अमरीश पुरी - एक अयशस्वी व्हिलन

Submitted by फारएण्ड on 6 October, 2022 - 18:55

अमरीश पुरीला आपण "बावजी" च्या रूपात अनेकदा पाहिले आहे. तो लंडन मधे ब्रिटिशांसारखा व अमेरिकेत अमेरिकनांसारखा असतो पण त्याचा भूगोल व दिशाज्ञान तसे कच्चेच. साधे लंडन मधे आपल्या घरून आपल्याच दुकानात जायला तो पुण्यातील रिक्षावाल्याने नवख्या व्यक्तीस फिरवून न्यावे तसा कोठून कोठून फिरून जातो. अमेरिकेत त्याच्या हॉलीवूड मधल्या म्हणजे समुद्रकिनार्‍यावरून बरेच मैल आत असलेल्या शहरातील घराखालीच समुद्रकिनारा व मरीना असतो, व त्या शहरातील "सबसे बडा पेपर" हा न्यू यॉर्क टाइम्स असतो. त्याला १८ मुले व १७ मुली असल्यातरी एक मानलेला मुलगाही असतो. व तो फावल्या वेळात भारतात आल्यावर ताजमहाल चा गाइड बनतो. तो जर भारतात राहात असला तर अमेरिकेहून शिकून भारतात आलेल्या मुलाकडे तो यायच्या दिवशीही ढुंकूनही न पाहता पेपर वाचत बसतो. तरीही तो एक यशस्वी दुकानदार्/उद्योजक गणला गेला. त्यामुळे ते आपण सोडून देऊ.

पण जेव्हा तो मोगँबो, जनरल डाँग, ठकराल, भुजंग ई. बनला तेव्हा असे यश तेथे मिळवू शकला नाही. माबोवर असल्या गोष्टींचा अभ्यास असलेल्या अनेक लोकांना वेळीच कन्सल्ट न केल्याने त्याचे नुकसान झालेच पण अनेकदा फालतू हीरो लोक जिंकून बॉलीवूडचे ही झाले. यातील अर्ध्याएक केसेस मधे तरी पब्लिक अमरीश पुरीच्या बाजूने असे पण कधी त्याचे टॅक्टिक्स, कधी चोरी/अन्याय कसा करावा याबद्दल असलेली मर्यादित समज, तर कधी त्याचा अस्थानी मेकअप्/कॉस्च्युम यामुळे तो प्रत्येक वेळेस हरला. त्या चुकांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. भावी चित्रपटांतील व्हिलन्सना यापासून बोध घेता यावा म्हणून इथे एक प्रबंधवजा बाफ उघडलेला आहे. तो पूर्ण करण्यास माबोवरील एक्स्पर्ट्सनी हातभार लावावा ही नम्र विनंती.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोगॅम्बो हा त्यातल्या त्यात यशस्वी म्हणायला हवा कारण त्यात मोगॅम्बो हा स्त्रीच्या मागे किंवा एखाद्या कलेच्या मागे धावताना दिसला नाही. नाहीतर त्याचा अड्डा सुरूवातीला पाहिल्यावर दोन तरी निदान कॅबरे सॉग होणार असे मला वाटत होते. पण दुर्दैवाने एकही गाणे नव्हते व मोगॅम्बो पुर्णपणे फोकस्ड राहिला. हिरोला गायब व्ह्यायची शक्ती मिळाली नसती तर मोगॅम्बोला हरवणे कठीण होते.

आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिलेल्याचा पराभव करण्यासाठी जादूई शक्ती किंवा काहीतरी साईन्टिफीक चमत्कार घडवावा लागला ही मोगॅम्बो जीत नव्हे का? जसे कर्णाला मारण्यासाठी तो निहत्ता असतानाच अर्जूनाने बाण मारला व त्यामुळे काही प्रमाणात का होईना कर्णाकडे लोकांची सहानुभूती वळली. हाच निकष मोगॅम्बो बाबतीत का नाही लावावा?

योगी तुम्ही पोस्ट कदाचित गंमतीने लिहिली असावी. पण एका बाबतीत मी खरेच मोगॅंबोला मानतो. आजकालच्या काळात जिथे पैसे घेऊन नेत्याची उदो उदो करणारी भक्त जमात उदयास आली आहे तिथे त्या काळात हे मोगॅंबो बोलत उकळत्या ॲसिडमध्ये लोकं स्वखुशीने उड्या मारायची. धन्य ती स्वामीनिष्ठा आणि धन्य त्या निष्ठेचा स्वामी !

उकळत्या ॲसिडमध्ये लोकं स्वखुशीने उड्या मारायची. >>>ते फँटा होते. त्यामुळे लोक स्वखुशीने उड्या मारायचे. स्वामींनी हौदं खोदून पार्टीसाठी आणून ओतले होते. केशरी-गुलबट ॲसिड कुठे असते! Proud

योगी, पायस, श्रद्धा, स्वरूप, रमड धमाल लिहिलेय Lol सगळ्या लिंक्स हहपुवा.

धमाल चालल्लिय इथे. Happy

तेजा या चित्रपटामध्ये "बास पे खडा रहने से आदमी उंचा नही होता", "बचपन मे हर छिपकली का बच्चा सोचता हैं बडा हो के वो मगरमच्छ बनेगा!" असे भारी डायलॉग्ज मारणारा अमरीश पुरी आहे.
पण त्यातही घराला एवढ्या खिडक्या असूनही त्यातील स्त्रीला बरोबर ट्रॅप करून शिताफीने पकडणारा अमरीश पुरी यशस्वी होईल वाटत असतानाच शेवटी एका स्त्रीच्याच (सोनू वालिया) जाळ्यात अडकतो आणि शेवटी घात होतो.

योगी तुम्ही पोस्ट कदाचित गंमतीने लिहिली असावी
नाही हो रून्मेष सर.. सिरीयसली लिहीलेय. त्याकाळात रणजित, शक्तीकपूर वगैरे स्रीलंपट खलनायक बघून बरेचजण असले सिन्स पहायला जायचे. त्या सर्वांंना मोगँम्बोने चपराक लगावली आहे. मलाही कँबेरे नाही किंवा मोगँम्बोने काही चाळे केले नाहीत याचे वाईट वाटलेच होते पण माझ्या तसेच इतर बऱ्याच जणांच्या या असल्या मनोवृत्तीला मोगँम्बोने वेसण घातली. असा ध्येयवादी बॉस असल्यावर स्वामीनिष्ठ भक्त नसलतील तरच आश्चर्य.

धमाल धागा आहे हा. प्रतिसाद भन्नाट आहेत एकेक Lol वरती एकात त्रिनेत्र च्या लिंक वर क्लिक केले आणि स्क्रोल करून पाहिले तर हा सीन दिसला. टिप्पिकल आहे. त्या काळात व्हिलन (अंडरवर्ल्ड माफिया गुंड वगैरे) आपण "व्हिलन आहोत" हे माहित व्हावे म्हणून आपला प्लान प्रेक्षकांना अगदी तपशीलवार मोठ्याने बोंबलून सांगायचे. पुरी साहेब तरी याला कसे अपवाद असतील? बिचारे प्रेक्षकांना प्लान सांगायला गेले आणि तो धर्मेंद्रने ऐकला Lol तिथे अमरीश पुरीचा माणूस असतोच. तो धरमपाजीला खूप आधी पाहतो. पण पूर्ण प्लान सांगून झाल्यावरच तो धरमपाजीला पकडतो. मग काय? अमरीश पुरीच्या एव्हढ्याश्या एका चुकीवर पुढचा सगळा चित्रपट तोलला आहे. बोंबाबोंब Biggrin
https://youtu.be/swNHcNpGTEQ?t=749

मग दिग्दर्शक अजून एक संधी अमरीश पुरीला देतो धरमपाजी आणि त्याच्या बायकोला दोघांना मारण्याची. पण अमरीश पुरी तिथे सुद्धा चूक करतो. धरमपाजीला मारतो आणि त्याच्या बायकोला दरीत ढकलून मेली असेल असे समजतो:
https://youtu.be/swNHcNpGTEQ?t=979 (इथून पुढची अडीच तीन मिनटे मला वाटते आधीच शूट करून ठेवली असावीत. कोणत्या ना कोणत्या चित्रपटात उपयोगी येतील म्हणून)

>> 'डान्स डान्स डान्स' नामक पिक्चरात अमरीश पुरीने जीव गमावून घेतला आहे. यात तो इतका आहारी गेलाय की समोरची डान्सर सरला येवलेकर आहे याचाही त्याला फरक पडत नाही

Lol
मेरे दिल गाये जा ज़ू ज़ू ज़ूबी ज़ूबी ज़ूबी... हे गाणे चक्क सरला येवलेकर वर चित्रित केले आहे माहित नव्हते. बर सरला येवलेकर तर सरला येवलेकर. फक्त तिला पळवून न्यायचे ना. सगळ्या ग्रुप ला नेऊन मग बाकीच्यांना मारतो. प्लान अप्रूव केलाच कुणी हा मुळात? नॉट एफीशीएंट अप्रोच. वेस्ट ऑफ टाईम एंड एनर्जी. सगळ्यांना मारून झाल्यावर एकट्या राहिलेल्या सरला येवलेकर सोबत कॉमेडी करतो. इथे प्रेक्षकांनी चिडायचे कि हसायचे कि रडायचे हेच कळत नाही. मला तर बेजान हसू फुटले बुवा Trumpet वर जुबी जुबी जुबी वाजवताना बघून Biggrin
https://youtu.be/U1b0u0_4a7k?t=816

मोगॅम्बो हा त्यातल्या त्यात यशस्वी म्हणायला हवा कारण त्यात मोगॅम्बो हा स्त्रीच्या मागे किंवा एखाद्या कलेच्या मागे धावताना दिसला नाही. >>> अगदी अगदी. तेजा , डागा , Watson हे हवा हवाईच्या मागे लागले होते.

Trumpet वर जुबी जुबी जुबी >>> हो, ते एक रत्न आहेच. मुळात सोनेरी (ब्लाँड) केसांचा ठाकूर ही कन्सेप्टच गमतीशीर आहे. खरंतर या आख्ख्या पिक्चरवर एक धागा निघू शकेल इतकं पोटेन्शिअल आहे त्यात. पण अगदीच अस्थायी होईल म्हणून या सीनमधल्या पण काही काही गमती मी इथे लिहायच्या टाळल्या आहेत. उदा: पुरीसमोरचा येवलेकरचा डान्स आणि तिचे उसासे, दमल्यासारखी एक्स्प्रेशन्स वगैरे. काहीही टोटल लागत नाही. Proud

आयटेम गर्ल म्हणजे सरला येवलेकर का... किती तो सस्पेन्स... >>> सस्पेन्स कसला! सरला येवलेकर मराठी चित्रपटसृष्टीतली बर्‍यापैकी प्रसिद्ध नायिका होती. तिला आयटम गर्ल म्हटल्याने मात्र तिलाही जबरदस्त धक्का बसला असणार Proud

का कुणास ठाऊक असे ग्रूप डान्स पाहताना माझे लक्ष टीम लीडर पेक्षा मागे डान्स करणार्‍या प्रोग्रॅमर्स कडेच जास्त जाते व त्यांना किती पगार असेल, वेळेवर मिळत असेल का? ते सध्या काय करत असतील ? असे रँदम विचार मनात येतात.

अवांतराअबद्दल क्षमस्व !

का कुणास ठाऊक असे ग्रूप डान्स पाहताना माझे लक्ष टीम लीडर पेक्षा मागे डान्स करणार्‍या प्रोग्रॅमर्स कडेच जास्त जाते व त्यांना किती पगार असेल, वेळेवर मिळत असेल का? ते सध्या काय करत असतील ? असे रँदम विचार मनात येतात.

अवांतराअबद्दल क्षमस्व !
अवांतर चांगले आहे. ह्या लोकांवर बारीक लक्ष हवेच. कधी कधी हे लोकं स्टेप चुकतात. त्याचाही व्हिलन लोकांना त्रास होऊ शकतो.

अवांतर डास्न डान्स चित्रपटात शक्तीकपूरचे नाव "रेशम" आहे. शेवटी मिथूनचा डान्स बघून मलाच त्याला गोळी घालायची इच्छा होत होती. पण अमरिशपुरी त्याला गोळी घालतो. पण दुर्दैवाने "रेशम" शक्तीकपूर मध्ये पडून ती गोळी आपल्या अंगावर घेतो.

... डान्स चित्रपटात शक्तीकपूरचे नाव "रेशम" आहे....

जाड्याभरड्या गोणपाटाचे नाव रेशम ???? आऊट ऑफ ऑल थिंग्स !

कहाँ से लाते हैं ऐसी अलौकिक प्रतिभा ?

शक्ती कपूरचा एका निळ्या रेशमी वस्त्रातील सोफ्यावर तंगड्या पसरून झोपलेला फोटो खूप फेमस आहे. तो पाहता या नावात मला तरी काही गैर वाटत नाही.

शक्ती कपूरचा एका निळ्या रेशमी वस्त्रातील सोफ्यावर तंगड्या पसरून झोपलेला फोटो खूप फेमस आहे. तो पाहता या नावात मला तरी काही गैर वाटत नाही.

https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2Fim.indiatimes.in%2Fme...

काही दिवसांपूर्वी 'ये मेरा इंडिया' हे 'परदेस' चित्रपटातील गाणे ऐकत असतांना अचानक अमरीश पुरीची आठवण झाली, आणि मग त्याच्याबद्दल विकिपीडियावर माहिती वाचून काढली (खरतरं आधीही अनेकदा वाचली होती). त्यादरम्यानच योगायोगाने तुमचा लेखही आला. ह्यापूर्वी ह्या धाग्यावर चर्चा झाली का माहित नाही पण भारतातील सिनेमा क्षेत्रातील सर्वाधिक नामांकित 'फिल्मफेयर अवॉर्ड्स' च्या 'सर्वोत्कृष्ट खलनायक' ह्या श्रेणीत अमरीश पुरीला सर्वाधिक नामांकने (७) मिळाली (सौदागर (१९९२), तहलका (१९९३), दामिनी (१९९४), करन अर्जुन (१९९६), कोयला (१९९८), बादशाह (२०००), व गदर - एक प्रेम कथा (२००२)) आहेत. दुर्दैवाने त्यापैकी तो एकही अवॉर्ड जिंकू शकला नाही. 'फिल्मफेयर अवॉर्ड्स' ने 'सर्वोत्कृष्ट खलनायक' ह्या श्रेणीत १९९१ पासून अवॉर्ड सुरु केल्याने अमरीश पुरीला १९८७ साली प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर इंडिया' मधील 'मोगॅम्बो' ह्या अजरामर खलनायकी भूमिकेसाठी तो जिंकण्याची शक्यताच नव्हती. तथापि अमरीश पुरीचाच 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' ह्या श्रेणीत सर्वाधिक ३ फिल्मफेयर अवॉर्ड्स (मेरी जंग (१९८६), घातक (१९९७), व विरासत (१९९८)) जिंकण्याचा विक्रम आहे. त्याच्याशिवाय प्राण, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व अनिल कपूर हेही ह्या विक्रमाचे सहमानकरी आहेत.

कुतूहलाने चेक केले तर दिसतंय कि 1986 आणि 1987 ला फिल्मफेयर अवॉर्ड्स ऑर्गनाईझ केले गेले नव्हते म्हणे... मिस्टर इंडिया ला एकही अवॉर्ड नाहीय त्यामुळे...

धमाल धागा झलाय हा.
माझ्या डोक्यात लगेच '... bury कर दो' असा डायलॉग आला, पण अजगराला पन्स चे वावडे असावे.>>> Lol

त्याकाळात रणजित, शक्तीकपूर वगैरे स्रीलंपट खलनायक बघून बरेचजण असले सिन्स पहायला जायचे. त्या सर्वांंना मोगँम्बोने चपराक लगावली आहे. मलाही कँबेरे नाही किंवा मोगँम्बोने काही चाळे केले नाहीत याचे वाईट वाटलेच होते पण माझ्या तसेच इतर बऱ्याच जणांच्या या असल्या मनोवृत्तीला मोगँम्बोने वेसण घातली. असा ध्येयवादी बॉस असल्यावर स्वामीनिष्ठ भक्त नसलतील तरच आश्चर्य.>>>> योगी९०० Rofl

नफरत की आंधी - हिरोला अंडरएस्टिमेट करणे/हलगर्जीपणा

हा सिनेमा मस्ट वॉच लिस्टित जाण्यासाठी तो तिरंगा फेम मेहुलकुमारने बनवला आहे हे कारण पुरेसे ठरावे. पण आत्ता आपण फक्त व्हिलन अमरीश पुरीच्या असफलतेची कारणे अभ्यासूयात. यात व्हिलन एकदा सोडून दोनदा सपशेल अपयशी ठरला आहे - पहिल्यांदा सात वर्षे सश्रम कारावास (जो तो पूर्ण भोगतो) आणि दुसर्‍यावेळेस मरण.

प्रथम अपयश - यात व्हिलन आहे चंडीदास खुराना (क्योंकी हम हैं चंडीदास खुराना और दुश्मनों को खत्म करना हमारा उसूल हैं पुराना) आणि त्याचा भाऊ शक्तीदास खुराना (शक्ती कपूर). जितेंद्र इन्स्पेक्टर आणि धर्मेंद्र जनरिक गुंड सोनू दादा. जॅकच्या विनंती/मैत्रीखातर पाजींनी गुंडगिरी सोडली आहे. अशावेळेस चंडू (हे पाजींनी पाडलेले टोपणनाव) पाजींना पैशाची लालूच दाखवून आपला माल जॅकच्या कस्टडीतून सोडवून आणायला मदत मागतो. या संधीचा फायदा घेऊन पाजी जॅकच्या साथीने चंडूच्या अड्ड्यावर ट्रकभर पोलिस नेऊन त्याला रंगेहाथ पकडतात. कोर्ट त्याला सात वर्ष तुरुंगात टाकते. हिरोला अंडरएस्टिमेट केल्याने (शक्तिमान पहिलवान के खोपडी में बुद्धिमान दिमाग नही होता) तो पराभूत होतो.

दुसरे अपयश - तुरुंगातून सुटल्यावर चंडू पाजी व जॅक दोघांच्या मुलांना किडनॅप करून त्या बदल्यात मौल्यवान हिरे मागतो. क्लायमॅक्सपूर्व गडबडीत पाजींचा मुलगा कै. होतो आणि पाजी सुडाने पेटून उठतात. फायनल फाईटमध्ये अतिशय हुशारीने त्याने जॅकला बंदी बनवले आहे. पण पाजी अंडरएस्टिमेट/हलगर्जीपणा पुन्हा त्याच्या अंगाशी येतो.
पाजी चक्क त्याच्याच खुफिया अड्ड्यात त्याच्या नकळत पूर्वीच शिरून, तिथे रिमोट कंट्रोल्ड बाँब पेरून, रिमोटमध्ये नवीन सेल टाकून दबा धरून बसलेले असतात. योग्य वेळी बाँबस्फोट करून ते पारडे फिरवतात. शेवटी त्याला हेलिकॉप्टरमधून पळून जायची संधी होती पण तिथेही तो जॅकच्या मुलाला मारण्याच्या प्रयत्नात वेळ वाया घालवतो आणि पाजी त्याचा हेलिकॉप्टरसकट जाळून खातमा करतात.

धर्मेंद्र जनरिक गुंड >>> टोटल फुटलो इथे Lol

रिमोटमध्ये नवीन सेल टाकून >>> लोल

क्योंकी हम हैं चंडीदास खुराना और दुश्मनों को खत्म करना हमारा उसूल हैं पुराना >>> स्वतःची यमकात्मक ओळख करून देणे हा प्रकार गुंडाने यातून घेतला की उलटे याचा शोध लावायला हवा.

खास पायस टच!! हायपोथिसिस - मग त्याचं प्रूफ आणि शेवटी हेन्स प्रूव्हन!! एकदम ऑब्जेक्टीव्हली गोष्टी प्रूव्ह होतात Happy

मस्त लेख आणि प्रतिसाद Happy

शहेनशहामधेही शेवटी त्याने असाच वेडेपणा केला आहे. भर कोर्टात तो छताला लटकलेला असतो, दिवसाढवळ्या कामकाज सुरु असताना. मग जज, पोलीस आणी शेकडो लोकांसमोर त्याला सगळ्या गुन्ह्यांची कबूली द्यावी लागते. मग शहेनशहा बच्चन त्याच्या खांद्यावरच्या दोरीचा फास फेकून त्याला वर खेचून घ्यायला लागतो. मग पुरता वर देखील आला नसताना, एक पाय हवेत असतानाच तो चाकू काढून बच्चनला मारायला जातो. बधीरच आहे. एक तर समोर बच्चन, त्यात त्याचा एक हात लोखंडी. बर, एवढं करुन त्याला जरी मारला तरी नुकतीच गुन्ह्यांची कबूली दिल्यावर, जज पोलीस आणी शेकडो लोकांच्या साक्षीने त्याला मारुन काय मिळणार होते अमरीश पुरीला? मग काय, वार चुकवताना बच्चनचा नुसता धक्का लागून तो परत खाली पडतो आणी गळफास लागून तात्काळ मरुन जातो.

>> पुरता वर देखील आला नसताना, एक पाय हवेत असतानाच तो चाकू काढून बच्चनला मारायला जातो

कसलं भारी एक्प्रेशन. शिट्ट्याच पडल्या असणार Lol Lol आता इतक्या वर्षांनी असं वाटतंय वेळात वेळ काढून हे चित्रपट तेंव्हा पाहायला हवे होते. People like me missed the whole party.

>> नुसता धक्का लागून तो परत खाली पडतो आणी गळफास लागून तात्काळ मरुन जातो.

साऊंड इफेक्ट पण भारी आहेत....... आहूऊऊऊऊ... ह्ह्ह...अह्ह्ह..... Rofl

Pages