कल्चरल शॉक - जर्मनीतील एक रेल्वे प्रवास

Submitted by वैनिल on 29 June, 2022 - 08:54

हा किस्सा २००० सालातला आहे. नुकताच एका IT company मध्ये स्थिरावलो होतो आणि नोव्हेंबर १९९९ मध्ये दक्षिण जर्मनीतल्या एका छोट्याशा गावात वर्षभराच्या onsite assignment साठी येऊन पोहोचलो होतो. सोबत २ colleague ही होते. तिघांच्याही गेल्या ७ पिढ्यांमधली पहिलीच परदेश वारी होती. त्यात भर म्हणून German भाषेचं गमभन ही येत नव्हतं.

पहिल्या ३ महिन्यांत ऑफिसमध्ये colleagues सोबत बोलून आणि जिथे paying guest म्हणून राहात होतो, त्या landlady सोबत बोलून थोडीफार German भाषेची अक्षर ओळख व्हायला लागली होती. तोडकी-मोडकी का होईना, पण २-४ वाक्यं जुळवून बोलता यायला लागली, तशी हिंमत वाढायला लागली. फेब्रुवारी महिन्यापासून रेल्वेच्या Wochenende Kart* (Weekend pass) वर आजूबाजूच्या (२०-२५ मिनिटांच्या अंतरावरच्या) गावांमध्ये २-४ वेळा जाऊन आल्यावर तर आता आपण कुठेही भटकू शकतो, असा आत्मविश्वास वाटायला लागला. Summer season जवळ येतच होता. Paris, Salzburg खुणावायला लागले.

[* २००० साली हा weekend pass ३५ DM मध्ये मिळायचा आणि त्या पासावर ५ जण शनिवार आणि रविवार असे २ दिवस अक्ख्या Germany भर कुठेही फिरू शकत असंत. अटी दोनच - हा पास फक्त Reginal Bahn (local/regional train) साठी वापरता यायचा (i.e. no long distance trains) आणि seats reserve करता यायच्या नाहीत. पण बर्‍याचदा बसायला जागा मिळायची. किंबहुना लोकांनी मोटारी ऐवजी रेल्वे वापरावी म्हणूनच हा पास असावा. त्यामुळे trains बर्‍याचशा रिकाम्याच असंत. सध्या हा पास ३५ euro ला मिळतो आणि बहुधा एका दिवसा पुरताच असतो.]

Paris वगैरे साठी country border cross करण्याआधी Germany मधलाच एखादा लांबचा प्रवास आधी करून पहावा, असं विचारांती ठरलं. खरं तर तशी गरज नव्हती, पण आमचा एक मित्र सतत tension मध्ये असायचा - आपल्याकडून काही चूक तर होत नाहीये ना. त्यामुळे हा विचार नक्की झाला. तसंही कुठेतरी भटकायचं ते तिथे जाऊ, असाही विचार होता. ईथे-तिथे चॉकशी केल्यावर उत्तर जर्मनीमधल्या Hamburg मधल्या एका भारतीय चमूचा बादरायण संबंध मिळाला. त्यांच्याशी emails exchange करून यायच्या-जायच्या तारखा आणि तिथला भटकंतीचा plan ही ठरला.

पुढचा टप्पा रेल्वे आरक्षणाचा. जर्मनीमधल्या ICE (InterCity Express) train चा बराच बोलबाला तेव्हा ऐकला होता (आणि तो खराही आहे). त्या train ने प्रवास करायचं स्वप्न ह्या निमित्ताने पूर्ण होणार होतं! Offenburg ह्या जवळच्या एका station वरून रात्री ११ वाजता ही train पकडली तर पहाटे ५:३० ला आम्ही Hamburg ला पोहोचणार होतो. मग अख्खा दिवस भटकायला मिळणार होता. वा ! आम्ही Advance booking करून टाकलं.

----- xxxxxx -----

अखेर प्रवासाचा दिवस उजाडला. ऑफिसमधली सगळी कामं संपवून आणि सहकार्‍यांना सांगून आम्ही बॅगा घेऊन स्टेशनवर आलो. Regional Bahn पकडून १ तासाचा प्रवास करून ICE च्या वेळेच्या तासभर आधीच आम्ही Offenburg station वर येऊन पोहोचलो. Railway junction असल्यामुळे हे स्टेशन इतर स्टेशनपेक्षा मोठं आहे. व्यवस्थित पोटपूजा करून आणि आमची ICE नक्की कुठल्या platform ला लागणार, ते पाहून आम्ही निवांतपणे बसलो. इतर प्लॅटफॉर्मवरून बाकिच्या trains (incl. ICE) जात-येत होत्या.

आमची ICE ठरल्या वेळेला, ठरल्या प्लॅटफॉर्मला आली. गाडीत चढायला जेमतेम १५-२० जण असावेत. बहुधा मधलं स्टेशन असल्याने गर्दी नसावी. Coach नंबर वगैरे बघून आम्ही आत चढलो, आमच्या berth पाशी पोहोचलो आणि 'आ' वासून बघतच राहिलो. एका coupe मध्ये पांढर्‍याशुभ्र चादरी घालून नीट नेटके तयार केलेले sleeping berths, पांढर्‍याशुभ्र मऊ उशा, व्यवस्थित घडी घातलेलं जाड पांघरूण आणि डोक्याशी एक adjustable lamp! आत्तापर्यंत भारतीय रेल्वेच्या General sleeper coach मधून प्रवास केलेले आम्ही तिघंही इथला General sleeper चा थाट पाहून थिजलो होतो.

सर्वात आधी आमचा शंकेखोर मित्र भानावर आला. "आपण बहुतेक चुकीच्या डब्यात शिरलो आहोत रे. टी.सी. ने पकडायच्या आत दुसर्‍या डब्यात जाऊया. चला." 'असं कसं होईल?', असं म्हणत त्याला समजावायला मी वळलो, तर आमच्या समोर एक टी.सी.ण काकू उभ्या! बहुतांशी जर्मन लोकांचे चेहरे एवढे करारी का असतात, कोण जाणे; पण तिचा चेहरा बघून आपलंच चुकलं असणार, असंच वाटून गेलं. तिला काय घडलंय ते तोडक्यामोडक्या वाक्यात सांगायचा प्रयत्न केला, पण आमच्या दिव्य जर्मन ज्ञानामुळे ती बहुधा अजूनच गोंधळली असावी. शेवटी तिने माझ्या हातातलं तिकिट काढून घेतलं, त्यावर एक नजर फिरवली आणि पाठ वळवून ती तिकिट घेऊन चालायला लागली.

आमचं धाबंच दणाणलं. तिकिट घेऊन जाण्याच्या कृतीचा आम्हाला अर्थच लागेना. आमचा मित्र तर मटकन खालीच बसला आणि म्हणाला, "आता ही बया जाऊन पोलिसांना घेऊन येणार!". मी तिच्या मागे धावलो आणि पुढच्या डब्यात तिला गाठून 'आमची कशी काहीच चूक नाही, आम्ही पाहिजे तर प्रवास रद्द करतो, पण तिकिट परत करा", वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला. ती बिचारी गोंधळून माझ्या चेहर्‍याकडे बघत राहिली. 'हा बहुतेक ठार वेडा असावा' असे काहीसे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.

त्या डब्यातला एक सदगृहस्थ बराच वेळ माझी शाब्दिक झटापट ऐकत होता, तो उठून पुढे आला आणि स्वच्छ इंग्रजी भाषेत त्याने मला काय घडलंय, ते विचारलं. घडलेला प्रसंग ऐकून तो खो-खो हसतच सुटला. मग त्याने त्या टी.सी.ला जर्मन भाषेत काहीतरी सांगितलं आणि दोघेही हसत सुटले.

माझा गोंधळ उडालेला पाहून त्याने हसू आवरत मला समजावलं, "तुमचं तिकिट बरोबर आहे, गाडीही बरोबर आहे. आता तुम्ही योग्य गाडीत चढल्यानंतर तुमच्या प्रवासाची जबाबदारी ही रेल्वेची, पर्यायाने टी.सी.ची आहे. तुमचा प्रवास रात्रीचा असल्याने तुम्ही निवांत झोपा. तुमच्या destination station च्या १० मिनिटं आधी तुम्हाला टी.सी. येऊन उठवेल. ती त्यांची duty आहे आणि त्यासाठी ती तिकिट घेऊन जाते आहे!"

आणि खरोखर Hamburg यायच्या आधी दुसरा एक टी.सी. येऊन आम्हाला हाक मारून उठवून, आमची तिकिटं देऊन गेला. पण आमचा शंकेखोर मित्र मात्र रात्रभर दर अर्ध्या-एक तासाने उठून घड्याळ चेक करत होता. Happy

(ह्या लेखाचा स्फूर्तिस्रोतः https://www.maayboli.com/node/66584)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी किस्सा आहे..
बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है Happy

हा हा.. सहीय! अविस्मरणीय अनुभव!
रच्याकने, प्रवासातील अविस्मरणीय अनुभव असा धागा निघू शकतो : D

छान अनुभव कथन. माझा अजून जर्मनीला जाण्याचा योग आलेला नाही, पण, तरीही हे वाचत असताना डोळ्यांसमोरून चित्रं सरकत होती.

लेख म्हणून वेगळा धक्का दिल्याबद्दल धन्यवाद.
मागच्या सात पिढ्या आणि या जन्मात आम्ही परदेश जाणार नाही हा धक्का नाहीच. त्यामुळे फोटोबिटो टाका.

किती छान ! ओ खरच फोटो टाका बरं का. पहायला आवडतील. अजून अनूभव येऊ द्या.

मायबोलीला लाईक करायचे बटण तयार करा हो अ‍ॅडमीन.

असे झटके बसतात खरंय. आपल्या मनात सर्वात आधी पोलीस पकडून नेतील, अपमानास्पद वागणूक मिळेल, जबरी दंड होईल, रात्री बेरात्री मध्येच उतरवायला लावतील वगैरे वगैरे काय काय येते. प्रत्यक्ष जरी चुकीच्या डब्यात बसला असतात तरी फार भयानक काही घडले नसते. अर्थात हे आता कळते. मी सुद्धा असे अनुभव घेतल्याने हे कोरिलेट झाले.