भारताचा सामरिक तळ?

Submitted by पराग१२२६३ on 1 October, 2022 - 08:54

येत्या 8 ऑक्टोबरला भारतीय हवाईदलाच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं.

सुमारे पावणेसहा कोटी लोकसंख्या आणि सुमारे 40 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या मध्य आशियाचे स्थान भू-राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे. त्यामुळं सोव्हिएट संघाच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या मध्य आशियातील देशांशी संबंध विकसित करण्यात भारताप्रमाणेच अनेक देशांनी पुढाकार घेतला. वेगाने आर्थिक विकास करणाऱ्या भारतासाठी राष्ट्रीय तसेच ऊर्जा सुरक्षेच्या तसेच आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिकदृष्टीनेही मध्य आशियाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच त्याच्याशी लष्करी सहकार्य वाढविण्याचा आणि त्याद्वारे आपल्या सामरिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी भारताने हालचाली सुरू केल्या. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 2003मधील ताजिकिस्तानचा दौरा त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरला होता. त्यावेळी ताजिकिस्तानची अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा आणि पाकव्याप्त काश्मीरशी असलेली भौगोलिक जवळीक लक्षात घेऊन त्याच्याशी भारताने `संरक्षण सहकार्य करार' केला होता. त्याचबरोबर ताजिकिस्तानात भारताचा परकीय भूमीवरील पहिलावहिला हवाईतळ स्थापन करण्यासाठी भारत-ताजिकिस्तान-रशिया असा त्रिपक्षीय करार झाला होता. त्या करारानुसार ताजिकिस्तानातील ऐनी येथील हवाईतळाचे पुनरुज्जीवन करून भारत तिथं आपली लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात करणार होता. हा तळ ताजिक राजधानी दुशान्बेपासून 15 किलोमीटरवर वसलेला आहे. तिथे आपली `मिग-29' स्वनातीत (सुपरसॉनिक) बहुपयोगी लढाऊ विमाने आणि काही हेलिकॉप्टर तैनात करण्याची भारताची योजना होती.

भारताच्या `सीमा रस्ते संघटने'ने (Border Road Organisation) या तळावर विमानांच्या देखभालीसाठीचे हँगर बांधले आहेत. भारताने 2007मध्ये या तळाची पुन:उभारणी पूर्ण केली. मात्र त्यानंतर या तळावर लढाऊ विमानं तैनात करण्याची परवानगी दुशान्बेकडून भारताला मिळालेली नाही. ती परवानगी मिळावी यासाठी नवी दिल्लीकडून दुशान्बेकडे वरचेवर पाठपुरावा करण्यात येत आहे. माजी उपराष्ट्रपती महंमद हामीद अन्सारी यांच्या एप्रिल 2013मधील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै 2015 मधील आणि माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या 2018 मधील दौऱ्यांच्या वेळीही या तळाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जाते. कोविंद यांनी तर या तळाला प्रत्यक्ष भेटही दिली होती. सध्या ताजिकिस्तान आणि रशिया संयुक्तपणे या तळाचा वापर करत आहेत. रशियाला मध्य आशियातील आपलं अस्तित्व अधिक बळकट करायचं असल्यामुळं ऐनीच्या तळावर रशियन लढाऊ विमानं तैनात करण्यासंबंधी दोन्ही देशांमध्ये सहमती झालेली आहे.

2003 मधील त्रिपक्षीय करारानुसार सध्या ऐनीच्या तळावर भारताचे शंभर लष्करी अधिकारी आणि जवान तैनात असले तरी ते प्रामुख्याने ताजिकिस्तानाच्या लष्करी दलांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. तसंच ताजिकिस्तानातील कुरघोंतेप्पा (Qurghonteppa) इथं भारताने अद्ययावत `India-Tajikistan Friendship Hospital' उभारले असून तिथे भारतीय भूदलाच्या वैद्यकीय सेवेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून ताजिक लष्कर आणि आसपासच्या परिसरातील सामान्य जनतेची शुश्रुषा केली जात आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक साधनसामग्रीची मदत जुलै 2022 मध्ये भारताने पाठवली आहे. काही वर्षांपूर्वी ताजिकिस्तानच्या विनंतीवरून त्याला भारताने दोन एमआय-17 हेलिकॉप्टरही पुरविली आहेत. याआधी अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता बळकाविल्यानंतर त्या विरोधात लढणाऱ्या अहमद शाह मसूदच्या Northern Alliance च्या लढवय्यांसाठी भारताने ताजिकिस्तानातील फारखोरच्या हवाईतळावर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती.

ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकेच्या आणि नाटोच्या अन्य सदस्यांच्या फौजा अफगाणिस्तानातून माघारी जात असताना तिथं अतिशय गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यावेळी भारताने हवाईदलाच्या विमानांमार्फत आपल्या नागरिकांची सुखरुप सुटका केली होती. त्यासाठी ताजिकिस्तानातील ऐनीच्या विमानतळाचा वापर केला होता. मात्र त्यावरून अनेक भारतीय माध्यमांमधून तेथील भारतीय हवाईदलाच्या गुप्त तळाविषयीच्या चर्चा घडल्या होत्या. त्या चर्चांमध्ये जे काही दावे केले गेले होते, त्यात तथ्य दिसत नव्हते. अर्धवट माहितीवर ते संपूर्ण वृत्तांकन आधारलेलं दिसत होतं.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2022/10/blog-post.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users