काही विस्कळीत जुन्या नोंदी...

Submitted by जिन्क्स on 28 August, 2022 - 07:50

माझ्या लहानपणीच्या घरा/अंगणाबद्दलच्या काही आठवणी.

IMG-20220906-WA0001.jpg

१. अंगणाच्या नैऋत्येला सूर्यास्तेकडे झुकलेला मोठा गुलमोहर होता. एवढे देखणे झाड पुढे आयुष्यात कधी पाहिले नाही. पूर्ण वाढीचा हा गुलमोहर एका सतेज कांतीच्या रुबाबदार पुरुषासारखा वाटायचा. ऐन रखरखलेल्या उन्हाळ्यात जेंव्हा इतर झाडे कोमेजून जायची तेंव्हा हा गुलमोहर तांबडी फुलें अंगावर फुलवून रुबाबात उभा असायचा. हा म्हशींच्या गोठ्याच्या मागे होता म्हणून रोजच्या वावरात तो दिसत नसे. अंगणातील इतर झाडी जशी त्यांच्या अंगाखांद्यावर बागडल्यामुळे ओळखीची वाटायची तसा हा थोडा परका वाटायचा. कधी चिंचा पाडायला किंवा असेच अंगणात फेरफटका मारताना घरामागे (गोठ्यामागे) गेलो तरच दिसत असे. ह्या गुलमोहराची मनात कोरलेले चित्र म्हणजे थंडीच्या दिवसात सूर्य मावळतेवेळी नांगरलेले घरामागचे रान पाहता पाहता कोपऱ्यात तटस्थपणे उभा असलेला हा वृक्ष एखाद्या सीमारेषेवरच्या राखणदार सारखा वाटे.

२. लहानपणी अंगणात बरीच झाडी होती. सवंगगाड्यांसोबतचे बरेच खेळ ह्या झाडांच्या साक्षीने चालत. अंगणातल्या बऱ्याच जागांना झाडांचीच ओळख असे. घरामागचा आंबा, बोळीतला जांभूळ, रानातली दिवसमावळी, पुलावरची दिवसमावळी, देवळजवळचा रामफळ, देवळासमोरचा चाफा, ओसरीवरचा आंबा, पडवीतली जास्वंद, बांबू, पेरू, चिक्कू, कागदी फुलाचे झाड, विहिरीजवळचा मोठा आवळा, त्याच्या शेजारचा गोड आवळा जणू ही सर्व रोज समोर दिसणारी माणसं होती. त्या अंगणात त्यांचं स्वतंत्र अस्तित्व होतं.

३. वस्तीवरचे मित्र जेंव्हा उन्हाळी सुट्टीत त्यांच्या आजोळी निघून जात तेंव्हा हीच झाडी माझ्या खेळातले सवंगडी होत. रामफळाच्या झाडावर माझ्या कल्पना जगातले हेलिकॉप्टर होते, गोबरगॅस प्लान्ट माझी बोट होती, देवळासमोरच्या बदामाला पाणी देण्यासाठी मी मातीचे छोटे धरण बांधले होते. सरडे, पाली, खारुताई तर असंख्य. अशोकाच्या झाडावर मोठ्या घारीचे घरटे होते. बुचाच्या झाडाखाली मुळ्याच्या खोबणीत पिवळी धामण कधी कधी दर्शन देत असे. उंबराच्या झाडावर मोठमोठाली आगीमोहळे होती. ह्या सगळ्यात मी खूप रमून जात. आख्खी दुपार जेंव्हा घरातले इतर लोक गाढ झोपेत असे तेंव्हा माझे हे खेळ सुरू असत. पुढे आयुष्यात मी प्रचंड इन्ट्रोवर्ट झालो त्याचे बीज बहुदा तिथे असावे.

४. मला एक सवय आहे. नवीन ओळख झालेल्या आणि मैत्री होऊ शकणाऱ्या व्यक्तीला मी मुद्दामहून त्याचे लहानपणीचे संदर्भ येतील असे प्रश्न विचारतो.आपल्या घराबद्दल बालपणाबद्दल भरभरून बोलणारे लोक खूप आवडतात. त्यांच्या आणि माझ्या मध्ये काही समान दुवा आहेत असे वाटते. झाडांचा संदर्भ देऊन पत्ता सांगणारे लोकही मला आवडतात - समोरच्या चिंचेपासून डावीकडे वळा. असे लोक झाडांचे अस्तित्व consider करतात हे मला आवडते. लहानपणीच्या आठवणी केवळ माणसं केंद्रित असणारे लोक मला रूटलेस वाटतात.

५. पानगळीच्या दिवसात सारे अंगण झाडले जात. पानांचे मोठमोठाले खच बनवून पेटवून दिले जात. पेटवलेल्या वाळलेल्या पानांचा वास मला अतिप्रिय.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला रात्रीचा वारा सुटे. त्या हवे मध्ये ही वेगळाच वर्णन न करता येणार वास असे. खास त्या वासासाठी मी रात्रीचे जेवण झाल्यावर तुळशीच्या ओट्यावर बसत असे.

पूर्वी देवळाजवळ खूप मोठे बुचाचे झाड होते. ह्या झाडाला छोटी छोटी पांढरी फुले येत. ह्या झाडाखाली खूप साऱ्या फुलांचा सडा सतत पडलेला असत. अख्खा आसमंत ह्या फुलांच्या वासाने सदैव भारलेला. पुढे एका वादळात हे मोठे झाड पडले. ह्या झाडाच्या लाकडातून अख्ख्या घरासाठी फर्निचर झाले. पडलेल्या झाडातून परत छोटी छोटी फुलांची झाडे उमलली. अंगणाचा उत्तरपूर्व भाग आज ही सुवासाचे सुख देणाऱ्या झाडांनी भरलेला आहे.

झोपायच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिले की उंच पण बारीक अंगकाठीचा चाफा दिसे. हा चाफा आज ही आहे. बहाराच्या मोसमात सगळी पाने गाळून फक्त सुबक पांढरी सुवासाची फुले अंगावर लेवून उभा असलेला चाफा हे फार सुंदर दृश्य असे. चाफ्याच्या समोर पूर्वी ओळीने लावलेला मोगरा असे. रातराणी, बकुळ ही इथे तिथे असत. पूर्वी गुलाबाची बाग लावण्याचा प्रयत्न झाला होता पण त्याच्या आठवणी अगदीच पुसटश्या.

६. घरामागचा उंबराच्या झाडाला बुंध्यापासूनच तीन फांद्या होत्या. उंबराच्या झाडावर लहानपणी खूप खेळलो. पण गोड फळामुळे ह्या झाडावर बऱ्याच लाल मुंग्या आणि इतर कीटक असत. खेळून झाल्यावर बराच वेळ अंग खाजत. त्याकाळी अर्थातच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात. तर ह्या झाडाला बुंध्यापासूनच तीन फांद्या असल्याकारणाने तिथे दत्ताचे ठाणे आहे म्हणून तिथे मंदिर बांधण्यात यावे असा उपदेश एका देवरूषीने माझ्या आज्जीला दिला होता. उंबर घरामागे असल्या कारणाने मंदिर तिथे न बांधता घरासमोर असलेल्या उंबराजवळ बांधले. देवळात सुबक दत्ताची मूर्ती आहे. शंकराची पिंड आणि नंदी आहेत. मोठी काकू सोडली तर घरातले तसे फार पूजा पाठ देव देव करणाऱ्यातले नव्हते. पण देवळातल्या पूजेसाठी नेहेमी कोणी न कोणी माणूस ठेवला असल्याची आठवण आहे.

७. माझा जन्म होईस्तोवर गोठ्यातले गोधन बरेच कमी झाले होते. माझ्या आठवणीतल्या गोठ्यात २-३ म्हशी आणि तेवढ्याच शेळ्या होत्या. अगदी पुसटशी बैलगाडीची आठवण आहे. गोठा पूर्वीच्या सुबत्तेची साक्ष देत ऐसपैस होता. त्याकाळी तो मॉडर्न असावा. पाया ताशीव दगडांचा होता आणि दावणी लाकडी होत्या. शेळ्यांचा गोठा ही वेगळा होता. माझ्या बालपणी हा गोठा गुरांसाठी कमी आणि अडगळीचे सामान ठेवण्यासाठी जास्त वापरत. लपाछपी खेळताना लपण्यासाठी सगळ्यात आवडती जागा म्हणजे हा गोठा. पावसात गोठ्यात उभे राहिले की पत्र्यावर ताड ताड आवाज भीतीदायक पण तेवढाच मनोरंजक वाटे.
गोठ्याशेजारी गॅरेज होते. गॅरेज शेजारी जांभळीचा बोळ ओलांडून दोन मोठाल्या खोल्या होत्या. हे नवीन घर बांधायच्या आधीचे घर. खोलीत मोरी, दगडी जातं, उखळ, तुळया, खुंट्या, मोठमोठाली पितळी भांडी असे सर्व होते. मी ही खोली दहावीच्या अभ्यासासाठी वापरली. नंतर माझ्या भाचीचा जन्म झाल्यावर पाहिले काही दिवस माहेरवाशीण बहिणीचा मुक्काम ह्या खोलीत होता. एकदा रात्री त्या खोलीत भिंतीतल्या कपाटातून खवड्या जातीचा साप निघाला होता. तो साप मी आणि आमच्या राखणदाराने मारला होता. पुढे त्या खोलीशेजारीच असलेल्या बोळीत (जांभळी खाली) त्या राखणदाराला नाग चावला होता. त्यातून तो बचावला पण नंतर आयुष्यभर बिचारा लंगडत चालत होता. ह्या खोलीशेजारी अजून एक अगदी तशीच खोली. तिचा उपयोग शेतीचे सामान, धान्य, खत आणि इतर अडगळ साठवण्यासाठी करत. एकदा खेळता खेळता मला ह्या खोलीत खूप जुनी तलवार सापडली होती. बरीच वर्षे ती होती. मध्ये कधीतरी घरी चोरी झाली तेंव्हा चोरांनी इतर सामनाबरोबर ती पण नेली.

शिक्षणासाठी वयाच्या १८व्या वर्षी मी ही स्वप्ननगरी सोडली. निघण्याच्या दिवशी घरातल्या काही बुजुर्ग मंडळींच्या डोळ्यात पाणी आले होते. पण मला त्यावेळी त्या प्रसंगातली तिव्रता समजली नाही. हे असे उपजीविकेसाठी घरातून बाहेर पडणे बऱ्याच वेळेला परत न येण्यासाठीच हे माहीत नव्हते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आठवणी
मुद्दा क्रमांक ४ आवडला

लेख आवडला..

माझ्याही लहानपणीच्या आठवणींत झाडेच झाडे आहेत.. सुदैवाने वर्तुळ पुर्ण करत जिथे बालपण गेले तिथेच मी आता परतले आहे. त्या वेळची झाडे, वेली, रस्ते शोधत फिरायला खुप आवडते. बहुतेक सगळेच बदलुन गेलेय तरी अचानक ओळखीचे काहितरी सापडते तेव्हाचा आनंद अवर्णनीय आहे.

आवडला लेख.
माझ्याही सगळ्या आठवणी मध्ये झाडेच आहेत, जी आताही माझ्या स्वप्नात येतात.

चांगला लेख. निव्वळ झाडांवर लिहिला आहे, अजून विस्तारता आला असता. काही वर्षांपूर्वी पुण्यात जायचा योग आला. पोलिस ग्राउंडजवळ, f c रोडवर झालेली झाडांची कत्तल बघितली गेली नाही. जंगली महाराज रोडवर, मुंबईत माटुंग्याला झालेले काँक्रिटचे जंगल बघून वाईट वाटले. मुंबईला शाळेत असताना जी सुंदर मुलगी प्रचंड आवडत असे, ती अचानक दिसली आणि लहानपणीच्या रम्य आठवणींना एकदम तडा गेला. कधी कधी निव्वळ आठवणींवर जगणे, जास्त चांगले असते.

खूप सुंदर लिहिलंय सगळंच.

गंमत म्हणजे आमच्याही अंगणाच्या नैऋत्येलाच गुलमोहर होता. आणि तिथेच बाजूला गोठाही होता हाही योगायोग. नंतर गोठा वाढवला तेव्हा तो गुलमोहर तोडला. त्याच बाजूला, पण आमच्या आवारात नाही, घरासमोरच्या मोकळ्या जागेत एक खूप मोठा टाकळ्याचा वृक्ष होता. त्याच्या शेंगा आम्ही लहानपणी गोळा करायचो. आमच्या गुलमोहराखालीही टाकळ्याच्या शेंगा येऊन पडायच्या. ते टाकळ्याचं झाडही नंतर तोडलं गेलं.
आमच्या घराच्या समोरच्या बाजूला अंगणात उंच सोनचाफा आणि पलीकडे, कुंपणाला लागून पांढरा/देवचाफा. तसाच देवचाफा सरळ समोरच्या देवळासमोर. त्या चाफ्यावर आम्ही लहानपणी चढून बसायचो, आता आमच्या मुलांनाही तिथे चढून बसण्याची ओढ असते याचं वेगळंच समाधान वाटतं Happy

आमचाही एक फणस (म्हणजे फणसाचं झाड) 'शाळेमागचा', एक आंबा 'डोहाचा', म्हणजे पूर्वी तिथे डोह असावा, एक आंबा 'रेवेवरचा', म्हणजे तिथे 'रेव' (बारीक रेतीसारखे दगड) ढीग करून पिढ्यानपिढ्या ठेवलेली होती. एक आंबा 'तरणाम्हातारा'. का देव जाणे! Lol

एक जागा 'फणशीजवळ' म्हणून ओळखली जाते गावात. ते फणसाचं झाड माझ्या जन्माच्या आधीच तोडलेलं होतं. पण हे नाव अजूनही टिकून आहे.

छान लेख आहे.

पुण्यात फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड आणि प्रभात रोडवरची गर्द झाडी आणि मोठे वृक्ष पाहिले आहेत. मधे कोणीतरी सिंहगड रस्त्याचाही असाच फोटो टाकला होता. त्यातले खूप आता तोडलेले दिसतात.

यावेळेस जुलै मधे भारतात गेलो होतो तेव्हा आमच्या सोसायटीमधेच किती असंख्य वेगळ्या प्रकारची झाडे/फुले आहेत हे जाणवले. पावसामुळे एरव्ही झाडांवर दिसणारी प्रचंड धूळ धुतली जाते आणि मूळचा रसरशीत हिरवा रंग उठून दिसतो. बरीच फुलेही या सीझन मधे येत असावीत असे दिसते.

आवडले लिखाण

झाडांचा संदर्भ देऊन पत्ता सांगणारे लोकही मला आवडतात >>> ह्याला मम

'विस्कटलेल्या' शब्द का योजला आहे म्हणे. विस्कळीत म्हणायचे आहे का?

छान लिहिलंय.

लेखातल्या अनेक गोष्टी रिलेट झाल्या. नवीन शहरात / परिसरात / घरात गेल्यावर तिथले वृक्ष, फुले-वेली हे नकळत टिपल्या जाते डोळ्यांनी आणि अनेक वर्षांनंतरसुद्धा चित्रवत आठवते Happy

छान आहे लेख. आवडला.
इतक्या मोठ्ठ्या झाडांची संगत घराच्या अंगणात नाही तरी शाळेच्या पटांगणांत भरपूर लाभली. त्याची आठवण झाली. स्पेशली बुचाच्या झाडांचा संदर्भ अगदीच आठवणी ताज्या करून गेला.
तुम्ही लिहील्यात अश्यासारख्याच आठवणी माझे वडील सांगतात आमच्या गावच्या घरापासच्या झाडांच्या. छान वाटतं ते ऐकायला.