शुन्याक्षर कथा

Submitted by रंगिला on 6 June, 2022 - 06:44

शुन्याक्षर कथा हे वाचून अनेकांना अचंबा वाटला असेल. अनेकांना हे वाटले असेल की शब्द सोडा एकही अक्षर न वापरता लिहली गेलेली कथा ही चित्र कथा तर नाही ? अनेकांना असे ही वाटले असेल की ही कथा अनुस्वार, वेलांटी, उकार, पुर्णविराम. प्रश्नचिन्ह किंवा उद्गार चिन्हाने साकारली आहे किंवा कसे ?

तस नाही हो. मला हेच सांगायचे आहे की कथेचे इतके संक्षिप्त रुप असू शकत नाही. क्रिएटीविटी वगैरे ठीक आहे पण नाहीच म्हणजे शुन्य शब्द कथा सुध्दा शक्य नसते तिथे शुन्याक्षर कथा लिहीणार एकतर अक्षरशत्रु असणार किंवा एम एफ हुसैन सारखा चित्रकार ज्याला चित्रातुन काय प्रकट करायचे आहे त्याचे त्याला कळले असेल किंवा नसेल माहित नाही. आता विचारायची सोय नाही. शिवाय जिवंत असताना त्याची चित्रे लाखो रुपयांना विकली जात असताना तो खरे थोडीच बोलला असता ?

आपण मागे गेलो तर आपल्याला कादंबरी नंतर गद्य लिखाणात दिर्घ कथा आणि लघु कथा हे कथा प्रकार वाचायला मिळाले. जसे गदीमांचे दिर्घ काव्य म्हणजे दहा एक कडवी असलेले त्यानंतर मोजून मापुन तीन कडव्यांचे अनेकांनी केले. दिर्घ काव्य असो की तीन कडवी होतील असे लघु काव्य यात गेयता होती. चालीत बांधता येत होते. चालीत बांधले आणि सुरेल आवाजात संगीतबध्द झाल्यानंतर तेच काव्य अनेकांना भावले असे होत असे.

एका कडव्याचा दुसर्या शी संबंध नाही पण गेयता आहे किंवा कमीत कमी पंडीत ह्र्दयनाथ मंगेशकरांना त्याची चाला सुचली अशी अनेक काव्ये भुतलावर आहेत किंवा असतील. अश्या असंबध्द कवितांना किंवा काव्य प्रकारांना किमान संगीतामुळे नाव मिळाले असे ही झाले असेल. शब्दप्रधान हा शब्दप्रयोग इथे संपला आणि सुरप्रधान नावाचा काव्य प्रकार हिंदी मराठीत धुमाकूळ घालतोय. लोकांना भावतोय पण त्यात काही शब्द नक्कीच आहेत.

अजुनही मराठी किंवा हिंदी सिनेमात शात्रीय गायनात तराणा नावाचा प्रकार असतो तसा आलेला नाही. किंवा एखाद्या सिनेमात सात गाणी आहेत आणि एकही गाणे शब्द बध्द नाही. असे घडलेले नाही. कधी तरी घडले तर ती संगीतकाराची कमाल असेल. अन्यथा टुकार यमक जुळवलेली गाणी यांना चाली लावणे म्हणजे संगीतकाराची कसोटी असेल. यासाठीच संगीतकार नावारुपाला आले आणि गीतकार मात्र अल्प मोबदल्यात गीते लिहून जगले.

मग रामदास फुटाणे यांनी मराठीत एक क्रिएटीव्ह प्रयोग आणला ज्याचे नाव चारोळी आहे. यात गेयता नव्हती. अटलबिहारींच्या गद्य कवितातलाच एक प्रकार असे म्हणले तर वावगे ठरु नये. पण त्यांच्या चारोळी सुध्दा समयोचीत असल्याने खुप गाजल्या.

अगदी प्रथम रामदास आठवले यांना मंत्रीपद मिळाल्यावर केलेली चारोळी तर खुप प्रसिध्दी त्यांना देऊन गेली. त्या चार ओळीत अनेक अर्थ असत, बसेल त्याला चिमटा काढलेला असे.

त्रिवेणी नावाचा तीन ओळीच्या काव्य प्रकार कुणीतरी आणला पण त्यामागचा माणुस जबरदस्त नसल्यामुळे त्या त्रिवेण्या आणि कवी माझ्या तरी स्मरणात राहीला नाही. अजुनही दोन ओळीची कविता किंवा एक ओळीची कविता लिहील्याचे मला माहित नाही.

लेखनात मात्र दिर्घ कथा , लघु कथे वरुन शत शब्द कथा नावाच्या प्रकारात लेखनाला सुरवात झालेली आहे. मोजून मापुन १०० शब्द लिहायचे. यातुन लेखनाचा लेखकाला तरी आनंद मिळतो किंवा नाही हे लेखकच जाणे.

इथे संपले असे नाही. कालच १४ अल्पशब्द कथा नावाचा प्रयोग फेसबुक वर पाहिला. एका कथेत साधारण पणे चार ओळी. प्रत्येक ओळीत सात आठ शब्द. काव्य लिहायचे म्हणले तर किमान यमक जुळावे असे बंधन इथे नसते. आई कमळ बघ अशी बालभारती मधील वाक्ये इयत्ता पहिलीच्या मुलांना शिकवली जायची त्यात चार शब्द अजून जोडले म्हणजे एक वाक्य असा प्रकार.

या कथेचे वर्णन आपण एखाद्या मित्राला करायचे ठरवले तर असे होईल.

ती आली.
तिने त्याच्या कडे पाहिले.
ती हसली.
त्याला वाटले ती पटली.

असल्या सुमार कथेच्या लेखकाला तो प्रसंग पुन्हा आठवून गुदगुल्या झाल्या असतील हो पण वाचकांचे काय ? आणि समिक्षक मंडळीना वाडःमय मुल्य वगैरे कसे करता येणार ही कथा वाचून ?

म्हणुन सांगतो शत शब्द कथा, अल्प शब्द कथा, एकशब्द कथा किंवा एकाक्षर कथा असले प्रकार कुणीही लिहावे . कारण भारतीय राजघटनेने तुम्हाला प्रकट होण्याचे स्वातंत्र्य जरुर दिले आहे. पण यातुन वाचकांना आनंद नाही.

Group content visibility: 
Use group defaults

कथेचा उद्देश एखाद्या अनुभवाचे स्वतः चा किंवा इतरांचा त्याचे सार्वत्रिकीकरण करणे. हे फक्त पात्र संवादातून जरी साधता आले तरी जेव्हा आजुबाजुचे वातावरणही बोलके होते तेव्हा ते अधिक भावते. उदाहरणार्थ गोंधळात कथीलेल्या पौराणिक कथा, दंतकथा. प्रथितयश लेखकांच्या कथा वाचकाच्या डोळ्यासमोर फक्त पात्र उभी करुन थांबत नाहीत तर भवतालही जिवंत करतात. यामुळे विशिष्ठ काळी, विशिष्ठ परिस्थितीत ते पात्र तसे का वागले हेही जास्त समजतं. शिवरायांच्या लढाया समजायला गड किल्ले कसे होते, मारुती चितमपल्ली समजायला जंगल कसं होतं आदी वर्णनं असायलाच हवी. मला नीटसे आठवत नाही पण रामायणही चार ओळींच्या श्लोकात आहे. एका गृहिणीला एका साधूने भिक्षा मागितली आणि गृहिणीने त्याला वाटीभर ताक सशर्त दिले. अट होती मला रामायण ऐकवं. आता एक वाटी ताकासाठी संपूर्ण रामायण किती महाग सौदा. ते चार ओळीचं झालं. संपूर्ण रामायण आणि चार ओळीचं ताकापुरतं रामायण कुठलं सुंदर हे आपण ठरवायचं.

पूर्वीची टपाल पाठवून आस्थेने केली जाणारी विचारपुस आणि आताचा २ ओळींचा व्हाट्सअप संदेश हे जसे काळानुरूप आणि उपलब्ध वेळेच्या सोई नुसार घडलेले सामजिक बदल आहेत त्याच प्रमाणे बहुतांश लोकांना शशक वाचायला सोप्पी आणि वेळेच्या दृष्टीने सुलभ वाटत असेल तर त्यात नक्की चूक काय आहे. मागणी तशी पुरवठा ह्या न्यायाने लेखक शशक लिहितच राहणार.

त्रिवेणी नावाचा तीन ओळीच्या काव्य प्रकार कुणीतरी आणला पण त्यामागचा माणुस जबरदस्त नसल्यामुळे त्या त्रिवेण्या आणि कवी माझ्या तरी स्मरणात राहीला नाही. >>>
त्रिवेणी गुलजार यांनी आणली. हा माणूस जबरदस्त नसेल तर कोण असेल बरं? ते असो. जरूर वाचून पहा ते पुस्तक. खूप छान आहे. शांता शेळके यांनी त्या त्रिवेण्या मराठीत अनुवादित केल्या आहेत. मी अनुवाद अजून वाचला नाहीये. वाचायची इच्छा नक्कीच आहे.

मायबोलीवर प्रकाशित झालेली पहिली शतशब्दकथा माझी होती. जर मी चुकत नसेल तर तुमचा अभिषेक आयडीने लिहिली होती. "आतिवास" नामक आयडीने लिखाण करणाऱ्या एका ताईंना आधी मी हे दुसऱ्या संकेतस्थळावर लिहिताना पाहिलेले.

विषय निघालाय तर लिंक झेला,

सावल्या ___ शतशब्दकथा (१०० शब्दांत कथा)
https://www.maayboli.com/node/44507

वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा
https://www.maayboli.com/node/44552

धाडस ___ शतशब्दकथा
https://www.maayboli.com/node/44639

पण येस्स, नंतर मलाही तो प्रकार काही रुचला नाही.

लेखकाच्या दृष्टीने विचार करता जर तो एखाद्या विषयावर आधीच ठरवून शतशब्द कथा लिहीत असेल तर ते त्याला सुचलेल्या कल्पनेवर अन्यायकारक आहे. त्याऐवजी एखादी कल्पना वा एखादे कथाबीज सुचल्यावर त्याने विचार करायला हवे की यावर लधुकथा लिहू शकतो, की दिर्घकथा होऊ शकते. जर लघुकथाही अतिलघु होत असेल तर तेच कथाबीज शतशब्दकथा फॉर्मेटमध्ये वापरू शकतो का हे तो चेक करू शकतो.
पण त्याचवेळी त्याने ईथे हे लक्षात घ्यायला हवे की हि काही त्याच्यावर जबरदस्ती नाहीये. एखाद्याची कथा ११० शब्दांची असेल तर कोणी त्याला सुनावणार नाहीये की अरे १० शब्द काटछाट करून मारून मुटकून कथानक १०० शब्दांत बसवता येत नव्हते का तुला..
मॉरल - लेखकाने स्वत: ठरवावे त्याला काय फॉर्मेटमध्ये लिहायचे आहे.

शांता शेळके यांनी त्या त्रिवेण्या मराठीत अनुवादित केल्या आहेत. मी अनुवाद अजून वाचला नाहीये. वाचायची इच्छा नक्कीच आहे. >> नक्की वाचा. खुप सुंदर अनुवाद केला आहे. माझ्या संग्रही आहे

चार ओळींचे रामायण

आदौ राम तपोवनादि गमनं हत्वा मृगं कांचनं । वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव सम्भाषणं ॥
वाली निर्ग्रहणं समुद्र तरणं लंकापुरी दाहनं । पश्चात रावण कुम्बकर्ण हननं एतहि रामायणं ॥
इति एकश्लोकि रामायणं सम्पूर्णम् ॥

थोडं पटलं आणि थोडं नाही. प्रत्येक प्रकारच्या माध्यमाची काही वैशिष्ट्य असतात. त्याला अनुरूप लिखाण चांगलं वाटतं. शत शब्द कथा लिहिताना विषय कादंबरीचा असेल तर तुम्हाला लिहिताना शब्द अपुरे पडणारच आणि वाचकाला अर्थबोध होणार नाही. पण ह्यात चूक शशक ची नसून लेखकाची आहे. शशक ची गंमत कमी शब्दात तुम्ही काय कल्पना मांडू शकता आणि कसा अनपेक्षित धक्का देऊ शकता यात आहे. आता विषय छोटा असेल तर त्यावर मोठा लेखही कंटाळवाणा होऊ शकतो. त्यामुळे सर्व प्रकारचे लिखाण असावेच, फक्त त्या त्या प्रकारची गरज, ताकद आणि मर्यादा ओळखून लेखकांनी त्याला अनुरूप लिखाण करावे हे बरे राहील.