवणे आणि ४२. किमी धावणे ह्या तिन्ही गोष्टी १४ तास ३५मिनिटात संपवून आयर्नमॅन हा किताब पटकावला. १६ तासात ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्वांनाच हा किताब मिळाला.

मी आयर्नमॅन कसा झालो त्याची ही कथा.

आयुष्यात पहिल्यांदा ट्रायथलॉन ह्या क्रीडाप्रकारात सहभाग घेतला, तो डिसेंबर २०१३ मध्ये. माझ्या पहिल्या हाफ मॅरॅथॉन नंतर एका आठ्वड्यात लगेचच. हाफ मॅरॅथॉनच्या आधी झालेल्या गुढगेदुखीमुळे क्रॉस ट्रेनिंग म्हणून उधार सायकलीवर थोडे फार केलेले सायकलिंग (कॉलेजनंतर पहिल्यांदाच) ते आवडले असल्याकारणाने पुणे हाफ झाल्या दिवशीच संध्याकाळी जाऊन नवीन हायब्रीड सायकल (ACT 110) घेतली होती. कर्नल गोडबोले संचालित 'एम आय इनीशीएटिव्ह' आयोजित स्प्रिंट अंतराची स्पर्धा ही माझी पहिली ट्रायथलॉन. त्या स्पर्धेला आमच्या गृप मधले मी आणि सिद्धू असे आम्ही दोघे जण होतो. बाकीचे गोवा मॅरेथॉन करता गेले होते. मला गोव्याला जायचे नव्हते त्यामुळे तो रविवार पुण्यात घरात बसून घालवण्यापेक्षा ही स्पर्धा कर असे रामने आग्रहाने सांगितल्यामुळे, सिद्धू (हा रामचा सगळ्यात धाकटा भाऊ त्यावेळी तो बारावीत होता) आणि मी आम्ही दोघांनी ती ट्रायथलॉन केली. त्या स्पर्धेची सुरुवात टिळक तलावात पोहून करायची होती आणि मग पुढे सायकलिंग आणि धावणे डेक्कन परिसरातच करायचे होते. रोजचाच परिसर अंगणच जणू. मला तर खूपच मजा आली. सिद्धू तर त्याच्या वयोगटातल्या पहिल्या तीन नंबरात आला.

माझ्या पहिल्या ट्रायथलॉन दरम्यान बी एम सी सी कॉलेज पाशी घेतलेले फोटो
१.
1452166_582067228526631_39219656_n.jpg

२.
1459822_582074588525895_1740619850_n.jpg

३. मी आणि सिद्धु आमच्या दोघांमधे आहे तो सिद्धुचा भाऊ
2013-12-08 09.08.26.jpg

'एम आय इनीशीएटिव्ह' तर्फे नंतर लगेचच मार्च २०१४ मधे ऑलिम्पिक अंतराची स्पर्धा आयोजित केली गेली त्यातही सहभागी झालो. त्यावेळी सिद्धू होताच पण राम अरुण सुनील हे ही सामील झाले. ह्यावेळी पोहोणे भूगाव येथील नैसर्गिक मानस तलावात करायचे असल्याने आणि अंतर अजून जरा जास्त असल्याने ही स्पर्धा जरा आव्हानात्मक आणि त्यामुळेच अतीव समाधान देणारी होती.

IMG-20140302-WA0005.jpg

ट्रायथलॉन ह्या क्रीडाप्रकाराची पुण्यातली आणि एकूणच भारतातली ही सुरुवात होती. त्यावेळी एकंदरीत वातावरण एकमेकांना प्रोत्साहन देत देत स्पर्धा पूर्ण करण्यावर भर द्यायचा अशा प्रकारचे होते. बरेच वेळा आयोजक आणि स्वयंसेवक हे हौशी खेळाडूच असत. वेग काय होता, वेळ किती लागला वगैरे सर्व गोष्टी निदान माझ्याकरता तरी गौण होत्या. सगळा भर स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर. माझ्या आठवणीनुसार डॉ. कौस्तुभ राडकर ज्यांनी सर्वात जास्त वेळा आयर्नमॅन पूर्ण करणारा भारतीय म्हणून नाव कमावले आहे आणि जे ट्रायथलॉनचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ख्यातकीर्त कोच आहेत ते त्यावेळी पोहोण्याच्या वेळी निरीक्षक / स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते. त्याही वेळी त्यांनी चार पाच तरी वेळा आयर्न मॅन पूर्ण केलेले होते.

नंतर ऑगस्ट २०१४ मधे राम सोबत थोन्नूर येथे हाफ आयर्न अंतराची स्पर्धा देखील पूर्ण केली. त्यावेळी तर आमचे हात आभाळाला टेकले होते. हाफआयर्न करणारे देखील खूप कमी असल्यामुळे आमचे प्रचंड कौतुक झाले होते.

मी आणि राम
IMG-20140810-WA0012.jpg

थोन्नुर ट्रायथलॉन दरम्यान
IMG-20140810-WA0011.jpg

त्यानंतर राम आणि मी फुल आयर्नमॅन करायचे ठरवले होते. आमचे ट्रेनिंग पार्टनर म्हणून एकमेकांसोबत ट्युनिंग जुळलेले होते त्यामुळे मी देखील त्याच्यासोबत फुल आयर्नमॅन करेनच अशी अपेक्षा होती पण त्यावेळी नेमके मला कैलास मानसरोवर येथे जाण्याची संधी प्राप्त झाल्याने त्याच्या त्या अपेक्षेला तडा गेला. त्यावर्षी बातम्या आल्या होत्या की कैलास मानसरोवर यात्रा मार्गावर रस्ता बांधण्याचे काम सुरु असून लवकरच तिकडे जाताना पायवाट ऐवजी गाडीतून जायला मिळेल. बातमीत जे 'मिळेल' असे होते ते माझ्याकरता 'लागेल' असे होते. कारण मला अनेक वर्षांपासूनच्या जुन्या मार्गावरून हिमालयातल्या पाय वाटा तुडवत पायी चालत यात्रा करण्याची फार ईच्छा होती त्यामुले उगाच रस्ता झाला आणि जीप किंवा इतर कुठल्या वाहनाने जायला लागले तर काय घ्या असे म्हणून मी यात्रा करायला प्राधान्य दिले.

त्यानंतर जुलै २०१६ मधे चेन्नई येथील ट्रायथलॉन करायच्या वेळी मात्र राम सिद्धू सोबतच बाबू अरुण सुनील प्रसाद असे आम्ही एकूण सात जण होतो.
हम सात आठ है|
Chennai Triathlon.jpg

आता ह्या वर्षी राम बाबू आणि प्रसाद ह्यांनी मलेशिया येथील आयर्नमॅन करायचे ठरवले होते. हाफ करताना लागलेला वेळ पाहता (९ तास वगैरे) आपल्याच्याने फुल जमेल की नाही असे वाटत तर होतेच आणि पण समजा सराव तयारी केली तरी पैशाचे सोंग घेता येत नाही ह्या कारणामुळेही ( कैलास मानस यात्रा देखील तसे खर्चीक काम असते) आयर्नमॅन करण्यासाठी काही काळ तरी थांबणे क्रमप्राप्त होते. कारण आयर्नमॅन म्हणजे रोड बाईक, ट्रायसूट, वेटसूट, बूट, ग्लोव्ह्स, सायकलच्या वेळी लागणाऱ्या इतरही बऱ्याच accessories, ट्रेनिंगच्या वेळचा सटरफटर खर्च, परदेश प्रवास, विमान तिकीट, तिकडचे राहणे खाणे पिणे ई. चा खर्च. वगैरे वगैरे त्यामुळे मग मी चक्क पैसे साठवायला / बाजूला टाकायला सुरु केले.

मधेच एकदा कोल्हापूरात ऑक्टोबर २०१८ ला झालेल्या स्पर्धेत फार सराव नसताना भाग घेऊन ती जरा बर्‍या वेळेत पुर्ण केल्यानंतर (साडेआठ तास) आत्मविश्वास वाढीस लागला होता.
IMG-20181118-WA0046.jpg

कोल्हापूर मेडल
IMG_20181119_095323.jpg

ह्या सगळ्यादरम्यान मनात पार मागे कुठेतरी, मिलींद सोमण ह्याने वयाच्या पन्नाशीत आयर्नमॅन स्पर्धा केल्याच्या बातमीने देखील घर केले होते. आणि बहुदा २०२० ह्या आकड्याचेही (काय माहीत का पण) आकर्षण असावे; मी २०१९ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इटली येथे सप्टेंबर २०२० मध्ये होणाऱ्या स्पर्धेकरता म्हणून नोंदणी केली. मनात अमूकच ठिकाणी करायचे असे काही ठरवले नव्हते. खरेतर त्यावेळी अनेक पहिलटकर कझाकिस्तानला जात होते. मलाही तिकडे चालले असते पण त्या स्पर्धेच्या दरम्यान गणपती येणार होते त्यामुळे मी तिकडे न जाण्याचे ठरवले.

इटलीला नाव नोंदवण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे तिकडे फ्लॅट कोर्स आहे आणि दुसरे म्हणजे ह्या निमित्ताने युरोपात जाणे होईल. मग थोड्या दिवसांनी इटलीतल्या मुक्कामाचे हॉटेल बुकिंग देखील करून झाले. विमानाचे तिकीट काढणारच होतो पण मग तितक्यात करोना उद्भवला. इटलीत त्याचा प्रसार आणि प्रादुर्भाव जानेवारीतच झाला होता तरी स्पर्धा सप्टेंबरमध्ये आहे तोवर 'होईल सगळे सुरळीत' असेच वाट त होते. त्यामुळे तेव्हाच, (हायब्रीड सायकलवर इतक्या मोठ्या अंतराची स्पर्धा नको म्हणून) रोड बाईक घेतली.

माझा बेस बिल्डिंग पातळीचा सराव सुरु करून झाला होता. रनिंग सुरु होतेच; पोहोणे आणि सायकलिंग देखील सुरु केलेले. सराव म्हणून एकदा सायकलवर लोणावळ्यापर्यंत देखील जाऊन आलो. पण मग आपल्याकडे पहिल्याप्रथम २२ मार्च रोजी एक दिवसीय जनता कर्फ्यू आला आणि २४ मार्च पासून पहिल्यांदा पंधरा दिवसांकरता असलेला लॉकडाउन नंतर कधी कधी आणि किती किती वाढत गेला ह्याचा ट्रॅक सूटूनच गेला. यथावकाश आयर्नमॅन आयोजकांकडून अधिकृतरीत्या स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे कळवले गेले.

मग २०२१ मध्ये आपल्याकडच्या परिस्थिती नुसार लॉकडाउन सुरु बंद होत राहिला. पोहोण्याचे तलाव अनिश्चित काळाकरता बंदच होते. आयोजकांकडून स्पर्धा होत असल्या बद्दल कळवले गेले. पोहोण्याचे जगभरातील तलाव बंद असल्याकारणाने असेही कळवण्यात आले की हवे असल्यास ही स्पर्धा ड्युएथलॉन प्रकारे करता येईल म्हणजे फक्त सायकलिंग आणि धावणे. मनात म्हटले पण मग त्यात काय मजा. मुख्य आव्हान समुद्रात पोहोण्यात तर आहे. आपल्याकडच्या परदेश प्रवास धोरणाबाबत सतत बदलणाऱ्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी कळत होत्या. मी आयोजकांना पुढच्या वर्षी भाग घेतला तर चालेल का असे विचारलेले त्याचे उत्तर येतच नव्हते मग परत एकदा आपल्याकडील आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सप्टेंबर असं अखेरपर्यंत बंद राहणार असल्याच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या जोडून मेल पाठवली तेव्हा मग आयोजकांनी माझा सहभाग पुढे ढकलून २०२२ करता नक्की केला.

क्रमशः

भाग २ - https://www.maayboli.com/node/82540

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन, फार कौतुक वाटतं आहे. इतकी अवघड स्पर्धा वेळेत पूर्ण केल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!!
सगळा प्रवास छान सविस्तर येऊदे.
ॐ नमः शिवाय

फारच कौतुकास्पद. उत्तम मार्जिंनने ही कठीण स्पर्धा पार केलीत!
पुढच्या भागाची उत्कंठा.

वा वा! अभिनंदन! Happy
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत आहे.

अभिनंदन. Marathon करणाऱ्यांच्या बद्दल पण मला अतीव आदर आहे. इथे तर काय, आयर्नमॅन आहे म्हणजे माझा साष्टांग नमस्कार हर्पेन यांना. खरंच तुमचे कौतुक आहे. वाचतोय हा लेख. या लेखामुळे, रोज माझे बूड हलवायला लागलो, तरी आयर्नमॅनचा आनंद होईल मला. _/\_

अभिनंदन.!
सुरुवात मस्त.. पुढील लेखाची उत्सुकता ...

मस्त सुरुवात.
पुढचे भाग मोठे मोठे आणि लवकर येऊ द्या!

जबरी

Pages