काश्मीर डायरीज - 1

Submitted by स्मिता श्रीपाद on 12 July, 2022 - 06:48

"आई आपण बर्फात कधी जायचं ?"
अगदी ५-६ वर्षांची असल्या पासून आमची लेक प्रत्येक सुट्टी जवळ आली की आम्हाला म्हणायची.. एकदा अगदी सगळं ठरवता ठरवता काश्मीर ट्रिप फिसकटली होती..
त्यानंतर लांबतच गेली..
गेल्या 2 वर्षानंतर यावर्षी नक्कीच कुठेतरी मोठी ट्रिप काढू असं ठरलं आणि काश्मीर ला जायचंच असं म्हणून जानेवारी पासूनच "अभ्यास" सुरू केला.
विमानाचे दर, ट्रॅव्हल कंपनी चे वेगवेगळे पर्याय बघायला सुरुवात केली....भाऊ-बहिणी, मित्र मंडळी सगळ्यांना हाक दिली..हो नाही करत आमच्या सहा जणांचे जायचे ठरले आणि आमचं विमान आणि KHAB travels तर्फे पॅकेज बुक करून झालं..
आता रोज रात्री डोळे मिटले की एकच स्वप्न डोळ्यासमोर दिसत होतं...
काश्मीर.. पृथ्वीवरचा स्वर्ग.
शॉपिंग,बॅग्स वगैरे वगैरे तयारी सुरू झाली.
आमची customized tour असणार होती त्यामुळे तिथे गेलं की कधी कसं फिरायचं ते आमचं आम्ही ठरवणार होतो..
वेगवेगळे ब्लॉग वाचून itinerary बनवली आणि ती 4 वेळा बदलून पण झाली.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे बर्फ दिसणार होता त्या गुलमर्ग केबल कार ची तिकीट्स बुक केली..
पण इतकं सगळं साधं सोपं नसतं देवा.
काहीतरी गोंधळ झाल्याशिवाय प्रवासाला कसली मजा.
पहिला गोंधळ पुण्यातच सुरू झाला.
जायच्या काही दिवस आधी आमच्या विमान कंपनी चा मेसेज आला की जायच्या दिवशीची पुणे ते श्रीनगर flight cancelled..
झालं
सगळ्या प्लॅंनिंग चा बँडबाजा... रात्री अपरात्री च्या flights नको होत्या म्हणून मुद्दाम दिवसाची flight ठरवली होती तर नेमकी तीच कॅन्सल..
मग कस्टमर केअर ला 10 वेळा फोन.. विमानाचे नवे पर्याय असं करत करत दूसरे विमान बुक झालं.
आणि..
14 मे 2022...
Finally... आम्ही उडायला तयार होतो..
283284023_10159165980414355_6119102064176170677_n.jpg
15 मे 2022..
सकाळी 11 वाजता श्रीनगर मध्ये पोचलो.विमान उतरतानाचे दृश्य बघूनच शब्दशः "दिल गार्डन गार्डन" असं झालं. विमानतळावर पण जिथे जागा मिळेल तिथे हिरवळीचे तुकडे आणि त्यातून डोकावणारी गुलाबाची फुलं..
पुणे 34 डिग्री >> दिल्ली 40 डिग्री >> श्रीनगर 18 डिग्री असा टप्पा सुमारे बारा-तेरा तासात पार केला होता..
विमानतळावर उतरताच पहिल्यांदा जॅकेट चढवलं.
बाहेर आलो तर ट्रॅव्हल कंपनीचा माणूस हातात माझ्या नावाचा वेलकम बोर्ड घेऊन उभा होता...आपल्या नावाचा बोर्ड घेऊन माणूस उभा असायचा हा पहिलाच प्रसंग.मज्जाच वाटली.
हा माणूस म्हणजे इनायत भाई.. पुढचे 6 दिवस आमच्या सोबत असणार होता.
सगळं सामान पटापट गाडीत भरून आमचा प्रवास सुरु झाला तो पहलगाम च्या दिशेने..
"मंजिल से बेहेतर रास्ते" चा प्रत्यय काश्मीर मध्ये कुठेही प्रवास करताना येतो तसाच किंबहुना त्याहून सुंदर असा हा प्रवास होता.रास्ते तर सुंदर होतेच पण मंजिल सुद्धा तितकीच सुंदर.
पहलगाम ला जाताना वाटेत केशराची शेते दिसली. म्हणजे सध्या केशराची फुलं नव्हती पण तरी दूरवर पसरलेल्या त्या विस्तीर्ण शेतात जेव्हा केशराची जांभळी फुलं फुलत असतील तेव्हा किती सुरेख दृश्य दिसत असेल याची कल्पना करूनच मस्त वाटलं..
वाटेत जेवण आणि काश्मिरी कहावा चा आस्वाद घेऊन पहलगाम च्या दिशेने निघालो..
Welcome to Pahalgam ची कमान लागली आणि किती पाहू आणि किती नको अशी अवस्था झाली..
डावीकडे अखंड खळाळत वाहणारी लीडर नदी, आभाळाशी स्पर्धा करणारे पाईन चे वृक्ष, हिरवेगार डोंगर,चिनार आणि अक्रोडची झाडं असं सुरेख चित्र समोर उभं होतं.सुरवातीला उत्साहात दाणादण फोटो काढत सुटलो पण नंतर लक्षात आलं की हे दृश्य फोटोत मावणारच नाही.. मग गपचूप कॅमेरा आत टाकला आणि डोळ्यात साठवून घ्यायला सुरुवात केली..
283460312_10159166719249355_2902072747232581236_n.jpg
साधारण 3 वाजता आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो..
Hotel Pahalgam Retreat..
लीडर नदीच्या काठी असलेले आणि हिरव्या डोंगरांचा नजारा दाखवणारे हे सुरेख टुमदार हॉटेल बघून प्रवासाचा सगळा शीण गायब.
लीडर च्या पाण्याचा खळखळाट अखंड ऐकू येत होता.. शुद्ध स्वच्छ हवा,हॉटेल समोर राखलेली सुरेख हिरवळ आणि त्यात फुलांचा उत्सव मांडला होता..
" किती रे तुझे रंग, किती तुझ्या छाया,
दोनच डोळे माझे, उत्सव जातो वाया"
अशी अवस्था..
283669409_10159166720389355_3039795558881753312_n.jpg283493391_10159166720804355_6190705449597015134_n.jpg
दमून भागून आलेलो, जेवणामुळे पोट जड झालेलं पण खोलीत जाऊन झोपायची इच्छा होईना..
बाहेर बागेत रेंगाळत बसलो..
थोडा वेळाने समोर नदीवर जाऊन भरपूर फोटो काढले..
थोडेसे ढग होते ते बाजूला सरले आणि समोर थेट बर्फ़ाचे शुभ्र डोंगर दर्शन देऊ लागले.. आहाहा.. अजूनही डोळ्यासमोरून चित्र जात नाहीये.
सगळी संध्याकाळ तिथे घालवून मग रात्री हॉटेल मध्ये जेवण करून बाहेर आलो तर पौर्णिमेचा चंद्र समोर दिसत होता..
एखादा दिवस किती सुंदर असावा..
हा दिवस दाखवल्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानत आणि उद्याची सुंदर स्वप्नं बघत मऊ दुलईत शिरलो..
283655149_10159166719104355_1076367897618524300_n.jpg
Travel tips -
-- पहलगाम अतिशय सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही काश्मीर ट्रिप प्लॅन करताना यासाठी किमान 2 दिवस जरूर बाजूला ठेवा.
-- आमचे हॉटेल मूळ पहलगाम गाव/मार्केट च्या 12-13 किमी अलीकडेच पायथ्याला होते. वर मार्केट आणि गावात खूप गर्दी आहे. त्यापेक्षा खाली जास्त सुंदर शांत वाटले.
--- क्रमशः

पुढील भाग : https://www.maayboli.com/node/81916

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त सुरूवात!
तुमच्याबरोबर आमचीही काश्मीर ट्रीप होईल Happy

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

@वीरु, पुढ्च्या भागात अजुन सविस्तर लिहायचा प्रयत्न करते

@राधिका, मला नाव माहित नाही फुलांचं... हॉटेल च्या आवारात होती . आवडली म्हणुन फोटो काढला.

@आबा. , @अमा, धन्यवाद.

मस्त !! काश्मीर ट्रिप या वर्षी काही कारणाने नाही जमली . तुमच्या लेखमाले मुळे आमचीही होईल .

प्लीज धाग्याचे नाव काश्मीर डायरीज आहे ते बदला.
त्यामुळे हा धागा त्या चित्रपटावर आहे असा गैर समज होतो आहे...शिवाय काश्मीर डायरीज हा फारच सिरियस चित्रपट आहे... तर त्याचं गांभिर्य तसंच राहू द्या.....>>> काहीही एकतर काश्मीर फाईल्स मुव्ही आहे आणि धागाकर्त्याची मर्जी काय नाव द्यायचे ते. म्हणजे आता लोकांनी काश्मीरचे प्रवासवर्णन पण लिहायचे नाही का.
बाकी मस्त प्रवासवर्णन आहे. जास्त फाफटपसारा न लिहता एकदम क्रिस्प.

प्लीज धाग्याचे नाव काश्मीर डायरीज आहे ते बदला.
त्यामुळे हा धागा त्या चित्रपटावर आहे असा गैर समज होतो आहे...शिवाय काश्मीर डायरीज हा फारच सिरियस चित्रपट आहे... तर त्याचं गांभिर्य तसंच राहू द्या..... >>> बळंच. काहीही