मर्मबंधातील एखादे नाते-मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 6 September, 2022 - 13:14

नमस्कार, मर्मबंधातील एखादे नाते हा विषय वाचला आणि माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो म्हणजे विनू ;माझा पहिल्या कंपनीतला मित्र.

आमची ओळख कशी झाली हा एक किस्साच आहे. कंपनीत अंतर्गत मेल एप्लिकेशन होतं. तिथे सेटिंग्स मध्ये आम्ही आमचा एक मेसेज लिहायचो. समजा अ व्यक्तीने ब व्यक्तीला मेल केला तर त्याला ब व्यक्तीने सेट केलेला मेसेज दिसायचा.

एकदा मी एक स्टेटस रिपोर्ट पाठवला होता. रेसिपियंटसमध्ये विनू होता. त्यावेळी मला त्याचा “only crying babies get milk” असा काहीसा मेसेज वाचायला मिळाला.

तोपर्यंत आमचा संपर्क म्हणजे मेल पाठवणे किंवा तिकीट असाइन करणे किंवा काहीतरी इश्यू आहे असं फोनवर कळवणे इतपतच होता.
हो, हे सांगायचं राहिलं कि मी फर्स्ट लेवल सपोर्ट मध्ये काम करत होते आणि तो सेकंड लेव्हल सपोर्टला काम करत होता. रोजचे काम करताना त्याचा समजूतदार स्वभाव लक्षात आला होता. उदाहरणार्थ तिकिटाची प्रायोरिटी चुकीची असली किंवा तिकीट चुकीच्या टीमला असाइन केलं तर त्याच्या टीम मधले बाकीचे लोकं अक्षरशः कालवा करायचे. तो मात्र शांतपणे बरोबर प्रायोरिटी किंवा बरोबर टीम स्वतःच असाइन करून घ्यायचा आणि कधी दुसर्या कारणाकरिता फोन केला तर ही गोष्ट समजून सांगायचा.

असो, त्याचा हा सेट केलेला मेसेज बघताच मी त्याला फोन केला. त्यावेळी अप्रेजल, प्रमोशन चे वारे त्यांच्या कंपनीत वहात होते. तिथे काहीतरी गडबड झाली म्हणून तो उद्विग्न होता. आणि त्यामुळेच त्याने हा मेसेज सेट केला होता. त्यानंतर मी काही समजुतीचे बोलले आणि फोन ठेऊन दिला. त्यानंतर आम्ही फोनवर कामाव्यतिरिक्तही काही वेळा बोलायला लागलो.

त्या वेळी मी कंपनीत अगदी भेदरलेले कोकरू होते. एमएनसी; फ्रेशरच्या मानाने पगार भरपूर; सगळं हाय-फाय वातावरण आणि काही लोकांचा सगळ्यांना वेठीस धरायचा स्वभाव व नेहमीचे अंतर्गत राजकारण आणि माझी ही पहिलीच कंपनी यामुळे मी सतत घाबरलेले असायचे. माझ्या चूका व्हायच्या, माझ्यावर काही वेळी लोकं विनाकारण त्यांच्या चूका ढकलायचे. काही लोक खूप विकृतपणे वागायचे. या सर्व गोष्टींचा मला मानसिक त्रास व्हायचा.

कंपनीत फॅसिलिटीज खूप होत्या. पण त्या सोयीसुविधांचा आनंद घेण्याची माझी इच्छा मावळू लागली होती. एकंदरीतच मी तिथे एक-एक दिवस कसाबसा ढकलत होते. आपल्यात भाबडेपणा असतो, सगळे जग चांगलं आहे हा एक विश्वास असतो. तो माझा जवळजवळ कोसळायला लागला होता.

या सर्व मन:स्थितीत विनू ने मला खूप मदत केली. तो माझं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायचा. नेहमी अदबीने बोलायचा. माझा ‘स्व’ त्याने परत जागवला. माझी स्वतःबद्दलची असहायतेची/अगतिकतेची भावना त्याने हळुहळू पण समूळ नष्ट केली. संवेदनशीलता, सहवेदना त्याच्यात खूप होती. कधीतरीच तो उपदेश करायचा.

मला जगण्याचा एक आत्मविश्वास ,सगळीच माणसं वाईट नसतात किंबहुना चांगली माणसे जास्त असतात हा मनाचा विश्वास त्याने मिळवून दिला. तिथल्या दलदलीच्या वातावरणातून बाहेर पडण्याकरिता त्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बरीच मदत केली. व्यावसायिक वातावरणात जगण्यासाठी आवश्यक असणारे काही नुस्के ही दिले. कधी मित्र ; कधी मार्गदर्शक;कधी सपोर्टर; कधी नुसतेच पण मनापासून ऐकण्यासाठी कान तो देत असायचा.

पहिल्या कंपनीतून बाहेर पडताना आणि दुसऱ्या चांगल्या कंपनीत ताठ मानेने जाताना माझा जगावरचा आणि जगण्यावरचा विश्वास त्याने परत मिळवून दिला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे मोहिनी.
आणखी अनेडॉटल प्रसंग इ. वाचायला ही आवडलं असतं. चांगलीशी कथा पण बनू शकेल यावर.

खूप छान आणि प्रामाणिकपणे लिहिलं आहेस.. मोहिनी..!!
कथा लिहायचा विचार नक्कीच करेन.>> नक्की कर..

छान लिहिलं आहे
अमितव यांना अनुमोदन. अजून किस्से वाचायला आवडले असते. वाचत असताना आपल्या ऑफिसमध्ये कोण असा आहे का हा विचार डोक्यात येत होता..

धन्यवाद रूपाली, ऋन्मेष,भरत,मामी.

खूप छान लिहिलं आहेस. छान सखा मिळाला. असं मैत्र जपून ठेवायला हवं.-हो, अगदी खरं, पण काही वेळा काळाच्या ओघात नाही रहात टिकून. अशावेळी त्या माणसांबद्दल कृतज्ञता मनात ठेवता येते फक्त . आणि भविष्यात परत भेटायची शक्यता/उत्सुकता.

वाचत असताना आपल्या ऑफिसमध्ये कोण असा आहे का हा विचार डोक्यात येत होता-किंवा आपण असं कोणासाठी आहोत का/होऊ शकतो का!