
विश्वरूपम नंतर कमल हसन सिनेमाच्या वाटेला गेलेला नाही. गेली आठ वर्षे त्याने ब्रेक घेतला आहे. त्याचे वयही दरम्यान वाढून ६७ झाले आहे. म्हणजे खानांपेक्षा सात आठ वर्षांनी जास्त असावा. विश्वरूपम मधे वय जाणवत असले तरी अगदीच वयस्कर वाटत नव्हता. केजीएफ, पुष्पा सारखे सिनेमे चालले हे पाहिल्यावर विश्वरूपम पडण्याचे कारण काही केल्या समजत नाही. ही आठ वर्षात झालेली प्र(अधो)गती म्हणायची का ?
विश्वरूपमची हाताळणी संथ होती. त्यात नायक भरत नाट्यम शिकवणारा म्हणून बायकी दाखवलेला आहे. त्याची बायकोही दुसर्या कुणाबरोबर तरी अफेअर मधे आहे. त्यांचे लग्न टिकण्यासारखे नाही. असे तपशील बारकाईने दिले आहेत. या फॅमिली ड्रामामधे बरीच रीळं खर्च झालीत. पण जेव्हां कमल हसनची असली ओळख होते तेव्हांचा त्याचा रुद्रावतार हे धक्कातंत्र होतं. तो संपूर्ण सीन वीस ते पंचवीस मिनिटांचा होता. त्याच प्रमाणे अफगाणिस्तान कि इराक मधल्या कुठल्याशा वाळवंटी भागातल्या भूमिगत दहशतवादी अड्ड्यावरचा थरारही सलग वीसेक मिनिटांचा होता. त्या आधीचा त्या अड्ड्यावरचा दिनक्रमही एक सलग मोठा सीन होता.
हेच तंत्र विक्रम मधे आहे. मध्यंतराच्या आधीचा सलग ४५ मिनिटांचा सीन आणि त्यातली थरार दृश्ये ही चढत्या भाजणीने वेगवान होत जातात. यात कुठेही भौतिकशास्त्राचे नियम नव्या शास्त्राप्रमाणे घेण्याची गरज पडलेली नाही. हा एक सुखद धक्का आहे. त्यामुळे एक जण अनेकांची धुलाई करतो हे त्या मानाने आपल्याला पचनी पाडून घ्यायला त्रास होत नाही. अमिताभच्या सिनेमात तो एकटा अनेक जणांना लोळवायचा तेव्हां तो त्याच्या अभिनयाने ते खरे वाटायला लावायचा. त्या वेळी प्रत्यक्ष हाणामारीपेक्षा त्याचा आवेश आणि लवंगी फटाक्यासारखे चुरचुरीत संवाद ही त्या अॅक्शन सीनची वैशिष्ट्ये असायची.
" पीटर, तुम मुझे वहां ढूंढ रहे थे और मै तुम्हारा यहा इंतजार कर रहा था " हा जावेद टच असलेला संवाद आणि सीन मधले सलीम यांचे हाय व्होल्टेज नाट्य यामुळे किती ठोसे मारले हे महत्वाचे नसायचे.
आत्ता म्हणजे " आय डोन्ट लाईक व्हायोलन्स, बट व्हायोलन्स लाईक्स मी " असले संवाद त्या सीनमधला ड्रामा नष्ट करतात आणि फक्त सुधारित भौतिकशास्त्र बघणे हेच एक काम राहते. विक्रम आता तिकडून साऊथ वाल्यांना मानवी मर्यादेत घेऊन निघाला आहे त्यामुळे त्याला अनेक गुन्हे माफ.
कथा तशी छोटीच आहे. तिचं सादरीकरण हे साऊथ पद्धतीचे आहे. त्या बाबतीत साऊथच्या सिनेम्यांना गुण द्यायलाच पाहीजेत. आपण जुन्या अॅक्शन पटाच्या अपेक्षेने पाहतो, पण ओटीटीच्या पिढीसाठी हे तंत्र कदाचित आवश्यक असावं. तीन तासाचा सिनेमा दीड तासात पळवून संपवणार्या पिढीला तसेही थेटरपर्यंत खेचून २ तास ५० मिनिटे बांधून ठेवणे हे आव्हानच आहे. मध्यांतरापर्यंत विक्रम त्यात २०० टक्के यशस्वी होतो.
कमल हसन एक नशेच्या आहारी गेलेला वयस्कर गृहस्थ आहे. कोणत्याही गुंड मवाल्यांच्या वस्तीत जाऊन त्यांच्याबरोबर दारू प्यायला त्याला काहीच वाटत नसते. नशेच्या अंमलाखाली ड्राईव्ह करताना त्याची कार झाडाला धडकते. त्याच वेळी एका गोडाऊन वर काही अज्ञात लोकांकडून रेड चाललेली असते. कैथी च्या पुढचा हा भाग आहे. पण कैथी नसेल पाहिला तरी अजिबात बिघडत नाही. दोन गायब कंटेनर साठी तो मनुष्य रेड करत असतो आणि बॉसला अपडेट करत असतो. पण तिथे गंजलेली शस्त्रे असतात. त्यांना हवा तो माल तिथे नसतो. अचानक संभाषण तुटते.*
दुसरीकडे कमल हसनला गाडीतून ओढून काही जण अज्ञात स्थळी नेतात. ***
पुढच्या सीन मधे डीसीपी एका मीटिंग मधे पोलिसांच्या ईमेल वर आलेले तीन व्हिडीओ मोठ्या स्क्रीनवर दाखवत असतात. डीसीपी च्या मिटींगला एव्हढे पोलीस अधिकारी का येतात हे आजवर न उलगडलेले कोडे आहे. म्हणजे ज्या अधिकार्याला केस द्यायची हे ठरलेय रेशपेन ड्राईव्ह दिला कि संपले ना ? ज्यांचा संबंध नाही त्यांना बोलावून ( ते बहुतेक मलेरिया विभागातल्या प्रमाणे मच्छर मारण्याच्या कामातून वेळ(च वेळ) काढून आलेले असल्याप्रमाणे) त्यांना हे सगळे सांगण्याचे कारण काय असावे ? पण सिनेजगताला पोलीसांनी एखादी केस गांभिर्याने घेतली आहे हे दाखवण्यासाठी कॉन्फरन्स हॉल, फॉरवर्ड, रिवाईंड, स्टॉप अशा आज्ञा देणारा हुषार अधिकारी हेच अपेक्षित असावे. (आठवा इन्कार मधला विनोद खन्ना - अचूक जागी फिल्म थांबवतो).
या व्हिडीओत तो रेड करणारा अधिकारी, अन्य एक पोलीस अधिकारी यांना काही नकाबधारी वेगवेगळ्या क्रूर पद्धतीने मारताना दाखवले आहेत. त्यात त्यांचा मेसेज असतो की "ही हत्या नाही, तर स्टेटमेंट आहे सिस्टीमच्या विरोधात " आणि कमल हसनच्या छातीत सुरा खुपसून एल आकाराचा कट घेऊन त्याला खुर्चीला बांधलेल्या स्थितीत ग्रेनेडच्या हवाली करताना दर्शवले आहे. इथे डीसीपी विचारतो कि " पहिले दोन पोलिसांशी संबंधित होते पण हा तिसरा जर पोलीसांशी संबंधित नाही तर याची का हत्या केली ? ***
मग तिथे फहाद फजलची टीम येते. डीसीपी त्याला मदत मागतो. तो अटी घालतो. माझ्यावर कायदा लागू होणार नाही. नियम लावले तर आम्ही ते तोडू . आमची आयडेन्टिटी गुप्त राहील.
इथे डीसीपीला एक अधिकारी प्रेक्षकांच्या सोयीसाठी शंका विचारतो. मग डीसीपी फहाद फजलची माहिती सांगतो. ही इन्व्हेस्टीगेशनची स्पेशल टीम आहे. यांचे आधार कार्ड नसते. ओळख नसते. यांना ज्या नावाने आपण ओळखतो ते खरे नसते.
फहाद मग चौकशी सुरू करतो ती कमल हसनच्या केसपासून. इथून कमल हसनची पार्श्वभूमी, त्याच्या हत्येचे गूढ उलगडाला लागते. अनेक घटना समांतर घडत असतात. काही फ्लॅशबॅक मधे घडत राहतात. तर काही फ्लॅशबॅक आणि चालू काळ असे मिश्रण या तंत्राने येतात.
फहाद कमलहनसच्या दिनक्रम समजून घेऊन एका झाडाजवळ येतो तेव्हां तिथे कमल समोर बसलेला असतो आणि त्याच्या समोर फहाद उभा असतो हे तंत्र प्रभावी आहे. तो इथे असा बसला असेल हे चालू काळात समजून घेताना दाखवण्यासाठी त्याचा उपयोग छान केला आहे.
या चौकशीत त्याचे कॅरेक्टर नशेडी, गंजेडी , वूमनायजर असे येत राहते. त्याची सून त्याला कधीच सासरा मानत नसते. तिच्या मुलाला जन्मतःच हृदयात एक छिद्र असते. मोठा आवाज झाला तर त्याला त्रास होत असतो. पण कमल हसन रोज ड्रिंक करून कार पार्क करताना धडका देऊनच पार्क करत राहतो.
याचे कारण म्हणजे रेड मधे ज्याची हत्या झाली तो त्याचा (मानलेला) मुलगा असतो. त्याची हत्या झाल्यापासूनच तो असा सैरभैर झालेला असतो.
एका क्षणानंतर फहादच्या एक गोष्ट लक्षात येते की आपण त्याचा दिनक्रम जाणून घ्यावा ही त्याची इच्छा होती. त्याने जाणून बुजून क्ल्यु सोडलेले आहेत. हा विचार डोक्यात आल्यावर तो नव्याने त्या जागा बारकाईने पाहतो आणि त्याच्या हाती अशी गोष्ट लागते ज्यामुळे हे गूढ आणखी गडद होत जाते. नकाबपोश हत्यार्यांना शोधण्यासाठी त्याची टीम जवळजवळ यशस्वीच झालेली असते, इतक्यात हाती आलेल्या या पुराव्यांमुळे फहादची मती गुंग होऊन जाते.
इथून पुढे ४५ मिनिटे तो निव्वळ कर्तव्यभावना म्हणून हिटलिस्ट मधल्या पुढच्या व्यक्तीला वाचवायला जातो. ही प्रसंगांची वेगवान मालिका सलग चालू राहते आणि श्वास घ्यायला उसंतही न देता मध्यांतरापर्यंत खिळवून ठेवते.
मध्यंतर होता होता आपल्यालाही गूढ उकलते आणि मग मध्यंतरानंतर नेहमी प्रमाणे पण आग ओकणार्या अर्नोल्डच्या शॉटगन्स ते हेवी स्टेनगन्स , तोफा आणि दारूगोळ्याचे शोभाकाम हे दिसत राहते. पुढच्या हाफ मधे खिळवून ठेवण्यासाठी मिस्ट्री उलगडण्यासारखा रोचक भाग नसल्याने या भागात भावनिक नाती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इथे पटकथा ठिसूळ झाली आहे. कमी पडली आहे. नाट्यमयता पुन्हा शेवटी येते. पण मध्यंतरापासून काही काळ निव्वळच पाठलाग आणि हाणामार्या हा कंटाळवाणा भाग झालेला आहे. इथे पटकथेवर थोडी मेहनत घेता आली असती.
कमल हासनने काय जोरदार पुनरागमन केलेय हे सतत वाटत राहते. सेतुपती विजय , सूर्या सारख्या सुपरस्टार्सना सारख्यांना खलनायकी भूमिका स्विकारणे कदाचित फायद्याचे असावे. सूर्या चित्रपटाच्या शेवटी दिसतो. तो बहुधा सूर्यवंशीच्या जॅकी श्रॉफ प्रमाणे पुढच्या भागासाठी राखीव कौरव असणार. पुढचा भाग येणार हे निश्चित आहे.
फहादला खूप मोठी संधी मिळाली आहे. त्याने त्याचा वावर विलक्षण सहज ठेवला आहे. हा गुणी मल्याळी अभिनेता अनेक वेबसिरीज मधे पाहिला आहे असे वाटते. सेतुपती विजय हा रोमॅण्टिक भूमिकांसाठी आपल्याकडे अजिबात चालणार नाही. धनुषलाही नाके मुरडली गेली होती. पण त्याने क्रूरकर्म्याचे काम करताना जी बॉडी लँग्वेज वापरली आहे ती अफलातून आहे.
शेवटी सिनेमा संपल्याचे समाधान मिळते. इंटर्वलला काही तरी जबरदस्त पाहिल्याचे समाधान मिळते ते नंतर टिकत नाही हा विक्रमचा अवगुण आहे. तरीही सध्याच्या साऊथच्या अमानवी चित्रपटांपेक्षा लाखो पटीने सुसह्य आहे हेच काय ते समाधान आहे. कदाचित चित्रपटाची लांबी कमी केली असती तर तीच तीच हाणामारी पाहताना येणारा कंटाळा आला नसता.
मध्यंतराच्या आधीचा लाँग सिक्वेन्स आणि शेवटचा अर्धा तास हॉलिवूडला टक्कर देणारा आहे. रोबो पासून रजनी कमल हसनच्या पुढे निर्विवाद पुढे निघून गेला. त्याला विक्रम हे उत्तर आहे. एकदा पहायला हरकत नाही. थिएटर मधे साऊंड इफेक्ट्स सहीत पाहताना आवडेल. छोट्या स्क्रीनवर प्रभाव पडणार नाही. हॉटस्टारचे नाव पार्टनर म्हणून आले आहे. पुढच्या महिन्यात उपलब्ध होईलच.
* , ** . *** - या खुणांमधला मजकूर वाचला तर हे लक्षात येते की ज्या वेळी गोडाऊन वर रेड चालू आहे त्याच वेळी कमलचा अपघात झाला आहे आनि त्याला उचलून घेऊन गेले आहेत. व्हिडीओ मधे एका पाठोपाठ एक हत्या झाल्या आहेत. जर रेड करणारा कमलचा मुलगा होता तर त्याच्या हत्येनंतर तो नशेच्या आहारी जाऊन सहा महीने वैफल्यग्रस्त फिरायला त्या वेळ कुठे मिळालाय ? इथे मी काही मिसले कि पटकथेचा दोष आहे ?
छान परिचय.
छान परिचय.
भारी लिहिलंय. शेवटची पाटी पण
भारी लिहिलंय. शेवटची पाटी पण मस्त !!!
छान चित्रपट परिक्षण..!
छान चित्रपट परिक्षण..!
डोळ्यांसमोर उभे राहतात प्रसंग..
पूर्वी वाटायची तशी ओढ नाही वाटत आता सिनेमा पाहायची .. मात्र जेव्हा कधी हा सिनेमा पाहीन तेव्हा पुन्हा एकदा हा लेख नक्की वाचेन..
कुमार सर, पियू आणि रुपाली
कुमार सर, पियू आणि रुपाली विशे - पाटील.. आपले आभार.
भारी परीक्षण
भारी परीक्षण
चित्रपट बघेनच हा
छान परिचय , चित्रपट बघावासा
छान परिचय , चित्रपट बघावासा वाटतोय.
कमलचे पुष्पक विमान पासून
कमलचे पुष्पक विमान पासून हिंदुस्थानी पर्यंतचे चित्रपट आवडीने बघावेसे वाटत, पण नंतर तंत्रज्ञान अभिनय / कथा / दिग्दर्शनाला वरचढ होत गेले तसा इंटरेस्ट संपला.
मस्त रिव्यु.ऑफिसातु न लंच
मस्त रिव्यु.ऑफिसातु न लंच करताना वाचायला राखुन ठेवला होता.