पंजाब मेल

Submitted by पराग१२२६३ on 3 June, 2022 - 23:46

मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती. तत्कालीन ‘ग्रेट इंडियन पेनिनसुलार रेल्वे कंपनी’ने (जी. आय. पी. आर.) ही रेल्वेगाडी सुरू केली होती. स्वातंत्र्यानंतर ‘पंजाब मेल’ मुंबई आणि भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेल्या पंजाबमधील फिरोजपूर कँटदरम्यान धावत आहे.

ब्रिटनहून भारतात नियुक्तीवर आलेल्या आणि पुढे दिल्ली, पंजाब आणि वायव्य भारतातील प्रांतांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी जाणाऱ्या आणि आपल्या भारतातील नियुक्तीचा काळ संपवून ब्रिटनला परतत असलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे लंडन आणि मुंबईदरम्यान ये-जा करणाऱ्या ‘पी. अँड ओ स्टीमर कंपनी’च्या जहाजाच्या वेळापत्रकानुसार ‘पंजाब मेल’चे वेळापत्रक ठरवण्यात आले होते. हे जहाज दर पंधरवड्याला मुंबईला येत असे. त्यातून आलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना, युरोपियनांना आणि रॉयल मेल घेण्यासाठी ‘पंजाब मेल’ मोल स्थानकातून पेशावरकडे निघत असे. 1930 पर्यंत ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’च्या पुढे मुंबई बंदरात बॅलार्ड पिअरजवळ मोल स्थानक होते. 1930 नंतर ‘पंजाब मेल’ ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’मधूनच आपला प्रवास सुरू करू लागली.

ब्रिटनचा तत्कालीन राजा जॉर्ज (पंचम) याने 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्लीत भरलेल्या विशेष दिल्ली दरबारात अखंड भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित झाल्याचे घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईहून वायव्य भारतासाठी सुरू करण्यात आलेल्या या आलिशान रेल्वेगाडीमुळे मुंबई आणि भारताच्या नव्या राजधानीदरम्यान वेगवान सेवा देता येऊ शकेल, असाही विचार करण्यात आला होता. सुरुवातीची काही वर्षे ‘पंजाब मेल’ Bombay Punjab Service या नावाने ओळखली जात होती. ‘साहेबाची गाडी’ असल्याने या गाडीत अनेक सुविधा पुरवल्या गेल्या होत्या. प्रवास लांबचा असल्यामुळे यात ‘साहेबां’साठी स्नानगृह, भोजनकक्षही उपलब्ध होते. त्यावेळी ‘पंजाब मेल’ अवघी सात डब्यांची होती. त्यात ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी प्रथम श्रेणीचे तीन, त्यांच्या नोकरांसाठी तृतीय श्रेणीचा एक आणि रॉयल मेलसाठी तीन डब्यांचा समावेश होता.

देशातील अनेक स्थित्यंतराची साक्षीदार ठरलेल्या ‘पंजाब मेल’ने गेल्या 110 वर्षांच्या वाटचालीत स्वत:तही बरेच बदल पाहिले आहेत. स्वातंत्र्यानंतर ही रेल्वेगाडी सामान्य जनतेच्या सेवेत रुजू झाली; पण त्याचवेळी या रेल्वेगाडीत मिळणाऱ्या खास सोयी आणि गाडीचा विशेष दर्जाही काढून घेतला गेला. परिणामी ‘पंजाब मेल’ अन्य मेल/एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच बनली. तरीही ‘पंजाब मेल’ची गर्दी वाढतच राहिल्याने तिची सेवा दररोज उपलब्ध करून देण्यात आली. तसेच तेव्हा या गाडीला 19 डबे जोडले जाऊ लागले होते.

1929 पर्यंत ‘पंजाब मेल’ला पूर्ण प्रवासात वाफेचे इंजिन जोडले जात असे. पण कसारा आणि इगतपुरीदरम्यानच्या थळ घाटातील बोगद्यांमधून जात असताना या गाडीतील गोऱ्या प्रवाशांना इंजिनाच्या धुराचा त्रास होत असे. त्याबाबत त्यांनी ‘जी. आय. पी.’कडे सतत तक्रारीही केल्या होत्या. या सर्व बाबींची दखल घेऊन ‘जी. आय. पी.’ने मुंबईहून इगतपुरी आणि पुण्यादरम्यानच्या लोहमार्गांचे 1929-30 मध्ये विद्युतीकरण केले आणि 1930 पासून ‘पंजाब मेल’चा मुंबई ते इगतपुरीदरम्यानचा प्रवास ‘ई/ए-1’ विद्युत इंजिनाच्या मदतीने होऊ लागला. पुढे नव्वदच्या दशकाच्या अखेरीपर्यंत ‘डब्ल्यूसीएम’ श्रेणीतील विद्युत इंजिन ‘पंजाब मेल’ला जोडले जात होते. इगतपुरीला आल्यावर तिचे विद्युत इंजिन बदलून वाफेचे इंजिन जोडले जाऊ लागले. मुंबई-दिल्लीदरम्यानच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले तरीही ‘पंजाब मेल’चे इंजिन 2012 पर्यंत इगतपुरीला बदलावे लागत होते. कारण तोपर्यंत मुंबई-इगतपुरी लोहमार्गावर 1500 व्होल्ट्स डी.सी. कर्षण (traction) प्रणाली वापरली जात होती. तिचे 25,000 व्होल्ट्स ए.सी. प्रणालीत रुपांतर पूर्ण झाल्यावर ‘पंजाब मेल’चे इंजिन इगतपुरीत बदलण्याची आवश्यकता राहिली नाही. आज मुंबई-भटिंडादरम्यान तिचे सारथ्य विद्युत इंजिनाकडे आणि भटिंडा-फिरोजपूर कँटदरम्यान डिझेल इंजिनाकडे असते.

स्वातंत्र्यापर्यंत ‘पंजाब मेल’ भारतातील प्रतिष्ठीत रेल्वेगाड्यांपैकी एक होती. त्यामुळे तिच्या मार्गात येणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांना बाजूला उभे करून या गाडीला प्राधान्य दिले जात असे. नव्वदच्या दशकात ‘पंजाब मेल’ला अतिजलद रेल्वेगाडीचा दर्जा दिला गेला. आज 110 वर्षांनंतरही ‘पंजाब मेल’ भारतातील लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/06/blog-post_4.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली माहिती.
१८६८ मधे राणीचा मुलगा आल्फ्रेड भारतभेटीवर आला होता. तुटक तुटक पण रेल्वे अधिक घोडागाडी असा तो मद्रास,कोलकाता,मुंबई, शिमला, पेशावर असा सगळीकडे फिरला होता.
((EMPRESS : QUEEN VICTORIA AND INDIA by MILES TAYLOR First Published in Marathi by Mehta Publishing House © Miles Taylor 2018

Translated into Marathi Language by Varsha Welankar सम्राज्ञी : महाराणी व्हिक्टोरिया आणि भारत । इतिहासपर अनुवाद : वर्षा वेलणकर

प्रथमावृत्ती : जानेवारी, २०२२ किंमत : ₹६५० P Book ISBN 9789392482434 EBook ISBN 9789392482441
या पुस्तकातून))

१८६८ मधे भारतात खूप कमी आणि तुकड्या-तुकड्यांमध्ये लोहमार्ग उभारले गेले होते. फक्त कोलकाता आणि दिल्ली या दोनच महानगरांदरम्यान थेट लोहमार्ग उपलब्ध होता.

मस्त माहिती. विकीवर पंजाब मेल आणि पंजाब लिमिटेड अशा दोन गाड्यांचे वर्णन आहे.

पुढे नव्वदच्या दशकाच्या अखेरीपर्यंत ‘डब्ल्यूसीएम’ श्रेणीतील विद्युत इंजिन ‘पंजाब मेल’ला जोडले जात होते. >>>

कसारा घाटातील डब्ल्यूसीएम इंजिनांबद्दल या रेल्वेशी काहीही संबंध नसलेल्या चित्रपटातील गाण्यात एकदम सुंदर चित्रीकरण आहे घाटाचे व इंजिनांचे. पुणे-मुंबई लाइन्स वर तर १९९६ च्या आधी बहुतेकांनी बघितली असतील ही इंजिने. या क्लिप मधे एकच इंजिन नसून ३-४ वेगवेगळी इंजिने आहेत. त्याबद्दल मी वेगळ्या लेखात लिहीलेले आहे. पण ते इथे अवांतर होईल - या इंजिनांच्या संदर्भात मात्र ती क्लिप इंटरेस्टिंग आहे.
https://www.youtube.com/watch?v=4bIQNbHofs0

कल्याण - दिल्ली
१७/१९/२२/२७ तासांत जाणाऱ्या गाड्या आहेत. अगदी दुसऱ्या गाड्यांंचे आरक्षण नसले की पंजाब मेल (12137)शोधतात.२५ तास. 3AC RS. 1700.
या गाडीने खांडव्याला पहाटे पाचला पोहोचून लगेच सवापाचची मीटर गेज मिळे ओंकारेश्वर जायला. म्हणून लागे. ती मीटरगेज काढली आणि ब्राडगेज अजून आली नाही पाच वर्षे.

रविवारी जाणारी दर्शन एक्सप्रेस पुणे दिल्ली(12493) 3AC rs. 1630 साडे सतरा तासात जाते. म्हणजे राजधानीपेक्षा चांगली आहे.

मंगला एक्सप्रेस २५ तास, 3AC, 1600/-

Rajdhani (22221),सतरा तास, 3AC रु ३०००.

सीएसटी अमृतसर (11057),२७ तास, 3AC RS.1500/-