काश्मीर डायरीज - २

Submitted by स्मिता श्रीपाद on 13 July, 2022 - 03:09

आधीच्या भागाची लिंकः
काश्मीर डायरीज -१ : https://www.maayboli.com/node/81910

16 मे 2022
सकाळी जाग आली तर दूरवर पावसाचा आवाज येत होता.. 6.15 ला उठले तेव्हा बाहेर व्यवस्थित पाऊस.. गोंधळ क्रमांक 2.
मनात म्हणलं, झालं आता कल्याण.कसलं काय मिनी स्वित्झर्लंड न काय.बसा गुपचूप खोलीत टीव्ही बघत.
पण,
"अगर किसी चीज को आप शिद्दत से चाहो.. तो पूरी कायनात.. " वगैरे वगैरे.. असं खुद्द शाहरुख खानने आपल्याला सांगितलंय.. ते खरंच आहे बरं का.
8 वाजता जादू झाल्याप्रमाणे पाऊस बंद....
एकदम स्वच्छ निळं आकाश आणि सूर्य महाराज नोकरीवर हजर...
सोमवार होता त्यामुळे बहुतेक लेट आले साहेब.. Monday Blues काय फक्त आपल्या सामान्य माणसालाच व्हावेत की काय ? ते उन्ह बघून आमच्या गोटात एकदम आनंद पसरला आणि पटापट सगळं आवरून 6 मराठी वीर पहलगाम च्या घोड्यांवर बसायला तय्यार झालो.
वर पहलगाम चा घाट चढायला सुरू केले तसा रस्ता अधिकाधिक सुंदर होत होता. इनायत भाईंनी आज काय आणि कुठे फिरायचं, घोडे वाले किती पैसे घेतात, त्यांच्याशी कशी घासाघीस करायची अशा सगळ्या सूचना देऊन ठेवल्या होत्या.पोनी/घोडा स्टँड वर पोचून जमेल तितकं बर्गेनिंग स्किल वापरलं ( तुळशीबाग ट्रेनिंग कामी आलं ) आणि शिवाजीराजांचं नाव घेऊन आम्ही 6 जण घोड्यावर स्वार झालो.
"बैसरन" म्हणजेच मिनी स्वित्झर्लंड च्या दिशेने कूच केले.
प्रत्येकी 2 घोड्या सोबत 1 हेल्पर असे सोबत चालू लागले.या पहाडात राहणाऱ्या लोकांचा स्टॅमिना बघून आश्चर्य आणि लाज वाटते राव.पूर्ण 40-45 मिनिटांचा साधारण ५-6 किमी चा चढ असलेला डोंगर घोड्यांसोबत अगदी आरामात चढत होते ते लोक.आम्हाला घोड्यावर बसून घाम फुटला होता पण हे लोक अखंड गप्पा मारत चालत होते.
घोडा जरा डोंगराच्या टोकाला जायला लागला की आमची पाचावर धारण बसायची पण ते भाईलोक एकदम निवांत होते.
"अरे भाई इसको धरो, उसका पाय सटकेगा" भीतीमुळे हिंदी ची चिंधी होत होती.
"डरो मत दीदी, घोडेको भी उसकी जान प्यारी है" भाई एकदम निवांत.
माझ्या घोड्याचं नाव तर "सलमान".. त्याने भाईजान चे बरेच पिक्चर पण पाहिले असावेत.. सरळ चालायचं नावच घेत नव्हता भाऊ.. खड्डा दिसला की गेलाच तिकडे.
40 मिनिटे ही कसरत केल्यावर एक दगडी कमान आणि गेट दिसले.. तिकिटं काढून आत शिरलो आणि....आहाहा.. सगळ्यांच्या तोंडून एकदम उद्गार निघाला.
विस्तीर्ण पसरलेलं हिरवगार पठार आणि त्याच्या चारही बाजूने बर्फ़ाचे डोंगर.हीच ती बैसरन व्हॅली उर्फ मिनी स्वित्झर्लंड.
283731481_10159168138604355_3033272067601083640_n.jpg
लहान मुलांसारखे पळत सुटावेसे वाटत होते.किती फोटो काढु आणि किती नको असे झाले होते.
फोटो चा पहिला भर ओसरला.. मग जरा निवांत हिरवळीवर बसून आराम केला.नजर जाइल तिकडे लांबच्या लांब हिरवळीचा पट्टा दिसत होता.गरजेपुरते उन्ह आणि थंड अल्हाददायक हवा असे एकदम "मौसम का जादु है मितवा" वातावरण.
इतक्यात तिथे काश्मीरी कपड्याचे स्टॉल दिसले.समस्त महिला वर्गाने "काश्मीर च्या कळ्या(?)" बनून मनसोक्त फोटो काढले.
पुरुष वर्गाला तसले कपडे न आवडल्याने नवर्‍याने स्वतःचे असे फोटो काढायला नकार दिला. ( शेजारीच एक काकु आणि काकांचे या विषयावर भांडण चालू होते.. काकांना अजिबात न आवडलेले कपडे त्यांनी घालावे म्हणून काकु मागे लागल्या होत्या.मी नवर्‍या कडे परत एकदा बघितले तर त्याच्या डोळ्यात काकांबद्दल सहानुभूती आणि काकुंबद्दल राग दिसला Wink मग तसला सीन रिपीट होऊ नये म्हणून मी पण गप्प बसले)
रंगीत अल्युमिनियम टमरेल cum मटका, खोट्या फुलांचा फ्लॉवरपॉट यासोबतच ससे, मेंढ्या असे जिवंत props हातात घेऊन आम्ही मनसोक्त फोटो काढले.. ( एकदा वेडेपणा करायचा ठरवला की पुरेपूर करावा नाही का.)
मग अचानक आलेल्या मॅगी आणि भजी च्या वासाने भुका लागल्यावर पोटपुजा करयला बसलो. अशा ठिकाणी मॅगी आणि भजी खायला फारच मजा येते.सोबत आमचा पण थोडा लाडु, वड्या असा खाउ होता. आमच्या सोबत आलेल्या घोडेवाल्या दादांना तो घरचा खाउ ऑफर केला तेव्हा त्यांनी सांगितले की "मीठा खानेसे पहाडोमे चलना मुश्किल होता है तो हम लोग बिलकुल मीठा नही खाते" त्यांचे उत्तर ऐकुन त्यांच्या तबियत चा राज लक्षात आला आणि पुढचा लाडु चा तुकडा तोंडात टाकयला लाज वाटु लागली. अखेर त्या सुंदर ठीकाणाला नाईलाजाने निरोप देउन खाली
उतरायला सुरु केले.उतरताना अजून जास्त मजा ( आमची मजा आणि घोडेवाल्यांची करमणूक ) करत खाली पोचलो.
त्या घोड्यावर तोल सांभाळत बसायचं, शिवाय ढाल तलवार हातात धरायची आणि शत्रूला कापायचा ते पण अवघड अशा दऱ्याखोऱ्यात. इतके उद्योग महाराज आणि मावळे कसे करत असतील या विचाराने मनोमन एकदा शिवरायांना मुजरा घातला.
पहलगाम मार्केट मध्ये एका बऱ्या हॉटेल मध्ये जेवण करून थोडीफार शॉपिंग केली ***.
आता पुढचे ठिकाण होते "बेताब व्हॅली" आणि "अरु व्हॅली"
इथे जाण्यासाठी लोकल टॅक्सी करावी लागते ती इनायत भाईंनी बघून दिली आणि बेताब ला निघालो.टॅक्सी वाला फॉर्म्युला 1 रेस चा चाहता होता त्यामुळे भयानक वेगात "बेताब" होऊन गाडी चालवत होता.तिथे पोचलो तर भयंकर ट्राफिक जाम.गाडीतून उतरून चालत चालत उतार उतरून खाली व्हॅली पर्यंत जावे लागले ( ट्रॅफिक जॅम नसता तर खालपर्यंत गाडी जाते) आणि तिथेच सगळा स्टॅमिना खलास झाला.
बेताब व्हॅली म्हणजे लीडर नदी जवळ पसरलेली एक सुरेख बाग आहे. तिथे छोटे छोटे पूल आहेत, गझिबो आहेत, एक छोटा तलाव आहे, 2-3 गोड दिसणारी उतरत्या छपराची घरं आहेत,भरपूर फुलं आहेत.
283921041_10159168139214355_3849267032135458228_n.jpg
बेताब या हिंदी सिनेमा चं शूटिंग झालेलं ठिकाण म्हणून नाव बेताब व्हॅली.
तिथे पोचेपर्यंत बरेच चालावे लागल्यामुळे , आत गेल्यावर हिरवळीवर लोळायला सुरू केले. पूर्ण व्हॅली बघायला 1-2 तास नक्कीच पुरणार नाहीत.. एक पूर्ण दिवस सुद्धा कमीच पडेल.पण इतका वेळ आमच्या कडे नव्हता त्यामुळे जेवढं दिसलं त्यावर समाधान मानून तिथून बाहेर पडलो आणि काय..
गोंधळ क्रमांक 3
माननीय टॅक्सी चालकाने वर रस्त्यावर जिथे सोडले होते तिथे हाशहुश करत पोचलो तर महाराज गायब.त्याचा नंबर पण नाही जवळ.खरतर गाडीतुन उतरलो तेव्हा त्याला नंबर मागितला होता पण "मै यही रहुंगा दिदी, आप गाडी नंबर प्लेट का फोटो लेलो" असे म्हणत स्वतःचा फोन नंबर जसा काही व्हीआयपी आहे अशा थाटात त्याने दिलाच नाही. तो तिथेच असेल मग कशाला नंबर लागेल असे म्हणुन आम्ही पण फार आग्रह केला नाही. आता अवघड झालं होतं. मग इनायत भाईंना फोन केला तर ते म्हणाले की हा माणुस पहलगाम टॅक्सी युनियन चा आहे आणि त्यांच्याकडे पण त्याचा नंबर नाही. मग गाडी नंबर इनायत भाईंना पाठवला त्यावरुन टॅक्सी युनियन च्या ऑफिस मधे जाउन त्या माणसाचा फोन नंबर मिळवला आणि अखेर त्याच्याशी संपर्क केला तर ट्रॅफिक क्लिअर झाले म्हणून साहेब सगळा उतार उतरून खाली जाऊन आमची वाट बघत बसले होते आणि आम्ही तोच सगळा चढ चढून वर येऊन त्यांची वाट बघत बसलो..
असो. बडे बडे देशो मे छोटी छोटी गलतिया होती है ना.. ( रा. रा. शाहरुख खान परत एकदा .. बघा किती तत्वज्ञान असतं भारतीय सिनेमात..आणि लोक उगीच सिनेमाला नावं ठेवतात..)
मग जरा गरमागरमी झाली, आता थेट रूम वर जाऊ वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या.पण पहलगाम च्या गार हवेने लगेच लोक शांत झाले आणि अरु व्हॅली ला एक चक्कर मारून येऊ असे ठरले.
अरु व्हॅली चा रस्ता म्हणजे रस्ताच होता.एकावेळी जेमतेम दोन लहान गाड्या जाऊ शकतील असा थोडा अरुंद रस्ता.एकीकडे डोंगर, दुसरीकडे दरी आणि त्यातून वाहणारी लीडर.पाईन ची झाडं, हिरवेगार डोंगर, मधून वाहणारे धबधबे, छोटी छोटी मातीची घरं,चरायला सोडलेल्या मेंढ्या, घोडे...नितांतसुंदर निसर्ग....
283751650_10159168139629355_1327600298174976683_n.jpg
त्या रस्त्यावरून अरु व्हॅली पर्यंत जाऊन परत येणे हा प्रवास अप्रतिम होता.. पण परत तेच.. वेळ कमी पडला त्यामुळे अरु व्हॅली ला जास्त वेळ थांबता आले नाही.
आमच्या फॉर्म्युला 1 टॅक्सी वाल्याने सुखरूप पहलगाम टॅक्सी स्टँड ला आणले आणि इनायत भाईंच्या हाती सोपवले एकदाचे.
सुंदर आणि थकवणारा दिवस संपला होता..
हॉटेल वर जाऊन फ्रेश होऊन आणि अप्रतिम जेवण ( तिथं खाल्ली तशी फ्लॉवर ची भाजी मी आजवरच्या आयुष्यात कधीच खाल्ली नाहीये) जेऊन अंथरुणावर पाठ टेकली तरी घोड्यावर बसल्यासारखे वाटत होते.
***Travel tips -
-- काश्मीर स्पेशल खरेदीसाठी पहलगाम अतिशय स्वस्त आहे. पुढे श्रीनगर मध्ये बघू वगैरे अजिबात विचार न करता व्यवस्थित खरेदी करा.
"इधर डुप्लिकेट माल मिळता है याहा मत लो दीदी, मै आगे श्रीनगर मे आपको फॅक्टरी मे लेके जाता हु" असे कोणीही कितीही म्हणाले तरी कोणाचंही ऐकू नका.. बिनधास्त खरेदी करा.
-- मार्केट मध्ये पॅराडाइज हॉटेल च्या शेजारी गल्ली मध्ये सुंदर शाली,स्टोल आणि स्वेटर मिळाले. तेच पुढे श्रीनगर ला दुप्पट तिप्पट दरात होते.
-- क्रमशः

पुढच्या भागाची लिंकः
काश्मीर डायरीज -३ : https://www.maayboli.com/node/81928

Group content visibility: 
Use group defaults

काश्मीर हा विषय पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशासाठी अली बाबा ची गुहा आहे.
काश्मीर हा राजकीय फायद्या साठी वापरला जाणारा विषय आहे.
त्या मुळे ह्या प्रवास वर्णन विषयी आणि हेतू विषयी संशक

आहाहा मस्त फोटो आहेत.. माझेही डोळे निवले..
लिहीलयही छान खुशस्खुशीत.. हिंदी चित्रपटातील तत्वज्ञानही आवडले.. अर्थात ते मला आवडणारच होते म्हणा Wink

त्या कपडेपटावर पुरुष वर्ग नाराज असणे अगदी अगदी.. वेज फ्राईड राईसमध्येच थोडेसे चिकन कुस्करून टाकले आणि चिकन फ्राईड राईस म्हणून सर्व्ह केले त्यातला प्रकार असतो. बायकांच्या कपड्यांनाच मेल वर्जन केलेले असते.. तमाम पुरुष वर्गाचे नाराज होणे जायज आहे.

या पहाडात राहणाऱ्या लोकांचा स्टॅमिना बघून आश्चर्य आणि लाज वाटते राव.

ह्याची म्हणजे लाज वाटण्याची काहीच गरज नाही, हिमालयात ऑक्सिजन विरळ असतो अन आपण समुद्रसपाटीपासून वर गेलेलो असतो त्यामुळे आपल्याला दम लागणे नैसर्गिकरित्या साहजिक असते.

पहाडात राहणाऱ्या लोकांची पिढ्यानपिढ्या तिथेच वाढ अन काम होतात, ओव्हर द जनरेशन्स डोंगरातील लोकांच्या रेड ब्लड सेल्स मोठ्या झालेल्या असतात ज्यामुळे त्या तांबड्या रक्तपेशी अधिक प्राणवायू वाहून नेऊ शकतात जे आपण मैदानी टुरिस्ट लोक करू शकत नाही सिम्पल.

खुसखुशीत प्रसंग वर्णन ... छान लिहितेस तू, स्मिता! Happy
पण पहलगामच्या गार हवेने लगेच लोक शांत झाले.>>> Lol आमच्याकडे तर ' मैं यहाँ तू कहाँ...' असे प्रसंग मॉल, स्कूल फुटबॉल गेम्स, after school pick up... अगदी कॉस्कोतही वारंवार येत असत. आता pick up/ drop off नसल्यामुळे, तसेच device tracking app यांमुळे बरेच सुखी आहोत.
डायरीचे हेही पान आवडले. आधीच्या आणि पुढच्या भागांच्या लिंक दिल्यास शोधाशोध करावी लागणार नाही.

आधीच्या आणि पुढच्या भागांच्या लिंक दिल्यास शोधाशोध करावी लागणार नाही. >> बदल केला आहे.धन्यवाद सुचवल्याबद्दल