तुमच्या मनातील / स्वप्नातील प्राथमिक शाळा कशी असेल?

Submitted by निवांत पाटील on 27 September, 2022 - 13:01

आमच्या गावातील प्राथमिक शाळेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. (भारत स्वतंत्र झाल्यावर बहुतेक ती जिल्हा परिषदेकडे आली असावी). माझे वडील याच शाळेत शिकले आहेत. तर या निमित्त या शाळेचे बरेच माजी विद्यार्थी जमले होते आणि सर्वानी ( गावकर्यांनी देखील ) शाळेच्या सुधारीकरणासाठी काही देणगी जमा करायला सुरवात केली. हे काम सध्या सुरु आहे. यातले माझ्याकडे आलेले काम पूर्णपणे शैक्षणिक / क्रीडा संदर्भातील आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचा पथदर्शी प्लॅन करायचा आहे. विद्यार्थी संख्या पहिली ते सातवी २१० आहे. शिक्षक संख्या ७ आहे.

शाळा शतक महोत्सवी यशोगाथेतील मुद्दे:
*शाळेची स्थापना सोमवार दिनांक १९/९/१९२१ इ रोजी झाली.
*शालेय दप्तर नोंदीवरून शाळेचा पहिला विद्यार्थी नाडगौडा यलगौंडा पाटील होता.
*शाळा स्थापनेच्या वेळी शाळेत ५५ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती.
*सन १९२९-३० मध्ये शाळेची पहिली विद्यार्थिनी गुणवंती कुसाबाई जोगतीण हिची नोंद झाली.
*स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजे १९४७ पूर्वी ४९ मुली व३०७ मुले एकूण ३५६ मुलांनी शिक्षण घेतल्याची शालेय दप्तरी नोंद आहे.
*शालेय दप्तरावरून पहिले शिक्षक श्री सदाशिव सिताराम वरपे रा.अंबप ता हातकणंगले हे होते.
*सन १९५७ साली शालेय दप्तरावरून पहिले मुख्याध्यापक श्री नेमू भाऊ चौगुले रा. सांगवडेवाडी या करवीर हे होते.
*सन १९८२ साली शालेय दप्तरावरून पहिले पदवीधर अध्यापक श्री जनगौंडा शामगौंडा चौगुले रा वसगडे ता करवीर हे होते.
*शाळा स्थापनेपासून आतापर्यंत १३ मुख्याध्यापक, १० पदवीधर अध्यापक व ८० शिक्षक असे एकूण १०३ शिक्षकांनी सेवा बजावली आहे.
*शाळा स्थापनेपासून आतापर्यंत २५१७ मुले , १६४५ मुली अशा प्रकारे एकूण ४१६२ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

( काही लोकांना प्रश्न पडतील कि स्वातंत्र्य पूर्व काळात इतक्या खेडेगावात शाळा कशी काय होती बुवा? म्हणून वरील अवांतर माहिती दिली आहे , जेणे करून लगेच विषयांतर होणार नाही ) Happy

हि झाली प्रस्तावना.

मला आपल्या सगळ्यांकडून बरीच मदत हवी आहे.

१) तुमच्या पाल्याच्या शाळेतील कोणती ऍक्टिव्हिटी खूप भावते.
२) तुम्ही तुमच्या पाल्याच्या शाळेत नेमके काय मिस करता ?
३) तुम्ही शिकत असताना , तुम्ही अनुभवलेली कोणती गोष्ट सध्या तुमच्या पाल्याच्या शाळेत मिसिंग आहे. ?
४) शिक्षकांचा विद्यार्थ्याकडे पाहायचा दृष्टिकोन तुमच्या मते काय असावा?
५) सध्या सुरु असलेल्या पद्धतीमधील चुकीच्या गोष्टी (तुम्हाला खटकणाऱ्या ) कोणत्या आहेत? त्या तुम्हाला कशा पद्धतीने सुधाराव्या वाटतात.
६) तुम्ही स्वतः एखादी शाळा सुरु केलीत तर कोणत्या गोष्टींना प्राथमिकता द्याल आणि कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाल?
७) जेंव्हा तुमचा पाल्य प्राथमिक शाळेतून बाहेर पडेल तेंव्हा तुम्हाला त्याच्या कडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? ( कोणते स्किलसेट )
८) सगळ्यात महत्वाचे म्हणजे, तुमच्या मते कोणत्या शैक्षणिक गोष्टी लहान मुलांच्या मानसिकतेवर खूप विपरीत परिणाम करतात पण सध्या दुर्लक्षित आहेत.

https://wablewadischool.org
(याबद्दल काही मतभेद आहेत आणि या शाळेचे मुख्याध्यापक ऍडमिशन साठी डोनेशन घेतात असे वाचनात आले आहे. ) या शाळेचे youtube वरील व्हिडीओ नक्की बघा.

या वेबसाईट वरून प्रेरणा घेऊन अश्याच प्रकारची शाळा करावी असा विचार आहे.
सध्याच्या परीस्थिती मधील
स्ट्रेंग्थ : उपलब्ध असणारा निधी प्रती विद्यार्थी बराच आहे. प्रत्येक विषयासाठी आणि वर्गासाठी बाहेरून एक्स्पर्ट आणून शिकवले (अगदी ट्युशन टाईप ) तरी चालेल.

विकनेस : इतके दिवस अतिशय "टिपिकल जिल्हा परिषद शाळा" या पद्धतीने सुरु असल्यामुळे सुरवातीला बराच त्रास होऊ शकतो. आहे त्या मुलांना नवीन वळण लावणे हे मोठे आव्हान असणार आहे.

ओप्पोर्च्युनिटी : गावातील बहुसंख्य लोक आपल्या पाल्याना कोल्हापूर मध्ये पाठवतात (परिस्थिती असो व नसो) . प्रत्येक विद्यार्थ्यामागे वार्षिक ३००००-३५००० रुपये ( सरासरी) खर्च होतात. जाण्यायेण्यात रोज २-२.५ तास वाया जातात. अश्या मुलांची संख्या जवळपास ५० आहे. हा सगळा पैसा वाचेल , मुलांचा वेळ वाचेल तो त्यांना खेळासाठी वापरता

थ्रेटस : वर जी लिंक दिली आहे तश्या पद्धतीने आहे त्या सिस्टिम चा गैरवापर होऊ शकतो. पण गावातील मुलांना जर दर्जेदार शिक्षण मिळाले तर त्या पुढे नुकसान होण्यासारखे काहीच नाही.

माझी अशी इच्छा आहे कि ५ वर्षानंतर , कोल्हापुरातून मुले शाळेला इथे यावीत. असे रोल मॉडेल तयार झाले तर इतर गावामधील लोक पण त्यांच्या शाळा चांगल्या करू शकतील.

जर तुमचे मुद्दे प्रश्नाखाली मांडून लिहिलात तर मला एकत्र करायला सोपे पडेल. या व्यतिरिक्त अजून काही सूचना / मार्गदर्शन असेल तर नक्की करा.

धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला उपक्रम...
तुम्ही प्राथमिक शाळेबद्दल विचारताय म्हणजे १ ली ते ४ थी बद्दल आहे असे ग्रुहित धरतो. माझी अपेक्षा ४ थी पास झाल्यावर मुलाना वाचानाची आवड आणि बाकीच्या विषयाची प्राथमिक ज्ञान एवढीच अपेक्षा आहे. मी मुंबईत जरी शिकलो तरी आमच्या प्रथमिक शाळेत फ्कत ३ वर्ग होते आणि एक वर्ग समोरच्या चाळीत एका घरी भरायची. शाळेला पंटागण , वाचनालय असल्या काही सोयी न्हवत्या. पण शिक्षक मात्र चांगले होते.
मुले मात्र परदेशातिल शाळेत शिकली. त्या ठिकाणी असलेले वाचनालय बघुन मी माझ्या बालपणी मिस केले असे वाटते. मुलाना चांगले वाचानालय हवे आणी त्याचा वयाप्रमाणे पुस्तके हवीत.
शाळा खेड्यात असल्याने पंटागण असेलच. ते मी मिस केले . मुलाना त्या ठिकाणी खेळायची सोय असावी, क्रिकेट, फुट्बॉल, बॅडमीटन ची सोय असल्यास चांगले. त्याचे सेट वयाचा कुवतीप्रमाणे असावेत.
१-४ मध्ये मुलासाठी बरेच चार्ट असावेत ज्याने मुलाना शिकवणे सोपे जाते.
प्राथमिक शिक्षणाला लॅपटॉप किंवा टॅब ची गरज नाही ते सगळे मध्यमिक शाळामध्ये

. यातले माझ्याकडे आलेले काम पूर्णपणे शैक्षणिक / क्रीडा संदर्भातील आहे>>>

मला या विषयातली फारशी माहिती नाही पण आता गावातच राहते व सध्या आजुबाजुची मुले पाहुन दोन तिन गोष्टी लक्षात आल्या आहेत त्या लिहिते:

१. मुलाना बाहेरील जगाबद्दल जबरदस्त आकर्षण असते पण शहरातले पालक जसे वर्षातुन एकदातरी बाहेरगावी जातात तसे गावी सहसा होत नाही. मुलाना शाळेत बसुन जगाची सफर घडेल अशा सोई होतील का ते पाहा. मोठ्या मुलांना प्रवासवर्णनम्पर पुस्तके, मोठ्या स्क्रीनवाल्या टिवीवर शहरांची, स्थळांची वर्णने करणारे शोज वगैरे दाखवणे करता येईल.

२. गावी हिस्टरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट व तत्सम चॅनेल्स कोणी बघत नाहीत. यावरच्या सिलेक्ट मालिका यु ट्युबवर वगैरे शोधुन मुलांना दाखवता येतील.

३. मुले सहज मिळवुन वाचतील अशी पुस्तकांनी भरलेली लायब्ररी हवी.

४. खेळ शिकवणारे शिक्षक हवेत. बॅडमिंटन, टे. टेनिस, जिम्नॅस्टिक, मल्लखांब वगैरे काहीतरी वेगळे शिकवणारे शिक्षक हवेत. खेळाच्या तासाला उगिच इकडे तिकडे करण्यात वेळ काढला जातो.

वाह! छानच उपक्रम.
तुम्ही इतका कळकळीने विचार करताय त्याबद्दल तुमचं कौतुक.
मी शहरात वाढले, त्यामुळे गावाबद्दल स्पेसिफिक काही सांगता येणार नाही. पण काही गोष्टी मुलीच्या शाळेत पाहून आठवतात त्या लिहिते:
१. मोट्ठी लायब्ररी - त्यात आवर्जून वेगवेगळ्या विषयांवर, विविध अनुवादित पुस्तकं ठेवा. आजकाल लहान मुलांचे फार सुंदर पुस्तकं मिळतात. प्रत्येक वर्गाला आठवड्यातून १ तास लायब्ररी मध्ये बसून पुस्तक वाचायला तास ठेवा. जितके जास्त पुस्तकं वाचले त्याला/तिला वर्षाअखेरीस छोटंसं बक्षीस द्या.

२. शहरातून किंवा दुसऱ्या गावातून व्हिसीटींग faculty ठेवता येत असेल तर पहा. २ आठवड्यातून एकदा वगैरे. येणं शक्य नसल्यास ऑनलाईन क्लास ठेवा त्यांचा. बरेच लोक volunteer म्हणून पण करायला तयार होतील. हे 'बाहेरचे' लोक काय सांगतात ते मुलं उत्साहाने ऐकतील.

साधना आणि साहिल यांचे प्रतिसाद छानच.

शंभर वर्षांचा रेकॉर्ड सांभाळलाय हे कौतुकास्पद आहे. शाळेत शिक्षक टिकलेले दिसतात.
वर आलेल्या सूचनांशिवाय -
शाळा व आवार सुंदर, स्वच्छ हवे. पाणी, स्वच्छतागृहांची चांगली सोय हवी.
पटांगण हवं. शाळा असल्यामुळे सांघिक खेळांना प्राधान्य द्यावं लागेल. पण शाळेनंतर इतर खेळांच्या शिक्षणाची सोय असावी.

शिक्षण विद्यार्थिकेंद्री हवं. प्राथमिक शाळा असल्याने शिक्षक विषयातले तज्ज्ञ नसले तरी चालेल. शिकवायची आवड व हातोटी हवी. Visiting faculty कधीतरी म्हणून ठीक. त्याने सातत्य राहतं का याबद्दल शंका आहे. ललितकलांची तोंड ओळख करून द्यायला अतिथी शिक्षक चालतील.
चौथीतून बाहेर पडताना मुलांना प्रथम भाषेत पुस्तकं वाचता आली पाहिजेत, सांगितल्याबरहुकूम आणि पाठ करून, स्वतः: रचून बिनचूक लिहिता आलं पाहिजे.
इतर दोन भाषांची अक्षर ओळख पक्की आणि तोवर जमलेल्या शब्दसंपत्तीचे उच्चार व अर्थ यायला हवेत. सांगितल्याप्रमाणे लिहिता यावं.
अंकगणितातल्या मूळ संकल्पना व क्रिया - दशमान पद्वत, बेरीज वजाबाकी गुणाकार, अभ्यासक्रमात असेल तर भागाकार - पक्क्या झालेल्या हव्यात.
भाषा व गणिताचं शिक्षण इयत्तेऐवजी त्यांच्या क्षमतेनुसार पाडलेल्या वर्गा/ गटाप्रमाणे व्हावं. एक मूल मराठी व गणितासाठी दोन वेगवेगळ्या वर्गांत असू शकेल.
एका वर्गात सारख्या क्षमतेची व सारखी पातळी गाठलेली मुलं असतील तर सगळ्यांना बरोबर नेता येतं.
वर्गात मुलांचा भरपूर सहभाग हवा. वाचून दाखवणं, बोलणं, फळ्यावर लिहिणं, इ. यासाठी वर्गात मुलं कमी हवीत व वर्ग आणि शिक्षकांची संख्या अधिक हवी. विद्यार्थी / शिक्षक गुणोत्तर कमी हवं.
हे बोर्डाच्या नियमांत बसत नसेल तर शाळेनंतर किंवा मोठ्या सुट्यांदरम्यान करता येईल.
शिक्षकांची राहायची सोय गावात असावी.

जागा असेल व फंड असेल तर पुढे माध्यमिक शाळा सुरू करून आजूबाजूच्या गावांतील मुलंही या शाळेत आणता येतील.

माझं पूर्ण प्राथमिक शिक्षण खेड्यात झालं. त्यामुळे या शाळेची कल्पना येऊ शकते.
Infrastructure हा खूप मोठा भाग असू शकतो यात. पूर्वी चार भिंती आणि वर छप्पर एवढाच प्रकार होता. आता जि. प. च्या शाळासुद्धा खूप इनोव्हेटिव झाल्यात. मी बघितलेल्या काही शाळा षट्कोनी आकाराच्या खोल्या, भिंतींना छान रंग, त्यावर छान छान चित्रं, स्वच्छ, प्रशस्त बाथरूम्स, स्वच्छ पाणी, मोकळे अंगण, छोटीशी पण छान बाग असं सगळं असलेल्या आहेत.अशी शाळा बांधल्यानंतर शाळेचा पट वाढल्याचं नक्की नाही पण कमी झाल्याचं दिसलं नाही. आता कॉम्प्युटर्स असतातच. त्यावर छान छान विडिओज् दाखवता येतील जे पुस्तकातील विषयांवर आधारित पण जास्त माहिती देणारे असतील. खेळाचं साहित्य, चित्रकला, क्राफ्ट हे सगळं फायद्याचं होईल.
मुळात शाळेचा पट कमी होऊन मोठ्या प्रायवेट शाळांकडे जाण्याचा कल वाढतोय तो प्रायवेट शाळांमधे काहीतरी भारी शिक्षण मिळतं आणि 'त्याची पोरं जातात मग माझी पण जाणारंच ' या स्पर्धेमुळे. शाळेची इमारत देखणी असेल तर जशा नजरा वळतील तसेच पालकही वळतील.

फारच स्वप्नाळू आहे हे, पण माध्यमिक शाळेसाठी ‘निसर्गशाळा’ नावाचा एक सुंदर अभ्यासक्रम आहे. शाळेत आपण शिकतो ते सगळे विषय प्रत्यक्ष अनुभवांशी जोडणारा. पहिली ते चौथीसाठीसुद्धा अशी शाळा असायला हवी. मुलं राहतात तो परिसर, त्यांना रोज अनुभवायला मिळाणार्‍या गोष्टी आणि अभ्यासाची पुस्तकं यातलं अंतर मिटवणारी.

शाळा ७ वी पर्यंत आहे. सध्या ५१ गुंठे जागा आहे , जुनी इमारत पण आहे. या वर्षी ग्रामपंचायत अजून ५१ गुंठे जागा क्रीडांगणासाठी मंजूर करत आहे.

र्गात मुलांचा भरपूर सहभाग हवा. वाचून दाखवणं, बोलणं, फळ्यावर लिहिणं, इ. यासाठी वर्गात मुलं कमी हवीत व वर्ग आणि शिक्षकांची संख्या अधिक हवी. विद्यार्थी / शिक्षक गुणोत्तर कमी हवं.>>> सगळ्या जिल्हापरिषद शाळा आणि नगरपालिकेच्या शाळा या बाबतीत आयडियल आहेत. मी पाहिलेल्या काही शाळेत तर पट १०-२०-३० असा आहे.
या शाळेतही वर लिहिल्याप्रमाणे १ ली ते ७ वी पट २१० आहे.

खूप छान प्रतिसाद येत आहेत, ज्यांची मुले सध्या प्राथमिक शाळेत जात आहेत (मराठी / इंग्रजी ) त्यांच्या कडून अजून प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. या शाळेत होत जाणाऱ्या बदलांची नोंद मी इथे नक्की देत जाईन.

धन्यवाद.

हव्या असलेल्या गोष्टी
1) छान निगा राखलेले मोठे ग्राउंड त्यात क्रिकेट, फुटबॉल, खो खो, कबड्डी सहित त्यात शहरी मुलं खेळतात तसे बास्केटबॉल सारखे खेळ खेळण्याची सोय.
2) उत्तम लायब्ररी त्यात पुस्तकं आहेतच शिवाय वयोगटानुसार नियतकालिके, न्यूजपेपर वै
3) 3 ते 6 कॉम्प्युटर असलेली comp lab. ज्यात मुलांना बेसिक कॉम्प्युटर आणि काही अँप्लिकेशन ( प्रो लेवल नव्हे ) माहीत असावेत इतपत शिक्षण. हे बाहेरून सपोर्ट ग्रुप करून शिकलेल्या लोकांनी द्यावे असे वाटते.
4) कन्सेप्ट कळण्यासाठी मॉडेल्स, युट्युब विडिओ, खान अकादमी सारख्या वेबसाईट ह्याचा वापर करणे , बायज्युसचे विडिओ लेक्चर चांगले असावेत पण ती कंपनी शाळेला कितपत सहकार्य करेल माहीत नाही. त्यांना वैयक्तिक ग्राहक कडे कल असेल, पण जर शाळेसाठी असं सेपरेट package देत असतील तर उत्तम.
5) विज्ञान प्रयोगशाळा
6) काही मुलांचा कल art कडे असेल तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी सोय. हे नेमके कसे करता येईल हे सांगता येत नाहीये.
7) व्यायाम त्याचे महत्व आणि त्याचे सुर्यनमस्कर सारखे उपक्रम राबवणे
8) मेडिटेशन शिकवणे गरजेचे वाटते कारण नवीन पिढी पेशन्स विसरली आहे की काय असे वाटते.
9) सिविक सेन्स/ नियम पाळणे ह्याबद्दल जागरूकता आणि आयुष्यात ते फॉलो करणे ह्यासाठी उद्युक्त करणे.

गाव तिथे राजकारण.... हे सत्यच आहे.
गावात जातीजातींमध्ये विभागलेली समाजरचना आणि समाजरचनेतुन पुन्हा श्रेयवाद. आपला माणूस प्रत्येक गोष्टीत असला पाहिजे ही सर्वांची इच्छा असते. त्यामुळे शालेय समिती अशी तयार करा ज्यामध्ये जास्तीत जास्त समाजातील वरिष्ठांना सहभाग मिळेल. लोक पदासाठी पण काम करतात. अशी पदे तयार करा. आणि मग त्यांच्याच सहभागातुन त्यांच्याच लोकांना आपल्या शाळेतील पट संख्या वाढवण्यासाठी आवाहन अथवा जनजागृती करावी. याशिवाय अश्या लोकांची समिती शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त गुणवत्ता सुधारण्याविषयी देखील सजग राहील.

आमच्या शाळेत लहानपणी सामूहीक प्रार्थना आणी समूहगान घेतले जायचे. आमच्याकडून वेगवेगळी स्तोत्रे आणी गीते म्हणून घेतली जायची. हे धार्मिक कारणासाठी नाही तर पाठांतर व स्वच्छ वाणीसाठी मला उपयोगी वाटले. मुलांना मनाचे श्लोक वगैरे गोष्टींची ओळखसुद्धा होते. या गोष्टी मुले सामूहिकरीत्या शिकतात तेव्हा लौकर शिकतात.

छान धागा. छान उपक्रम. छान प्रतिसाद देखील आलेत. हे सर्वच आपल्या मुलांच्या शाळांत हवे असे वाचताक्षणी वाटू लागले Happy
तरी नंतर विचार करून लिहितो जरूर माझ्याही अपेक्षा..