मायबोली गणेशोत्सव २०२२ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 30 August, 2022 - 20:53

2022 hgu murti-2-final-V2.jpg

योग आणि तंत्र मार्गानुसार, प्रत्येक मनुष्याच्या मेरुदंडाच्या शेवटी, अचित, असीम शक्तीशाली, रहस्यमय शक्ती, सुप्तावस्थेमधे निद्रिस्त असते, जिला कुंडलिनी असे नाव आहे. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. ही शक्ती मेरुदंडातून वरवर चढत जाउन जेव्हा ७ चक्रांचे शुद्धीकरण करुन, सहस्रार चक्रात पोचते तेव्हा, शिव-शक्ती मीलन सोहळ्याचा अनुभव जीवास येतो. ज्ञानेश्वरीमधे चक्र शुद्धीकरणाच्या आणि कुंडलिनी जागृत होण्याच्या टप्प्यांचे अत्यंत रसाळ वर्णन येते. सुप्तावस्थेतिल कुंडलिनीचे वर्णन करताना, ज्ञानेश्वर म्हणतात -

नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें ।वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी ।अधोमुख सर्पिणी ।निजैली असे ॥

तर ही कुंडलिनी कशी आहे? जणू कुंकवात न्हायलेले, नागाचे पिलू, औट म्हणजे साडेतीन वळणांचे, वेटोळे घालून निजलेले असते तशी, ही कुंडलिनी, निद्रिस्त आहे. सुप्तावस्थेतील कुंडलिनीचा वास कुठे आहे, तर मूलाधार चक्रात. मूलाधार चक्राचा रंग कोणता असतो तर लाल, कुंकवासारखा. योगमार्गानुसार, या मूलाधार चक्राची देवता आहे श्रीगणेश. अर्थात या चक्रावर अधिराज्य आहे गणपतीचे. जोपर्यंत गणपती प्रसन्न होत नाही तोपर्यंत ना कुंडलिनी जागृत होणार, ना शिव-शक्तीचे मीलन होणार. आता आठवा जगदंबेच्या म्हणजे पार्वतीच्या, विनंतीनुसार, गणपतीने दारावर दिलेला पहारा. साक्षात शंकरसुद्धा, गणपतीस ओलांडून जाउ शकले नाहीत. म्हणजे शिव-शक्तीचे मीलन हे गणेशाच्या रुकाराशिवाय होउच शकत नाही हा त्याचा मथितार्थ.
तर मंडळी अशा विघ्नहर्त्या गणेशाचे, बुद्धीच्या देवतेचे, आपल्या लाडक्या बाप्पाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करुया.

||गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया!
छान आणि वेगळी पोस्ट. यानिमित्ताने योगमार्ग आणि गणेशोपासनेमध्ये काय दुवा आहे ते लक्षात आलं.

दोन छोट्या दुरुस्त्या (दुरुस्तीचे अनेकवचन दुरुस्त्या बरोबर आहे का? की अनेक दुरुस्तीच म्हणतात?) सुचवतो -
१. जागॄत - जागृत ( र्‍हस्व ऋकार हवा; दीर्घ नको)
२. मतितार्थ - मथितार्थ (मथित + अर्थ; मथित म्हणजे मंथन करून काढलेला, घुसळून काढलेला अर्थ)

Submitted by हरचंद पालव on 31 August, 2022 - 06:53 >> धन्यवाद हरचंद पालव , दुरुस्त्या केलेल्या आहेत.

बाप्पा मोरया !
चित्र देखणे आहे. संयोजकांचे मनोगत नेहमीपेक्षा वेगळे आहे.

मायबोली गणेशास मनोभावे वंदन!

गणेशमूर्ती आणि सजावट सुंदर आहे.

प्रस्तावना जरा क्लिष्ट आहे. विषय माहित असलेल्यांनाच समजेल.

बाप्पा मोरया !

>>>>नागिणीचे पिलें | कुंकुमें नाहलें |
वळण घेऊनि आलें | सेजे जैसें ||६-२२२||
तैशी ते कुंडलिनी | मोटकी औट वळणी |
अधोमुख सर्पिणी | निदेली असे ||६-२२३||
>>>>

आजवर असच वाचलेलं आहे.

गणपती बप्पा मोरया !

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभं |
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वाकार्येषु सर्वदा ||

प्रस्तावना आवडली. वेगळी नि प्रसंगोचित आहे.

Pages