क्रिप्टो ( Crypto ) भाग ५

Submitted by मिलिंद महांगडे on 22 May, 2022 - 10:36

₿₿₿

गाडी जुहूच्या दिशेने सुसाट निघाली. रस्त्यात येईल त्या वाहनाला हॉर्न देत, ओव्हरटेक करत त्यांची गाडी वेगात पुढे चालली होती . गाडीचा ड्रायव्हर हरी म्हणजे एक पायलटच होता . मिळेल त्या जागेतून गाडी काढण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नव्हता आणि इतकं होत असूनही आजपर्यंत गाडीला कधी टचसुद्धा झाला नव्हता. तो त्याच्या कामात मास्टर होता. वेस्टन एक्सप्रेस हायवेवर बरीचशी ट्रॅफिक असूनही त्याने पाऊण तासात जुहू गाठले . श्रीमती रागिणीच्या सी-व्हियू बिल्डिंगसमोर गाडी येऊन थांबली. बिल्डिंग चांगल्या स्थितीत होती. प्रत्येक फ्लोर वर एक फ्लॅट , अशा प्रमाणे प्रशस्त फ्लॅट होते. श्रीमती रागिणी दुसऱ्या मजल्यावर राहात होती. बिल्डिंगच्या मागच्या बाजूला माडांचं छोटंसं बन आणि त्याला लागूनच समुद्र होता. गेटच्या वॉचमनने पोलीस आल्याची वर्दी आत दिली. ते सर्वजण आत गेले. समोर निळाशार समुद्र पसरलेला होता. त्या समुद्राकडे बघत एक तरुणी प्रशस्त अशा बाल्कनीमध्ये बसलेली होती . घरातल्या म्हाताऱ्या नोकराने त्या तिघांना तिथे आणले. ती तरुणी पाठमोरी बसली होती. केस वाऱ्यावर उडत होते. तिने पांढरी शाल पांघरली होती. वाघचौरे साहेब आणि त्यांचा स्टाफ स्तब्ध उभे राहिले .
" मॅडम, पोलीस स्टेशनमधून साहेब आलेत. " म्हाताऱ्या नोकराने अदबीत त्या तरुणीला सांगितले.
" ठीक आहे . " म्हणत तिने सुस्कारा सोडला. अद्याप ती समुद्राकडेच पहात होती. जणूकाही तिला त्या ऑफिसर्सशी काही देणं घेणं नव्हतं. अमर आणि वाघचौरे साहेबांनी एकमेकांकडे पाहिलं. वाघचौरे साहेबांनी अमरला खुण केली .
" एक्स्क्यूज मी मॅडम .... " अमर पुढे काही बोलणार इतक्यात श्रीमती रागिणी म्हणाली , " जस्ट अ मोमेंट ऑफिसर, प्लिज " ती अजूनही समुद्राकडे एकटक बघत होती. डोळे पुसले आणि थोड्या वेळाने तिने मागे वळून पाहिलं. श्रीमती रागिणी दिसायला अतिशय सुंदर होती. एखाद्या फिल्मची हिरोईन शोभली असती , गोरीपान , नितळ कांती , कपाळावर डाव्या बाजूला जुन्या जखमेची बारीकशी खूण होती , घारे डोळे लालसर झालेले दिसत होते . वय फार फार तर तिशीच्या आत असेल . लेडी कॉन्स्टेबल कवठेकर आणि सौदामिनी मॅडम सोबत होत्या हे बरं झालं असं अमरला उगाचच वाटून गेलं .
" येस ऑफिसर ... " तिच्या डोळ्यांतले अश्रू लपवत ती म्हणाली .
" ऍक्चुली , वी आर फ्रॉम सायबर क्राईम डिपार्टमेंट . ही इज माय सिनिअर , पी आय वाघचौरे सर , शी इज मिसेस कवठेकर , मायसेल्फ सब इन्स्पेक्टर अमर अँड शी इज सौदामिनी मॅडम … "
“ फ्रॉम सिरिअस फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन ऑफिस … ”, अमरचं राहिलेलं वाक्य सौदामिनी मॅडमने पूर्ण केलं.
“ सिरिअस फ्रॉड ? म्हणजे मला काही समजलं नाही. ” , ती म्हणाली.
“ ते डिपार्टमेंटचं नाव आहे मॅडम आमच्या . ”, सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
“ ओह ! म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय कि ह्यात फ्रॉड झालाय ? ” रागिणीने काहीशा आश्चर्याने विचारलं.
“ तसं नाही मॅडम , त्या सिरिअस फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन ऑफिसच्या ऑफिसर आहेत आणि …. ” अमर पुढे काही बोलणार इतक्यात त्याचं बोलणं तोंडात सौदामिनी मॅडम म्हणाल्या , “ होय , आम्हाला असं वाटतंय कि ह्यात फ्रॉड झाला असण्याची शक्यता आहे. ”
“ हाऊ कॅन यु से लाईक दॅट… आय हॅव लॉस्ट माय हजबंड मॅम… माझ्यावर काय ओढवलं आहे माझं मलाच माहीत ! ”, रागिणी रडवेल्या चेहऱ्याने म्हणाली.
“ सो व्हॉट ? हजारो लोकांचे पैसे बुडालेत तुमच्या एक्स्चेंजमुळे ”, सौदामिनी मॅडम त्याच रागात म्हणाल्या.
“ एक मिनिट , एक मिनिट … सौदामिनी मॅडम तुम्ही जरा थांबा . आपण आधी शांतपणे बसुया मग सुरुवात करू … एकदम हमरी तुमरी वर येऊ नका. शांतपणे बोलूनसुद्धा चौकशी करता येऊ शकते. ” , वाघचौरे साहेबांनी मध्यस्ती केली.
" आय … आय एम सॉरी ... प्लिज हॅव अ सीट ... " सर्वजण त्या प्रशस्त हॉलमध्ये बसले. त्यातलं फर्निचर किमती असल्याचे दिसत होते. समुद्राच्या दिशेला मोठ्या फ्रेंच विंडो होत्या. त्यांना पांढऱ्या रंगाचे आणि बारीक नक्षीकाम केलेले उंची पडदे लावलेले होते. त्यापलीकडे प्रशस्त बाल्कनी होती. बाल्कनीत रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या. माडांच्या झाडांना चुकवत खारा वारा समुद्रावरून आत येत होता. भिंतींना पांढऱ्या रंगाचा वेलवेट पेंट केला होता. पांढऱ्या भिंतीवर समोर लावलेलं मॉडर्न आर्टचं भडक रंगांचं पेंटिंग लक्ष वेधून घेत होतं. त्याच्या बाजूच्या भिंतीवर भला मोठा एल सी डी स्क्रिन होता. त्याच्या बाजूला एक छोटंसं शो केस त्यामध्ये श्रीमती रागिणी आणि ओमी मिरचंदानीच्या फोटोची फ्रेम ठेवलेली होती. त्यात कुरळ्या केसांचा, आणि डोळ्यांना जाड काळ्या फ्रेमचा चष्मा लावलेला, दाढी वाढवलेला ओमी मिरचंदानी दिसायला फार काही चांगला नव्हता , रागिणी सारखी सुंदर स्त्री त्याच्या प्रेमात कशी काय पडू शकते ह्याचं अमरला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. माणसाकडे पैसा असला कि सगळी सुखं त्याच्या पायाशी लोळण घेतात हेच खरं …
" मॅडम आम्ही इथे का आलोय ह्याची आपल्याला कल्पना असेल . मराठी समजता है ना आपको ? " वाघचौरे साहेब म्हणाले .
" हो , समजतं . मी मुंबईचीच आहे . बोला , व्हॉट कॅन आय डु फॉर यु ? " ती म्हणाली. वाघचौरे साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला .
" तुमचे मिस्टर ओमी मिरचंदानी आणि त्यांच्या कंपनीबद्दल थोडी चौकशी करायची आहे. तुम्हाला आमच्या सोबत पोलीस स्टेशनला यायला लागेल. " वाघचौरे साहेब असं म्हणाले आणि रागिणी एकदम थक्क झाली .
" पोलीस स्टेशन ? पोलीस स्टेशनला का ? " , ती विचारू लागली.
" ऐकायला आलं नाही का ? चौकशीसाठी ! " सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
रागिणीने आपले तोंड ओंजळीत झाकले आणि ती रडू लागली . अवघड परिस्थिती झाली .
“ एक मिनिट ! रडण्यासारखं काही नाही ह्यात. नुसती चौकशी करायची आहे. ” , सौदामिनी मॅडम आवाज चढवत म्हणाल्या.
" चला मॅडम " लेडी कॉन्स्टेबल कवठेकर म्हणाल्या . अद्याप ती ओंजळीत तोंड झाकून बसली होती. “ मॅडम चला ” त्या घाई करत म्हणाल्या. रागिणीने डोळे पुसले.
" सर, तुम्ही मला अर्रेस्ट करणार का ? " ती वाघचौरे साहेबांच्या डोळ्यांत पहात म्हणाली .
" अरेस्ट नाही . चौकशीसाठी नेत आहोत , काही प्रॉब्लेम नाही . प्लिज को- ऑपरेट " , अमर समजुतीच्या सुरात म्हणाला.
" कॅन आय कॉल माय लॉयर ? "
" ऍक्चुली , तसा काही प्रॉब्लेम नाही .... " अमर पुढे काही बोलणार इतक्यात तिने बाजूला ठेवलेला फोन उचलला आणि तिच्या वकिलाला फोन लावला .
" ओ मॅडम , तुम्ही कशाला प्रकरण वाढवताय ? चला लवकर साधी विचारपूस करायची आहे. " सौदामिनी मॅडमनी चांगलाच दम दिला .
" ऑफिसर , प्लिज ... " म्हणत तिने परवानगी मागितली. थोडा विचार करून वाघचौरे साहेबांनी मूक संमती दिली. सौदामिनी मॅडमना तिला ही दिलेली सूट आवडली नाही . ती वाघचौरे साहेबांकडे आश्चर्याने पाहू लागली . ' ठीक आहे ' अशा अर्थाचा चेहरा करून त्यांनी सौदामिनी मॅडम ना इशाऱ्याने खुणावलं. रागिणीने लगेच तिच्या वकिलांना फोन लावला. ती थोडं बाजूला जाऊन बोलू लागली. सर्वजण उठून उभे राहिले . बोलता बोलता ती बाल्कनीत गेली . बोलून झाल्यावर तिने फोन ठेवला .
" ठीक आहे . चला , " ती म्हणाली . सर्वजण दरवाज्यापर्यंत आले असतील तेवढ्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला , अमरने मागे वळून पाहिलं तर श्रीमती रागिणी बेशुद्ध होऊन खाली पडली होती .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users