अमिताभ - टॉप टेन

Submitted by स्वाती_आंबोळे on 6 October, 2022 - 13:56

बच्चन ऐंशी वर्षांचा होणार यंदा?!
सोशल मीडियावर बच्चन मेनिया कशाबद्दल सुरू आहे ते शोधल्यावर कळलं!

इथे बरेच (सगळेच?) बच्चन फॅन्स आहेत. तुम्हाला पहिली लागण कशी झाली बच्चनची ते आठवतं का? म्हणजे प्रथम कुठला चित्रपट पाहिला असं नव्हे, प्रथम 'अरे, हे भारी प्रकरण आहे' असं कधी वाटलं?

मला प्रयत्न करूनही आठवत नाही, जणू ते कायमच माहीत होतं.

आमच्या चाळीत दिवाळीच्या शेवटी प्रोजेक्टर वगैरे आणून सिनेमा बघायचा कार्यक्रम असायचा. तो सिनेमा कायम अमिताभचाच असायचा. (बहुधा 'डॉन'च असायचा नेहमी वाटतं! Proud ) . त्यात बहुधा प्रथम पाहिलं असावं बच्चनला. 'डॉन का इंतजार', 'नीचे तुम्हारी आँटी बहुत सारे अंकल्स को लेकर आयी है' वगैरेवर क्राउडबरोबर नेमाने टाळ्या पिटल्याचंही आठवतं.

पण अमिताभ ही व्याधी कधी जडली ते काही आठवत नाही.

तुम्हाला आठवत असेल तर सांगा - वाचायला आवडेल. Happy

त्याबरोबरच तुमच्या टॉप टेन फेव्हरिट अमिताभ मोमेन्ट्सही लिहा. डायलॉग, एक्स्प्रेशन, अ‍ॅक्शन, काहीही.

या माझ्या (नॉट इन एनी पर्टिक्युलर ऑर्डर) :

१. चुपके चुपके : परिमल बनून असरानीच्या घरी राहायला जातो आणि जया भादुरीला बघताच प्रेमात पडतो. जात्या सत्प्रवृत्त माणूस, सोंग उघडं पडेल या भीतीने सतत टेन्शनमध्ये असतो. ते एक फार प्रचंड भारी सुंदर पंक्चरलेलं हसू हसत 'हॅ हॅ हॅ, गाना तो आप को सुनाना ही पडेगा' म्हणतो ते बघून मला दर वेळी फुटायला होतं! सिनेमा भाषेच्या गमतीजमतींचा आहे, आणि नखशिखांत गुलजारचाच आहे, पण अमिताभ हा प्रसंग खिशात घालतो!

२. नमक हराम : यूनियन लीडरने अपमान केला त्याबद्दल राजेश खन्नाला सांगताना संतापाने अक्षरश: डोळ्यांत पाणी आलेला बच्चन. तो रोलच खराखुरा अ‍ॅन्ग्री यंग मॅनचाच आहे. त्याच किंवा बापाला हार्ट अटॅक आल्याचं कळतं त्या प्रसंगात त्याबद्दल बोलताना 'ही इज अ ब्लडी… ही इज अ ब्लडी…' याच्यापुढे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही रागाने!

३. त्रिशूल : तो 'एक सेकंद के लिये लगा मेरा अपना खून है'वाला सगळाच प्रसंग! बापाबद्दलचा राग, सूडबुद्धी एकीकडे आणि त्याने आणि गीता सिद्धार्थने सहज कौटुंबिक जिव्हाळ्याने त्याच्या जखमी हाताची शुश्रुषा केल्यावर एकदम डिसार्म होणं दुसरीकडे! त्या सगळ्या संमिश्र भावना एकाच वेळी चर्येवर दिसत असतात! अफाट!

४. शोले : कितीतरीच प्रसंग - लिस्ट करणं अवघड होईल. 'बहुतों को इन्होंने दो घंटों में सिखा दिया है', 'तो शादी के बाद तेरे घर मुझे आया की नौकरी मिलनेवाली है' हे नेहमी आठवल्या जाणार्‍या 'तो मैं ये रिश्ता पक्का समझूँ?' किंवा 'पहली बार सुना है ये नाम'वगैरेंव्यतिरिक्त. प्रत्येक संभाषणात जी 'पते की बात' असते ती तो बोलतो किंवा विचारतो! त्या अनुराधा चोप्राच्या पुस्तकात वाचलं होतं की सेटवर बसून सलीम जावेद डायलॉग्ज ऑन द फ्लाय लिहीत होते. तसं असेल तर हे कॅरेक्टर बिल्डिंग किती भारी आहे ते आणखीनच जाणवतं.

५. शक्ती : तो स्मिता पाटीलच्या घरी राहात असताना राखी त्याला 'घरी चल' म्हणून भेटायला येते तो सगळाच प्रसंग. तो आपण एका मुलीबरोबर राहातो हे आईला कसं सांगायचं म्हणून इतका अवघडून जातो की ज्याचं नाव ते! 'वो वहाँ उस का कमरा - वहाँ वो जाने, उस का काम जाने; मैं यहाँ ये अपना… अलग…'

६. दीवार : मारामारीत कशाला पडलास म्हणून निरुपा रॉय त्याला ओरडत असते तेव्हा तिच्याकडे रोखून बघत फक्त 'तो क्या मैं भी भाग जाता?' इतकंच विचारतो! ते 'भी' ठासूनसुद्धा म्हणत नाही, गरजच नसते! ती त्या संपूर्ण कुटुंबाची सगळ्यात दुखरी नस असतेच. ऐकून तिच्या वर्मावर आघात होतोच, पण ते म्हणताना त्यालाही तितकाच त्रास होत असतो!

७. पुन्हा दीवार : शशी कपूरला पोलिस ट्रेनिंगसाठी सोडायला स्टेशनवर जातात तेव्हा तिथे नंतर नीतू सिंग येते. शशी कपूर दोस्त म्हणून ओळख करून देतो, पण अमिताभ काय ते समजतो आणि आईला घेऊन शिस्तीत तिथून कटतो. मग हळूच मागे येऊन शशी कपूरच्या कानात 'अच्छी है' म्हणून सांगून जातो.

८. डॉन : लता चांगली गाते हे आपल्याला माहीत असतंच, पण इतर कोणी तिची गाणी गायलेली ऐकली की ती चांगली म्हणजे किती चांगली होती ते नीटच कळतं तसं माझं शाखाचा डॉन बघताना झालं! 'मुझे उसके जूते पसंद नहीं'चं 'हॅहॅहॅहॅ शूज' झालेलं ऐकवेना!

९. काला पत्थर : राखी काहीतरी बॅन्डेज वगैरे आणायला दुसर्‍या खोलीत जाते तेव्हा तिच्या टेबलावर उपडं घातलेलं पुस्तक न राहवून उचलून बघतो तो सीन.

१०. त्याच्या आवाजात ऐकलेल्या नज्म/कविता! 'कल नयी कोपलें फूटेंगी', 'मैं और मेरी तनहाई', इ.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर!! बच्चन चं व्यसन कधी जडलं ते सांगता येत नाही. लहान असताना तो एकटाच भावायचा. कदाचित अगदी नुसतं 'ढिशुम ढिशुम' साठी सुद्धा असेल, पण बाकी ढिशुम ढिशुम वाले सुद्धा होतेच की....पण अमिताभसारखी 'बात' इतरत्र कुठे 'ज़मी नहीं'. अमिताभ स्क्रीनवर असला कि इतर कुणाकडे लक्षच जात नसे. त्या ब्रह्मास्त्र वगैरे मधे कुणीतरी सब-व्हिलनच्या ही हाताखालची मंडळी बच्चन ला जायबंदी करताना पाहिलं की 'हाय गे उज्जैनी' होतं. अरे, खर्या-खुर्या (म्हणजे मुक्ख्य) व्हिलन्सच्या फौजेला एकहाती नामोहरम करणारा, गब्बरच्या आक्ख्या फौजेला एका रिव्हॉल्व्हरच्या सहाय्यानं पुलाच्या 'उस पार' रोखणार्या बच्चन ला कुणीतरी व्हीएफएक्स च्या जोरावर रोखावं? छे छे!

वरच्या लिस्टीत बरीच भर घालण्यासारखी आहे. जसं जमेल तसं;

त्रिशूल च्या त्या 'एक सेकंद के लिये मुझे लगा के मेरा अपना ही खून हैं' इतकाच, बच्चनचं कॅरेक्टर 'बयाँ' करणारा आणखीन एक सीन म्हणजे अँब्युलन्स चा. काय तो कॉन्फिडन्स!!!

काला पत्थर मधला तो, 'व्हाय डोन्ट यू अंडरस्टँड?' वाला सीन.

शोले: आक्खा (आक्खा मसूर सारखा)!! हेमाच्या 'जब तक हैं जान' गाण्यानंतर ची त्याची ती एंट्री आणि 'अगर किसीने हिलनेकी कोशिश किं, तो भूनके रख़ दूंगा' - फुल्ल टू मसीहा!

डॉन (परत आक्खा), दीवार (आज खुश तो बहुत होंगे तुम), जंजीर (जब तक बैठने को ना कहाँ जाए), शान (बरेच, तो लडकी, गाडी वाला सीन, परवीन बाबीबरोबर हाराच्या चोरीनंतरचा सीन)......अमर अकबर अँथनीतला साक्षात आचरटपणा (पण तरिही तो फादर च्या खुनानंतरचा चर्चमधला सीन), अभिमानमधला जेलस नवरा (आणि परिवर्तन), बासू चटर्जी / ऋषिकेश मुकर्जीच्या सिनेमांतले कॅमिओ, बावर्चीची टायटल्स, लगानमधलं 'और फिर उस ऐतिहासिक दिन की सुबह हुई'..... द लिस्ट गोज ऑन अँड ऑन...

लता, अमिताभ आणी सचिन ह्यांना पर्याय नाही.

वा वा! या पानवरचे सगळ्यांचे सगळेच नंबर आवडणार आहेत Happy
शक्तीमधला अजून एक आवडणारा सीन म्हणजे राखी च्या मृत्यूनंतर अमिताभ दिलिप कुमार ला भेटतो तेव्हा. दोघांतले नाते संपलेले असते केव्हाच पण राखी हाच एक समान धागा असतो. तिच्या जाण्याचे दु:ख दोघांना एक क्षण भर(च) जोडते. काहीच डायलॉग नाहीये तेव्हा. अमिताभ नुस्ताच खाली बसून दिलिप कुमार च्या हातावर हात ठेवतो आणि दोघांचे चेहरेच तेवढे बोलतात! फार भारी!

>>> जंजीर (जब तक बैठने को ना कहा जाए)
>>> शक्तीमधला अजून एक आवडणारा सीन म्हणजे राखी च्या मृत्यूनंतर अमिताभ दिलिप कुमार ला भेटतो तेव्हा

येस येस, हे माझेही!

वरील सगळेच आवडणारे, पण अमिताभ हा 'अमिताभ' आहे हे दाखवणारे Happy
मला त्याचा 'सौदागर' मधला ग्रे शेड असलेला नायक अतिशय आवडला. नूतनच्या बरोबरीने त्याने अभिनय केला आहे.

"येस येस, हे माझेही!" - ह्या वाक्यासाठी एक मॅक्रो किंवा इमोजी बनवून घ्यायला हवा कारण ह्या धाग्यावर हे बरेचवेळा होणार आहे.

थॅंक यू. थँक यू. बाफ काढल्याबद्दल आणि वरच्या सर्व पोस्टींबद्दल.

अशा टॉप अमुक लिस्ट आल्या की एकदम मोठ्या कारकीर्दीचा आढावा घेउन प्रत्येक फेज मधल्या गोष्टींचे प्रतिनिधित्व हवे वगैरे असे काहीतरी वाटू लागते. ते नंतर कधीतरी करू. सध्या जे एकदम डोक्यात येत आहे ते. वरती ऑलरेडी बरेच येउन गेले आहेत पण हे त्याव्यतिरिक्त.

१. पहिली एण्ट्री जंजीरचीच हवी. "ये पुलिस स्टेशन है..." वाला सीन फेमस आहेच. पण हा तो नंतरचा सीन. इथे अमिताभचा "बच्चन" झाला. पुढे कायम दिसलेली स्टाइल इथे पहिल्यांदा दिसली. तोपर्यंत अनेक पिक्चर्स आपटलेला, विशेष व्यक्तिमत्त्व नसलेला, लुकडा आणि नुसताच उंच अमिताभ इथे फ्रेम व्यापून टाकणार्‍या प्राण च्या फुल फॉर्म मधे असलेल्या व्यक्तिरेखेसमोर उभा आहे. पण इथे त्याच्या नजरेत ती खुन्नस, तो माज दिसू लागतो. नंतर त्याने ते आणखी डेव्हलप केले. पण सुरूवात इथे झाली.

२. १९७७. बच्चन ऑलरेडी सुपरस्टार च्या लेव्हला पोहोचलाय. पण पब्लिकला तो धुमसता, घुमा, अँग्री यंत मॅन म्हणून माहीत आहे. जबरी डॉयलॉग्ज मारणारा पण एकूण कमी बोलणारा. गाणी बिणी तर नाहीतच. इथे मनमोहन देसाईने त्याला माणसाळवला. "आपुन थोबडे से फंदेबाज लगता है, पण अपुन है नही" पासून जी काही त्याने धमाल उडवली आहे त्याला तोड नाही. या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधली त्याची संवादफेक उच्च दर्जाची आहे. विनोदी सीन्सना फार कमी वेळा सिरीयसली घेतले जाते अभिनयाचा दर्जा बघायला. पण मला वाटते इथला अमिताभ टॉप क्लास आहे. जरी तो सरळ सीनच्या मधे प्रेक्षकांशी बोलतो Happy

३. कल नयी कोपले फूलेंगी! साहिर आणि बच्चन हे कॉम्बो अजून खूप वेळा यायला हवे होते. नंतर स्टेजवर "मै पल दो पल का शायर" गातानाची त्याची कसलेही अ‍ॅण्टिक्स नसलेली अदाकारीही भारी आहे.

४. डॉन चा डिग्निफाइड स्मगलर. या सीन बद्दल अनेकांनी अनेक वेळा लिहीले आहे. अजून काय लिहीणार. पण मला यात आवडते ती त्याची बॉडी लॅंग्वेज. ७० मधले कोणतेही अ‍ॅक्शन हीरोज डोळ्यासमोर आणा. समोरच्यांनी पिस्तूल काढल्यावर काय अचाट हरकती लोक करत. इथे फक्त किंचित अवघडलेली प्रतिक्रिया आहे. एखादा असले प्रसंग कोळून प्यायलेला स्मगलर असेच काहीतरी करेल.

५. त्रिशूल मधली एण्ट्री. बच्चन ब्रॅण्ड फेमस होत होता तेव्हाच्या सुरूवातीच्या पिक्चर्स मधे त्याची एन्ट्री एकदम लो प्रोफाइल असे. जंजीर, दीवार, शोले, काला पत्थर - कोठेच खास एण्ट्री सीन बनवला आहे असे नाही. त्रिशूल मधेही वरकरणी हा ग्लॅमरस सीन नाही. पण बच्चनच्या स्टाइलमुळे तो बनला. त्याचे एण्ट्री सीन्स आवर्जून लिहीले जाऊ लागले ते बहुधा डॉन पासून.

६. लंबी रेस का घोडा. अमिताभच्या अनेक आवडत्या सीन्स पैकी बहुधा हा माझा सर्वात आवडता सीन आहे.

७. १९७९. गोलमाल. या काळात म्हणे मुंबईत एकाच वेळी अमिताभचे त्रिशूल, डॉन, कस्मे वादे, मुकद्दर का सिकंदर व इतर २-३ पिक्चर्स जोरात चालत होते. त्यावर्षी फिल्मफेअर मात्र गोलमाल घेउन गेला. पण यात अगदी जेमतेम दोन सेकंद असलेला अमिताभचा कॅमिओ धमाल आहे. अमोल पालेकरचे स्वप्नरंजन सुरू असते की तो सुपरस्टार झालेला आहे आणि अमिताभचे मार्केट त्याने डाउन केले आहे. प्रत्यक्षात सुपरस्टार असलेल्या पण इथे फुटपाथवर डोक्यावर हात ठेवून बसलेल्या अमिताभने १९७९ साली पब्लिकला काय हसवले असेल याची फक्त आपण कल्पना करू शकतो.

८. मुकद्दर का सिकंदर. बच्चनचा माझा सर्वात आवडता रोल. इथल्या एण्ट्रीचा लीड-अप आणि ते गाणे. असे ऐकले आहे की पुण्यात "मंगला" मधे रात्री ९ च्या शो ला भरपूर कट्टर बच्चन प्रेमी असत आणि या गाण्याला शिट्ट्या व नाणी यांचा कल्ला चाले.

९. शान मधला हा अ‍ॅक्शन सीन. ८०ज च्या सुरूवातीचे त्याचे जे पिक्चर्स होते त्यातील एक टीपिकल भन्नाट अ‍ॅक्शन. दरवाज्याजवळ गेल्यावरचा त्वेष बघा. ब्लडी सिरीयस.

१०. मि. नटवरलाल. हा सगळा सिक्वेन्स धमाल आहे. सलीम-जावेद, सिप्पी, चोप्रा वगैरेंनी अमिताभला लोकप्रिय केल्यानंतर आलेल्या काही पिक्चर्सपैकी हा एक. ऑटाफे सीन आहे.

हे सगळे पहिल्या इनिंग मधले. खरा बच्चन तो हाच. नंतरच्या इनिंगमधेही काही आहेत. १० स्पेसिफिक सुचले तर लिहीन.

>>> "येस येस, हे माझेही!" - ह्या वाक्यासाठी एक मॅक्रो किंवा इमोजी बनवून घ्यायला हवा

म्हणजे ‘मिलाओ हाथ’ असा? :
D6A90BF5-3A4E-4096-98FB-EFE0D7D6FF6B.jpeg

फा, लिंक्स बघते होतील तशा. ती जंजीरमधली क्लिप आहे त्यात चालत येताना त्याचे डोळे काय दिसतात!
प्राणही आधी 'कोण आहे' म्हणून कुतुहलाने पाहतो आहे आणि कोण ते लक्षात आल्यावर इन्ट्रीग होऊन ओठांच्या कोपर्‍यात जाणवेल न जाणवेल असं हलकं स्माइल करतो ते भारी आहे!
पुन्हा बघायला हवा जंजीर!

मला पोलीस स्टेशनमध्ये जया भादुरीला दंडाला धरून ओढत नेऊन ती मुलांचं कलेवरं दाखवतो तो एक सीन अगदी डोक्यात बसलेला आहे. काय त्वेष!

अमिताभ हा 'अमिताभ' आहे हे दाखवणारे >> ह्यावरून आठवलं, मला अमिताभ हा 'अमिताभ' आहे हे कळायला काही वर्षं लागली. त्यापूर्वी मी लहानपणी त्याला 'अमिता' बच्चन म्हणायचो. आमच्या घरी एक अमिता बच्चन चमचा होता. बोर्नव्हिटाच्या उंच बाटलीत तळाशी, पावसाळ्याच्या दिवसात दगड झालेली पावडर खरवडून काढायला उपयोगी पडायचा.

त्या चमच्याच्या नावाचा मालक हा एक उंच असा अभिनेता आहे असा कधीतरी शोध लागला. त्याने सिनेमात केलेली फायटिंग आवडू लागली. तेव्हा अजून शोले बघायचा होता. लहानपणी भावाभावात किंवा मित्रामित्रात एक शशी, एक अमिता अशी नावं ठरवून आपसातच मारामारी व्हायची. तेव्हा आम्हाला मारामारी करू नका हे सांगायचं सोडून 'अरे तो अमिता नाही, अमिताभ आहे' असे व्याकरणाचे धडे मोठ्यांनी दिले.

सुरुवातीला त्याचे सगळेच मारामारीचे सिनेमे आवडायचे. टिव्हीवर अभिमान लागला होता तो घरच्यांना का आवडला हे तेव्हा कळत नव्हतं. जसं कळायला लागलं तसं त्यातली मजा उत्तरोत्तर वाढत गेली. सिनेमांच्या बाबतीत वरील सर्वांशी सहमत. मी उल्लेख करेन तो सरकार चा. पोक्त अमिताभला आतापर्यंतची सर्वात जास्त योग्य वाटेल अशी ती भूमिका होती, अशी माझी धारणा आहे.

फेफ मजा आली लिन्क्स दिल्यामुळे! काही काही सिनेमे पुन्हा बघायला हवेत असे वाटले Happy

खरय , सगळ्याच पोस्ट्सना +११११११
फा ने दिलेल्या लिंक्स फार भारी आहेत, प्रत्येक वेळी तितकीच मजा येते !
आय मिस ओल्ड बॉलिवुड , मसाला फिल्म्स , अँग्रीयंग मॅनचा स्वॅग, व्हिलन सारखे दिसणारे व्हिलन्स इ. Happy

अरे वा अमिताभवर धागा.

लहानपण व्यापून टाकणारा, भारून टाकणारा आणि मनावर अजूनही राज्य करणारा माणूस.

तो परवानात व्हिलन म्हणूनही आवडला होता. सौदागर मध्येही आवडला होता. टॉप टेन नाही सांगता येणार. तो असला की फक्त तो, एक आनंद सोडून, तिथे राजेश खन्नाची दखल घ्यायलाच हवी. एरवी अमिताभ असला की अमिताभ अगदी चुपके चुपकेतही तोच, शोलेतही तोच. इतर अनेक अगदी आवडते कलाकार सोबत असूदेत, भारुन टाकणारा फक्त तोच.

बरेच पिक्चर गणेशोत्सवात पडद्यावर बघितले आहेत आणि टीव्हीवर. थिएटरमधे शोले, नसीब, तो एक हेमामालीनी आणि रजनीकांत वाला, सिलसिला, अजून काही असतील थोडे, असे हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे बघितले.

शतायुषी भव या शुभेच्छा त्याला.

“म्हणजे ‘मिलाओ हाथ’ असा? :” - येस्स!! पर्फेक्ट!!

“फेफ मजा आली लिन्क्स दिल्यामुळे” - नामसाधर्म्यामुळे कधी कधी फायदा होतो, तो असा. Wink (थँक्स फा Happy )

Lol गुस्ताखी चा प्रॉब्लेम नाही पण मी फेफने आणखी कोणत्या लिन्क्स टाकल्या ते बघायला गेलो व मला फोमो आला. (फ च्या बाराखडीतील चार अक्षरे झाली इथेच Happy )

मला आधी वाटायचं, अमिताभ काही आपल्याला तसा आवडत नाही. आपण बरे आणि आपला संजीवकुमार बरा. स्टार अभिनेता म्हणून विनोद खन्ना
अमिताभची लागण झाली केबीसी पाहताना. तिथे तो माणूस म्हणून जसा दिसला , त्यामुळे त्यांचे सिनेमे पाहतानाची नजरही बदलली. म्हणजे आधी त्याचे सिनेमे नको असं काही नव्हतं. पण आवडते सिनेमे , अभिनेता कोण म्हटल्यावर त्याचं काम येत नसे.
टॉप टेन असं नाही , पण लक्षात राहिलेले पडद्यावरचे क्षण.
बेनाम आणि मजबूर हे दोन चित्रपट डोक्यात घुसलेले आहेत. मजबूर मध्ये त्याला रस्ता ओलांडताना चक्कर येते ते शेवटी जखमी प्राणसाठी डॉक्टरला आणतानाचं ड्रायव्हिंग आणि तो अख्खा क्लायमॅक्सचा सिक्वेन्स. परवीन बाबी किती गोड होती!
बेनाममध्ये संकट आपल्या घरी येऊन ठेपल्याचं कळल्यावर प्रोटेक्टिव्ह भावनेतून आलेलं agression. शेवटचा रेल्वे स्टेशनवरचा पाठलागाचं सीन आला तेव्हा कोणीतरी हे तर चर्चगेट स्टेशन असं म्हणालं होतं हे प्रत्येक वेळी आठवतं.
मिलीमध्ये तो त्या सोसायटीत राहायला येतो तिथपासून प्रेमात पडण्यापर्यंतचा सिनेमा त्याचाच आहे.
आनंदमध्ये रमेश देवच्या क्लिनिकमध्ये बसलेला असताना दिलेल्या नि:शब्द प्रतिक्रिया आणि शेवटी रेकॉर्ड संपल्यानंतरचा outburst.
ज्वालामुखी फुटल्यानंतरचा असा अभिनय तोच करू जाणे.
तसंच निद्रिस्त ज्वालामुखीतली खदखदही. आलापमधले ओमप्रकाश सोबतचे तणावाचे प्रसंग. त्यात तो सायकल रिक्षा चालवतो आणि बापच पॅसेंजर होऊन बसतो .
त्यातलं वहिनीसोबतचं एक गाणंही तो आहे म्हणूनच फिट होतं.

नटवरलाल -मेरे पास आओ या गाण्यात किती रंग आलेत! कौतुकाने ऐकणारी , पाहणारी रेखा हाही.
अमरकडून मार खाणारा अॅंथनी.
चीनी कम. अमिताभ , तबु आणि ती आगाऊ चिमुरडी.

सिलसिला मात्र अजिबात आवडत नाही. रंग बरसे हे गाणं तर बीभत्स रसातलं वाटतं आणि धुळवडीला कोणी ना कोणी मोठ्याने वाजवतं त्यामुळे ऐकावंच लागतं.

गायक अमिताभ आवडत नाही, रंग बरसे तर एकदम बेकार.

कविता छान म्हणतो, विशेषतः हरिवंशराय यांच्या, फार सुरेख.

भारी!
सगळ्या पोस्ट ना सगळ्या सिनेमांना मम!
मला आखरी रास्ता पण खुप आवडतो.
Don तर फेव्ह

आनंदमध्ये रमेश देव घ्या क्लिनिकमध्ये बसलेला असताना दिलेल्या नि:शब्द प्रतिक्रिया आणि रेकॉर्ड संपल्यानंतरचा outburst.
ज्वालामुखी फुटल्यानंतरचा असा अभिनय तोच करू जाणे. <<< ++

हे फार भावतं

>>>>>>>. त्याच्या आवाजात ऐकलेल्या नज्म/कविता! 'कल नयी कोपलें फूटेंगी', 'मैं और मेरी तनहाई', इ.
वडीलांच्या कविताही त्याने जबरदस्त गायलेल्या आहेत काय फेक (मराठी अर्थ) आहे आवाजात. - 'मधुशाला' ची कडवी, 'कोशिश करनेवालोंकी हार नही होती' - हे हरिवंशराय यांचे आहे की नाही ते मात्र आठवत नाही. 'मै और मेरी तनहाई' तर मस्तच.
कल नई कोंपलें फूटेंगी, कल नए फूल मुस्काएंगे
और नई घास के नए फर्श पर नए पांव इठलाएंगे
वो मेरे बीच नहीं आए, मैं उनके बीच में क्यों आऊं
उनकी सुबह और शामों का मैं एक भी लम्हा क्यों पाऊँ

या ओळी अत्यंत आवडीच्या आहेत. अ-त्यं-त!!! प्रत्येक ययातीने वाचाव्यात अश्या.

डॉन
अग्निपथ
त्रिशुल
शोले
दिवार
शक्ति
नमक हराम
अभिमान
सिलसिला
अमर अक्बर अ‍ॅन्थनी
मे आझाद हु
खुदा गवाह
आंखे
हम

अ‍ॅन्ड ऑन अ‍ॅन्ड ऑन अ‍ॅन्ड ऑन

टॉप टेन : बडी नाईंसाफी है यह

>>>>>>>>>नटवरलाल -मेरे पास आओ या गाण्यात किती रंग आलेत! कौतुकाने ऐकणारी , पाहणारी रेखा हाही.
अगदी अगदी!!
मला आवडलेला प्रसंग नाही आठवत परंतु 'मै और मेरी तनहाई' मधील त्याचे प्रेमात आकंठ भिजलेले रुप फार छान आहे. ते लव्ह आहे. तर भरत यांनी उल्लेख केलेले 'रंग बरसे' फक्त लस्ट आहे.

'रंग बरसे' ला मी अगदी बीभत्स नाही म्हणणार तो शृंगार रसच आहे फक्त तामसिक शॄंगार आहे - राक्षस विवाह म्हणतात ना तश्या प्रकारचा असुरी!

Pages