काहीच्या काही कविता- उड्डाणपूल

Submitted by वावे on 11 October, 2022 - 01:34

सुरुवातीची ओळ बा. भ. बोरकरांच्या सुप्रसिद्ध कवितेवरून सुचल्यामुळे त्यांची मनापासून क्षमा मागत आहे.

खूप या पुलास फाटे
एक जाया, कैक याया
सायंकाळी अन् सकाळी
वेळ हा जाणार वाया

विमाने देशी-विदेशी
उतरती ती उत्तरेला
मार्ग हैद्राबाद जाण्या
होय तोही त्या दिशेला

रिंगणे वा कंकणे दो
बंगळूरूच्या सभोती
नाव त्यांचे रिंग रोड
आहे सर्वांच्याच खाती

ओलांडुनी त्या रिंग रस्त्या
प्रवेशिण्या शहरामध्ये
वाहनांची रांग येथे
पुलावर्ती चढू लागे

गाड्यांची गर्दी सदैव
प्रवाहो जाई पुढे
येथ प्रत्येकास घाई
काढण्या गाडी पुढे

मात्र येथे ना कधीही
वाहतुकीचा मुरंबा
आळिपाळीने तुम्हाला
सांगती पोलीस 'थांबा!'

असा हा उड्डाणपूल
नाव तयाचे हेब्बाळ
नित्य येथे जातसे हो
संध्याकाळ अन् सकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमलीय! Lol
नविन झाला होता तेव्हा एक दिलासा होता हेब्बाळ.
आता बॉटल नेक झालाय.

काहीच्या काही नाहीय ही..
जमलीय एकदम... >> +१

हेब्बाळ फ्लायोवरच्या कटू आठवणी जाग्या झाल्या.

धन्यवाद सगळ्यांना! Happy
बॉटलनेक- अगदीच मानव. विशेषतः संध्याकाळी शहरातून बाहेर पडताना तो 'नेक' अगदी अरुंद ठरतो.
मात्र इथल्या ट्रॅफिक पोलिसांचं खरोखरच करावं तितकं कौतुक कमी आहे. हेब्बाळ फ्लायओव्हरच नव्हे, तर कितीतरी ठिकाणी तासनतास उभे राहून ते वाहतूक शक्य तितकी सुरळीत करत असतात. मोठं काम करत असतात!

धमाल झाली आहे , अगदी इथेही लागू पडतेय. Lol
आमच्याकडे 'गाय मेली ओझ्यानी, शिंगरू मेले हेलपाट्यानी ' अशी गत आहे, मला तर आमच्याकडच्या रस्त्यांचा आर्किटेक्ट सायको वाटतो. Lol सरळ जाणाऱ्यांनी उजवीडावीकडून येणाऱ्यांना Yield करायचा नियम आहे. पुलावरून निघालेला माणूस सततच्या कन्स्ट्रक्शनने दरवेळी वेगळ्या ठिकाणी मर्ज होतो. तिथेच गोलगोल फिरतो, ध्येय दिसत असूनही पोचता येत नाही. मी Wreck it Ralph मधले रियानाचे 'शट अप अँड ड्राईव्ह' गाणे लावून मनस्ताप कमी करते.
हे घे वावे तुला Lol
https://youtu.be/6b4XOLSwhxw

<<<काहीच्या काही नाहीय ही.>>>
बरोबर. मला बोरकरांची मूळ कविता नाही माहीत, पण याला विडंबन म्हणता येईल.

रिक्षा अलर्ट: काहीच्या काही म्हणजे अशी

मला बोरकरांची मूळ कविता नाही माहीत, पण याला विडंबन म्हणता येईल. >>> +१ कविता जमली आहे. मूळ वाचल्यावर विडंबन जास्त कळेल.

मला वाटले आधी तो पुण्यात चांदणी चौकात पाडला त्या पुलाबद्दल आहे Happy

वावे
मस्त कविता
मस्त जमलीये
मला पुण्याचं वर्णन वाचतोय असंच वाटलं

ही
मूळ कविता. (आता माझी कविता (?) काहीच्या काही वाटेल Wink )
सगळ्या गलेलठ्ठ अस्ताव्यस्त शहरांना लागू. />> हो हे बरोबर आहे. घरोघरी मातीच्या चुली.

धन्यवाद सर्वांनाच!

धन्यवाद मनीमोहोर आणि कुमार सर!
मानव, तुमची कविता मस्त आहे! Lol
बरोबर आहे, माझ्या या कवितेला कदाचित विडंबन म्हटलं पाहिजे!
अस्मिता, गाणं पाहिलं Happy एकीकडे स्वतःच गाणी गुणगुणणे हा माझा उपाय आहे.

गेल्या डिसेंबरात इकडे जाणे झाले. मी गेलो तो सुट्टीचा दिवस असावा, त्यामुळे फार गर्दी लागली नाही. स्वस्तात सुटलो. पूर्वी एअरपोर्ट रोडवर बरेच सिग्नल लागत पण आता बराच लांबसडक (शब्दशः लांब 'सडक') पूल झाल्यामुळे लवकर गेलो असे वाटले.

शनिवार-रविवारी शक्यतो गर्दी नसते. पण जर काही कारणाने रविवारी गर्दी असेल तर हाल होतात कारण त्या दिवशी पोलीस नसतात वाहतूक नियमन करायला!
एरवीही पोलिस अतिशय चांगल्या प्रकारे manage करतात. म्हणजे थांबावं लागतंच, पण जरा वेळाने नक्की पुढे जाता येईल याची खात्री असते. 'घुसा म्हणजे शिरकाव होईल' या धोरणाचा अवलंब करण्याची फार गरज नसते. सवयीने केलं जातंच अर्थात!
एअरपोर्ट रोडचा लांबसडक फ्लायओव्हर मस्तच आहे. लांबीच्या मानाने तो खूप लवकर बांधून पूर्ण झाला होता.

अनु, धन्यवाद Happy

काहीच्या काही कविता
हे अशा कवितांचं सदर चालू केलंय असं समजून धागा उघडला. पण एकच कविता सांगतेय "थांबा."